बाजार फायद्याचा तोटे कुठे मिळावे

Submitted by स्वानंद on 7 July, 2010 - 01:57

सर्वस्व अर्पिणारे नाते कुठे मिळावे
बाजार फायद्याचा तोटे कुठे मिळावे

चचपून पाहसी का प्रत्येक माणसाला
डोके मुळी मिळेना फेटे कुठे मिळावे

नाठाळ खेटणारे मजला इथे अघोरी
त्या हाणण्या कपाळी सोटे कुठे मिळावे

अस्फूट आठवांचा हा मोडका पसारा
अडगळित कोंबण्याला पोते कुठे मिळावे

लाचार हे शिळेचे परमेश भग्न दिसती
मग 'हाडपेर'वाले नेते कुठे मिळावे

येथे क्षणाक्षणाला होतात वाद युद्धे
जग पूर्ण जिंकणारे जेते कुठे मिळावे

माझी अगाध दु:खे ऐकून सांत्वनाला
दर्दी तुझ्याप्रमाणे कविते कुठे मिळावे

-स्वानंद

http://amrutsanchay.blogspot.com/

गुलमोहर: 

स्वानंदजी,
मतल्यामधेच अलामत निश्चित होत असते...... यास्तव फेटे,तोटे,बेटे हे काफिये (कवाफी) घेतल्यानंतर्,सोटे,लोटे,गोटे,बोटे आदि कवाफी चालतील..... पण पोते,मोते,जेते,नेते,कविते ह्या चालणार नाहीत.....

बाकी गझलेचा आशय आवडला.

डॉ.कैलास

पण पोते,मोते,जेते,नेते,कविते ह्या चालणार नाहीत..

>>> स्वर काफिया नावाचा ही काही एक प्रकार असतोना ???

बाकी ...स्पष्ट मत : गझल आवडली नाही ...कळाली नाही म्हणुन असेल कदाचित .. ...

गझल म्हणल्यावर काहीतरी एक फील निर्माण व्हायला पाहिजे असे मला वाटते ...

उदा >
कल चौदवी की रात थी शब भर रहा चर्चा तेरा
फासले ऐसे भी होंगे येकभी सोचा न था
जो थके थके से थे हौसले ...

ह्या असल्या गझल ऐकल्या की कसा एक मस्त फील येतो ... एक वातावरण निर्मीती होते ... तसं काहीसं होत असेल तर गझलं जमली असे म्हणता येईल .

बाकी या क्षेत्रातला मी अजुनही बालकच आहे ...ज्येष्ट लोक अधिक स्पष्टीकरण करतीलच ...

स्वानंद ...क्षमस्व

अमित, प्रसाद आणि डॉ.कैलास जी
प्रतिक्रीयांसाठी आभारी आहे.

डॉ.कैलासजी,

>>>मतल्यामधेच अलामत निश्चित होत असते...... यास्तव फेटे,तोटे,बेटे हे काफिये (कवाफी) घेतल्यानंतर्,सोटे,लोटे,गोटे,बोटे आदि कवाफी चालतील..... पण पोते,मोते,जेते,नेते,कविते ह्या चालणार नाहीत.....

या बद्दल माहिती नव्हती..
कवितेमध्ये जसे ...ते किंवा ...टे याचे यमक जुळते तसे इथेही चालत असेल असे वाटले.

असे नसेल आणि जर ही रचना गजल प्रकारात बसत नसेल तर कृपया सांगावे. मी त्याचा प्रकार बदलून कविता करतो.

गझल अप्रतिमच. Happy

छान लिहिता. पुलेशु.
............................................
स्वर काफिया नावाचा ही काही एक प्रकार असतोना ???

पण मतल्यामधेच अलामत निश्चित होत असते त्यामुळे
स्वर काफिया असेल तर ते मतल्यातच निश्चित व्हायला हवे.

कैलासजी आणि मी नव्यानेच गझल शिकतो आहे. त्यामुळे चुक भुल देणे घेणे.
.........................................
जर ही रचना गजल प्रकारात बसत नसेल तर कृपया सांगावे. मी त्याचा प्रकार बदलून कविता करतो.

ही रचना गझल म्हणुनच उत्तम वाटते.
त्यामुळे मतल्यात दुरूस्ती करावी. तेच योग्य राहील.
.........................

बाजार फायद्याचा या शब्दावरून मला माझा अय्याशखोर या गझलेतील शेर आठवला.

मेंदू उगाळतांना माणूस थोर झाला
पंडीत कायद्याचा बाजारखोर झाला

ही गझल नाहीच आहे..... स्वरकाफिया वगैरे मतल्यात निश्चित व्हायला हवे.......

डॉ.कैलास

दर्दी तुझ्याप्रमाणे कविते कुठे मिळावे..
वा...
बाकी ही गझल होण्यासाठी तांत्रिक बाबींकडे लक्ष द्यावे...
शुभेच्छा..

आनंदयात्री, निहारिका, छायाताई
प्रतिसादासाठी धन्यवाद.

गंगाधरजी,
आपल्या प्रतिसादासाठी विशेष आभार. Happy
अय्याशखोर वाचली, भावली.

>>माझी अगाध दु:खे ऐकून सांत्वनाला
दर्दी तुझ्याप्रमाणे कविते कुठे मिळावे

या ओळी अप्रतिम.... बाकी गझलेचे व्याकरण जाणकारांनाच माहीत Happy
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

स्वानंद्,आपल्या रचनेत आशय आणी अभिव्यक्ती छान आहे.... फक्त ही रचना एक निर्दोष गझल व्हावी म्हणून आपण ही लिंक अवश्य वाचावी.

http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi

डॉ.कैलास

येथे क्षणाक्षणाला होतात वाद युद्धे
जग पूर्ण जिंकणारे जेते कुठे मिळावे

माझी अगाध दु:खे ऐकून सांत्वनाला
दर्दी तुझ्याप्रमाणे कविते कुठे मिळावे

आवडले.

bumrang, अलका आणि गिरीशजी
आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे.

@डॉ.कैलासजी,
मतल्यात दुरूस्ती करायचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ही रचना निर्दोष 'मराठी गझल' व्हावी.
आपण दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद.

@बेफिकीर,
प्रतिसादासाठी धन्यवाद.
अस्फूट केले Happy