संजीवन..

Submitted by के अंजली on 1 July, 2010 - 05:23

अशाच एका तप्त दुपारी
नव्हती चाहूल नव्हती गाज..
स्तब्ध जाहली झाडे पाने
सुस्त परिसर शांत आवाज..

तोच अचानक फुटला आसूड..
कडकड करी रव बिजली बिथरुन!
घुमवित उठले गडगड गर्जून
काळेकभिन्न हस्ताचे घन..

टिपरीवरती टिपरी पडली
ताल पकडला वरुणाने..
भरभर पिंगा घालूनी दंगा
उच्छाद मांडला वार्‍याने..

रेशीमधारा सरसर पडल्या
शुभ्र जलाच्या मौक्तिकमाळा..
अविरत बरसे मेघ सावळा
धरतीच्या मिठी घालूनी गळा..

धबधब पाडीती कडेकपारी
शुभ्र तुर्‍यांचे हे नवजीवन..
रौंरव वाहती गर्वीत सरीता
भयप्रद तरी ते हो संजीवन..

खळखळती उच्छृंखल निर्झर
पाऊलवाटा चिंब जाहल्या..
धरणीसाठी या वरुणाने
प्रेमविराण्या किती गायल्या?

निर्मळ जग हे निर्मळ सृष्टी
निर्मळ दव हे पानांवरती..
उज्जल स्वप्न उद्याचे पाही
वस्त्र लेऊनी हिरवे, धरती...!

गुलमोहर: 

अनुजा, मला गाणी आवडतात म्हणून गेय कविताही आवडतात, पण मुक्तछंदही आवडतो!

किरणा,पावसाळ्यातच नाही तर वर्षभर तो मला भेटतच असतो! हे पागलपण कधीही न संपणारं!
धन्यवाद दोघांनाही!

टिपरीवरती टिपरी पडली
ताल पकडला वरुणाने..
भरभर पिंगा घालूनी दंगा
उच्छाद मांडला वार्‍याने..

भन्नाट....
खरंच काय सही वर्णन केलयसं ....
खुप मस्त..

अमित, पिलु आणि अमोल
प्रतिसादल्याबद्दल धन्यवाद!

कदाचित, निबंध लिहिण्याऐवजी पाटी पावसात धरून चिंब ओली झाल्यावर वर्गात गेली असेल अन हा घ्या निबंध .. म्हणाली असेल. पावसाचं असलं वेड असणारी हि ऐकमेव आहे.