इंजिनीयरींगचा सोहळा-४-कुणी नोकरी देता का नोकरी??

Submitted by सुमेधा आदवडे on 9 July, 2010 - 06:30

याआधीचे भागः
इंजिनीयरींगचा सोहळा-१-बारावी उवाच पण प्रवेश हवाच!
इंजिनीयरींगचा सोहळा-२-पहिला मान रॅगींगचा..
इंजिनीयरींगचा सोहळा-३-चित्रांची कला आणि के.टी प्रकरण

सगळी धम्माल,मौज-मस्ती,असाईनमेंट्स,जर्नल्स,आणि परिक्षा ह्या गाड्या बदलत बदलत दुसरं वर्ष कधी संपायला आलं ते कळलं पण नाही. चौथ्या सेमीस्टरला वरचे सगळे राक्षस तसेच्या तसेच होते. त्यात त्यांचा एक नवा सवंगडी आम्हाला छळण्यास सुसज्ज झाला होता. ह्या नव्या राक्षसाचं नाव "वायवा" असं होतं. तोंडी परिक्षेचा तसा थोडाफार अनुभव बारावीपासुन गाठीशी होता. पण तो फक्त कॉलेजातल्या शिक्षकांनी नावापुर्ता आणि औपचारिकतेपोटी माझ्या पदरी बांधला होता. मात्र ह्यावेळेस बाहेरच्या कॉलेजातुन एक "एक्स्टर्नल एक्झामिनर" चं लेबल लावलेले प्राणी आमचं रक्त शोषायला येणार आहेत हे कळल्यावर डोक्यावरचे सगळे केस ताठ उभे झाले, रक्ताचा प्रत्येक थेंब आपला जीव वाचावा म्हणुन माझ्या नावाने ठणाणा करु लागला आणि अस्मादिक दहा हत्तींचं बळ (बुद्धीत, अंगात नव्हे!) आल्यासारखे कामाला लागले.

"पुढच्याला मार,मागच्याला शहाणपण" ही म्हण वायवा मध्ये जाम कामाला यायची. पण त्यामुळे पहिल्या २-३ रोल नंबर्सची नेहमी तंतरलेली असायची. ती मुलं परिक्षा देऊन बाहेर आल्यावर गुळाच्या ढेपीवर माशा बसाव्या तसे आम्ही सगळे त्यांच्या आवती-भोवती "क्या पुछा, क्या पुछा?" करत गोळा व्हायचो आणि त्यांची दुसरी अनौपचारीक वायवा घ्यायचो. खास करुन एक्स्टर्नलच्या समोर बसलेला विद्यार्थी..एक्स्टर्नलच्या प्रश्नांनी तो जितका घाबरला नसेल त्याच्या दुप्पट बाहेरच्या प्रशोनत्तरांनी तो भंजाळुन जायचा! मग ह्या "हलाल झालेल्या बकऱ्यांच्या" उत्तरांवरुन एखाद्या खुप वेळा विचारल्या गेलेल्या प्रश्नाची परत परत उजळणी व्हायची,काही महाभाग ’असलं काही आपल्या सीलॅबस मध्ये आहे’ असा प्रथमच साक्षात्कार झाला असल्यामुळे आतमध्ये समोर येणार असणारे प्रश्नचिन्ह बाहेरुनच चेहऱ्यावर पांघरत आत जायचे, तर कधी कधी एखाद्या नंबरला पुन्हा आत बोलावलं गेल्यावर "मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही" च्या थाटात ते पुन्हा आत जायचे आणि बाहेरचे परिक्षार्थी पुन्हा नोट्स मध्ये गडुन जायचे.

आतल्या आणि त्यानंतर बाहेरच्याही प्रश्नांची सरबत्ती संपवल्यावर काही टवाळ कार्टी इकडे-तिकडे नाक खुपसून टाईमपास करायची आणि कधी कधी समोरच्याचं उगीचंच टेंशन वाढवयची. माझ्या एका मैत्रीणीला तर इतकं घाबरवलेलं की ती आत जाऊन एक्सटर्नल समोर बसली आणि त्यांनी काही विचारायला सुरूवात करायच्या आधीच रडुच लागली! पण आमच्या लठ्ठ एच.ओ.डी मॅडमने तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकल्यावर तिचे अश्रु घाबरुन डोळ्या परत गेले. नंतर मॅडमने बाहेर येऊन सगळ्यांना,खास करुन मुलींना चांगलं झापलं..."आणखी कोणी आत आल्यावर रडलं तर याद राखा!" बर्‍याचदा वर्गात कोणी जास्त शहाणपण करत असल्यास, गब्बरच्या थाटात पोरं "अ‍ॅलिस तेरेपे बैठ जायेगी!" बोलायची तिच्या साईझच्या विचारानेच सगळ्यांची दातखिळी बसुन हडं खिळखिळी व्हायची. मी स्वप्नात पाहिलेली रॅगींगची कुंभकरीण आणि ही जुळ्या बहिणीच वाटायच्या मला! आमचे एक मॅथ्सचे सर पण हिच्या जवळपास साईझचे होते. कॉलेजात बाईकवर येणाऱ्या एखाद्याचा, आदरभाव अगदीच उतु जाऊन जर त्याने सरांना लिफ्ट दिली तर देव त्याला पेट्रोलच्या टाकीवर बसुन बाईक चालवण्याची शिक्षा लगेच करायचा! कधी कधी अशा शंकाही काहींच्या मनात यायच्या की त्या मॅडम आणि ह्या सरांची जर कधी टक्कर झाली तर काय होईल? असो.

तर चौथ्या,सहाव्या,सातव्या आणि आठव्या सेमीस्टरमधलं हे वायवा प्रकरण मजेशीर रित्या पार पडलं. चेतन भगतचं "फाईव्ह पॉंईंट समवन" हे पुस्तक त्याच दरम्यान खुप प्रचलीत झालं होतं. त्यातुन आयडीया घेऊन मद्यपानाचा आधार घेऊन वायवाचं भक्षण व्हायच्या चर्चा पण काही अती धाडसी मंडळी करायची, मात्र तसं काही कुणी केल्याचं कधी ऐकीवात आलं नाही.

सहावी सेम आली आणि फायनल ईयर प्रोजेक्ट साठी ग्रुप्स बनु लागले. सगळ्या ओढाताणी,इमोशनल सीन्स वगैरे पार पडुन एकदाचा माझा ग्रुप तयार झाला. सहाव्या सेमची परिक्षा खुप छान गेली होती. आता आम्ही इंजिनीयरींगच्या शेवटच्या टप्प्यात पाय टाकत होतो...शेवटचं वर्ष! आमच्या ग्रुपला सीवरीच्या कोलगेट कंपनीमध्ये प्रोजेक्ट करायची परवांगी मिळाली होती. आईच्या पायाचा अंगठा फ़्रॅकचर झाल्यामुळे एकटीवर पडणारी घरातली कामं, कॉलेज, आठवड्यातुन दोन विषयांचे दोन क्लासेस, आणि कंपनीत जाऊन प्रोजेक्टचं काम..अशी कसरत करता करता सातव्या सेमीस्टरचा एक महीना संपलादेखील. मात्र यात एक जमेची बाजु ही झाली की बाकीच्यांच्या प्रोजेक्टचं "श्री गणेशा"ही व्हायचं बाकी असताना महिन्याभरातच आमचं प्रोजेक्ट अर्ध्याहुन अधिक पुर्ण झालं होतं! आता प्रेशर जरासं कमी झाल्यासारखं वाटत होतं.

पण इंजिनीयरींगच्या आयुष्यातल्या एका अती महत्वाच्या गोष्टीला आता समोर जायचं होतं-"रीक्रुटमेंट"! खरंतर सहावी सेमीस्टर संपल्या संपल्या लगेच टी.सी.एस,वीप्रो,अल अ‍ॅण्ड टी वगैरे मोठमोठी नावं प्रत्येक सेकंदाला कानी येऊ लागली होती. ह्या सगळ्या मोठमोठया कंपन्यांमध्ये जॉब साठी अप्लाय करायला आतापर्यंतच्या पाचही सेमीस्टर मध्ये ६०% हुन अधीक परसेंट असल्याची तोंडी अट होती. माझं नशीब नेहमीप्रमाणे डोकं वर काढत असल्यामुळे माझं अ‍ॅवरेज ५९.९४% होतं. हा ०.०६% चा फरक ह्या मोठ्या कंपन्यांना अक्षम्य अपराध वाटायचा. खरंतर जॉबला लागल्यावर,पद्धतशीर ट्रेनींग देऊन मगच काम चालु होतं हा सगळीकडचा नियम होता..तरी हा ०.०६% फरक त्यांच्या कंपनीच्या कारकिर्दीत किती फरक पाडणार होता हा प्रश्न कितीही मनात असुन कोणालाच विचारता आला नाही.म्हणुन मला सुरुवातीच्या ३-४ कंपन्यांना अप्लाय करताच आलं नाही! ह्या कंपन्यांनी एकत्रच, ८५,५०,४०, अशा मोठमोठ्या संख्येत विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या होत्या.

आमच्या ब्रांच साठी आलेल्या जवळ जवळ पाचव्या कंपनीला ५५% कटऑफ ठेवायचं शहाणपण सुचलं आणि मी "उधे इंडीया प्रायव्हेट लिमीटेड" नावाच्या ह्या कंपनीत अप्लाय केलं. माझे अ‍ॅप्टीट्युड टेस्ट, ग्रुप डिस्कशन वगैरे सगळे राऊंड छान पार पडले. प्रत्येक राऊंडला विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली होती. आता फक्त आम्ही १५ जणं शेवटच्या ’पर्सनल इंटरव्ह्यु’ च्या राऊंडसाठी उरलो होतो. सहाव्या सेममध्येच आमच्या कडच्या काही सांस्कृतिक मंडळांनी, "मॉक इंटरव्ह्युज" चे सेशन्स घेऊन ह्या लढाईची आमच्याकडुन बऱ्यापैकी तयारी करुन घेतली होती. तरीही ’इंटरव्ह्यु’ म्हटल्यावर नॉर्मल माणसांना टेंशन येतंच ना.. डॅडींशी फोनवर एकदा बोलणं झालं. पहिल्याच कंपनीत अप्लाय केलं आणि सगळे राऊंड्स क्लीयर झाले कळल्यावर त्यांना बरं वाटलं होतं पण अजुन इंटरव्ह्यु बाकी होता आणि सगळ्या नाही पण बऱ्याचशा प्रश्नांची नीट उत्तरं दिली होती मी. थोड्या वेळात निकाल जाहीर झाला. आमच्यापैकी तिघांना नोकरी मिळाली होती, त्यात माझं नाव नव्हतं. यावर डॅडी म्हणाले होते," नाही झालं तर नाही..इतका छान एक्स्पीरीयन्स मिळाला तुला सगळ्या प्रोसेसचा हे काय कमी आहे? अजुन येतील ना कंपनीज."

त्यानंतर सलग ३ कंपन्यांमध्ये मी अप्लाय केलं. पण शेवटच्या राऊंडपर्यंत एकही कंपनीसाठी पोहचु शकले नाही. माझ्या जवळच्या मित्र-मैत्रीणींना, माझ्या खास मैत्रीणीलाही नोकरी मिळाली. खुप उदास वाटु लागलं होतं. कॅंपस मधुन नोकरी नाही मिळाली तर कॉलेजनंतर खुप वणवण करावी लागणार ह्या विचाराने आणखी टेंशन यायचं. एव्हाना सातव्या सेमीस्टरचे तीन महिने संपले होते. २ महीन्यांनी आमची परिक्षा होती आणि महिन्याभराने प्रॅक्टीकल आणि वायवा सुरू होणार होत्या. इतर इंजिनीयरींगच्या गोष्टीही होत्याच. तेवढ्यात आमच्या रीक्रुट्मेंट ऑफिसर तर्फे एच.सी.एल कंपनी रिक्रुटमेंटसाठी येत असल्याचं समजलं.५५% कट ऑफ असल्यामुळे मी अप्लाय करु शकत होते. मात्र सगळी प्रोसेस अंधेरीच्या एस.पी (सरदार पटेल) कॉलेजला होती.
इतक्या वर्षात अंधेरीला एकटीने जायचा तसा हा पहिलाच प्रसंग होता. बाहेरच माझ्या क्लासमधल्या ३-४ मैत्रीणी भेटल्या. मग आम्ही मोठ्या हॉल मध्ये कंपनीच्या प्रेझेंटेशनसाठी एकत्र गेलो. व्ही.जे.टी.आय, एस.पी आणि आमचं स्वामीज अशी ३ कॉलेजं मिळुन साधारण १२५ विद्यार्थी होते. प्रेझेंटेशनच्या वेळेसच कळलं की ह्या नेटवर्कींग कंपनीत फील्ड जॉब्स खुप असल्यामुळे मुलींचं रिक्रुटमेंट कमी प्रमाणात होतं. थोडीशी निराशा सुरुवातीलाच झाली. पण तरी सगळ्या थांबलो.

सगळ्या ब्रॅन्चस चे राऊंड दुपारपर्यंत चालु झाले. आमचा काही नंबर लागेना. संध्याकाळचे ६ वाजत आले होते. तेवढ्यातच कुणीतरी येऊन सांगुन गेलं की इंस्ट्रुमेंटेशनचे विद्यार्थी एच.सी.एल ला नको आहेत, म्हणुन अजुन आम्हाला बोलवलंय नाही. हे ऐकुन आमच्या क्लासमधल्या ४-५ जणांनी तिथुन लगेच काढता पाय घेतला. पण तरी आम्ही काही आशाळभुत मंडळींनी थोडावेळ थांबण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी दसऱ्याची सुट्टीच होती, त्यामुळे घरी जायला उशीर झाला तरी चालणार होतं. अखेर आमच्या आशेने आम्हाला आधार दिला आणि ७.३० ला आम्हाला आत बोलावलं. आम्ही १०-१२ जणं आतल्या रुममध्ये गेलो. मोठ्या अंडाकार टेबलाभोवती बसलो. एच.सी.एलची ३ जणं "काय वैताग आहे!" अशा नजरेने आम्हा सगळ्यांना बघत होती. मग एकाने उभं राहुन बोलायला सुरूवात केली. पहिल्यांदा आमच्यातल्या २-३ जणांना त्या क्षणी डोक्यात येईल ते चित्र समोरच्या व्हाईट बोर्डवर काढायला सांगितलं. माझ्या एका मैत्रीणीने चालु वेळ दाखवणारं घड्याळ काढलं आणि आणखी एकाने गीटार काढलं. त्यांना कारणं विचारली गेली आणि मग मोर्चा आम्हा सगळ्यांवर आला. साधे सुधे प्रश्नोत्तरे अनौपचारिक चर्चेच्या स्वरुपात झाली. आणि अर्ध्या तासात "धिस इज द बेस्ट बॅच व्हुई हॅव कम अक्रोस सिन्स मॉर्नींग!" अशी पृष्टी देताना मघासचे त्यांचे मलूल चेहरे आता बऱ्यापैकी खुलले होते...आणि आमचेही, हे सांगायला नकोच! आता वेळेकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हती.

बाहेर आल्यावर दहाच मिनीटात ह्या राऊंडचा निकाल लागला आणि आम्ही ९-१० जणं पुढच्या राऊंड साठी निवडले गेले होतो. माझ्या वर्गातल्या आम्ही तिघी जणी आणि २ मुलं होती. पुढचा राऊंड म्हणजे अ‍ॅपटीट्युड टेस्ट, रात्री ९ ला चालु होणार होती. सकाळपासुन फक्त दोन वडापावांवर धन्य माननाऱ्या पोटात कावळे ओरडु लागले होते. खाली येऊन बंदच व्हायला आलेल्या कॅंटीनमधुन सॅंडवीचस,कॉफी वगैरे जे मिळालं ते घेतलं आणि पहिले पोटोबा करुन घेतला. ८.४५ वाजता वर आलो. बरोबर ९ ला टेस्टचे पेपर हातात दिले गेले. पाऊण तासाचा वेळ होता, पण टेस्ट अगदीच सोप्पी होती. शाळा-कॉलेजातल्या स्कॉलरशीप्स मधले प्रश्न होते. अर्ध्या तासात माझा पेपर सबमीट झाला होता. सगळ्यांना टेस्ट बरीच गेली होती. १०.३० ला निकाल लागला. आमच्या वर्गातले आम्ही सगळे पुढच्या राऊंडला पोहोचलो होतो. आता पुढचा राऊंड "ग्रुप डिस्कशन" (जी.डी)चा होता, ११ वाजता.

तीन वर्गात जी.डी चालले होते. तरी आमच्या ग्रुपचा नंबर पावणे बाराला लागला. जी.डी बऱ्यापैकी पार पडलं, माझं सहाव्या सेमच्या एका सबजेक्टच्या जीवावर उड्या मारणारं नेटवर्कींगचं ज्ञान अखंड बडबडत होतं. निद्रादेवी बऱ्याच जणांवर सवयीने प्रसन्न होऊ लागल्या होत्या. एका मित्राच्या मोबाईलवर अधुन मधुन घरी बोलणं चालुच होतं. काही झालं तरी आता सकाळशिवाय कॉलेजच्या बाहेर पडु नका, असं वारंवार आम्हा मुलींच्या घरातुन सुचना देण्यात येत होत्या. १२.३० ला निकाल लागला..मी पुढच्या राऊंडला गेले होते, पण माझ्याबरोबरच्या दोघी जणी निवडल्या गेल्या नव्हत्या. त्यातल्या एकीचा भाऊ गाडी घेऊन तिला न्यायला आला आणि दुसरी पण तिच्यासोबत निघुन गेली.आता माझ्या सोबतची, सकाळीच ओळख झालेली दुसऱ्या वर्गातली मुलगी आणि आमच्या वर्गातला एक जण ह्यांच्यासोबत मला पुढच्या राऊंडची वाट बघायची होती.

पुढचा पहाटे दीडला चालु होणार असणारा राऊंड जरा कठीण होता. ह्यात तीन कॉलेजांचे मिश्रीत असे आम्ही ५० विद्यार्थी होतो. आमचे ब्रांच,कॉलेज सगळं सगळं बाजुला ठेवुन पुन्हा दहा-दहा जणांचे नव्याने ग्रुप बनवले गेले. आता प्रत्येक ग्रुपमधल्या दहामधली निम्म्याहुन अधीक मंडळी एकमेकांना अगदीच अनोळखी होती. याचा फायदा घेऊन आम्हाला सांगण्यात आलं की तुमच्यापैकी कोणालाही कोणाबद्दलही करीयरबद्दल, आवडी-निवडींबद्दल, गोल्स बद्दल कोणताही प्रश्न विचारला जाईल. तेव्हा एकमेकांबद्दल तासाभरात जितकं जाणुन घेता येईल तेवढं घ्या. बरोबर दीडला हा राऊंड चालु झाला. माझ्याकडे आलेल्या २-३ जणांच्या प्रश्नांना मी नीट न्याय दिला. एकाला माझ्याबद्दल विचारलं गेलं होतं की हिने नेटेवर्कींग मध्ये जायला हवंय की ई-सेक्युरिटी मध्ये. त्याने ई-सेक्युरिटी असं उत्तर दिल्यावर, कंपनीच्या माणसाचं "बट आय थिंक शी हॅज एकसेलंट नेटवर्कींग स्कील्स!" हे विधान मला संजीवनी वाटलं होतं...आणि मनातल्या मनात हसुही येत होतं की माझ्या थोड्याशा बडबडीने तो ह्या निष्कर्षावर पोहोचला होता.

राऊंड संपता संपता सगळ्यांचे डोळे झोपेने लालेलाल झाले होते. पहाटे ३ ला "पर्सनल इंटर्व्ह्यु" चालु झाले. पाच-पाच मिनीटांत पोरांना आत बोलवुन बाहेर सोडत होते. तेव्हाच यांचा टाईमपास लक्षात आला. मनात हजारो शिव्या येत असल्या तरी "आलिया भोगासी.." करणार काय? माझा इंटरव्ह्यु सव्वातीनला झाला.आता ह्या मंगल वेळेला शेवटच्या राऊंडला पोहोचल्यानंतर "हाऊ वॉज युअर पर्फ्रोमन्स टुडे अकॉरडींग टु यू?" ह्या प्रश्नामागे काय लॉजीक होतं हे त्यांचं त्यांनाच ठाऊक!

माझ्याबरोबरच्या मैत्रीणीचा पण इंटरव्ह्यु झाला. ती बोलता बोलता टेबलावर डोकं ठेवुन झोपुन गेली. कंपनीतल्या त्या तिघांची ह्या वेळेसही सविस्तर चर्चा चालु होती. काय खाऊन आलेले सकाळी कुणास ठाऊक. माझेही डोळे इतके जड झाले होते, पण प्रयत्न करुनही झोप काही येईना. पहाटे सहा वाजता ही तिघं रुमच्या बाहेर आली. एकजण माझ्याकडे बघुन चक्क त्या दमलेल्या चेहऱ्यानेही हसला! निवडल्या गेलेल्या २१ विद्यार्थ्यांच्या नावांची यादी एक जण वाचु लागला, तिसरंच नाव माझं होतं...एकदाची नोकरी मिळाली रे देवा!!..आणि तेही बिग फोर कंपनीत..एच.सी.एल मध्ये!

आम्ही दोघी कॉलेजातल्या शंकराच्या मंदीरात जाऊन आलो. येताना त्या प्रसन्न सकाळी कॉफी विकणारा एक जण दिसला, आणखी काय हवे? घरी आल्यावर आईच्या डोळ्यातल्या पाण्याने सगळं काही सार्थकी लावलं!

हा लेख इथेही वाचता येईल. नक्की भेट द्या, वाट बघतीये Happy

गुलमोहर: 

अभ्यासासाठी पहाटेने पहाट काय सोडली नाय अन इथे नोकरी मिळवायलासुद्धा पहाटच नडतेय एकदम झक्कास गं सुमे ...ऐकेक पान मस्त लिहिलं आहेस... पुढच्या सोहळ्याच्या प्रतिक्षेत...
Happy

आम्ही दोघी कॉलेजातल्या शंकराच्या मंदीरात जाऊन आलो. येताना त्या प्रसन्न सकाळी कॉफी विकणारा एक जण दिसला, आणखी काय हवे? घरी आल्यावर आईच्या डोळ्यातल्या पाण्याने सगळं काही सार्थकी लावलं! <<< खरा आनंद इथेच झाला असेल नै... Happy

च्या मारी.. एच सी एल वाले फेमस दिसतायेत ह्यासाठी... आमच्या एमबीएच्या कॅम्पसच्या वेळेस पण असाच घोळ घातला होता.. मित्राचा शेवटचा इंटरव्ह्यू पहाटे ५ वाजता झाला होता... डोक्याला जाम शॉट देतात.. लेकाचे.

सुमे Rofl
मस्तच लिहिलयस.१ल्याच कॅम्पस इंटरव्ह्युला नोसिलची ऑफर हातात होती. मफतलाल मे जॉब मिला तो लाईफ झिंगालाला अशी तेव्हा नोसिलची ख्याती. मुकाट्याने नोसिलमध्ये मजुरी चालु केली.

सुमेधा मस्त लिहिलंयस. पहाटेपर्यंत हे इंटरव्ह्यू चालू शकतात हे मला आईशपथ अजूनपर्यंत माहित नव्हतं - बीई आणि एमबीए दोन्हीत कॅम्पसमधूनच जॉब मिळूनही हा अनुभव मित्र-मैत्रिणींमधेही कोणालाच आलेला ऐकला नव्हता आत्तापर्यंत.

'कॅम्पस इंटरव्ह्यु' हा प्रकार सोडला तर बाकी तंतोतंत... >>> येस्स येस्स माझेही अनुमोदन.

पहाटेपर्यंत हे इंटरव्ह्यू चालू शकतात हे मला आईशपथ अजूनपर्यंत माहित नव्हतं >>> मी पण असं कधीही अनुभवलं नाही पाहिलंही नाही आणि ऐकलंही नाही. Uhoh

ती मुलं परिक्षा देऊन बाहेर आल्यावर गुळाच्या ढेपीवर माशा बसाव्या तसे आम्ही सगळे त्यांच्या आवती-भोवती "क्या पुछा, क्या पुछा?" करत गोळा व्हायचो आणि त्यांची दुसरी अनौपचारीक वायवा घ्यायचो. >>> अगदी अगदी. Happy

एखाद्या नंबरला पुन्हा आत बोलावलं गेल्यावर "मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही" च्या थाटात ते पुन्हा आत जायचे >> Biggrin

धन्यवाद मंडळी...सगळ्यांचे खुप खुप आभार Happy

बर्‍याच वर्षांनी ती आख्खी रात्र डोळ्यांसमोर आली आणि पुन्हा गंमत वाटली Happy

ईतक्या रात्री पहाटेपर्यंत चालणारे इंटरव्ह्यू! हॅट्स ऑफ फॉर यु सुमेधा....... एक सांग हा जॉब Night कॉलसेंटर साठी होता का??... "हाऊ वॉज युअर पर्फ्रोमन्स टुडे अकॉरडींग टु यू?" या वाक्यावरून शंका आली म्हणुन विचारतो.smileyvault-cute-big-smiley-animated-055.gif

कॉलेजमधे एका बेवड्या टिचरने पगार पुरत नाही म्हणुन विद्यार्थ्यांकडे उधारखाते उघडले होते. मग वायवाला त्याचा पहिला प्रश्नः smileyvault-cute-big-smiley-animated-066.gifमाझी तुझ्याकडे किती उधारी बाकी आहे????

मस्त जमले आहे लिखान..
मला पण नोकरी प्रकरण फार भोवले आहे.. अ‍ॅग्रीगेट ५७% होते Sad
४७ ईन्टरव्हीयु द्यावे लागले.. तेंव्ह्या कुठे एम्.एन.सी. मधे जॉब मिळाला..

बादवे माझे सर नेम "अ" पासुन सुरु होते.. सो नेहमी रोल नं. १ असायचा..
सो व्ह्यायवा साठी मीच सर्वात पहिला एक्स्टर्नलला मिळालेला बकरा..

सी.ओ. आणी डि.एल्.डी. ह्या सबजेक्ट ची व्हायवा आयुष्यभर लक्षात राहील.
सी.ओ. च्या एक्स्टर्नल नी विचारलेल्या एकापण प्रश्नाची ऊत्तर देता आले नाही..
मग त्याला अस्मादिकावर दया आली असावी बहुतेक
त्यानी विचारले.. बाळा तु काय शिकला आहेस ह्या सेम मधे ह्य सबजेक्ट्चे तेवढे सांग..
त्याला ५-६ मेन टॉपिक सांगितले.. तसे तो हसुन म्हणाला बाळा मी तुला पास करतोय जा.. Happy
शेवटी रिसल्ट आला... मला २५ पैकी १० मार्क्स (पासिंग १० लाच असते) मिळाले होते Happy

सगळ्यात मजा आली डी.एल्.डी. त्या मॅडम नी क्लास चालु असताना धिंगाना करतो म्हणुन वर्गातुन बाहेर काढले होते.. Happy
माझ्या आणी माझ्या मित्राच्या नावाभोवती २ स्टार टाकले.. आणी एकदम ऊच्च स्वरात सर्व वर्गामधे
सांगितले.. "ईन दोनो को मै फेल करुंगी व्हायवा मै"
आम्ही सॉरी म्हणुन काही ऊ‍पयोग न्हवता... म्हणून ते म्हणालोच नाहीत..
त्या लेक्चर नंतर तब्बल ३ महिन्यांनी व्हायवा एक्साम झाली..
रिसल्ट आला तेंव्हा व्हायवा मधे मला २५ पैकी २४ मार्क्स आणी माझ्या मित्राला २३ मार्क्स होते Happy
आणी मी टॉपर होतो .. त्या सबजेक्ट चा :फिदीफिदी:
त्या मॅडम नी स्टार मार्क चा अर्थ कदाचीत वेगळाच संबोधला असावा..
अर्थात रिसल्ट नंतर बाकीच्या नेहमी टॉप येणार्या मंडळीचा प्रचंड जळफळाट झालाच Happy

सुमेधा, तुझी मालिका वाचतेय. इंजिनीयरिंगच्या कितीतरी आठवणी तुझ्या लेखांमुळे ताज्या झाल्या. Happy

मी डिप्लोमा करून मग इंजिनीयरिंग केलं. त्यामुळे सेकंड इयर डायरेक्ट अ‍ॅडमिशन आणि सेमिस्टर सुरू होऊन महिना झालेला. त्यात मी पहिल्यांदाच होस्टेलावर राहत होते. अभ्यासाची पार वाट लागली होती.
माझे सेकंड इयरचे एलसीए आणि एम३ क्रिटिकल बॅकलॉगपर्यंत गेले होते. Proud (आता त्याचे काहीच वाटत नाही! तेव्हा मी रडून घर डोक्यावर घेतले होते.)

आणि ७व्या सेम.मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाले. विप्रो पहिलीच कंपनी. तेव्हा निवडलेल्या लोकांना विप्रो पार्टीला घेऊन जायची. दोन बॅकलॉगांचा रिझल्ट अजून लागलेला नाही, थर्ड इयरचाही नाही, निवड निकष 'हायर सेकंड क्लास' होता त्यात सुदैवाने बसतेय, असे सगळे असताना मी अतिआगावपणे 'मी लेखी टेस्ट पार केली तर संध्याकाळच्या पार्टीला नक्की जाईन' असे (इंटरव्ह्यूंची काळजीच नसल्यासारखे) विधान मैत्रिणींमध्ये केले होते. Proud (खरेच गेले संध्याकाळी.)

नंतर क्रिटिकल बॅकलॉगांची आठवण आली आणि पंधरा दिवसांनी सेकंड आणि थर्ड इयर रिझल्ट एकदम लागले. सेकंड इयरचा रिझल्ट हुकला असता तर नोकरी, वर्ष सगळेच हातातून गेले असते. सेकंड इयरची मार्कशीट आधी घेऊन बघितली आणि दोन्ही विषयांपुढे 'P' पाहून काय वाटले, ते आजही सांगता येणार नाही. मार्कशीट घेतल्यानंतर सही करताना माझा हात असला थरथर कापत होता की ते सरही मला 'शांत हो! झालीस ना पास?' वगैरे म्हणत होते. Happy

आगामी लेखांची वाट पहातेय. Happy

ह्म्म, सुमेधा आठवतय सगळं ! आमच्या वेळी नागानंद सर होते रिकृटमेण्ट साठी!!
मी ह्या आणि त्या दोन्ही बाजू पाहिल्या आहेत.

आमच्या कम्पनीच्या कॅम्पस रिक्रुटमेण्टसाठी मी अल्वर(राजस्थान) ला गेलो असताना तिथे तर जवळ जवळ ११ कॉलेजेस एकत्र आली होती. शिवाय आधी किती विद्यार्थी रिस्पॉन्स देतील ह्याची कल्पना नसल्याने शेड्युलिंगचा बट्ट्याबोळ वाजतो. मात्र हे सर्व वेळापत्रक कॉलेजेसच करत असल्याने कम्पन्या काहीच करु शकत नाहीत. उलट रिक्रूटमेण्ट करणार्‍यांवरतीच प्रेशर येते.

आम्हालादेखील विद्यार्थ्यान्ची खुप दया येत होती, पण लवकर आटपले तर बाकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो त्यामुळे माझ्याकडुन मी (डोळे ताणत) सर्वांच्या इण्टर्व्ह्यू नि टेस्टस च्या निकषात फेरफार केला नव्ह्ता.

मात्र त्यातल्या त्यात लाम्बच्या कॉलेजमधून आलेले विद्यार्थी, मुली ह्यांची लवकर सुटका होईल असे पाहत होतो.

Expected 200-250 Count च्या ऐवजी तब्बल ६००-७०० मुले दूरवरुन आली होती. आमच्या गृपमधील काही जणांचे असे म्हणणे होते की Count 200-250 येईल असा selection criteria modify करुया. त्यांना मी स्पष्ट नकार देऊन सांगितले की तो सरळ सरळ विश्वासघात होईल. आणि मग असे ठरले की काहीही झाले तरी सगळ्यांची प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय हलायचे नाही.

एकदा असाही विचार आला होता की आजचे काम थाम्बवून उद्या पुन्हा फ्रेश सुरू करावे, पण मग पुन्हा वाटले की मग रात्री ही मुले कुठे जातील? उलट त्यांना पण काय तो सोक्ष मोक्ष लागलेलाच बरा पडेल.
मग सकाळी ७ वाजल्यापासून जे आमचे काम चालू झाले ते दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता आटोपते झाले. मला चांगले आठवतेय की इण्टर्व्यू घेताना मुलांसमोर जेवणार किंवा चहा कसा घेणार म्हणून आम्ही दुपारी ४ वाजता आळीपाळीने जाऊन जेवण केले.

पण खरच आम्हाला मुलांचीच जास्त काळजी होती कारण आमची बडदास्त कॉलेज ठेवतच होती पण मुलांचे काय? ती बिचारी आपला कधी आपला नंबर येईल नी बोलावतील ह्या भीतीने बाहेर जाऊन कुठे खात पण नसावीत. (स्वानुभव असल्याने ह्या बाबी नीट माहित होत्या) त्यामुळे आम्ही त्यांचे वेगवेगळे गृप बनवून त्यांना १-१ तासाच्या अन्तराने वेळा दिल्या म्हण्जे त्यांना काही "बुडण्याची" भीती रहाणार नाही.

मला आठवतंय की एका कुठल्यातरी सेमला प्रॅक्टीकल परिक्षेच्या वेळेस माझी फाफ्रे अगदी वेळ संपत आली असताना एक कुठलातरी कॉम्पोनन्ट आणायला गेली. इथे लॅब असिस्टन्टला वाटलं की तिचं काम झालं म्हणून त्याने सर्किट व्यवस्थित disassemble करून टाकलं. ती परत आली आणि ते बघून रडायलाच लागली. मग एक्सटर्नलने तिची समजूत काढली आणि नुसत्या वायवावर ती पास झाली होती. आता ते वायवा प्रकरण आठवलं तरी कसंतरीच होतं. सगळं काही एका नोकरीसाठी. शिकण्याचा असा आनंद कधी घेताच आला नाही. पुढे मग नोकरी लागल्यावर गंमत म्हणून वेगवेगळ्या सर्टीफिकेशनच्या परिक्षा दिल्या तेव्हा हा आनंद थोडाफार मिळाला.

सगळ्यांच्या आठवणी वाचुन खरंच गंमत वाटतीये Happy
प्रसिक, तो जॉब कॉल सेंटरचा नव्हता, नेटवर्क मेंटनंसचा होता...क्लायंट साईटला बसावं लागायचं.
किशोर, तुमच्यासारख्या केसेस आमच्या वर्गातल्या आणि इतरही अनेक महाभागांसोबत झालेल्या मी पाहिल्यात Proud
किरण, आमच्या वेळी पण नागानंद सर होते, तुम्ही वेसीटचेच का? कोणती बॅच?
बाकी सगळ्यांचेही मनापासुन आभार Happy

छान लिहिलयस.. जुन्या आठवणी... Happy
एका वायवाला अंगात १०३-१०४ ताप होता.. थंडी वाजून आलेली..
मुंबईत भर उन्हाळ्यात - भर दुपारी स्वेटर-स्कार्फ घालून वायवाला गेलेले..

आणि विप्रोच्या (कॉलेजात आलेली पहिली कंपनी) इन्टरव्यूत टेक्निकल राऊंड नंतर ८ जणीच निवडल्या गेल्या - त्यात असल्यानं - अचानक सगळीकडे भाव वधारलेला Happy

रात्रभर ईंटरव्यूह ... बापरे पहिल्यांदाच माहिती पडल..
<<ती मुलं परिक्षा देऊन बाहेर आल्यावर गुळाच्या ढेपीवर माशा बसाव्या तसे आम्ही सगळे त्यांच्या आवती-भोवती "क्या पुछा, क्या पुछा?" करत गोळा व्हायचो आणि त्यांची दुसरी अनौपचारीक वायवा घ्यायचो. >> हो हे मात्र खर
<<माझ्याबरोबरच्या मैत्रीणीचा पण इंटरव्ह्यु झाला. ती बोलता बोलता टेबलावर डोकं ठेवुन झोपुन गेली. >> वाईटही वाटतय वाचून आणि आठवून हसायलाहि येतय.
<<घरी आल्यावर आईच्या डोळ्यातल्या पाण्याने सगळं काही सार्थकी लावलं!>> Happy

मलाही माझ्या कॅम्पस सिलेक्शन ची आठ्वण झाली. बरंच अपयश पचवून गाडी रुळावर येत होती. मी नाशिकला होते. ६व्या सेम मधे पर्सिस्टन्ट येतेय के के वाघ मधे, असं समजलं. कट ऑफ होत ५५%. म्हणून अप्लाय केलं. के के वाघ मधे आमच्या कॉलेजची आम्ही २५-३० मुलं गेलो. "मी फक्त अ‍ॅप्टिट्युड देऊन येते गं आई..." असं सांगून, डबा न घेताच गेले होते. दुपारी घरीच येइन याची प्रचंड खात्री!! मग अ‍ॅप्टि पास झाले. माझ्या एका क्लासमेटने मला हे कळवलं तेव्हा मी के के च्या कॅम्पस मधे सगळ्यांबरोबर फिरत होते. पण मग मात्र टेन्शन आलं. लगेच पुढचे राऊंड्स आहेत हे समजलं आणि काहिच न खाता मी तिकडे गेले. मग एकेक करून सगळ्यांचे रिझल्ट्स लगेच समजायला लागले. मी टेक्निकल राऊंड पण क्लिअर केला. मी खरं तर e&tc ची होते. चक्क सांगितलं मी इन्टर्व्यु देताना, की मला हार्ड कोअर एलेक्ट्रॉनिक्स मधे जायचय. पण त्यांना काय वाटलं देव जाणे, मला २र्या राऊंडला पाठवलं. तिथेही तेच्!!नशीब जोरावर होतं हेच खरं. मग HR च्या वेळी HR म्हणाली, "you can do a good software job".
मग, "नाही म्हणणं आपल्या हातात असतं, आता हो म्हण" असं आमचे सर आणि माझी एक मैत्रिण म्हणाली, आणि माझी नोकरी पक्की झाली. मग मी १.५ वर्षं तिथे काम केलं!!!

सुमेधा मस्त लिहिलयसं , पण हे रात्र रात्र इंटरव्यु शुद्ध वेडेपणा आहे , एवढ्या मोठ्या कंपनीत काम करुनही कळत कसं नाही ह्या लोकांना.