परमेश्वरी - एक अविस्मरणीय मैफिल

Submitted by दाद on 16 April, 2008 - 23:12

शनिवार सकाळची नवाची प्रसन्न वेळ. आम्हाला नम्रपणे नकार देत, आपापली आयुधं म्हणजे सतार आणि स्वरमंडल आपणच घेऊन हे दोन कलाकार म्हणायचे ते दोन तरूण आमच्या गाडीत बसले.

अगदीच जुजबी बोलणं होता होताच आम्ही ज्यांच्या घरी कार्यक्रम ठरवला होता, तिथे पोचलोही. एक अर्ध्या तासात कार्यक्रम सुरू होणार. आम्ही आतल्या खोलीत वाद्य जुळवायला बसलो. स्वरमंडल आणि सतार लावून होईपर्यंत तो राग परमेश्वरी आहे हे म्या पामराच्या ध्यानी आलं.. माझा हा एक अत्यंत आवडता सकाळचा राग.

मी तबला लावला. कार्यक्रम जरी सिडनीत असला तरी समोरचे ऐकणारे हे सिडनीतले शास्त्रीय संगीताचे गायक-वादक आणि दर्दी आहेत ह्याची कल्पना मी देबप्रिया(गायक) आणि समन्वय (सतारवादक) दोघांनाही आधीच दिली होती.... थोडक्यात काय तर कार्यक्रम ’गर्दी’ साठी नसून दर्दींसाठी आहे.... असा ’सोंदेश’ द्यायचा प्रयत्नं केला होता.

बरोबर दहा वाजता, जमलेल्या सगळ्यांचं मनापासून हसत स्वागत करीत देबप्रियाने राग परमेश्वरीने सुरूवात करीत असल्याचे सांगून स्वरमण्डल छेडलं सुद्धा....

स्वत:ची ओळख नाही, कुठे कुठे कार्यक्रम झालेत, दौरे झालेत, सभा गाजवल्यात... काही काही नाही....

एक निखळ निकोप..... निव्वळ ’सा’. त्या षड्जाला नुस्ताच आवाज नव्हता तर एक गाभार्‍यातून आल्यासारखा ’घुमारा’ होता. त्याचा स्वर संपता संपता, समन्वयने मिंडने ’सा’ लावला... निषाद आणि तिथून मिंड घेऊन षड्जं.... अगदी सहज.

सुंदर सुरात लावलेलं वाद्यं काय करू शकतं त्याचं उत्तम उदाहरण! दोन्ही स्वरांच्या वेळी तरफेच्या तारा स्वत:हून झणकारल्या.




आता सुरू झाला आलाप. संथ लयीत, ’तब्येतीत’ म्हणतात ना, तसं. कधी एकमेकांना खुलवत, प्रोत्साहन देत तर कधी हुलकावणी देत, चिडवत... गळा आणि सतार एका रागाचं अतिशय सुंदर मूर्तं उभी करीत होते.

आलाप हा रागाबद्दलचा कलाकाराचा मूळ विचार स्पष्टं करण्याचा प्रदेश.... मूर्तीच्या भाषेत सांगायचं तर आलापीत रागाची मूर्ती ही एखाद्या मान खाली घालून कटी घट घेऊन निघाल्या स्त्रीची आहे की, हाती आयुध घेऊन आवेशाने निघाल्या योद्ध्याची आहे हे ध्यानी येतच पण... आलापीची कलाकुसर अशी की, त्या स्त्रीचं मान खाली घालून उभं रहाणं, कदाचित घुंघट ओढलेला, आपल्यातच संकोचून घेतलेले अवयव.... हे ही सारं दृश्यमान व्हावं.

आलापीचा प्रदेश हा स्वर लावण्याच्या संयमाचा... होय! संयमाचा! संयम अशासाठी की, आलापीत "लय मात्रांना" जागा नाही. शुद्ध स्वरानंद. वेगवेगळ्या प्रकारांनी स्वर आणि स्वर-समुह ह्यांच्या सागरात मुक्तपणे लहरत निर्माण केलेल्या लाटा. मुक्तं पण स्वैर नाही.... म्हणजे काय तर इथे मूर्तं घडविणे आहे.... पण एकदा हात, एकदा पायाचं बोट... मग भुवई असलं विस्कळीत बांधकाम नाही...

रागाच्या आरोहाची म्हणजे चढणीची अन अवरोहाची म्हणजे उतरणीची बंधनं आहेत.... स्वरांचा त्या क्रमाने लगाव अपेक्षित आहे...
गंमत म्हणजे एकाचवेळी दोन मुर्तीकार दोन वेगवेगळ्या प्रकारची ह्त्यारं घेऊन एकच मूर्तं घडवतायत. किती त्यांच्या विचारात, कृतीत साधर्म्य हवं... ह्या विचाराने मी थक्कं झाले.




आलापी ही खास करून गायकीची गल्ली. सतारवादक, जे गायकी ढंगाने वाजवतात तेच ह्या रस्त्याने जाऊ धजावेत. देबप्रियाने गळ्याच्या वाटे शोधल्या गल्ल्यांमधूनही सतारीला गायकी अंगाने मुरकत समन्वय फिरवत तर होताच पण जमेल तिथे आपल्या स्वत:च्या नागमोड्या पायवाटा रेखून देबप्रियाला चकवाही देत होता. कधी देबप्रियाने सरळ लावलेला स्वर, समन्वय मिंडने खेचून दाखवत होता तर कधी समन्वयच्या सतारीने शोधलेली अवघड जागा अजून अवघड करून देबप्रिया गळ्यावरची हुकुमत दाखवत होता. समन्वयने वरच्या सप्तकात लावलेले स्वर खालच्या सप्तकात आपल्या निकोप स्वरात देबप्रियाने दाखवणं आणि देबप्रियाचे स्वर लगाव तशाच पद्धतीने पण वेगळ्या सप्तकात समन्वयच्या सतारीने बोलणे....
एकमेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीने स्वर लावण्याला त्यांनी एकमेकांना दिलेली समर्थ साथ.... केवळ अप्रतिम. इथे देबप्रियाच्या गळ्याची रेंज ऐकत रहावी. एका अखंड धारेत बासुंदी ओतावी तसा मुलायम आवाज तीन सप्तकात फिरतो.




जवळ जवळ पन्नास मिनिटं नुस्ती आलापी झाली. त्यानंतर सुरू झाला ’जोड’ म्हणजे लयीचा अविष्कार. पण तबल्याची साथ न घेता. ह्यात दिसून येते त्या त्या घराण्याची राग विस्तार, राग मांडणी, विशिष्टं पद्धतीने लयीशी खेळणं. अजून शब्दांचं अवतरण झालेलं नाही. मूर्तीच्या हर एक भागाची चढ, उतरण, गोलाई, कोपरे, कंगोरे.... ह्यावरचं कुसरीचं काम.

हा खास करून वादकांचा मोहल्ला. सतारीचं मिंडकाम इथे नुस्तं स्तंभित होऊन बघत रहायचं. कधी कधी समन्वयची सतार एका एका स्वराचा मोती गुंफित होती तर कधी अनेक सुरांच्या पागोळ्यांचा लयीत झिरमिळणारा पडदा.... एखादं वाद्य एखाद्या कलाकाराच्या शरीराचाच एक भाग बनतं म्हणजे काय... तर वाद्यं आणि कलाकार हे ’एक’ होऊन वाजतात... सतारीच्या तारांतून निघणारी मिंड आधी समन्वयच्या बाहूतून निघताना दिसत होती.... सतार समन्वयचा गळा झाली होती!




शब्दं न वापरता, किंवा अगदी फक्त नोम-तोम अशा जुजबी शब्दांचा आधार घेत गळ्यातलं स्वरयंत्र सतारीच्या अंगाने चालवण्याला किती अथक रियाज केला असेल देबप्रियाने, ते लख्खं दिसत होतं. तोडीस तोड गमकेच्या ताना एका मागून एक येत होत्या. समन्वयने काढलेल्या तिप्पट चौपट लयीच्या ताना देबप्रियाचा गळा हूबहू काढत होता.

ह्या दोघांचं ह्या लयीच्या साम्राज्यात एकमेकांना द्वंद्वासाठी आव्हान नव्हतं... अहं! अनेकानेक फुलांनी बहरल्या एखाद्या विस्तीर्ण पठारावर हुंदडणाया अवखळ दोन मित्रांसारखं..... अरे हे बघ.... अरे ते बघ... हात धरून ओढून ओढून नेऊन कवतिक एकमेकांना दाखवणं, कधी थांबून गुढग्यांवर बसत एखाद्या सुंदर फुलाला जवळून निरखणं तर कधी हातात हात गुंफुन नुस्तं सैराट पळत सुटणं....
ह्या दोन खेळियांची हर खेळी अती विलोभनीय होती!

जवळ जवळ अर्धा तास जोड वाजवून जेव्हा ते थांबले.... तेव्हा स्तिमित झालेल्या समोरच्यांना भानावर यायलाही थोडा वेळ लागला....

मध्य लयीत तीन तालात एक सुंदर बंदिश सुरू झाली ती ही ह्या दोघांनी बांधलेली. शब्दांच्या साम्राज्यात शब्दांचे अर्थं सतारीवर नुस्तं स्वरात उकलून दाखवणं... सतार बोलते म्हणजे काय ते प्रत्यक्ष पाहिलं.




मूर्तं घडवून झाली होती आणि आता शब्दांचे प्राण फुंकून तिला चेतस दिलं... कसं तिचं चालणं, कसं डोलण, कसं ओठंगून उभं रहाणं, कसे विभ्रम, कसं खळीदार हासू, कसं झिणकारत बोलणं...

हे सारं दाखवणं अन ते ही कशा संयमात... स्वर, ताल, राग, शब्दं ह्यांची बांधिलकी न सोडता. गाणारा गळ्याच्या सीमा ओलांडू बघतोय पण गायकीची बूज राखून तर सतारिया सतारीच्या.... पण वादनाचे किनारे न ओलांडता... स्वातंत्र्य आहे पण स्वैराचार नाही. बंदिश गायकीची आणि वादनाची सगळी सगळी अंग खुलवली दोघांनी मिळून... कधी एकमेकांना पूरक होत तर कधी चेतावत.




ह्यानंतर त्या दोघांनी चार वेळा लय वाढवली.... सतारीचं एक ठीकय. पण गायकी ह्या लयींमध्ये ऐकायला मिळत नाही. ह्या लयीत देबप्रियाने गायलेल्या स्वरतानांसाठी शब्दं नाहीत. म्हणजे 'सा रे ग म' असे स्वर वापरून घेतलेल्या ताना. त्याही सतारीच्या अंगाने! केवळ अप्रतिम. अन, देबप्रियाने सुरू केलेलाच लयीचा बाज उचलून समन्वयने दाखवलेल्या हरकती.... त्याला तोड नाही. ह्या दोघांचं एकमेकांच्या विचारांत विचार करणं, हे ऐकायलाच हवं बघायलाच हवं.




अती द्रुत लयीत देबप्रियाच्या आणि समन्वयच्या फिरकीच्या ताना म्हणजे नुस्ता पाणलोट होता...




ह्या दोघांनी, अवघ्या पंचविसाव्या वर्षी मिळवलेल्या ह्या हुकुमतीला माझा सलाम! बाबांनो, असेच आणि अजूनही करीत रहाण्यासाठी जे काही हवं ते सारं सारं तुमच्यासाठी उपलब्धं होवो... हे एकच एक मनात येत राहिलं.

जवळ जवळ दीड-पावणे दोन तासांनी त्यांनी एक राग संपवला तेव्हा समोरच्यांना टाळ्या वाजवायचही भान राहिलं नाही. कशातरी दोन-पाच जणांनी टाळ्या वाजवल्या... तेव्हा इतर भानावर आले... आणि मग वाजली ती अशी टाळी वाजली....

********************************************************
मध्यंतर करायचं का? ह्यावर दोघे उत्तरले.... तशी आम्हाला गरज नाही... फक्तं वाद्य पुढल्या रागात लावून घेतो की झालं.... पण आम्ही ऐकणार्‍यांनीच मागून घेतला वेळ.... डोक्याला आलेल्या झिणझिण्या घालवायला....

त्यानंतर जवळ जवळ तासभर भीमपलासी आणि एक होरी-ठुमरी सादर करून मगच थांबले हे पठ्ठे.
त्यांचा आलापी-अन जोड ह्याला मी स्वस्थं बसून होते.... यापूर्वी तबला समोर ठेवून काहीही न वाजवता इतका वेळ बसणं, इतकं आनंददायी मी कधीच अनुभवलं नव्हतं... इतकच नव्हे तर आता मी यांच्याबरोबर वाजवायचय ह्या विचाराने थोडकं दु:ख मात्रं झालं... ते ही अशाने की काही झालं तरी माझ्या वाजवण्याकडे मला काहीतरी लक्षं देणं भाग आहे... म्हणजे ह्या आजूबाजूला चालल्या आनंदयात्रेत इतरांसारखं झोकून देता येणार नाही.... सजग रहायला हवं.... म्हणजे थोडसं मुकण्यासारखंच.

अजून एक गोष्टं आवर्जून सांगायची म्हणजे, कुणीतरी त्यांना त्यांच्याबद्दल "काही सांगा" असा आग्रह केला.... तेव्हा "सांगितलं की इतका वेळ" असं म्हणाले. आजच्या कार्यक्रमात काही उत्तम हातून घडलं असल्यास, ती गुरुंची कृपा आणि चुका झाल्यात त्या आमच्या... बाकी माहिती वेबसाईटवर वगैरे मिळेलच.... असलं!
मला अशी जमिनीवरल्या पायांची ’पोचलेली’ मंडळी प्रचंड भावतात.... अगदी मैत्र असावं अशी.

हा कार्यक्रम घडायला काही तशीच खास माणसं, ठिकाणं, घटना कारणीभूत आहेत. त्याची कथा ही अशी - एका बुधवारी संध्याकाळी, घरचं सगळं आवरून नुक्ती टीव्ही नावाच्या बिनडोक खोक्यासमोर त्याहीपेक्षा "खोकं" झालेलं डोकं घेऊन बसले आणि फोन वाजला.... थोडा आनंदच झाला.

"आप आईये कल.... हा तबला लेके ही तो बुला रहे है।...कोलकातासे है। हा। जुगलबंदी. सितार और गायन....", इथेच कुठेतरी मनात नकारघंटा वाजायला लागली होती. सतार कितीही गायकी अंगाने वाजवली तरी.... गायनाबरोबर नको वाटतं. किंबहुना ह्या दोन गोष्टी कितीही स्वतंत्रपणे छान वाटल्या तरी जुगलबंदीत अगदीच "चढा-ओढ" वाटते. एकाच जेवणात श्रीखंड आणि पुरणपोळी ठेवल्यावर मला जितका राग येतो तितकाच.

पण निमंत्रण करणारे वेदांत केंद्राचे सिडनीतले स्वामीजी आहेत. त्यांचा मान राखायला हवा, जायल हवं. मला स्वत:ला नं, असं 'देखल्या देवा दंडवत' एकवेळ देवाला घालायला चालतं पण "ऐकण्याशी प्रतारणा"?.... ती क्लेशदायी असते. असो....

गुरूवारी कामावरून तडक आश्रमातच पोचलो. अजून एक असेच ऐकणारे मित्रवर्य होते बरोबर. जाताना डोक्यात अठ्ठावन्न तरी प्रश्नं- कसे असतील कलाकार, नावं एकलेली नाहीत, शिवाय आज वीकडे, उद्याचं कसं, काय काय, परत घरी कधी पोचणार आता.... हे आणि असले अनेक ऐहिक प्रश्नं शिरावर घेऊन निघालो होतो.... ह्यासारखे प्रश्नं किती निरर्थक असतात ते उत्तरं मिळाल्यावरच कळतं हा विनोदाचा भाग झाला.

ह्या आश्रमाची जागा भर सिडनीत अशा ठिकाणी आहे, की आवारात पाऊल ठेवताच एकेक आवरणं गळून पडायला लागतात. रामकृष्णांच्या देवायतनापाशी जाईपर्यंत, तिथल्या झाडीने, आतून येणार्‍या उदबत्तीच्या सुवासाने, कधी नाम-जपाने आपला कब्जा केलेला असतो..... नुसता नमस्कार करे करे पर्यंत आपण तिथले झालेले असतो.

तिथे हे दोन "कलाकार" म्हणायचे ते..... चांगल्या शब्दांत ’तरूण’ आणि माझ्या भाषेत सांगायचं झालं तर अजून जमिनीतून पूर्णपणे न उगवलेली वीसा अधिक जास्तीत जास्तं पाच.... वर्षांची कोवळी रोपटी.... बसले होते.

नमस्कार-चमत्कार झाले.... त्यानंतर त्यांनी ’सेवा’ म्हणून गायला-वाजवलेला आणि आम्ही अनुभवलेला चमत्कार आमच्या इतर दर्दी मित्र-मंडळींना ऐकवला नाही तर तेव्हढ्या पापासाठी अजून काही जन्मं परत परत यावं लागेल.... हे इतकं पटलं की दोन दिवसात शनीवार सकाळची ही घरगुती मैफिल जमवली.... (त्यांना चालेल पेक्षा इतक्या थोड्या अवधीत चांगला तबलावादक/दिका मिळण्याची शक्यता नाही म्हणता तबला मीच वाजवला झालं.... तेव्ह्ढं एक वळतं करून घेतलं बुवा त्यांनी)

मैफिलीत काय घडलं.... ते पुढलं तुम्हाला आता माहीतच आहे. आणि इतका समृद्ध अनुभव तुम्हाला कथला नाही तर अजून एक दीडतरी जन्मं परत.... म्हणून हा लेख-प्रपंच!

हे गुणी कलाकार लंडनच्या दौर्‍यावर लवकरच जाणार असल्याचं त्यांच्या बोलण्यात ऐकल्याचं आठवतय.... कुणा कानसेनांना माहीती हवी असल्यास कळवा.... विचारून नक्की सांगेन...

(या लेखातला पुष्कळसा भाग श्रवणीय असून लेखाचा पूर्ण आस्वाद घेण्यासाठी आपल्या संगणकावर MP३ प्रकारचे कार्यक्रम ऐकण्याची सुविधा आवश्यक आहे. ही सुविधा सध्या फक्त IE न्याहाळकात चालत असून Firefox किंवा इतर न्याहाळकात दिसणार नाही. तसेच तुमच्या IE settings मधे Activx control वापरायला परवानगी द्या)
गुलमोहर: 

दाद, स्वतःला आलेला सुंदर अनुभव इतक्या सुंदर शब्दात आमच्यापर्यंत पोचवलास.....
अगदी मनापासून धन्यवाद.
पण इथल्या MP3 files दिसत नाहीयेत मला इंटरनेट एक्सप्लोरर मधून Sad

दाद, किती अप्रतिम उतरवलं आहे तुम्ही हे...

दाद, सुंदर !
अतिशय उत्कट लिहीले आहे. आधी मैफिलीचा आनंदअनुभव सांगून मग फ्लॅशबॅक सांगणेही आवडले. आता MP3 ऐकायची उत्सुकता आहे !

हा लेख म्हणजे आपल्या मायबोलीच्या तांत्रिक सपोर्टणार्‍यांसाठी प्रच्चंड डोकेदुखी होणार आहे... असं दिसतय. पण एकच सांगते... इथे तो अशा स्वरूपात टाकण्यासाठी त्यांनी आधीच खूप मेहनत घेतलीये. ह्या क्लिप्स खर्रच ऐकण्यासारख्या आहेत. हे दोन्ही कलाकार... नुस्ते वाचण्यासाठी नाहीत. आपल्या ऍडमिनना कदाचित हा लेख दोन तीन भागात विभागावा लागेल कारण एकच पान एव्हढ्या क्लिप्स सह लोड व्हायला वेळ लागतोय....
आणि अजून काही इमेल्स येण्याआधीच सांगते... यात तबला मी वाजवलाय.
तेव्हढ.... एक वळतं करून घ्या... श्राव्य भागात Happy

क्या बात है. . सगळच आवडल. तबल्या सकट.
- अनिलभाई

शलाकाताई, आभार आभार आभार! Happy
एका स्वर्गीय मैफिलीला कान मन आणि आत्मा घेवून हजर राहता आले तुमच्या मुळे!
एका एका क्लीपचे वर्णन करतांना तुम्ही अगदी मोहवून टाकता. अवघुंटनातली शांत 'ती' असो वा झिरमिळणार्‍या ताना. सुरेखच! गायक, वादक, वाद्य आणि रंगून गेलेले श्रोते ह्यांच अद्वैत सुंदर साकारले आहे. ह्या गोष्टींना 'मूर्त' करण्यात तुमचाही मोलाचा सहभाग आहे, हे वाचून छान वाटले!
इकडे ह्या क्लिप्स टाकतांना अडचणी असतीलही, पण एक तक्रार आहे. बासुंदीचा आस्वाद घ्यायला लागतो न लागतो तोच क्लिप थांबते Sad काचेतून भरलेलं ताट दिसतांना नमुन्यावर समाधान मानावे लागले. आसुसून ती परमावधी अनुभवतांना मध्येच थांबणे पटत नाही.
हेही नसे थोडके! तरी अतृप्त वाटले.

अति दृत मध्ये दोघांना ऐकने म्हणजे केवळ उच्च. व्वा. क्या बात है. जियो.

त्यांच्या परवानगी ने कुठेतरी सगळं रेकॉर्डिंग अपलोड करता येइल का? अन त्यांच्या वेब साइटची लिंक?
लेख अगदी मस्तच, अन मधे मधे स्पेसिफिक क्लिप्स टाकल्यायत त्यामुळे माझ्यासारख्या कानसेनांना पर्वणी आहे.

गाण्यातलं काही एक कळत नाही, पण हे खूप सुंदर आणि ताकदीने गायलयं एव्हढं कळलं!! द्रुतगतीने गायलंय ते खूप मस्त वाटलं ऐकायला.. लाईव्ह ऐकायला जास्त मजा आली असती.. असो.. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद...
लेखही मस्त च झालाय.. पण आम्हा पामरांना फारसं कळत नसल्याने जरा काही गोष्टी डोक्यावरून गेल्या.. मा.बु.दो.स.

दाद
क्लिपिंग्ज ऐकली. खरोखर "परमेश्वरी" अनुभव होता. आणि त्यावर तुमचे लेखन!! आणि सर्वावर ताण म्हणजे तबला तुम्ही स्वतः वाजवला आहे!!!!!!!! ग्रेट.
हा प्रोग्रॅम कुठे झाला? मायबोलीकरांना सम्पूर्ण ऐकता येइल का?

शलाका,
लेखन निव्वल अप्रतिम !!
क्लिपिन्ग्ज ऐकु शकलो नाहि.पन हा अनुभव इतक्या सुंदर शब्दात आमच्यापर्यंत पोचवल्याबद्द्ल ध्नन्यवाद.
रवि अधिकारी

हो कार्यक्रम सिडनीत झालेला दिसतोय.
आधी क्लिपिंग्ज ऐकली पण आता पूर्ण लेख वाचला.
अप्रतीम!!!!!!!!!!!!!

दाद,
एका अप्रतिम जमलेल्या मैफिलीचे अप्रतिम रसग्रहण? कां शब्दचित्रण? खूपच सुरेख. मलाही शास्त्रीय संगीताची परिभाषा समजत नाही. पण आवडतं. या अशा लेखांमुळे आणि दिलेल्या क्लीपिंग्जमुळे ही समज थोडी वाढते. कित्येक गोष्टींची परिभाषा आपल्याला समजत नाही. पण संस्काराने त्या गोष्टी कानावरून गेलेल्या असतात. जस भाषेच व्याकरण. भूत भविष्य वर्तमान, प्रास, यमक वगैरे आपण खूप उशीरा शिकतो. पण हे सर्व काळ, अलंकार आपण जाणत असतो. अडगुलं मडगुलंला सोन्याच कडगुलंचा यमक लहानपणीच रुजून गेलेला असतो मनात. तसं संगीतात लता रफी मन्ना वगैरेनी सूर आणि त्या गाण्यांनी ताल व वाद्यमेळाची ओळख दिलेली असते. पण परिभाषा अनोळखी असते.
अशा परमेश्वरी लेखांनी ही ओळखीची होते. सौ. भारती वैशंपायन पूर्वी शास्त्रीय संगीताची ओळख सामान्यांसाठी व्हावी म्हणून प्रात्यक्षिकांसह व्याख्याने देत. त्याची आठवण झाली.
अस खूप लिहा. संगीताची ही काव्यमय ओळख आहे. सुंदर!

अतीशय सुन्दर, अप्रतिम जमलय हे,

सुरेख अनुभव!! सर्वकाही देखणं आहे, गायन, वादन, लेखन. इतके सुंदर क्षण जिवंतपणे शब्दांत उतरवल्याबद्दल आणि इथे शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

मीही हे ऐकु शकलो नाही, पण त्याची गरज वाटली नाही, इतके सुश्राव्य लेखन आहे हे.

अरे, माझा प्रतिसाद गायब झालाय्..असो. पुन्हा एकदा:
छान जमलीये मैफील.. आणि आम्च्यापर्यन्त ती पोचवली (sound quality of clips is extremely good) त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.

(तबला कुठून्/कुणाकडून बान्धून घेतलाय..? "आस" चान्गली ऐकू येत आहे.. )

खुप सुंदर, उच्च. स्वर आणि ताल यांच बोट धरुन सुरांच्या वाटे संगीताच वैभव दाखवाव ते तुमच्या सारख्यानीच (तुझ्या म्हणु शकणार नाही)

यावेळी तुमचे लि़खाण वाचताना पंचप्राण नुसते डोळ्यात नाहीतर कानात पण गोळा झाले.
टेक्नॉलॉजीचा उत्तम उपयोग केला आहे. अर्थात मायबोलीचे खूप खूप आभार.
तुमच्या चाहत्यांच्या यादीत माझे नाव जमा कराल?
-अनिता

दाद....अगं तुला दाद द्यायची म्हणजे शब्दच कमी पडतात गं..... काय अप्रतिम लिहितेस..... तुझे शब्द वाचल्यावर इतकं तृप्त वाटतं ना...... कसल्या उपमा देतेस गं......!! फारच देखणे आहेत तु़झे शब्द !!
अजून ह्या क्लिप्स ऐकल्या नाहीयेत पण दिनेश म्हणाला तसं ऐकायची गरजी वाटत नाही.... इतकं सुरेख वर्णन तू केलं आहेस्......सगळं आतपर्यंत पोचलंय.
एक कडक सॅल्युट तुला Happy
आता क्लिप्स ऐकते Happy

दाद, अनेक धन्यवाद, शास्रिय संगीताची पहिली वहिली ओळख झाली.. तु करुन दीली म्हणुन नाहीतर मी कूठेच गेले नसते करुन घ्यायला..:)
सुरेख लिहिलेय त्यामुळे जास्त भावले !!!!

हो.....आणि तू तबला वाजवतेस............ तुस्सी ग्रेट हो यार! मधे वैभव आणि अमोल कडून कळले तेव्हा खूपच आश्चर्य वाटलं होतं.... एक वेगळी वाट (की राजमार्ग Happy ) निवडली आहेस गं तू......!! तुझ्या ह्या सांगितिक वाटचालीला खूप खूप शुभेच्छा !!

दाद!! मैफील केवळ अप्रतिम. ह्या क्लीप्स आमच्यापर्यंत पोहोचवण्याबदाल तुझे आणि टेक्निकल टीमचे शतशः आभार. कान खरओखर तृप्त झाले, असही म्हणवत नाही, कारण हे चाच्पडत ऐकण्याऐवजी पुर्ण राग मांडणी ऐकण्याची ओढ लागली.

तुझ्या लेखनाबद्दल काय लिहावे? तेवढे शब्द माझ्याकडे नाहीत.

दाद......जियो यार......... काय तबला वाजवला आहेस गं..... आणि तबला काय, गाणं काय , सतार काय....... नुसती मेजवानी आहे. अप्रतिम....!! आज अगदी तॄप्त वाटतंय इतकं सुंदर गाणं, वादन ऐकून.....!!

योगिनि

केवळ अप्रतीम..........
दिवसच शीण कुठल्या कुठे पळाला..............

तुमच वर्ण् न ही मस्त आहे...........

दाद , पहिली दाद तुझ्या लेखनाला. दुसरी दाद गायक आणि सतारियाला आणि तिसरी दाद तुझ्या तबलावादनाला.
खूपच सुंदर कार्यक्रम झालाय.
हा लेख म्हणजे ..... गायन,वादन आणि उत्तम वर्णन ह्यांचा त्रिवेणी संगम आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
तबल्यावरचा तुझा हातही चांगलाच वजनदार आहे हे जाणवतंय. जियो!
संगीतातले फारसे न कळणारा पण संगीत हाच देव मानणारा
:प्रमोदकाका

शलाकाताई ..
अप्रतिम ! अप्रतिम !! अप्रतिम !!!
खूप खूप धन्स ... लेखासाठी, ऑडिओ क्लिप्ससाठी आणि तुमच्या तबल्यासाठी विशेष !
आत्तपर्यंत मायस्पेसच्या नादी लागलो नव्हतो पण चक्क त्या दोघांची माहिते मायस्पेसवर मिळाली Happy
http://www.myspace.com/debapriyasamanwaya

आता ते अमेरिकेत आले तर सोने पे सुहागा !!!

सन्दीप, मस्त रे, तिथे पण छान clips आहेत....

सगळ्यात आधी मायबोली सपोर्टकरांचे धन्यवाद... अगदी मनापासून. त्यानंतर त्या दोन कलाकारांचे. खरच पाय जमीनीला आहेत, दोघांचेही. आता ही लिन्क त्यांना पाठवते. माझं आणि माझ्या नवर्‍याचं आपसातलं मराठी 'त्यांना' कळलं म्हणे आणि देवनागरी वाचता येतं... ह्या बळावर हा लेख वाचूच वाचू... असं बंगलात 'प्रोतिज्ञा' केलीये दोघांनी सिडनीत असताना Happy
त्यांच्या मायस्पेसची लिंक आधीच दिल्याबद्दल आभार रे...
www.myspace.com/debapriyasamanwaya

ह्या दोन पठ्ठ्यांना ऐकण्याचा योग आल्यास सोडू नकाच नका. शास्त्रीय संगीताचा सूर्य अस्ताला चालला... वगैरे काही नाही... हे पलिते घेऊन वेगळ्या दिशा उजळायला निघालेले बघितले की जाणवतं... जे नश्वर ते ईश्वर... आणि वेगवेगळ्या रूपात ते असंच आपल्यासमोर येणार आहे... दृष्टी, कान संकुचित असता उपयोगी नाही... चांगले सत्ताड उघडे हवेत!
(तुमचे वाचणार्‍यांचे खरच आभार. वाचता, कळवताही....
त्यात आणि माझ्या तबल्याचं तुम्हाला मायबोलीकरांना कौतुक... ती एक झाकली मूठ थोडी थोडी उघडते मी कधी कधी... फारच उघडतेय वाटली की बंद करायची पट्टदिशी Happy )

ह्या लेखानंतर,त्यावरच्या प्रति़क्रियांनंतर काहि बोलायची मा़झी पात्रता नाही,पण तरिही...
अतिशय सुरेल अनुभव,ओघवतं लिखाण,आणि हो,ती "झाकली मूठ":).(ह्यालाच "विनय" म्हणतात बहुतेकः-),गम्मत करतेयः)
तुम्ही सगळेच खूप खूप उत्तम वाजवा,गा,तुम्ही लिहित्या रहा,आणि आम्ही वाचत आणि ऐकत रहातो.
केवळ अप्रतिम..

Pages