गुमनाम है कोई

Submitted by स्वप्ना_राज on 23 June, 2010 - 02:48

अंधारी रात्र. त्यातून मुसळधार पाऊस. एक तरूण एकटाच गाडी चालवत निघालाय. अचानक रस्त्याच्या मधोमध पांढरी साडी नेसलेली एक बाई उभी दिसते. चमकून तो गाडी थांबवतो. ती बाई लिफ्ट मागते. दरवाजा उघडून ती आत बसते आणि इतका वेळ व्यवस्थित चालणारे वायपर्स बंद पडतात. तरूण चक्रावतो. आता ह्या धुवांधार पावसात गाडी कशी चालवणार? एव्हढ्यात ती बाई म्हणते "मला तर रस्ता लख्ख दिसतोय. मी सांगते, तुम्ही चालवा". गाडी चालवता चालवता तो तरूण तिच्याकडे मधून मधून पहात रहातो. मनात येणारी शंका दूर सारत रहातो. शिकली-सवरलेली माणसं अश्या गोष्टींवर विश्वास ठेवतात थोडीच? अचानक ती बाई गाडी थांबवायला सांगते. तिला उतरायचं असतं. ती उतरते मात्र, गाडीचे वायपर्स परत चालू होतात. आता हया सुनसान रस्त्यावर ही उतरून कुठे जाणार म्हणून चक्रावलेला तो तरूण पहातो तर समोर एका कबरिस्तानाचा दरवाजा करकर करत उघडत असतो - तिच्यासाठी.

काय? ओळखलात का हा हिंदी चित्रपट? तुमचं उत्तर "वो कौन थी" असेल तर तुम्हाला १०० पैकी १०० मार्क! भुताखेतांच्या, रहस्यमय वाड्यांच्या किंवा अगदी उकल न झालेल्या खुनाच्या कहाण्या कोणाला आवडत नाहीत सांगा? अश्या अनेक कथानकांवर फार सुरेख हिंदी चित्रपट येऊन गेले. साधना आणि मनोज कुमार ह्यांच्या भूमिका असलेल्या "वो कौन थी" मधलं असंच एक Haunting गाणं - नैना बरसे रिमझिम रिमझिम. पांढर्‍याधोप बर्फाच्या चादरीवर तितकीच पांढरीशुभ्र साडी नेसून फिरणारी साधना किती गूढ वाटते ते पहा तरी.

एकमेकांना न ओळखणार्‍या १० माणसांना एका बेटावरच्या आलिशान वाड्यात रहायला बोलावलं जातं. प्रत्यक्षात त्या वाड्यावर त्यांच्याव्यतिरिक्त आणखी कोणीच नसतं. आणि मग त्यांच्यातील एकेका माणसाचा खून होत जातो. संशयाचं धुकं गडद होत जातं. अ‍ॅगथा ख्रिस्तीच्या And Then There Were None ची ही कथा. ह्यावर साधारणपणे बेतलेल्या कथानकाचा एक हिंदी चित्रपट १९६५ साली येऊन गेला. ओळखा पाहू. नाही ओळखता येत? एक क्लू देऊ? हैदराबादी लहेज्यात बोलणारा महमूद. बरोब्बर! ह्या चित्रपटाचं नाव होतं "गुमनाम". एका क्लबातल्या काही सभासदांना एका स्पर्धेत जिंकल्याचं बक्षिस म्हणून व्हेकेशनसाठी पाठवण्यात येणार असतं. त्यांना घेऊन जाणारं विमान बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीसाठी एका निर्जन बेटावर उतरवण्यात येतं. पाय मोकळे करायला हे प्रवासी (नंदा, हेलन, मदन पुरी, प्राण, धुमाळ, तरूण बोस आणि मनमोहन) आणि विमानाचा एक पायलट (मनोज कुमार) बाहेर पडतात. विमानाच्या उड्डाणाचा आवाज येतो म्हणून परत येऊन पहातात तर त्यांना न घेताच विमान निघून गेलेलं असतं. त्या बेटावर रहाण्याचं ठिकाण शोधत असताना अचानक एक गाणं ऐकायला यायला लागतं. कोण गातंय हे मात्र दिसत नसल्यानं सगळे चक्रावून जातात. त्यातून गाण्याचे शब्द असे की त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलंय ह्याची स्पष्ट कल्पना यावी. हे गाणं आहे - गुमनाम है कोई. ऐकून तर पहा - "आज अगर तुम जिंदा हो तो कल के लिये माला जपना' हे शब्द अंगावर कसा शहारा आणतात ते.

तुम्ही Sir Arthur Conan Doyle चं The Hound Of The Baskervilles वाचलं असेलच. एका पूर्वजाच्या हातून झालेल्या गुन्ह्यामुळे ह्या घराण्याला एक शाप असतो. घराण्यातला प्रत्येक पुरुष एक भयंकर अमानवी कुत्रा दिसल्यावर मरण पावत असतो. काका सर चार्लसच्या म्रृत्यूनंतर घराण्याचा शेवटचा वंशज तरूण सर हेन्री त्याच्या पूर्वजांच्या वाड्यात येतो. ह्या कथानकाशी साधर्म्य सांगणारी कथा आहे १९६२ सालच्या एका चित्रपटाची. कुंवर विजय (विश्वजीत) हाही घराण्याचा शेवटचा वंशज. ह्याआधीचे सगळे कुंवर रहस्यमयरितीने मरण पावलेत. त्यांना म्रृत्यूकडे घेऊन जातो तो रात्री-बेरात्री ऐकू येणारा पैंजणाचा आवाज. कुंवर विजय आल्यापासून ह्या पैंजणाच्या आवाजाच्या जोडीला एक गाणंही ऐकायला येऊ लागतं. ह्या गाण्याची जबरदस्त दहशत गावकर्‍यांवर बसते. म्हणून तर ते ऐकू येऊ लागलं की बायका मुलांना घेऊन दरवाजे बंद करून घरात जातात. शेकोटीभोवती सुखदु:खाच्या गोष्टी बोलणारे गावकरी पळून जातात. आणि गावात सगळीकडे सामसूम होते. प्रत्येकाने स्वतःच्या म्रृत्यूला स्वतःच सामोरं जायचं असतं नाही का? मग तो राजा असो वा रंक. अंगावर काटा आणणारं हे गाणं आहे कही दीप जले कही दिल आणि ह्या चित्रपटाचं नाव आहे "बीस साल बाद".

जोअ‍ॅन जेव्हा लग्न होऊन तिच्या नवर्‍याच्या आलिशान वाड्यात येते तेव्हा तिला माहित नसतं की आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय. सगळे नोकर आणि विशेषतः हाऊसकीपर डॅनव्हर्स तिला जणू मालकीण मानतच नाहीत. पावलोपावली तिला आधीच्या मालकिणीची आठवण करून देण्यात येते. रहस्यमय रित्या मरण पावलेली ही जोअ‍ॅनच्या नवर्‍याची पहिली बायको जणू अजून तिथेच वावरत असते. हिचकॉकच्या "रेबेका" तलं हे जोडपं हिंदीत साकार केलं विश्वजीत आणि वहिदा रेहमान ह्यांनी. डॅनव्हर्सच्या भूमिकेत होत्या ललिता पवार. "ये नयन डरे डरे", "राह बनी खुद मंझील" आणि "ओ बेकरार दिल" ह्यासारखी एकाहून एक सरस गाणी असलेल्या "कोहरा" मध्ये आणखी एक गाणं आहे. कुमार सिंगच्या आधीच्या बायकोच्या रहस्यमय म्रृत्यूची कहाणी सांगणारं - झूम झूम ढलती रात.

तुमची गाडी अचानक बंद पडते. मध्यरात्रीची वेळ. त्यातून भोवती क्षणोक्षणी दाट होत जाणारं धुकं. तुम्ही टॉर्च घेऊन गाडीबाहेर पडता. जवंळपास एखादं घर दिसलं तर मदत मिळेल ह्या अपेक्षेने चालायला लागता. तुम्हाला घर दिसतंसुध्दा. पण त्या घराचा दरवाजा उघडाच असतो. तुम्ही आत जाता. समोर खुर्चीवर बसलेल्या माणसाकडे एक फोन करायची परवानगी मागता पण तो काहीच बोलत नाही. कदाचित त्याला झोप लागली असेल ह्या कल्पनेने तुम्ही त्याला हलवायला जाता आणि तुमच्या लक्षात येतं की तो जिवंत नाही. तुम्ही विलक्षण हादरता. तेव्हढ्यात तिथे असलेली एक तरूण स्त्री तुम्हाला दिसते - तिच्या हातात असतं एक पिस्तूल. तुम्ही काय कराल? तिथून निघून जाल का पोलिसांना फोन कराल? संजय खानला हाच प्रश्न पडतो . तो आपल्या पध्दतीने तो सोडवतोही. आणि त्यातूनच पुढचं नाट्य घडतं. बी.आर. चोप्रांच्या ह्या "धुंद' मधलं एक गाणं माझ्या फार आवडीचं आहे - संसार की हर शैका इतनाही फसाना है. जन्माला यायच्या आधी कुठे होतो आणि म्रृत्यूनंतर कुठे जाणार हेच मुळी माहित नसलेल्या मानवी आयुष्याची कहाणी सांगणारे "एक धुंदसे आना है, एक धुंदमे जाना है" शब्द ऐकून।इ तुम्हीही एक क्षण विचारात पडाल.

एक नामचीन हिरेचोर. एक पोलिस कमिशनरचा मुलगा जो ह्या हिरेचोराच्या मागावर आहे. आयुष्याचा खेळ बघा - दोघांचे चेहेरे एकदम सारखे. खरं रहस्य माहित आहे ते एका सुंदर मुलीला - शालूला. पण ती बोलू शकत नाही. नेमकं हेच सांगतंय १९६७ साली आलेल्या Jewel Thief मधलं - होठोंमे ऐसी बात. पहा बरं तुम्हाला तरी खरा Jewel Thief कोण आहे ते ओळखता येतंय का ते.

"झपाटलेला वाडा" हे शब्द नुसते ऐकले तरी लोकांचे कान टवकारतात. विश्वास असो वा नसो - जवळजवळ प्रत्येकालाच अश्या गूढ, अनाकलनीय गोष्टींचं आकर्षण असतं. म्रृत्यूनंतर काय ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर इतकी शतकं उलटून गेली तरी मिळालेलं नाही. त्यामुळे जिथे जीवन संपतं तिथून कोणी परत येऊ शकतच नाही ही खात्री कोणी द्यावी? ह्यातूनच जन्माला आल्या अनेक झपाटलेल्या वास्तूंच्या कहाण्या - पांढरी साडी नेसून केस मोकळे सोडून हातात दिवा घेऊन रात्री फिरणारी स्त्री, काळ्या रंगाचं मांजर, घड्याळात पडणारे बाराचे ठोके, वातावरण व्यापून टाकणारं धुकं आणि ह्या सगळ्या गूढतेला भारून टाकणारं एखादं गाणं. असाच कोणी एक तरूण आनुवांशिकतेने मिळालेल्या वाड्यात येतो. तिथे लावलेल्या अनेक वर्षांपूर्वीच्या एका पेटींगमध्ये आपला चेहेरा पाहून चक्रावतो. ह्या पेंटींगच्या मागे असते ताटातूट झालेल्या प्रेमिकांची कहाणी. मागल्या पानावरून गोष्ट पुढे चालू व्हावी तशी अचानक एक तरुणी मग त्या वाड्यात दिसू लागते. वाड्यातल्या बागेतला झोपाळा पुन्हा एकदा झुलायला लागतो. आणि एक गाणं ऐकायला यायला लागतं - आयेगा आनेवाला. हिरो अशोककुमारबरोबर आपणसुध्दा हवालदिल होतो.

शेखर हा एक पोलिस इन्स्पेक्टर. त्याचा संपादक मित्र काही महत्त्वाची बातमी द्यायला त्याला एके दिवशी आपल्या ऑफिसात बोलावतो. शेखर तिथे पोचतो तेव्हा त्या संपादकाचा खून झालेला असतो. ह्या खूनाचा तपास करता करता आणखी एक खून होतो आणि त्याचा आळ मात्र शेखरवरच येतो. आता खर्‍या गुन्हेगाराचा शोध लावणं आणखी गरजेचं होऊन बसतं. कारण नुस्तं कर्तव्य नाही तर आता हा त्याच्या आयुष्याचा प्रश्न बनलेला असतो. ह्यात मदत असते ती त्याच्या प्रेयसीची आणि सत्याची कल्पना असणार्‍या तिच्या डान्सर मैत्रिणीची. 'सीआयडी' ह्या चित्रपटातलं देव आनंद (इन्स्पेक्टर शेखर) आणि वहिदा रेहमान (डान्सर) ह्यांच्यावर चित्रित झालेलं एक गाणं चित्रपटाची कथा पुढे न्यायला खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हे गाणं आहे - कहीपे निगाहे कहीपे निशाना.

रहस्य कितीही अनाकलनीय का असेना पण प्रत्येक चित्रपटाच्या शेवटी त्याची उकल होतेच होते. आयुष्याचं मात्र तसं नाही. पडणारे सगळेच प्रश्न विचारता येतातच असं नाही, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळतातच असं नाही आणि मिळाली तरी पटतातच असंही नाही. जवळपास सगळ्याच आयुष्यांची कहाणी "कुछ कटी हिम्मत-ए-सवाल मे उम्र, कुछ उम्मीद-ए-जवाब मे गुजरी" ही अशी:-)

म्हणूनच अश्यावेळी वाटतं की बाहेर धुवांधार पाऊस पडत असावा. भर दिवसा अंधारून आलेलं असावं. सोबत आवडीची मित्रमंडळी असावीत. चहाचे वाफाळलेले कप असावेत. एकदम विजेचा लखलखाट व्हावा, मागोमाग ती कडाडल्याचा आवाज. आणि तीच सम साधून टीव्हीवरच्या चित्रपटात गाणं सुरू व्हावं - गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है वो, अनजान है कोई"!

-----

वि.सू.१ - ह्या लेखात काही गाणी निसटून गेली असतील. पण ज्याला Top of the Mind Recall म्हणतात तसं आठवली त्या क्रमाने गाण्यांबद्दल लिहिलं आहे ह्याची नोंद क्रृपया घेणे Happy

वि.सू.२ - काही तपशील चुकले असतील कारण ह्यातले बरेचसे चित्रपट पाहून अनेक वर्ष झाली आहेत. चुकीबद्दल क्षमस्व.

-----

ह्याआधीचं असंच लिखाणः

१. मेघा छाये आधी रात
२. जनम जनमका साथ है

गुलमोहर: 

सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.

धुंद सोडुन बाकीचे सगळे चित्रपट पाहिलेले आहेत. Happy

कही दिप जले कही दिल हे माझे आवडते गाणे आहे. तशी ही भुतवाली गाणी सगळ्यांच आवडतात कारण एक गुढ वलय असतं त्याभोवती. गाणी ऐकताना त्यातले गुढ परत जागे होते. यातले काही चित्रपट मी एकापेक्षा जास्त वेळा पाहिलेत तरीही तो पहिला थरार काही जात नाही. भिती वाटते ती वाटतेच.

वो कौन थी मध्ये ती आत बसल्यावर वापयर्स बंद, नंतर ती उतरल्यावर परत चालु. शेवटी सगळ्या रहस्याचा उलगडा होतो पण हे रहस्य मात्र गुलदस्त्याच राहिले.. बहुतेक वायपर्समध्येच काहीतर गोची होती.

तु गाण्यांवर लिहिलेयस त्यामुळे इथे अस्थानी , तरीही -- कोहरा जाम फसलेला. मुळ कल्पनेला भारतीय साज चढवायचे काम नीटसे जमले नाही. पण गाणी काय क्लास होती.... त्या मानाने बीस साल मुळ कथेच्या मानाने बराच बरा होता... (म्हणजे कथेपेक्षा बरा नव्हे तर अ‍ॅडॅप्टेशन बरे जमलेले). मी मुळ कथा वाचताना पण तेवढीच घाबरलेले.. Happy

सुरेखच ! अनुक्रमे साधना, नंदा, वहिदा रेहमान, झीनत अमान, वैजयंतीमाला आणि या सर्वांवर कडी करणारी मधुबाला--- हिंदी चित्रपटसृष्टीविषयी अतोनात प्रेम करायला लावणार्‍या या नायिका आणि लेखिकेने उल्लेख केलेले बहुतांशी सर्व चित्रपट हे नायकप्रधान असूनही निव्वळ यातील "हॉन्टिंग मेलोडी"मुळे चित्रपटापेक्षा यातील या सर्व "रहस्यमय" नायिकाच ल़क्षात राहतात.

"वो कौन थी" मधील इथे ज्या गाण्याबद्दल लिहिले गेले आहे, ते थीम साँग असल्यामुळे महत्वाचे आहेच तरीदेखील काळजात घर करते ते अन्य एक "जो हमने दास्तां अपनी सुनायी....". बीस साल बाद बद्दल मात्र तुलनेला वाव नाही कारण "कही दीप जले" याला तोडच नाही. का कोण जाणे पण बीस साल बाद जसा इथे रुचला, खपला, गाजला तसा याच टीमचा "कोहरा" का फसला हे समजू शकले नाही. कदाचित "रेबेका" चे पडद्यावर कधीच न येणे ही बाब हॉलीवूडला जशी भावली तशी भारतीय प्रेक्षकाला भावली नसावी. यातील एक हसरे गाणे "ओ बेकरार दिल हो चुका है मुझे आँसुओसे प्यार" हे लतादिदीचे अप्रतीम गाणे नेहमी ऐकण्यासारखे असेच आहे.

"गुमनाम" चे यश तर सांघीक सादरीकरणाचा एक चांगला नमुना म्हणावा लागेल. ८ व्यक्ती आणि सर्वांना कथानकात समान महत्व. संगीत, त्या निर्जन बेटाची फोटोग्राफी, रहस्यातील नावीन्यता (अगोदरच्या एका गुन्ह्याबद्दल सर्वाना एकत्र आणायचे व पाळीपाळीने यमसदनाला पाठवायचे), मेहमूदची धमाल आणि या सर्वांपेक्षा लताची ती पुकार !

"ज्युवेल थीफ" मधील कथानकाची गती हाच त्याचा मर्मबिंदू आहे, जिचा किमयागार होता एकमेव विजय आनंद. अखेरच्या रिळापर्यंत "अमर" आणि "विनय" या दोन भिन्न व्यक्ती आहेत ही रहस्याची भावना सातत्याने ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हती पण विजय आनंद अशा प्रकारच्या कथाककात किती "मास्टर" आहे हे दिसते. तोच कित्ता त्याने "तिसरी मंझील" मध्येही गुंफला होताच.

"महल" बद्दल तर आणखीन काय लिहायचे? लता, मधुबाला ही दोन नावे या चित्रपटाशी अशी काय जोडली गेली आहेत की केवळ या चित्रपटाचे नाव जरी टाईप केले तर या दोघींची जादू नजरेसमोर येते.

"धुंद" आणि "सीआयडी" हे चित्रपट मी पाहिले नसल्याने त्यावर मत व्यक्त करता येत नाही, पण ज्या पध्द्तीने लेखिका स्वप्नाराज यांनी अप्रतिम भाषेत त्यांचे वर्णन केले आहे ते वाचून यांच्या डिव्हीडीज मिळवाव्यात असा मोह झाला आहे, आणि असे वाटणे हीच या लेखासाठी प्रशंसेची पावती आहे असे मी म्हणतो.

मी हे सर्व, अगदी धुंद सुद्धा बघितला आहे. गुमनाम मधले गाणे कोण गात होते, हे रहस्य
जरा तकलादू वाटले होते. पण सिनेमा खासच.यातली गाणी तर आजही भारुन टाकतात.

इत्तेफ़ाक आठवतोय का ? त्यात गाणे नव्हते पण नंदाच्या साध्यासुध्या इमेजचा सुंदर वापर
केला होता.

अमोल पालेकर, झरीना वहाब आणि विजयेंद्र घाटगे चा अगर नावाचा एक चांगला सस्पेन्स
सिनेमा होता. आशाचे एक गाणे पण खास होते.

अमोल पालेकर आणि शबाना आझमीचा एक सिनेमा होता, त्यात दोघांनी स्वत:च्याच भुमिका
केल्या होत्या, त्यात शबानाला झोपेत चालायची सवय असते.

दुसर्‍या एका सिनेमात पण अमोल पालेकर होता, त्यात रेल्वे मधे खून होत जातात. या तिन्ही
सिनेमात, अमोल पालेकरच्या भोळ्या इमेजचा छान वापर केला होता.

ऋषी कपूर आणि किमी काटकरचा पण खोज नावाचा उत्तम सिनेमा होता. त्याची बायको
हरवल्याची तक्रार घेऊन तो पोलिसांकडे जातो. आणि कीमी काटकर बायको म्हणून घरात
येते. शेजारी पाजारी, समाजसेविका, त्यांची छोटी मुलगी इतकेच नव्हे तर त्यांचा कुत्रा
सुद्धा, किंमीला ओळखतात, पण ऋषी कपूर मात्र तिला बायको मानत नाही, काय
असते रसस्य ? मिळाला कुठे तर अवश्य बघा. दोघांचाही वेगळ्या भुमिका.

Sir Arthur Conan Doyle चं The Hound Of The Baskervilles वाचलंय मी. या कथानकावर सिनेमा येऊन गेलाय हे मला माहीतच नव्हतं. Uhoh

पण मला ती कथा इतकीशी काही आवडली नव्हती. रहस्याचा पर्दाफाश ज्या पद्धतीने झालाय ते विशेष रुचले नाही मला. शेवटी खूप प्रश्न अनुत्तरीत राहिले. एक तर Sir Arthur Conan Doyle यांच्या होम्स कथांमध्ये रहस्यांच्या मूळाशी अमानवी कारणे कधीच नसतात, हे ठाऊक असल्याने या स्टोरीतला गूढपणा (म्हणजे व्हॅम्प्/आत्मा/भूत वगैरे) आधीच लुप्त झाला होता. शिवाय काही काही असंबद्ध प्रसंग रचून कथा खूप खेचत नेल्यासारखी वाटते. अगदी अध्ये मध्ये २-३ वेळा मला direct शेवट वाचून टाकावा की काय असे वाटले. अर्थात ते सर्व प्रसंग मुद्दाम उत्कंठा वाढविण्यासाठी घातलेले आहेत की जेणेकरून वाचकाच्या मनात रहस्यभेदाचे पुष्कळसे tracks निर्माण व्हावेत. पण तरीही कित्येक प्रसंगांच्या बाबतीतली वातावरणाची वर्णने फारच रटाळ वाटतात. अर्थात हे माझे स्वतःचे मत. पण छोट्या हलक्या फुलक्या होम्स कथा आवडतात वाचायला. डोक्याला जास्त शॉट नाहीत Proud (थोडं विषयांतर झालं पण क्षमा करा. Happy ) "बीस साल बाद" मी पाहिला नाहिये त्यामुळे काही comment नाही करणार.

बाकी लेख मस्त जमून आलाय. धुंद मी पाहिलाय. पण नेमके तपशील आता आठवत नाहीयेत.

कुणी खोज सिनेमा पाहिलाय का? ऋषी कपूर आणि किमी काटकर आणि नासिरुद्दीन शाह. मस्त सिनेमा. याच प्लॉट वर मध्यंतरी एक नाटकही येऊन गेलं. "केस नं ९९" नाव होतं बहुतेक त्या नाटकाचं.

ऋषी कपूर आणि किमी काटकरचा पण खोज नावाचा उत्तम सिनेमा होता

धुंद ची नेमकी हीच स्टोरी आहे आणि पुढे जाऊन ह्याच कथेवर मिथुन रंजीता आणि राखीचा चित्रपटही आला होता. मी धुंद पाहिला नाही तरी कथा माहित आहे Happy

अजुन एक भुतगाणे मला आवडते - पांढरा गाऊन घालुन हातात मेणबत्ती घेऊन हिरवीन गाणे गात भल्यामोठ्या महालात फिरत असते आणि भयचकित झालेला जगदीप तिच्यामागुन फिरत असतो ...
गाणे आता आठवत नाही, पण आहे एकदम मस्त, आठवले की टाकते इथ.. तोपर्यंत कोणाला माहित असल्यास....

अप्रतीम लेख स्वप्ना...तुझं जुन्या चित्रपटांचे ज्ञान एकदम अफाट आहे..आधीच्या काही लेखांतुनही ते समजते..त्यात ही बेफाम शैली..अगदी डोळ्यांसमोर उभा राहतो चित्रपट..मी हे बरेचसे चित्रपट अर्धे मुर्देच पाहिले आहेत Sad पण तुझ्या मागच्या ह्या तीनही लेखांतुन ह्या सगळ्या चित्रपटांच्या डी.व्ही.डीज्स घ्याव्यात असं वाटु लागलं आहे.

मस्तच गं स्वप्ना! अगदी ते वातावरण उभे केलेस! Happy

काही वर्षांपुर्वी आलेला म्हणजे १९९१ मधे ....अवॉर्डविनर 'घोस्ट' या हॉलीवुडपटाची कॉपी मारण्याचा उद्योग ही केला बॉलीवुडने ....ते ही राहुल राय नि बसक्या तोंडाची शीबा हिला घेऊन! "प्यार का साया' नावाचा चित्रपट ....पण काही जमला नाही!

'घोस्ट' मधे पॅट्रीक आणि डेमी मूर होते.... एक सुखी जोडपे, एका अनपेक्षीत हल्ल्यात पॅट्रीक चा मृत्यु होतो. आणि तो भूत बनुन डेमी मूरला पदोपदी वाचवतो..... तिच्याशी संवाद साधण्यासाठी तो एका स्पिरीच्युअ‍ॅलीस्टचा आधार घेतो.
हिन्दीत राहुल रॉय नि शिबा नावाच्या बद्दड अ‍ॅक्टर्सला बॉलीवुडने संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचे माती करत प्रेक्षकांना भारताच्या डेमी मूरपासुन वाचवले. नाही म्हणायला अमृता सिंग ने स्पिरीच्युअ‍ॅलीस्टचे काम त्यातल्या त्यात बरे केले होते.
तात्पर्य काय , हॉलीवुडपटांची जातकुळीच वेगळी असते...आपण उगाच त्याची कॉपी करु नये.

आर्या, काय घाण चित्रपटाची आठवण काढलीस!!! रागोवचा "रात" हा एक उत्तम जमलेला सिनेमा. नंतर त्याने भूत्.फूंक असले पिक्चर बनवण्यातच वेळ काढला.

जुन्या भूतवाल्या पिक्चरमधे गाणी हा एकदम सुंदर भाग. हल्लीच्या चित्रपटामधे तांत्रिक करामतीच जास्त असतात Sad

नैना बसरे रिम झिम माझं अत्यंत आवडतं गाणं. साधना खूप सुंदर दिसते या पिक्चरमधे!! गुमनाम पण खूप लक्षात राहिला होता तो त्यातल्या गाण्यामुळेच.

इत्तेफाकमधे गाणं एक पण नव्हतं.. पण स्टोरी खूपच वेगवान आणी खिळवून ठेवणारी होती.

मस्तच लिहिलयस गं स्वप्ना!
सगळीच सही गाणी आहेत ही. त्यातही "गुमनाम" माझं एकदम आवडतं गाण Happy

साधना तो नूरमहल,
संगीत जानी बाबू कव्वाल यांचे होते. सगळी गाणी सुमन कल्याणपूरची होती

मेरे मेहबूब न जा, आजकी रात न जा
होनेवाली है सहर, थोडी देर और ठहर

हे ते गाणे

आणखी एक होते

शराबी शराबी ये सावन का मौसम
खुदा की कसम, खुबसुरत ना होता
अगर इसमे रंगे मुहोब्बत ना होता

वाचल्याबद्दल आणि वाचून लगेच प्रतिक्रिया दिल्याबद्दल सगळ्यांचे खूप आभार Happy

साधना,अनुमोदन. कोहरा जाम फसलेला. पण गाणी कसली सुरेख. Happy "कही दीप जले" मात्र आजही खोलीत एकटं बसून पहायची माझी हिंमत नाही Happy महल मी मोठ्या अपेक्षेने पाहिला खरा पण माझा अपेक्षाभंग झाला होता. मुळीच आवडला नाही तो मला Sad

The Hound Of The Baskervilles मात्र मला फार आवडलेलं.

सुमेधा, माझं ज्ञान अफाट नाहिये ग. पण जे माहित आहे त्यावरच लिहिते म्हणून असं वाटत असेल Wink

मी_आर्या, घोस्ट मध्ये पॅट्रीक स्वेझी मस्त दिसलाय ना. त्याला मारलं तेव्हा डेमी मूरपेक्षा जास्त दु:ख मला झालं होतं Happy हिंदीत राहुल रॉय आणि शिबा?? ब्यॉक!

साधना, तू म्हणतेस ते गाणं राहिलं खरं पण त्या पिक्चरची मला काहीच माहिती नाही. नावही माहित नव्हतं ते दिनेशदांनी सांगितल्यावर कळलं. त्यात जगदीपला बघून मी जाम हसले होते. मला त्याची तेव्हापर्यंतची ओळख सुरमा भोपाली अशीच होती.

"भूत" पंगतीत आपले ताट मांडणारा व गुमनामच्याच आगेमागे आलेला मनोजकुमारचाच एक चित्रपट होता : "पूनम की रात". यातील अभिनेत्रीचे नाव आठवत नाही पण लतादिदींचे एक गाणे मात्र अप्रतिम असे होते "साथी रे ~~ तुजबिन जिया उदास रे, ए कैसी अनबुझ प्यास रे, आजा !!"

पॅट्रीक स्वेझीने सादर केलेला "घोस्ट" हा तर सर्वांना हवाहवासा झाला होता. डेमी मूरचे नाव याच चित्रपटाने सर्वत्र केले. असे असूनही भाव खावून गेली ती "व्हूपी गोल्डबर्ग". धमाल केली होती हिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने, विशेषत: तो सात दशलक्ष डॉलर इतक्या अवाढव्य रकमेचा चेक "चर्चला देणगी" द्यावयाचा प्रसंग येतो त्यावेळेची तिची घालमेल पाहण्यासारखी आहे. अत्यंत न्यायपूर्ण असे "ऑस्कर" तिला मिळाले होते.

आणखी एक चित्रपट होता. अशोक कुमार व राजेंद्र कुमार (आता नाव आठवत नाही, पण संगम मधे राजकपूरची बायको वैजयंतिमाला हिला चोरून नेणारा, नि 'मेरे मेहबूब' मधे काम करणारा!).

अशोक कुमार जज्ज असतो. राजेंद्र कुमार हिरो, वकील. त्याचे जज्जाच्या मुलीशी प्रेम प्रकरण असते. (असे वाटते. पण ते कधीहि झाडाभोवती फेर्‍या, पळापळ, एकमेकांना मिठ्या मारून गडबडा लोळणे असे प्रकार करत नाहीत. आजकाल मला वाटते प्रेम प्रकरण नसले तरी उगीचच असले सीन दाखवतात!))

शेवटच्या सीनमधे पुरावे असलेले ग्लास हिरो वकील फोडून टाकतो, उत्कंठा वाढते, पण हिरो खरे ग्लासेस आणून गुन्हेगार शोधून काढतो. आनि गुन्हेगार कोण असावा?

मला वाटते गाणे नसलेला तो सिनेमा, गाणे नाही म्हणून लक्षात राहिला आहे.

स्वप्ना छान लेख. मी हे सगळे चित्रपट पाहिले आहेत. वर्णन छानच!!!
झक्की मला वाटतं तो म्हणजे कानून. मी पाहिलाय असाच एक सिनेमा. त्यात एक थिएटर बॅले पण होता. हिन्दीत झालेला पहिला प्रयोग असावा बहुतेक. बराच चांगला होता तो सिनेमा. शेवट आठवत नाही पण.

त्यात जगदीपला बघून मी जाम हसले होते. मला त्याची तेव्हापर्यंतची ओळख सुरमा भोपाली अशीच होती.

वेरी सॅड.. ब-याच वर्षांपुर्वी जगदीपवर एक लेख वाचलेला. एक चांगला होतकरु अभिनेता काँट्रॅक्टच्या बंधनात अडकला आणि त्याच्या करीअरची वाट लागली असे काहीसे त्यात होते. भाभी चित्रपटात त्याचा बराच मोठा रोल होता. त्याचे कामही खुप छान झाले. पण नंतर सुरमा भोपाली म्हणुन तो अगदी भलत्याच दिशेने वाहावत गेला. Sad

दिनेश धन्यवाद.. मला माहित होते तुम्हीच उत्तर देणार ते... मी खुप डोके शिणवले पण गाणे आठवायलाच तयार नाही, गंमत म्हणजे 'होनेवाली है सहर, थोडी देर और ठहर' हे आठवत होते, पण पहिली ओळच आठवत नव्हती... Happy
स्वप्ना, मला वाटत नाही तो चित्रपट कोणी पाहिला असेल म्हणुन.. दुरदर्शनवर हे गाणे नेहमी लागायचे पण चित्रपट लावायची तसदी त्यांनीही घेतली नाही.

लतादिदींचे एक गाणे मात्र अप्रतिम असे होते "साथी रे ~~ तुजबिन जिया उदास रे, ए कैसी अनबुझ प्यास रे, आजा !!"

मलाही हे गाणे आठवले होते वरचे वाचताना. हे गाणे ऐकताना लताने अगदी घाईघाईत गायल्यासारखे वाटते... बहुतेक त्या भुताला नायकाला बोलवायची फारच घाई झाली होती Happy

वरील प्रतिसाद वाचता वाचता आणखीन एक "भुतीण" आठविली -- "ये रात फिर ना आयेगी" मधील परत त्याच पांढर्‍या शुभ्र साडीतील "शर्मिला टागोर" आणि परत तोच गोंधळून गेलेला नायक "विश्वजीत". यातील आशा आणि नय्यर यांची सुरेल संगत "यही वो जगह है, यही वो फिजा, यहीं पर कभी आप हमसे मिले थे" - चित्रपट फारसा आठवत नाही, पण हे गाणे मात्र आशा-नय्यर यांच्या "ऑल टाईम हिट" मधील जरूर आहे.

प्रतीक, त्यात मुमताज पण होती (पण भूत नव्हती )
मै शायद तूम्हारे लिये अजनबी हू, पण त्यातलेच ना.

मुहोब्बत कैसी हालत है, मुहोब्बत करके देखेंगे, हे पण त्यातलेच.

रिना रॉय चा पण होता एक भूत सिनेमा. गूंज, नाव होते त्याचे.
घोस्ट वरती आणखी एक सिनेमा आला होता, त्यात जयाप्रदा होती.

>>आणखी एक चित्रपट होता. अशोक कुमार व राजेंद्र कुमार (आता नाव आठवत नाही, पण संगम मधे राजकपूरची बायको वैजयंतिमाला हिला चोरून नेणारा, नि 'मेरे मेहबूब' मधे काम करणारा!).

राजेन्द्रकुमारच तो. हा चित्रपट कानून नसेल तर "अदालत" असेल. मी पाहिला नाहिये पण आईकडून स्टोरी ऐकली आहे. त्यात खटला चालू असतो आणि हळूहळू गुन्ह्याचा आळ एकेका व्यक्तिवर येत जातो. त्यातही जज अशोककुमारच होता बहुतेक.

>>"भूत" पंगतीत आपले ताट मांडणारा व गुमनामच्याच आगेमागे आलेला मनोजकुमारचाच एक चित्रपट होता : "पूनम की रात". यातील अभिनेत्रीचे नाव आठवत नाही

प्रतीक, ही बहुतेक कुमुद छुगानी असावी. ह्याही चित्रपटाबद्दल आईकडूनच ऐकलं आहे. पण ते गाणं मात्र झकास आहे खरंच. घोस्टबद्दल अनुमोदन. व्हूपी गोल्डबर्गने मस्त केलाय तो रोल. तो पेनी दरवाज्यातून आत सरकवयाचा सीनसुध्दा छानच.

>>आणि परत तोच गोंधळून गेलेला नायक "विश्वजीत

हे वर्णन विश्वजीतला त्याच्या बहुतेक सगळ्या चित्रपटात लागू पडावं Wink विश्वजीतचे इथे कोणी पंखे असतील तर सॉरी हं.

विश्वजीतचे इथे कोणी पंखे असतील तर सॉरी हं.

त्यला पंखे होते का कधी? तो हिरविनीपेक्षा गोड नाजुकसाजुक, मोजुनमापुन हसायचा, केसाचा भांग अजिबात न मोडता उघड्या गाडीतुन हिंडायचा. एका गाण्यात तो हिरवीन आणि बबिता की मालासिन्हा हिरो आहे, त्या गाण्यात तो हिरविनीपेक्षा गोड आणि नाजुक दिसतो.

त्यावेळी रफी, नौशाद, रवी, रोशन सारखी माणसे होती, म्हणुन विश्वजीत, जॉय मुकर्जी सारखे बाहुले तरले.. नाहीतर कधीच बुडाले असते.

स्वप्ना नॉस्टॅल्जिक केलंस बघ Happy

"महल" बद्दल तर आणखीन काय लिहायचे? लता, मधुबाला ही दोन नावे या चित्रपटाशी अशी काय जोडली गेली आहेत की केवळ या चित्रपटाचे नाव जरी टाईप केले तर या दोघींची जादू नजरेसमोर येते.>>>>

अगदी, अगदी. पण या चित्रपटाचा खरा नायक होते ते या चित्रपटाचे स्व. खेमचंद्र प्रकाश यांनी दिलेले संगीत. मधुबालाचं दैवी सौंदर्य, अशोककुमारचा रुबाबदार नायक आणि लताचा वातावरणाला एक गुढ आकार देणारा आवाज. कसलं जबरा काँबिनेशन होतं राव.

"एक मध्यमवयीन व्यक्ती बर्‍याच दिवसानंतर आपल्या गावी येते. गावातली प्रचंड हवेली विकण्यासाठी म्हणून. हवेलीतला गुढ नौकर.... मग तिथे जाणवणारे अमानवी अस्तित्वाचे भास. शेवटी असे सिद्ध होते की त्या व्यक्तीने काही वर्षापूर्वी त्या वास्तुच्या खर्‍या मालकाचा खुन केलेला असतो आणि त्या मालकाची आई आपल्या मृत मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळं घडवून आणत असते. शेवटी ती त्या व्यक्तीचा वध करते. "

अहं.. हा एक मराठी चित्रपट होता. त्या अपराध्याची भुमिका वठवणारे श्रीराम लागू आणि वाड्यातला गुढ नौकर बहुदा निळू फुले यांची मस्त जुगलबंदी रंगली होती त्यात. आईची भुमिका केली होती दस्तुरखुद्द नुतनजींनी आणि त्यांचा मुलगा झाला होता सचीन. चित्रपट होता १९७७ साली आलेला किशोर मिस्कीन यांचा "पारध", किशोर मिस्किन निर्मीत दिग्दर्शीत या चित्रपटाला स्व. राम कदम यांनी जबरदस्त संगीत दिले होते.

चंद्रशेखर गाडगिळ यांनी गायलेलं "अजुन आठवे ती रात पावसाळी" हे गाणं असाच फिल देवून जातं.

खुप वर्षांपुर्वी मी एक अशाच गुढ गाण्यांची कॅसेट ( हो कॅसेटच) घेतली होती...! गुमनाम पासुन कही दिप... वगैरे सर्वी गाणी होती त्यात. रात्री हायवे/ घाटातुन येतांना फोर व्हिलर मधे मुद्दाम लावायचो आम्ही ही गाणी !
त्यातले एक लताचे गाणे "अकेली हुं मै...पिया आ जा" असे काहीसे होते. पण का कुणास ठाऊक या गाण्यात सुरांमधे काहीतरी गडबड होती असं वाटायचं! गुढ अर्थाचा फील येत नव्हता.... Sad

मस्त वातावरणनिर्मिती केली आहेस स्वप्ना Happy

'धुंद' मूळ अगाथा क्रिस्तीचे पुस्तक आहे.. असलं अफलातून पुस्तक लिहिलंय की बास.. शेवट खुनी कोण आहे ते नाहीच कळत. धुंदही बर्‍यापैकी जमलाय.

'मधुमती'चे भूतही आवडते. आणि त्यातली गाणी!! Happy

>>>>>>ही बहुतेक कुमुद छुगानी असावी.>>>>

ही कोण कुमुद छुगानी? 'वासना' या चित्रपटातील? आणि पुनश्: त्या नशिबवान विश्वजीत बरोबरची नायिका"? असे असेल तर हे विश्वजीत महाशय खरोखरीच नशिबवान म्हटले पाहिजेत ! कारण संगीतकार..
नशीबाने याला (जॉय मुखर्जीसह) योग्य त्या काळात दिग्गज असे संगीतकार मिळाले.... जसे ओ.पी.नय्यर, एलपी.,रवि, एसडीबर्मन, एस.जे. आदी... ज्यांच्या जादुई संगीतामुळे हे हिरो तगून राहिले.

>>>>>>ही बहुतेक कुमुद छुगानी असावी.>>>>

ही कोण कुमुद छुगानी? 'वासना' या चित्रपटातील? आणि पुनश्: त्या नशिबवान विश्वजीत बरोबरची नायिका"? असे असेल तर हे विश्वजीत महाशय खरोखरीच नशिबवान म्हटले पाहिजेत ! कारण संगीतकार..
नशीबाने याला (जॉय मुखर्जीसह) योग्य त्या काळात दिग्गज असे संगीतकार मिळाले.... जसे ओ.पी.नय्यर, एलपी.,रवि, एसडीबर्मन, एस.जे. आदी... ज्यांच्या जादुई संगीतामुळे हे हिरो तगून राहिले.

स्वप्ना, मस्त लेख!! तू हे असे लेख छान लिहीतेस.. Happy

घोस्ट!! कसला सुंदर पिक्चर आहे तो. एकनएक फ्रेम आठवते अजुनही..
पॅट्रिक स्वेझी तर इतका आवडायचा मला! ( तो नाचतोही अशक्य सुंदर! डर्टी डान्सिंगमधला त्याचा लॅटीन डान्स आठवला.) गेला बिचारा मागच्या वर्षी..

आर्या, ते गाणे आशाचे आहे
मै खुद हु चंद्रमुखी, चमक से डरती हु

अशी सुरवात आहे ना ?
अत्यंत अवघड गाणे आहे ते, एकंदर १६ राग वापरले आहेत त्या गाण्यात.

तुझे हे असे लेख आले की वाचल्याशिवाय राहवत नाही.... वाचलं की दाद दिल्याशिवाय!
झकास जमून लिहितेस. आणि त्या गाण्यांची लिन्क असल्याने पुनःप्रत्यय....
बहोत खूब.

Pages