पावसाळी संध्याकाळाचे विचार

Submitted by nikhilmkhaire on 2 July, 2010 - 09:49

दरवज्यातून एक भिंत दिसतिये, भिंतीचा रंग पूर्वी पांढरा असावा. आता त्यावरच शेवाळ वाळून काळं झालं आहे त्यामुळं काळं आणि पांढ-याच्या मिश्रणातून होतो तसला करडा झाला आहे. पावसाळ्याच्या संध्याकाळच्या रंगामध्ये तो निपचीत मिसळून गेला आहे.

मी काहीच करत नाही, म्हणजे गेले सहा महिन्यांपासून मी काहीच करत नाहीये. काहीच म्हणजे जेवण, चहा, झोप, सिगारेट्स आणि गरजेपुरता श्वासोच्छवास यांच्यापलिकडे मी काहीच करत नाही.

सहा महिने झाले तरी मी काहीच करत नाही हे बघून बापानं मोठ्या आस्थेनं एका बाबा़कडे नेलं, पण गंम्मत म्हणजे त्या बाबाकडे कुणीतरी नुकताच जन्म घेतला होता, त्यामुळे त्याला सोयरं की सुतक की काहीतरी होतं आणि म्हणून तो पण काहिच करणार नव्हता. मी पोटभर हसलो. तो बाबा पण हसला. बाप नाही हसला. बापाचं एक बरं आहे, तो जन्माला आल्यापासून काही ना काही करतो आहे.

काल पम्या आला होता, त्याचं लग्न ठरलं आहे. त्यानं स्कॉच आणली होती. मी प्यायलो. खूप प्यायलो. मग तो स्कॉचच कौतुक करू लागला मग मला बोअर झालं. मग मी त्याला आई बहिणीच्या शिव्या दिल्या, सगळ्यांना वाटलं मला चढली आहे. मग त्यांनी मला झोपायला सांगितलं. मी झोपलो. पम्या सॉफ्ट्वेअर इंजिनिअर आहे. त्याला ३० हजार रुपये पगार आहे. शिवाय तो शेअर मार्केट्मध्ये पैसे टाकतो आणि काढतो. मला चढली असती तर हे सगळं लक्षात राहिलं नसतं.

सिगरेट प्याविशी वाटते आहे, आलोच.

शेजारच्या कंप्युटरवर एक सेक्सी मुलगी येऊन बसली आहे. तिचा पर्फ्युम मस्त आहे. माझ्या तोंडाला सिगारेट्चा वास येतोय. तिलाही तो आला असेल का? कदाचित नसेल आला किंवा आला असेल तर तिला तो आवडला असेल, किंवा तिला सर्दी झाली असेल. वासाचं एक बरं असतं, त्याला फारसं काही करावं लागत नाही, तो आपोआपच हवा तिथे पोहचू शकतो. नाक आणि कान यांचा विकास पूर्ण झालेला नाही. ते डोळ्यांसारखे, हवे तेव्हा बंद करता येत नाहीत. त्यासाठी हाताला त्रास द्यावा लागतो. येत्या काही हजार वर्षांमध्ये माणसाचा विकास होणार आहे, तेव्हा या दोन गोष्टिंचा विचार झाला पाहिजे. तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी प्रेम करित होतो तेव्हा माझी तत्कालिन गर्लर्फ्रेण्ड मला म्हणाली होती की मी वासाच्या बाबतीमध्ये भलताच संवेदनशील आहे.

राम माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. तो वकील आहे आणि मी बलात्कार केला तर तो मला त्यातून सहिसलामत बाहेर काढणार आहे. पण माझा या गोष्टीवर फार विश्वास नाहीये. कारण तो पण फारसं काही करत नाही. त्याला ग्रेस आवडतात, रोज संध्याकाळी तो घरी आला की आम्ही दोघं मिळून ग्रेस वाचतो. कळत दोघांनाही काहीच नाही पण बर वाटतं.

शेजारची सुवासिक सेक्सि मुलगी नोकरी शोधते आहे. बहुदा सॉफ्ट्वेअरमध्ये. मी चोरून बघितलं तिच्या स्क्रिनवर. म्हणजे तिनेदेखील मी काय लिहितो आहे हे वाचलेच असेल. मी आणि रामने आधीच ठरविले आहे की सॉफ्ट्वेअरम्धल्यांशी संबध ठेवायचे नाहीत. म्हणून मग मी तिकडे बघत नाहीये. दुकानाच्या मालकाने उदबत्ती लावली आहे. तिचा वास हा साधारणतः रस्त्यावरून आणलेल्या कुठल्याही घाणेरड्या उदबत्तीसारखा घाणेरडा आहे. मला खोकला येतोय त्या वासानं. शेजारची मुलगी हळूच हसती आहे.

पॉर्नोग्राफीक साईट्सच एक बरं असतं, तिथे नग्नता सहज सामोरी येते त्यामूळे उत्सुकता पहिल्या झटक्यातच संपते. शाळेत असताना दुपारी एक इंग्रजी मालिका लागायची "सांता बार्बरा". खूप मजा यायची ती बघताना. घरी एकटाच असायचो बहुदा. पण आता कळतंय ते सगळं प्रिटेन्शियस होतं.

काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या दिग्दर्शकाच्या समोर पट्कथा घेऊन बसलो होतो तेव्हा खिशामध्ये फक्त वीस रुपये होते. स्वतःचा केवढा अभिमान वाटला होता तेव्हा. की-बोर्डच्या खालून एक झुरळ बाहेर आलं आहे. त्याचा के पाय तुटला आहे. पकडू का त्याला? जाऊ दे. मी झुरळापेक्षा आकारानं बराच मोठा आहे. रात्र झाली आहे.

क्रमशः

- -
निखिल

गुलमोहर: 

सुशिक्षित बेकार तरूणाच्या असंबद्ध विचारांची मालिका, उत्तम प्रकारे मांडली आहे.. त्याचं हताशपण, हलकीशी असूया, मुलीबद्दलचे विचार... सही सही...

कित्येकदा मनात अशा असंबद्ध विचारांची मालिका सुरू असते अखंड....

छान लिहीलेय. पुलेशु. पुढील भागाच्या प्रतिक्षेत Happy

काही काही वाक्य जबरद्स्त

>>मी काहीच करत नाही, म्हणजे गेले सहा महिन्यांपासून मी काहीच करत नाहीये. काहीच म्हणजे जेवण, चहा, झोप, सिगारेट्स आणि गरजेपुरता श्वासोच्छवास यांच्यापलिकडे मी काहीच करत नाही.

>> त्याला ग्रेस आवडतात, रोज संध्याकाळी तो घरी आला की आम्ही दोघं मिळून ग्रेस वाचतो. कळत दोघांनाही काहीच नाही पण बर वाटतं.

छान

पण एकत्रित लेखाचा अर्थ लागला नाही ...असो क्रमशः आहे , पुढे अर्थ लागेल कदाचित ...पुलेशु

छान लिहिलंय..... मनाने अस्वस्थ असलेल्या तरुणाचे विचार त्याच्या आयुष्यासारखेच भरकटलेले कळत आहेत!

अरे हे मी कसं मिसलं होतं? सहसा तुझं काही नजरेतून सुटत नाही...
खैरे स्ट्रगल उत्तम चाललेला दिसतोय... यंज्जॉय करा हे भणंग दिवस!! Happy

!!!