माझी झाशीची राणी

Submitted by सुनिल परचुरे on 16 June, 2010 - 04:30

माझी झाशीची राणी
म्हणतात न की लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गातच बांधल्या जातात ते खर आहे. म्हणजे आता माझ्या बायकोचेच बघा ना. सॉरी हं , मी हे एकदम काय सुरु केल. आधी मी माझी ओळख करुन देतो. मी , माझ नांव मनोहर सामंत. शिवाजीपार्कला राहतो. वडिलांपासूनचे आमचे स्टेशन रोडवर रेडिमेड गारमेन्टसचे दुकान आहे. तर मी सांगत होतो... हां , माझी बायको , म्हणजे गमतीने मी तिला माझी झाशीची राणीच म्हणतो. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक नव-याला आपली बायको ही झाशीची राणीच वाटते. पण खर सांगु हल्ली नवरा चेतक घोडा व बायको झाशीची राणी असेल तरच संसार चांगला व्यवस्थित चालतो. पण माझी बायको ही झाशीची राणी आहे ति वेगळ्या कारणाने.

काय आहे, आमच्या वडलांचे एक वर्ग मित्र होते अनंत बंड म्हणून . ते झांसीला राह्यचे. त्यांच्याच शेजारि आमच्या हिचे वडिलही रहात होते. मे महिन्याच्या सुट्टीत म्हणा कधी ती मंडळी इकडे यायची तर कधी आम्ही तिकडे जायचो . अशीच एक बंडकाकांचे शेजारी म्हणून आमची ओळख झाली. मला ही शेजार्यांचि मुलगि तेजल तेव्हापासून खुप आवडायची. त्यामुळे जेव्हा माझे लग्नाचे वय झाले तेव्हा सरळ हिला मागणी घातली. सर्व ओळखीतच होत. त्यामुळे ही तिथुन इथे मुंबईत आली व माझी झांशीची राणी झाली.

आता आमच्या लग्नाला पुढल्या वर्षी 25 वर्षे होतील. पण असा एकही दिवस मला आठवत नाही की, तो काहीही न होता गेला. म्हणजे हिच्या स्वभावामुळेहं. मी तसा शांत, विचारी, कुठलीही कृती घाईघाईत न करणारा, तर ही एकदम तेज, तडफदार, कसलीही भिती न बाळगणारी.

आता साधी गोष्ट सांगतो, परवा आम्ही दोघे सकाळी शिवाजी पार्कवर जॉगिंगला गेलो. आता झपाझप चालतांना मी दोन तरुण मुला मुलीला बघत होतो. अगदी नुकतीच कॉलेजात जाणारी वाटत होति. पण अगदी गळ्यात गळा व हातात हात घालून रमतगमत जात होती. मी मनात विचारही केला की काय हि हल्लीची पिढी पण क्षणात बघतो तर ही बाजूला नव्हती. त्या दोघां समोर जाऊन ति उभी राहिली. व तिने त्यांना विचारल
``तुमच्या दोघांपैकी कुणी आजारी आहे का ?``
ती दोघे दिग्मूढ होऊन उभी.
``नाही एकमेकांवर रेलुन चाललाय म्हणून म्हटल कुणी आजारी असेल तर मी मदत करीन. कुठल्या शाळेत जाता ?``
``शाळेत नाही आम्ही एफ.वाय.ला आहोत.``
``हो मग लेक्चर बंक करुन इकडे काय असे हिंडताय? अग केवढीशी ग तु , तुझ्या बाबांचा फोन नंबर दे ग .....``
दोघ कधी पसार झाले कळलच नाही. आता काहि अडलयका हीच त्यांना अस हे बोलण. अशाने ती मुल लगेच सुधारणार आहेत का. आता तर काही महिने ती ह्या एरियातच येणार नाहीत, पण नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घ्यायची व मग ती निस्तरत बसायची असाच हिचा स्वभाव आहे. आता नुकतीच एक घडलेली गोष्ट सांगतो. तुम्हाला म्हणून सांगतो पण कुणालाही सांगु नका हं.

काय झाल की, गेले 4-5 वर्षे असच कुणाच्या तरी ओळखीने नागपुरहून गड्डमवार म्हणून एक गृहस्थ मे महिन्यात माझ्याकडे यायचे. चांगलेच काळे, ठेंगणे होते . ते कुठल्यातरी एका अनाथ वसतिगृहाकरता डोनेशन मागायला यायचे. म्हणजे माझ ठरलेल होत की दरवर्षी मी एक हजार रुपये त्यांना देत होतो. अगदी न चुकता . मे महिन्यांत त्यांची फेरी असायचीच. आता मला आठवतही नाही की मला त्यांचा रेफरंस कुणी सांगितला ते.
ह्या वर्षीही नेहमी प्रमाणे ते आले. पण जुन महिना लागला होता.
``या या मी गेल्याच आवठडयात हिला म्हटल की ह्या वेळी नागपुरहुन स्वारी आली कशी नाही ते ``.
``हो , म्हणजे ह्या वर्षी जरा उशीरच झाला. माझी पर्सनल काही काम बाकी होती त्यामुळे आज जाऊ उद्या जाऊ करत वेळ गेला``.
``बर, ह्या कोण तुमच्या बरोबर आल्यात ?``
``हां, मी सांगणारच होतो. ह्या आमच्या नागपुरच्याच आहेत. त्यांचही तुमच्याकडे एक काम होत. यांना आम्ही राधाक्का म्हणतो. बाईसाहेब आहेत का घरात?``
``का ? हिच्याशी काय काम आहे ?``
``नाही म्हणजे त्या आत असल्या तर बोलवाल का त्यांना ?``
``अग तेजल जरा बाहेर ये ग``.
``ह आलात का तुम्ही ? गेल्याच आठवड्यात तुमची आठवण काढत होते. आणि ह्या कोण ?``
``बाई , मला राधाक्का म्हनत्यात. म्हंजी म्या ह्यांच्या जवलच राहती. तुमाला सांगाव का न्हाई कळत न्हाई...``.
``अहो काय ते सांगा ना. घाबरताय काय ?``
``न्हाई काय झाल म्हंजे आमचा वाडा लई जुना व्हता. तो दुरुस्तीला काढला तवा आतलि एक भित पडली. तिची साफसफाई करता करता मला एक तांब्या हाताला लागला. आत उघडुन पाहिल तर सर्व जुने सोन्याचे दागिने व्होते. आधी मी इचार केला की ह्ये सर्वे पुलीसात द्यावे , पन मंग ह्यांना भेटले. ह्यांना म्हटले हे ईकुन पैसे येतील , तो माजा न्हवरा हास्पिटलात हाय, तेला दवादारुला होतील. हे दागिने तुमाला हवेत का?``
``अहो तुम्ही ते आधी पोलिसातच द्यायला हवे होते .किंवा विकता कशाला. तुमच्या जुन्या वाडयात मिळाले म्हणजे ती पुर्वजांची ठेव आहे. एक आठवण म्हणून तसेच ठेवा. आम्हाला नकोत ते`` मी त्यांना म्हटले.
``अहो थांबान . बर मला बघु ते आधी``.
त्या बाईने मग एक लाल फडक्यात बांधलेला पितळी डबा काढला. त्यात जुने दागिने म्हणजे चपलाहार, मोहनमाळ, बाजुबंद, वाक, दुपदरी माळ असल काही बाई होत.
``अहो पण हे दागिने खरे आहेत कशावरुन ?``
``न्हाई म्हंजे तुम्ही तपासून बघा न. वाटल खर तर घ्या. म्या ह्याच वजन बि केलया.``
``किति आहे वजन``.
``बघा धा तोळे तरी हाये``.
``दहा तोळे ! अहो आता सोन्याचा भावच आहे दहा ग्रॅमला जवळ जवळ 18 हजार. दहा तोळे जरी म्हटल तर एक लाख अंशी हजार रुपयाहुन जास्त. बापरे पण तुम्हाला ह्याचे किति हवेत? "
``आता बघा ह्ये म्हाज्या नव-याच्या दवादारुला हवेत. तवा दिडलाख तरी द्याच``.
``अहो जरा एक मिनीट इथे आत येता का ?``
``काय?``अस म्हणुन मी आतमध्ये गेलो.
``हे बघ ह्यांच काही मला खर दिसत नाही. हल्ली पेपरातही आपण कितितरी अशा बातम्या वाचतो. तेव्हा उगाच भलत्या फंदात पडु नकोस. शिवाय हिच बोलण, हेलही नागपुरी नाही, तर सातारा-कोल्हापुर सारखा वाटतोय. तेव्हा जाऊ दे. "
``अहो पण जर हे खरे असतील तर ?``
``म्हणुन एक लाख ऐंशी हजाराच्या ऐवजी दिड लाख द्यायचे ? आणि आता सोन अजुन घेऊन करायचय काय ? कमी का आहे आपल्याकडे.``
``हे बघा मी आधी आपल्या वैद्य सोनारांकडे जाऊन हे तपासुनतर येते, मग बघु``.
बाहेर येऊन ती म्हणाली. ``हे बघा मी स्वतः हा डबा घेऊन आमच्या सोनारांकडे जाईन व हे जर सोन खर निघाल तर मग बघु. तुम्हाला चालणार असेल तर बघा``.
``पन म्या येऊ तुमच्या संग ?``
``नको.``.
``बर, या जाऊन``.
लगेच आमची ही आमच्या नेहमीच्या सोनाराकडे गेली. तिन अस सांगितल की तिच्या कुणा ओळखीच्यांना निकड होती म्हणुन त्यांना हे दागिने विकायचे आहे. तर हे सर्व दागिने खरे आहेत का व ह्याच वजन किति ? तेव्हा खरच ते अगदी शुध्द सोन्याचे दागिने होते व वजन एकशेदोन ग्रॅम भरल्याच सोनारांनि सांगितले.
घरात शिरल्या शिरल्या तिने मला आत बोलावले.
``अहो हे बघा. हे सर्व मी दाखवून आले. सोन अगदी शंभरनंबरी आहे``
``अग अस काय करतेस ? उगाच नसत्या फंदात पडु नकोस``.
``अहो मी विचारुन बघते. ति समजा एक लाखात द्यायला तयार झाली तरच घेईन``.
``एक लाख रुपये ?`` ``अग फक्त एक लाख कोण देईल ?``
``तिला पटल तर हो म्हणेल नाही तर नाही``.
``आणि पैसे ?``
``कालच माझ्याकडे दर महिना दहा हजार भिशीचे भरते न ति भिशि लागलि होति. त्याचे एक लाख तिस हजार आलेत. ``
``अच्छा म्हणून तुमच्या उडया चालु आहेत तर``
बाहेर येत ति म्हणाली
``हे बघा हा घ्या तुमचा डबा. उघडुन बघा. तेच दागिने आहेत. अस नको वाटायला की मी काही बदललेत की काय. आणि ह्याचे जास्तीत जास्त मी लाख रुपये देऊ शकेन. त्यापेक्षा जास्त हवे असतील तर मी देऊ शकत नाही``.
``अवो बाई अस करु नका. कुट लाख व कुट दीड लाख. मला नव-याच्या दवादारुला हवेत. तुझ्याकडे खुप हायती. मला जरा मदद व्होईल``
``अग सौदा पटला तर ठीक. नाहीतर मला नकोत, काय जबरदस्ती आहे का दिड लाखात घ्यायची ?``
``न्हाई बाय न्हाई, जबरदस्ती न्हाई पन , काय वो ह्या बाई लाखच म्हनत्यात ?`` गड्डमवारना ती म्हणाली.
``अहो मला काय विचारता, तुमच सोन तुम्हीच ठरवा``
``बर, ठीक, पण पैस लागलीच द्या. मला नव-याच्या हास्पीटलच्या खर्चाला व्हतिल .``
लगेच सौदा पक्का झाला. आतुन हिने लाख रुपये आणुन त्या बाईला दिले. लाल फडक्यातला डबा आत नेऊन ठेवला. आता हिला काय रहावतय का, झाल . दुस-याच दिवशी ही म्हणाली की त्या सोन्यातले काही दागिन्यांच्या बदल्यात सोन्याचा तुकडा आणते. वळी किंवा कॉईन म्हटली तरी पैसे द्यावे लागतील. ही लगेच त्या वैद्यांकडे एक चपलाहार व मोहनमाळ एक्सचेंज करायला गेली आणि खरा धक्का बसला.
``अहो वहिनी हे काय ? हे कुणाचे दागिने आहेत``
``का हो काय झाल, परवाच तर नाही का तुमच्याकडून चेक केले. त्यांना हे बदलून सोन्याचे तुकडे हवेत. त्यांच्या मुला / मुलीत वाटायला."
``अहो हे नकली आहेत``
``नकली ? अस कस होईल त्या दिवशी तर तुम्ही असली म्हणालात ?``
``अहो बरोबर आहे. त्या दिवशी तुम्ही आणलेले खरच असली होते पण हे अगदी तसेच दिसणारे पण नकली आहेत``.
बायको एकदम हबकलीच. आत्तापर्यंत ती अशी कधीच फसली गेलि नव्हती. एक लाखाला गंडा ? पण हा डबा त्यां दोघांनी बदलला कधी ? तिला काहीच कळेना.
``मी सोडणार नाही त्यांना, आपण पोलीस कंप्लेंट करु.``
``वेडी आहेस का ?, पोलीस विचारतील हे एवढे पैसे आणलेत कुठुन ?``
``मी सांगेन न की आमच्या भिशीचे आले होते ?``
``मग ते म्हणतील की तुम्ही एवढी शिकली सवरलेली माणस पेपरात इतके ह्या सारख्या प्रसंगाबद्दल बातम्या येतात, तरीही तुम्ही तेच केलत. आपल्या सर्व ओळखीच्यांना कळेल ते आपल्यावर हसतील, चालेल तुला ?``
``अहो तुम्ही म्हणताय ते खरय, पण पण मग त्यांना असच सोडुन का द्यायच ? तुम्ही एवढे मेहनतीने कमावलेले पैसे असे चोरीमारींवर द्यायचे ?``
``अग बघ म्हणुन मी तुला आधीही सांगत होतो की ह्या भानगडीत पडु नकोस म्हणून``.
``मला खात्री आहे मी ते पैसे परत मिळवीनच``

नंतर एखाद आठवडा तर ही अगदीच अस्वस्थ होती. चेह-यावरुन दाखवत नव्हती पण मला समजत होत. असाच महिना गेला असेल. एक दिवस सकाळीच हिचा मला दुकानात फोन आला.
``अहो आत्ताच्या आत्ता तुम्ही घरी या``
``काय, काय झाल ? काही प्रॉब्लेम आहे कां ?``
``तुम्ही घरी या मग सांगते``
अक्षरश: धावतच घरी गेलो. मला कळेना की काय एवढ झालय ? घरी बघतो तर त्या दिवशीचीच बाई राधाक्का बसली होती.
``मी म्हटल न तुम्हाला आपले कष्टाचे पैसे आहेत, जायचे नाहीत. आज सकाळी मी स्टेशनरोडने जात होते तेव्हा एका सराफांच्या दुकानाबाहेर ही दिसली. तशीच धरली आणि हाताला धरुन इथे आणली. आता हिला मी पोलीसात देणार मग मला कोणी काहीही बोलले तरी चालेल``
``अवो बाई मी कंदीपासून सांगते की मी तुमच्या पाया पडते. मी खरच खरे दागिने दिले व्हते.``
``हे बघ जास्त हुषा-या नकोत. पोलीसात गेल्यावर ते तुला बरोबर इंगा दाखवतील. मग बघु कशी खर सांगत नाहीस ते. अहो तुम्हीपण चला आपण पोलीस स्टेशनात जाऊ``.
``अहो बाई मी तशातली बाई न्हाई हो. खरच मला पैशाची लई गरज व्हती म्हुन ..."
``अग पैशाची गरज कुणाला नसते. तु कितिही रडलीस न तरी मी काही तुला सोडणार नाही``
``ओ बाई हे बघा. खरच माजा नव्ह-याला हास्पीटल मंधी ठेवलाय``
``माझे पैसे कुठे, आहेत ते सांग, तुझ्या नव-याला कुठेही ठेव मला काय करायचय``
``बाई हे बघा मी तुमाला सांगते, पन मला पुलीसात देऊ नका``
``हां मग सांग कुठे आहेत माझे पैसे ?``
``म्या , म्या ते महमदभाईला नेरलला दिले. "
``आता हा कोण महमदभाई ``
``त्योच सगल बघतो. मला फकस्त धा ट्क्के कमिशन दिले. मला 10 हजार व त्या काळ्या माणसाला दहा हजार ."
``म्हणजे त्या नागपुरच्या गड्डमवारला ?``
``त्योच तो, मला नव-या करता -"
``अग किती वेळा तेच तेच सांगणार आहेस ? बर मग तो महमदभाई कुठे भेटेल ?``
``नेरलला.``
`` तु खर सांगते का खोट ते बघुया. चल आपण दोघी तिथे जाऊ``
``अग काय बोलतेस काय ? तिथे कसली मवाली मंडळी असतील आणि तु जाणार आहेस ?"
``हे बघा माझी काळजी करु नका. मला ह्या गोष्टीचा छडा लावायचाच आहे. तुम्ही बरोबर यायची गरज नाही . काय ग नेरळला कुठे असतो तो ?``
``कुट राहतो ते माहीत नाय. तो टेशनवर मला भेटतो. तिथेच पैसे देतो-घेतो``
`` दिसायला कसा आहे, नाही तुला तिथल्या पोलीस स्टेशनवर गेल्यावर सगळी माहीती द्यावी लागेल म्हणून मीच आधी विचारुन ठेवते .``
``अवो बाई आता तिथ बी पोलीस स्टेशन ?``
``मग तु सांगत्येस ते खर की खोट ते पोलीसच बघतिल.``
``अवो बाई माझ्यावर इस्वास ठेवा``
`` अहो हे बघा माझ्याकडे मोबाईल आहे. तुम्ही काही काळजी करु नका. वेळ पडली तर मी शाळेतली स्पोर्टस चॅपियन होते . माझे हात हे फक्त बांगडया भरण्याकरता नाहीत. मीहि काही करु शकते``
अस म्हणून मला खाजगीत तिने सर्व सांगितले, काही वर्षापुर्वीच आम्ही नेरळला एक फार्महाऊस घेतले होते. त्यावेळी तिथे एक शबाना म्हणून बाई होती. इस्टेट एजंट कसली टेररच होती. सर्व प्रकारची कामे ति करायची. आमच्या करता प्लोट बघून तो रितसर नांवावर रजिस्ट्रेशन करुन त्यावर बंगला बांधून दिला. सबकुछ तिच. आम्हालाही खरतर आश्चर्य वाटल होत की, ही बाई आणि एवढ सगळ कस करेल. हा आता त्यावेळी तिथल्या सरकारी कचे-यात कामाला वेळ लागत होता म्हणून एका ओळखीने मंत्रालयातुन मी फोन केला होता एवढच , बाकी सर्व तिनेच मॅनेज केल. तेजल म्हणाली की त्या शबानाला तिथलि असली सगळी लफडेबाज मंडळी माहीत आहेत. तिच्याकडूनच शक्यतो काम होईल अस बघते.

पुढली कथा चमत्कारिक व विश्वास न ठेवता येण्यासारखी आहे. पण जे खरोखर घडल तेच मी तुम्हाला सांगतो.

ट्रेनमधुन नेरळला जातानाच तेजलने त्या शबानाला फोन करुन सर्व हकीकत सांगितली. आधी त्या राधाक्काला घेऊन ती शबानाकडे गेली. गेल्यागेल्याच तीने विचारले.
``ओ इदर इतने महमद है, ये तुम्हारावाला दिखने में कैसा है ?``
``वो न, त्याला एक डावा डोला नाही ``
``अच्छा वो कौवा ?``
``कौवा ?``
``हां चल मला कळले``, असे म्हणून तिने त्या कोण महमदला फोन करुन बोलावून घेतले.
``जी , आपने मुझे बुलाया ?``
``हॉ . हि बाई कोण आहे ओळखलस ?``
``नही मैं इनको नही पहचानता``
``अरे बाबा वळखत नाही काय म्हनतोस, माझ्याकडले पैसे घेतोस आणि वळखत नाही म्हनतोस ?``
``नही शबानाजी मैं इनको नही पहचानता``
``अरे ये पुलीसवाले या कोर्टकचेरिवाले नही है, जो होगा सच बोलना``
``अरे तुम बी क्या बाई हो ? सिधा किसि को भी इधर लेके आओगी और बोलोगी की मुझे पैसा दिया तो मैं क्या हां बोलु ?
``ये देख महमदमिया ही बाई आहे न आपण हिच काम केलय, ये मेरी बहेन जैसे है, क्यु पुछ``
``क्युं -"
``अरे इनकी और मेरी जनमतारीख एक ही है. वो सब छोड, वो तात्याका प्लोट था न अपननेही इनको बेचा था. बिचमे देखो थोडा इधर तलाठी प्रॉब्लेम करता था तो इन्होने ही मंत्रालय से फोन किया. बडे आदमी है, इनका पैसा इनको वापस कर दो. "
``अरे शबानाजी आप एसे करोगी तो "
``देखो इसके पहले कभी एसा हुआ था ?``
``नही फिर भी``
``मैं बोल रही हुँन . कितना था पैसा तेजल दिदि ?
``एक लाख रुपये``
``नही नही मुझे अस्सी हजार ही मिले है, दस दस तो इन दोनो को दिये है``
``ठिक है, कब लौटाओगे ?``
``अरे इतनि रकम अभी एक झटके में थोडी मैं दे सकता हूँ ?"
``ठिक है, ये मेरे घरका मामला है एसे समजो . कर्जत का एक प्लोट लेने के लिऐ तुने मुझे पैसे दिये थे उस पैसेमेसे अस्सी हजार मैं इनको दे देती हुँ``
``ये सब मुझे गलत लग रहा है, शबानाजी``
``देखिए बहन, मैं पुरा अस्सि हजार रुपया आपको दुँगी, मगर ये पुलीसका चक्कर मत चलाना या कुछ दुसरी गलती भी मत करना``
``अरे मला माझे 80 हजार का होईना पैसे परत मिळाले तर मी कशाला पोलीसात जाऊ ?``

ते 80 हजार रुपये घेऊन बाई साहेब निघाल्या. रस्त्यात ही परत राधाक्काला म्हणाली
" तो गड्ड्मवार तुला कुठे भेटला? "
"हास्पिटलमंदि . म्हनला नवर्‍याकरता पैस हव असतिल तर म्या सांगतो तस कर "
``हे अस किती लोकांना फसवलय ?``
``नाही पयल्यांदाच. मला खरच नव-या करता .... नायतर मी पुना त्याच एरियात कशाला गेले असते ?``
``चल मला तुझ्या नव-याला भेटायचय, कुठल्या हॉस्पीटलमध्ये आहे ?`` येता येता तिच्या त्या नव-याला भेटायला हॉस्पीटलमध्ये गेली.
``राधाक्का तुम्ही इथच दुर थांबा, जवळ येऊ नका .....काय हो कस आहे आता तुम्हाला ?
``तुमि कोन ?`` खोकत खोकत तिचा नवरा म्हणाला.
``मी ओळखते त्यांना . त्यांनी मला सर्व तुमच्या बद्दल सांगितले म्हणून बघायला आले. त्या बाई कोण तुमच्या ?
``कोन ही ? राधा.."
``म्हणजे तुमची "
``बायको . का हिने काही केल की काय ?``
``नाही हो सहज विचारले``
सगळी चवकशी करुन निघतांना राधाक्काला तिने आणखीन दहा हजार रुपये दिले व म्हणाली की असले धंदे करु नकोस . तु चांगल्या घरातल्या आहेस. नव-याला बर वाटल की माझ्याकडे ये, मी तुला कुठेतरी काम मिळवुन देईन.

घरी येऊन म्हणाली बघा मी म्हटल होत न मेहनतीचे आपले पैसे आहेत , कुठेही जाणार नाहीत. आता सांगा मी म्हणतो की ही माझी झाशीची राणी आहे तर मी चुकत तर नाही न अस म्हणायला.

गुलमोहर: