कनकचंपा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कनकचंपा किंवा रामधनचंपा

kanakachampa.jpg

खरे तर हि मला परवा अचानक भेटली. मी गेलो होतो, फ़ोर्टात उर्वशीला शोधायला, तर हिच भेटली.
चाफ़ा कुळात आपण बराच घोळ घालून ठेवला आहे. खुरचाफ़ा, सोनचाफ़ा, नागचाफ़ा, कवठीचाफ़ा, हिरवाचाफ़ा, हे सगळे वेगवेगळ्या कुळातील. यांचा एकमेकांशी काहि संबंध नाही. हि कनकचंपा पण अशीच. हिला मराठीत नाव असल्याचे माहित नाही, कनक म्हणजे सोने, या फ़ुलाचा झळाळता सोनेरी पिवळा रंग हे नाव सार्थ ठरवतो. आणि चंपा नावावरून हि उत्तरेकडची असणार हे ओघाने आलेच. शिवाय तिकडे सगळेच रामाचे नातलग, त्यामूळे हिदेखील रामरंगी रंगली.

हिचे शास्त्रीय नाव Ochna squarrosa झाड साधारण तीनचार मीटर्स वाढते. नविन पालवी खास कुसुंबी रंगाची असते. या झाडाला तशी फुलेही भरपूर लागतात. आणि सगळे झाडच झळाळून उठते. फुले सुंदर आहेतच पण याची फळेही खुप सुंदर असतात. एखाद्या कर्णफुलाप्रमाणे याची रचना असते. आधी हिरवी असणारी हि फळे मग लाल आणि शेवटी काळी होतात. सर्व अवस्थेत ती सुंदर दिसतात.

या झाडाला फ़ुले खुप लागतात, तसा सुगंधहि असतो, पण वार्‍यावर सुगंधाने स्वार व्हावे, असे काहि नसते. शिवाय फ़ुलांपेक्षा या झाडाच्या देखण्या बियाच जास्त काळ झाडावर असतात. या बिया एखाद्या कर्णफ़ुलाप्रमाणे, रेखीवरित्या मांडलेल्या असतात. ( याचा फोटो मी मागे दिला होता )

kanakachampaa.jpg

वर लिहिल्याप्रमाणे मी खरे तर फ़ोर्टात उर्वशी शोधायला गेलो होतो, त्यावेळी मला बांबूचा फ़ुलोरा, तामण वगैरे दिसले, पण पारशी विहिरीच्या सिग्नलपासून सायन्स इन्स्टिट्युट पर्यंत तीनचारवेळा फ़ेर्‍या मारुनदेखील, मला उर्वशी दिसली नाही.
ती अगदी कुंपणाच्या भिंतीलगतच होती. याचे मोठेमोठे तुरे अगदी माझ्या डोक्याशी यायचे. माझ्याच नव्हे तर अनेकांच्या ती आठवणीत असणार. अनेक पुस्तकात आणि लेखात मी त्या झाडाचा उल्लेख वाचलाय, पण ती आज तरी तिथे दिसत नाही ( हा माझा दृष्टिदोष असू दे, अशी प्रार्थना करतो. )

उर्वशी खरेच खुप दुर्मिळ आहे. भारतात ती नवखी असल्याने, तिच्या बिया इथे नीट विकसित होत नाहीत. फ़ुलांच्या मानाने शेंगा खुपच कमी दिसतात आणि त्यातल्या बियाहि अविकसित राहतात. कलमाद्वारेच लागवड शक्य आहे. हे सगळे जर माझ्यासारख्या कुडमुड्या माणसाला माहित असेल तर विद्यापिठाच्या माळीबुवाना नसेल का माहित ? मग उर्वशीवर कुर्‍हाड कशी चालवण्यात आली ? बरे ती जर नैसर्गिकरित्या नष्ट झाली असेल तर, ती जागा उर्वशीची म्हणुन का नाही राखून ठेवण्यात आली ?

आपल्यालाच विचारायचे प्रश्न आणि मन विषण्ण करुन घ्यायचे.
आशा एकच, हा माझा दृष्टिदोष असु दे.

विषय: 
प्रकार: 

सुरेख, दिनेशदा.

छान लिहिलय.