विहीर

Submitted by साजिरा on 23 June, 2010 - 05:26

परीक्षेचा शेवटचा पेपर संपला आणि रस्त्याने पायी घरी येताना मला अगदीच सुनं सुनं वाटू लागलं. हे नेहेमीचंच. पेपर लिहून घरी आलं की, प्रचंड पोकळपोकळ वाटायचं. डोकं रिकाम्या घड्यागत आणि पायात कुणीतरी जड लोखंडाच्या वस्तू अडकवल्यागत. समुद्रात किल्ला बांधताना शिवाजी महाराजांचे लोक तळाशी जडभदक शिसं का काय ते ओतायचे आणि त्यात किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंती रोवायचे म्हणे. तर त्या भिंतींना नंतर आयुष्यभर जे काय वाटत असेल, तस्संच मला त्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी वाटायचं. पुस्तकांतून घोकून डोक्यात छापून टाकलेल्या इतक्या त्या धड्यांचं आणि प्रश्नोत्तरांचं आता काय करावं हेच कळायचं नाही. पुस्तकांची आणि डोक्याची पण दया यायची. दुसर्‍या पेपरच्या तयारीला लागावं लागलं की ते एक ठीक. पण मग शेवटच्या पेपरानंतर सारं फारच भकास वाटायचं. उगाच इतका अभ्यास केला, अशी राघोनानांच्या विहिरीइतकी खोल खोल टोचणी मनाला लागून राहायची.

पण खेळाचे डाव गल्लीत लागायला सुरू झाले की, मग टोचण्या बिचण्या काही नाही. मग आनंदीआनंद. लगोर्‍या, आबाधाबी, त्याच चिंध्यांच्या चेंडूने क्रिकेट आणि फुटबॉलपण. शिवाय लंगडी, कबड्डी. आजूबाजूच्या घरातली माणसे कावून ओरडेपर्यंत धिंगाणा चालायचा. पण समोरच्या वाड्यातल्या राघोनानांची आई सोडली, तर कुणाकडे आम्ही फारसे लक्ष देत नसू. ही आजी कर्कश आवाजात ओरडायची, ते अगदीच नको वाटायचं. शिवाय भला मोठा चष्मा घातलेला, आणि नेहमी आठ्यांनी भरलेला तिचा चेहेरा मला अजिबात आवडायचा नाही. राघोनाना किती रुबाबदार होते. आणि त्यांचे वडील पण. हे आजोबा जास्त कुणाशी बोलत नसत. पण ही रेशमाआजी मात्र घरात आणि बाहेर सर्वांवर सदासर्वकाळ ओरडत असे.

मला आनंद होण्याचं सुटीतल्या खेळांपेक्षाही मोठं एक कारण आणखी होतं. राघोनानांच्या घरी खूप वर्तमानपत्रे येत. ती आता सुटीत सारी आणि भरपूर वेळ वाचता येतील अशा विचाराने मला आनंद झाला. बंगल्यात मला मुक्त प्रवेश होता. राघोनाना असले की, कौतुकाने जवळ घ्यायचे. प्रश्न विचारायचे. हे वाच, ते वाच, असं म्हणायचे. त्यांच्या घरातल्या कुणालाही काहीही वाचण्यात फारसा रस नव्हता. ते आजोबा थोडंफार वाचत, इतकंच. नाहीतर राघोनाना नसले, तर तो पेपरांचा गठ्ठा दिवस दिवस न उलगडला जाऊन तसाच पडलेला असायचा. राघोनाना खूप वाचायचे, पण त्यांची वाचण्याची पद्धत मात्र मला आवडत नसे. वाचून झाल्यावर घड्या घालणे तर दूरच, पण सारे कागद चोळामोळा होऊन घरभर पसरायचे. तेव्हा ती खोली पीटीचे सर वेळेवर न आल्याने मुलं रांगा तोडून इकडेतिकडे पळून मस्ती करायची, तेव्हा दिसणार्‍या मैदानासारखी मला दिसे. त्या भल्या मोठ्या ओसरीत इतस्ततः उडणारी सारी वर्तमानपत्रे गोळा करून, व्यवस्थित घड्या घालून कोपर्‍यात बसून मी ती वाचत असे. नानांनी घरात सर्वांना सांगून ठेवलेले असल्याने मला कुणीच काही बोलत नसे.

एकदा लहान मुलांसाठीच्या पुरवणीत मी पाठवलेली गोष्ट पहिल्यांदाच छापून आली, तेव्हा मी धावत जाऊन ती नानांना दाखवली. तेव्हा त्यांनी शाबासकी तर दिलीच, पण त्यांच्या कपाटातून एक सोनेरी रंगाचं पेन आणि एक शिसपेन्सिलींचं पाकीटच मला देऊन टाकलं. शिवाय त्यांनी एकदा परदेशातून चॉकलेटांचा भलाथोरला डबा आणला होता, त्यातली मूठभर काढून मला दिली. मला इतका आनंद झाला की, नानांची ही बक्षिसं मी नंतर कितीतरी दिवस सार्‍यांना दाखवत फिरलो. त्या दिवसांत आईने मला आई 'नाचरा मोर' असं नावच देऊन टाकलं होतं.

राघोनानांचा वाडा भला थोरला होता, आणि त्याचं आमच्या अख्ख्या तालुक्यातल्या लोकांना अप्रूप वाटायचं. तो होताच तसा. दोन-तीन माणसं एकावर एक उभी राहून होईल एवढ्या उंचीचं भलं मोठं लाकडी दार होतं. हे दार आम्हा दोन तीन मुलांमिळूनही ढकललं जायचं नाही, इतकं जड होतं. मग आत गेलं की, दगडी बैठक भलीमोठी. तिथं रोज कुणी ना लोक येऊन आम्हाला अजिबात न कळणार्‍या राजकारणावरच्या गपा मारत. मग तीन-चार पायर्‍या वर चढलं की, उजव्या हाताला पुन्हा भली मोठी ओसरी, तीतून वरती जाण्यासाठी लाकडी जिना. तसाच आणखी एक जिना डाव्या हाताला दोन झोपण्याच्या खोल्यांपैकी एका खोलीतून होता. या खोलीत नाना झोपत आणि त्याच्या वरच्या खोलीत खूप गुप्त चर्चा वगैरे चालत. तिथे कधी जायला मिळायचं नाही, पण एकदा नानांच्या मुलासोबत- विशूसोबत गेलो, तर तिथं भला मोठा लाकडी सोफा. पुस्तकांची आणि मासिकांची कपाटे. शिवाय मोठीमोठी चित्रे भिंतींवर टांगलेली. आणि खाली सुंदर गालीचा होता. पुस्तकांची ती भलीथोरली लाकडी कपाटे पाहून मला खूप हेवा वाटला. ही कपाटे उघडून पाहावीत, असं मला खूप वेळा वाटलं, पण नानांना किंवा नानींना तसं काही सांगायचा धीर झाला नाही.

खालच्या दगडी बैठकीतून सरळ गेल्यावर माजघर. त्याच्या आजूबाजूला पुन्हा चार पाच खोल्या. यातलीच शेवटची खोली रेशमाआजीची होती. तिच्या खोलीला लागून पाठीमागे मोठं अंगण होतं.

हा वाडा जुना असला तरी खूप खर्च करून नानांनी त्यात मोठ्या शहरांतल्या मोठमोठ्या बंगल्यांत असतात तशा अनेक गोष्टी आणून ठेवल्या होत्या. सार्‍या झोपण्याच्या खोल्यांमध्ये भिंतींना भगदाडे पाडून थंड हवेची यंत्रे बसवली होती. त्याला एसी म्हणतात आणि थंडीमध्ये त्यांच्या खोल्या गरम राहाव्यात म्हणून बसवलेल्या वस्तूला हीटर म्हणतात, असं विशूनेच मला सांगितलं होतं. आम्ही किंवा आमच्या सगळ्या नातेवाईकांत कुणीच श्रीमंत नसल्याने या सगळ्या वस्तू आजवर आम्हाला माहीतच नव्हत्या. कडक उन्हाळ्यात एसी लावलेल्या खोलीत दुलई पांघरून गुडुप झोपायला किती मजा येते ते विशूने एकदा आम्हाला सांगितलं होतं.

नाना खूप लोक जमवून सारखे काहीतरी बोलत असत. कळत नसलं, तरी तिथंच कोपर्‍यात उभा राहून मी नानांकडे एकटक पाहत असे. त्यांचं बोलणं लोकांना इतकं पटायचं, की सारे काहीही न बोलता ऐकत राहत. तिथं रामाचं आणि महात्मा गांधींचं मोठं चित्र लावलं होतं. धारदार नाकाचे आणि मोठ्या काळ्याभोर डोळ्यांचे, स्वच्छ कुर्ता पायजमा घातलेले उंचनिंच नाना बोलू लागले की रामाचा, गांधीजींचा आणि नानांचा असे तीन चेहरे बघणार्‍याला अगदी एका ओळीत दिसत. हे सारं मला अगदी बघत राहावसं वाटायचं.

***

नानांचा मळाही गावाला अगदीच लागून होता. तिथं खूप सारं बघण्यासारखं होतं. लांबलचक रांगा करून उभे राहिलेले द्राक्षांचे वेल आणि हिरवागार मांडव, आत शिरायला भिती वाटेल इतके उंच आणि दाटीवाटी करून वाढलेले ऊस, पिकलेल्या अंजिरांची आणि पेरूची झाडं, केळीचे मोठमोठे घोस लटकलेली झाडं, भुईमुगाचा आणि कांद्याच्या पातीचा वास पसरवणारे लांबचलांब वाफे, या सार्‍यांना फावड्याने बारे देऊन पाणी फिरवणारे सालदार, त्यांच्या झोपड्या आणि इतर खूप काही.

पण या सार्‍यांत मला खूप आवडणारी एक भारी गोष्ट होती. नानांच्या मळ्यातली विहीर. या विहिरीला इतकं पाणी असायचं की, खोलीचा अंदाजच आम्हांला कधी आला नाही. ती नक्की किती खोल असेल, याबद्दल आमच्यात नेहेमी गप्पा होत, पैजा लागत. नानांनी ती खूप सुंदर बांधून घेतली होती. मोठी संरक्षक भिंत, शिवाय त्यावर लोखंडाचे पाईप. बाजूला भला मोठा दगड-सिमेंट वापरून बांधलेला कट्टा. विहिरीच्या एका बाजूला आंबा, पिंपळ आणि शेवग्याची मोठी झाडं आणि दुसर्‍या बाजूला पेरू, अंजीर आणि केळीची झाडं. झाडांच्या अशा गर्दीमुळे तिथं अगदी दाट, शांत सावली असायची. नानांच्या बंगल्यातला तो एसी चालू केल्यावर येईल तितकी थंडगार हवा इथं कडक उन्हाळ्यातही असायची. त्यांच्या आणखीही चार-पाच विहिरी होत्या, पण या विहिरीवर गेलो की आम्ही तासन् तास रमायचो. अशी विहीर फक्त राघोनानांचीच असू शकते, असं उगीच वाटायचं.

एकदा तर ही विहीर बघायला सिनेमा बनवणारे लोक आले होते. त्यांना पाहिजे तशी विहीर शोधण्यात त्यांनी अनेक गावे फिरून आणि अनेक दिवस घालवले होते. त्यांना ही खूप आवडली असावी, कारण त्यानंतर काहीच दिवसांत ते त्यांचा सारा लवाजमा घेऊन आले. मोठमोठे कॅमेरे, दिवे, लोखंडी रूळ आणि आम्ही कधीच न बघितलेलं काय काय सामान. हे सारं सामान आणि सिनेमात काम करणार्‍या लोकांना बघायला प्रचंड गर्दी जमली होती नानांच्या मळ्यात. त्या सिनेमातली नायिका या विहिरीत उडी मारून आत्महत्या करते अशी गोष्ट आहे, म्हणून कॉलेजात जाणारा दिगू सांगत होता. अशी कशी गोष्ट? हे मात्र मला अजिबात आवडलं नाही. इतक्या सुंदर विहिरीबद्दल असं ऐकताना, बघताना कसं वाटेल? त्या सार्‍या दिवसांत आम्ही कुणीच कुणालाही विहिरीत उडी मारताना पाहिलं नाही. पण सिनेमात ते आत्महत्येचं आहेच म्हणून दिगू सांगत होता, तेव्हा ते बरोबरच असेल.

***

वाड्यात आणखी कुमुदकाकू आणि उमाकाकू पण होत्या. नानांचे लहान भाऊ रमाकांत आणि दिनकर यांच्या या बायका. कुमुदकाकू तर सारखी पदर खोचून काम करताना दिसे. उमाकाकू दोनच वर्षांपूर्वी लग्न होऊन घरात आलेली. खूपच नाजूक आणि गोरीपान. सारखा डोक्यावर पदर घेतानाची तिची उडणारी तारांबळ बघून तर मला हसूच यायचं. बोलायची पण खूप हळू आणि बारीक आवाजात. आणि ती हसली की, बघत राहावंसं वाटायचं. दिनकर मात्र मला अजिबात आवडत नसे. उमाकाकूने याच्याशी कसं लग्न केलं, याचंच मला नेहमी नवल वाटे. त्याच्या तोंडाला नेहमी विड्यांचा वाईट वास येई. शिवाय प्रचंड दारुही प्यायचा. गावातल्या वाईट मुलांसोबत नेहमी भटकत आणि पत्ते खेळत असायचा. यावरून राघोनानांनी अनेकदा त्याला मारलंही होतं. नानांच्या समोर दिनकर सहसा येत नसे. नाना वाड्यात असले की, तो सरळ रेशमाआजीच्या खोलीत जाई, तिथेच जेवे आणि मग त्यानंतर आजीशी गप्पा मारे नाहीतर वाद घाली. मग संध्याकाळ झाली की पुन्हा भटकायला बाहेर.

आजोबा आणि दिनकर दोघेही दारू प्यायले, आणि घरात नाना नसले की, मात्र दोघांची जुगलबंदी बघण्यासारखी असायची. आमची भरपूर करमणूक व्हायची, आणि मग रेशमाआजीचा रेडिओ ढणाढणा चालू व्हायचा.

***

सुटी लागली, अन् समोरच्या वाड्यात वेळ जाऊ लागला तसं मला कळलं, नानांच्या घरातलं राजकारणी वातावरण जरा जास्तच वाढलं होतं. त्यांच्या बैठका वाढल्या होत्या, आणि ते सतत काहीतरी चळवळीबद्दल बोलत असायचे. शेतकर्‍या-कामकर्‍यांच्या एका संघटनेचं काम करत असावेत, इतकंच मला त्यातून कळलं.

एक दिवस दुपारी खेळ थांबल्यावर काहीतरी वाचायचं म्हणून वाड्यात गेलो. तर कुठे वर्तमानपत्रे दिसेनात. ओसरी सामसूम होती. माजघरातून बायकांचा आवाज येत होता, तसा तिकडे गेलो. तर तिथे कुमुदकाकू, उमाकाकू आणि इतर कामवाल्या बायका. पेपर बघतो आहे, असं सांगितल्यावर उमाकाकु मला म्हणाली, 'नानी वाचत होत्या. त्यांच्या खोलीत बघ जा.'

मी नानींच्या खोलीत आलो, तर नानी झोपलेल्या. काही पाने त्यांनी पांघरुणासारखी तोंडावर घेतलेली, तर काही झोपेतच त्यांच्या अंगाखाली आलेली. काय करावे, हे न सुचून मी तसाच दोन मिनिटे दाराशी उभा राहिलो. शेवटी धीर करून तोंडावरची पाने नानींना न उठवता अलगद काढायची, असं ठरवलं. हळूच काढलीही ती पाने, पण अगदी शेवटच्या क्षणी पंख्याच्याच वार्‍याने ती पाने मोठ्यांदा हलून त्यांचा आवाज झाला, आणि त्या आवाजाने दचकून नानी उठल्याच. मला भयंकरच कसेतरी झाले. आमच्या घरात दादांना असे उठवले असते झोपेतून, तर धपाटा नक्कीच बसला असता. मी अपराधी नजरेने नानींकडे बघितले, मग मान खाली घालून काहीतरी सांगू लागलो. तसं मला मायेने जवळ घेऊन त्यांनी सारी पाने मला दिली आणि हसल्या.

मी ती घेऊन वळणार, तेवढ्यात रस्त्यावरून मिरवणूकीसारख्या गलक्याचा आवाज आला. ढोलताशाचा आवाजही. मी फिरून नानींच्याच खोलीच्या खिडकीतून बघू लागलो, तर नानीही आल्याच तिथे. 'अरे, नानांची मिरवणूक काढली की काय? आणि कशापायी?' असं नवलाने विचारू लागल्या. तेवढ्यात रमाकांतकाका धापा टाकत आलाच खोलीत. नानी त्याच्याकडे आश्चर्याने बघत होत्या, तेवढ्यात तो म्हणाला, 'नानी.. नानी.., नाना अध्यक्ष झाला संघटनेचा. आताच बातमी आली. तू.. तू पटकन पूजेची तयारी कर. नाना इकडेच येतो आहे..!'

रमाकाका घाईत निघून गेला, तसं मी नानींकडे पाहिलं, तर त्या प्रचंड थकल्यागत दिसत होत्या. त्यांचा चेहेरा मला नेहमीच फार मायाळू वाटायचा. आता त्यात चिंता मिसळल्यागत वाटली, आणि का कुणास ठाऊक, मला त्या अगदीच देवीसारख्या दिसू लागल्या. पडताना आधार घ्यावा तसा त्यांनी पलंगाचा कठडा पकडला, आणि उठून माजघराकडे जाऊ लागल्या.

मिरवणूक दाराशी आली, तसं सगळ्या बायकांनी नानांना ओवाळलं. रेशमाआजीने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून कानाजवळ बोटे नेत कडाकडा मोडली. मग नानांनी ओसरीत बैठक मांडली. घामाघूम होऊन ते लोकांना कसकसल्या सूचना देत होते. त्यांना राममंदिरासमोरील मैदानात संध्याकाळी मोठी सभा घ्यायची होती.

संध्याकाळी आम्ही मैदानात गेलो, तर तिथे भलतेच उत्साही वातावरण होते. सगळीकडे पताका, पोस्टरं लागली होती. आजूबाजूच्या गावांतून गाड्या भरभरून लोक नानांचं भाषण ऐकायला आले होते.

सभेला सुरुवात झाल्यावर नाना बोलायला उठले, तसा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अध्यक्ष होऊन ते संघटनेमध्ये काय काय करणार आहेत, आपण सर्वांनी मिळून काय करायला हवं.. असं बरंच काही ते जोशात बोलत होते. मी बराच पुढे बसून नानांकडे टक लावून बघत होतो. त्यांच्या घरात लावलेल्या युद्धाला उभे राहिलेल्या प्रभूरामचंद्राच्या मोठ्ठ्या चित्राची मला आठवण आली. त्यांचं भाषण संपल्यावर पुन्हा कडकडाट झाला तेव्हाच मी भानावर आलो.

राघोनाना आपल्या गावात आहेत, याचा मला त्या दिवशी भयंकरच अभिमान वाटला.

***

समोरच्या वाड्यात आता नेहमीच लगबग, घाईगर्दी दिसू लागली. आणि ते सारं बघत राहणं हा आमचा छंदच होऊन बसला. नानांना भेटायला मोठमोठे लोक, म्हणजे अगदी मंत्री वगैरे पण येत. त्यांचा गाड्या, त्यांच्या सोबतची माणसे न्याहाळण्यात आमचे तास तास निघून जात.

गल्लीतला कामतांचा आवल्या आम्हांला अनेक गोष्टी सांगे. मोठ्या लोकांच्या नोकरांना आणि गाडी चालवणार्‍यांना कसे गणवेष असतात, मंत्री लोक कसं थोडंच बोलतात, आणि त्यांच्या इशार्‍याने भयानक दिसणारे पोलिस लोक पण कसे पटापट हलतात, त्यांच्याकडे कसे अगदी जहाजे आणि विमाने पण विकत घेऊ शकतील इतके पैसे असतात.. अनेक कथा आवल्या आम्हाला नेहमी सांगत असे. आम्हांला आजवर हे कुणीच न सांगितल्याने आम्ही खेळ वगैरे बंद करून ते सारे ऐकत असू. त्याचं नाव खरं तर सुदाम असं होतं. पण सारे त्याला आवल्या म्हणत. खरं तर आवल्याचा अर्थ कुणालाही माहीत नव्हता. त्याला विचारल्यावर नावात कसला अर्थबिर्थ- असं तो म्हणायचा. तो खूप आगाऊपणाही करायचा. आणि डेअरिंगही. नानांच्या गाडीत गुपचूप शिरून, गियरचा दांडा आणि ब्रेक की काहीतरी हलवून तो गाडी थोडी हलवून दाखवायचा. असं आमच्यापैकी कुणालाच करता येत नसायचं. आणि हिंमतही नसायची. फार तर एक-दोनदा मी गाडीचा हॉर्न वाजवून बघितला होता. पण तेवढंच. एकदा आवल्या गाडीत चोरून बसला आणि तो काहीतरी करत असतानाच गाडी जरा जास्तच हलली आणि बाजूलाच असलेल्या विजेच्या खांबाला टेकली. हे रेशमाआजीने पाहिलं आणि आवल्याच्या आईकडे खूप मोठा आवाज आणि हातवारे करत सांगितलं. आवल्याला खूप मार बसला, याचं मात्र आम्हांला वाईट वाटलं.

तालुक्याच्या गावी एक फार मोठा साखर कारखाना होता, त्यात आवल्याचे वडील काहीतरी नोकरीला होते. तो बरेचदा त्याच्या बाबांसोबत तिथे जाई आणि तिथली खूप मोठमोठी यंत्रं, त्यांचे आवाज आणि पोतीच्या पोती तयार होणारी साखर याबद्दल आम्हाला सांगे. मी कधीच साखर कारखाना आतून पाहिला नव्हता, पण त्याच्या शेजारून एक-दोनदा जाताना आलेला तो भयंकर वास मला अजिबात आवडला नव्हता. तो मळीचा वास असतो, आणि आत गेल्यावर तर तो वास खूपच येतो असंही आवल्याने आम्हाला सांगितलं होतं.

साखर कारखान्यावर आणि तालुक्याच्या गावी पण नानांची भली मोठी हात जोडणारी चित्रं लागली आहेत, असं एकदा त्याने आम्हाला सांगितलं. शिवाय आता अख्खा महाराष्ट्र नानांना ओळखायला लागला आहे असंही. मग नंतर गावात प्रचाराच्या जीपगाड्या फिरू लागल्या. आम्हीही त्या गाड्यांत बसून काहीवेळा फिरत असू. आवल्याने पत्रके वाटण्याचं काम केल्याने जीपमधल्या त्या माईकवर बोलण्याची हौसही त्याने करून घेतली. हा मोठा झाल्यावर नक्की नानांसारखा नेता होणार असं आम्हां सर्वांना नेहेमी वाटायचं. माझी मात्र पत्रकं वाटायची हिंमत झाली नाही. एकदा घरात सहजच काही पत्रकं हातात घेऊन गेलो, तर दादा खूप नाराज झाले. 'मी कधीच निवडणूकीत उभा राहणार नाही. संघटनेचा अध्यक्षपदाचा वापर करून मी कधीच कुणाकडे मत मागायला जाणार नाही, असं राघोनाना म्हटले होते, त्याचं काय झालं?' असं दादा आईशी बोलताना म्हटले. ते आणखी बरंच काही बोलत होते, पण मला त्यातलं बरचसं कळलंच नाही.

मग एक दिवस गावात पुन्हा नानांची मिरवणूक निघाल्यावर कळलं- नाना साखर कारखान्याचे पण चेअरमन झाले. गावात पुन्हा एकच जल्लोष उडाला. वाड्यासमोर आता कारखान्याच्याही गाड्या दिसू लागल्या. बैठका आणि चर्चा खूपच वाढल्या. नाना जीपमध्ये बसून सारखे कुठे तरी जात असत. नेहमीच घाईगर्दीत असल्यासारखे दिसत.

नाना घरात आले की, नानींची खूप धावपळ उडे. नानांबद्दल पेपरात नेहेमी काही ना काही छापून येई. मी ते नानींना संगितलं, की त्या बातम्या मला त्या वाचून दाखवायला सांगत. ऐकून झालं की चिंताग्रस्त चेहेर्‍याने बसून राहत, नाहीतर माझ्या डोक्यावरून हात फिरवत माजघरात किंवा त्यांच्या खोलीत निघून जात.

साखर कारखान्यात काहीतरी खूप मोठा पैशांचा घोळ झाला आहे, आणि कारखान्यातल्या आणि बाहेरच्या काही लोकांचा त्यावरून नानांवर खूप राग होता, एवढं मला काही बातम्यांवरून कळलं. ते लोक खरं तर थोडेच होते. त्या तुलनेत नानांना देवमाणूस मानणारे लोक खूपच होते. आमच्या गावातच नाही तर आमच्या तालुक्यात आणि जिल्ह्यातही. इतकंच नाही, तर थेट मुंबईच्या मंत्रीमंडळातही नानांचा वट आहे, असं आवल्या नेहेमी सांगायचा.

काहीही असलं तरी नानांसारख्या माणसाला त्या थोड्या लोकांनी असं काहीही बोलू नये, असं मलाही सारखं वाटे.

***

एक दिवस गावात पुन्हा नानांनी सभा घेतली आणि भाषण केलं. त्यात त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष झाल्यापासून काय काय सुधारणा केल्या, कारखान्याची कशी प्रगती झाली, वगैरे सांगितलं. नानांच्या आवाजाची आणि भाषणाची जादू जबरदस्तच म्हटली पाहिजे. 'मी काही आकडेवारी सांगतो, ती कागदपेन घेऊन लिहून घ्या, आणि तुम्हीच ठरवा की या राघोनानाने काय चूकीचं केलं!' असं अगदी हुकमी आवाजात सांगितलं, तेव्हा अनेकांनी खरंच ते सांगतात ते लिहून घेतलं. मी देखील भारावून जाऊन एका कागदावर ते सांगतील ते लक्षपूर्वक लिहून घेऊ लागलो.

सभा संपली, आणि नाना कुणाला तरी शोधू लागले. बहुतेक ड्रायव्हरला शोधत असावेत. मी, विशू, आवल्या, मालपानीचा आनंद, पंक्या आणि आणखी काही मुले पुढेच बसलो होतो, तर त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं. म्हणाले, 'घरून पाच-सहा माणसांचा जेवणाचा डबा आणा. पंचायतीत आता पुन्हा बैठक आहे. तिथंच घेऊन या..'

आम्ही घरी आलो, आणि नानींच्या खोलीत जाऊन सभा संपल्याचं सांगितलं. नानी आजारी असाव्यात. थकलेल्या आवाजात, खोलीत पडल्या जागीच त्यांनी उमाकाकूकडून डबा घ्या म्हणून सांगितलं.

उमाकाकू केस सुकवायचं काम बाजूला ठेऊन डबा भरण्याच्या तयारीला लागली. डबा भरताना ती सभेबद्दल काय काय विचारत होती. नानांनी सभेत सांगितलं ते मी लिहूनही आणलं आहे, असं आवल्या म्हणताच तिनं उत्सुकतेने माझ्याकडून तो कागद घेतला. आणि तो बघून मला काही कळायच्या आतच 'कित्ती हुश्शार!' म्हणून गपकन जवळ घेऊन माझ्या गालाचा मुकाही घेतला. त्या दाट ओल्यागच्च केसांमुळे मला अगदीच गुदमरल्यासारखं आणि नंतर भयंकर लाजल्यासारखं झालं. आवल्या दुष्टासारखा हसला तशी ती पण हसू लागली.

डबे भरलेल्या दोन भल्याथोरल्या जड पिशव्या तिने आमच्याकडे दिल्या, आणि आम्ही बाहेर पडलो. पंचायतीकडे जाताना आवल्या मधूनच फिदीफिदी दात काढत होता. अजूनही मला तो साबणाचा मंद वास येत असल्यागत आणि उमाकाकूच्या खांद्याचा, छातीचा स्पर्श माझ्या दंडाला झाल्यागत वाटत होतं.

मला प्रचंड घाम आला, आणि ओल्यागच्च तळहातातून पिशवी निसटेल असं मला वाटू लागलं. मग मी ती पिशवी विशूकडे देऊन सरळ घरीच आलो.

***

दिनूकाका मधूनच 'मला माझी वाटणी द्या' म्हणून भांडण काढी. त्याला वेगळं काढलं, तर दारूच्या आणि जुगाराच्या नादाने सारं विकेल, अशी भीती सार्‍यांना वाटत असावी. नानी तर त्याला नेहेमी समजावून सांगत. तो तेवढ्यापुरतं ऐके, पण संध्याकाळी पिऊन आला, की तेच.

एक दिवस तो आजीशी वाद घालत असतानाच नाना घरात आले आणि त्यांनी चिडून दिनूकाकाला बुटांनीच बडवायला चालू केले. दिनूकाका इतका प्यायला होता की, त्याला धड उभंही राहता येत नव्हते. अचानक मार बसल्यामुळे त्याची भलतीच केविलवाणी अवस्था झाली. रमाकाकाही धावून आला. नानांना आवरू लागला. पण नाना भलतेच चिडले होते. त्यांचं हे असं रुप फारच क्वचित दिसे. दारुवरुन दिनूकाकाला शिव्या घालत ते पुन्हा त्याच्यावर धावून गेले, तशी रेशमाआजी मध्ये पडली. नानांचा हात पकडून ती कडाडली, 'नाना, बस झालं. तो दारु प्यालाय, आणि तूही. कुठचा तरी राग त्याच्यावर काढू नकोस. सोड त्याला!'

नानांनी चिडून आजीकडे, नानींकडे आणि खाली पडलेल्या दिनूकडे पाहिलं. आणि ते तरातरा निघून गेले. नानाही दारु पितात, हे तर मला माहीतच नव्हतं. तो दिनूकाका कसाही असला, तरी आजचा नानांचा अवतार मला अजिबात आवडला नाही.

सभेत भाषण करणारे नाना कसे अगदी भव्य पडद्यावरच्या हिरोसारखे दिसायचे. आज ते सिनेमातल्या जुगारी अड्ड्यावर मारामारी करणार्‍या गुंडासारखे वाटले.

***

शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमाला तर राघोनाना असायचेच असायचे. शाळेत तर त्यांना खूपच मान होता. ते आले की सार्‍या शिक्षकांची खूपच धावपळ उडे. संस्थेच्या मागे लागून त्यांनी आमच्या शाळेत कितीतरी सुधारणा केल्या होत्या. समाजदिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी विद्यार्थांना ते बक्षिसे वाटायचे. असाच एकदा शाळेत एक कार्यक्रम झाल्यावर निबंधस्पर्धेत मिळालेलं बक्षिस मी घरात दाखवलं. त्यानंतर आईने आठवण करून दिली आजच्या वर्तमानपत्रात 'हॅलेचा धुमकेतू' यावरच्या निबंधस्पर्धेचा निकाल येणार होता.

मी तसाच धावत वाड्यात गेलो, तर ओसरीत रमाकाकाची मुलं खेळत होती आणि माजघरात कामाची गडबड. ओसरीत पेपर दिसला नाही, म्हणून नानींच्या खोलीत गेलो, तर तिथेही नव्हता. नानी मळ्यात गेल्याचं कुमुदकाकुने सांगितलं. नाना वरती असतील असंही सांगितलं. वर जावे की नाही असा विचार करत होतो, तेवढ्यात नानांचा आवाज आल्यासारखं वाटलं, म्हणून त्या लाकडी पायर्‍या चढून वर जाऊ लागलो.

जिन्याला जिथं वळण होतं, तिथे मला नाना आणि उमाकाकु दिसले. तिला अगदीच जवळ घेऊन ते उभे होते. तिच्या बांगड्याचा हलका आवाज मला आता थेट अंगणापर्यंत ऐकू जाईल इतका मोठा वाटला.

दोघांनाही मी आल्याचे कळलं नव्हतं. मी तसाच मागे फिरून खाली आलो. घरात येताना मला जाणवलं, आजवर इतक्या माणसांच्या त्या घरात एकदाही नाना आणि उमाकाकूला बोलत असताना मी पाहिलं नव्हतं. घरात येऊन मी पुस्तक उघडून बसलो, पण मला खूप घाम आल्यागत वाटले, म्हणून मी पुस्तक ठेऊन डोळे मिटून बसलो.

सिनेमाचा हिरो करतो तसं सरळ, सगळ्यांना छान वाटेल असं सारी माणसं का करत नसावीत, असा विचार चमकून गेला. नानांचा कितीही विचार केला, तरी मला ते कळतच नव्हते. आता मला ते त्यांच्या विहिरीसारखेच आहेत, असं वाटलं. कितीही बघितलं, तरी त्या विहिरीच्या खोलीचा अंदाज आम्हाला आजवर आला नव्हता, तसंच काहीसं.

त्यानंतर बरेच दिवस मी नानांच्या घरात गेलोच नाही. खरं तर मला आता तिथं जायचीच भीती वाटू लागली. नानांची, आजीची, नानींची, उमाकाकूची, दिनूकाकाची. सार्‍यांचीच.

दिनूकाका तर माणसात नसल्यागतच आजकाल वागायचा. संध्याकाळी बाहेर बसूनच तो घरातल्यांनाच नव्हे, तर सगळ्या जगाला शिव्या द्यायचा. एक दिवस तो दारुच्या नशेत द्राक्षांना फवारण्याचे कोणतेतरी औषध प्याला आणि सार्‍यांची धावपळ उडाली. तोंडातून फेस येत असलेला तो मला आयुष्यात पहिल्यांदाच फार केविलवाणा वाटला. रमाकाकाने त्याला गाडीत घालून मोठ्या दवाखान्यात नेलं. महिन्याने तो परत आला, तेव्हा त्याचं तोंड कायमचं वाकडं झालं होतं आणि शिवाय त्याचं नीट बोलणंही बंद झालं होतं. बोलला तरी कुणाला फारसे कळेना. मरता मरता वाचला, असं आवल्या म्हणत होता. त्याला बघून मला तर त्याची दयाच आली, आणि पोटात मळमळूनही आलं.

मला कसं तरीच झालं, आणि न राहवून मी एकटा नानांच्या विहिरीवर जाऊन बसलो.

***

एकदा रात्री लाईट नव्हते म्हणून आम्ही बाहेर अंगणात आवल्याने पाहिलेल्या एका सिनेमाच्या गप्पा ऐकत बसलो होतो. तेवढ्यात समोर वाड्यात घरघर करत जीप आली. ड्रायव्हरच्या ऐवजी कुणीतरी बाईच उतरली, म्हणून आम्हाला नवलच वाटलं. रेशमाआजीने बत्ती आणून पाहिले, तर नाना जवळजवळ बेशुद्धावस्थेत शेजारच्या सीटवर मान टाकून पडले होते. रमाकाका आणि एका गडीमाणसाने आधार देऊन नानांना बाहेर काढले. नाना भयंकर दारु प्यायले होते. इतकी दारु आजवर फक्त दिनूकाकानेच प्यायलेली मी पाहिली होती.

निराश होऊन गळून गेल्यागत नानी हे सारे पाहत होत्या. रेशमाआजी काही तरी विचारणार, तेवढ्यात त्या बाईनेच उत्तर दिलं, 'ड्रायव्हर कुठेय माहिती नाही. नानांना अशा अवस्थेत इतर कुणी बघणे बरं नाही. मीच शेवटी गाडी चालवत आणली.'

मग तिने वळून नानींकडे पाहिले. बत्तीच्या उजेडात ती किंचित हसल्यासारखी मला दिसली. मग जीपमध्ये बसून ती निघून गेली. आवल्या माझ्या कानात हळूच म्हणाला, 'ही मंगल. सहा महिन्यांपासून हिची चर्चा चालू आहे!'

नक्की काय आणि कसली चर्चा चालू आहे, ते मला काही कळलं नाही. मी नानींकडे पाहिलं, तर त्यांचा गोर्‍या-गव्हाळ रंगाचा चेहरा शांत, मंदिरातल्या देवीसारखा दिसत होता. सारे हळूहळू आत निघून गेले, तरी बत्ती हातात घेऊन त्या मूर्तीसारख्या निश्चल होऊन कितीतरी वेळ जीप गेली त्या दिशेकडे बघत होत्या.

एखाद्या शांत संध्याकाळी राघोनानांची विहीर दिसायची, तशा मला त्या दिसत होत्या.

***

पुन्हा कसल्या तरी निवडणूका लागल्या तसे राघोनानांचे दौरे वाढले. महाराष्ट्रातल्या कितीतरी जिल्ह्यांमधून ते वादळासारखे फिरू लागले. ते आजकाल आठवडेच्या आठवडे बाहेरच असत. घरी आले, तरी एखादाच दिवस किंवा थोडाच वेळ. गावात आणि बाहेरही त्यांच्या खूप सभा झाल्या. सार्‍या पेपरांतून याबद्दल सारे काही छापून येत होते, ते मी नेमाने वाचत होतो.

एक दिवस सोसाट्याच्या वार्‍यासारखी एक बातमी गावात येऊन धडकली. मुंबईजवळ कुठे तरी एका मोठ्या रस्त्यावर राघोनाना अपघातात गेले. काहीच वाचलं नाही. गाडीही नाही. नानाही नाही.

आवल्याने मला नंतर सांगितलं, त्यावेळी गाडीत ती मंगलही होती आणि तीही मेलीच. पण पंचनामा करताना पोलिसांनी ते लिहिलं नाही.

नानांचं प्रेत गावात आलं तेव्हा प्रचंड खळबळ माजली. सार्‍या गावात रडारड झाली. समोरचा अख्खा वाडा कोसळून पडल्यागत नानांच्या अंगावर पडून रडू लागला.

नानांना मळ्यात नेलं. त्यांना त्यांच्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ घातली आणि त्यानंतर पुढे स्मशानात नेलं. तिथं मात्र मी गेलो नाही. रिकामा झाल्यागत तिथंच विहिरीच्या कट्ट्यावर बसून राहिलो. तसं बसून शेवटी कंटाळा आला, म्हणून उठून डोकावून विहिरीत बघितलं, तर त्यातलं पाणी तसंच शांत, संथ आणि तळ नसलेलं दिसत होतं.

***

त्यानंतर आठवड्याभरात पेपरांत बातम्या आल्या- नानांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला होता. जिकडे तिकडे नानांचे फोटो दिसत होते. शिवाय श्रद्धांजली. त्यांचे अनेक उमेदवार निवडून आले होते. पण नाना आता नाहीतच, तर ते लोक नक्की काय करणार हा प्रश्न मात्र मला पडून राहिला.

एक दिवस शाळेतून घरी आलो, तेव्हा आई गलबलल्यासारखी आणि कुठेतरी घाईने जाण्याच्या तयारीत दिसली. विचारल्यावर म्हणाली, नानींनी विहिरीत जीव दिला पहाटे.

मी धावतच विहिरीवर गेलो, तर नानींना बाहेर कधीच काढलं होतं, आणि आजूबाजूला प्रचंड कल्लोळ माजला होता. मी जवळ जाऊन नानींच्या चेहेर्‍याकडे पाहत राहिलो. तर त्यात काहीच फरक नव्हता. तसाच शांत, निश्चल, देवीच्या मुर्तीसारखा.

मी पुन्हा विहिरीजवळ गेलो, तर ती एखाद्या सिनेम्यात नुकताच खुन करून आलेला एखादा वाईट गुंड दिसावा, तशी दिसत होती. पण तरीही शांत, संथ. मी जीव खाऊन विहिरीत एक मोठा दगड टाकला. आता तरी तिने हलून तळ दाखवावा, असं मनापासून वाटलं.

धप्पकन आवाज करत दगड विहिरीत पडला. पाण्यात थोडी खळबळ झाली. आणि मग दगडाच्या आवाजाचे प्रतिध्वनी येत राहिले.

मी पाण्यात एकटक बघत राहिलो. खळबळ बंद झाली. आणि काळ्याशार पाण्यावर शिल्लक राहिलेल्या गोल गोल तरंगांवर माझा चेहेरा वेडावाकडा होत विहीरभरून फिरत राहिला.

***

संपूर्ण
***

गुलमोहर: 

सुरेख! सातवीतल्या मुलाच्या नजरेतून एका राजकारणी प्रस्थाचे व्यक्तिचित्रण ही कल्पनाच अफाट आहे.
राघोनानांचं मूळरुप एकेका कंगोर्‍याने पाहात पाहात अगदी त्या विहीरीच्या तळाशी जाऊन पोचण्याचा प्रवास केवळ पाहत राहण्यासारखा.. त्या शांत निश्चल देवीच्या मूर्तीसारखा!
शेवटच्या वाक्याने काय परिणाम साधलाय हे शब्दात सांगणं अवघड आहे. तो क्षण तसाच गोठवून ठेवावासा वाटतो.

अप्रतिम शब्दच नाहीत. कुठेच काही राहिल्यासारख वाटत नाही. भाषा, शैली आणि वेग सगळच जुळुन आलय. पुलेशु

अप्रतिम,
> शेवटच्या वाक्याने काय परिणाम साधलाय हे शब्दात सांगणं अवघड आहे. तो क्षण तसाच गोठवून ठेवावासा वाटतो.

आशूडी अगदी, अगदी. !

तू खूप सुरेख लिहितोस साजिर्‍या !
कथा वाचून नक्की काय वाटतं आहे ह्याचा नीटसा थांग लागत नाहीये.
मी पाण्यात एकटक बघत राहिलो. खळबळ बंद झाली. आणि काळ्याशार पाण्यावर शिल्लक राहिलेल्या गोल गोल तरंगांवर माझा चेहेरा वेडावाकडा होत विहीरभरून फिरत राहिला. >>> हे असंच काहीसं वाटत असावं !

साजिरा.... केवळ अप्रतिम.
<<मी जीव खाऊन विहिरीत एक मोठा दगड टाकला. आता तरी तिने हलून तळ दाखवावा, असं मनापासून वाटलं<<>>
जबरदस्तं.... खरंच

साजिर्‍या - फारच 'जिवंत' लिहिल आहे.

अवांतरः काळाच्या दृष्टीने 'रेशमा' हे नाव विसंगत दिसते का?

वा! सुरेख एकदम.

मी पुन्हा विहिरीजवळ गेलो, तर ती सिनेम्यात नुकताच खुन करून आलेला एखादा वाईट गुंड दिसावा, तशी दिसत होती. पण तरीही शांत, संथ. मी जीव खाऊन विहिरीत एक मोठा दगड टाकला. आता तरी तिने हलून तळ दाखवावा, असं मनापासून वाटलं.>> हे एकदम खास .

मी पाण्यात एकटक बघत राहिलो. खळबळ बंद झाली. आणि काळ्याशार पाण्यावर शिल्लक राहिलेल्या गोल गोल तरंगांवर माझा चेहेरा वेडावाकडा होत विहीरभरून फिरत राहिला.
<<<<
साजिर्‍या, अप्रतिम कथा! हे शेवटचं वाक्य जमून आलंय अगदी.

Pages