सूर्याची पिल्ले

Submitted by अरूण on 8 August, 2010 - 10:37

सूर्याची पिल्ले --- नाटक तसं जुनच. वसंत कानेटकरांनी लिहिलेलं.

१. ५ एप्रिल १९७८ साली "धी गोवा हिंदु असोसिएशन" प्रथम रंगमंचावर आणलेलं. दिग्गज कलाकारांनी रंगवलेलं. नुसती नावं जरी घेतली तरी कल्पना येते. माधव वाटवे, बाळ कर्वे, दिलिप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापुरकर, शांता जोग इत्यादी इत्यादी.
२. व्हीसीडी च्या जमान्यात याच पुर्वीच्या संचात थोडेफार फरक करून सर्वांपर्यंत पोहोचलेलं हे नाटक. कानेटकरी विनोदाची एक वेगळीच मांडणी आणि जातकुळी सांगणारं हे नाटक. काळ बदलला तरी संदर्भ फारसे न बदलल्यामुळे ताजं वाटणारं.
३. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील पहिल्या अशा "आठवणीत रुतून बसलेल्या श्रेष्ठ नाट्यकृतींच पुनर्मंचन" म्हणजेच सुबक निर्मित सुर्याची पिल्ले.

स्वातंत्र्यसूर्य पंजाबराव तथा आबाकाका कोटीभास्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त असलेला कार्यक्रम ही या नाटकाची सुरुवात. या आबाकाकांचे ४ चिरंजीव - पांडूअण्णा, बजरंगा, रघुराया आणि श्रीरंगा. स्वातंत्र्यसूर्यांचे वारसदार असल्यामुळे आपणही काही थोर आहोत आणि आपल्याकडून सुद्धा काही दिव्य घडतं आहे ही या पुत्रांची विचारसरणी. अर्थात याला अपवाद म्हणजे श्रीरंगा. आबाकाकांनी सुरु केलेल्या विविध संस्थांचे एकमेव ट्रस्टी जांबुवंतराव ठाणेकर यांच्या मदतीने श्रीरंगा आपल्या इतर भावांना कसं सुधरवतो याची ही कहाणी. याला उपकथानक म्हणून ठाणेदारांची कन्या आणि रघुराया यांचं प्रेमप्रकरण सुद्धा आहे.

आबाकाकांच्या स्मरणार्थ होणार्‍या पुण्यतिथीच्या कार्यक्रमापासून सुरू होणारं नाटक श्रीरंगाच्या वाक्याने शेवटाकडे जातं "आपण जितक्या लवकर आबाकाकांना विसरू तितक्या लवकर आपले पाय जमिनीवर येतील." म्हणजे केवळ आपल्या पुर्वजांच्या पुर्वपुण्याईवर आपण जगू शकत नाही किंवा जगू नये असा काहीसा संदेश या नाटकात आहे.

आज या पुनर्निमित नाटकाचा अकरावा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. त्यानिमित्ताने नाटका बद्दल आणि नाट्यप्रयोगाबद्दल थोडं काही ........

व्हीसीडी मुळे परत परत बघितलं गेलेलं हे नाटक. ते देखिल दिलिप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापुरकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांकडून सादर केलं गेलेलं. त्यामुळे ही नव्या दमाची फौज काय करते ही उत्सुकता होतीच मनामध्ये. कारण शेवटी नविन कलाकारांकडून पाहात असलेल्या नाटकाची कुठेतरी आधीच्या संचाबरोबर तुलना होणं स्वाभाविक होतं. परंतू नाटक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत ही अशी तुलना झालीच नाही, इतकं या नविन मंडळींनी आम्हाला नाटकात गुंतवून ठेवलं.

अर्थात हा नविन संच काही लेच्यापेच्या कलाकारांचा नाहिये. वैभव मांगले, आनंद इंगळे, पुश्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, उज्ज्वला जोग, आतिशा नाईक, उदय सबनिस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षिती जोगच्या आजारपणामुळे आयत्या वेळेस उभी राहिलेली शर्वरी पाटणकर ही या नाटकाची सध्याची टीम. सगळ्यांचीच कामं एकापेक्षा एक सरस.

या पुनर्जिवित नाटकात फक्त कलाकारचं नविन होते असं नाही, तर काही नविन पद्धती सुद्धा अवलंबिल्या गेल्या. निदान माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या पद्धती मी फारशा काही मराठी नाटकांमध्ये बघितल्या नाहीत. या पद्धती मला तरी भावल्या.

१. साधारणपणे आपण नाट्यग्रूहात गेल्यावर, तिकिट दाखवलं की डायरेक्ट आपल्या सीट्वर जाउन बसतो. पण इथे, नाट्यग्रूहात शिरल्यावर चक्क बायकांचं स्वागत गजरे देऊन आणि पुरुषांचं स्वागत गुलाबाची फुलं देऊन झालं.
२. फुलांचा सुगंध घेत असतानाच तिथे असलेल्या स्वयंसेवकांनी एक पत्रक हातात दिलं. त्या पत्रकात नाटकाबद्दलची माहिती, कलाकारांची नावं त्यांच्या फोटो आणि सही सकट आहेत. मुख्य म्हणजे क्षिती जोग या प्रयोगात काम करणार नाहिये, याची माहिती सुद्धा पत्रकात उपलब्ध आहे.
३. नाटक संपल्यानंतर पडदा पडायच्या आधी, एक एक करून सगळे कलाकार पुन्हा एकदा रंगमंचावर आले, प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी. या इथे सगळ्या टीमबरोबर टीमचा कप्तान उर्फ निर्माता सुनिल बर्वे पण आला.

तिसरा अंक सुरु होण्याआधी सुनिल ने प्रेक्षकांशी संवाद साधत, या उपक्रमाबद्दल अधिक माहिती पुरविली. या एका वर्षात यासारखी अजून ४ नाटकं सुबक तर्फे रंगमंचावर येणार आहेत. प्रत्येक नाटक वेगवेगळे दिग्दर्शक दिग्दर्शित करणार आहेत. प्रत्येक नाटकाचे फक्त २५ प्रयोगच होणार आहेत. अर्थात याबद्दल त्यांची काही गणितं असतील, पण माझ्या सारख्या प्रेक्षकाची एकच अपेक्षा आहे, की या २५ प्रयोगांनंतर या अशा प्रकारच्या नविन संचातील नाटकांचं योग्य ते जतन व्हायला हवं. म्हणजेच याच्या व्हीसीडीज किंवा डिव्हीडीज यायला पाहिजेत.

एकंदरीत २५ प्रयोगांपैकी ११ प्रयोग तरी झालेत. उरलेल्या प्रयोगांमध्ये तुम्हाला चान्स मिळाला तर तो अजिबात चुकवू नका.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुण, मस्तच रे ! तू सुनील बर्वेने परत चालू केलेली इतरही नाटकं बघितलीस तर त्याबद्दलही लिही.

हे मूळ संचातले नाटक मी बघितले आहे (त्या नाटकाने पण एक नवीन पद्धतीची जाहीरात केली होती. म्हणजे जाहीरातीत फक्त आडनावे असत. जसे वाटवे, प्रभावळकर, अमरापूरकर, गोखले, जोग अशी )
या नव्या प्रयोगाचे जतन होणे अत्यावश्यक आहे. नाहीतर २५ प्रयोग काय, दोन तीन महिन्यात होऊन जातील.
परत रंगमंचावर यावीत, अशी अनेक नाटके आहेत !!!!!

सुनील बर्वेने स्वतःच्या नाट्यकारकिर्दीच्या पंचवीशीनिमित्ताने सुरू केलेला हा उपक्रम आहे. जुन्या प्रसिद्ध नाटकांचे नवीन संचात पुन्हा प्रयोग, अशी कल्पना. मोठे कलाकार घेता यावेत, त्यांच्या डेट्स सहज मिळाव्यात, हा हेतू फक्त पंचवीसच प्रयोग करण्यामागे आहे. (पण दुर्दैवाने तिकिटाचे दर आणि नाट्यगृहाच्या तारखांवरून अनाठयी वादही सुरू झालेत.) कालच्या 'लोकरंग' मध्ये सुनील बर्वेच्या या प्रयोगांवरचा एक लेख वाचनात आला.

वाटवे, प्रभावळकर, अमरापूरकर, गोखले, जोग हीच कलाकार मंडळी सुरुवातीपासून होती का? काशिनाथ घाणेकरने या नाटकात काम केले आहे का ???

अशी नाटके पहायला नक्कीच आवडतील Happy

परत रंगमंचावर यावीत, अशी अनेक नाटके आहेत>>>>> अनुमोदन Happy

मी पण बघितल काल !!!! मस्त अनुभव !! प्रत्येकाने बघावेच !!
पण दुर्दैवाने तिकिटाचे दर आणि नाट्यगृहाच्या तारखांवरून अनाठयी वादही सुरू झालेत.) कालच्या 'लोकरंग' मध्ये सुनील बर्वेच्या या प्रयोगांवरचा एक लेख वाचनात आला>>>>> मला तर हा वाद अनाठायी वाटतो आहे.. सगळे प्रयोग हाउसफुल्ल होता अहेत त्या मुळे बाकी निर्मात्यांना त्रास झाला असावा.. तिकीटाचे दर जास्त आहेत पण जर त्यात दर्जा / आनंद मिळत असेल तर जास्त दराने पण तिकीट काढुन लोक येतात असे कालची गर्दी बघुन वाट्ले!!
बाकी गोष्टी जाउ द्या पण खुप छान व स्तुत्य उपक्रम आहे.

तिकीटाचे दर जास्त आहेत पण जर त्यात दर्जा / आनंद मिळत असेल तर जास्त दराने पण तिकीट काढुन लोक येतात असे कालची गर्दी बघुन वाट्ले!! >>>>>>> अनुमोदन काशी. कालचा प्रयोग पण हाऊसफुल्ल होता .......... Happy

वा! अरुण. सुबक बद्दल ऐकलं, वाचलं होतं. तू अनुभव इथे शेअर केलास त्यामुळे आता खरंच सुबक ला दाद देण्यासाठी जावेसे वाटत आहे. धन्यवाद. Happy

मंजिरी, या नाटकात हीच मंडळी होती.
डॉ. घाणेकरांची आठवताहेत ती नाटके, गारंबीचा बापू ( उषाकिरण / आशालता ), गुंतता हृदय हे (आशा काळे ) इथे ओशाळला मृत्यू, अंधार माझा सोबती (फैयाज), अश्रुंची झाली फूले, आनंदी गोपाळ (सुहास जोशी )
मला वाटते मर्यादीत प्रयोग संख्या, हि कलाकार उपलब्ध नसणे, थिएटर उपलब्ध नसणे, प्रेक्षकांच्या प्रतिसादाची खात्री नसणे, अशा कारणांसाठी असेल. यापेक्षा, या नाटकांचे दर्जेदार रित्या चित्रीकरण करण्याचा आग्रह धरु या.

अरुण, मस्तच. परिक्षण छान आणी बाकी तू लिहिलेल्या पद्धतीही आवडल्या.

जास्त म्हणजे किती महाग आहे या नाटकांची तिकीटे?

अरूण, धन्यवाद. ऐकून होतो, आता प्रथमहस्ते वार्तापत्र मिळाले Happy
हे नुकतेच टीव्हीवर पाहिले, त्यात तो असंभवमधला लटपटआजोबा होता. बरा कास्ट होता. पण लेखन मात्र भन्नाट आहे. तू म्हणतोस तसे शेवटी तर श्रीरंगाच्या तोंडून एक से एक षटकार आहेत. त्याचे 'मी आता काय करणार, का करणार' वगैरे सांगणे तर महानच. हे बघायलाच पाहिजे.

जुन्या म्हणजे अगदी जुन्या नाही, पण दिलिप प्रभावळकर, सदाशिव अमरापुरकर, बाळ कर्वे काम करीत असलेली व्हीसीडी उपलब्ध आहे.

अरुणराव, या नाटकाबद्दल आधीच माहिती पाहिजे होतं, आम्ही पण पहिल्यांदा या नाटकाला जाऊ म्हणून बेत केला होता, पण नवीन नाटक आहे, तेव्हा जरा परिक्षण वाचूनच जाऊ पुढच्या वेळेस म्हणून संधी गमावली Sad , असो पुढच्या वेळी ज्यावेळी नाटक लागेल पुण्यात तेव्हा नक्की जाईन.

या परिक्षणाबद्दल धन्यवाद. Happy

ह्या शनिवारी शिवाजी मंदिरात आहे हे नाटक. सकाळी ऑफिसला उशीर होत असतानासुध्दा तासभर उभे राहून रांगेत ति़किट काढलं. ३०० ची तिकिटं तर पहिल्या काही मिनिटातच संपली. एकेका माणसाने १०-१५ तिकिटं घेतल्यावर आणखी काय होणार म्हणा. वर कोणी एक फोटोग्राफर रांगेचे फोटो काढत होता. बहुतेक "मराठी नाटकांचं सुवर्णयुग परतलंय" किंवा "दर्जेदार नाटकांसाठी मराठी प्रेक्षक आहे" असल्या छापाच्या लेखासाठी असेल. त्याला रांगेतल्या चिडलेल्या लोकांनी तिकिटाच्या तक्त्याचा फोटो काढायला सांगितला. काही लोक तर म्हणत होते की सिनियर सिटिझन्ससाठी कोटा ठेवा, कारण रांगेतले सगळ्यात पुढचे मेंबर ह्याच वयोगटातले होते. Sad

२५० च्या तिकिटाच्या सीटवरून नाटक दिसलंच तर पुढल्या आठवड्यात पोस्टेन इथे Sad

शनिवारी शिवाजी मंदिरात प्रयोग पाहिला. फार छान झाला. एक तास रांगेत उभं राहून तिकिट काढल्याचं सार्थक झालं. नेटवर काही ठिकाणी अनिकेत विश्वासराव ह्या संचात विसंवादी वाटतो अश्या कमेन्टस वाचल्या होत्या. मला तरी त्याचं काम आवडलं. फक्त नाटक संपायला जवळजवळ ११:४५ झाल्याने घरी जायला बराच उशीर झाला. नाटक निदान ७:३० ला असायला हवं होतं. Sad

कालच यशवंतरावला नाटक पाहीलं. धम्माल आली. कालची संध्याकाळ अविस्मरणीयच झाली. वैभव आणि आनंदला भेटलो. Happy रादर सगळ्यांनाच भेटलो. प्रेक्षकात अतुल कुलकर्णी होते त्यांनाही ..
अनिकेत विश्वासराव मला पण नाही आवडला. आतिषा नाईक सहीच. पण एकंदरीत नाटक मस्तच.

Pages