आठवणींचा प्राजक्त

Submitted by मंजूडी on 10 April, 2008 - 08:30

शुक्रवारी ऑफिसमधून परस्पर इकडेच ये म्हणजे मग जोडून तीन चार दिवस तुला राहता येईल असा आईचा फोन आला तेव्हा कल्याणीचा नाईलाज झाला. शनिवार रविवार मध्ये अनिकेतच्या लग्नाची खरेदी करायची होती. खरेदीला तिची ना कधीच नसायची पण मग आईकडे रहायला गेलं की एक अप्रिय गोष्ट तिला करावी लागणार होती. त्यासाठीच तिचा जीव घोटाळत होता.

अनिकेतच्या लग्नाला आता जेमतेम दोनच महिने राहिले होते. त्याची होणारी बायको, क्षिप्रा अन् तिची आई शनिवार रविवार आमंत्रणासाठी पुण्यात यायच्या होत्या म्हणून मग आईनेही खरेदीचं नक्की करून टाकलं होतं. आणि कल्याणीला रहायलाच ये, मग बाकीच्या गोष्टीही फायनल करून टाकता येतील असा सज्जड दम भरला होता.

लग्नाच्या निमित्ताने बंगल्यात काही फेरफार करण्याचं घाटत होतं. त्यानुसार आई बाबांची बेडरूम स्वयंपाक घर आणि बैठकिची खोली तयार झालीच होती. आता फक्त अनिकेतची बेडरूम, काही किरकोळ फर्नीचर आणि रंगकाम एवढंच बाकी होतं. तिची आणि अनिकेतची असलेली खोली आता अनिकेतची बेडरूम होणार ह्या कल्पनेनेच तिला अगदी कसंनुसं होत होतं. खरंतर बंगला बांधताना ती खोली आधी बाबांच्या ऑफिससाठी निश्चीत केली होती. पण एकूणच त्या खोलीची रचना पाहून कल्याणीने त्यावर आपला क्लेम लावून टाकला. अनिकेतला त्यांची रूम गच्चीच्या जवळ हवी होती पण पहिला मजला चढवायला त्यावेळी परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे मग अनिकेतला आपलं घोडं पुढे दामटता आलं नाही.

पूर्ण बंगल्यातली ती एकच खोली कल्याणीच्या अत्यंत आवडीची होती. पश्चिमेला असणारी खिडकी संध्याकाळचं कोवळं ऊन अलगद त्या खोलीत सोडायची. कंपाऊंडमधला प्राजक्त संध्याकाळीच डवरून जायचा आणि त्याचा वेडा करणारा सुगंध कल्याणीला कोवळ्या स्वप्नांच्या दुनियेत फिरवायचा. तिच्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास त्या खोलीच्या खिडकीतच झाला होता. मैत्रिणींचे जमलेले अड्डे, परीक्षेनंतरच्या पार्ट्या, आते मामे भावंडं रहायला आल्यावर घातलेला धूडगूस, पत्ते, कॅरम, ल्यूडो सगळ्याची साक्षीदार तिची ती खोली होती.

आणि खोलीत असलेलं तिचं कपाट....... ते तर काय तिच्या जीवाचा तुकडाच होतं जणू. लहानपणापासूनच्या हृद्य असलेल्या सगळ्या आठवणी तिने तिच्या कपाटात जपून ठेवल्या होत्या. फोटो, ग्रिटींग कार्डस्, रीझल्ट्स्, सर्टीफिकेट्स तर होतेच त्याशिवाय जुने खेळ, ड्रेसेस आणि इतरही अनेक अचाट वस्तू तिने जिवापाड जपल्या होत्या. कल्याणी होतीच तशी मनस्वी!!
नेलपॉलिशची शेड आवडली म्हणून एक कोट की दोन कोट असं करत तिने आणि मैत्रीणीने एका बैठकीत संपवलेली नेलपॉलिशची बाटली तिच्या कपाटात होती.
वेडीवाकडी वाढलेली अक्कलदाढ काढावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितल्यावर इंजेक्क्शनच्या भितीने क्लिनिकमध्ये किती धिंगाणा घातला होता कल्याणीने. तिच्या थयथयाटाला घाबरून डॉक्टरांनी शेवटी ऍनेस्थेशिया देऊन ती अक्कलदाढ काढली होती. मग ती अक्कलदाढ जपून ठेवणं आलंच.
सी ए इंटरचा अभ्यास करताना कशी कोण जाणे पण तिच्या बोटात स्टेपलरची पिन घुसली. दुखणार्‍या बोटाकडे तसंच दुर्लक्ष करून पहिले दोन पेपर्स तिने दिले होते. पण मग वेदना फारच असह्य व्हायला लागल्या तशी डॉक्टरना दाखवलं तेव्हा त्यांनी सेप्टिक झालंय म्हणून सांगितलं. बँडेज केलेल्या बोटाने शेवटचा पेपर लिहिणं फारच तापदायक ठरलं होतं. पण चक्क त्याच पेपरला तिला एक्झम्प्शन मिळालं होतं. मग स्टेपलरची पिन नाही अगदीच पण तो स्टेपलर मात्र तिच्या आठवणींच्या गोदामात भरती झाला.
कुठल्याश्या छंद वर्गाला पॉट पेंटींग शिकायला कल्याणी गेली होती तिथे सिरॅमिकच्या स्ट्रॉबेरीज् करायच्या होत्या. कल्याणीला ते चिकणमातीत खेळणं इतकं आवडलं की मग स्ट्रॉबेरीजचे घोसच्या घोस तयार झाले होते. पॉटवर चिकटवल्यावर मग वेगळंच रूप धारण केलं त्या स्ट्रॉबेरीजनी, तशी त्यांना पोपटी रंग दिला तिने छानपैकी. तो ग्रेपस् पॉटही दिमाखात उभा होता तिच्या कपाटात. तोच प्रकार कोल पेंटींगचा. कोळश्याची पूड करता करता कल्याणीची झक्कपैकी रखूमाई झाली होती आणि ते कोल पेंटींग म्हणजे अक्षरश: एक काळा कार्बन पेपर तयार झाला होता. पण तोही तिने अगदी प्लास्टीक कव्हर घालून नीट एन्व्हलपमध्ये ठेवला होता.
सागरने तिला प्रपोज केल्यावर मग त्याही आठवणी कपाटात विराजमान होणं अतिआवश्यक बनलं होतं. कॅडबरीची असंख्य रॅपर्स, अगदी दिल चाहता है स्टाईलमध्ये सागरने दिलेले फुगे आणि लाल गुलाब अजूनही एका लाल बॉक्समध्ये होते. फक्त एवढच की फुगे फुटले होते आणि लाल गुलाबांनी काळा ड्रेस परीधान केला होता.

कल्याणीचं हे कपाट म्हणजे अनिकेतचा हमखास चेष्टेचा विषय होता. त्या चेष्टेचा अतिरेक झाला की मग दोघांची मारामारी ठरलेलीच असायची. त्यातही अनिकेतच्या दांडगाईला पुरं पडण्यासाठी कल्याणी सरळ पट्टीचा वापर करायची. अश्या अनेक मारामार्‍यांमध्ये कित्येक पट्ट्या मोडल्या होत्या. त्या मोडक्या पट्ट्यांचाही कपाटात जुडगा करून ठेवला होता, अनिकेतला शह दिल्याची आठवण म्हणून.

लग्नानंतर सागरने तिला विचारलही होतं की हे कपाट आपण आपल्या घरी घेऊन जाऊया म्हणून. त्यावर अनिकेत अगदी व्हिलन स्टाईलमध्ये हसला होता. तो तर केव्हाचा टपलेलाच होता तिचं हे कपाट हलवायला कारण त्याच्या मते ती जागा त्याच्या मुझिक सिस्टीमसाठी आणि फिश टँक्ससाठी अतिशय योग्य होती. पण कल्याणीने दोघांनाही ठामपणे नकार दिला होता. सासरी नेल्यावर त्या सगळ्या वस्तूंचं काही महत्वच उरणार नव्हतं. कारण कपाट हलवता आलं असतं एकवेळ, पण ती खोली थोडीच उचलून नेता आली असती? सगळ्याच आठवणी त्या खोलीशीच तर बांधलेल्या होत्या. दरवेळी माहेरी आल्यावर खोलीत ठाण मांडून कपाट उघडून त्या जमवलेल्या वस्तूंवर हात फिरवून सगळ्या आठवणी जाग्या करण्याचा सोहळा कल्याणी साग्रसंगीत पार पाडत असे.

आता ह्या सगळ्या जीवापाड जपलेल्या वस्तू कुठे न्यायच्या? टाकून द्यायच्या की आईच्या खोलीत हलवायच्या? पण इतर कुठेही नेल्या तरी ह्या खोलीत त्या वस्तू असण्याचा जो आनंद होता, तो तिथे मिळेल? आपण हक्क गाजवू पाहतोय का ह्या घरावर, खोलीवर? मग माझी खोली, माझी खिडकी, माझा प्राजक्त? आपला हा अगदी खुळेपणा चाललाय हे कल्याणीला समजत होतं पण......... जास्तच त्रास व्हायला लागला तशी तिने ठरवलं की कपाट नेऊ आपल्या सासरच्या घरी, आतल्या वस्तूंसकट, पण ही खोली अनिकेतकडे सोपवायलाच हवी, त्यातल्या आठवणींमध्ये गुंतून न पडता. मनाशी निश्चय झाल्यावर तिला थोडं हलकं हलकं वाटायला लागलं.

लग्नाची खरेदी मोठ्या उत्साहाने पार पडली. क्षिप्राची आणि कल्याणीची आवड जुळत होती. कल्याणीनेही दोन साड्या वसूल केल्या, एक अनिकेतकडून आणि एक आईकडून. शिवाय करवलीचा मान म्हणून क्षिप्राच्या आईनेही तिला एक साडी घेतली. सोनाराकडे क्षिप्राचे दागिने करायला टाकताना अनिकेतने कल्याणीला एक कानातल्यांची जोडी आणि आईलाही हिर्‍याची अंगठी घेतली.

खरेदी आटपून मंडळी घरी आली तेव्हा बाबा वाटच बघत होते सगळ्यांची.. एक आनंदाची बातमी घेऊन. बंगल्यावर एक मजला चढवायची परवानगी मिळाली होती. सगळ्यांच्या आनंदाला मग उधाणच आलं. अनिकेतनेच मग पटापट निर्णय घेऊन टाकले, पहिला मजला कसा वाढवायचा, किती वाढवायचा ह्याबद्दल. स्वतःची बेडरूम त्याला हवी होती तशी गच्चीच्याशेजारी, शिवाय दोन गेस्टरूम्स सुद्धा...... वर असंही म्हणाला की माझी आणि कल्याणीची खोली राहू दे तशीच, कल्याणीसाठी अन् तिच्या कुटुंबासाठी .......... मग इथे आली की बसेल तिच्या कपाटातला कचरा कुरवाळत.

कल्याणीचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. म्हणजे.... खरंच तिची खोली तिचीच राहणार होती. आणि तिचं कपाटही... सगळ्या आठवणींसकट..... मग खुषीतच कल्याणी तिच्या खोलीत गेली ...... खोलीच्या खिडकीतून पश्चिमेचा गार वारा झुळूझुळू वाहत होता. आणि प्राजक्तही नेहमीप्रमाणे मस्त डवरून आला होता.

------ समाप्त--------

गुलमोहर: 

छान लिहिली आहेस.. simple and sweet Happy
'कचरा' नेहेमीच 'कचरा' नसतो, नाही का? मी सध्या त्यातूनच जात आहे.. कथा वाचल्यावर 'अगदी अगदी' वाटलं Happy

त्या कच-याच मोल कीती अनमोल आहे ना????

आवडली, एकदम छोटीशी आणि क्युट वाटली. मी पण आत्ताच या अनुभवातुन गेले. माझ्या लग्नाच्या वेळी आईने माझे कपाट आवरायला काढले तेव्हा असाच काय काय 'आठवणीतला-साठवणीतला' ऐवज निघाला माझ्या कपाटात.

Short & sweet......................
mastach............

माझ्याही कपाटात अश्या अनेक वस्तू आहेत. त्याचे महत्व इतर कुणालाच कळणार नाही. दरवेळी कपाट आवरायला बसतो आणि परत सगळे जागच्या जागी ठेवून देतो. छान जमलाय, फक्त शीर्षक मला खटकले, टिकणारी ती बकुळ, प्राजक्त तर ओंजळीत घेतला तरी विरघळून जातो.

कल्याणीला खुळं करणार्‍या आठवणी, तसाच तो प्राजक्तही..... दरवेळी आठवणींच्या उजाळ्याने ताजंतवानं व्हायला होतं तसंच तो प्राजक्ताचा सुगंध श्वासात भऊन घेतल्यावरही मन एकदम प्रफुल्लित होऊन जातं. म्हणून 'आठवणींचा प्राजक्त'..........

छान. तसा प्राजक्तही आवडतो, पण त्याचा वास टिकत नाही ना, म्हणून म्हंट्लं.

Really a nice one......
Wachatanna kharach ajubajula 'Prajakt' darvalto aahe aasa watata.....
very Real and Captivating....

एकदम छान लिहिलय . शोर्ट बट स्वीट .

मस्तच आहे --शॉर्ट आणि स्विट.---प्रत्येक मुलीच्या मनातली.

मंजू, छान, छोटुकली... कथा अगदी तुला हवं आहे ते पोचवतेय आमच्यापर्यंत... मला असं बिन्-पसार्‍याचं लिहिता येत नाही नीटसं... म्हणजे नाहीच Happy
बाकी शीर्षकाचं म्हणशील तर, त्या खोलीत घालवलेल्या क्षणांना खोलीबाहेरल्या प्राजक्ताच्या फुलांचा वास आहे... एव्हढच...
मला वरण्-भाताचा कुकर कधीही उघडला तरी दुपारची अकराची गाणी- कामगारसभा लागणार असंच वाटतं.... तसच....

मंजु, एकदम क्युट आहे हं ही कथा Happy एकदम "आपली" (मुलींची) कथा आहे.

सगळ्या मुली या अनुभवातुन जातातच ना... प्रत्येकीच्या आठवणींना एक निराळा सुगंध असतो. माझ्या भावाचं लग्न व्हायचय अजुन म्हणुन माझं कपाट आणि खोली अजुनही त्या जुन्या गोष्टी साठवुन आहेत.
-प्रिन्सेस...

प्रिन्सेस, एक्झॅक्टली मला हेच मांडायचं होतं. लग्न झालं तरी मुलींची एक हक्काची स्पेस माहेरी राखून ठेवलेली असते. त्या स्पेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला की एक प्रकारची असुरक्षितता, हुरहुर त्यांना वाटू लागते. इतरांना बिनमहत्वाच्या वाटणार्‍या वस्तु, काही घटना त्यांच्या दृष्टीने अतिमहत्वाच्या असतात. त्या जोपासणं, सांभाळणं त्यांना आवश्यक वाटतं. हे अर्थातच काही काळापुरतंच असतं. पण ते एक वेडं वय असतं.

पूनम आणि रुनी : मग त्या कचर्‍याचं काय केलंत? बॅगेत भरून तुमच्या नविन घरात नेलात का? Happy

दाद : वरण भात आणि कामगार सभा....... अगदी अगदी.... तुला कश्या काय इतक्या चपखल उपमा सुचतात??

असो, तुम्हा सगळ्यांना कथा आवडली आणि त्यावर आवर्जून प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद.

मंजु, छान लिहीलेस!
आठवणींचा प्राजक्त दरवळतोय.........
Happy

मंजु!! कथा आवडली. माझं लग्न झाल्यावर सामान आवराय्ला घेतलं तेव्हापण असच काहीसं दाटुन आलं होतं!! Happy

मंजू मस्त आहे गोष्ट, एकदम क्यूट.

चांगलं लिहितेस मंजु! लिहित चल..

आपण मुलि काय काय साठवतो ना? सगळिच गम्मत्...मंजु कथा एक्दम जमुन आलिय..आठवणिंच्या राज्यात नेउन आणलस तु..

असं थोडीच आहे काही.. मुलं पण खूप काही साठवतात..

छानच लिहिली आहे कथा. एकाच बैठकीत संपवुन टाकली हे तर फारच सुंदर. वाचल्यासारखे वाटते. कपाटात कितीतरी वस्तु असतात. कधीकधी खुप वैताग येतो त्या वस्तुंचा पसारा पाहुन परंतु हातात घेतल्यावर आठवणी जाग्या होतात व परत कशाबश्या कपाटात कोंबल्या जातात.

एकदम गोडुलि कथा आहे, खुदकन हसू फुटलं बघ!

फार छान कथा आहे. खूप आवडली.

मंजू.....फार गोड आहे गं कथा....... अगदी सगळ्या सासुरवाशीणींची..... मनातली हुरहुर खूपच छान उतरलीये गं...... अगदी आतपर्यंत पोचली. लिहिती रहा अशीच Happy

मन्जु जी कथा किती अप्रतिम लिहिली आहे हो तुम्ही .. दृष्य समोर उभे राहिले

२ दा वाचली .. खुप खुप आवडली ........

छान लिहीलीये कथा. आवडली.

छान लिहिलिये कथा.. Simple and sweet..
लिहित रहा अणखिन... Happy

छान आहे ग कथा. अगदी असच काहीस वाटत असतं खरं. केवळ नविन लग्न झाल्यावरच असं नाही, नंतरही कधीपण माहेरची आठवण आली तरी, त्या बालपणीच्या सुगंधी क्षणांनी हळवं व्हायला होतं. आता तर खरं आपल्या आणि नवर्‍याच्या सगळ्या घरावरच आपला हक्क आणि स्वैर संचार असतो पण माहेरच्या घरातल्या त्या एका खोलीत आपला जीव गुंतलेला असतो.
असो. लिहीत राहा.

सगळ्याच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वाचकांना मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी कथा वाचलीत आणि ती आवडल्याची प्रतिक्रिया इथे, मेलवर, विचारपुशीत दिलीत त्याबद्दल खरंच सगळ्यांचे मनापासून आभार.....