फिताधारी कुत्री

Submitted by अरुण मनोहर on 11 July, 2010 - 23:00

फ़िताधारी कुत्री
एका शेतकऱ्याकडे बरीच कुत्री होती. ती घर, बैल, शेती वगैरे मालमत्तेची राखण करीत असत. रोज तेच ते काम करून ती कुत्री कंटाळून जात. काहींना आपल्या कामात स्वारस्य वाटत नसे. काहींना वाटे, कसले मामुले काम आहे आपले! अशा वातावरणात ती कुत्री काम व्यवस्थीत करीत नसत. त्यांना कामामधे रस यावा, आणि अभिमान वाटावा म्हणून शेतकऱ्याने एक युक्ती केली. त्यातल्या त्यात चांगल्या कुत्र्यांना कामाचे कौतूक म्हणून गळ्यात बांधायला रंगीत फ़िता दिल्या. त्या फ़ितांना छान छान किणकिण आवाज करणाऱ्या घंटा देखील होत्या. फ़िताधारी कुत्री मोठ्या दिमाखात आपापल्या फ़ितांचे प्रदर्शन करीत सगळी कडे फ़िरायची. काम संपल्यावर देखील ती फ़िता सगळ्यांना गर्वाने दाखवित मिरवायची. ज्यांना रंगीत फ़िता मिळाल्या नाही, ती कुत्री ईतरांचा हेवा करायची आणि आपल्यालाही फ़ीत मिळावी म्हणून जोमाने काम करीत. गळ्यात फ़ीत असणे ही जणू सामाजीक प्रतिष्ठेची गोष्ट झाली.
शेतकऱ्याला फ़ितांमधील घंटांच्या आवाजाने, कुत्र्यांवर चोवीस तास नजर ठेवणे शक्य झाले. त्यामुळे फ़ार थोड्या खर्चात त्याला चोवीस तासांचे गुलाम मिळाले. कुत्री आणि शेतकरी सगळे खूष होते.

एकदा विश्रांतीच्या वेळात माळरानावर जमून कुत्री मौजमजा करीत होती. त्यात एकच फ़िताधारी होता. तो अर्थातच आपल्या फ़ितेचे प्रदर्शन करीत इतरांना जळवीत होता. आपल्या फ़ितेमधून कसे वेगवेगळे मधूर आवाज निघतात, ती फ़ीत वजनाला किती हलकी आहे इत्यादी अप्रुप ऐकून कुत्री मनामधे त्याचा हेवा करीत, वरवर "कित्ती छान, कित्ती आधुनिक" वगैरे म्हणत जिभल्या चाटीत होती. सर्वांची गाणी, गप्पा, खेळणे रंगात आले होते. इतक्यात शेतकऱ्याचा नोकर घंटेच्या आवाजाने माग काढीत तिथे आला. काहितरी महत्वाचे काम ह्या फ़िताधारी कडून करवून घ्यायचे होते, कारण तो एक उत्तम कामगार म्हणून माहिती होता. नोकर फ़िताधारीला साखळीला पकडून आपल्याबरोबर ओढून नेऊ लागला.

खरं तर इतकी मौज मजा सोडून कामासाठी जाणे फ़िताधारीच्या अगदी जिवावर आले होते. पण तसे न दाखवता, शेतकऱ्याच्या साम्राज्यात आपण किती महत्वाचे प्रस्थ आहोत, बाकिच्यांसारखे रिकामटेकडे नाही, असा आव आणून ऐटीत तो तिथून जाऊ लागला. तेव्हा त्यातली काही बिनफ़िताधारी कुत्री त्याच्याकडे मत्सराने पाहू लागली. त्यानंतर आजुबाजुला चाललेल्या दंगामस्तीचा आस्वाद घेणे देखील त्यांना जमले नाही.

बोध-
१) चैनीचा आभास आणि आभासाची तृष्णा निर्माण करून शहाणे आपला कार्यभाग साधतात.
२) निर्भेळ सुख व्यावहारीक जीवनात क्वचितच लाभते. प्रत्येक सुखासोबत काही दु:खे देखील स्विकारावी लागतात.

गुलमोहर: 

अरुण
तुमच्या दोन्हि कथा वाचल्या.
कॉर्पोरेट कल्चरशि अगदि जवळीक साधतात Happy
कॉर्पोरेटनिती वैगेरे काहितरि नाव अगदि समर्पक ठरेल.

बोध काही पटत नाही.
रंगीत सुमधूर हलक्या फिता कुत्र्यांच्या गळ्यात घालू नयेत अस कंन्क्लुसन निघतय बाई.

एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. कुत्र्यांच्या गळ्यात तसल्या फिता घालतच नाहीत. लेदर किंवा तत्सम पट्टे घालतात. पपीज सोड्लेतर घंटा घालत नाहीत. फिता त्यांच्या गळ्याला करकचून बसण्याची शक्यता आहे.

अश्विनीमामी-एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. कुत्र्यांच्या गळ्यात तसल्या फिता घालतच नाहीत. लेदर किंवा तत्सम पट्टे घालतात. पपीज सोड्लेतर घंटा घालत नाहीत. फिता त्यांच्या गळ्याला करकचून बसण्याची शक्यता आहे.

आणि योग- अरे कुठून कुठे नेताय बोधकथेला?

ह्यावर देखील मस्त बोधकथा होईल!