खेळ मांडीयेला...

Submitted by सुमेधा आदवडे on 2 July, 2010 - 09:35

वयाच्या कुठल्याही टप्प्यात "लहानपण देगा देवा..." मनापासुन आठवायला लावणारा एक महत्वाचा घटक म्हणजे खेळ! खेळ आणि खेळणी यांना लहानपणात कशाचीही तोड नसते. मग अगदी मोठमोठी पकवान्न समोर असली किंवा नवीन आणलेले कपडे किंवा कुठलीही वस्तु असली, तरीही ह्या खेळेच्या वेळेत कसलीही तडजोड होत नाही...निदान मी तरी नाही करायचे..भाऊ तर नाहीच नाही! अगदी लहान असताना सर्वात आवडता खेळ म्हणजे सगळ्यांचा असतो तोच-भातुकली. मला त्या खेळाला भातुकली म्हणतात हे आधी माहितच नव्हतं. खेळण्यात भांडी वापरत असल्यामुळे मी त्याला "भांडी-कुंडी" असं नाव दिलं होतं. "भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी" हे गाणं ऐकल्यावर आईकडुन त्या खेळाचं खरं नाव समजलं. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न पडला तो यात राजा आणि राणी कुठे असतात? आम्हाला खेळताना दिसत नाहीत, म्हणजे गाणं चुकीचं आहे!

मी माझ्या इवल्याशा भातुकलीत आईसारखा स्वयंपाकाचा थाट मांडायचे. आम्ही मुली-मुलं एकत्र आलो की मुलं प्लास्टीकच्या पिशव्या "बॅग " म्हणुन घेऊन ऑफिसला जायची आणि आम्ही मुली स्वयंपाक करायचो. सगळ्या स्वयंपाकाचा खाण्यात नाही पण दिसण्यात तरी खरा खुरा भाव यावा असा प्रयत्न असायचा. मग पानं कुटून त्यांची भाजी, पिवळी फुलं कुटून त्यांची डाळ, पांढर्‍या फुलांचा भात असं सगळं चालायचं. फुलवेड्या आईला त्या झाडा-पानांवर दया आल्यावर आम्हाला खेळायला चुरमुरे,गुळ, चणे-शेंगदाणे असे सगळे खरेखुरे प्रकार मिळु लागले. माझ्या भातुकलीत खेळणी कितीही जपली तरी एकेक करुन हरवायचीच. मग पुन्हा नवीन भातुकली..त्यातली माझी सर्वात आवडती आणि आठवणीतली म्हणजे डॅडींनी पुण्याहुन आणलेली खास लाकडी भातुकली. त्यातल्या रंगीबेरंगी भांड्यांमधे खायचे पदार्थ कुटायला मला खुप आवडायचं. ह्या भातुकलीत काही काळाने मला गावच्या यात्रेतुन घेतलेली प्लास्टीकची बाहुली पण सामील झाली होती. ह्याशिवाय घरात आणि कॉरीडॉरमधे खेळायला काच-बांगडी हा एकेकाळचा आमचा प्रसिद्ध खेळ होता. "काच लागेल, काच लागेल" म्हणुन आईकडुन ऐकुन ऐकुन बांगड्यांच्या काचांची पिशवी जपता जपता अगदी नाकी नऊ यायचे.

थोडी मोठी झाल्यावर ह्या घरातल्या खेळांची जागा लुडो, कॅरम,व्यापार,सारिपाट आणि बुद्धीबळाच्या खेळांनी घेतली.आमच्या घरात खेळातला मोठा भाग म्हणजे चीटींग जी केल्याशिवाय भाऊ घरात कोणताही खेळ खेळायचा नाही. कॅरमची सोंगटी हळुच बाहेर काढणं, लुडो-व्यापारसारख्या खेळात कुणाचं लक्ष नाही असं पाहुन सोंगटी पुढे सरकवणं असे सगळे प्रकार हमखास चालायचे. आणि यावर माझं फुरगटुन खेळ सोडणं आणि पुन्हा नाही करणार म्हणुन भावाचं मला मनवणं नेहमीचं होतं. ह्यावरुन आमची भांडणंही खुप व्हायची. व्हिडीयो गेम आणल्यावर पण त्याची खेळण्याची वेळ संपुन जायची तरी गेम माझ्या हातात यायचा नाही.टी.व्ही वर खेळायचे व्हिडीयो गेम मात्र आम्ही अगदी गुण्या-गोविंदाने खेळायचो, त्यात कसलीही चीटींग व्हायची नाही! बुद्धीबळ नेहमी मी आणि डॅडी खेळायचो आणि माझ्या विसरभोळ्या डॅडींना कोणत्याही सोंगटीची चाल लक्षात रहायची नाही आणि त्यावरुन माझ्याशी वाद घालायचे. त्यामुळे बुद्धीबळासारखा अगदी शांततेत खेळला जाणारा खेळही आमच्या घरात अकांततांडव माजवायचा. एकदा आईने आमच्या वादाला कंटाळुन चालु खेळाचं आख्खं पट सोंगट्यांसकट उचलुन चक्क बाहेर फेकुन दिलं होतं!

माझ्या बालपणातलं आमचं दुसरं घर तळमजल्यावर होतं. त्यामुळे बाहेर अंगणात बॅडमिंटन, लगोरी, डब्बा ऐस-पैस, लंगडी, तळ्यात-मळ्यात, ह्या सगळ्या मैदानी खेळांची मजा लुटता यायची. त्यात आम्ही एक लोखंडाच्या वस्तुंनाच हात लावुन सांगितलेल्या गोष्टीला शिवण्याचा खेळही खेळायचो. (त्याला,"आडा माडा कीडा,किसका घर?" असं विचीत्र नाव दिलं होतं !) पण ह्या मैदानी खेळांशी माझ्या सर्वात जास्त आठवणी जोडल्या आहेत त्या गावाला माझ्या भावंडांबरोबरच्या! आजीकडे अंगणात किंवा मावशीच्या नारळ-सुपारीच्या वाडीत ह्या खेळांची मज्जाच काही वेगळी असायची. मात्र माझ्या साठी हे खेळ खुप वेळा वैताग देणारे असायचे. सगळी भावंडं मिळुन असं काही करायची की नेहमी राज्य माझ्यावरच आलं पाहीजे. आणि नाही घेत म्हटल्यावर ते चिडवायला आणि अती झाल्यावर मी मुळूमुळू रडायला मोकळी!

सगळ्या खेळांबरोबरच, कुठल्याशा उंच जागेवर जाऊन बसणं आणि टाईमपास करणं आम्हाला फार आवडायचं. आमच्या बिल्डींगच्या समोरच बाग होती. तिथे घसरगुंडी, झोपाळ्यांवर वगरे खेळता खेळता बऱ्याचदा चढायला एकदम सोप्पं असलेल्या तिथल्या पेरुच्या एका झाडावर आम्ही बसायचो. त्याच बागेच्या एका कोपऱ्यात झाडांचा पाचोळा आणि इतर कचरा टाकुन जाळण्यासाठी एक छोटीशी खोली होती. तिला वरुन घरासारखं छप्पर होतं. बागेच्या कंपाऊंड वॉलवर चढुन मग त्या खोलीच्या छप्परावर जाऊन बसण्याचे प्रकारही आम्ही करायचो. तिथे बसुन गप्पा मारणं म्हणजे खुप मोठी अचीव्हमेंट असायची. आमच्या आयांना कळलं की सगळ्या ओरडायला त्या खोलीसमोर हजर. त्या घरात भूतं आहेत असं सांगुन शेवटी आमचं तिथे जाणं बंद केलं होतं. गावालाही आमच्या दारातच मोठं आंब्याचं झाड होतं. त्यावर चढायला ही मजा यायची. भावाच्या आणि माझ्या बसण्याच्या फांद्याही ठरलेल्या असायच्या. भाऊ तर काही खायला दिलं तरी झाडावर जाऊन खायचा. एका सुट्टीत झाडावरुन पडुन साहेबांनी पाय फ्रॅक्चर करुन घेतला होता. तेव्हापासुन आमचं झाडावर चढणं बंद!

आम्ही भावंडं मिळुन बऱ्याचदा नाटकही तयार करायचो. वेड्या चिंगीचं नाटक करुन करुन मला इतका कंटाळा आला होता की एक वेळ शाळेच्या कुठल्याशा कार्यक्रमात ते करायचं आमचं ठरलेलं असताना ऐन दोन दिवस आधी मी सगळी रीहर्सल बंद करुन नाटक रद्द करायला लावलं होतं. कारण काय तर..चिंगीची आई म्हणजे माझी मैत्रीण एवढी छोटी आहे..ती आई झालेली चांगली नाही दिसणार! आता आठवलं तरी हसु येतं Happy

भावाचे खेळ म्हणजे घरात गाड्या आणि रोबोट्स आणि बाहेर क्रीकेट! त्याच्या गाड्या आणि त्यांचे असंख्य अवयव नेहमी घरात पसरलेले असायचे. कुठलीही नवीन गाडी अगदी आठवडा -दहा दिवसातच स्क्रु-डायवरने खोलुन तिचा पार पोस्ट-मॉर्टम करेपर्यंत त्याला चैन पडायची नाही! फुंसुख वांगडुचा सातवा अवतार होता तो. मग पुन्हा असं करणार नाही ह्या बोलीवर नवीन गाडी हजर! पण हा प्रकार खुप कमी वेळ चालला कारण नंतर तो बाहेरचे खेळ अर्थात क्रीकेट,फुटबॉल वगरे जास्त खेळु लागला. संध्याकाळी सातला घरात दोघंही हजर हवेत अशा अटीवरच आम्हाला खेळायला सोडले जायचे. पण ह्याची बॅटींग नेमकी त्याच दरम्यान रंगात यायची. आई बाहेर येऊन उभी राहिली की जवळ येऊन तिला,"माझी बॅटींग आहे.पाचच मिनीटात संपवुन येतो. अगं जिंकतोय आम्ही!" म्हणत तिच्या उत्तराची वाटही न बघता पळत सुटायचा. शाळेतले सगळे खेळ बहुतेक मैदानीच. तिथेही सर्वात आवडता खेळ म्हणजे खो-खो. पण इतर खेळांपेक्षा भाऊ लेझीम ग्रुप मधे आहे आणि सगळ्या कार्यक्रमात त्यांना लेझीम खेळायला बोलवतात ह्याचा मला फार हेवा वाटायचा. आणि तो उत्तम लेझीम खेळायचा जी मला कधी हातात नीट धरायलाही जमली नाही!

मोठ्या माणसांचे खेळ फार विचीत्र असतात अशी माझी लहानपणापासुन समजुत झाली होती. याला कारण मी दोन-अडीच वर्षांची असताना घडलेला एक प्रसंग आहे. गावाच्या घरात गणपती मधे घरात जागरण असायचं. त्यात भजन, बायकांचा नाच, पत्ते आणि असे सगळे कार्यक्रम व्हायचे.ते सगळे बघण्याच्या प्रयत्नात कितीही डोळ्यांवर ताण दिला तरी मध्यरात्रीपर्यंत पापण्या मिटायच्याच! अशाच एका वर्षी मी कसल्यातरी आवाजाने मधेच जागी झाले. बहुतेक यांचा पत्त्यांचा डाव कोणीतरी जिंकलं होतं. म्हणुन आरडा-ओरडा आणि डावावर सविस्तर चर्चा चालली होती. उठल्यावर दोन-अडीच वर्षांची मुलगी करेल तेच केलं- आईला शोधु लागले. आतल्या खोलीत आई कुठेतरी जरा पहुडलेली दिसली. मी तिच्या जवळ गेल्यावर तिथल्या सगळ्या बायकांना कसली लहर आली कुणास ठाऊक...म्हणे तुझी आई देवाकडे गेली! आता येणार नाही! आईनेही न उठुन आणि हलचाल न करता नाटकाला फुस लावली. मी जे काही भोकाड पसरलं ते थांबेच ना. बाहेर आले आणि बाप्पाच्या मखराजवळ उभी राहिले. सगळे माझी मजा बघत होते. माझं कुणाकडेही लक्ष नव्हतं. जोरजोरात रडत बोलु लागले, "माज्या आईला का नेलंस.आत्ताच्या आत्ता पलत पाठव! नाहीतल मला घेऊन चल तुझ्याकडे!" तितक्यात गालाला कसला तरी स्पर्श झाला. मागे बघते तर आई उभी! लगेच मिठी मारली तिला. मग तिनेही उचलुन घेतलं. पण देवाजवळ मी केलेल्या ह्या बोबड्या प्रार्थना वजा भांडणाने तिथल्या सत्तरीच्या पुढच्या म्हाताऱ्यांचेही डोळे पाणवले होते, असं आई सांगते Happy
पत्त्यांचा हा खेळ अजुनही दरवर्षी रंगतो..आणि हल्ली तो रंगवणाऱ्या खेळाडुंमध्ये आम्ही भांवंडं असतो. माझी ही आठवण निघाली की अजुनही सगळे हसतात.

किती सुखाचा असतो ना बालपणीचा काळ...आता कुठेही बागेत किंवा मैदानावर मुलांना खेळताना बघितलं की वाटतं..निदान खेळासाठीतरी.."उगाच मोठे झालो!!"

हा लेखा इथेही वाचता येईल. नक्की भेट द्या, वाट बघतीये Happy

गुलमोहर: 

म्हणे तुझी आई देवाकडे गेली! आता येणार नाही! आईनेही न उठुन आणि हलचाल न करता नाटकाला फुस लावली.>>> हे असं कोणी सांगू शकतं? Uhoh
बाकी लेख चांगला.

सुमेधा.. खूप छान ,सरळसाध्या भाषेत गोड लिहिलयस Happy
आणी आईबद्दल असं कुणी सांगितलं तर भोकाड पसरून रडावसं वाटतं ..मोठेपणी सुद्धा Sad

सर्वांचे खुप आभार मंडळी...सायो..मलाही खुप खुप राग आला होता त्या बायकांचा!! Angry
वर्षू, अगं अशी कल्पना पण नको गं Sad
सु.की, ह्या आठवणी तर सर्वात मोठा ठेवा असतो आपल्या आयुष्याचा, त्यांना तर धन-दौलतीपेक्षा जास्त जपलं पाहिजे, नाही का Happy
बाकी पुन्हा एकदा आभार सगळ्यांचे Happy

खुप अकृत्रिम आहे लेखन. माझेही खेळ असेच. त्यात फक्त दगडावर काठी टेकण्याचा एक खेळ असायचा.
आमच्या भातुकलीत मात्र मोठेही सामिल व्हायचे, आणि सरळ अंगणातच जेवण शिइजायचे,

सुमेधा, अगदी खरं आहे.. अश्या आठवणी गोंजारता गोंजारताचं आयुष्य खर्‍या अर्थाने रमून जातं. अन मग आयुष्य किती सुंदर आहे हे आपोआप कळून जातं. आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आपल्यापुरतं मर्यादित का होईना पण एक आयुष्य जगलेला असतो. अन अश्या क्षणांचा संचय म्हणजेच दिर्घायुष्य होय.

तुझ्या खेळांच्या रम्य आठवणी वाचताना खूप छान वाटलं! मनापासून लिहिलं आहेस Happy

आणि लहान मुलाची अशी वाईट थट्टा करणार्‍या त्या बायकांना जोरात रागवावसं वाटलं!