वेदकालीन संस्कृती भाग १

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

संस्कृती म्हणजे काय?

भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात. अगदी शाब्दिक अर्थ न घेता रुपकात पाहिले तर इतर देशांपेक्षा भारत हा देश प्रगत होता असा त्याचा अर्थ सहज निघावा. कुठलाही देश प्रगत होण्यासाठी तेथे राहणारा समाज इतर चांगले विचार अंगिकारणारा असावा लागतो. आपली भारतीय वैदिक संस्कृती प्राचीन संस्कृतींपैकी एक प्रगत संस्कृती मानली गेली आहे. कुठल्याही संस्कॄतीची वाढ ही परिवर्तन झाल्याशिवाय होत नाही, तसेच ही संस्कृतीही त्याला अपवाद नसावी.
रानटी समाज जाऊन प्रगत समजाव्यवस्था तयार व्हायला काही हजार शतके लागली असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही, पण आपला इतिहास जेवढा जुना आहे तेवढा आज तरी माहित असलेल्या जगात तेवढा जुना इतिहास आपल्या संस्कृतीशिवाय आणखी एक दोन संकृतींचाच आहे. मुळात संस्कृती म्हणजे काय?

संस्कृती : माणूस व्यक्तिशः व समुदायशः जी जीवनपद्धती निर्माण करुन अंगिकारतो, आणि स्वतःवर व बाह्य विश्वावर (जनसमुदाय, निसर्ग ) संस्कार करुन जे अविष्कार निर्माण करतो ते करण्याची पद्धत व तो अविष्कार म्हणजेच त्या समुदायाची संस्कृती होय. थोडक्यात निसर्गावर विजय मिळविन्याचा क्रम म्हणजे संस्कृती. आधिभौतिक व आध्यात्मिक असे संस्कृतीचे दोन भाग आहेत. साधारण आपण असे म्हणू शकतो की ज्या क्रियेने बाह्य विश्वावर बदल घडून येतो ती भौतिक संस्कृती व ज्याने माणसात, त्याचा अंतर्मनावर संस्कार / बदल घडून येतो ती आध्यात्मिक संस्कृती.

माणूस शहाणा झाल्यापासून तो निसर्गाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, निसर्गावर विजय मिळविण्यास तो प्रगतिशील आहे. निसर्गाच्या जडणघडणीला कोण जबाबदार आहे? देव नावाची गोष्ट असावी काय? असल्या्स तिचे ऊद्दीष्ट काय? हे प्रश्न माणसाला तो शहाणा झाल्यापासून पडत आहेत. माणसाचा भौतिक गरजा भागल्या की त्याला वेध लागतात, ह्या विश्वाचे रहस्य जाणून घेण्याचे, तो मग ह्या विश्वकर्त्याच्या शोधास निघतो व त्यातून त्याला कळेल ते तत्वज्ञान निर्माण व्हायला सुरू होते आणी हिच आध्यात्मिक प्रगती होण्याची नांदी होय. संस्कृतीच्या आध्यात्मिक भागात धर्म, निती, कायदा, कला, साहित्य, मानवी सदगुण आणि शिष्टाचार ह्यांचा अतंर्भाव होतो.

ह्या जडणघडणीत मानवाने विवाहसंस्था, आर्थिक संस्था, सामाजिक जीवन इ. नियम निर्माण केले. माणसामाणसामधील संबंध, एका समुहाचे दुसर्‍या समुहाशी संबंध हे प्रस्थापित झाले. प्रत्येक संस्कृतीत परिवर्तन निर्माण होत असते, त्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात, जसे युद्धकाल, शांतीकाल,जेते व जीत ह्यांची एकमेकांशी वागणूक इ इ. शिवाय कोणत्याही संस्कृतीच्या प्रगतीच्या कालखंडात जे काही असते त्याचे मूल्य त्या कालखंडापुरते मर्यादित असते. असायला पाहिजे. युग बदलले की मुल्ये बदलतात. म्हणजे संस्कृतीची जडणघडण ही कायम होत असते. एकदा चांगली असलेली संस्कृती एखाद्या रानटी समुहा बरोबरीच्या युद्धात जर हारली तर त्यात होणारे बदल हे त्या संस्कृतीला त्याकाळाच्या मागे नेणारे ठरतात तर प्रगत समुहाबरोबर युद्धात हारली तर पुढे नेणारे ठरतात.

भारताची संस्कृती म्हणजे काय? ती ह्या जडणघडणीतून मुक्त असेल काय? उत्तर साहजिकच नाही असे येते. ज्ञात कालापासून ते आजपर्यंत आपली संस्कृती बदलत गेली आहे, कारण मुल्ये ही त्या युगापुरती असतात हे आपण आधीच मांडले आहे, तसाच परकीय आक्रमणाचा देखील आपल्या संस्कृतीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
वैदिक कालखंड जर शून्य असे पकडले तर त्यानंतर जैन धर्म स्थापना, बौद्ध धर्म स्थापना हे वैचारिक बदल तर शक, हुण, यवन आणि म्लेच्छ ही आक्रमणे आपल्या संस्कृतीने पचविली आहेत. त्यातिल पहिले दोन बद्ल हे वैचारिक होत, मानसिक उन्नती साठी झालेले हे बदल आहेत, ही प्रगती आध्यात्मिक तत्वज्ञान मांडणारी व संस्कृतीच्या आध्यात्मिक बाजूला उन्नत करणारी होती तर शक, हुण, यवन आणि म्लेच्छ ही आक्रमने तत्कालिन भारतीय संस्कृतीपेक्षा हीन दर्जाच्या संस्कृती होत्या, रानटी अवस्थेतून त्या बाहेर पडून त्यांनी भौतिक प्रगतीची द्वारे खुली केली होती. भौतिक प्रगती पूर्ण झाल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती सुरु होणे ही गरजेच्या तत्वात तेवढे चपखल बसत नाही, त्यामुळे ह्या हीन संस्कृतीचा संकर इ स पूर्व कालात व्हायला सुरु झाला होता.

कार्ल मार्क्स म्हणतो की आर्थिक प्रगती हा कोणत्याही संस्कृतीचा प्राण आहे. आर्थिक प्रगती झाली असेल तर इतर गोष्टी जसे कला, धर्म, आध्यात्मिक प्रगती, ह्या संस्कृतीच्या दुसर्‍या भागाची प्रगती व्हायला सुरु होते.

थोडक्यात संस्कृती म्हणजे काय व तिची जडणघडण कश्याप्रकारे होऊ शकते ते आपण पाहिले.

इतिहासाची आपली ओळख होतेच मुळी हडप्पा व मोहजंदारो ह्या गावांच्या नाववरुन.

लहानपणी कधीतरी आपण हे दोन नावं ऐकतो व त्यावरुन ठरवतो भारत फार प्रगत होता. हे खरे असावे काय? त्यास प्रमाण काय? येथील लोकं खरेच प्रगत होते की इतर विद्वजन आरोप करतात तसे भारत कधीच प्रगत नव्हता हे आपण येत्या काही लेखात पाहू.

मोहजंदारो ह्या शब्दाचे दोन तीन अर्थ विद्वान लावतात. मोहन जं दारो म्हणजे हे गाव कृष्ण संबंधित असावे, मोहन हे कृष्णाचे नाव आहे. व माउंड ऑफ डेड म्हणजे जिथे अनेक लोकं एकाच वेळी गाडले गेले.
हडप्पा व मोहजंदारो येथील उत्खननात अनेक गोष्टी सापडल्या, जसे लोखंड धातू, पाण्याचे नियोजन, घरांचे नियोजन, रस्ते, विविध मुर्ती, आयुर्वेदाच्या दॄष्टिने निंब, शिंग, काही वनस्पती, इ इ त्यात सध्यापुरते जास्त खोलात न शिरता आणखी एक महत्वाची गोष्ट सापडली ते म्हणजे मृत शरीर. कार्बन डेटिंग करुन ती ४५०० ते ५००० वर्षांपूर्वीची असावित असे गृहित धरन्यात येत आहे तसेच मृतांचे कारण अतिपूर व युद्ध हे देखील कळत आहे. ह्या सापडलेल्या प्रेतांवरुन मानववंशासंबंधी काही अनुमान बांधता येतात, म्हणून ती जास्त महत्वाची. त्यातील काही प्रेते ही मंगोलाईड व काही द्रविड मानववंशाची होती असे निश्चित झाले आहे.

आता थोडक्यात आपण आर्य आक्रमणाकडे पाहू. म्हणजे आर्य आक्रमण झाले वा झाले नाही ह्यात अनेक मतभेद आठळून येतात. आपण तुर्तास झाले व नाही झाले ह्या दोन्ही बाजू पाहू.

सिंधुसंकृती हडप्पा, मोहजंदाडो ह्या तत्कालिन प्रगत संस्कॄती अचानक नाहीश्या का झाल्या असाव्यात ह्याचे कारणं स्टॅनली वोलपार्ट सारखे अमेरिकन इतिहासकार आर्य-अनार्य ह्या युद्धामुळे झाल्या असे म्हणतात. हडप्पा वगैरे प्रगत असल्या वर धातूंचे त्यांनी संशोधन केले असले तरी त्यांना घोडा हा प्राणी माहीत नव्हता व आर्यांकडे घोडा हा धावणारा प्राणी असल्याकारणाने युद्धात ते वरचढ ठरले. तत्कालिन आर्य समाज हा हडप्पा संस्कृतीपेक्षा अतिशय मागास पण युद्धात प्रविण होता. हडप्पा हे शहर पाण्याखाली आले, त्याचे कारण स्टॅनली असे देतात की आर्यांनी हडप्पावाल्यांच्या पाणी साठवून ठेवायच्या साधनांना फोडले व त्यामुळे पूर येऊन हडप्पा बुडाले व अनेक मृतदेह विचित्रावस्थेत त्यामूळेच सापडतात. आर्यदेव इंद्र ह्याने एक युद्ध केले होते, सतत २१ दिवस हे युद्ध चालले व पाण्यामुळे इंद्र जिंकला ह्याचे वर्णन पुराणात आहे, स्टॅनली ह्यांचामते हे युद्ध म्हणजेच आर्य व हडप्पा ह्यांचे युद्ध जे इंद्राने पाण्याचा वापर करुन जिंकले. ह्या युद्धवर्णनात इंद्र सोमयाग करतो असे वर्णन ही आहे. म्हणजे आर्यानी एकजात अनार्यांची कत्तल केली त्यामुळे माउंड ऑफ डेड निर्माण झाले. ही झाली एक बाजू, पण तर्क असा की सर्व जुन्या संस्कृती ह्या पाण्याच्या शेजारी वसत. नदिला अचानक पुर आल्यामुळे ह्या संस्कृती नष्ट झाल्या असाव्यात. त्यामुळे ही गावं नष्ट का झाली ह्याचे निश्चित कारण नाही. पण सिंधूसंस्कृती मधील ह्या दोन महत्वाचा संस्कृती, ज्या प्रगत होत्या. आर्य आले असले तरी त्यांनी त्यांचा वाहना (घोड्या) बरोबरच ह्या संस्कॄतीतील काही भौतीक बाबी आत्मसात केल्या असे वादासाठी गृहित धरायला हरकत नसावी.

१९३३ मध्ये डॉ गुह ह्यांचा संशोधनाखाली भारतातील मानववंशाची अधिकृत माहिती -
भारतात मुख्यतः सहा मुख्य भारतवासी वंश आहेत / होते ते म्हणजे.
१. नेग्निटो
२ प्रोटो ऑस्ट्र्लॉईड
३ मोंगोंलॉईड
४ भुमध्यसमुद्रीय
५ पश्चिमी पृथकपाली
६. नॉर्डिक

सध्या नेग्निटो हा वंश केवळ अंदमान निकोबार मध्ये आहे. मोंगोंलॉईड हे भारताचा पूर्व भागात (मेघालय, आसाम, मनिपुर,नागालँड इ ) आजही आहेत. भुमध्यसमुद्रीय वंशाचे लोक प्रामुख्याने दक्षिण भारतीय किंवा द्रविडी म्हणून प्रसिद्ध आहेत. तर नॉर्डिक हे लोक युरोपमधून टोळ्यांनी आले व त्यांनी आपली संस्कृत भाषा सोबत आणली व इ स पूर्व २००० ते १२०० ह्या दरम्यान ते कधीतरी किंवा समुहाने येत राहिले पंजाब, राजस्थान, गंगेचा दुआब, महाराष्ट्रातील चित्पावन ब्राह्मण ह्या लोकांमध्ये नॉर्डिक अंश विशेष प्रमाणात दिसतो. असा एक मतप्रवाह आहे.
ऑस्ट्रलॉईड वंशाने कृषिपद्धती शोधली असे माणले जाते, पण त्याचवेळेस मोहजंदारो व हडप्पा येथेही कृषीपद्धत विकसीत झाली होती ह्याकडे कधी कधी दुर्लक्ष होते. विद्वजनांमध्ये अनेक मुख्य व उपमुख्य मतप्रवाह आढळून येतात. हळद कुंकू, नौकानयन, अवजारे, बूमरॅंग, सुपारी, उसाची साखर काढने, कापसाचे कापड तयार करने, मानवास उपयुक्त प्राणी पाळणे, नारळ,सुपारी ह्यांचा पुजेची साधने म्हणून वापर करने, मरणोत्तर जीवनावर भाष्य, पुनर्जन्माची कल्पना इ इ गोष्टी ह्या ऑस्ट्रलॊईड लोकांच्या देणग्या होत असे माणले जाते.

हडप्पा व मोहजंदारो येथील नमरचनाकार लोकांची भाषा द्रविडी होती का? ह्याचा निश्चित पुरावा नसला तरी तेथे नॉर्डिक प्रेत अजूनही सापडले गेले नाहीत (शेवटचे उत्खनन १९६४) त्यामूळे हडप्पा संस्कृती आर्य नव्हती हे मात्र निश्चित आहे.

भाषा संस्कृती : ह्यावर खूप मोठे संशोधन केले जात आहे. संस्कृत, पाली, अर्धमागधी, अपभ्रंश, पैशाची, महाराष्ट्री इ भाषा बोलल्या जात असत. ऋग्वेदात दास व दस्यु या नावांचे अनार्य पण आर्यांशी स्पर्धा करणारे मानवगण आढळतात, तसेच दास व दस्यु इराणातही होते. त्या भाषेत दास चे दहए व दस्यु चे दंह्यु वा द्क्यु असे रुपांतर आढळते. दंह्यु म्हणजे शत्रुदेश. देशनामे व जननामे (म्हणजे पांचाल, कुरु, काशी, कोशल, विदेह, मत्स इ इ) ही एकच असल्यामुळे त्या त्या मानवसमुहाला ती ती नावे प्राप्त झाली. आर्यसत्ता सगळीकडे स्थापन झाल्यावर दह्यु ला दास हे नाम प्राप्त झाले. दास म्हणजे गुलाम. शमर, शुष्ण, चिमुरि, धुनि इत्यादिंना इंद्राने जिंकले असे ऋग्वेदात म्हणलेले आहे. व त्यांना ऋग्वेदात दस्यु हे विशेषन देखील लावले आहे. पराभूत जनता आर्यावर हल्ले करत म्हणून नंतर दस्युंना चोर ही सज्ञाही प्राप्त झाली. वरिल पराभूत जमाती ह्या रानात पळून गेल्या.

ऋग्वेद कोणाची देन?
- संस्कृत भाषा व संकर भारताबाहेरील पश्चिमेकडील (म्हणजे युरोप ) भाषात ट, ठ, ड, ढ, ण, ळ हे वर्ण नाहीत पण वेदात हे वर्ण आहेत. ह्याचे कारण निट समजू शकले नाही पण हे द्राविडांच्या संकरामुळे हे वर्ण आले असावेत व आधीच्या लढायांनंतर हे दोन्ही समाज एकत्र निवास करु लागले असावेत असा तर्क आहे. ऋग्वेदाची भाषा हा संकर निर्माण झाल्यावरची आहे. ऋग्वेद ऋचा संस्कृत भाषेवर अनेक संस्कार निर्माण झाल्यावर तयार करण्यात आल्या आहेत. म्हणूनच वेद हे फक्त आर्यांची देण आहेत हा समज खोटा ठरतो.

टीप :
१.हा लेख मुख्यतः स्वअभ्यासाने मांडला आहे. वॉलपार्टचे तसेच अनेकांची ह्या विषयावरील अनेक पुस्तकं वाचली आहेत पण हा लेख लिहीताना ती पुस्तकं समोर नाहीत, तर जमा केलेली माहिती परिक्षेत पेपर लिहताना आपण जशी लिहतो तशी सहज लिहली आहे, जो प्लो आहे तो परत संदर्भासाठी डिस्टर्ब न करता मनात जसे आले ते उतरवले आहे, पण ह्यातील प्रत्येक वाक्याला माझ्याकडे आधार आहे.
२.भाषा, मानववंश व संस्कृती म्हणजे काय हे लिखाण तर्कतिर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ह्यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास ह्या पुस्तकातून मला आकलन झाले त्याप्रमाणे घेतला आहे.

वरील दोन्ही कारणांमूळे काही त्रुटी राहण्याची शक्यता जास्त आहे पण ह्या लेखमालेचा उद्देश अभ्यास ग्रंथ म्हणून माहिती मांडणे हा नसून ह्या विषयाची तोंडओळख व्हावी हा आहे. हा विषय खोलात जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी ह्यावर स्वतःचा असा अभ्यास करणे आवश्यक आहे. चूक निदर्शनास आणून दिली तर मी जरुर ते बदल अवश्य करेन.
विचार मांडणे हा उद्देश असल्यामुळे व जात्याच शुद्धलेखनाचा अभाव असल्याने शुद्धलेखनाच्या य चुका आहेत ह्याची मला खात्री आहे, त्या सांगितल्या तर ते शुद्धरुपात प्रसिद्ध करता येईल.

वेदकालीन संस्कृती भाग २

प्रकार: 

जे बाहेरुन आले, त्यांच्या प्रदेशात इतकी विपुलता नव्हती>>अगदी अगदी.. तुम्ही आफ्रिकन देशांची माहिती मिळवलीत तर हेच कळत कि जिथे जिथे युरोपियन आक्रमण झाले आणि त्यांची सत्ता होती .. एकमेव कारण .. नैसर्गिक संपत्ती .. इथियोपिया हा अतिशय सधन प्रांत होता असा म्हटल्या जातं..

काही महत्वाच्या गोष्टी.
१. मॅक्सम्युल्लर हे स्वतः जर्मन होते.
२. पूर्वी अनेक जर्मन लोक भारतात येऊन अनेक जुन्या पुराण्या पोथ्यांची गाठोडी जमवत गावोगाव फिरत असत. अनेक जुनी हस्तलिखीते आज जर्मन संग्रहालयांमधे आहेत.
३. निनाद बेडेकर यांचा अनुभव या बाबतीत फार बोलका आहे. कविंद्र परमानंद या शिवाजी महाराजाना समकालिन कवीने लिहीलेल्या 'शिवभारत' या संस्कृत ग्रंथाचा बेडेकरांना सुगावा लागला. मग तो शोधण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. प्रथमतः तंजावर व इतर भारतीय ग्रंथालयांना पत्रे लिहीली. तसला ग्रंथ त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. मग अनेक जर्मन संग्रहालयांना पत्रे लिहीली (त्यांच्यापैकी कोणी नेला असेल तर म्हणून). जर्मन संग्रहालयाकडून उत्तर आले. सदर ग्रंथ तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात अमुक अमुक ठिकाणी आहे. त्याप्रमाणे शोध केल्यावर तो ग्रंथ मिळाला. सांगण्याचा उद्देश काय तर काही नवीन मिळते का हे बघायाला अनेक युरोपियनांनी आपले अनेक ग्रंथ नेले आहेत.
४. जसे लेखकाने म्हटले आहे की खरोखर ध्रुवही बदलले आहेत का? असतीलही. जगाचा नकाशा मात्र नक्कीच बदलला आहे. पूर्वी सर्व खंड एकत्र होते. नंतर त्यांमधे अंतर पडत पडत समुद्राचे आक्रमण भूभागावर होत गेले. त्यामुळे सर्व जुने संदर्भ त्या दृष्टीने तपासले पाहीजेत.
मी काही मोठा अभ्यासक नाही पण मला वाटले ते मी इथे व्यक्त केले.

प्रोटो ऑस्ट्रलॉइड कुठून आले? पृथकपाली कुठून आले? पुढे कुठे गेले? वेद लिहिण्यापूर्वीच द्रविडांचा आर्यांशी संबंध आला होता? मग वेदात 'शिव' ही देवता का नाही?

वेदातले संस्कृत व्याकरण व पाणिनीचे व्याकरण यात थोडे फरक आहेत. जे पाणिनीच्या व्याकरणात बसत नाही त्याला चूक न म्हणता आर्ष प्रयोग म्हणतात. जसे 'सत्यमेव जयते'. पाणिनीच्या मते ते सत्यमेव जयति असायला पाहिजे असे वाचल्याचे आठवते.

तसेच कित्येक आध्यात्मिक संज्ञांचे वैदिक अर्थ व उपनिषदातील अर्थ यात फरक आहे असे म्हणतात. श्री चिन्मयानंद स्वामींनी त्यांच्या श्रीमद्भगवद्गीतेवरील पुस्तकात म्हंटले आहे की 'यज्ञ' या शब्दाचा अर्थ सुद्धा उपनिषदात, वेदात नि श्रीमद्भगवद्गीतेत वेगळा वेगळा आहे.

तर जेंव्हा आपण वैदिक संस्कृतिबद्दल बोलतो, तेंव्हा त्यातला शब्दांचा आपल्याला माहित असलेला अर्थ घेऊन बोललो, तर सत्य समजणार नाही.

आजहि आपण हिंदीतले शब्द त्यांच्या अर्थासहित मराठीत आणण्याचा प्रयत्न केला नि म्हंटले की 'मला गर्व आहे', तर म्हणाल, मी गर्विष्ठ आहे! पण ते बरोबर नाही!

आज आपल्या भारतात गंगा ही सगळ्यात मोठी नदी आहे. पण कधी काळी ती तितकीशी मोठी नव्हती आणि त्याचमुळे फारशी महत्त्वाचीदेखील नव्हती. त्याचमुळे वेदात तिचा उल्लेख अभावानेच आढळतो. जे जे उत्तुंग, उपयुक्त अशा सगळ्या नैसर्गीक गोष्टींवरती त्या काळातल्या ऋषींनी माहितीपर स्तुतीकवने लिहिली. त्याच वेदातल्या ऋचा. वारा, पाऊस, सूर्य अशा सगळ्यांवरती ऋचा आहेत. नद्यांमध्ये सगळ्यात जास्त ऋचा आहेत त्या सरस्वतीवरती. पण गंगेवरती अगदी मोजक्याच ऋचा आहेत. वेदात सरस्वतीला इतके महत्त्व आहे की तिला देवी मानले गेले आहे. त्या काळातली बहुतेक वस्ती सरस्वतीच्याच काठावरती होती आणि हीच ती संस्कृती ज्यांनी वेद रचले. म्हणजे वेदात उल्लेखलेल्या दोन्ही नद्या भारतात होत्या त्या पण त्याच नावाने - उगाच 'आमु दरिया' या सारख्या अगदी भिन्न नावाने नाही.

आता जेंव्हा हराप्पा संस्कृतीचा शोध लागला तेंव्हा जास्तीत जास्त वस्त्या ह्या सिंधु नदीच्या काठी सापडण्याऐवजी त्याच्यापेक्षा पूर्वेकडे सापडल्या. सिंधू ही त्या भागातली सगळ्यात मोठी नदी असेल तर तिच्या काठी जास्त वस्ती असायला हवी होती पण तसे आढळले नाही. पण ज्या भागात जास्त वस्ती आढळली त्या भागातूनच सरस्वती वहात होती.

आजच्या संशोधनाप्रमाणे हराप्पा संस्कृतीचा काळ हा इ.स.पूर्व ३५०० ते इ.स.पूर्व १५०० असा काढला जातो (कार्बन प्रणालीनुसार). आणि सरस्वती नाहिशी (?) होण्याचा काळ हा साधारण इ.स.पूर्व १९०० येतो. म्हणजे हराप्पा संस्कृती प्रामुख्याने सरस्वतीच्या काठावरच विकसीत झाली. आणि ही भारतातली सगळ्यात प्राचीन संस्कृती. म्हणजे भारताचे सगळ्यात प्राचीन वाङ्मय हे ह्याच प्राचीन संस्कृतीची देणगी असली पाहिजे. किंवा भारतात त्या आधीही प्रगत संस्कृती असली पाहिजे.

आज ही सरस्वतीच सापडत नसल्यामुळे बराच गोंधळ झाला आहे. आर्यांचे आक्रमण ही संकल्पना देखील त्या गोंधळामुळेच फोफावली. पण आता सरस्वतीचे पात्र सापडले आहे. ती जेंव्हा प्रवाही होती तेंव्हा सतलज (वेदातली शतद्रू) आणि यमुना ह्या तिच्या मुख्य उपनद्या होत्या. ती इतकी विशाल होती की तिचे पात्र (river bed) काही ठिकाणी ७ किमी रुंद होते. पुढे काही भौगोलीक घटनांमुळे सतलज पश्चिमेला वळली आणि सिंधूला मिळाली आणि यमुना पूर्वेकडे वळून गंगेला मिळाली. दोन प्रमुख उपनद्या गमावल्यामुळे सरस्वतीच्या पाण्यात बरीच घट झाली. आजही सरस्वती पाकिस्तानातल्या घग्गर हाक्रा या जोडनदीच्या रुपात शिल्लक आहे पण त्यांचे पाणी इतके कमी आहे की त्या कच्छच्या रणातच संपून जातात. आजच्या काळातली सतलज ही पाकिस्तानातल्या रोपर येथे आपली दिशा अचानक बदलून पश्चिमेकडे वळते. ह्याच ठिकाण्यापासून एक कोरडे पूर्वगामी पात्र आजपण दिसते हाच तो प्राचीन सतलजचा मार्ग जो सरस्वतीला मिळायचा.

म्हणजे भारतात सरस्वती नदी अस्तित्वात होती. तिच्या काठआवर प्रगत संस्कृती होती आणि याच संस्कृतीने वेदांची निर्मिती केली.

भारतात अरोरा दिसत नाहीत (नॉर्थ पोलवर दिसतात) त्यामुळे अगदी लोकमान्य टिळक पण ही भुमिका घेतात की आर्य भारताबाहेरचे.
बरं आता पोल शिफ्ट झाले असावेत असेही शास्त्रज्ञ माणत आहेत, त्यावर एक पेपर मी वाचला होता. हे खरे असले तर मुळालाच धक्का बसेल.>> हि थोडी अपूर्ण माहिती आहे. अरोरा जगभर सर्वत्र दिसतात फक्त polar region मधे magnetic filed effect जास्त pronounce असतो म्हणून सहजपणे दिसतात. magnetic pole shifting is very complex phenomena which is yet to be completely understood. त्याच्या फक्त वर्णनावरून geographical locations ठरवणे कठीण आहे.

magnetic filed effect जास्त pronounce असतो म्हणून सहजपणे दिसतात. >> म्हणजे हिमायलयात ते दिसू शकतील का? ऑफकोर्स त्याची तिव्रता तेवढी नसणार पण तिथे दिसू शकतील ही शक्यता आहे का हेच मी विचारात घेतले नाही. आणि तू म्हणतोस तसे दिसत असतील तर उषा सुक्त युरोपात निर्माण झाले ह्याचे आपोआप खंडन होईल.

झक्की शिव देवचा मुद्दा मी त्या हिंदूत्वाचा चर्चेत आर्य अनार्यामध्ये थोडा मांडला होता. आर्यांचे व आर्येतरांचे देव मी डिटेल मध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

तुम्ही म्हणता त्या व्याकरणाच्या मुद्याला तर्कतिर्थांनी फारच चांगल्या रितीने मांडला आहे. मी ह्या पुस्तकाचा आधार घेऊन ते लिहेन. ह्यासाठी मला खरेतर स्वातीलाच धन्यवाद द्यावे लागतील.

तुम्ही जो शब्द आणि त्यांचे अर्थ हा मुद्दा मांडला आहे तो अगदी योग्य. उदा पुरूष व योनि हे शब्द. पुरूष ह्या शब्दाचा अर्थ वेदकालीन साहित्यात वेगळा आहे. पुरात राहणार / परमात्मा अश्या अनेक अर्थांनी तो आलेला आहे. तसेच योनि म्हणजे घर. तुमचा आवडता दुष्ट्यदुम्न हा अयोनिज आहे. रुढार्थाने आपण त्याला मग अग्नितून निर्माण झालेला वगैरे माणतो. पण भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास ह्या पुस्तकात राजवाड्यांनी असे लोक घराबाहेर जन्मले हा योग्य अर्थ मांडला आहे व त्याची योग्य ती फोड करुन तो अर्थ का बरोबर आहे हे मांडले आहे. म्हणजे विमानात, कार मध्ये वा उघड्यावर जन्मलेला मणूष्य अयोनिज ठरतो.

<<<पूर्वी सर्व खंड एकत्र होते. नंतर त्यांमधे अंतर पडत पडत समुद्राचे आक्रमण भूभागावर होत गेले. त्यामुळे सर्व जुने संदर्भ त्या दृष्टीने तपासले पाहीजेत.>>>

पण हे खुप पुर्वि म्हणजे 'मानव' उत्क्रांत होण्याआधिच झालय ना?

प्रित मी आफ्रिकेत ७ वर्षे वास्तव्य केले आहे. तिथली नैसर्गिक साधनसंपत्तीची गणनाच करता येणार नाही, पण इथे परकियांना बौद्धीक समृद्धता आढळली नाही. इथले सोने, हिरे त्यांनी नेले आणि गुलाम ही नेले. या गुलामांच्या व्यापाराचा खुणा आजही दिसतात.
ही बौद्धीक समृद्धी बाहेरून आलेल्यांना भारतात सापडली. पण त्या काळात मुगलांच्या वगैरे आकलनापलिक्डची ती होती, आणि या ज्ञानाची त्यांना भिती वाटली असावी म्हणून त्यांनी ति ग्रंथसंपदा जाळून नष्ट केली.
त्या काळात मौखिक ज्ञानार्जनाची परंपरा होती, ती पुढे अर्थातच नष्ट झाली. जी थोडीफार ग्रंथात होती, ती नष्ट करण्यात आली. (योगेशच्या फोटोतल्या दिल्लीतल्या लोहस्तंभाचे उदाहरण आहेच, तसाच स्तंभ रायगडावर आहे. शेकडो वर्षे त्यांना काहिही झालेले नाही. पण १९७४ साली वाशीच्या खाडीवर बांधलेला पूल, १९८६ साली म्हणजे १२ वर्षात खचला.)
मी वर भूगोलाचा उल्लेख केला. पानिपतच्या लढाईत आणि सिकंदराच्या पराभवात, भूगोलाचा मोठा भाग होता, पण ते आपल्याला शालेय शिक्षणात कधी सांगितलेच गेले नाही.
आणि मला नाही वाटत, आज आपल्याकडे पुर्ण रुपात, वेद उपलब्ध आहेत. कदाचित त्याचाही बराचसा भाग, मौखिक परंपरेत नष्ट झाला असण्याची शक्यता आहे.

लोक्स,

माहिती चांगली आहे पण संदर्भ देत चला कारण कधी कधी दोन संदर्भात नोंदवलेली मते ही परस्परविरोधी आहेत हे सिध्द झाले आहे.
झक्की म्हणतात तसे "मला काय वाटते" पेक्षा "ईतीहासात संदर्भासकट" काय अनुमाने काढली आहेत ते महत्वाचे अन्यथा केदारच्या या लेखावरील प्रतिक्रीया "हे माझे मत" या ईथल्या अलिकडे गाजलेल्या डिस्क्लेमरच्या वाटेने (चूकीच्या अर्थाने) जायला वेळ लागणार नाही.

आजकाल "गूगल पांडित्त्य" जोरावर आहे पण सर्व संदर्भ अन शक्यतेंचा अभ्यास करून तौलनिक विश्लेषण करणे हे फार दुर्लभ झाले आहे. Happy

केदारच्या लेखातून वेळोवेळी अश्या प्रकारचा तौलनिक अभ्यास दिसून येतो म्हणून त्याचे मेरीट सहाजिकच अधिक वाटते. इतीहास अन भूगोल तरी निदान सापेक्ष नसावा असे वाटते.

केदार, लगे रहो......

आजकाल "गूगल पांडित्त्य" जोरावर आहे पण सर्व संदर्भ अन शक्यतेंचा अभ्यास करून तौलनिक विश्लेषण करणे हे फार दुर्लभ झाले आहे
केदारच्या लेखातून वेळोवेळी अश्या प्रकारचा तौलनिक अभ्यास दिसून येतो म्हणून त्याचे मेरीट सहाजिकच अधिक वाटते. इतीहास अन भूगोल तरी निदान सापेक्ष नसावा असे वाटते. >>>>

"हे माझे मत" हे डिस्क्लेमर केदारसाहेबांनीच आधीच द्यावे. त्यांचा अभ्यास "स्वदेशी जनक" यातुन चांगलाच दिसला आहे. Proud
आधीच मत ठरवुन त्याला अनुकुल पुरावे शोधणे ह्याला इतिहास नाहि म्हणत. तसेच स्वताच्या मताच्या विरुद्ध मत असेल तर त्याला खोटे ठरवणे यालाहि इतिहास नाहि म्हणत. असो.

भूगोल सापेक्ष आता असु शकत नाहि. (technology advance मुळे)
इतीहास नेहमीच सापेक्ष असतो आणी असेल.

ठिक आहे गणू. हे माझे गुगल मत . Happy बास का.

पण गणू ह्यांच्या ""हे माझे मत" हे डिस्क्लेमर केदारसाहेबांनीच आधीच द्यावे. त्यांचा अभ्यास "स्वदेशी जनक" यातुन चांगलाच दिसला आह" ह्या वाक्याच्या शैलीतून मला माबोवरच्या माझ्या नेहमी चालणार्‍या चर्चेतील एका मित्राची खास करुन आठवण होत आहे. तसे नसावेही. पण तिकडेही बरेच वाक्य अगदी त्याच शैलीत होते म्हणून म्हणलं चाचपणी करावी, कदाचित बिछडा मित्र निघायचा.

असो. आपण आलात. आता नक्कीच टिआरपी वाढेल ह्याचा आनंद काही वेळ साजरा करावा म्हणतो.

असो. आपण आलात. आता नक्कीच टिआरपी वाढेल ह्याचा आनंद काही वेळ साजरा करावा म्हणतो. >>>>

मी आले नाहि आतापर्यत कारण टिपण्णी करण्यासारखे वाइट काहिहि लिहिले नाहिये तुम्हि. उगाचच टिका नाहि करत मी.

कोणत्याहि धर्माचा प्रसार करणे , उगाचच glorify करायचा प्रयत्न करणे ह्या गोष्टींवीरुध्द मी बोलेनच तसे काहि तुमच्या लेखात किवा इतर पोस्ट मधे आले तर.

मी आले नाहि आतापर्यत कारण टिपण्णी करण्यासारखे वाइट काहिहि लिहिले नाहिये तुम्हि. उगाचच टिका नाहि करत मी
कोणत्याहि धर्माचा प्रसार करणे

>> ते तर मी तिथेही केले नव्हते. माझ्या पोस्ट नीट वाचून पाहा. इतकेच काय मला तसे एका पोस्ट मध्ये लिहावे लागले.
पण आपण आलात. आनंद जाहला. एकीकडे म्हणता टिपण्णी करण्यासारखे वाइट काही लिहले नाही, एकीकडे म्हणता माझा अभ्यास दिसून येतो. म्हणजे असे म्हणावे काय की मी एखाद्या (म्हणजे हिंदू) धर्माबद्दल वाईट लिहले तर ते चांगले पण थोड्या चांगल्या बाबी एखाद्या (म्हणजे हिंदू) धर्माबद्दल लिहल्या तर ते वाईट ठरेल काय?

गणू. विरोधासाठी विरोध कधिही करु नये. प्रत्येक धर्मात जश्या चांगल्या तश्या वाईट बाबी असतात, काहीत चांगल्या जास्त, काहीत वाईट जास्त. आणि जुने खोटेच मांडायचे असले असते तर मी चित्पावन ब्राह्मणांत नॉर्डिक वंश आढळतो असे लिहले नसते, तसेच आर्य म्हणजे ग्रेट हेच मांडत बसलो असतो. असो आय थिन्क यु विल गेट द पाँईट. येत राहा. मी काही विचारविरोधी नाही. उलट तू पण इथे लेखाचा विरोधी मत फक्त योग्य भाषेत मांडले तर इंटरनेट ज्ञान प्राप्ती होण्यास Proud हातभार लागेलच.

केदार, Proud
मला प्रस्तुत लेखातली आणि तुझ्या एकुणच विचारसरणीतली एक गोष्ट फार भावली आहे.ती ही की हे लिखाण तू हिंदू धर्मापासून वेगळे होउन एका त्रयस्थ दृष्टीकोनातून लिहीले आहेस. चिनुक्सच्या लिखाणातही(अन्नं वै प्राणा:) हे प्रकर्षाने जाणवले होते मला.

तू अजून लिही. वाचायला खरेच आवडेल.
बाकी चर्चाही इंटरेस्टींग होत चालली आहे. माधव चांगली माहिती ! Happy

चांगला लेख आहे.. ऋग्वेदाचा काळ महामहोपाध्याय चित्राव शास्त्रींच्या ऋग्वेदाच्या मराठी भाषांतरात दिलेला आहे... वाचून लिहिन इथे..

एकीकडे म्हणता टिपण्णी करण्यासारखे वाइट काही लिहले नाही, एकीकडे म्हणता माझा अभ्यास दिसून येतो >>>>

केदार , मी इथल्या पोस्ट वर टिका केली नाहि त्याचे कारण सांगीतले आहे कि टिका करण्यासारखे काहि नव्हते, अभ्यास दिसुन येतो हे मी 'स्वदेशी ' च्या धाग्याबद्दल म्हणले आहे.

म्हणजे असे म्हणावे काय की मी एखाद्या (म्हणजे हिंदू) धर्माबद्दल वाईट लिहले तर ते चांगले पण थोड्या चांगल्या बाबी एखाद्या (म्हणजे हिंदू) धर्माबद्दल लिहल्या तर ते वाईट ठरेल काय >>>

मला खात्री आहे कि इतर धर्माबद्द्ल तुम्हि लिहिणार नाहि. Proud
मुळात माझा धर्मालाच (organized religion) लाच विरोध आहे तो हिंदु असो वा मुस्लिम वा ज्यु वा अजुन कोणताहि . कारण सर्व धर्म म्हणजे blind beliefs, creeds, dogmas आहेत. जगात ३०० हुन जास्त धर्म आहेत आणी प्रत्येक धर्म सांगतो कि सत्य एकच आहे. जर सत्य एकच असेल तर ३०० धर्म कसे असु शकतात ? त्यामुळे माझ्याकडुन टिका होणारच.

केदार, सिंधू संस्कृती बद्दल मांडताना मोहंजोदडो आणि हडप्पा सोडून सापडलेल्या इतर साईटसची माहितीही देऊ शकलास तर?
मला सध्या लोथल (गुजराथ) आणि कालिबंगन ह्यांचीच माहिती आठवतेय - लोथल हे एक वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेलं बंदर होतं.. त्या बंदराची अफलातून रचना, कालिबंगन ह्या शहराची रचना (आपल्या मध्यंतरीच्या समाजरचनेत प्रत्येक जातीची घरं एका ठराविक ठिकाणी असत, त्याचं आद्य उदाहरण?)
ह्या सगळ्या शिवाय एकूणच सिंधू संस्कृतीतल्या लोकांची वास्तुशास्त्रातली प्रगती (वीटांची घरं.. वीटांची लांबी रुंदी जाडी जवळपास आयडीयल असणं, कमान बांधण्याची कला अवगत असणं, सांडपाण्याची सोय वगैरे), त्यांची लिपी, शिल्पकाम ह्या सगळ्याचा उहापोह केलास लेखात तर लेख जास्त परिपूर्ण वाटेल असं मला वाटतं.
(फक्त सजेशन आहे हे.. अस्थानी वाटलं तर सांग, उडवेन इथून)

त्यांची लिपी, शिल्पकाम ह्या सगळ्याचा उहापोह केलास लेखात तर लेख जास्त परिपूर्ण वाटेल असं मला वाटतं >> मला आवडलं असतं पण माझा तेवढा अभ्यास नाही.

लोथल आणि कालिबंगन पण सिंधूसंस्कृतीचाच एक भाग आहे. ह्या विषयी मी माहिती द्यायला पाहिजे होती. पण ह्या दोन्हीचे रिपोर्ट माझ्या वाचनात अजून आले नाहीत, जे काही वाचले ते इंटरनेटवर आणि इंटरनेटवरिल सर्वच खात्रिलायक नसतं. पण ह्यांची नाव मी घ्यायला पाहिजे होती.

आणि उडवायला काय? ही चर्चा पण आहे. इनफॅक्ट तुला जे माहित आहे ते तू इथे टाकू शकतेस वा इथला संदर्भ देऊन अजून एक लेख लिहू शकतेस.

"तर नॉर्डिक हे लोक युरोपमधून टोळ्यांनी आले व त्यांनी आपली संस्कृत भाषा सोबत आणली "
This is not completely accurate. sanskrit and other european languages have the same root language. So you can say Sanskrit has roots in the language brought by these people. They did not bring Sanskrit.
There are also schools of thought that like to differentiate Vedic and Sanskrit as different languages while the other school believes them to be one and the same language that changed over time. So to be super accurate you can say Vedic language or language of the vedic literature was derived or developed from the language these people brought.

"तेथे नॉर्डिक प्रेत अजूनही सापडले गेले नाहीत (शेवटचे उत्खनन १९६४) त्यामूळे हडप्पा संस्कृती आर्य नव्हती हे मात्र निश्चित आहे."
thinking about Aarya as a particular race is a eronous. We have only literary or linguistic evidence for these people and no archeological evidence. So talking about Aarya as one race is overextending. So not finding Nordic bodies in harappa and thus it not being Aarya culture is eronous. Recently Aarya are refered to more as a ethno-linguistic group than a race.

I opologize for commenting in English. I am new to commenting and having trouble mastering the Marathi speak as you write keyboard. Will try my best to write in Marathi next time.

कावेरी आर्यन थेअरी मी स्वतः खोडून काढत आहे. खोडताना आधी विद्वानाचे मत मग माझी त्यावर टिपण्णी व त्याला पुरावा असे देत आहे.

thinking about Aarya as a particular race is a eronous.

Recently Aarya are refered to more as a ethno-linguistic group than a race
>> बरोबर. दुर्दैवाने मी स्वतः त्यांना "रेस" हे विशेषन लावले नाही. उलट ज्यांनी लावले ते कसे खोटे व दिशाभूल करणारे आहे हे मी मांडत आहे. आर्य लोकांना रेस म्हणने चुकीचे आहे, तो शब्द मॅक्स मुलर ने एरियन ह्या जर्मन लोकांच्या वंशावरुन दिला आहे.
आपण ज्यांना आर्य म्हणतो तो वंश नाही. तो एक केवळ समानार्थी शब्द आहे, ज्याला विल्यम्स आणि मुलर ने वंश म्हणून पाहिले.

>> भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात.

ईकॉनॉमिस्ट मधिल ग्राफ बघा, खात्रि पटेल... लेख आवडला Happy

201034NAC119.gif

केदार अगदि मला जी माहिति खुप दिवसांपासुन हवी होती तिच इतकि छान मिळाली आहे .. त्याबद्दल खुप खुप धन्यवाद ..

वा!
>>
टीप :
१.हा लेख मुख्यतः स्वअभ्यासाने मांडला आहे.
<<
म्हंजे नक्की काय? स्वअभ्यास? कुठे केलेत उत्खनन आपण? 'ओरिजिनल रिसर्च'? इतके अभ्यासू अन विचारवंत मायबोलिवर आहेत हे भाग्यच म्हणायचे!

Pages