सखेसोयरे!

Submitted by अनिताताई on 29 June, 2010 - 14:19

आपलं मन निसर्गाकडे नेहमीच ओढ घेत असतं पण काही कारणांनी त्याचा सहवास करण्याचा योग फ़ारसा येतोच असे नाही. आमच्या इमारतीमधील एका सदगृहस्थांनी अतिशय प्रेमाने इमारती सभोवती सुंदर वृक्ष वाढवले आहेत. त्यांना धन्यवाद देत मी निसर्गाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते.
आमच्या सभोवती पांगारा,आंबा, अशोक [मादी आणि नर] असे वृक्ष त्यांनी जोपासले.पैकी घराच्या हॉलला लागुन असलेला पांगारा बिचारा आता इतिहासजमा झाला आहे. घरात फ़ार अंधार येतो अशी तक्रार करुन काहीजणांनी कु-हाड घालुन त्याला अगदी नामशेष केला. ह्या पांगा-याची पाने हिरवीगार, सुंदर , सुबक आकाराची होती. पावसाळ्यात या पानांवर पाण्याचे थेंब तेजस्वी मोत्यांसारखे चमकत. हा वॄक्ष छान डेरेदार आणि छोट्यामोठ्या फ़ांद्यानी भरलेला...जणू मुलामाणसांनी भरलेलं, गजबजलेलं, गोकुळच जणू ! मला आठवतंय हा वॄक्ष संध्याकाळी चिमुकल्य़ा चिमण्यांनी भरुन जायचा. अक्षरश: पानागणिक चिमणी ! खूप चिवचिवाट करायच्या. दिवसभर काय काय केलं याचा वॄत्तांत एकमेकींना सांगायच्या बहुतेक. रात्रभरच्या मुक्कामासाठी याची कशी बरे निवड केली असेल असं वाटायचं. त्यांचा गलका थांबवण्यासाठी मुली जोरात टाळी वाजवायच्या. तेवढा एक क्षण शांत व्हायच्या की पुन्हा सुरु.... आम्हाला मजा वाटायची. अंधार झाला की मात्र पांगारा एकदम शांत व्हायचा. पहाटे उजाडले की भुर्रकन उडून जायच्या. वर्षातून एकदा हा निष्पर्ण व्हायचा. मग त्याच्या शेंड्यावरती लालभडक फ़ुलांचे गुच्छ फ़ुलायचे.
जणू पेटत्या मशालीच ! या फ़ुलांमधे भरपूर मध असावा बहुतेक. कारण खाद्यजत्रेत कशी सर्व गर्दी करतात तशी अठरापगड प्रकारचे पक्षी गर्दी करायचे पांगा-यावर..... आम्ही लपुनछपुन भरपूर नेत्रसुख घ्यायचो. हिरवेगार पोपट, मैना , काळ्यापांढ-या रंगाचे केशरी चोच असणारे पक्षी.... असे वेगवेगळे पक्षी खाऊ खायला यायचे. अगदी कावळेसुद्धा.. कावळेमात्र धसमुसळेपणाने फ़ुलांच्या पाकळ्या ओरबाडत आस्वाद घ्यायचे. त्यांची पद्धतच तशी ! आता हा पांगारा फ़क्त आठवणीतच जपायचा.
आमच्या बेडरुमला लागुन दोन आंब्याची झाडे आहेत. सणावारी आंब्याचे टाळे हात बाहेर काढुनसुद्धा तोडता येते. सिझनमधे हात बाहेर काढुन कै-या तोडता येतात. खूप मज्जा येते. लगतच्या वृक्षावर कावळे तर कधी Pond Heron पक्षी विशिष्ट मोसमात घरटी बांधतात. मग अंडी घालणं , पिल्लांचा जन्म त्यांच संगोपन वगैरे चालतं. अलीकडे कावळ्यांनी मात्र त्यावर घरटे बांधणं सोडून दिलंय.
त्याचं असं झालं या झाडावर बरेच वर्ष कावळ्यांनी एक मजबूत आणि छानसं घरटं बांधुन ठेवलं होतं. दरवर्षी सिझनमधे थोडी मारामारी करुन एक जोडपं त्यावर कब्जा करायचं. आणि मग अंडी,पिल्लं,त्यांचं संगोपन,रक्षण हे सर्व शिस्तीत चालायचं.पंख फ़ुटले की पिल्लं उडुन जायची. उरलेले दिवस ह्या घरट्याचा डायनिंग टेबल सारखा उपयोग करत हे कावळे! असे हे मजबूत घरटे अनेक वर्षे वापरात होतं. ३ वर्षांपूर्वीची गोष्ट..एका सकाळी कावळ्यांचा कोलाहल सुरु झाला.घरट्याभोवती उडत ते गोंगाट करत होते. पाहिलं तर एका कावळ्याचा पाय घरटयाच्या काडयांत पक्का अडकला होता. सगळे भाईबंद त्याची सुटका करायला बघत होते. त्यांच्या प्रयत्नात तो चोची लागुन घायाळ होत होता. दृश्य फ़ारच करुण होते. काय करावे काही सुचेना. शेवटी अग्नीशमन दलाला फ़ोन केला.थोड्याच वेळात त्यांची गाडी हजर! त्यांचे २-३ जवान तत्परतेने धाऊन आले सोबत लांब काठी आणि त्याला पुढे हूक होता. गच्चीवर जाउन त्यांनी काही सेकंदात कावळ्याचा पाय सोडवला! आणि जखमी कावळा सुटकेच्या आनंदात उडुन गेला. अग्नीशमन दलाच्या कृपेने आमचीही मानसिक त्रासातून सुटका झाली. संध्याकाळी पाहिलं तर ते जुनं घरटं कावळ्यांनी साफ़ उडवून टाकलेलं! ते आजतागायत पुन्हा तिथे बांधलेलं नाही. फ़ार आश्चर्य वाटतं याचं.
पावसाळ्यापूर्वी याच झाडावर बगळ्यांच्या जातकुळीतलं एक जोडपं अवतरलं. मानेवर बारीक लांब तुरा...एका पुस्तकात याचं नाव pond heron असे वाचले. छानसं घरटं बांधुन आपली वंशपरंपरा वाढवण्याची तयारी सुरु झाली. आम्हालाही उत्सुकता वाटली पिल्लांच्या जन्माची. आणि थोड्याच दिवसांत घरट्यातोन थोडी हालचाल व बारीक शिट्टीसारखे आवाज येऊ लागले. नंतर तीन छोट्या चोचींचा आ वासलेला दिसू लागला! दोघांपैकी एक आसपास राहून पिल्लांचं रक्षण करी. दुसरी बहुतेक मादी तोंडातून छोटे मासे,आणि चक्क बेडकांची पिल्ले आणुन भरवू लागली. हळूहळू घरट्यात तीन पांढरे लोकरीचे गुंडे दिसु लागले. सारखा क्वॅक क्वॅक आवाज आणि आ वासून सारखी खाऊची प्रतिक्षा! मग जवळच्या फ़ांद्यांवर उड्या मारण्याचा सराव सुरु झाला. दुसरा एखादा पक्षी आला की तिघे एकमेकांना बिलगुन बसायचे.किती विलोभनिय दृश्य दिसायचे ते! कालांतराने संपूर्ण कुटुंबाने स्थलांतर केले. आठवणी मागे ठेऊन...
आता थोडं पिलाजीरावांबद्दल! मैने एवढा आकार, पिवळा धम्मक रंग, पंखांवर थोडी काळ्यारंगाची फ़टकार.चोचही गडद पिवळी. निसर्गाचा देखणा आविष्कार! त्याचं नामकारण आम्ही 'पिलाजीराव' असे केले. पानांत लपलेले कीडे,अळ्या हे त्याचं खाद्य असावं. तोंडाने फ़ुर्र फ़ुर्र असा आवाज काढत संचार चालायचा. उन्हं उतरल्यावर गॅलरीच्या ग्रिलजवळ असलेल्या अशोकाच्या फ़ांदीवर निद्रादेवीची आराधना करायचा.हिरव्यागार पानांत एखादं पिवळं पान दिसावं असं वाटायचं. एक डोळा असुरक्षेच्या भावनेपोटी आमच्या कडे. मग त्याचे आगमन झालं की स्लायडींग बंद करायचो. आणि छोटीशी फ़ट ठेऊन त्याला बघायचो. तोही निर्धास्तपणे डोळे मिटायचा.आता अशोकाच्या फ़ांद्या छाटल्यावर त्याने आरामाची जागा बदलली.आता दिवसा कधीतरी त्याचे ओझरते दर्शन घडते!
वृक्ष, वेली, पक्षी,हे सर्व निसर्गाचंच रूप.मग त्यात शुभ-अशुभ का मानायचे? असे मला नेहमी वाटते.एकदा पुणे university campus मधे जाण्याचा योग आला. तिथल्या गेस्ट हाऊस मधे राहण्याचा योग आला. रात्री जेवण झाल्यावर पाय मोकळे करायला बाहेर पडलो. आजुबाजुला घनदाट झाडी..आणि त्या हिरव्या काळोखातून घुबडासारखा दिसणारा पण आकाराने बराच लहान असा पक्षी अगदी भेटायला आल्यासारखा कुंपणावर येऊन बसला. सगळे म्हणाले त्याच्याकडे न बघता पूढे चला. पण मी रेंगाळून त्याचे निरिक्षण केले.आणि हळूच त्याला bye करुन मगच पुढे गेले!
मागे एकदा सकळी सकाळी कावळ्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी भले मोठे घुबड चक्क हॉलमधल्या पंख्यावर येऊन बसले होते. चॉकलेटी रंगाचे,गोल मोठ्या डोळ्यांचे..अचानक हॉलमधे गेले तर अगदी माणसांसारखे मान वळवून पाहिले आणि घाबरून उडुन गेले.पण मला काही त्यात अशुभ वगैरे वाटले नाही. तेही एक निसर्गाचे रूपच ना?
सरतेशेवटी पक्ष्यांच्या गंधर्वांविषयी. आमच्या परिसरात पंचम[?] स्वरात गाणा-या कोकिळांची संख्या फ़ार वाढली आहे. पूर्वी फ़क्त वसंत ऋतुत सुरेल कुहु कुहु कानावर पडे. कोकिळ दृष्टीस पडणं फ़ारच दुरापास्त असे. आजकाल कोकिळ आणि कोकिळा अगदी कावळ्यांसारख्या सहज दर्शन देतात. बेडरूमच्या शेजारी असणा-या मादी अशोक वृक्षाला मोहर येऊन हिरव्या छोट्या फ़ळांचे घोस येतात. काही काळाने ही फ़ळे करवंदासारखी काळी होतात. ही फ़ळे कोकिळ कोकिळा दिवसभर गट्टं करतात. [रात्री त्यातील बिया साफ़सुफ़ होऊन टपटप पडल्याचा आवाज होतो.] हल्ली या गंधर्वांना स्थळकाळाचे भान नाही राहिलेले! कोणत्याही ऋतुत कूजन[?] करतात. आजकालच्या मानवनिर्मित गोंगाटाचा त्यांच्यावरही परिणाम झाला आहे की काय न कळे. कोकिळा कर्कश्य ओरडतात.आणि कोकिळ कूजनही कानांना ओरखडे काढणारे वाटते. संगीतातल्या घराण्यांचा आदर बाळ्गूनही असे वाटते की यांनी आपले किराणा घराणॆ बदलून आग्रा घराणे स्विकारलेले दिसते! पहाटे तर समुहगान करून साखरझोपेचे खोबरे करतात ही मंडळी! हे ही निसर्गाचंच रूप..
असे अनेक क्षण अगदी घर बसल्या पक्ष्यांना न्याहाळण्यात अगदी रंगीन झाले आहे. म्हणुन घराभोवतीचा या हिरव्यागार वृक्षांचा पसारा आणि त्यावर येणारी ही मंडळी सखेसोयरेच भासतात!

गुलमोहर: 

मस्त लिहिलय !! अगदी बालभारतीच्या पुस्तकातला धडा वाचल्यासारखं वाटलं.. Happy
लिहीत रहा...

छान लिहिलं आहेस Happy
'पिलाजीरावांचा' शोध आपल्याला कसा लागला ते आठवतंय का ? साईडच्या पाईपावरुन उंदीर यायच्या भितीने संध्याकाळनंतर आपण ते स्लाईडिंग बंदच करुन घ्यायचो. म्हणूनच फांदी ग्रिलच्या इतकी जवळ असूनही त्याने ती बसण्यासाठी निवडली होती कदाचित. पण एकदा दिवाळीच्या दिवसांत आपण त्या ग्रिलला उघडमीट होणारे दिवे लावले होते आणि रात्रीही स्लाईडिंग विंडो उघडीच ठेवली होती तेव्हा त्या दिव्यांच्या प्रकाशात आपल्याला त्या पिवळ्या पक्ष्याचा शोध लागला. अंधार पडल्यामुळे त्याला उडूनही जाता आलं नाही. तसाच बसून राहिला चुळबुळत ! त्यानंतर मात्र त्याला त्रास होणार नाही ह्याची आपण काळजी घेऊ लागलो. त्यालाही खात्रीच होती आपल्याबद्दल म्हणून आपली चाहूल लागली तरी त्याने बसण्याची जागा बदलली नाही.

मस्त लिहिलय. ती अशोकाची झाडे वगैरे पाहिली असल्याने डोळ्यासमोर आली Happy

आमच्या घरातूनही एक मोठे जांभळाचे झाड दिसत असे. जांभळं लगडली की पक्ष्यांचं get together तिथे. पोपट तर असंख्य येत.
त्याच्या बाजूच्याच झाडांवर बगळ्यांची अक्खी वसाहत होती.

लिहित रहा.

धन्यवाद झेलम. हो गं. मलाही आठवलं.. संध्याकाळी तुमच्या शेजारच्या झाडावर बगळ्यांचं लँडींग Happy सुरु व्हायचं!