वारिस शाह नूं - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 17 June, 2010 - 01:52

गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे! आज मनाने धीर केला आणि तो अपूर्ण अनुवाद पूर्ण केला.

ते अजरामर काव्य आहे अमृता प्रीतम यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून उतरलेलं, ''वारिस शाह नूं''......

भारत व पाकिस्तानच्या फाळणीचे दरम्यान पंजाब प्रांताचे जे विभाजन झाले त्या मानवनिर्मित चक्रीवादळात कित्येक कोवळ्या, निरागस बालिका - युवती, अश्राप महिला वासना व सूडापोटी चिरडल्या गेल्या. एकीकडे रक्ताचा चिखल तर दुसरीकडे आयाबहिणींच्या अब्रूची लक्तरे छिन्नविछिन्न होत होती. प्रत्येक युद्धात, आक्रमणात, हिंसाचारात अनादी कालापासून बळी पडत आलेली स्त्री पुन्हा एकदा वासना, हिंसा, सूड, द्वेषाच्या लचक्यांनी रक्तबंबाळ होत होती. अनेक गावांमधून आपल्या लेकी-बाळींची अब्रू पणाला लागू नये म्हणून क्रूर कसायांगत नंगी हत्यारे परजत गिधाडांप्रमाणे तुटून पडणाऱ्या नरपशूंच्या तावडीत सापडण्याअगोदरच सख्खे पिता, बंधू, चुलत्यांनी आपल्याच लेकीसुनांच्या गळ्यावरून तलवारी फिरवल्या. शेकडो मस्तके धडावेगळी झाली. अमृता आधीच निर्वासित असण्याचे, तिच्या लाडक्या पंजाबच्या जन्मभूमीपासून कायमचे तुटण्याचे दुःख अनुभवत होती. त्या वेळी तिच्या संवेदनशील कवीमनावर आजूबाजूच्या स्त्रियांचे आर्त आक्रोश, त्यांच्या वेदनांच्या ठुसठुसत्या, खोल जखमा, हंबरडे आणि आत्मसन्मानाच्या उडालेल्या चिंधड्यांचे बोचरे ओरखडे न उठले तरच नवल! अशाच अस्वस्थ जाणीवांनी विद्ध होऊन, एका असहाय क्षणी तिच्या लेखणीतून तिने फोडलेला टाहोच ''वारिस शाह नूं'' कवितेत प्रतीत होतो. १९४७ साली लिहिली गेलेली ही कविता ''हीर'' या लोकप्रिय दीर्घकाव्याच्या - हीर व रांझ्याच्या अजरामर व्यक्तिरेखांच्या रचनाकाराला, वारिस शहाला उद्देशून लिहिली आहे!

हे वारिस शाह!

आज मी करते आवाहन वारिस शहाला
आपल्या कबरीतून तू बोल
आणि प्रेमाच्या तुझ्या पुस्तकाचे आज तू
एक नवीन पान खोल

पंजाबच्या एका कन्येच्या आक्रोशानंतर
तू भले मोठे काव्य लिहिलेस
आज तर लाखो कन्या आक्रंदत आहेत
हे वारिस शाह, तुला विनवत आहेत

हे दुःखितांच्या सख्या
बघ काय स्थिती झालीय ह्या पंजाबची
चौपालात प्रेतांचा खच पडलाय
चिनाब नदीचं पाणी लाल लाल झालंय
कोणीतरी पाचही समुद्रांमध्ये विष पेरलं

आणि आता तेच पाणी ह्या धरतीत मुरतंय
आपल्या शेतांत, जमिनीत भिनून
तेच जिकडे तिकडे अंकुरतंय...

ते आकाशही आता रक्तरंजित झालंय
आणि त्या किंकाळ्या अजूनही घुमताहेत

वनातला वाराही आता विषारी झालाय
त्याच्या फूत्कारांनी जहरील्या
वेळूच्या बासरीचाही नाग झालाय

नागाने ओठांना डंख केले
आणि ते डंख पसरत, वाढतच गेले
बघता बघता पंजाबाचे
सारे अंगच काळेनिळे पडले

गळ्यांमधील गाणी भंगून गेली
सुटले तुटले धागे चरख्यांचे
मैत्रिणींची कायमची ताटातूट
चरख्यांची मैफिलही उध्वस्त झाली

नावाड्यांनी साऱ्या नावा
वाहवल्या आमच्या सेजेसोबत
पिंपळावरचे आमचे झोके
कोसळून पडले फांद्यांसमवेत

जिथे प्रेमाचे तराणे घुमायचे
ती बासरी न जाणे कोठे हरवली
आणि रांझाचे सारे बंधुभाई
बासरी वाजवायचेच विसरून गेले

जमिनीवर रक्ताचा पाऊस
कबरींना न्हाऊ घालून गेला
आणि प्रेमाच्या राजकुमारी
त्यांवर अश्रू गाळत बसल्या

आज बनलेत सगळे कैदो*
प्रेम अन सौंदर्याचे चोर
आता मी कोठून शोधून आणू
अजून एक वारिस शाह....

(* कैदो हा हीरचा काका होता, तोच तिला विष देतो! )

मूळ काव्य :

(पिंजर चित्रपटात ह्या कवितेचा सुरेख वापर केला गेला आहे. )

वारिस शाह नूं

आज्ज आखां वारिस शाह नूं

कित्थे कबरां विचों बोल ते आज्ज किताबे ईश्क दा

कोई अगला वर्का फोल

इक रोई सी धी पंजाब दी तूं लिख लिख मारे वैण

आज्ज लखां धिया रोंदियां तैनूं वारिस शाह नूं कैण

उठ दर्दमंदा देया दर्दिया उठ तक्क अपना पंजाब

आज्ज वेले लाशा विछियां ते लहू दी भरी चिनाव

किसे ने पंजा पाणियां विच दित्ती जहर रला

ते उणा पाणियां धरत नूं दित्ता पानी ला

इस जरखेज जमीन दे लू लू फुटिया जहर

गिट्ठ गिट्ठ चड़ियां लालियां ते फुट फुट चड़िया कहर

उहो वलिसी वा फिर वण वण वगी जा

उहने हर इक बांस दी वंजली दित्ती नाग बना

नागां किल्ले लोक मूं, बस फिर डांग्ग ही डांग्ग,

पल्लो पल्ली पंजाब दे, नीले पै गये अंग,

गलेयों टुट्टे गीत फिर, त्रखलों टुट्टी तंद,

त्रिंझणों टुट्टियां सहेलियां, चरखरे घूकर बंद

सने सेज दे बेड़ियां, लुड्डन दित्तीयां रोड़,

सने डालियां पींग आज्ज, पिपलां दित्ती तोड़,

जित्थे वजदी सी फूक प्यार दी, ओ वंझली गयी गवाच,

रांझे दे सब वीर आज्ज भुल गये उसदी जाच्च

धरती ते लहू वसिया, कब्रां पइयां चोण,

प्रीत दिया शाहाजादियां अज्ज विच्च मजारां रोन,

आज्ज सब्बे कैदों* बन गये, हुस्न इश्क दे चोर

आज्ज कित्थों लाब्ब के लयाइये वारिस शाह इक होर

--- अमृता प्रीतम

हे काव्य अमृता प्रीतम यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी यूट्यूबची ही लिंक :

http://www.youtube.com/watch?v=aFkKOr08-jw

गुलमोहर: 

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! Happy

शरद, पंजाबी वगैरे मला अगदीच तुटकंफुटकं (गाण्यांपुरतं) येतं, ह्या कवितेला मी इंग्रजी आणि हिंदी अश्या दोन्ही अनुवादांमध्ये अभ्यासलं.... माझ्या काही पंजाबी स्नेह्यांना काही शब्दांचे अर्थ शंकासमाधानासाठी विचारले आणि मगच हे धार्ष्ट्य केलं! Happy

अमृताजींची प्रत्येक कविता म्हणजे स्वत:च एक मैफ़िल असते, एक थॉट असते... ती लिहीते तेव्हा आतुन बाहेरुन हलवून सोडते

जाने खुदा कीं रातों को क्या हुवा,
वो अंधेरे में दौडती और भागती,
नींद का जुगनु पकडने लगी…..

सुनार ने दिलकी अंगुठी तराश दी
और मेरी तकदीर उस में..
दर्द का मोती जडने लगी ….

और जब दुनीयानें सुली गाड दी
तो हर मन्सुर की आंखे..
अपना मुकद्दर पढने लगी ….

अकु... खुप खुप आभार या सुंदर अनुवादासाठी आणि चोरी करण्यासाठी अनुमती दिल्याबद्दलही.
माझी चोरी इथे पाहायला-वाचायला मिळेल.

छान जमलाय अनुवाद.
गुलजार आणि अमृता, दोघेही असेच या आगीत होरपळले. कदाचीत म्हणूनच ते अशा थेट भिडणार्‍या रचना करु शकले.

डुआय, दिनेशदा, धन्यवाद प्रतिसादाबद्दल! गुलजारांनी अमृताच्या अनेक कवितांचे वाचन केले आहे.... फार सुंदर कविता आणि त्याहीपेक्षा गुलजारांच्या वाणीतून प्रकट होणारे ते ठसठसते दु:ख!

आशुतोश, एक फूल .... धन्स! Happy
पंजाबीचं माझं ज्ञान अगदीच जुजबी आहे.... त्यामुळे वरचा अनुवाद करताना मला हिंदी व इंग्रजी अनुवादाचाही टेकू घ्यायला लागला.