बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ७. जंगलातला थींकर आणि थरार )

Submitted by अवल on 15 June, 2010 - 23:55

आधीचे सहा भाग : http://www.maayboli.com/node/16653

कल्लू आणि बल्लू आपल्या गुहेत निघून गेले. त्यांच्या गुहे भोवतालच्या वाळक्या वेली अन झाडांच्या फांद्यांच्या सावल्या यात डोळे फाडफाडून आता काहीच दिसणार नव्हतं. मग आम्ही जंगलातले दुसरे अनुभव घ्यायला निघालो. जंगलातली झाडी मागे पडली. आता आम्ही गवताळ रानात आलो. कान्हामध्ये अशी गवताळ रानं खुप मोठी आहेत, पण बांधवगडमध्ये एखाद दोनच ठिकाणी अशी गवताळ रानं आहेत. त्यातल्या एका रानात आम्ही होतो.
आत शिरल्याबरोबर आमच्या समोर पिंपळ उभा होता. नुकतीच पालवी आल्याने छोटी छोटी लाल लाल पानांनी सळसळ करत आमचे स्वागत करत होता. त्याची पानं अगदी तांब्याच्या रंगाची होती. मागे निळे आकाश अन त्यावर हा "तांबूस" पिंपळ ! माझ्या कॅमेराला वाईड लेन्स लावलेली होती. ( म्हणजे लांबचे झूम करण्यासाठी असणारी लेन्स) त्यामुळे इतक्या जवळ असलेला तो सुंदर वृक्ष माझ्या फ्रेममध्ये बसेना. मग फव-त शेंड्याचाच भाग क्लिक केला.

थोडं पुढे गेलो. आमच्या डावी कडच्या गवतात ही आपल्या घरट्याजवळ फिरत होती. ही जमिनीवर राहणारी टिटवी. डोक्यावर काळी टोपी घातल्यासारखी दिसत होती ती ! फिका तपकिरी कोट, आत पांढरा शुभ्र शर्ट अन गळ्या ऐवजी कपाळावर बांधलेला पिवळा टाय अन डोक्यावर हॅट ! जणूकाही मॅडम मिटिंगलाच चालल्या होत्या.

पुढे थोड्या अंतरावर उजवीकडे हरणं चरत होती. आमची चाहूल लागल्याबरोबर ती सगळी थोडी आत जंगलात वळली. हरणं अतिशय सजग आणि चपळ असतात. त्यामुळे त्यांचे क्लोज-अप्स मिळणे अवघड असते. तुमची झूम लेन्स अगदी ४००-५०० ची असेल तर शक्य असते. पण माझ्याकडे होती ५५-२५० ची लेन्स. पण बहूदा माझं जंगलप्रेम इथल्या प्राण्यांना कळलं असाव. सगळा कळप जरी आत गेला तरी हे हरीण आमच्या खुप जवळ थांबून राहिलं होतं, इतकच नाही तर मस्त स्माईल देत थांबलं होतं. जंगलातले हे असे क्षण आपल्याला हळवं करून जातात. आपल्यावर त्यांनी टाकलेला हा विश्वास आपल्याला हलवून टाकतो. मी दोन क्षण तशीच थबकले. गाईडने हळून भान दिले, "दिदी, स्नॅप लेलो ना " मी भानावर आले. पण एकदम हालचाल करणे योग्य नव्हते. अगदी हळू, मोठी हालचाल न करता कॅमेरा त्याच्याकडे वळवला अन हा स्नॅप मला मिळाला. थॅक्स टू गाईड Happy

पुढे गेलो तर जंगलातला आणखीन एक महत्वाचा प्राणी दिसला. एरवी आपण " ई ssss डुक्कर " असं म्हणत असलो तरी जंगलच्या जैवसाखळीतला हा एक महत्वाचा प्राणी. अन हे जंगली सुव्वर दिसतही होते रेखीव अन जरा भीतीदायकही. नीट पाहिलत तर त्याचा चमकणारा गोल आकाराचा सुळाही दिसेल तुम्हाला.

आता सकाळची वेळ संपत आली होती. आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. झाडांच्या सावल्यात अन उन्हाच्या कवडशात माकडांची कुटुंबे रस्त्यावर फिरत होती. त्यामानाने वाघानंतर माणसांना पाहून पळून न जाणारे कोणते प्राणी असतील तर ते म्हणजे आपले वंशजच ! आमच्या येणार्‍या गाड्या पाहूनही ती मंडळी आपला रस्तावरचा मुक्काम हलवायला तयार नव्हती. मग काय आम्ही त्यांचा दिनक्रम बघत बसलो. काही मोठी माकड आपापल्या शव-तीचा अंदाज घेत होती. काही झाडांवर सूरपारंब्या खेळत होती. त्यातल्या एका कुटुंब प्रमुखाची आमच्यावर अशी नजर होती.

तेव्हढ्यात माझे लक्ष गेले. एका आईच्या कुशीत हा आपला खरा वंशज बसला होता. त्याची पोज मला ऑगस्ट रॉडिनच्या 'थींकर"चीच आठवण देऊन गेली. गंमत म्हणजे बर्‍याच जणांना हा दिसलाच नव्हता. कारण रिसॉर्ट्वर परत आल्यावर एकमेकांचे फोटो पाहताना हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यव-त केलं. त्यांनी पाहिलाच नव्हता तो ! त्याची ती गोड पोज मला फारच भावली.

सकाळची ही ट्रिप अशी मस्त झाली होती. दुपारी आम्ही निघालो तेव्हा आता काय काय बघायला मिळणार असं म्हणत आम्ही निघालो. कारण आज आम्ही बांधवगडच्या शेषशाही विष्णूला पहायला जाणार होतो. डोंगरावरच्या घाटाच्या, मातीच्या चिंचोळ्या रस्त्याने धाडधाद जीप्स चालवत आम्हाला चालकाने वरती आणले. २-४ दा तर अगदी धस्स झालं. त्यांचे स्किल खरच वाखाणण्यासारखे आहे.

वरती पोहचलो. वरही भरपूर झाडी होती अन त्यातच विष्णूची भलीमोठी मूर्ती, जवळ जवळ २५ - ३० फूटतरी असावी , आराम करत पहुडली होती.

त्याचे तपशील आता मी विसरले. तिथे मला एक अगदी छोटा गॉगलवाला दिसला. सहा पायाचे हे महाराज अगदी रिबॉकचा गॉगल घालून बसले होते.

तिथून आम्ही पुन्हा खाली जंगलात आलो. आता आम्ही एका गुहे पाशी थांबलो. भर जंगलात एका टेकडीच्या पायथ्याशी ही गुहा होती. खडकात खोदून तयार केलेली असल्याने मध्ये गुहा अन तिच्या डावी, उजवी कडे उतरत येणारी टेकडी अशी काहीशी रचना होती. गुहेला लोखंडी जाळीचे दारही होते. ( हे इतक्या तपशीलाने सांगतेय त्याचे कारण पुढच्या गोष्टींमधला थरार लक्षात यावा म्हणून !)

ही गुहा तिथल्या वटवाघळांसाठी प्रसिद्ध आहे. छोटी छोटी हजारों वटवाघळं इथे वस्तीला आहेत. आम्ही आत गेलो. आतमध्ये एक मोठी गुहा अन त्याच्या आत अजून छोट्या खोल्या होत्या. आमच्या गाईडने आम्हाला आतल्या छोत्या खोलीवजा गुहेत नेले. अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं.

मग आमच्या गाईडने काडी उजळली. तरी काही दिसलं नाही अन तेव्हढ्यात उजेडामुळे काही वटवाघळं उडायला लागली. ईsssss असा आवाज करत बहुतांशी लोक मागे सरले. आख्ख्या गुहेत छताला वटवाघळं चिकटली होती. आजपर्यंत इअतकी वटवाघळं मी बघितली तर जाऊच दे पण इमॅजिनही केली नव्हती. अगदी जीवावर उदार होऊन कसं तरी क्लिक केलं अन बाहेरच्या गुहेत आले. त्यामुळे फोटोही त्या खोलीच्या फव-त बाहेरच्या बाजूचा आलाय. पण उजवी कडे आत आत किती वटवाघळं असतील याचा अंदाज नक्की येईल तुम्हाला. हा फोटो पाहून जे "याssssक" असं म्हणणार नाहीत, त्यांना माझ्याकडून एक जेवण लागू Happy

मग आमच्या गाईडला अजूनच स्फुरण चढले. त्याने एका वटवाघळाला पकडून आमच्या समोर आणले. एतके छोटे होते ते, अन खरं सांगायचं तर मला ते दिसूनही आवडले. तुम्ही हसाल पण मला ते गोंडूस दिसले, आजही तसेच वाटते.

मग आम्ही गुहेच्या बाहेर आले. जंगलात असे जमिनीवर आम्ही पहिल्यांदाच आहोत याची जाणीव झाली. खुप छान वाटलं. आता पर्यंत आमच्या गाईड, चालकाची सव-त ताकिद असायची " कोणीही जंगलात प्रवेश केल्यावर जीपमधून खाली उअतरायचे नाही " अन हा नियम ते स्वतः ही पाळत. ( अपवाद फव-त आत जिथे चहा-पाण्याची सोय केली आहे ते चेक पॉईंट ) आता पहिल्यांदा असे झाले होते की आम्ही जंगलात पाय उतार होतो. हे लक्षात आले अन अंगावर सरसरून काटा आला. म्हटलं तर आपण आणि जंगलचा राजा आता एकाच पातळीवर आहोत !

आम्ही इकडे तिकडे पाहू लागलो, आमची जीप गायब होती. त्या वेळेस आमच्या दोन जीप्स तेथे आल्या होत्या पैकी आमची जीप अन चालक गायब होते. आम्ही टेन्स झालो. मग कळले की आमच्यातल्या एकाला बरे वाटत नसल्याने त्याला रिसॉर्टवर सोडायला जीप परत गेलेय. मग आम्ही सगळे निवांत झालो. आम्ही मोठे ४-५ जण, दुसर्‍या जीपचा चालक, दोन्ही गाईड, अन ४-५ मुलं असे टेकडीच्या उजवी कडच्या उतारावर जरा निवांत बसलो.

मुलांना कंटाळा यायला लागला. त्यांचा कंटाळा घालवावा, म्हणून मग आमच्या फोलिएजच्या मार्गदर्शकाने जंगलच्या काही गोष्टी सांगायला सुरवात केली. दोन वाघांच्या मारामारीच्या कथा, पाहलेल्या शिकारीच्या कथा, या आणि अशा अनेक. मग दुसर्‍या जीपच्या चालकाला सुरसुरी आली त्याने तिथल्या कथा सांगायला सुरवात केली.
" पूर्वी इथे म्हणे काम करणार्‍या मजुरांना त्यांच्या कामाचे पैसे देण्याचे काम चाले. एकदा असेच काम चालू होते. मुकादम गुहेच्या उजवी कडच्या उतारावर बसून, एकेकाला बोलवून पैसे देत होता. त्याची डोंगराकडे पाठ होती. अचानक डोंगरावरून वाघिण खाली उतरली. मुकादमासमोर असलेल्या मजूरांना ती दिसली. ते धावत गुहेत पळाले. त्यांनी मुकादमाला ओरडून पळायला सांगितले. पण त्याची पाठ होती. त्याला कळलेच नाही ते का ओरडताहेत ते. वाघिण डोंगर उतारावरून खाली आली अन मुकादमावर तिने हल्ला चढवला. त्याचा हात उपटून काढला. सगळ्या मजूरांनी लोखंडी दार बंद करून घेतले होते. त्यामुळे ते बचावले. वाघिण नरभक्षक नव्हती. पण तिच्या वाटेत मुकादम आल्याने तिने हल्ला केला होता. बराच वेळ तिथे थांबून मग ती निघून गेली. अंदाज घेऊन मजूर बाहेर आले, त्यांनी मुकादमाला दवाखान्यात नेले. पण अतिरिव-त रव-तस्त्रावामुळे तो मेला. "

बापरे हे सर्व ऐकताना ही आमचा थरकाप उडाला. सगळे डोंगर उतारा कडे जरा साशंकतेनेच पाहू लागले. आता त्या लोखंडी दाराचा आम्हाला आधार वाटू लागला. त्या गोष्टीतले खरे खोटे तो चालकच जाणे, आम्ही त्याची शहानिशा करायच्याही भानगडीतही पडलो नाही.

नुसत्या कल्पनेनेही आम्हाला जंगलाची ही दुसरी बाजू थरकवून गेली. प्रत्यक्षात काहीही वावगे न घडूनही आम्ही सगळे अतिशय टेन्स झालो. जंगलाला कॅज्युअली घ्यायचे नाही हे अगदी मनात ठसले. संध्याकाळच्या उतरत्या सावल्या आता मनावर ओथंबून येऊ लागल्या.

आमच्या जीपने उडवलेला धुरळा दिसू लागला. पण आमच्या मनावरचे मळभ मात्र तसेच राहिले. परतीच्या वाटेवरही फारसे कोणी बोलले नाही.

८. "बी टू" ला शेवटचा मुजरा : http://www.maayboli.com/node/30769

गुलमोहर: 

मस्तच ग Happy

मला जेवण लागू माझ्याबरोबर माझ्या लेकीला पण Proud आम्ही अशी गुहाभरुन वटवाघळं पेठ किल्ल्याला गेलेलो तेव्ह बघितली. लेकीनेच शोध लावला आणि बाबाला कॅमेरा घेऊन बोलावल Proud

आताच एका दमात सगळे भाग वाचले...फोटो आणि लिखाण दोन्ही उत्तम!!!! ह्यातला तो हरणाचा फोटो खुपच क्युट आलाय Happy