कढिपत्ता (अमेरीकेत लावताना)

Submitted by अंजली on 29 July, 2010 - 13:12

अमेरीकेत कढिपत्ता लावताना तुम्ही कुठल्या 'झोन' मध्ये राहता हे माहिती करून घेणं जरूरीचं आहे. http://www.garden.org/zipzone/ इथे वेगवेगळ्या 'झोन्स' बद्दल माहिती मिळेल. कढिपत्त्याला थंड हवामान अजिबात चालत नाही. त्यामुळे '९अ', '९ब', '१०अ', '१०ब', '११' या झोनमधे रहात नसल्यास कढिपत्ता कुंडीत लावावा.

कुंडी प्लास्टिकची असेल तर आतबाहेर करायला सोपे जाते. कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा / holes असावेत. नसले तर करून घ्या.

Kadhipatta1.jpg

कढिपत्त्याला माती पाण्याचा व्यवस्थित निचरा (well-drained) होणारी लागते. त्यामुळे इथे मिळणारी 'टॉप सॉईल' (Top soil) किंवा 'गार्डन सॉईल' (garden soil) अजिबात वापरू नका. कुठल्याही चांगल्या कंपनीची - शक्यतो ऑरगॅनिक - 'पॉटींग सॉईल' (Potting soil) वापरा. मी मिरॅकल ग्रो या कंपनीची Organic Potting soil वापरते आणि आत्तापर्यंत तरी चांगला अनुभव आहे. त्यात perlite या गोष्टी घातल्या तरी चालेल. नसतील तर नुसती Potting soil वापरली तरी चालेल.

कढिपत्त्याला उष्ण आणि दमट हवामान लागते. कढिपत्ता बाहेर ठेवायचा असल्यास रात्रीचे तापमान ५५ डि. फॅपेक्षा जास्त असलेले असावे. मोगर्‍याप्रमाणेच एप्रिल-मे नंतर फ्रॉस्ट संपला की बाहेर ठेवावा. ऑक्टोबर मधे रात्रीचे तापमान ५० पर्यंत जायच्या आधी घरात आणावा. रोप लहान असेल तर यात एक दिवस जरी उशीर झाला तरी रोपाला हानी पोचू शकते. रोप बाहेर ठेवताना सूर्यप्रकाश साधारण ४-५ तास मिळेल अशा ठिकाणी ठेवावं.

कढिपत्ता बिया रूजवून लावता येतो किंवा छोटे रोप मिळाले तर तेही लावता येते.

Kadhipatta2.jpg

बिया लावताना पूर्णपणे वाळलेल्या बिया लावू नयेत. अशा बियांमधून अंकुर / रोप येण्याची शक्यता कमी असते. झाडावरच पिकलेल्या / अर्धवट पिकलेल्या बिया मिळाल्या तर त्या लावाव्यात. या बिया छोट्या कुंड्यांमधून किंवा छोट्या प्लास्टिकच्या कपमधे, चांगल्या प्रतीच्या Potting soil मधे लावाव्या. कुंड्यांना पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा / भोके असावीत. बिया लावण्याआधी त्या भोवती असलेले आवरण, द्रव काढून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. माती ओलसर असावी पण फार पाणी / चिखल नसावी. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत असला पाहिजे. घरातच या कुंड्या / कप खिडकीपाशी, उन येते तिथे किंवा उबदार जागेत ठेवाव्यात (तापमान ८०-८५ डि फॅ). साधारण १० दिवसांनी अंकुर दिसू लागतील. रोप २ ते २.५ इंच मोठे झाले की त्या कुंडीतून / कपातून काढून ७-८ इंच व्यासाच्या कुंडीत लावावे. त्यानंतर रोप एक आठवडा घरातच ठेवावे. बाहेर रात्रीचे तापमान ५५ डिग्री फॅ च्या पुढे असेल तेव्हा बाहेर ठेवावे. पण बिया रूजवून लावल्यास 'success rate' जास्त नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे रोप मिळाल्यास उत्तम.

रोप लावताना मुळं वाढण्यासाठी भरपूर जागा मिळेल इतपत मोठी कुंडी घ्यावी. 'Good thumb of rule' म्हणजे जर रोप ६ इंच उंच असेल तर ८ -९ इंच व्यासाच्या कुंडीत लावावे. रोप लावल्या नंतर ३-४ दिवस कुंडी घरातच असू द्यावी.

हे झाड 'drought tolerant' मानलं जातं. पाणी देताना माती बर्‍यापैकी ओलसर असेल तर पाणी देउ नका. पण पाणी देताना फारच उशीर झाला तर पानं गळून गेल्यासारखी दिसतात.

कढिपत्त्याला खत घालताना 'overfeed' होणार नाही याची काळजी घ्या. या झाडाला वर्षातून ४-५ वेळा खत दिलं तरी पुरेसं होतं. आपण कढिपत्ता स्वैपाकात वापरतो, त्यामुळे ऑरगॅनीक खत वापरावे. मिरॅकल ग्रोचं Organic Vegetable food चांगलं आहे. कमी concentrationचं (पाण्यात dilute केलेलं) खत नियमित देण्याने फायदा होतो. उन्हाळ्यात साधारण ३ आठवड्यातून एकदा खत द्या. थंडीत खत घालणे पूर्णपणे बंद करा. मे-जून पासून सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत खत देणं योग्य. भारतात आंबट ताक, चहाचा चोथा खत म्हणून देतात. इथे एकदा ताक घालून बघितलं पण मुंग्या लागल्यामुळे नंतर कधी हा प्रयोग केला नाही.

माती २ वर्षातून एकदा बदलावी. कुंडी बदलताना आधीच्या कुंडीपेक्षा ३ ते ४ इंच मोठा व्यास असलेली कुंडी घ्यावी. कढिपत्त्याचे रोप ३-४ वर्षांचे झाले की मुळापासून अजून रोपं उगवतात. अशावेळी ही छोटी पिल्लं ५-६ इंच उंच झाली की वेगळी करून स्वतंत्र कुंडीत लावा. मुख्य झाड / रोप जस जसे मोठे होते तशी भरपूर रोपं/ पिल्लं येतात. मुख्य कुंडीत अशा रोपांची गर्दी होऊ देऊ नये. छोटे रोप वेगळे केले की त्याची मुळं 'root starter mix' मधे बुडवून वेगळ्या कुंडीत लावावे. ही कुंडी एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवावी आणि अगदी वर टोकाला बांधून घरात सावलीत ठेवावी. ४-५ दिवसांनी अगदी लहान नविन पालवी दिसेल तेव्हा पिशवीचं तोंड मोकळं करून ठेवावं पण कुंडी पिशवीतच ठेवावी. काही दिवसांनी नविन पालवी थोडी मोठी झाली की कुंडी पिशवीतून बाहेर काढून ठेवावी. छोटी रोपं मुख्य झाडापासून वेगळी करताना मुळांना धक्का बसतो. त्यामुळे रोपं नाजूक झालेली असतात, 'शॉक' मधे असतात. प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्याने 'settle' व्हयला मदत होते.
रोप मुख्य झाडापासून वेगळं करताना धारदार सुरी त्या रोपाभोवती १ इंचाच्या अंतराने फिरवावी, सुरी मातीत ४-५ इंच जाईल असे बघावे. कडेकडेने मुळं कापत अलगद रोप वेगळे करावे.

प्रत्येक स्प्रिंगमधे प्रत्येक फांदीचा ३-४ इंच शेंडा खुडावा. त्यामुळे तिथून दोन फांद्या फुटतात. झाड जोमानं वाढतं.
थंडीत झाड घरात आणतो तेव्हा बरीच पानं गळतात. ही पानं वाळवून स्वैपाकात वापरू शकतो. ही पानं खोबर्‍याच्या तेलात उकळून ते तेल लावल्याने केस काळे होतात असं म्हणतात. मी हा प्रयोग केलेला नाही. Happy
स्प्रिंगमधे परत नविन शेंड्याला नविन पालवी फुटते.

या झाडाला कीड फारशी लागत नाही, पण पानांवर काळे डाग पडू शकतात. 'Scales' ही कीड लागत नाही ना याकडे लक्ष असू द्यावे. जर ही कीड लागलीच तर ताबडतोब झाड बाकिच्या झाडांपासून वेगळे ठेवावे. नीम ऑइल / Insecticidal soap याचे मिश्रण करुन झाडावर फवारावे.

कढीपत्त्याचं झाड चिवट असतं म्हणतात, बरीच वर्ष राहतं.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली. ही माहिती छान वाटते आहे, सगळ्या बारकाव्यांसकट आहे. धन्यवाद.
आमच्या इकडे म्हणतात की लावल्यावर वर्षभर तरी कडीपत्ता वापरायला काढायचा नाही, नाहीतर तो पुन्हा वाढत नाही. आता वर्ष झाले, आता काढु वापरायला. Happy

अंजली, फार सुंदर माहिती.
खरे तर हे झाड, थंड प्रदेशात वाढवणे फार कटकटीचे होते. भारतात, किंवा बाकीच्या ठिकाणी, काहिहि मेहनत न घेता, हे झाड वाढते, इतकेच नव्हे तर त्याच्याखाली त्याची पिल्लावळ पण वाढत राहते. आपल्या खाण्याच्या वेगापेक्षा याच्या वाढण्याचा वेग जास्त होतो.

मस्त माहिती आहे. पुर्ण वाळलेल्या बिया उगवुन येत नाहीत हे माहितच नव्हत.
माझ झाड गेल्या विंटर मध्ये अवेळी पडलेल्या स्नो ने पुर्ण गेलेले. पण परत आता जोमान वाढलय. Happy

ज्ञाती, अगं इंडियन ग्रोसरी स्टोअर्स मधे बघ मिळतय का. नर्सरीतपण मिळतं.
सीमा, त्याच झाडाला पालवी परत फुटली का नविन रोपं आली?

अंजली, छान माहिती.

मला गेल्या डिसेंबरात कढीपत्त्याचं अगदी वितभर उंचीचं रोप मिळालं. बरेच दिवस छोट्या पॉटमधे आणि थंडीमुळे घरात होतं. घरात झाडाची उंची (आधीची ४-५ इंच) जेमतेम अर्धा इंच वाढली. जवळपास ३ महिने घरात ठेवून शेवटी मिरॅकल ग्रो च्या पॉटिंग सॉइलमधे घातलं आणि बाहेर ठेवलं. एप्रिल, मे, जून मधे प्रचंड भरभर वाढलं. आता शेंड्याकडे internodal अंतर जास्त व्हायला लागलंय. पानं पण आधी छान गडद हिरवी होती ती फिकी व्हायला लागलीत. कसला स्ट्रेस असावा? शोध घ्यावा लागेल. एरवी झाड आनंदी आणि बाळसेदार दिसतं. Happy

kadhipatta-maayboli.JPGProud

मृ,
झाड हेल्दी आहे. :). खूप उन्हामुळं किंवा कधी कधी खत कमी पडल्यानं असं होतं.
एवढ्या मोठ्या झाडासाठी ही कुंडी थोsडी लहान वाटतीये. त्याची कुंडी बदलता येईल का?. थोडी मोठी कुंडी हवी एवढ्या झाडाला. आणि भरपूर माती. आत्ता जर बदललीस तर काही दिवस घरातच ठेव. कुंडीत झाड लावल्यावर पाणी घालून पाण्याचा निचरा झाला की मग घरात ने. आणि वरचा शेंडा त्या तीन मोठया काड्यांसकट हातानं खुडून टाक.

वा मस्तच आहे झाड मृ!!

आई ताक घालते कडिपत्त्याला, ते फक्त कीड लागु नये म्हणुन की त्याने वाढ चांगली होते?

अंजली, झाडाची तब्बेत बरी असल्याचं सांगितल्याबद्दल धन्यवाद. Happy झाडाची कुंडी बरीच मोठी आहे. फोटुतल्या अँगलमुळे अशी दिसत असेल. Happy माती बदलून ३च महिने झालेत. शेंडा खुडते.

ज्ञाती, कढिपत्ता आणि तत्सम झाडांच्या वाढीसाठी माती अ‍ॅसिडिक असावी लागते. ताकामुळे ते साध्य होतं. अशा मातीतून मुळांना मातीतले पोषक घटक व्यवस्थीत षोशता येतात. झाडाची वाढ चांगली होते.

अंजली, झाडाची तब्बेत बरी असल्याचं सांगितल्याबद्दल>>>> दुरुस्ती करतेय मृ झाडांची इ-डॉक्टर Happy

ज्ञाती, कढिपत्ता आणि तत्सम झाडांच्या वाढीसाठी माती अ‍ॅसिडिक असावी लागते. ताकामुळे ते साध्य होतं. अशा मातीतून मुळांना मातीतले पोषक घटक व्यवस्थीत षोशता येतात. झाडाची वाढ चांगली होते.>>> हो
ज्ञाती, मी नाही मृ झाडांची डॉक्टर आहे Happy माझं फक्त अनुभवातून आलेलं ज्ञान Proud

अ‍ॅसिडिक माती लागणार्‍या झाडांसाठी मला वाटतं मिरॅकल ग्रोचं निराळं खत मिळतं. मी मागे गार्डिनियासाठी आणल्याचं आठवतंय.

माझ्याकडे गेली बारा वर्षे चांगले सुदृढ असे कढिलिंबाचे झाड आहे, कधीकधी ते सात फुटाच्या वरही वाढते. आतापर्यंत मी जवळजवळ १०० जणांना रोपे दिली आहेत. त्यांचीही झाडे छान वाढत आहेत. मी कधीच काहीही खत घातलेले नाही. नाही म्हणायला एकदा माझ्या मुलाने चुकून लिंबाचा रस ओतला होता. लहान असताना उन्हाळ्यात बाहेर ठेवत असे. आता ते अशक्य झाले आहे, त्यालाही काही वर्षे होऊन गेली. शक्य होते तेव्हा बाहेर उन्हात ठेवणे, नियमित (एक दिवसाआड) पाणी घालणे, रोपे काढून दुसर्‍यांना देणे, अधुनमधून उंची फार झाल्यावर छाटणे आणि येताजाता पाने वापरण्यासाठी खुडणे एवढे करून माझे झाड, झाडे छान जगली आहेत.

>>>मी मिरॅकल ग्रो या कंपनीची Organic Potting soil वापरते
हे Organic Potting soil प्रकरण मला नीटसं माहिती नाही, पण माहिती असलेली एक बाब: कुठलंही पोषक खाद्य झाडाला घातलं तरी झाडं Organic form मधलं पोषण घेऊ शकत नाही. Inorganic nutrition आवश्यक आहे. म्हणजे काय तर ऑरगॅनिक खाद्य देखील, बॅक्टेरियामुळे विघटीत (decompose) होऊन इनऑरगॅनिक मिनरल फॉर्ममधे येईपर्यंत खाद्य म्हणून झाडाला उपलब्ध नाही.

अगदी थोडक्यात, सहज समजेल अशी माहिती इथे बघा: http://www.ipni.net/ppiweb/ppibase.nsf/$webindex/article=304E9A7948256C5400523EBE0AB5D73C

अंजली, डॉक्टर वगैरे नाही गं मुली. वनस्पतींसंबंधी, सविस्तर आणि खोलवर अशी वैज्ञानिक माहिती असलेले, त्यात उच्च शिक्षण घेतलेले बुध्दीमान मायबोलीकर वेगळे. Happy

मृ, तुझा कढिपत्ता छानच आहे. त्यापुढे माझा अगदी काडिपेहेलवान. वरती फांद्या फुटल्या की खालच्याची पानं गळतात.

ह्या कढिपत्त्याच्या बियांना काय म्हणतात इथे? इंडियन ग्रोसरीत विचारुन कळेल पण बाहेर कुठे मिळेल?
स्वाती, तुझ्याकडे परवा विंडोसीलमध्ये काही रोपं दिसली. कसली होती विचारायचं राहिलं.

छान माहिती.
जागा किती लागेल कढिपत्त्याला? आयमिन मला अपार्टमेंटच्या समोरच्या व्हरांड्यात कुंडी ठेऊन वाढवता येईल का?

मृ, स्वाती, माहितीबद्दल धन्यवाद. Happy इतरांनीपण त्यांचे अनुभव, माहिती लिहा इथे.
मृ, कडिपत्ता आपण जेवणात वापरतो म्हणून रासायनिक द्रव्ये असलेली माती नको म्हणून ऑरगॅनिक वापरत होते. Happy
बस्के,
जिथे प्रकाश येतो तिथे कुठेही ठेव. फार जागा लागत नाही त्याला.
स्वाती, माझ्याकडेपण १४ वर्षे होता. तुम्ही म्हणता तसे बरीच रोपं दिली मीपण. नुकताच scales कीड लागून पूर्ण वाळला. तुम्ही म्हणता तसं लिंबाचा रस, मेधा म्हणते तसं कॉफीच्या ग्राऊंडस घालून बघायला पाहिजे.

अंजली, त्याच झाडाला परत बाजुने फांद्या फुटल्या. मेन फांदी जी बरीच उंच झालेली ती वाळुन गेली.
आमच झाड:
Optimized-DSC07843.JPG

सीमा, मस्त आहे गं तुझंपण झाड. Happy स्नो पडून ते जगलं हे विशेष. माझ्या मैत्रिणीनं तिला दिलेलं एक रोप थंडीत बाहेर ठेवून त्याचा अक्षर्शः खून केला.

मला हवं आहे रोप किंवा बिया. इथे मिळालं नाही. बिया कुठून ऑनलाईन वगैरे मागवता येतील का?

अंजली, माझी तुळस गेल्या वर्षी अशी गेली माझ्या हातून. बाहेर ठेवायची घाई केली.

Pages