२१ अपेक्षित - ग्रुमिंग सेंटर

Submitted by कविन on 18 June, 2010 - 05:57

सुस्वागतम..! Happy आपल्या क्लासचा आजचा आठवा दिवस आहे. आज आपण सरप्राईझ टेस्ट ठेवलेय. तर करुया सुरुवात..?

हम्म.. बन्या तुझ्यापासून सुरवात करुया..

मी: बन्या पहिला पाठ लक्षात आहे?

बन्या: होSS सर

मी: चल तर मग... पटापट उत्तर दे.

बन्या: खूप आनंद झाSSआS (घाम पुसत) लाय. ह्या यशाचं श्रे..(थुंकी गिळून)य म.मी

मी: ममी नाही रे मी.. मी म्हणायचं. आणि आनंद झाला सांगताना चेहरा का असा सुतक लागल्यासारखा? अगोदर घाम पुस. अरे..अरे! बाहीला नाही रे रुमालाला पूस

एक आठवडा प्रॅक्टिस करुन घेतली तरी ही हालत? घरी आरशासमोर उभ राहून केलीच नसेल म्हणा प्रॅक्टिस? कसं होणार तुझं? आता जेमतेम एक आठवडा राहिलाय. हा सराव म्हणजे खायचं काम नाही गड्या. बोर्डात येणं सोप असेल एखादवेळेस.. त्या बेस्ट फाईव्ह मुळे १००% पण मिळतील... पSSण ह्या मुलाखती देणे हे येSराSगबाSळ्याचेSS काSSम नाSSही

बस आता खाली. तो २१ अपेक्षित संच नेलायस ना घरी? पाठ कर तो. आरशापुढे उभ राहून घोकंपट्टी करायची? कळलं?

चिंगे तू आता पेढा खायचा सराव करुन दाखव बघू. ह्या नमीला कर तुझी आई तात्पूरती.

हं... नमी तू भरव पेढा चिंगीला. अगंSS असंS काSSय करतेसS? ते बिस्किट ठेवलय नाS पाSरले जी .. हSS.. तेSच भरव पेढा म्हणून्...खरे पेढे ३०० च्या पुढे आहेत. सगळ्या वर्गाला प्रॅक्टिकलला द्यायला गेलो तर दिवाळं निघेल क्लासचं.

चिंSगेSS असं नाही गSSSSS. नमे भरव परत. तो पेढा असा.. अर्धा तोंडात असला पाहीजे फोटोग्राफर फोटो काढताना...आणि दोघींचे चेहरे कॅमेर्‍याकडे... सराव करा आत्त्ताच, लक्ष समोर ठेवायचं पण बाजूचीला पेढा भरवायचा.. कळलं का? गेलाSS माझा ४ रुपयाचा पुडा अख्खा फुकट गेला दोघींवर Sad

चिंगे अग पेढा भरवतेय ती... कारल्याचा रस नाही.. चेहरा हसरा ठेव बाळा. तुला आनंद झालाय ना बोर्डात आल्याचा? मग दिसूदे की जगाला..

आता सदू भाऊ तुमचं काय? नवीन कपडे घेतलेत रिझल्ट्साठी म्हणून.. कप्पाळ! अरे तुला अ‍ॅडमिशन देतानाच सांगितलं ना मी.. तू फाटकेच कपडे ठेवायचे मुलाखतीच्यावेळी त्यानेच वजन पडेल. त्या मुलाखत कारांना चटकपटक बाईट्स हव्या असतात त्या कशा मिळणार? तुझी गरिबी.. तुझ्या आईचे कष्ट हे सगळं फ्रेम होणारे. तू ढिग मजेत गेलं बालपण म्हणत असशील... नको नको असच म्हण मग कॅप्शन टाकता येईल त्यांना की "गरिबीतही हसत मुख रहाणारा सदा रडे बोर्डात दुसरा" हो रे आता बोर्ड नाही म्हणे?

म्हणजे आमचं क्लासचं मार्केट डाऊन की काय? फिकर नॉट हरी, अरे ह्या क्लासची सेलिबिलिटी कायम रहाणार. मी गेल्या १० वर्षातल्या पेपरमधल्या बातम्या, न्युज चॅनल वरच्या बाईट्स गोळा केल्यात ह्या बाबतीतल्या. माझा अभ्यास एकदम पक्का आहे.

हे बघ लोकल पेपर असो की र्‍हाईम्स ऑफ इंडिया सगळी कडे बातम्यांचा टाईप फिक्स आहे. त्यावरुनच हे २१ अपेक्षित तयार केलेय. (ह्यात नुसते प्रश्न नाहीत तर काही इमोशन्स कसे द्यायचे ह्याचाही समावेश आहे.)

उदाहरणार्थ हे काही निवडक दाखले बघा ना:

१) काय/कसं वाटतय तुला बोर्डात आल्यावर? (बोर्ड जाऊन बेस्ट फाईव्ह आले तर फार्फार तर बोर्ड शब्द जाईल पण अमुक % मिळाल्यावर हा प्रश्न कायम राहील.त्याला मरण नाही..अगदी जगाच्या अंताSपर्यंत.)

जळ्ळ ह्यांचं लक्षण ते.! कोणाला दु:ख होतं का बोर्डात आल्याबद्दल? सांगा आहे का कोणी असा जीव ह्या भूतलावावर? तरीही हा प्रश्न येतोच.

२) ह्या यशाचं श्रेयं तुम्ही कोणाला देऊ इच्छीता?

मी शेजारच्या बंटीला/बबलीला देऊ इच्छीते/तो असं कोणी म्हणतं का? ते ही जाहीरपणे? किंवा असं कोणी म्हणतं का..? की बाबा टिव्हीला चिकटून एचबिओ बघत बसायचा.. आई मायबोलीवर टिपी करत बसायची, ताईटली फोनला चिकटून गुलुगुलु गप्पा मारत खुदखुदायची त्यामुळे ह्या यशाचं श्रेय हे फक्त आमच्या कामवालीला आहे. तिने शेवटच्या काही महिन्यात दांड्या मारल्या म्हणून आधी आई कामाला लागली.. मग तिने बाबाला कामाला लावलं आणि बाबाने ताईला त्यामुळे घरात त्यांना टिव्ही बघायला, मायबोलीवर बागडायला आणि फोनवर खुदखुदायला वेळ मिळायचा नाही आणि त्यामुळेच मला शांतता लाभली अभ्यासाला म्हणून ह्याचं श्रेय आमच्या रजेवर गेलेल्या कामवालीला.

ते श्रेयं नेहमी आई, वडील, भाउ/बहीण, शिक्षक्/शाळा, क्लास इ.इ.इ. लाच असते. हे विचारणारा, बोलणारा नी ऐकणारा सगळ्यांना माहीत असत तरीही प्रश्न येतोच की नाही?

३) तुला वाटलं होतं का बोर्डात येशील म्हणून?

होSSS मला नाकपण पुसता येत नव्हत त्या वयापासून पक्की खात्री होती मी बोर्डात येईन, म्हणून मी घरी भिंतीलाच बोर्ड समजून त्यावर माझं नाव लिहून ठेवलेल लहानपणीच Proud

४) अभ्यासा व्यतिरिक्त काय छंद आहेत?

सांगता न येण्यासारखे चिक्कार आहेत (जसे शिक्षकांची खोडी काढणं, व्रात्यपणा करणं, आई वाचत असते त्या बाफवरल्या सारखे नसते उद्योग करणं इ.इ.) पण सांगण्यासारखे विसरुनच गेलेय्/गेलोय ८ वी पासून घाण्याला जुंपल्या सारखी/खा मी व्हेकेशन बॅच, रेग्युलर बॅच्,स्पेशल बॅच, टेस्ट पेपर स्पेशल बॅच सारख्या बॅचमधे गरागरा गरागरा फिरतेय्/तोय. असं इतक्या स्पष्ट पणे कोणी सांगतं का?

५) कॅमेर्‍यामनने ग्रीन सिग्नल दिल्यावर नेमक्या वेळेत नेमके एक्स्प्रेशन देऊन पेढा भरवण... हे काही वाटतं तितकं सोपं काम नाहीये.

माझ्या साखरपुड्याला एकदा फोटोग्राफर साठी आणि एकदा व्हिडीओ रेकॉर्ड करणार्‍या सदगृहस्तासाठी मी माझ्या होणार्‍या बायको कडून ५० पेढे भरवून घेतलेत.. खोटं नाही, नंतरचा अख्खा दिवस मी सारखा "आम्ही जातो अमुच्या गावा" चित्रपटाची आठवण काढण्यात घालवला Sad

६) पेपर वाल्यांना द्यायची पोझ, चॅनल समोरची पोझ ह्यात व्हेरिएशन राखावं लागतं. कधी आई बाळ बाबा असं त्रिकुट डोक्याला डोकं लावून फ्रेम मधे बसवायचं, कधी घरातल्या पाळीव प्राण्याबरोबर फोटो... त्यातही दरवर्षी नवीन काही तरी ट्रेंड येतच असतो त्याचा अभ्यास ही मंडळी कधी करणार? आता ह्यावर्षी टुम आहे ती मोबाईल कानाला लावलेल्या स्नॅपची. बघा उघडून सगळी वर्तमान पत्र. काय दिसतय फोटोत? आहेत ना मोबाईल कानाला लावलेली बाळं? मग.. हा ट्रेंड आम्ही आधीच ओळखतो तशी तयारीच करुन घेतो आमच्या ग्रुमिंग सेंटर मधे.

ह्याची गरज काय विचारता?

अहोSS..आता एकवेळ बोर्डात येणं सोपं असेल पण आमच्या ह्या हुषार बाळांना ९-१० कधीकधी ८ वी पासूनच एकदम अभ्याSस एकेSS अSभ्याSSस असं घोकायला लावलेलं असतं.. असा एकदम पुस्तका बाहेरचा प्रश्न आला की गांगरतात ते. सवय असते का त्यांना असं माईक पकडून कॅमेर्‍याकडे बघत उत्तरं द्यायची?

म्हणून मी हा क्लास चालू केला. इथे शिकवणच दिली जाते. अगदी थिअरी ते प्रॅक्टिकल. उभं कसं रहायचं, कसं बघायचं, कधी कुठे बघायचं, कपडे, मेकअप किती? बोलायचं काय... ते बोलायचं कसं? हे सगळ तयारच करुन घेतो इथे. Happy

फी एकदम वाजवी आहे आमची. म्हणजे करुन घेतलेल्या तयारीच्या मानाने तर एकदमच कमी. (अंदरकी बात सांगतो, गेल्या वर्षी काही आघाडीच्या चॅनलनी आणि पेपर वाल्यांनी टायपच केलय आमच्याशी) आणि आम्ही चॅरिटी करतो तर.. एखाद्या सदूभाऊ सारख्या विद्यार्थ्याला फ्री प्रवेश देतो (फक्त त्याने आमच्या क्लासच नाव जमेल तितक्या ठिकाणी घ्यावं येव्हढीच माफक अपेक्षा ठेवतो आम्ही)

गेल्या वर्षी पिटी चॅनलने (म्हणजे जो चॅनल बघितल्याबद्दल बघणार्‍याबद्दलच पिटी वाटत आपल्याला त्याला पिटी चॅनल म्हणतात) आम्हाला क्लासच्या मुलांबरोबर, त्यांचा रिअ‍ॅलिटी शो बघायला आमंत्रित केलं होतं. तिथे म्हणजे कसं सSगळं कंट्रोल्ड... उभं रहाण्यापासून ते पार पार्टिसिपेंटसच्या कमेंटस पर्यंत. कोणी रडायचं, कोणी कधी फेटे उडवायचे, कोणी तोंडावर हात ठेवून त्या सुस्मिता सेन फेम आश्चर्य दाखवायचं. इतकच नाही किती सेकंदभर हे आसु,हासु नी आश्चर्य दाखवायचं... सगळं सगळं कंट्रोल्ड अगदी होऊ, जाऊ दिलेल्या टाळ्याही अर्धी टाळी कमी नाही की अर्धी टाळी अधीक नाही अशा स्वरुपाच्या.

तेव्हा आमच्या क्लासच्या मुलांनी त्या पार्टिसिपेंटसना तिथे जाऊन धडे द्यावेत, आम्हीही काही महत्वाच्या लास्ट मिनिट टिप्स द्याव्यात म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. ती मिस झिप्रे मिसमॅचे, ती आली होती ना आम्हाला आमंत्रण करायला. तिलाही दिला की आम्ही सल्ला... तो ही मोफत "म्हंटलं बाई ग..! ४ आठवडे मिसमॅचच कपडे घालायचे, मग ५ व्या आठवड्यात घातलेल्या मॅचिंग कपड्याने आपण चर्चेत रहातो"

पुढे मागे चॅनलसाठी पण असं ग्रुमिंग सेंटर चालू करायचा विचार आहे, तस पिटी चॅनलशी बोलणही झालय. पण तुर्तास तरी आम्ही दहावी बारावी वर लक्ष केंद्रित केलय. काय आहे ही मुलं आपली भावी पिढी आहे. पुढचा समाज घडवणारी म्हणून त्यांचं व्यवस्थित ग्रुमिंग होणं ही खरतर सरकारची जबाबदारी आहे पण सरकार तरी कुठे कुठे लक्ष देणार? म्हणून आम्हीच पुढाकार घेऊन हे ग्रुमिंग सेंटर चालू केलय.

गेल्यावर्षी १० जणांना घेऊन सुरु केलेल्या एका बॅचच्या ह्यावर्षी ३० जणांच्या ३ बॅचेस झाल्यात. पुढच्या वर्षी किमान ३ शहरात शाखा सुरु करायचा मानस आहे त्या दृष्टीने प्रशिक्षक ग्रुमिंग सेंटर नुकतस सुरु केलय. त्याच्याही बॅचेस फुल्ल झाल्यात.

ह्यावर्षी पेपर मधले एका साच्यातले फोटो बघून कळलच असेल तुम्हाला ते सारं आमच्या ग्रुमिंग सेंटरचं यश आहे. आमच्या यशाचं श्रेयं हे सर्वस्वी चॅनलवाले आणि पेपरवाले ह्यांना जातं हे मान्य करण्यात आम्हाला अजिबात कमीपणा नाही.

खरतर आम्ही रिझल्ट च्या एक महिना आधी बॅच सुरु करतो पण ह्यावर्षी पालकांच्या खास आग्रहास्तव पुढच्या वर्षीची बॅच आताच सुरु करायचा विचार आहे. बुकिंग यायला सुरुवात झालेय. लिमिटेड सिट्स फक्त बाकी आहेत. तेव्हा त्वरा करा...! हाऊसफुलचा बोर्ड कधीही लागू शकतो आणि ह्यावर्षी तरी 'आमची कुठेही शाखा नाही...!"

गुलमोहर: 

काय आहे ही मुलं आपली भावी पिढी आहे. पुढचा समाज घडवणारी म्हणून त्यांचं व्यवस्थित ग्रुमिंग होणं ही खरतर सरकारची जबाबदारी आहे पण सरकार तरी कुठे कुठे लक्ष देणार? <<< चांगलाच उपक्रम Wink

कवे , मस्तचं .. १७ नं भरला आहे तेव्हा माझं अ‍ॅडमिशन फिक्स कर Proud

शिर्षका बाबत जरा मदत हवेय : "२१ अपेक्षित - ग्रुमिंग सेंटर / आमची कुठेही शाखा नाही" कोणतं जास्त बाद टायटल वाटतय?) : " आमची कुठेही शाखा नाही " हे नको.
" २१ अपेक्षित - ग्रुमिंग सेंटर " हे बरं वाटतयं.

धन्स लोक्स Happy

सुकी Proud
तोषा Proud पुढच्या वर्षी ठाण्यात काढायचा विचार आहे, देशील का ट्रेनिंग ठाण्यात? Wink

कवे, ठाण्यात कशाला?
तु म्हणशील तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण नेऊया. २ री अधिकॄत शाखा सायप्रसलाच उघडू Lol

SSS मला नाकपण पुसता येत नव्हत त्या वयापासून पक्की खात्री होती मी बोर्डात येईन, म्हणून मी घरी भिंतीलाच बोर्ड समजून त्यावर माझं नाव लिहून ठेवलेल लहानपणीच >> Lol

कविता मॅम, आपल्या अनुभवाचा फायदा आमच्या शहरातील विद्यार्थी वर्गाला सुद्धा होऊ देत.
आपण ह्या लेखात सांगितलेच आहे की, आपल्या क्लासची कुठेही शाखा नाही. तरी आपण आपल्या ह्या क्लासची फ्रॅंचाइझी आम्हास द्यावी, ही नम्र विनंती.
आजकाल शैक्षणिक क्षेत्रात उद्योग करणे, ह्यात दुहेरी फायदा आहे. एक, ज्ञानार्जन आणि थोड्याफार प्रमाणात, जास्त नाही हं, अगदी पोटापाण्यापुरते अर्थार्जन. Wink
तरी "२१ अपेक्षित - ग्रुमिंग सेंटर " क्लासच्या उपक्रमात आम्हास सहभागी करुन घ्यावे आणि आम्हाला पण आजच्या विद्यार्थीवर्गाला घडवण्याची संधी द्यावी.

छान लेख.. Happy

पोरांना १००% मार्क्स मिळतायत Uhoh आम्हाला दीडशेपैकी शंभर पण नाही मिळाले कधी.

मस्तं खुसखुशीत लेख. मला प्रशिक्षक ग्रुमिंग सेंटर मध्ये अ‍ॅडमिशन हवी. फॉर्म कुठे भरायचा.

लय कवतिक चाल्लीत... जरा संक्षिप्तात , ४-५ ओळीत सांगितलत तर म्या पन वाचिन म्हन्तो...

अशीच अमुची बाई (म्हणजे शिक्षिका बरं) असती
आमी बि घडलो असतो ...

मस्त जमलाय.
सगळ्याचेच साचे, मग ते विश्वसुंदरी असो कि गायक/गायिका असो.

कवे Lol सुक्या बरोबर मला पण अ‍ॅडमिशन घ्यायचंय, मी पण फॉर्म भरलाय....सिगरेटच्या पाकिटावर लिहितात तसा वैज्ञानिक इशारा पहिलाच देतोय... आम्हाला एकाच बेंच वर बसविण्याची चूक चूकुन सुध्दा करु नकोस नाहितर एका महिन्यात 'आमची कुठेही शाखा नाही' चे 'आमची शाखा कुठे होती' म्हणायची पाळी येईल Lol काय सुक्या?

धन्स लोक्स Happy

वैभव तुम्हाला दोघांना एका बेंचवर काय एका बॅच मधे पण नाही ठेवणार Wink एकाला ठाणे बॅच तर दुसर्‍याला पुणे बॅच Proud

अमोल, तुझ्या मागणीचा विचार करावाच लागणार नाहीतर तू गांधीगिरी करुन एकच पोस्ट सारखं सारखं टाकत बसशील Proud (रॉयल्टी किती देशील ते आधी कळूदे की Wink Proud )

Pages