विश्वाचे आर्त…

Submitted by रैना on 26 July, 2010 - 07:11

उन्हाचे चौकोन चेह-यावर गिरवीत जबरदस्ती पहुडलेलं कार्टं (आणि बाजूला ऊन पकडू पाहणारं खुळं मांजर), मोठ्ठं व्हायची काय काय स्वप्न रंगवीत असावं. अशा दुपारी नंतर पुन्हा कधी आयुष्यात प्राणपणाने मागून सुद्धा न याव्या, ही जगाची रीत ! अशा लांबच लांब दुपारी पसरलेल्या त्या जुल्माच्या शांततेला तर सोनचाफ्याचा वास यावा, किंचीत उग्र. ती शांतता एका गालावर ऊन झेलते आणि दुस-यावर गार फरशीचा खास गारेगार स्पर्श. डोक्यात मधोमध शांततेचं मोहोळ पेटावं !

लहानपणी गुरगुट्या भात नावाचा एक छळवादी प्रकार खावा लागावा. 'पोटात शांत रहातं' हे त्यामागचं कारण तर्काच्या कसोटीवर फिजूल. ही पोटात शांत रहाण्याची भानगड तेव्हा न आकळावी. आता मागायचंच असेल तर मात्र हेच दान भक्तीभावाने मागावे. आप्तसुहृदांच्या आणि एकंदरीत विश्वातील सर्वांच्या 'पोटात शांत राहू दे' !

कामाच्या वावटळीत डुबून जावं, अनंत उपसाउपशीनंतर, आता अगदी सोसवत नाहीच्या उंबरठ्यावर कधीतरी चुकून पहाटेच्या धूसर सीमारेषेवर एक ग्लानीभरी शांतता भेटावी. आभासाच्या पावलावर स्वार होऊन ती यावी.

कडाक्याच्या भांडणानंतर चोरपावलांनी आलेल्या शांततेच्या किती त-हा. सगळ्या मेल्या अभद्र. पावसाळ्यात कधीतरी संधीप्रकाश काविळीगत पिवळा दिसावा, ती रंगछटा. तसल्या भेसूर शांततेत माणसं आणि मोटारी दोन्ही भयंकर भासावे. कानांना गर्दीचे आवाज ऐकू यावे; पण मेंदूपर्यंत पोचू नये. तुटक्या आकांताची शांतता !

आकंठ प्रेमातली हवीशी आणि नकोशीही शांतता. ती सापडायलाही अनेक वर्षं लोटू शकतात. अधीर प्रीतीत ती हरवतेच. सापडली की मात्र तळ्याकाठी मग्न बसलेल्या एखाद्या झाडासारखी. पानं आपसुक अलगद तळ्यात पडताहेत, पाचोळा संथ डोहावर वायुलहरींबरोबर तरंगतोय. अनंत काळापर्यंत... स्पर्शांची नक्षी तळहातावरल्या ओल्या मेंदीसारखी. नाजूक, अलवार, रेखीव, गार आणि शांत. दोघांतील शांतता कधी शांत सहचर्याची; 'शब्देवीण संवादू', कधी धुमसणारी अबोल्यातील मौनाची...

काळ्याशार ओल्या दगडी गाभा-यातली अद्भूतरम्य, गूढ शांतता भेटायला देवावर विश्वास असायची जरूरी नाही. तिला बेला-जास्वंदाचा, कापराचा, तेलवातीचा वास का यावा ? ती टिकते किती क्षण ? दोन घंटानादांच्या मधल्या, आवर्तनांच्या ओळींच्या मधल्या क्षणांत ती विरावी.

किर्र अंधारातली ती करकर वाजणा-या वहाणेसारखी भयाण शांतता. उजाडेस्तोवर काय खरं नाही. वरचा श्वास वर आणि खालचा खाली. दमेक-यासारखा.

बाहेर घोंघावणारं वादळ , श्वापद जणू पाचक शतपावली घालतंय. आपण चिडीचूप, गुडूप.. दारंखिडक्या बंद करून. आत शांततेची घरघर ऐकू यायला लागावी. एकदा का पाऊस रपारपा पडायला लागला की सुटकेचा नि:श्वास !

समुद्राकाठची गाजेच्या लक्षावर्तनातली गजबज शांतता. मनातले कल्लोळ नादात प्रतिबिंबीत व्हावेत. सतत किनार्याला धडका बसाव्यात. असीमाची, अनंताची धास्ती उरावर बसावी, हात आणि स्वर किंचीत कापरा व्हावा. ही महत्वाच्या निर्णयापूर्वीची असह्य शांतता.

डोंगरमाथ्यावरील प्राणवायू विरळ होत जाईल तसतशी बेफान वाढणारी शांतता. अलग. दिव्य. उत्तूंग. चोहोबाजूंने धोक्याच्या अवघड चढांवर प्रतिध्वनीत व्हावी.

प्रसन्न सकाळी पाखरांच्या चिवचिवाटात भेटावी खळाळ निर्झर प्रसन्न शांतता. अत्तरासारखी उडून जावी. वर्षाकाठी एकदातरी भेटावी हेही मागणं "लई" का ठरावं ?

सुर्यकिरण ढगातून परावर्तित व्हावे आणि आपण ढगांवर स्वार. दुपारच्या एखाद्या अभ्राच्छादित क्षणी भेटते ती विमानातल्या बंद काचेआडील मूक शांतता. दिसते पण.. स्पर्श करू शकत नाही.

मायदेशात तर्हेतर्हेच्या आवाजांचा कल्लोळ. काही समुद्रापार गेल्यावर कधीतरी गिच्च वातानूकुलित शांततेत, मूक रहदारीत आणि थंडीत घरव्याकूळ आठवणी गालावरुन ओघळाव्यात. वर्षागणिक मायदेशातला कोलाहल जास्तच अपरिचीत वाटायला लागावा. अल्याड, पल्याडचा निर्णय न व्हावा ती शांतता जराशी विकल!

पंख्याची अविरत घरघर ऐकु आली तरी स्वतःला भाग्यवान समजावं अशी महानगरी शांतता. विचारांच्या भुतावळीने गचांडी धरावी आणि श्वास कोंडावा. अस्तित्वाची कीव दाटावी, ती लाळेबरोबर गिळावी.

तसंच आपल्या अलिकडे, पलिकडे व्यापून राहीलेली बकालियत. ती आपल्याला आणि आपण तिला नाईलाजाने न्याहाळावे. ही थरकाप उडवणारी गटारांच्या वासांची; उंदराने कुरतडलेली अगतिक शांतता! ही भरल्यापोटी गायलेली शांततेची आरती फुकाची? भुकेच्या उसळलेल्या डोंबाला शांततेचे कसले कौतिक? पोटातला जाळ, वेदनेचा दाह एक तो खरा, बाकी सब झूठ! थकबाक्यांची बापुडवाणी रागेजली शांतता कर्फ्यूसारखी. भयाण. अमानवी. उद्याची आशा पाय घासत चटकफटक चालत रहावी. शब्दांना फारसे अर्थ नसावेत.गळक्या छप्परांची, धडक्या चिरगुटांची, विझल्या डोळ्यांची, लाजेकाजेची अन्यायी शांतता....

केवळ आवाजाचा अभाव म्हणजे शांतता नाही, ती कधी संपूर्ण कोलाहलात दडुन बसते. पोरांच्या गलबल्याने भरले घर डोक्यावर घ्यावे आणि समाधानाच्या तुषारांची हलकी हलकी मंद सुवासिक कारंजी उडावी. शांततेचा आणि मानववंशसातत्याचा आवंढा घशात दाटावा. दुपारधरून गच्च अंधार दाटून यावा, बर्फाळ वार्यांनी कहर करावा, हाडं गोठून आता रक्त साकळेलशी थंडी असावी. धावत उबेत शिरुन अत्यंत गजबजलेल्या जागेत बसून गरम पेय प्यावे. एकेका अवयवात संवेदना परत यावीशी एक परिचीत शांतता. खरोखर गोंगाटातच सापडते.

कुरळ्या काळ्याभोर जावळाच्या बाळाच्या मुखावरची शांतता, सापडायला अन समजायला, मायबाप व्हावं लागतं. पोर कुशीत शिरलं की मायेची शांत साय मनावर सांडते. ही शांतता उबदार. बुद्धप्रतिमेच्या मंद स्मितासारखी !

सुरांवरती स्वार शांतताच शांतता. तारांच्या झंकारात पारिजातकाच्या फुलांसारखी मुक्तहस्त. गळ्यातला सूर लागला की अक्षरशः डोक्यावर शांततेची छत्रचामरं ढाळीत अज्ञातांचे दूत. ही शांतता आळवावी ! धीमे धीमे, ठाय लयीत. सूरों मे आस होनी चाहिये. एकेक स्वर दुसर्यात विलीन व्हावा.

आजारपणातली आढ्याकडे पहात राहण्याची काळ्यापाण्याची शांतता. आपल्यानंतरचे सर्व एकत्रित विचार सुटेसुटे होऊन ग्लानीत फेर धरू लागावे.
प्रेताच्या चेह-यावरची चिरनिद्रीत थंडगार शांतता. हीच ती अंतिम म्हणे.गाईच्या डोळ्यांतली खोल खोल मूक रूदन करणारी करूण शांतता.

ध्यानातील शांततेचे मर्म अजून त्या गुरगुट्या भातातील तर्कविसंगतीसारखे अप्राप्य. तेव्हा विचारांची दाटी निष्पर्ण झाडाच्या प्रत्येक फांदीवर बसलेल्या कावळ्यांसारखी. कावळे जणू झाडावरच उगवावे.

ऊर फाटून दशांगुळे उरावे एवढे दु:ख, रित्यांच्या नोंदी, तुटले पाश, न रुजलेले अंकूर, वेदनेच्या सत्याची मुजोर अटळ दर्दभरी शांततेची छटा; समंजसपणे स्विकार करुन टाकावी ! दुसरे करण्यालायक काय असते?

मिटल्या नेत्री शांतता लख्ख दिसावी, उघडे डोळे भवपाशात अडकावे. पण डोळे टक्क उघडे असले तरच मिटल्या नेत्री अनुभव विलग करता येईल, म्हणजे संवेदनाहीन शांतता नसतेच कधी ? ज्ञानाची ती हीच का? तमसो मा ज्योतिर्गमय…? जगाच्या अंतापर्यंत विचार करत बसलेल्या Rodin च्या Thinker ची ही ज्ञानमग्न शांतता !

‘घुबड आहे मेली. अग्गं कार्टे जरा बोलत जा.....’ संतापात बरसणार्‍या आरोपांची न्यायालयीन एकलकोंडी शांतता. निकाल...?
दया, क्षमा, शांती चढ्या पायर्‍यांवर का भेटाव्या ?

विश्वासघातांची, गिळलेल्या अपमानांची आणि रागांची शांतता भलतीच धारदार पात्याची, याज्ञसेनी !

घटनांशी तद्रूप व्हावं तर ही जन्मापासूनची एकटी पायवाट, अरूंद चढण, एकलकोंडी घूमी शांतता पाचवीला का पुजावी? ते प्राक्तन सटवाईने का लिहावे? Why should anyone hear a different drummer? पलिकडले सूर ऐकू येणार्याला एकांतवासाची आणि जन्मठेपेची शांतता इनाम ! जन्मठेप काटल्यावर काय पुष्पक विमान यावे?

शांततेची किती वैयक्तिक रूपं! आणि विश्वशांती ? ती अवचित ठिकाणी भेटावी..
हिरोशिमा... अजस्त्र, अक्राळविक्राळ संहाराच्या यादगारीत 'शांतता स्मारक' उभारलं जावं. ते उमजूनही न हेलावणार्या मनुष्याला, मनुष्य का म्हणावे? शांततेचे स्मारक पहावं, तेव्हा या सगळ्या शांततांच्या पलिकडचे काहीतरी निदान दिसावे. गवसले तर उत्तमच !

झाडामाडांची ती आश्चर्यमुग्ध शांतता. ती साठवावी. वणवणीत रापताना तिची ओल हृदयी जपावी. तीच एक चिरंतन !

'कुशीतलं बाळ गाढ झोपेत खुदकन टप्पोरं हसतं.
का?
लहान मुलांच्या स्वप्नात देव येतो आणि त्यांना हसवतो म्हणे.
हॅ. काहीही....'
तो पुसटसा क्षण धरुन सुखचित्रं, शांतचित्रं रेखावी अणूरेणूत. काहीश्या पूर्णत्वाची ही शांतता. कुठल्याही संस्कृतीला ही जाणवावी ! मायकेलँजेलोने शिल्पात कोरली ती काय उगाच?

शब्द आवाजी, ऊटपटांग, आभासी; शांतता अंतिम, शाश्वत, भयंकर! शांततेने शब्दांना अर्थ प्राप्त होतो. दोहोंचे मिळून सत्य, मोक्ष ! ...आत्म्याचा आवाज येतो म्हणतात, तो ऐकू यावा इतका नीरक्षीरविवेक, आणि शांतता दे मज अद्वैता !
*****************************************************
शुद्धलेखन सहाय्य- मंजूडी.

गुलमोहर: 

आमच्या घरी एक फोटो पोस्टर होतं ..
हिरव्या कंच व्रुक्ष - वेलींच्या पार्श्वभूमीवर कोसळणार्या शुभ्रधवल धबधब्याचं... आणि त्यावर एक ओळ होती
" If you do not understand my silence , You will not understand my words !"

तुमचं काव्य म्हणजे शांततेचा कोसळणारा असा धबधबा आहे !

Pages