पारंपारीक चिकन/मटण रस्सा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2010 - 06:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो चिकन किंवा मटण
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर वाटण २ ते ३ चमचे
२ बटाटे कापुन
लसुण पाकळ्या ४-५ ठेचुन
२ मोठे कांदे चिरुन
हिंग, हळद,
२ ते ३ चमचे मसाला (तिखटाच्या आवडीवर)
चवीनुसार मिठ
१ चमचा गरम मसाला
वाटण : २ छोटे कांदे व अर्धी वाटी सुके खोबरे भाजून वाटून

क्रमवार पाककृती: 

प्रथम चिकन किंवा मटण साफ करुन धुवुन त्याला आल, लसुण मिरची कोथिंबीरची पेस्ट लावुन घ्या. मग थोड्या वेळाने टोपात तेल घालुन त्यावर लसुण पाकळ्यांची फोडनी देउन कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा. मग त्यात हिंग, हळद, मसाला घालून त्यात चिकन किंवा मटण घालावे. जर चिकन असेल तर चिकन सोबतच बटाटे घालावेत व जर मटण असेल तर आधी ते अर्धे शिजवुन मग बटाटे घालावेत कारण मटण शिजायला वेळ लागतो. मग वरती ताट ठेउन ताटात पाणी ठेवावे. आता जेंव्हा ढवळायच असेल तेंव्हा ताटातील पाणी त्यात टाका किंवा तुमच्या गरजे पुरते पाणी टाका. मग चिकन/मटण शिजले की त्यात कांदा खोबर्‍याचे वाटण, मिठ व गरम मसाला घाला. एक चांगली उकळी येउ द्या व गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

बटाटा ऑप्शनल आहे.
चिकनला मुरवण्यासाठी आल लसुणच्या पेस्ट सोबत २ चमचे दही किंवा १ लिंबुचा रसही लावतात.
पुर्वी कांदा खोबर आख्ख चुलीत भाजून ते पाट्याने वाटून वाटण करत त्याला वेगळीच चव असते. मी ही कधितरी करते अस. आणि पुर्ण मटणही चुलीवर करते कधीतरी मुड आणी वेळ असल्यावर.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु धन्स , तोंपासु Happy आता २ च दिवस आहेत हे करण्यासाठी , तेव्हा नक्की आज किंवा रविवारी २न्ही पद्धतीने करून बघणार .

सुख्या खोबर्याच्या वाटणा बरोबर ओलं पण वाटण थोड घातला तर चव मस्त येते. आणी २/३ चमचे तिखटा ऐवजी मालवणी मसाला वापरुन बघा...यम्म्म्मी

निकिता अग मालवणी पद्धती मध्ये ओल खोबर आणि मालवणी मसाला वापरतात. मी वरची पारंपारीक आमच्याकडची पद्धत दिली. तरी तु म्हणतेस त्याप्रमाणे चेंज म्हणून करायला हरकत नाही.

दक्षीणा अग केल की फोटो टाकेन. अग नुतन ने रेसिपी मागितली होती म्हणून टाकली आत्ता. पण तु, अश्विनी (व्हेजीटेरियन अलस्यामुळे) खरच खुप बर वाटत तुम्हाला ह्या धाग्यांवर बघुन.

मस्त रसीपी जागु. आम्हीही अशीच करतो. पण वाटणात तिळ, खसखस , डाळे पण घालतो. आणि नंतरचे वाटण टाकताना ते तेलात परतुन घेतो. Happy

अहाहा! घरी केलेलं चिकन Happy हाटेलातल्या कुठल्याही शाही नॉनव्हेज डीशला त्याची सर नाही Happy

जागु, मस्त आणि सोपी आहे ग पाकृ Happy मी खात नाही पण नवरोबासाठी करेन नक्की Happy

हल्ली तु सपाटाच लावलायस की रेसिप्या टाकायचा Happy लगे रहो Happy

जागू, छान पाककृती आणि माहिती देत आहात मायबोलीकरांना.

मला एक प्रश्न आहे. 'लागणारे जिन्न्स'मधे

>> २ ते ३ चमचे मसाला (तिखटाच्या आवडीवर)
>> १ चमचा गरम मसाला

असे दोन जिन्न्स लिहिले आहेत. त्यांपैकी पहिला मसाला कुठला?

मी पण अगदी हाच मसाल्याचा प्रश्ण विचारणार होते. नेहेमी फक्त मसाला असं लिहिता. तो म्हणजे लाल मिरचिची पावडर की अजून काही जिन्नस असतात? एकदा ह्या मसाल्याची पण कृती द्या.

देशावर, जिथे खोबर्‍याचा तितका वापर नसतो, तिथे बाजरी भाजून वाटणात घेतात.
गोव्यात बटाट्याच्या जागी, अलकोल वापरतात.
कोल्हापूर भागात मटणाच्या फोडींपेक्षा रस्साच जास्त लोकप्रिय आहे.

माझा श्रावण मोडायचा पणच घेतलाहेस तु जागू...

श्रावणाला वेळ आहे अजुन.... Happy

जागु, रेसिपी एकदम मस्त..

जागु मंगळ्वार पासुन श्रावण सुरु होतोय, बये मांसाहारि पदार्थाच्या रेसीपी नको हा लिहुस, नाहि तर वाचुन श्रावण मोडायच ग!
चिकन ची रेसीपि रविवार च्या गटारी साठि का ग? मस्त!

जागु मंगळ्वार पासुन श्रावण सुरु होतोय, बये मांसाहारि पदार्थाच्या रेसीपी नको हा लिहुस, नाहि तर वाचुन श्रावण मोडायच ग!>>>>> जागु तु लिही ग रेसिपी , आम्ही वाचतोय.:स्मित:
चिकन ची रेसीपि रविवार च्या गटारी साठि का ग? >>>> हो मीच मागवलेली , पण काल नवरा घरी जेवणार नव्हता , त्यामुळे काल चिकन नाही केल. काल कित्ती दिवसांनी जवळा मिळाला , मग जवळाच्या वड्या केल्या . आता शुक्र्-रवि वारी गटारी Happy

कविता, लाजो, स्वातीताई,प्रॅडी, दिनेशदा, साधना धन्यवाद.

स्वातीताई, प्रॅडी, मसाला म्हणजे आपण मिरची आणि सगळे गरम मसाले, धणे वगैरे टाकुन वर्षभरासाठी करुन ठेवतो तो मसाला. मिरचीपुड नाही.
गरम मसाला म्हणजे फक्त गरम मसाल्यांची प्रमाणात केलेली पुड. ह्याला गरम मसाल्याचाच वास येतो.

चिकन ची रेसीपि रविवार च्या गटारी साठि का ग? मस्त! >>> थंडतै, तुम्हाला दिव्यांच्या अमावस्येच्या शुभेच्छा Happy

आता शुक्र्-रवि वारी गटारी >>> नूतनतै, तुम्हालाही दिव्यांच्या अमावस्येच्या शुभेच्छा Happy

असायची ना आजोबा असे पर्यंत. त्यानंतर आम्ही ४ महिने कांदे खात नसू. आई कांदा भजी करत असेल कांदे नवमीला. आता चातुर्मासातही कधीतरी थालिपिठात, कांदेपोह्यात वगैरे कांदा वापरला जातोच, त्यामुळे नो कांदे नवमी Happy

>> मसाला म्हणजे आपण मिरची आणि सगळे गरम मसाले, धणे वगैरे टाकुन वर्षभरासाठी करुन ठेवतो तो मसाला. मिरचीपुड नाही.

जागू, तुम्ही वापरत्या त्या मसाल्याचे नेमके घटकपदार्थ आणि प्रमाण सांगू शकाल का?
वर्षभरासाठी करून ठेवण्याच्या मसाल्याच्याही निरनिराळ्या पद्धती असतात, म्हणून विचारते आहे.
म्हणजे सीकेपी लोकांचा सीकेपी मसाला हा 'नेहमीचा', काहींकडे काळा/गोडा मसाला 'नेहमीचा', मालवणी लोकांकडे मालवणी मसाला हा 'नेहमीचा'. पण हे तीन निराळे प्रकार आहेत ना? तशीच तुमची जी काही पद्धत असेल 'नेहमीचा' मसाला करण्याची, ती सांगाल का? किंवा कुठून तयार घेत असाल तर त्याची माहिती देऊ शकाल का?

स्वातीच्या विनंतीला माझ्याकडुन दुजोरा.
अगदी वर्षभराचे प्रमाण देण्याऐवजी १०० ग्रॅम धणे अशा प्रमाणात देता आले तर अजून मस्त. इथे एकदम वर्षाचा मसाला करण्याइतकी माझी हिम्मत नाही Happy

स्वाती , मेधा दोघींना अनुमोदन . Happy मेधाला १०० ग्रॅ प्रमाणाबद्दल डबल अनुमोदन . Happy

मला तर असं वाटतं की आता " घरचा मसाला " नावाची सिरीज करुया . प्रत्येकीने आपल्या आईचा किंवा सासुबाईंचा नेहमीचा मसाला नीट प्रमाणासकट लिहायचा . मला खात्री आहे की खूप वेगवेगळे मसाले आपल्याला संग्रहित करता येतील . Happy

स्वातीताई, मेघा, संपदा, आर्च. मी मसाला घरीच करते वर्षभराचा. मी आईकडून प्रमाण लिहुन घेते. आणि आईकडेच करते. उद्या तिच्याकडे मागुन टाकेन मसाला धाग्यावर.
जुन्या माबो वर आहे मसाल्याचा बिबि. त्यातही चांगले मसाले आहेत. मी त्यावरुन दिनेशदांनी सांगितलेला कांदा लसुण मसाला २ वर्ष घरी केला होता. छान झाला होता. ह्यावर्षी नाही जमल.

Pages