मटणाचा रस्सा

Submitted by लालू on 8 July, 2010 - 23:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१ किलो मटण (२ ते ३ पाऊंड, थोडी हाडे- नळ्या असाव्यात.)
तिखट
मीठ
हळद

पहिले वाटण-
१ वाटी कोथिंबीर
१ इन्च आले
१ मिरची
१ छोटा लसणाचा गड्डा
१ चमचा बडीशेप
१ छोटा कांदा (कच्चाच)
थोडी पुदिन्याची पाने (आवडत असल्यास)
२ चमचे लिंबाचा रस किंवा दही.

दुसरे वाटण-
१ नारळ खवणून खोबरे तव्यावर भाजून घ्यावे
२ कांदे उभे पातळ चिरुन तव्यावर तेल टाकून तळून
३-४ लसूण पाकळ्या
२ चमचे खसखस भाजून
दालचिनी
४-५ लवंगा
४-५ वेलदोडे

फोडणी-
१ मध्यम कांदा चिरुन
खडा गरम मसाला (२-३ लवंगा, दालचिनीचा तुकडा, १ छोटा चमचा काळे मिरे, एक मसाला वेलची)
तमालपत्र
हिंग

तेल/तूप

क्रमवार पाककृती: 

-मटणाला हळद आणि मीठ लावून थोडावेळ ठेवून मग धुवून घ्यावे.

-पहिल्या वाटणासाठी दिलेले जिन्नस बारीक वाटून घ्यावेत. मटणाला मीठ, हळद, चमचाभर तिखट आणि पहिले वाटण लावून अर्धा तास मुरत ठेवावे.

mutton1.jpg

- जाड बुडाच्या पातेल्यात तेल किंवा तूप घालून तापल्यावर हिंग, खडा मसाला, तमालपत्र टाकून मग चिरलेला कांदा टाकून परतावे. मटणाचा रंग बदलू लागला की २ वाट्या पाणी घालून झाकण ठेवावे.

- मटण थोडे शिजल्यानंतर दुसरे वाटण घालावे, आवडीनुसार अजून तिखट, प्रमाणात मीठ घालावे. वाटीभर पाणी घालून आणि उकळी आणावी, नंतर मटण पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवावे. मटण पूर्ण शिजवून घेऊन दुसरे वाटण घातले तरी चालते पण घातल्यावर पुन्हा नीट उकळी आणावी. रस्सा अति दाट किंवा पातळ नको. त्याप्रमाणे पाणी वापरावे.

mutton2.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

- ही आमची नेहमीची मटण रश्श्याची रेसिपी आहे.

- फोडणी स्टीलच्या कुकरमध्ये केली आणि दुसरे वाटण घातल्यावर कुकरचे झाकण लावून प्रेशरसह मटण शिजवता येते. मटण चांगल्या प्रतीचे, जून नसेल तर पातेल्यात ३०-४५ मिनिटे लागतील. कुकरमध्ये मोठ्या आचेवर १ शिटी झाल्यावर आच कमी करुन पूर्ण प्रेशर येऊ द्यावे. मग शिटी होऊ न देता गॅस बंद करावा आणि पूर्ण वाफ गेल्यावरच कुकर उघडावा. मटण शिजले की नाही ते एखादा हाडासहित असलेल्या तुकड्यावरुन समजेल. मांस हाडापासून सहज वेगळे झाले, तुकडा मोडता आला की ते शिजले असे समजावे. मटण रुम टेम्प. ला असेल, किमान अर्धा तास तरी मॅरिनेट केले असेल तर लवकर शिजते.

- वाढताना बरोबर कांदा टोंमॅटोची दही घातलेली कोशिंबीर द्यावी.

- यासाठी भात करताना तेलावर खडा गरम मसाला घालून तांदूळ परतून आणि मटण शिजताना काढलेले थोडे पाणी घालून शिजवला तर छान लागतो.

-एका नारळाऐवजी, अर्धा नारळ आणि २ टोमॅटो ब्लांच करुन किंवा नुसते चिरुन फोडणीत घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु... गेला आठवडा एकांतवासात राहिल्याने असेल कदाचित, पण आता घरी गेल्यावर हे नक्की... .

लय भारी लागतो असा रस्सा... बहिणीच्या रेसिपीची आठवण झाली. श्रावणमास सुरू व्हायच्या आधी असा रस्सा नक्कीच ताव मारायला भेटणार Happy

बाकी मसाले कळ्ळे, पण "खडा गरम मसाला" हा काय प्रकार आहे?
(आम्हा शाकाहारीन्ना मटणच कशाला हवे? मी वरील कृती वापरुन मटणा ऐवजी घोसाळ्याचा रस्सा करणार आहे Proud
घोसाळ्या ऐवजी सोयाबीनच्या लगद्याचे गोळे मिळतात, त्याचाही केला तरी चालेल
शेवटी चव मसाल्यान्ना आहे! नै का? Biggrin )

ओके स्वाती, हे कळले, पण त्यातले बाकीचे जिन्नस कोणकोणते?
मिरी? दालचिनी? लवन्ग? तमालपत्र? जन्गली वेलची? बादलफुल? खसखस? आम्बेहळद? सूण्ठ? जायपत्री? दगडफुल?

शेवटी चव मसाल्यान्ना आहे! नै का?

खाओ तो जानो... तोपर्यंत ऐसाहीच बोलो...

लालु, तुझी रेसिपी मस्तच आहे. माझ्या घरी युगानुयुगे आई असाच रस्सा बनवते. फक्त ते पुदिना नाही वापरत. आता मी तुझ्या रेसिपीने करते आणि तिला improvement सुचवते Happy

लिंबुदा खडा मसाला म्हणजे आख्खा मसाला.
लालु. रेसिपी छानच.
मी पण असेच बनवते. फक्त त्यात प्रत्येक वेळी काही ना काही बदल करते. कधी दही मुरवते, कधी कांदा खोबर न घालता नुसत्या आल, लसुण, मिरची कोथिंबीरच्या वाटणावर करते. ह्याने मटणाचा खरा स्वाद येतो.
कधी कधी गरम मसाल्याची पुड करते कधी कधी खडा मसाला टाकते. प्रत्येक वेळी वेगवेगळ करते.

लालू, मस्त रेसेपी :). मटण कुकरला न लावता नुसतं बाहेर शिजवलं तर १ किलो मटणाला साधारण किती वेळ लागतो? जास्त शिजलं तर वातड होईल ना?
मी सगळे मसाले तुझ्या सारखेच वापरते फक्त सगळे एकत्रच बारिक करते, आता तू सांगितलंस त्याप्रमाणे वेगवेगळे बारिक करून मटण बनवून बघते.

सिंडे कुठल्याही हलाल मीट शॉप मधे मिळेल मटण. इस्ट इंडीयन ( जमैकन वगैरे ) ग्रोसरीमधे पण मिळते पण ते चांगले लागत नाही. साफसफाई सोपी असते. तुकडे आणून स्वच्छ धुवावे लागतात एवढेच.
रेसिपी मस्त. करुन पाहणार लगेच.

मस्त. अल कबीर चे मट्न मिळते ते वापरता येइल. या बरोबर गरम गरम तव्यावरच्या पोळ्या हव्यात.
करून बघते.

एकदम तोंपासु Happy
मटण कुकरला शिजवलं तर साधारण किती शिट्ट्या कराव्यात आणि किती वेळ ठेवावं ? मटण वातड होण्याबद्दल इतकं ऐकलं आहे की आणायचं डेअरिंग केलं नाही. आमच्याइथल्या एका पाकिस्तानी रे. मध्ये मस्त मटणकरी मिळते ती आणून खातो कधीतरी.

सही दिसत्ये रेसिपी. Happy
(पण मलाही कुठलंच मीट शिजण्याबद्दलचा काहीच अंदाज नाही त्यामुळे कधी धीर झालेला नाही.)

धन्यवाद.
प्रश्नांची उत्तरं रेसिपी अपडेट करुन लिहिते.

>>नुसत्या आल, लसुण, मिरची कोथिंबीरच्या वाटणावर
जागू, हो. छान लागतं हे. याच्या रश्श्याला छान चव येते. फार मसाले नसल्याने मुलांना द्यायला बरं पडतं, त्यांनाही आवडतं.

हलाल आहेच. पण गेल्या वर्षी मला फार्मर्स मार्केटवाल्याचा शोध लागला. तिथले काही व्हेन्डर आणतात. जास्त हवे असेल तर त्यांना आधी सांगावे लागते. मस्त असते पण एकदम. फ्रोजन खिमा, क्यूब्ज इ. असतात. हलालकडून सहसा मांडीचे घ्यायचे. मांडीचे हवे असेल तर आख्खी घ्यायला लावतात कधीकधी. मग थोडा खिमा थोडे पीसेस घ्यायचे.

राधिका, चिकन रश्श्याच्या वेगळ्या कृती आहेत पण ही रेसिपी वापरुन चिकन करु शकता.

लालु, कालपासुन हजारदा तरी हे पान उघडुन तुझा रस्सा बघितला आणि मनोमन चपाती आणि भाताबरोबर चापला..

माझ्या घरी मटण मी सोडुन कोणाला आवडत नाही, म्हणुन मी आणत नाही. पण आता पाव किलो आणते माझ्यापुरते आणि बनवते एकदाचा रस्सा.... असा नुसताच virtually खात बसले तर उगाच मनातल्या मनात झुरुन बारीक व्हायचे.. Happy

लालू,
मस्त झालं होतं. सगळ्यांना खूप आवडलं. दुसर्‍या वाटणात मी थोडे धणे, जीरे पण घेतले. आणि फोडणीत ताजं तमालपत्र घातलं Happy

काल रात्री केला होता हा रस्सा. एकदम मस्त झाला. 'कीपर रेसिपी है' असे सर्टिफिकेट मिळाले नवर्‍याकडून.

लालू, आज अचानक शोधता शोधता मिळाली रेसिपी... सेम २ सेम माझ्या आईबाईंसारखी आहे... फक्त किती वेळ शिजवायचं त्याचा अंदाज नव्हता...
आई मटण तो भांडे कुकर असतो ना...अ‍ॅल्युमिनियमचा...हाईटला छोटा, त्यात स्टील ची भात, डाळीची भांडी नसतात... त्यात शिजवते...

शिजलंय की नाही ते पाहायला दुसरं वाटण घालायच्या आधी थोडासा रस्सा आणि एखादं हाडूकवाला पीस... त्याचा आले, लसूण, टोमॅटोचा तो फ्लेवर आहा... गरम गरम सूपसारखा रस्सा भुरकायचा... पावसाळी रविवारचा माझा आवडता मेन्यू... स्स्स्स्स पाणी आलं बघ टाईपतानाच...

नवरा येणारेय आता सिंगापूरवरून... तिथे कसलं उकडलेलं बेचव जेवण! आता खास तोंडाला पाणी आणणार्‍या मर्‍हाटी झणझणीत नॉनव्हेज पाककला त्याच्यावर ट्राय करेन म्हणतेय Happy

धन्स हा... Happy

Pages