पॉलची भारतभेट - एक काल्पनिक कथा

Submitted by सुनिल परचुरे on 8 July, 2010 - 09:50

पॉलची भारतभेट - एक काल्पनिक कथा

आधी जर्मनीच्या वृत्तपत्रात बातमी आली " भविष्यवेता पॉल अचानक दोन दिवसाच्या रजेवर. जर्मनीतील ऍक्वेरियममधील पॉल व त्याचा केअरटेकर मि. नॅनो मुल्लर दोघेही दोन दिवसांच्या रजेवर गेले आहेत. नॅनो जातांना मेल करुन गेले आहेत कि, त्यांचे वडिल जे भारतात नावाजलेले ऍस्ट्रॉलॉजर आहेत ते शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांच्या इच्छेप्रमाणे नॅनो पॉलसह त्यांना भेटायला गेले आहेत."
पाठोपाठ जगभरच्या सर्व चॅनेल्सवर, वृत्तपत्रात ह्या बातम्या झळकल्या. आधीच लोक हे पॉलचे जबरदस्त फॅन झाले होते. त्यात त्याचे हे अचानक दोन दिवस जाण्याने सर्व जर्मनी हलली. कारण त्यांना आता तिस-या नंबर करता ते जे मॅच खेळणार होते त्याचा आधीच रिझल्ट हवा होता. सर्वांत आधी चर्चा सुरु झाली ति हि की एखाद्या प्राण्यासह विमानातून हा माणूस सिक्युरिटीला चकवुन गेलाच कसा. आपली सिक्युरिटी आपण सर्वोत्तम मानतो आणि तिथे असे कसे झाले ?

जेव्हा नॅनो मुल्लर हा मुंबईत विमानाने उतरला तेव्हा सामानासह ग्रिन बेल्टमधून जाऊ लागताच स्टमवाल्यांनी त्याला थांबवले.
``थांबा मि. नाना मुळे, हे हे डोक्यावर काय आहे ?``
``ही-ही पॉल हॅट आहे. ऑक्टोपससारखी दिसणारी. काय आहे सध्या जगात हा ऑक्टोपस खुपच फेमस झाला आहे. त्याची हॅट काढलीय , तिच घातलीय``.
``ओ , तुम्ही बाकीच्यांना टोप्या घालू शकाल, आम्हाला नाही, काढा-काढा, आधी ती टोपी काढा``.
``पण मला आधी हे सांग की माझ नांव नाना मुळे आहे हे कोणी सांगितल. बघा पासपोर्टवर काय आहे``.
``ते बघा, ते तिथे साहेब उभे आहेत न त्यांनी, त्यांनीच सांगितल``
``कोण , कोण ओss तुम्ही .. तु.. बंडया देशपांडे नं रे ? "
``चल बाबा मला ओळखलस तरी. काय अचानक एकदम जगप्रसिध्द झालास.``
``जगप्रसिध्द ``?
``हो . अरे ह्या पॉलला तु इथे आणलस काय आणि जगभर धमाल झाली``
``म्हणजे``
``अरे जर्मन चॅन्सलरचा ही आपल्या पी.एम. ना फोन आला होता .नॅनोला ताबडतोब परत पाठवा. कुठल्याही कारणाने अडवू नका, त्याने जे कारण मेलमध्ये सांगितलय ते खाजगीत कितीही बरोबर असल तरी कायद्याच्या दृष्टीने चुक आहे. तो इथे आल्यावर आम्हि काय ते बघु. त्याला त्याच्या वडलांची भेट झाली की लगेच इथे पाठवा. आणि पी.एम.च्या ऑफिसातून आमच्या वरच्या साहेबांना आणि तिथुन आमच्या साहेबांना फोन आला. आमचे साहेब ही आत बसलेत. चला , आधी तुला त्यांना भेटायला लागेल. बाय द वे तु नानाचा नॅनो कसा झालास ? "
``अरे बापरे, एवढ रामायण झाल ? नाही काय आहे , नांवाच म्हणालास न तर मला समुद्र, त्यातील प्राणी ह्यांची खूप आवड. तेव्हा त्यावर पि.एच.डी. करण्याकरीता मी जर्मनीला गेलो. तिथे नाना मुळेचा हळुहळु नॅनो मुल्लर झालो``.
``या या मि. नॅनो, अहो तुम्ही आम्हा सगळ्यांची झोप उडवलीत``
``सॉरी साहेब, मी फक्त माझ्या वडलांकरता इथे आलोय. त्यांची अवस्था कठीण आहे. शेवटच्या घटका मोजताहेत ते. मला तर त्यांना भेटायचे होतेच. शिवाय त्यांना ह्या पॉललाही भेटायचे होते, म्हणून .....``
``अरे पण जर्मनीतल्या एवढया सिक्युरिटीमधून तु ह्याला घेउन कसा आलास``?
``नाही काय आहे मी एक रिकामा छोटासा पाण्याचा टँक हँड लगेज म्हणून घेतला होता. पॉलला टोपी म्हणून काही वेळ डोक्यावर ठेवला होता. त्यांना असच दाखवल की ही ऑक्टोपस कॅप आहे. स्क्रिनिंगमधेही त्याचा काही प्रॉब्लेम आला नाही . चेक इन झाल्यावर टँकमध्ये पाणि टाकुन ह्याला आत सोडला.``
``तुला काही वेळ इथेच थांबाव लागेल. मला वरुन जसे आदेश येतील तस मी तुला तुझ्या घरी जाऊ देईल``.

मुंबईत पॉल आल्याची बातमी सर्व चॅनेल्सवर झळकली. एअरपोर्टवर सर्व चॅनलवाल्यांचा गराडाच पडला होता. तो दादरला प्रख्यात ज्योतिषी मुळे काकांच्या घरी येणार हे आधीच समजल्याने तिथेही बरीच गर्दी झाली होती.
थोडयाच वेळात पंतप्रधानांच्या गाडयांचा ताफा जातो तसा पॉल व मागे सर्व चॅनल्सच्या गाडया असा एअरपोर्ट ते दादर प्रवास झाला. घरी उतरल्या उतरल्या चॅनल्सवाल्यांनी नानाला भंडाउनच सोडल.

"हे पहा आधी मला वडलांना तर भेटु द्या. प्लिज काही वेळ मला कुणीही तिसरा माणूस आत नकोय.".पॉलला घेऊन गाडीतून उतरता उतरता नानाला मुष्कील झाली.
मुळे काका बेडवर आडवे पडले होते. शरिराने अगदी कृष झाले होते, पण मनाने आनंदी होते.
"अरे आलास, सगळे म्हणतायत बाहेर खुपच हलचल झालीय."
"ते जाऊ दे, तुमची तब्येत कशी आहे ? तुम्हाला मी म्हणत होतो की तिथे चला, तुम्हाला ट्रिटमेन्ट मिळेल पण तुम्ही काही माझ एकल नाहीत."
"अरे बाबा सर्व आयुष्य इथे गेल. आता ह्या आजारपणात तिथे येऊन काय करु ? आणि मला माहितीय की माझी वेळभरत आली आहे. फक्त मला ह्या पॉलला बघायचे होते. मी मरतांना मला एकदा तरी देवाचे दर्शन व्हाव अशी माझी इच्छा होती. आणि ह्याच्या बद्दल सर्व एकले आणि वाटले की हाच देव असेल. "
" देव ?"
``बघु .. बघु दे मला त्याला`` कसे बसे उठत ते म्हणले.
``बघ बघ हा कसा बघतोय माझ्याकडे, ह्याचा डोळा बघितलास. अरे मला हा शंकराच्या कपाळावरील तिस-या डोळ्यासारखाच भासतोय. बघ बघ ह्याने आपल्या हाताने मला आशिर्वादही दिला``, नमस्कार करत ते म्हणाले.
``अहो बाबा हा देव वगेरे आहे की नाही माहीत नाही पण ह्याच्यात काहीतरी अद्भुत शक्ति आहे खरी``.
``अरे लोकांच्या कुंडल्या बघण्यात सर्व आयुष्य गेले. कुणी हातावरच्या रेषा बघुन तर कुणी चेहरा बघुन, आता तर नुसत लिखाण बघुनही अचुक भविष्य सांगणारी माणस पाहिल्येत. पण प्राणी , हं आता लहानपणी नंदीबैल बघितलाय. पण तो काय .. हा पास होईल ना ? यंदा पाऊस पडेल ना ? अस काही विचारल व त्याच्या माणसाने त्याच्या गळ्यात बांधलेली दोरी ओढली की होय-होय अशी मान हलवणार . पण हे म्हणजे अद्भुतच वाटतेय. ह्या वेळची वल्डकपमधील सर्व अंदाज बरोबर. पण काय रे , तुला ह्याच्या शक्तिचा अंदाज कधी आला ?``
``नाही काय आहे, ह्याला मी अगदी लहान असल्यापासून बघतोय. ह्याच बघण , पाण्यातिल चालण काही वेगळ आहे हि जाणिव मला झालि. ह्या सेक्शन मध्येच जगभरातून विविध मासे व वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणले आहेत. त्यातलाच हा ऑक्टोपस. ह्याला नांव मीच दिल.. पॉल.. खाली काचेला सर्व देशांचे झेंडे लावले आहेत. एकदा अस झाल की, काही दिवसापासून खाण्याच्या वेळेस त्याला खायला दिलेले अमेरिकेच्या झेंडयाजवळ पडल की तो ते उचलून बाजूला चायनाचा झेंडा होता तिथे आणायचा व खायचा. मला कळेना की हा अस कां करतोय ? पण त्यानंतर लगेच अमेरिकेला जो मोठमोठया बँका दिवाळखोर झाल्याच्या बातम्या आल्या.मला वाटले की त्याला सांगायचे होते की, अमेरिकेची अर्थव्यवस्था खराब होईल व चायनाची मजबुत होईल आणि तसेच होत आहे."
``मग तुझ्या बद्दल म्हणजे स्वतबद्दल काही ह्याचा फायदा ..``
``नाही म्हणजे मी एकदा प्रयत्न करुन पाहिला पण मला वाटत की जिथे माझा स्वार्थ आहे अशा गोष्टी तो सांगत नाही. ह्या वल्ड्कपमध्ये आपण नाहि आहोत म्हणुन बरय."
``वा म्हणजे आमच्याच सारखाच . कुंडली बघणारा आपली स्वतची कुंडली किंवा आपल्या जवळच्यांची शक्यतो पहात नाही तसेच. खरच तु भेटलास , हा ही भेटला आता मी मरायला मोकळा झालो. ``

``आता येऊ का ? नाही तुम्हाला मी डिस्टर्ब करतोय पण बाहेर बरेच व्हि.आय.पी. येऊन बसलेत ? " एक पोलिस आत येत म्हणाला.
``व्ही.आय.पी. ?``
``हो म्हणजे त्यांच म्हणण आहे की सर्वांना पॉलला एकांतात भेटायचय, पाठवू आत ?``
``अहो कसल एकांतात ? आणि हा काही भविष्य सांगत नाही ?``
``नाही ..म्हणजे मी कस त्यांना सांगु, फक्त एकेकाला आत पाठवतो. "
भविष्यवेत्ता पॉल दादरला आल्याची बातमी वणव्यासारखी पसरली त्यामुळे त्यांच्या घरी मोठयांची रिघच लागली.
``नमस्कार, मला ओळखल न ?``
``हो यान . अहो तुम्हाला कोण नाही ओळखणार, तुम्ही इथले मंत्री``.
``मंत्री काय हो आज आहे, पण मुख्यमंत्री दुस-या मित्रपक्षाचा आहे न. मला पॉल साहेबांना एवढच विचारायच की मी मुख्यमंत्री कधी होणार ?``
``अहो ते असले भविष्य सांगत नाहीत. देशाची सांगतात तिही झेंडयावरुन."
``मग चालेल की, मी माझ्या पार्टीचा व मित्र पार्टीचा झेंडा आणलाय. तो समोर ठेवला, मग तर ते सांगतील न``.
``अहो पार्टीचा नाही , देशाचा .. देशाचा झेंडा हवा. "
``अरे सोड सोड म्हणतोन`` दादागिरीने आत शिरतच एक म्हणाले.
" मला थांबवतोस... मला, अरे तुझ्या मोठया साहेबांना सांगून ट्रान्सफर करीन.``
``बर मी निघतो. " मंत्रीसाहेब म्हणाले
``नॅनोभाय - नाय बराबर बोलन न म्यां ? नमस्कार पॉलभाय, ह्यानला विचारान की आपली गँग ऐ गँग आहे, व आपोझिशनची झेड. न्हाई म्हणजे त्यांचा तसा बी शेवटलाच नंबर आहे .पण ह्या पॉलभायला विचारा की आम्ही नेहमी एक नंबरवरच राहू न ?``
``अहो हा असल काही भविष्य सांगत नाही, फक्त देशाच सांगतो``.
``बापरे फक्त नेशनचच, एकदम गांधीबाबा दिसतो, पन माझ्या करता येकदा -"
``नाही हो अस नसत .प्लिज`` ते दादा बाहेर पडले.
``नमस्कार``.
``या एवढया मोठया माणसांचे पाय ह्या घराला लागले, धन्य झालो``.
``नाही , जस्ट आस्क हिम, म्हणजे माझी कंपनी ही माझ्या भावाच्या कंपनीपेक्षा नेहमी वरचढ राहील न ?``
``सॉरी सर, हा फक्त देशाच भविष्य सांगतो, खाजगी नाही" असे करत करत देशभरातील सर्व मोठी माणसे स्वतचे प्रॉब्लेम घेऊन आलि होति.
``छे छे उगाच वेळ गेला, अहो चॅनलवाले तुम्ही आधी सांगायचेन की हा फक्त देशाच भविष्य सांगतो , आपल नाही "
``अहो पण देशाच भविष्य सांगतो, त्यात काहीच नाही ?`` चॅनलवाला म्हणाला.
``देशाच घेऊन काय करायचय ? कसला प्राणी तो."
``ह बरोबर आहे साहेब, तो नुसता प्राणी आणि आपण मनुष्यप्राणी, फरक आहेच न, त्याचे आठ हात दिसतात पण आपले दोनच दिसतात. बाकीचे अदृष्य सहा हात काय काय उद्योग करतात ते दिसत नाही न``.
``तुम्ही चॅनलवाले म्हणजे, प्रत्येक गोष्टीच ब्रेकिंगन्युज करण्यातच आयुष्य जाणार."
तेवढयात साक्षात पी.एम. साहेबांचा चा नॅनोला फोन आला.
``यस सर, माझ्या कधी स्वप्नातही नव्हत की भारताच्या पंतप्रधानांशी मी बोलू शकेन``.
``नाही ठीक आहे, तुमच्य वडलांची व तुम्हा दोघांची खुशाली विचारण्याकरता मी फोन केला. सर्व युरोपियन देशांच्या प्रमुखांचे मला फोन आले, पॉलना नीट घेऊन जा. ``
"यस सर``.
``फक्त मला एवढच विचारायच होत की जर हा फक्त देशाचच भविष्य सांगतो तर मग तुम्ही पाकिस्तान व आपल..".
``नाही सर, एकदा प्रयत्न केला होता. 26/11 नंतर. पण त्या दिवशी दिवसभर त्याने उपासच केला , काही खाल्ल नाही . युध्दच झाल नाही त्यामुळे कोण जिंकणार कोण हरणार हे तो काय सांगणार. आपल्यात युध्द होणार नाही हे मला तेव्हाच कळल.``
``ठिक आहे, भविष्यात कधी वेळ आलीच तर तुम्हाला कॉन्टॅक करु. बरय``

जे संपुर्ण मुळ्यांच्या खानदानात झाल नव्हते ते ह्या दोन दिवसात झाल. मुल्लर म्हणून का होईन त्यांच नांव जगभर झाल. कुठलाही आरोप न होता नॅनो पॉलसह परत जर्मनीत गेला.विमानतळावर त्यांच जंगी स्वागत झाल. कारण त्यांना आता जर्मनी तिसरातरी येणार का म्हणून विचारायचे होते.
फायनल करता स्पेन व नेदरलँडचे झेंडे ठेवले गेले. पॉलना परत कोण जिंकणार कोण हरणार म्हणून साकड घातल गेल. पॉल सरसावला आणि.....
ह्याची सगळीच भविष्य खरी होतात मग कोण जिंकत हे आधीच कळल्यामुळे खेळातली मजाच जाते. जो देश हरणार म्हणून पॉल सांगतो ते मनाने आधीच खचून ढेपाळत खेळतात, व जिंकणारा म्हणून जाहीर होणारा संघ अधिक त्वेषाने खेळतो .त्यामुळे फायनलचा खेळ संपेपर्यंत पॉलचा निकाल जाहीर करु नये असे फिफाने ठरवल आहे.

गुलमोहर: 

मस्त आहे... एकदम current subject... मज्जा आली...
फक्त हे वाक्य उलटे पाहिजे ना ....

"आधीच पॉल हा लोकांचा जबरदस्त फॅन झाला होता." >>> म्हणजे इथे "आधीच लोक पॉलचे जबरदस्त फॅन झाले होते".... असे पाहीजे ना?

सुनील छानच रे कथा. मला अख्खा एक दिवस लागला समजायला. मला फुट्बॉल काय कशाचाच ( खेळांचा ) ताप येत नाही त्यामुळे मी संदर्भातल्या बातम्या वाचल्याच नाहीत. आज दै. सकाळ मधे त्याचा फोटो व बातमी आल्यावर तुझी कथा समजली.