ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग ३

Submitted by अर्धवट on 25 June, 2010 - 02:51

पूर्वसुत्र - भाग १
पूर्वसुत्र - भाग २

माझ्या त्यापुढच्या मुक्कामामधे असे बरेच राजकीय पैलू आढळत गेले. माझ्या उत्सुकतेपोटी (पक्षी आगावपणामुळे) एखादा शब्द बोलला गेला त्या देशाच्या कुठल्याही परीस्थितीवर, की लोक भरभरुन बोलत रहायचे, कित्येक संदर्भ नवीन उलगडत जायचे, पण चुकूनही कोणी उपहासाने हसले नाही की रागावले नाही. माझ्या भक्तांपैकी काहीजण मागच्या निवडणुकीच्या वेळेला आंदोलनात भाग घेतलेलेही होते. सध्याच्या राष्ट्राध्यक्षानी निवडणुकीत बळाचा वापर करुन विजय मिळवल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यानंतर बराच राडा झाला होता, आंदोलनात ७० -७५ जण मरण पावले, माझ्या निरीक्षणानुसार ह्यात तथ्य असु शकेल कारण मला भेटलेल्या आंदोलनकर्त्यांपैकी कुणीच रिकामटेकडे नव्हते. (सगळे जण लठ्ठ पगारावर उच्चपदसस्थ होते, तरिही कळवळून बोलत होते.. जरा दुर्मीळच असे दृश्य)
ईराणमधे कुणीही नागरीक राष्ट्राध्यक्ष्याच्या निवडणुकीला उभे राहु शकतो फक्त त्यासाठी त्याला ईमाम व मौलवींच्या धार्मीक समितीची मान्यता घ्यावी लागते (आणि ती फक्त त्यांच्याशी एकनिष्ठ राजकारण करणार्‍यानाच मिळते ).
मला भेटलेल्या कुणालाही सध्या अमेरीकेशी चालू असलेल्या भांडणात रस दिसला नाही. अमेरीकेबरोबर भांडण लवकर संपवावे जेणेकरून आर्थिक व ईतर निर्बंध संपतील असाच सूर दिसला. ईराणचा अणुकार्यक्रम फक्त उर्जाउत्त्पादनासाठी आहे हे त्यांच्या सरकारचे मत मात्र पटत नाही. मी ज्या कंपनीत गेलो होतो तीच देशाच्या गरजेपैकी ८३% वीज बनवत होती - सगळीच्या सगळी तेलापासुन. आणि ईतके मुबलक तेल उपलब्ध असताना ईराण अणुउर्जेकडे वळेल हे असंभवनीय. पण ईराण ओपेक मधला दुसर्‍या क्रमांकाचा तेल ओकणारा देश आहे हे लक्षात घेतलेत तर अमेरीकेचे ह्या देशाबद्दलचे चालू व भविष्यातील राजकारण समजायला हरकत नाही.(सध्याचे तेलाचे भाव पेट्रोल ५ लिटर/१ डॉलर व डिझेल ६० लिटर/१ डॉलर)

४-५ दिवस रोज प्रवचन संपल्यावर मी सतत कुणा ना कुणा बरोबर भटकत होतो शहरामध्ये. वाह्तुककोंडी ची परीस्थिती जगातल्या कुठ्ल्याही मोठ्या शहराप्रमाणेच चांगली किंवा वाईट आहे. अमेरीकेबरोबर वाकडे असल्याने अमेरिकन गाड्या दिसतच नाहीत. मोजक्या जपानी गाड्या दिसतात पण जवळजवळ ९०% गाड्या फ्रेंच बनावटीच्या, प्युजोट कंपनीच्या आहेत. वाहतुकीचा सर्वात मोठा विशेष म्हणजे गाडी जर एकमेकाला ठोकली तरच हॉर्न वाजवतात. (कदाचीत ठोकल्यावर तो चालू आहे का हे बघायलाही वाजवत असावेत).ही अजीबात अतिशयोक्ती नाहीये. एके दिवशी प्रवचन संपल्यावर हॉटेलवर जाताना जरा डोळा लागला. काही क्षणाने जाग आल्यावर मी दचकलोच, आम्ही ट्रॅफीकजॅम मधे अडकलो होतो, मागे पुढे हजारो गाड्या होत्या पण स्मशान शांतता.
भारतीय बनावटीची एकाच प्रकारची दुचाकी दिसली - बजाज पल्सर. काही जणांनी मला 'ठाठा' च्या US$२००० कार बद्दल विचारले (मी लगेच त्याच कंपनीने जग्वार व लँडरोव्हर विकत घेतलिये हे सांगुन ह्या तीनही कंपन्या माझ्याच बापाच्या असल्यासारखा भाव मारला)

ईराणची मुख्य निर्यात तीन गोष्टीत संपते - तेल, गालिचे व पिस्ते. मला फक्त ईराणी गालिचे व पिस्ते ह्याविशयीच लिहिणे भाग आहे ( कारण तेलावर डोळा ठेउन अमेरिकेला कांपीटीशान केल्यास ख्योळ खलास व्हायचा)
ईराणी कार्पेट्स हा एक अतीसुंदर प्रकार आहे, तलम, मखमली, गुबगुबीत, रेशमी, नक्षिदार्, रंगीबेरंगी नानावीध प्रकार बघायला खरच डोळे पुरे पडत नाहीत. अनंत प्रकारची कलाकुसर, कुराणातले प्रसंग, आणि सगळ्यावर कडी म्हणुन शेवटी त्याने मला पर्शियन सौंदर्यवतीचे चित्र असलेला रेशमी गालीचा दाखवला, भिंतीवर लावायचा, आपण खलास.. (तेवढी किंमत विचारण्यापुर्वी तुमच्या बुडाखाली गुबगुबीत गालिचा आहे याची खात्री करुन घ्या, पडलात तर कं ज ना. )

जेवढ्या प्रकारचे गालिचे तेवढ्याच असंख्य प्रकारचे पिस्ते, पिस्त्यामधे पण फ्लेवर्स असतात ह्या वाक्याचा अर्थ समजायलाच १० मिनिटे लागली (मला बापड्याला पिस्ता हा एकच फ्लेवर माहीती होता )

क्रमशः

गुलमोहर: 

अरे वा.. मस्त आहेत तिन्ही भाग.. ह्या देशात हिंडायची फार उत्सुकता आहे.. कट्टर मुस्लिम राजवट, सहिष्णु लोक, तंत्रज्ञानात प्रगत, जगातील एकमेव शिया देश (दुसरी शिया बहुसंख्य जनता लेबेनॉनमध्ये) त्यामुळे इतर मुस्लिम राष्ट्रांशी फटकूनच, त्याचबरोबर अमेरिकेशी जोरदार वाकडे (हे अयातोल्ला खोमेनीपासून कारण तेव्हाच्या शहाला अमेरिकेने प्रचंड मदत केली त्याच्या सर्व कृष्णकृत्यांवर पांघरुण घालून).. सगळेच अजब मिक्स आहे..

हा पण भाग चांगला जमलाय. (पण भाग छोटे छोटे आहेत.) ओले पिस्ते खायला मिळले कि नाहीत ?
ते व्हीसा प्रकरण पण लिहायच आहे.

प्रत्यक्ष जाउन आल्यासारख वाटतय पर्शियाला. मी पण प्रवचने करतो. सांगा काहीतरी ट्रीक तिकडे जायची.