उन्हाळ्यात करायचो तरी काय?

Submitted by नविना on 25 June, 2010 - 12:24

इतक्यातल्या इतक्यात बरेच लेख वाचतेय माझं आजोळ, माझं गाव, आजीचा वाडा न काय न काय.
मला तर काही केल्या आठवत नाही मी काय विशेष करायची लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत. म्हणजे विदर्भातल्या उन्हाळ्यात जे जे करण्यासारखं असेल ते सगळं बहुतेक. पण असं महिनोनमहिने आजोळी वगैरे कधीच नाही गेलो आम्ही म्हणून हेवा वगैरे वाटतो मला. लहानपणी तर हेवा म्हणजे काय हे पण नसेल कळत.

आमचं आजोळ पण विदर्भातल्या अतिशय संतापी भागात. तिथे सकाळी ९ वाजल्यानंतर फारसं कोणी बाहेर पण निघायला नाही बघायचं. आजोबांची शेती मोठी पण घरापासून इतकी लांब की तिकडे जाणं म्हणजे बैलगाडीशिवाय पर्याय नाही. गावातली एकच एक नदी ती पण वर्षातले १० महिने कोरडीच. नाही म्हणायला २ महिने तिचा नाला व्हायचा पण आम्ही पावसाळ्यात कधीच गेलो नाही तिकडे त्यामुळे ते पाणी बघणं कधीच नशिबात नव्हतं. त्यातही आजोळची परिस्थिती म्हणजे कुटुंब खाउन पिउन सुखी, पाहुणे आलेत तरी पाहुणेच बनून यावेत असं होतं. त्यामुळेच की काय आमच्या आई बाबानी पण कधीच तिकडे जाऊन खूप दिवस राहू असं म्हटलं नाही. आईची इच्छा म्हणून दर वर्षी एक चक्कर व्हायची. कधी उन्हाळ्यात कधी दिवाळीत, पण ती पण आजोबांच्या कडचा शेतीचा रागरंग बघूनच ठरवली जायची. ६ वी -७वी नंतर तर मला नाही आठवत आम्ही कधी तिथे ५-७ दिवस पण लागून राहिलो असू कारण पाउसच नाही त्यामुळे पाणी अजिबातच नसायचं. आजच्या घडीला सुद्धा हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आजोळ आणि तिथली सुट्टी फक्त पुस्तकात वाचण्याचेच विषय होते आमच्यासाठी.

इकडे बाबांच्या कडे पण आजी आजोबा कुठल्या ना कुठल्या मुला कडेच असत. सगळेच नोकरीवाले, त्यामुळे कोणाकडे किती दिवस रहायचं हा प्रश्नं असायचाच. आजी-आजोबांचं काही घर नव्हतं वेगळं, ना काही शेतीवाडी.
म्हणून शेतात भटकणे वगैरे नाहीच. कुठे गेलो तरी आपलं, घरीच पत्ते खेळा, जवळपास काही बाग वगैरे असेल तर जा, तेव्हा बागापण फक्त नागपुरात गेलो तरच होत्या. एका काकांच्या गावाला बाग होती ती पण काकांच्या घरापासून इतकी लांब की तिथे जायलाच फार वेळ आणि पैसे लागतात, आणि परत येण्यासाठी ऑटो मिळेलच याची गॅरंटी नाही म्हणुन कोणीच नेत नसे. सगळं खाणं पिणं अगदी भेळ पाणीपुरी सुद्धा, घरीच केली जायची. तेही घराच्या गच्चीवर रात्रीचे ७.३० वाजल्यानंतरच, कारण तोवर वर जाण्याची परवानगीच नसायची. उन लागेल अशी भिती आणि ते लागायचं सुद्धा.

आमच्या स्वतःच्या गावी मात्र छान वाटायचं. आमचं घर कौलारू होतं त्यामुळे उन्हाळ्यात थंड राहात असे. तेव्हा तिथल्या लायब्ररीत जायला परवानगी असायची पण संध्याकाळीच. पावसाळ्यात भरपूर पाउस पडायचा, त्यामुळे कधीच पाण्याचं दुर्भीक्ष पाहिलेलं मला आठवत नाही. उन्हाळ्यात सुद्धा दिवसातून अगदी दोन वेळा नळ येतील इतकं पाणी असायचं नदीला (विदर्भातलं गाव असून सुद्धा!! आश्चर्य वाटतं मला कधीकधी ह्या गोष्टीचं अजूनही!!). आई सोडुन घरचे सगळेच गोडखाऊ त्यामुळे दररोज आंब्याचा रस हा व्हायचाच. सोबत दररोज, एकदातरी गुळांबा, साखरांबा आणि पोळी असं व्हायचं. त्याच्यावर तूप किंवा साय ठरलेली. लहान गाव होतं त्यामुळे दुधवाला सुद्धा छान घट्ट दुध देत असे. त्यामुळे साय साखर खाणे हा आवडता उद्योग होता. दिवसभर खाणे, जमल्यास कूलर लावून झोपणे, उठल्यावर पत्ते आणि कॅरम खेळणे, सन्ध्याकाळी ऊन उतरलं म्हणजे ५ वाजल्यानंतरही आईला थंड वाटल्यास बाहेर खेळणे. मला तर खरच काय काय खेळ खेळायचोना तेपण नाही आठवत. साखळीदंडा, विशामृत वगैरे होतं, अबाधुबी का अबाधाबी कायतरी होतं, आणि लगोरी होती बहुतेक आमच्याकडे पण नाही आठवत खूप खेळल्याचं मला ते पण. आणि लहान असताता खूप बाहुल्या होत्या आमच्याकडे ते आठवतंय आणि आमच्या अंगणात तिचं घर पण बांधलं होतं आम्ही. संध्याकाळी टीव्ही वर काही बघण्यासारखं असल्यास बघणे नाहीतर बाबा घरी आले की पुन्हा एकदा कॅरम चे डाव. बस दिवस संपला. गोष्टं वगैरे सांगणं असं कामं आई फारच क्वचित करायची. लायब्ररीतून आणलेलं पुस्तक मात्र वाचायची ती आणि आमच्या वाचण्यासारखं असेल तर आम्हाला वाचू पण द्यायची. आमच्यासाठी काही स्पेशल पुस्तकं आणले जायचे, पण त्या लहान गावातल्या लायब्ररीत मिळ्तील तेवढेच, बाकी सगळे चंपक वाचायचे आणि काही अजून गोष्टीची पुस्तकं. आमच्या कडे इतके चंपक जमले होते, की माझ्या बाबानी मी इंजीनीयरींगला गेल्यावर ते सगळे एकत्र बाईंड करून घेतले तेव्हा त्याचे सगळे मिळून ६-७ पुस्तकं झालीत, प्रत्येकी २०० पानं. मग त्यानी घरच्या घरी फुकट लायब्ररी सुद्धा चालवली, पण मग लोकानी नेलेलं पुस्तक जेव्हा एकदा फाडून आणलं तेव्हापासून त्यांनी मग ते बंद केलं. पुढे मग ईंजीनीयरींग फायनलला असताना आम्ही गाव सोडलं. शहरात रहायला आलो. आम्ही म्हणजे, आई बाबाच फक्त. आम्ही तर तेव्हापासून घरी राहिलोच नाही. सारखं आपलं होस्टेल. त्यामुळेच की काय आजही घर अगदी स्वप्नात जरी आठवलं तरी मला तेच जुनं घर आठवतं. नवीन शहरातलं घर नाहीच. मी अजूनही त्याच अंगणात खेळते. आमच्याच अंगणात. आजोळ वगैरे आठवत नसल्याचं दु:खं वाटून न घेता.

गुलमोहर: 

छान ! Happy

वा...............माझं पण बालपण आठवलं.... तु पण विदर्भातली... मी पन....

हेच अगदी आम्ही मुबईकर त्यामुळे कि आम्हाला गाव नाही जो काहि जमिन-जुमला आहे तो ईथलाच.
आजोबा मुबईचे, आजीआणि मम्मी पण इथलीच. त्यामुळे आम्ही स्वतःच गाव काय असत हे कधी पाहिल नाही. एकदा कधी लहानपणी आत्याच्या गावी कुर्‍हाड ला गेलेल मला आठवतय पण ते तेवढ्यापुरतेच. मला वाटल चला स्वत:च नाही पण नवर्‍याच्या गावाला तरी मनसोक्त नान्दता येईल पण माझ गाव प्रेम शेवटी अपुर्णच राहील कारण ह्याना ही गाव नाही आहे.
माहीत नाही ह्या जन्मी माझ गाव प्रेम पुर्ण होईल का ते??????
एक अपुर्ण आशा आहे ही पुर्ण कधी होईल माहीत नाही.
अवघी दुनिया फिरुन पुर्ण होईल माझी आता. पण स्वतःच हक्काच गाव अस कोणत आता सान्गता येणार नाही.

मस्त!!! त्या वातावरणाच्या पण आठवणी आहेतच की तुझ्याकडे..आपल्याला "काय करायचो तरी काय उन्हाळ्यात?" असं आता वाटलं तरी आठवणी गाठीशी बांधल्या जातातच कशाही Happy