First Things First

Submitted by अश्विनी कंठी on 7 August, 2010 - 18:41

आपण सगळेच जण आपल्या रोजच्या रुटीन मध्ये वेळेचे नियोजन (Time Management) करत असतो. त्या विषयावरची वेगवेगळी पुस्तके वाचत असतो, टिप्स मिळवत असतो. अश्याच एका प्रयत्नामध्ये काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात एक उल्लेखनीय पुस्तक आले.ते पुस्तक आहे Stephen Covey चे First Things First. तुम्ही वाचले आहे का हे पुस्तक ? ज्यांनी अजून वाचलेले नाही त्यांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

या पुस्तकामध्ये एक छान गोष्ट मांडली आहे, ती म्हणजे आयुष्य अर्थपूर्ण आणि परिपूर्ण बनवण्यासाठी वेळेचे गणित कसे मांडायचे या विषयीचे मार्गदर्शन.आयुष्यात Time management सगळ्यांनाच करावे लागते.पण आयुष्य सुंदर करण्याकरता, आयुष्याला अर्थ देण्याकरता फक्त तेवढेच करून भागत नाही, तर प्रथम आपल्या विचारांची दिशा बदलावी लागते. आणि हेच लेखकाने या पुस्तकात सांगितले आहे.

वेळेचे नियोजन या विषयावर आत्ता पर्यंत अगणित पुस्तके लिहिली गेली आहेत. कमी वेळात जास्त कामे कशी करावी ,वेळेची आखणी कशी करावी,अशी अनेक वेळेशी निगडीत असलेली तंत्रे शोधली गेली.उदा. यादी बनवा, किंवा प्राधान्य ठरवा किंवा कामे दुसर्यावर सोपवा,ए बी सी अनालिसिस करा,८०-२० चा नियम लावा असे उपाय एका पाठोपाठ विकसित झाले.पण हे सगळे उपाय होते कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम कसे करायचे ह्या प्रश्नाशी निगडीत. लेखकाच्या मते ही सगळी कालबाह्य तंत्रे झाली. ह्याचा उपयोग नाही असे नाही. पण आयुष्य अर्थ पूर्ण बनवण्य करता आयुष्याचे सुकाणू कोणत्या दिशेला जात आहे हे ओळखणे जास्त महत्वाचे आहे असे लेखकाला वाटते..

लेखक म्हणतो आपण कितीही वेळेचे उत्तम नियोजन केले तरी आपल्याला आपल्या आवडत्या गोष्टी करायला वेळ बाजूला काढता येत नाही. त्यामुळे किती तरी मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात. वाटते, काय अर्थ आहे या आयुष्याला? अश्या वेळेस काय करावे? पुस्तकाची सुरुवातच लेखकाने अशी केली आहे कि सांगा तुमच्या मनात अशा कोणत्या गोष्टी आहेत कि ज्या केल्याने तुम्हाला तुमचे आयुष्य सार्थकी लागले असे वाटणार आहे? या वर्गात बसणाऱ्या फक्त ३-४ महत्वाच्या गोष्टी लिहून काढा.प्रथम ठरवा तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे. मग लेखक विचारतो की या ३-४ गोष्टीना तुम्ही पुरेसा वेळ देत आहात का, याचा विचार करा. किंवा असा विचार करा कि तुमच्या साठीशांतीला तुमच्याबद्दल लोकांनी काय म्हणावे असे तुम्हाला वाटते? या प्रश्नामधून आपल्याला अनेक प्रश्नाची उत्तरे सापडतात. या प्रश्नामध्ये उभ्या आयुष्याचे गमक दडलेले आहे. या ३-४ गोष्टी म्हणजेच First Things आणि या First Things ना आयुष्यात प्राधान्य द्यायचे ह्याबद्दल लेखकाने मार्ग सांगितले आहेत.

खरे तर आपल्याला हे अनेकदा जाणवत असते कि आपण आपल्या रुटीन मध्ये, रोजच्या जबाब दार्या मध्ये किंवा अचानक उपटणार्या प्रश्नात इतके अडकून गेलेलो असतो की आपण कसे जगायचे ठरवले होते, कसे स्वताला घडवणार होतो, कसे मुलांना वाढवणार होतो, हे सगळे विचार काळाच्या ओघात मागे पडले आहेत. कधी तरी अंतर्मुख झाल्यावर जाणवते की नकळतपणे आपण ऐहिक सुखाच्या मागे धावतो आहोत, अनुभव गोळा करण्या पेक्षा वस्तू गोळा करणात धन्यता मानतो आहोत. या सगळ्यामुळे व्यक्ती म्हणून स्वताची उन्नती करायचे पार विसरून गेलेलो आहोत. मग आपण ' वेळ कोठे मिळतो ?' या सबबी खाली हे सगळे विचार झटकून टाकतो आणि परत पहिले पाढे पंचावन्न. पण यामध्ये तुम्ही आनंदी नसता, समाधानी नसता.

लेखक म्हणतो जोवर तुम्ही एक अर्थपूर्ण,परिपूर्ण जीवन जगत नाही तोवर तुम्हाला तुमच्या आयुष्याला काही अर्थ आहे असे वाटत नाही. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला फक्त अर्जंट आणि महत्वाची कामे करायची सवय असते,आणि या ज्या First Things आहेत त्या महत्वाच्या जरी असल्या तरी नेहमीच नॉन अर्जंट असतात आणि म्हणूनच त्या बाजूला पडतात. लेखक प्रथम आपल्याला ही सगळी महत्वाची,अर्जंट, नॉन अर्जंट, कमी महत्वाची कामे ओळखायला शिकवतो आणि मग First Things ला प्राधान्य द्यायला शिकवतो. रोजच्या रुटीन मध्ये ते कसे बसवायचे हे सांगतो. हे सांगत असताना लेखकाने अनेक शक्यता पण विचारात घेतल्या आहेत. जसे की माणूस म्हणजे काही यंत्र नव्हे. भावना मध्ये येतात, नाती सांभाळावी लागतात ,अनपेक्षित घटना घडतात. या सगळ्या गोष्टी आपल्या रुटीनचा पार बोर्या वाजवतात. या सर्व अडथळ्यांचा, शक्यता-अशक्यताचा विचार करत, हा कठीण वसा कसा सांभाळायचा हे लेखकाने सांगितले आहे.

हा वसा काही सोपा नाही. रोजच्या रोज नियमाप्रमाणे वागणे शक्य नसते. त्या करता सगळ्यात आधी गरज पडते मनोनिग्रहाची. हा मनोनिग्रह कसा मिळवायचा हे पण लेखकाने फार सुरेख पद्धतीने सांगितले आहे. तसेच कधी नियम वाकवणे (किंवा वेळप्रसंगी मोडणे) योग्य असते यावर देखील मार्गदर्शन केले आहे.

पुस्तक मोठे आहे - ३०० पानांचे. आणि त्यात पानोपानी इतके काही सांगितले आहे कि ते पुस्तक एका बैठकीत बसून संपवण्यासारखे नाही. लेखकाने असंख्य प्रशन विचारून आपल्याला अन्तर मुख होण्यास प्रवृत्त केला आहे. प्रत्येक प्रकरण वाचून झाल्यावर त्यात सांगितलेल्या गोष्टींवर विचार करून, मनन चिंतन करून त्या गोष्टी आपल्या आयुष्यात कश्या समाविष्ट करता येतील किंवा आपल्या आयुष्यात कोणते बदल करायला हवे आहेत याचा आढावा घेऊन मगच पुढचे प्रकरण वाचणे गरजेचे आहे.

तर्......अश्या असंख्य मार्गदर्शक तत्वांनी भरेलेले हे पुस्तक आहे. पुस्तक जेव्हा संपते तेव्हा आपल्याला आपण स्वताला एक समृद्ध व्यक्ती म्हणून कसे घडवायचे ,कसे आयुष्य परिपूर्ण आणि अर्थपूर्ण बनवायचे हे कळलेले असते. कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे ,कधी काम-धाम विसरून ते ते क्षण फक्त मनापासून उपभोगायचे ...अश्या अनेक आत्ता पर्यंत न सापडलेल्या कित्येक प्रश्नाची उत्तरे सापडतात आणि हे उत्तरे दुसर्या कोणी आयती दिलेली नसून तुमची तुम्हीच शोधून काढलेली असतात,आपल्या सगळ्या मर्यादांचा,शक्यतांचा विचार करून आपण आपला मार्ग ठरवलेला असतो ही या पुस्तकाची फार मोठी जमेची बाजू आहे. आणि मग हे पुस्तक आपले 'गीता-भागवत' न झाले तर च नवल.

गुलमोहर: 

सेव्हन हॅबीट चा एक छोटेखानी ग्रंथच आटोपशीर लिहिला आहे तुम्ही. मी वाचलेय आणि आचरणात आणून फायदा पण घेतला. अजुन काहि पुस्त्के पण चांगलीच वाचनीय आहेत. उदा रीच डॅड पुअर डॅड्,किवा मजेत कसे जगावे कसे {शिवराज गोर्ले},मराठी तरुणानो श्रीमंत व्हा { शाम भुर्के},व्हू मूव्हड माय चीज. यावर पण लिहा.

छान लिहिलत! असच एक उल्हास कोल्हटकर यांच पुस्तक वाचलं,टाईम मॅनेजमेंट करता करता ते नीरस न होता तुम्हांला त्याचा आनंद घेता आता पाहिजे.
रिच डॅड पुअर डॅड मीही वाचलय, पण आज अजून काही चांगल्या पुस्तकांची नावे मला कळली! धन्यवाद सुनील जोग.

हे झाले रोजच्या जगण्यातले..पन एकंदर आयुष्यातल्याच प्राथमिकता कशा ठरवायच्या याची एक गोष्ट मी वाचलेली : एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना एक जार jar आणि लहान मोठ्या आकाराचे पुष्कळ दगड देतात. काही अगदे बारीक खडे, आणि जास्तीत जास्त खडे त्या जार मधे भरायला सांगतात.
जे विद्यार्थी आधी लहान आणि मग मोठे खडे भरतात त्यांच्या खड्यांची संख्या जास्त भरते, पण एकंदरित वस्तुमान मात्र ज्यांनी आधी मोठे व मग लहान खडे भरले त्यापेक्षा कमीच असते. ज्यांनी मोठे खडे आधी भरले त्यांचा जार हलवला तर आणखी लहान खड्यांनाही जागा होते...पण आधी लहान खडे भरणार्‍यांना असे करता येत नाही.
आपले कुटुंब, स्वास्थ्य, स्थैर्य हे आय्ष्यातले मोठे खडे, खूप पैसा, करीअर हे मध्यम खडे, उपभोगाच्या वस्तू, प्रसिद्धी हे लहान खडे.