मला भावलेला 'तो' किंवा 'ती' ....

Submitted by राधा कुलकर्णी on 23 June, 2010 - 06:24

( माबो वर मी नविन असल्यामुळे हा लेख मी आधी "वाचू आनंदे" ह्या ग्रुप मध्ये टाकला होता. पण काही जणांना ह्या लेखनाचा धागा तिथे सापडत नाहीये. म्हणून हा लेख "गुलमोहोर" ह्या सदरात टाकला.
पण अ‍ॅड्मिनच्या म्हणण्यानुसार हा लेख "वाचू आनंदे" ह्या ग्रुप मध्येच योग्य होता. अ‍ॅड्मिननी केलेल्या विनंतीला मान देऊन मी हा लेख परत "वाचू आनंदे" ह्या ग्रुप मध्ये टाकत आहे. तसेच, माझ्या लेखावर ज्यांनी आधी प्रतिसाद दिले आहेत, ते पण तेथे चिटकवले आहेत. तरी ह्या लेखाकरता http://www.maayboli.com/node/17221 येथे टिचकी मारावी. "वाचू आनंदे" ह्या ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर हा लेख वाचता येऊ शकेल आणि प्रतिसाददेखील देता येतील. )

मला भावलेला 'तो' किंवा 'ती' ....

नमस्कार ! Happy
माझा हा मायबोलीवरचा पहिलाच प्रवेश. इतक्यातल्या इतक्यात अमोल कडून मायबोली बद्दल, मायबोलीकरांबद्दल खुप काही ऐकलं, खुप काही वाचलं.

जेंव्हापासून ऑफिस, घर आणि सियोना (माझी दिड वर्षाची मुलगी) ह्या सगळ्यांमध्ये अडकलीये, अवांतर वाचनच खुंटलय. मग मध्येच कधीतरी आठवतं, 'अरे खुप दिवस झाले, काही छान वाचलचं नाहीये.' पण आता असं वाटतयं, इथे नक्कीच काहीतरी छान वाचायला मिळेल, मस्त चर्चा रंगतील आणि माझ्या सध्याच्या रुटीन मध्ये, माझ हरवलेलं मराठी जग मला परत मिळेल.

अमोलनीच सुचवलं, नुसतं मायबोली वर सभासद होण्यापेक्षा काहीतरी लिहीत जा, एखादा विषय निवड आणि एक 'बाफ' सुरु कर. थोडा विचार केल्यानंतर क्लिक झालं, जर तुम्ही सगळे एवढं सुंदर लिहीता, इथे विषय ज्या पध्दतीने मांडता, त्या वरच्या चर्चा रंगतात ..... त्याचा अर्थ तुम्ही प्रत्येकानी खुप काही वाचलं असणार.

मग आपण असं करु या ना, प्रत्येकालाच कुठलं ना कुठलं तरी पुस्तक खूप आवडतं असणार, तसचं त्या पुस्तकात उतरवलेली एखादी व्यक्तिरेखाही भावलेली असणार, त्या व्यक्तिरेखेबद्दल काहीतरी मतं बनलं असणार ..... मग तीच इथे मांडूया ना. आणि मग रंगवूया आपल्या गप्पा.

मज्जा will come ! Wink

गुलमोहर: 

मीच नांदी करते. Happy

पुस्तक : महाभारत
व्यक्तिरेखा : दुर्योधन

मुळात, दुर्योधन ही माझी आवडती व्यक्तिरेखा नाही.
पण, त्याच्या खलनायक भुमिकेमागचा एक विचार येथे मांडत आहे.
तो का असा झाला असावा ह्यामगची मला वाटलेली थोडक्यात कारणमिमांसा.

कधीही मला एखाद्या व्यक्तिरेखेबद्द्ल लिहावं किंवा बोलावसं वाटलं ना की, कुणास ठाऊक मला पटकन 'दुर्योधन' ही व्यक्तिरेखा डोक्यात येते. त्याचा अर्थ असा नाही की ती माझी आवडती व्यक्तिरेखा आहे. पण असं वाटतं, व्यासांनी दाखवलेल्या दुर्योधनाला थोड्या वेगळ्या विचारधारेतून बघावं. व्यासांना तो खलनायकचं भासवायचा होता म्हणून त्यांनी त्याची काळी प्रतिमाच रेखाटली. पण आपण जसं म्हणतो, प्रत्येक माणूस जसा पूर्ण पांढरा नाही तसा तो पूर्ण काळाही नाही. दोन्ही छटा प्रत्येक माणसात असतातच. मग दुर्योधनाची काळीच छटा का बघायची?

'दुर्योधन' - धृतराष्ट्र आणि गांधारी ह्या आंधळ्या जोडप्याचं पहिलं वहिलं मूल. एकाला जन्मजात अंधत्व प्राप्त तर एकानी ते नवर्याच्या प्रेमापायी पत्करलेलं. नीट विचार केला तर मला असं वाटतं, दुर्योधनाच्या काळ्या छटेचा जन्म गांधारीने पत्करलेल्या तीच्या काळ्या जगापासूनच झाला. मूलाला संस्कार देण्याचं, त्याच्यामध्ये चांगूलपणाचं बीज पेर्ण्याच काम मूलतः त्याची आई करत असते. पण गांधारीने पतीप्रेमापायी डोळ्यावर पट्टी बांधून स्वतःच्या जगात अंधार ओढवून घेतला. असा त्याग करण्यासाठी खूप मोठं धाडस हवं हे खरं, पण तीनी तीच्या ह्या कर्तव्यापुढे तीचं आई असण्याचं कर्तव्याला दुय्यम स्थान दिलं. स्वतःच्या ह्या व्यंगामुळे तीने आपल्या मुलाचं आयुष्य शकुनी सारख्या कपटी भावाच्या हातात दिलं. तीला आपला भाऊ कसा आहे हे माहित नसावं ??? मग आपल्या मुलाचं भवितव्य एका कपटी माणसाच्या हातात देण्याइतकी ती का आगतिक व्हावी. एखाद्या मुलाला छल कपटाचं बाळकडू मिळाल्यानंतर त्याचा चांगला माणूस कसा बनू शकेल ??? म्हणून मला असं वाटतं, गांधारी ही एक चांगली पत्नी होती, पण ती चांगली माता बनू शकली नाही.

दुर्योधनाचे बालपण त्याच्या इतर भावांबरोबर क्षात्रिय धर्माला आवश्यक अश्या विद्या प्राप्त करण्यात गेलं. पांडव आणि कौरवां मधला मी-तू भाव जेवढा कौरवांमध्ये होता, तितकाच तो पांडवांमध्येही होता. आपण बलशाली असल्याचा भीमाचा गर्व, आपल्यासारखा कोणीही धनुर्धर नसावा या इर्षेनी पेटलेला अर्जुन याही त्यांच्या काळ्या छटाच ना. फक्त व्यासांनी त्या पांढर्या भासवल्या. दुर्योधनही त्यांच्याच तोडीचा क्षत्रिय, फक्त फरक एवढाच, पांडवांची आई ही 'आई' होती त्यामुळे त्यांच्यावर तीचा जरब होता. दुर्योधनाची आई ही आगतिक आई होती आणि तो शकुनी बरोबर वाहवत होता. दुर्योधनाने ही कधी पांडवात सामिल होण्याचा प्रयत्न केला नाही आणि पांडवानी ही कधी त्याला आपला मानला नाही. आणि इथेच वैराच बीजं पेरलं गेलं.

दुर्योधन जसा मोठा होत गेला, त्याचबरोबर त्याच्या मनातला पांडवांबद्दल असलेला तिटकाराही. आधीची मी-तू पणाची भावना वेगवेगळ्या कारस्थानांच्या रुपानी डोकं वर काढू लागली. त्यातच पांडवांनी आरंभलेला 'राजसूय' यज्ञ आगीत तेल ओतून गेला. या यज्ञाचा मान फक्त सम्राटालाच. हस्तिनापूरचा मूळ राजा धृतराष्ट्रच. पण त्याच्या अंधत्वामूळे ते सम्राटपद पंडू राजाकडे गेलं. त्यामूळे तर्कदृष्ट्या ते पद भुषविण्याचा मान दुर्योधनाचा. पण ते पिढीजात असल्यामुळे पांडवांकडे चालून गेले. इथेच दुर्योधनाचा अहंकार डिवचला गेला. क्षत्रियच तो, अहंकारावर झालेला हल्ला कसा पचविणार ? म्हणूनच ह्या यज्ञाला प्रतिउत्तर असा त्याने 'वैष्णव' यज्ञाचा घाट घातला. पांडवांना निमंत्रण पाठवलं, पांडवांनी ते उन्मत्त्पणे नाकारलं. अजुन एक हल्ला ..... मग द्युतसभा, छलकपट, द्रौपदी वस्त्रहरण ..... ह्या सगळ्याचे सूत्रधार दुर्योधन आणि कर्ण ठरले. आणि व्यासांनी परत एकदा दुर्योधनाची काळी छटा दाखवली. पण स्वतःला धर्मनिष्ठ म्हणवणारा युधिष्ठिर, द्रौपदीला एका वस्तू प्रमाणे द्युताच्या पटावर लावताना स्वतःला का थांबवू शकला नाही ? आणि इतर पांडवही का लाचार बनले ? ही कोणती छटा ???

ज्याप्रमाणे दुर्योधनाने कर्णाला 'अंगद' च राज्यपद दिलं आणि एक मैत्रीचं नातं निर्माण केलं. अशा प्रकारे पांडवांनी कुठल्याही हिन कुळातील पण कुवत असलेल्या व्यक्तिला स्वतःसारखाच दर्जा दिल्याचा उल्लेख महाभारतात आढळत नसावा. मग दुर्योधनाच्या या गुणांची प्रशंसा का करु नये ?

विचार केला तर असं लक्षात येतं, जरी दुर्योधनाला मिळालेलं बाळकडू कपटाचं होतं, तरी समजता झाल्यावर, आजूबाजूला भिष्म, विदूर ह्यांच्यासारखे चारित्र्याची मूर्तीमंत उदाहरणं बघून तो स्वतःला बदलवू शकला असता. पण त्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची इच्छाही नव्हती आणि त्याच्यामध्ये ती क्षमताही नव्हती. 'कावेबाज' हाच त्याचा धर्म बनला होता. आणि त्यावर .....
' जानामि धर्मं न च मे प्रवृति: | जानामि अधर्मं न च मे निवृति: | '
( मी धर्म जाणतो, पण तो माझा स्वभाव नाही. आणि मी अधर्म ही जाणतो, पण त्यापासून परावृत्त होऊ शकत नाही. ) असेही भाष्य करुन जातो.
मग परत प्रश्न पडतो, स्वतःच्या वाईट प्रवृत्तीचा बेधडक स्विकार करणारा दुर्योधन परवडला का स्वतःला धर्मनिष्ठ, समतोल बुध्दीचा म्हणवणारा आणि जुगाराच्या पटावर वाहवत जाऊन पत्नीला डावावर लावणारा ' धर्मराज ' युधिष्ठिर बरा ???

सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार करताना, एक कुणकुण सतत मनात राहते, या संपूर्ण महाभारताचा साक्षीदार, सर्वज्ञ, पापी लोकांचा उद्धार करु शकला नसता का ???

( सदर लेखात मांडलेली मतं ही बरोबरच असतील असं नाही, काही माहिती अपूरी किंवा चूकीची सुद्ध असू शकेल. No Hard Feelings. )

प्रतिसाद मंजिरी सोमण | 23 June, 2010 - 12:58

राधे, छान लेख यावर बरंच काही बोललं जाऊ शकतं...
कॉलेजमधे असताना आम्ही सुद्धा तासनतास दुर्योधनावर चर्चा करायचो. त्यावेळी असेच दोन्ही बाजूंनी खूप विचार मांडले गेले होते.
सर्वात पहिलं म्हणजे, दुर्योधन पांडवांना ते 'पांडव' आहेत हे मानायलाच तयार नव्हता.... ते नियोग पद्धतीने झालेले, मंत्रसामर्थ्याने जन्माला आलेले म्हणूनच कुरुवंशज नाहीत असं ठाम मत घेऊन तो जगला. पण मग तसंच पाहायला गेलं तर तो आणि त्याची ९९ भावंडं ही आजच्या 'टेस्ट ट्यूब' पद्धतीने जन्माला आली होती आणि ती सुद्धा व्यासांच्या आशिर्वादाने. यातच अजून मागे जायचं तर, मुळात धृतराष्ट्र, पंडु, आणि विदूर हे तिघे सुद्धा व्यासांच्या 'आशिर्वादाने' अंबा, अंबिका, आणि एक दासी यांना झालेले होते. म्हणजे, खरा कुरु वंशज, जो शेवटचाच ठरला तो होता भीष्म...

पांडव आणि कौरवांचा बालपणीचा काळ बघता जसं दुर्योधनाला तू-मी ला सामोरं जावं लागलं त्याच्या कितीतरी पटींनी छळ-कपटाचा आणि विषप्रयोगाचा बळी ठरले पांडव. राजसूय यज्ञाच्याही खूप आधी लाक्षागृहाच्या कपटाला आपल्याला विसरून चालणार नाही.

कर्णासारख्या कुवत असलेल्या पण हीन कुळात वाढत असलेल्या तेजस्वी क्षत्रियाला त्याने आपल्या बरोबरीने स्थान दिले कारण पांडवांना हरवू शकेल असा एकही योद्धा कौरवांमधे नाही हे तो जाणून होता आणि कर्णा बरोबरच्या मैत्रीत असा स्वार्थाचा वास होता.

एकंदर व्यक्तिरेखा पाहता, कुठल्याच मुद्द्याने, त्याची थोडीफार पांढरी बाजूचे पारडे जड होत नाही. व्यासांनी तो जसा होता तसा रेखाटला, त्याची काळी प्रतिमा लोकांसमोर ठेवावी म्हणून नाही...... असं मला वाटतं. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी पांडवांना जरी कुठल्याच पद्धतीने क्षमा नसली तरी (जी द्रौपदीने कधी केली ही नाही) रज:स्वला स्थितीतल्या सावत्र का होईना,भावाच्या बायकोला भरसभेत खेचून आणण्याची आज्ञा देणारा आणि तिला आपली मांडी उघडी करून दाखवणारा निदान मला तरी माणूस वाटत नाही.

असे बरेच मुद्दे आहेत........

माझी आवडती व्यक्तिरेखा म्हणजे 'कृष्ण'..... त्याबद्दल विचार करून लिहावं लागेल. लिहिनच यथावकाश

प्रतिसाद arc | 23 June, 2010 - 13:12

"चौघीजणी" " little women" मधला Lorry , माझा टीनएज क्रश होता हा!!
another teenage crush ,ययातीतला कच.

प्रतिसाद कविता नवरे | 23 June, 2010 - 13:16

राधा दुर्योधना बद्दलची तुझी मतं पुर्ण पटली नाहीत तरिही तुझी विषय मांडण्याची पद्धत आवडली.

मंजे आता तू लिही ग कृष्णा बद्दल. मला बर्‍याच शंका कुशंका आहेत त्याबद्दल. आणि इथे मांडून विषय भलतीकडे नेण्याची इच्छा नाही आहे.

प्रतिसाद राधा कुलकर्णी | 23 June, 2010 - 13:32

धन्यवाद मिनल, इथे मंजिरी

मंजिरी, मुळात दुर्योधन ही माझी आवडती व्यक्तिरेखा नाही.

पण, त्याच्या खलनायक भुमिकेमागचा एक विचार मांडला. तो का असा झाला असावा ह्यामगची मला वाटलेली थोड्क्यात कारणमिमांसा.

प्रतिसाद कविता नवरे | 23 June, 2010 - 13:17

arc you too मी पारायणं केलेत शाळा-कॉलेजमधे little woman पुस्तकाची

प्रतिसाद arc | 23 June, 2010 - 13:24

कविता , ज्या मुलीच्या टीनएज मधे हे पुस्तक नाही ती टीनएज जगलीच नाही, असे arrogant विधान करायलाही मी मागेपुढे बघणार नाही.ज्यो जेव्हा त्याला नाही म्हणते तेव्हा "काय बावळट आहे का ही मुलगी ? केव्हड्या चांगल्या मुलाला नाही म्हणतीये, आता नसला त्या प्रोफेसरसारखा व्यासंगी म्हणुन काय झाले?" अशी हळहळ आजही मला वाटते.

प्रतिसाद कविता नवरे | 23 June, 2010 - 13:26

arc अगदी अगदी, पण मला ज्यो ही तितकीच आवडायची. Lorry दुसर्‍या कुणा बहिणीच्या प्रेमात पडूच शकत नाही अशी होती ती.

प्रतिसाद राधा कुलकर्णी | 23 June, 2010 - 13:33

कविता धन्यवाद Happy

आणि मंजिरी, कविता म्हणतीये त्याप्रमाणे तू कृष्णा बद्दल लिही. मला पण आवडेल त्यावर माझी मतं मांडायला.

छान लिहिलयं.. असा विचार महाभारतातील प्रत्येक व्यक्तीरेखेबाबत करता येइल..
"धनंजय" पुस्तकात अर्जुन कसा योग्य आणि कर्ण कसा अयोग्य हे लिहिलय.. तर मृत्युंजय मधे याच्या उलट...

मला recently आवडलेला तो म्हणजे प्रकाश संताचा वनवास, शारदा संगीत इ. मधला "लंपन", बाकीही जुने बरेच आहे... Happy

खूपच छान विषय !!! माझा हा मायबोलीवरचा पहिलाच प्रवेश. >>> पहिल्याच बॉल वर षटकार !!!

असो .

मला भावलेली ती .
(खरं सांगु का , असा एकेरी उल्लेख करायचं धाडस होत नाहीये )
मला आवडलेले चरीत्र म्हणजे "स्वामी" मधील रमाबाई !!

कोणी कोणावर इतकं प्रेम करु शकतं यावर विश्वासच नाही बसत आजकाल . जेव्हा रमाबाई सती जातात , त्या प्रसंगाचं जे वर्णन केलंय रणजीत देसाईनी .... आत्ताही ते आठवुन माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या ...

असेच आणखी एक म्हणजे ... पुतळाबाई ... संपुर्ण शिवचरित्रात मुक राहुनही शेवटी अमर झाल्या ...रणजीत देसाईं नी जी अर्पण पत्रिका लिहिली आहे ना श्रीमान योगीची ती सिम्प्ली ग्रेट .

घराण्या मध्ये सतीची चाल नसतानाही या दोन पतिव्रता सती गेल्या ....खरंच येवंढं प्रेम कोण कोणावर करत असेल का हा प्रश्न मला नेहमी सतावत राहतो ....

घराण्या मध्ये सतीची चाल नसतानाही या दोन पतिव्रता सती गेल्या ....>>>

पैकी रमाबाईं माधवरावांच्या शवाबरोबरच सती गेल्या. परंतु पुतळाबाईंना शिवाजीराजांच्या मृत्युबद्दल उशीराने कळले त्यामुळे शिवाजीराजांचे जोडे कवटाळून त्या सती गेल्या असे ऐकले आहे.

रमाबाईं माधवरावांच्या शवाबरोबरच सती गेल्या. परंतु पुतळाबाईंना शिवाजीराजांच्या मृत्युबद्दल उशीराने कळले त्यामुळे शिवाजीराजांचे जोडे कवटाळून त्या सती गेल्या असे ऐकले आहे.>>>
हो हो अगदी बरोबर !! ( शिवरायांना सोयराबाई व इतर सहकार्‍यांनी मिळुन भडाग्नी दिला असण्याचीच शक्यता जास्त आहे ) त्या मुळे आदर जास्त वाढतो पुतळाबाईंविषयी .

रमाबाईंच्या सोबत किमान पती चे शव तरी आहे ...इथे तेही नाही ...केवळ प्रेम ...भक्ती पतीवर असलेली ...

(असेच अजुन एक चरित्र मला आवडणारे : " मस्तानी " हिला तर समाजाने कधीही राऊस्वामींची पत्नी असा दर्जा दिला नाही ...पण यांचे प्रेम मात्र खरे होते ... राऊस्वामी गेल्या नंतर यांनीही देहत्याग केला असे ऐकुन आहे)

________________________________________________________________________________

आणि इतर पांडवही का लाचार बनले >>

पण स्वतःला धर्मनिष्ठ म्हणवणारा युधिष्ठिर, द्रौपदीला एका वस्तू प्रमाणे द्युताच्या पटावर लावताना स्वतःला का थांबवू शकला नाही ?>>
हे पूर्णपणे बरोबर नाही. ह्या प्रसन्गाच्यावेळी भीमाच्या तोन्डी शब्द आहेत ध्रुतराष्टा सम्बधी

बाहु ते सम्प्रदेक्ष्यामी सहदेव अग्निमानय

अरे ध्रुतराष्टा ज्या हातान नी द्रौपदीला प्णाल लावलेस ते तुझे हातच जाळून टाकतो. सहदेवा अग्नि घेउन ये

अजून ही काही लिहवयचे आहे \नन्तर

हस्तिनापूरचा मूळ राजा धृतराष्ट्रच. पण त्याच्या अंधत्वामूळे ते सम्राटपद पंडू राजाकडे गेलं. >>>>>

पण नंतर पंडुने स्वतःच्या कर्तुत्वाच्या आणि पराक्रमाच्या जोरावर ते सार्थ सिद्ध केलं होतं. हि गोष्ट विसरता कामा नये. खरं पाहायला गेलं तर जर मी चुकत नसेन तर त्या वेळी ही राजा धृतराष्ट्रच होता. पंडू केवळ त्याच्या अधिपत्याखाली लढला होता. "जो टिकवेल, वाढवेल त्याचे राज्य" हि सत्तेची मुलभुत संकल्पना असते. त्या न्यायाने हस्तिनापूरावर खर्‍या अर्थाने पंडूचाच अधिकार होता.

असो... मला भावलेली पात्रे म्हणाल तर...

तस्लिमाच्या "लज्जा" मधला सुरंजन !

<<असेच आणखी एक म्हणजे ... पुतळाबाई ... संपुर्ण शिवचरित्रात मुक राहुनही शेवटी अमर झाल्या ...रणजीत देसाईं नी जी अर्पण पत्रिका लिहिली आहे ना श्रीमान योगीची ती सिम्प्ली ग्रेट .>>> सहमत !

आणखी एक आवडलेले पात्र म्हणजे "स्वामी"मधलंच आनंदीबाईंचं !

माझ्या अति लाडक्या त्या दोन आहेत...
१. पु.शि.रेग्यांच्या सावित्री मधली लच्छी (या सावित्रीचा वडाची पुजावाल्या सावित्रीशी काहीही संबंध नाही) - आपल्याला मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं अशी आजीची शिकवण पाळणारी...
त्याबद्दल मी लिहिलं होतं बरंच पूर्वी माबोच्या एका दिवाळी अंकात.

२. मार्गारेट मिशेलच्या गॉन विथ द विंड मधली स्कार्लेट..
का ते सांगायची जरूरच नाही.. Happy
होपलेसली ऑप्टिमिस्टीक अशी स्कार्लेट... 'as god is my witness.....' म्हणत स्वतःला दिलेलं वचन...
अजून काय हवं...
याबद्दलही लिहिलंय मी पूर्वी माबोवर.

दोन्ही लेख आता माझ्या ब्लॉगावर स्थानापन्न आहेत.

मला भावलेला तो...

"द लास्ट बुलेट" : श्री. अशोक कामते

मुळातच गर्भश्रीमंत असलेला हा माणुस आयपीएस होवून महाराष्ट्र पोलीस सेवेत रुजु होतो. आपलं सगळं आयुष्य कधी नक्षलवाद्यांशी, कधी खंडणीखोरांशी, तर कधी राजकारण्यांशी लढण्यात घालवलं त्यांनी.
कधीही आपल्या निष्ठेशी, तत्वांशी तडजोड केली नाही. आयुष्यभर माणसेच जोडली.
सोलापूरातील त्यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीदरम्यान एक दोनदा त्यांच्या संपर्कात आलो होतो. एवढा मोठा माणुस पण कमालीचा साधा, सरळ, कुठलाही अहंकार नाही, मोठेपणा नाही.
आपल्या आयुष्याची अखेरही त्यांनी या देशासाठी, देशवासियांसाठी लढताना आपले प्राणार्पण करुनच केली

A Real Hero कामतेसाहेब तुमच्यासारख्या खर्‍याखुर्‍या हिरोंची खरेच खुप गरज आहे हो देशाला ! तुमचं कार्य, तुमचं बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही .

ल्हानपणी आवडलेले कॅरॅक्टर
फास्टर फेणे ,सिंदबाद, शेरलॉक होम्स...आणि वेताळ(भारी गोष्टी सांगायचा! :P)

टीनएजमधले,
कर्ण (मृत्यूंजय) , कच (ययाती) .

त्यानंतर..Doctors मधली लॉरा आवडली...इतकी की शेवटी डॉक्टरशी लग्न केले!

हे पूर्णपणे बरोबर नाही. ह्या प्रसन्गाच्यावेळी भीमाच्या तोन्डी शब्द आहेत ध्रुतराष्टा सम्बधी

बाहु ते सम्प्रदेक्ष्यामी सहदेव अग्निमानय

अरे ध्रुतराष्टा ज्या हातान नी द्रौपदीला प्णाल लावलेस ते तुझे हातच जाळून टाकतो. सहदेवा अग्नि घेउन ये>>>>

हे धृतराष्ट्राला उद्देशुन आहे की युधिष्ठिराला ? Uhoh

मला रावण बद्दल असच वाटतं कि बिचा-यावर अन्याय झालां.

खरं तर रावण हा शिवभक्त होता, खुप बुद्धिमान होता. शुर होता, कलाकार होता, संशोधक (विमाना वरुन म्हणता येईल) होता. त्याच्या आयुष्यात केलेली एकमेव चुक म्हणजे सितेला पळवलं. बरं पळवुन नेल्यावर तिच्यावर काहिच अत्याचार वगैरे केला नाही, यावरुन तो सज्जन होता असे म्हणायला काही हरकत नाही. किंवा त्याचे तिच्यावर खुप प्रेम असावे असाही अंदाज बांधायला स्कोप आहे. (स्त्रीची ईच्चा नसताना हाथ लावल्यास नाश होईलवर वगैरेचा नुसतं फेकम फाक वाटतं.)

बरं सितेवर प्रेम नव्हत म्हटल तर पळवुन नेण्याचं आजुन एक कारण म्हणजे त्याच्या बहिणीचं नाक कान कापल्याच्या बदल्यात रागाच्या भारत तिला उचलुन नेलं पण नंतर राग शांत झाल्यावर चुक कळली असावी. म्हणुन तर सितेला हाथ सुद्धा लावला नाहि असं म्हणायलाही वाव आहे.

अगदी याच्या उलट राम मात्र सज्जन नव्हता याचं उदा. म्हणजे रामाच्य रुपावर भाळुन रावनाची बहीण जेंव्हा रामाकडे येते तेंव्हा तो तिला लक्षमण कडे पाठवतो ते हि त्याच्या पाठीवर लिहून. हे खर तर रामाला न शोभणारं होतं.

बरं शेवटी रावणाचा मृत्यु सुद्धा घरच्याच माणसानी दगा दिल्यामुळे होतो.

एक, फक्त एक चुक आणि आयुष्यातुन उठावं तर लागलंच वरुन त्याच्या कला गुणांची व बुद्धिचाहि कुठे कौतुक नाहि.

त्या तुलनेत पतिव्रतेचा तपास म्हणुन बायकोना आगीत ढकलणा-या व धोब्याच्या टोमण्यावरुन वनवासात धाडणा-या रामाच नको तितकं कौतुक झालय.

बिच्चारा रावण.

मधुकर, तुमची वरील पोस्ट उपहासात्मक असेल तर ठिक आहे, पण तसे नसेल तर ....

रावण शिवभक्त होता, कलावंत होता, पराक्रमी होता, शक्तिशाली होता हे सर्व गुण मान्य करुनही वरचं विधान मान्य करता येत नाही. मुळात रावणात सगळ्यात मोठा दोष होता तो म्हणजे त्याचा प्रबळ अहंकार..

जो इतका प्रबळ होता क्या ज्या शिवाची आराधना तो करायचा त्यालाच त्याच्या कैलासासकट लंकेत आणायला निघाला होता. रावणाने आयुष्यात एक नाही तर अनेक चुका केल्या आहेत.

पुष्पकविमानाबद्दल बोलायचं झालं तर ते त्याने वडील बंधु कुबेराकडुन जबरदस्तीने हिरावून घेतलेलं होतं, तो त्याचा शोध नव्हता.

आपल्या एका हट्टापायी सगळ्या लंकावासियांचा बळी देणार्‍या व्यक्तीला बिच्चारा कसं म्हणता येइल?

<<<बरं सितेवर प्रेम नव्हत म्हटल तर पळवुन नेण्याचं आजुन एक कारण म्हणजे त्याच्या बहिणीचं नाक कान कापल्याच्या बदल्यात रागाच्या भारत तिला उचलुन नेलं पण नंतर राग शांत झाल्यावर चुक कळली असावी. म्हणुन तर सितेला हाथ सुद्धा लावला नाहि असं म्हणायलाही वाव आहे.>>>>

तसं असेल तर त्याने अंगदशिष्टाईला नकार का दिला. हनुमंताबरोबरच सीतामातेला सन्मानाने परत का नाही पाठवले. केवळ शुर्पणखेच्या उदाहरणावरून रामाला दुर्जन ठरवणे यासारखा विनोदही केवळ तुम्हीच करु शकता, मागेही स्वा. सावरकरांच्या बाबतीत तुम्ही ते सिद्ध केलेलंच आहे.

हे धृतराष्ट्राला उद्देशुन आहे की युधिष्ठिराला ? >>
धन्यवाद विशाल

माफ करा हे युधिष्ठिराला उद्देशून आहेत धृतराष्ट्राला नाही

राधा,
छान लेख !
दुर्योधनाबद्दल माहीती मिळाली !
Happy

राधा,छान लेखाने सुरुवात केलीस Happy
मला भावलेले व्यक्तीमत्व म्हणजे १ ला बाजीराव.
या वीराच्या युद्धकौशल्याला तोड नव्हती.मला वाटतं रणांगणातील कोणतीही लढाई न हरलेला हा एकमेव योद्धा असावा.
मस्तानीमुळे उदभवलेल्या कौटुंबिक आणि सामाजिक कलहामुळे बाजीरावाला जरी मनःस्ताप झाला तरी शेवटपर्यंत तो मस्तानीशी एकनिष्ठच राहिला.
ह्या व्यक्तीला जर अजुन आयुष्य लाभते तर ईतिहास पूर्ण बदलेला दिसला असता.

राधा, छान लेख! Happy

मला अनेक पुस्तकातील अनेक व्यक्तिमत्वांनी भारलंय आतापर्यंत....

ते भावले की नाही माहीत नाही... पण ते ते पुस्तक वाचल्यावर मी बर्‍याचदा त्या व्यक्तीरेखेचा विचार करत बसायचे! त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातील ''जर'' ''तर'' चा विचार करत बसणे हा पुस्तक वाचल्यावरचा आवडता छंदच म्हणेनात! Happy

अंकल टॉम्स केबिनमधला अंकल टॉम..... एक होता कार्व्हर मधला कार्व्हर.... अ‍ॅन रॅन्डच्या अ‍ॅटलास श्रग्ड मधली डॅनी टॅगर्ट....रिचर्ड बाखचा जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल....

आणि कृष्ण, राधा, यशोदा हेही मला कायम म्हणजे अगदी आठवत असल्यापासून आवडत आलेत. प्रत्येक वाचलेल्या पुस्तकातून त्यांच्या वेगवेगळ्या छटा वाचायला आवडल्या आहेत. ययातीची पत्नी शर्मिष्ठा हिच्याविषयी कायम कुतुहल वाटत आले आहे. वासवदत्ता, उदयन, आम्रपाली....

संत मीराबाई.... संत कबीर.... भगवान बुध्द.....

किती नावे घेऊ? खूप मोठी यादी होईल... Happy

छान लेख आहे. अशा व्यक्तिरेखेंबद्द्ल मला इतरांकडून वाचायला खुप आवडेल.
ऐतिहासिक वा पौराणिक व्यक्तीरेखेंबद्दल, इमेज बदलण्याचे प्रयत्न अनेकवेळा होतात. कैकयी काय किंवा आनंदीबाई काय, लेखकाच्या हातात असते ते.

लिटिल वूमन मधिल जोसेफिन मार्च, शिरवडकरान्चा फिरोज इराणी, अ स्टडी इन स्कारलेट मधील जॉन,
वपून्चा पार्टनर..... केशव पन्डीत .... श्रीमान योगी मध्ये रेखाटलेले मिर्झा राजे जयसिन्ग....
आणखी बरेच काही ....

लिहू कधीतरी ...

Pages