धोंड्या - २

Submitted by प्रकाश काळेल on 2 July, 2010 - 05:10

धोंड्या - १

धोंडीबा सूर्यकांत मलमे.
हातभट्टीची दारू बनवायचा उद्योग करणार्‍या सुर्‍या रामोश्याच्या बायकोची कूस बरीच नवसं बोलून उजळली. पह्यलं पोरगंच झालं. ते बी बाचा खानदानी काळा रंग घेउन. कोंडा तशी उजळ होती त्यामुळं तिला थोडं वाईट वाटलंच. कोंडाची जमिनीला टेकलेली म्हातारी सासू मातूर रंगाची खाण साबूत राह्यली ते बघून हरखली. थरथरणारं दोन्ही हात नातवाच्या गालावर फिरवून तिनं मायेनं बोटं मोडली. "सूर्‍या, आरं तुझा बाच आलाय बघ तुझ्या पोटाला. त्येंच्यावानीच येक-दांडी नाक हाय आन त्याल लावल्यावानी नुळ-नुळीत अंग! " झालं. मग पोरालाबी आज्याचंच नांव मिळालं.

किडेबीसरी गांव तसं आडवळणीच. गावाला सरव्या बाजूनं डोंगरांचा येढा असल्यानं, आसपासच्या गावांशीबी किडेबिसरीचा जास्त संबंध याचा नाही. गावठाण आन चार वस्त्या पकडून खच्चून शंबर-सव्वाशे उंबरा असंल गावाला. पर हर जातीची येगळी आळी होती गावात. रामोश्यांची वस्ती गावातनं जरा बाह्यरच्या अंगाला वड्याकाठच्या टेकाडावर होती. गावाची राखण करणे हे रामोश्यांचं मुख्य काम, त्या हिशोबानं तशी रचना केलेली. बलुतेदारीच्या बेड्या गळून पडायला लागल्या आन समदी बलुतीदारं ज्याला ज्यो जमंल त्यो उद्योग करायला लागला. तश्यातच मग किडबिसरीचे रामोशी हातभट्टीची दारू बनवायच्या धंद्यात आले. ते अंधारात अजूनबी काही धंदे करायचे अश्या कथा होत्या. पर त्या ऐकीव!

धोंड्या झाल्याव तीन म्हयन्यातच म्हातारी गेली. जणू नातवाचं त्वांड बघायलाच तीचा जीव अकडला हुता. ती हुती तवर कोंडाक्काला जरा आधार हुता. हातरुनात पडल्या पडल्या म्हातारीनं कीतीबी त्वांड वाजिवलं तरी तिचा सूर्‍याला धाक होता, ही जमंची बाजू. ती गेली आन सूर्‍या येसण काढलेल्या बैलावाणी वागायला लागला. दिवसेंदिवस त्याचं दारूचं व्यसन बळवत गेलं... आणि धोंड्या अवघा सव्वा वर्षाचा असताना लीवर खराब होऊन सुर्‍या गेला. तिरडीवर मावंत सुदीक नव्हता त्याचा देह. अख्खं गांव हाळहळलं. एवढा ताड माड गडी दारूच्या पायात पार हुत्याचा नव्हता झाला. कोंडावर जणू आभाळच ढासळलं. पण ज्या धंद्यामुळे तिचा नवरा गेला त्यो तिनं पुढं चालवला नाही. ते तिच्यानं होणारं बी नव्हतं! सुर्‍या होता तोवर घरी ताजा पैका हुता. पर पुर्‍या हयातीत त्यानं ना जमीन घेतली ना सोन्यानाण्यात पैसा गुतीवला. सूताक पुरं व्हायच्या आतच कोंडाला पोटासाठी घर सोडायला लागलं. कोंडानं शेतातली मजूरीची कामं केली. गड्यांच्या बरोबरीनं नाला बंडींगला पाट्या टाकायची कामं केली. आता राहीलेली धडपड फक्त त्या नावाएवढ्या जीवासाठी हुती. येकल्या बाइनं घर चालवताना तीची पार ससेहोलपट होत हुती. धोंड्याच्या बाललीला बघून ती जरा सुखवून जायची. पर तीबी घडीभरच, मंग सांधीला जाउन धाय मोलकून रडून घ्यायची. धोंड्या कावराबावरा हुन तिला हुडकत सांधाडीत धडपडायचा. ती कामावर गेल्यावरबी धोंड्या तीच्या मागनंच फीरायाचा. अनवानी.

बघता बघता धोंड्या सा वर्षाचा झाला आणि कोंडाक्कानं त्याचं गावातल्या साळंत नांव घातलं. खापराच्या पाटीवर त्यानं गिरवलेली तिला नं उमजणारी अक्षरं बघून, कोंडाक्काला वनवास कारणी लागल्यावाणी वाटायचं. आन मंग अश्यातच धोंड्याला शीकवून 'मोठा मानूस' बनवायचं सपान तीच्या मनात बाळसं धरायला लागलं.

धोंड्यालाबी साळंत बरी गती होती. सुद्द बोलनारे, सोच्छ कापडं घालनारे मास्तर मारकुटे असले तरीबी त्याला आवडायचे. पयल्या लायनीत बसून, मास्तर जे शिकीवतात ते धोंड्या मन लावून ऐकायचा. घरला आल्यावर घासलेटच्या चिमणीच्या उजेडात, पाडे मोठ्यानं म्हनंत पाटीवर काढायचा. ती बघून कोंडाक्का दीवसभराचं कष्ट पार इसरून जायची. तीसरीपर्यंत धोंड्या पहिल्या धात तरी यायचाच.

नवर्‍याच्या माघारी, परिस्थितीनं कोंडाला चांगलंच घडवलं. शेतातल्या कामासाठी तिला पार घरापर्यंत बोलावणी यायची. मुख्य कारण म्हंजी कोंडा इमानदार होती आन कामालाबी वाघीण होती. आजकाल जास्त येळंला ती पाटलाच्या मळ्यातंच असायची. एकतर पाटलाची शेती मोठी होती आन पाटलांच्या रखमाचा तीच्यावर भरोसा होता. पाटलाच्या घरी काही काराण असलं तर वरची कामं करायलाबी जायची कोंडा. रखमाचा पोरगा राज्या धोंड्याच्या बरोबरीचाच. येकाच वर्गात होते दोघे. चांगलं पटायचं दोघांचं आगुदर. पर जसजसं कोंडाचं पाटलाच्या घरी येणंजाणं वाडलं तसं राज्या फटकून राह्यला लागला धोंड्यापस्नं. धोंड्या जायचा आइच्या बरुबर.
कोंडा कामात असताना पडवीतल्या खांबाजवळ घुटमळत राह्यचा. कधीकधी रखमा त्याला येखादा कळ्याचा लाडूबीडू खायला द्यायची. धोंड्या त्यो चड्डीच्या खिश्यात ठीवायचा. घरला आल्यावर कोंडाला त्यातला अर्धा दीउन मग खायचा.

शाळेतली काही पोरं धोंड्याचा उगाचच इसाळ करायची. रंगावरनं तर कधी जातीवरनं त्याला काहीबाही बोलायची. म्हणायला गावात शीवताशीवत पाक बंद झालेली असली तरीबी ह्या पोरांना त्याचं कुठुनतरी धडं मिळत होतं ही नक्की. तरी धोंड्या तसा थंड डोसक्याचा होता, हसून न्यायचा त्यास्नी. पण त्याचा जास्तच आरसाटा घ्यायला सुरु केला काही टारगट पोरांनी. रामुश्याचं पोरगं आपल्या बरूबरीनं शीकलेलं मानवत नसावं त्येंना. तशी बाकीचीबी अजून बरीच पोरं होती वर्गात.. म्हाराची, मांगाची, व्हरलाची. पर धोंड्याला पाठीमागं इचारणारं कुनी नव्हतं त्यामुळं जास्त न्याट यायचं त्यांना. बाविषयी धोंड्याला काहीच माहीत नव्हतं. बा कसा दीसत अशील ह्ये बघायला, घरात त्याचा येखादा फोटू सुदीक नव्हता. कधी त्यानं कोंडाच्या म्होरं तोंड उघाडलंच बाचा विषय काढून तर ती खेकसायची " दारू पिउन उलथला त्यो. आन तुला ठीउन गेलाय मागं माझ्या मड्यावर! "
मंग येकटीच रडत बसायची माळीत जाऊन.

गोट्या खेळायचा नाद भरला धोंड्याला.
येकदम जबरी नेम हुता त्याचा. लांबनं कुठलीबी गोटी अज्जात उडवायचा. पाक कडूस पडस्तवर गोट्या खेळायची पोरं. घरला येताना डावात जिकलेल्या गोट्यानं धोड्याच्या चड्डीचं दोन्ही खीसं भरुन जायचं आन त्यामुळं चड्डी कमरंतनं घसरायची. माळीत सांधाडीला चुन्यानं रंगिवलेली गाडग्याची उतरंड रचलेली होती. त्यात कोंडाक्का अंडी, चटणी, लोणची तसंच तांदळात पुरुन पैसं दडवून ठीवायची. धोंड्या त्यातल्या एका उतरंडीच्या तळाला असलेल्या मोठ्या गाडग्यात गोट्या साठवून ठीवायचा.

असंच येके दीवशी गोट्या ठीवत असताना धोंड्याच्या हातनं गरबडीत एक गाडगं खाली पडलं. त्यात कोंडानं काय ठीवलं होतं ते कळीना. तीथं ध्याचाबी अंधारच असायचा त्यामुळे काय सांडलं ते बगायला धोंड्या चुलीजवळची चीमणी पेटवून घीउन आला. गाडगं फुटलं होतं. त्याच्या खपर्‍या आन त्यातली हाळकुंडं खाली शेणानं सारवलेल्या जमीनीवर इस्काटली होती. चिमणीच्या उजेडात हळकुंडं येचताना धोंड्याला येक इचित्र गोष्ट नदरं पडली. येकदम कोपर्‍यात भिताडाला लागून ठीवलेल्या दाण्याच्या ठीक्याखाली येक चौकोनी फट होती. ती फट जमीनीबरोबर असली तरीबी त्याच्या खाली कायतरी असावं हा अंदाज धोंड्याला आला. आधी बाहेर येउन त्यानं रस्त्यावर कोंडाचा अंदाज घेतला. ती दीसत नाय ते बगून मंग पुन्हा सांधाडीला गेला. निम्म रीकामं असलेलं दाण्याचं ठीकं धडपडत बगलंला केलं आन मग त्याला त्या चौकोनाच्या मधल्या भागात असलेली कडी नजरं पडली. बिचकतच धोंड्यानं कडीला पकडून ते झाकण उचललं. चिमणी हातात पकडून मग त्यो आत असलेल्या सामानाकडं डोळं फाडून बघायला लागला. आतली एकेक गोष्ट बघील तसतसा भितीनं आलेला त्याच्या पोटातला गोळा मोठमोठा होत गेला!

********
क्रमशः
___________________

धोंड्या - ३

गुलमोहर: 

छान.... तुम्ही पण उत्कंठा ताणून क्रमशः वाले लेखक झालात की राव.... बाकी लिखाण लई झ्याक.....

सही बॉस, तुला ही भाषा मस्त जमते. तुझ्या गावाकडची आहे काय? स्टोरीही मस्त जमली आहे. पुढच्या भाग लवकर येऊदे.

काय तब्येतीत जमवताय गोष्टं..... तुम्हाला क्रमशः माफ करावं का नाही असं दुग्ध्यात टाकणारं जबरी लिहिताय...

पक्स अगदी तब्येतीत चाललय...
Take your own time अर्थात तरीही पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत Wink