तीन बेडूक

Submitted by अरुण मनोहर on 10 July, 2010 - 06:05

पंचतंत्रात प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्‍या नितीकथा आहेत. आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगातले प्राणी कसल्या कथा सांगत असतील? माझ्या कल्पनेतून काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक पंचतंत्र कथा जन्माला आल्या.
**************************
तीन बेडूक
एकदा एका कोरड्या विहीरीत तीन बेडूक पडले. विहीर बरीच खोल होती. त्यामुळे उड्या मारून किंवा चढून वर येणे शक्य वाटत नव्हते. विहीरीत खाण्यासाठी काही खास दिसत नव्हते. थोड्या फार माशा, किडे, काही हिरवे कोंभ वगैरे असावेत. त्यातल्या हुशार बेडकांनी लगेच सर्व परिस्थीती ताडली. जर खाद्यपदार्थांमधे सर्वांचा वाटा पडला, तर लवकरच उपासमारीची पाळी येणार! हुशार बेडूक मठ्ठ बेडकाला म्हणाली "तू असे कर....तू सर्वात बारीक आहेस. उंच उंच उड्या मारून विहीरीबाहेर पडण्याचा प्रयत्न कर. जर कसोशीने प्रयत्न केला, तर तुला बाहेर नक्कीच पडता येईल. मग तू बाहेरून आमच्यासाठी मदत पाठवू शकतोस."
मठ्ठ बेडूक उंच उड्या मरून वर जाण्याचा प्रयत्न करू लागले. हुशार बेडूक मोठमोठ्याने ओरडून त्याला प्रोत्साहन देऊ लागली. "हा हा! शाबास पठ्ठे, आणखीन जोरात.." इकडे ओरडता ओरडता हुशार बेडकांचे विहीरीत असलेले अन्न खाणे सुरूच होते. हुशार बेडूक थोड्याच वेळात टम्म फुगले. मठ्ठ बेडूक दमून निपचीत पडले. हुशार बेडकांचे ओरडणे ऐकून एक साप तेथे आला. टम्म फुगलेल्या बेडकांना पाहून लगेच त्याने ती मटकावली. नंतर दमून निपचीत पडलेले मठ्ठ बेडूक देखील गिळंकृत करून तो साप तेथून दुसर्‍या भक्षाच्या शोधात निघून गेला.
बोध-
१) प्रॉडक्टीव कामे करणारे लोक एखाद दुसरेच असतात. बाकीचे फक्त गाजावाजा करणारे असतात.
२) प्रॉडक्टीव भासणारी कामे वास्तवात प्रॉडक्टीवच असतील असे नाही.
३) होणार्‍या आणि न होणार्‍या कामांचा गाजावाजा करून छोटे समूह लठ्ठ झाले की मोठे समूह त्यांना आपल्यात सामावून घेतात. (ऍक्वीजीशन)
*********************************

गुलमोहर: 

कृपया तीन बेडूक कराल का? बेडूक पुल्लिंगी आहे. नपु. नाही.
बेडके या शब्दाचा आणखी एक वेगळाच अर्थ आहे.

शैलेशराव आणि प्र-साद ह्यांस-
दोन हुशार बेडूक, एक मठ्ठ बेडूक.
तीघांनाही सापाने खाल्ले.