देहाची तिजोरी

Submitted by नीधप on 8 June, 2010 - 05:25

मिळून सार्‍याजणी या मासिकातर्फे घेतलेल्या रेऊ कथास्पर्धा २०११ मधील विजेती कथा. मिळून सार्‍याजणी (फेब्रुवारी २०१२) मधे प्रकाशित.
---------------------------------------

"काल तुझी निलू दिसली होती मार्केटात. तुला भेटते का गं अजून ती?’’ आवराआवर संपवून खोलीत येत ताई म्हणाली.
‘‘नाही गं, आता काही संपर्कच नाही राह्यला तिच्या लग्नानंतर. पंकजशीच लग्न झालंय तिचं. दोन मुली आहेत एवढं माहितीये.’’
"केवढ्या थापा मारायचीस तू तिच्यासाठी आठवतंय का? अगदी आईला तिचा सगळा घोळ कळल्यावरही तिच्यासाठी खोटं बोलणं संपलं नव्हतं तुझं. नशीब तुझं की मला खरं काय ते कळलेलं होतं. नाहीतर आईनं तर तुला कैदेतच ठेवलं असतं शिक्षण संपेपर्यंत.’’
‘‘हा हा ताई! मी काय कैदेत बियदेत टिकले नसते. कधी उडाले असते तुम्हाला कळलं पण नसतं.’’
‘‘तीच तर भिती होती ना आईला म्हणून तुला जास्त बांधून नाही ठेवलं तिने. करायचं ते करू दिलं. असला राग यायचा तुझा तेव्हा. तुला आई सगळं भितीपोटी का होईना करू द्यायची. नाटकं, गाणं, फिल्मस्कूलच्या डिप्लोमा फिल्म्स.’’
‘‘भितीपोटी नाही गं. मी ते सगळं करणं आईला आवडायचं म्हणून. पण ताई आता मी दमलीये आणि तूपण तेव्हा हा वाद उद्या घालूया? ’’
बारशाच्या उस्तवार्‍या करूनही ताईला भरपूर उत्साह होता. शिवाय निलू हा तिचा आवडता विषय. खूप वर्षांनी वेळ काढून ताई भारतात आली होती. माझी डिलिव्हरी, बाळाचं बारसं सगळं करून मगच परत जाणार होती.
‘‘खरं सांगू गंगाबाई, त्यादिवशी आई निलूच्या घरून आली ना तेव्हा आईचा चेहरा बघून मला जाम घाबरायला झालं होतं. तूच घोळ घातलास की काय काही अशीच भिती वाटली.’’
ताई लाडात आली की मला गंगाबाई म्हणायची. लहानपणी मी भांडायचे. आता आवडतं मला ते.
‘‘मला हे कळूच शकत नाही की तुम्हाला दोघींना असं वाटलंच कसं? माझ्या आजूबाजूचे सगळे कमालीचे आगाऊ आणि अनइंटरेस्टिंग बाप्ये तुम्हाला माहित होते. ते मित्र म्हणूनसुद्धा पदरी पडले पवित्र झाले प्रकारात होते. त्यातल्या कुणाशी गंमत म्हणूनसुद्धा चारदोन दिवसाचं अफेअर मी करणं शक्य नव्हतं आणि डायरेक्ट प-लं-गा-व-र-ती?? असं वाटलंच कसं तुम्हाला?’’
‘‘माहीत होतं गं तसं पण तरी भिती वाटतेच ना!’’
ताईचा आवाज भिजल्यासारखा झाला. मला पंधरा वर्षांपूर्वीचं आठवलं. निलूने घोळ घातला आणि माझ्या काळजीनं आई, ताई दोघी बेचैन होत्या. तेव्हा त्या दोघींचे आवाज असे भिजलेले असायचे.
‘‘बरं तुझं खरं माझे ताई!’’ पण ताईला विषय सोडायचा नव्हता.
‘‘सुचा तुला खरंच माहीत नव्हतं काही त्या दिवशी पर्यंत?’’
गंभीर बोलायचं असलं की ताई मला सुचा म्हणायची आणि गांभीर्याने कमाल पातळी गाठली असेल तर आख्खं चार अक्षरी नाव घेऊन... सुचरिता...
‘‘नव्हतं गं. म्हणजे ती माझ्याकडे जाते सांगून पंकजबरोबर फिरायची ते माहित होतं. पण असं दोनदोन रात्री बाहेर रहाणं हे तिनं मला कधीच सांगितलं नाही. नंतर विचारलं तेव्हा म्हणाली तिची हिंमतच नव्हती मला सांगण्याची. जाम चिडले होते मी तिच्यावर. पण नंतर काही वर्षांनी मला सगळ्याचीच गंमत वाटायला लागली. तिचे निर्णय, तिचा नाईलाज, आपल्या प्रतिक्रिया, तिच्याशी माझी मैत्री कमी करण्याचा तुझा प्रयत्न.. सगळंच गमतीशीर...’’
‘‘गंमत?’’
‘‘नाहीतर काय ताई. चिडू नकोस तू, पण मला सांग, आपण नक्की कशामुळे तिला असं घरी येत जाऊ नको सांगितलं?’’
‘‘हा काय प्रश्न झाला?’’
‘‘नाही, सांग ना ताई. कशासाठी? ती माझ्या नावावर थापा मारून पंकजला भेटायची म्हणून?’’ ‘‘कारण तुलाही माहितीये सुचरिता.’’
‘‘पण सांग ना परत एकदा.’’
‘‘भांडायचंय तुला?’’
‘‘नाही, वाद घालायचाय. सांग.’’
‘‘निलू रात्री खोटं सांगून घराबाहेर होती. आपल्याकडेही राह्यली नव्हती तेव्हा. ती आणि पंकज त्या कुठल्याश्या फार्महाउसवर राह्यले होते. दोघंच. ते कशासाठी असं म्हणणं आहे तुझं? आणि तेव्हा तर त्यांचं लग्न ठरलेलंही नव्हतं.’’
‘‘म्हणजे ते लग्नाआधीच जवळ आले म्हणून...?’’
‘‘अर्थातच! फक्त अठराएकोणीस वर्षाची होतीस तेव्हा. कुठला ग्रूप जमवला होतास देव जाणे. एकालाही शिक्षण, करीअर कशात इंटरेस्ट नाही. अर्ध्याहून अधिकजण बारावीच्या पुढे न गेलेले. अगदी निलू आणि पंकजसुद्धा. हाताशी भरपूर रिकामा वेळ त्यांच्या. मग हे धंदे. तुझ्यावर असल्या गोष्टींचा प्रभाव पडू नये म्हणून तिला बाजूला करणं भागच होतं ना?’’
आईबाबा गेल्यानंतर ताई अजून अजूनच आईसारखी बोलायला लागलीये. अगदी हेच असंच म्हणायची आई तेव्हा. पण मी इतकी बावळट, अडाणी गोळा होते का नीलूच्या वाटेवर जायला? एकतर सगळं काही समजावलंच होतं आईनी, ताईनी. त्यात आजूबाजूला एक मित्र असा नव्हता की ज्याच्याबरोबर एकटंच बसून नुसती कॉफी प्यावी. प्रेम, अफेअर आणि हे बाकीचं तर दूरच राह्यलं.
-----------------------------

‘‘काय घोळ घातलेयस निलू बिंधास्त माझ्या नावावर? मी विचारही करू शकत नाही की, तू असं काही केलंस.’’
‘‘अगं असं काही ठरलं नव्हतं. मला बसवर सोडायलाच आला होता तो आणि मग अचानक त्याने बाईक वळवली. मी नकोच म्हणत होते.’’
‘‘कॉफी प्यायला घेऊन गेल्यासारखं बोलत्येस...’’
‘‘कॉफी नाही जेवण जेवण...’’ निलू खिदळली. दोन कानाखाली वाजवाव्याश्या वाटल्या तिच्या.
‘‘लग्नाच्या आधी हे असलं काही बरोबर नाही. प्रेग्नंट झालीस म्हणजे? मग काय करशील? तुझा दादा तुला जिवंत तरी ठेवेल का? आणि पंकजने हात वर केले म्हणजे?’’
‘‘खरंय गं पण आता रहावत नाही. त्याने जायचं ठरवलं ना की नाहीच म्हणावसं नाही वाटत.’’
‘‘ईई गप घाणेरडे!! .... शी:!! निलू हे सगळं बंद होणार नसेल तर माझं नाव सांगायचं नाही यापुढे घरी. आईनी तर निलू रहायला येता कामा नये यापुढे आणि एकमेकींचे कपडेही वापरायचे नाहीत असं सांगितलंय मला.’’
यावर मात्र आम्ही दोघी एकमेकींकडे न बघता रडलो...
-------------------------------------

‘‘सुचा, तू काल सगळं गमतीशीर असं का गं म्हणालीस?’’ बारसं छान पार पडल्यानंतर रात्री गाढ झोप लागली. दुसर्‍या दिवशी सकाळी ताई आणि मी गप्पा मारत बसलो होतो.
‘‘कधी? काय? अचानक काय आठवतं गं तुला!’’
‘‘निलूबद्दल गं!’’
निलूचा विषय ताई अजून सोडायला तयार नव्हती तर...
‘‘तिचं काय?’’

‘‘निलूचा निर्णय आणि तिला घरात येऊ नको सांगणं सगळं तुला गमतीशीर वाटतं आता असं म्हणालीस तू.’’
‘‘ताई जाऊदेत ना.’’
‘‘नाही आज मला वाद घालायचाय. सांग काय गमतीशीर होतं त्यात.’’
‘‘माझी प्रतिक्रिया. मी तिच्याशी मैत्री तोडणं. खूप कठोर शिक्षा झाली की गं ती. एवढ्याश्या चुकीला. चुकीला पण नाहीच खरंतर.’’ ‘
‘चूक नाही? लग्नाआधीच सगळं काही देऊन बसली हे चूक नाही? आईवडिलांना खोटं सांगत राह्यली हे चूक नाही? तुझ्या नावावर हे उद्योग करत राहिली हे चूक नाही? तिच्या आईला कळल्यावर आपल्याकडे जाब विचारायला आली असती तिची आई तर आपली आई काय सांगणार होती?’’
‘‘ताई तिनी थापा मारल्या, माझं नाव सांगितलं खोटंच हे चूक होतं की गं पण तश्या थापा योगिनी पण मारायची की. तिला नाही अशी शिक्षा दिली आपण.’’
‘‘अगं पण लग्नाआधीच?’’
‘‘इतकं भयंकर आहे का हे ‘लग्नाआधीच’?’’
‘‘हं? म्हणजे तुला चुकीचं वाटलं नव्हतं ते?’’
‘‘तेव्हा वाटलंच होतं की. जगबुडीइतकं चुकीचं वाटलं होतं. पण आता नाही वाटत. निसर्ग आहे हे होणारच ना.’’
‘‘म्हणजे आता तू आईला दोष देणारेस का?’’
‘‘काहीतरी काय ताई! तो मुद्दाच नाहीये. तिच्या दृष्टीने जे बरोबर होतं तिच्या मुलीसाठी ते तिने केलं.’’
‘‘मग मुद्दा काय आहे?’’
‘‘लग्नाआधीच शरीरानं जवळ येणं हे मला चुकीचं वाटत नाही. आणि तसं कुणी केलं तर त्यांना लेबलं लावावीत असं वाटत नाही इतकंच."
‘‘तुला खरंच असं वाटतं सुचा? म्हणजे तू दिल्लीला असताना तू आणि कबीर? का तू आणि प्रशांतो?’’
‘‘ताई? काय?’’
‘‘काय काय?’’
‘‘प्रशांतो काय? काहीही.. काहीसुद्धा नव्हतं आमच्यात. केवळ नाटकात अफेअर होतं आमचं. आणि सुरूवातीला स्टेजवर त्याला माझा हात धरायचीही भिती वाटायची म्हणून एकदीड महिना आम्ही एकत्र फिरत होतो. बाकी काही नाही. सगळं कळवलं होतं तुला ताई. काहीतरी उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नकोस.’’
‘‘सुतावरून स्वर्ग काय? आधी काय बोललीस तू? शंका येणार नाही?’’
‘‘अगं कबीरपर्यंत ठिके विचारलंस ते पण प्रशांतो हे टू मच होतंय ताई.’’
‘‘म्हणजे कबीर?’’
‘‘नाही गं बाई लग्न होईपर्यंत तस्सेच होतो मी आणि कबीर.’’
‘‘नक्की ना!’’
‘‘नक्की ना काय? आमचं लग्न होऊन सात वर्ष झालीयेत आणि आता एक मुलगीही आहे. आणि नक्की ना काय? आता काय फरक पडतो त्याने? पण ताई... तो वेळ वाया घालवल्याचा आता मला पश्चात्ताप होतोय. दिल्लीतलं ते एकटं रहाणं, ती थंडी, माहौल... श्या यार!!’’
ताईला उचकवायला मजा येते.
‘‘सुचरिता..’’
इतकी का चिडली ही?
‘‘ताई काय झालंय?’’
‘‘काय बोलतेयस कळतंय का? शमिकानं ऐकलं म्हणजे?’’
ओह हो ताईला निलूचा विषय महत्वाचा नव्हता. गेला बाजार माझा विषय पण महत्त्वाचा नव्हता. तिला फक्त ‘लग्नाआधीच’ बद्दल माझं मत हवं होतं. ताईची शमिका, चौदा पूर्ण... हा तिच्यापुढचा महत्वाचा प्रॉब्लेम होता.

सहा वर्षांपूर्वी ताई शेवटी अमेरिकेत शिफ्ट झाली. हेमंतच्या खूप मनात होतं. त्याच्या शिक्षणाला म्हणे तिथेच स्कोप होता. तरी ताईनी सुरूवातीची काही वर्ष तळ्यात मळ्यात केली. आधी आईचं आजारपण म्हणून मग मी दिल्लीला होते म्हणून मग शमिका अगदी तान्ही आणि मॉरल सपोर्टला तरी आईच हवी म्हणून. असं करत ती इकडे तिकडे करत राह्यली. काही करून अमेरिकेत रहायला जाणं टाळत आली. आईबाबा दोघंही एकापाठोपाठ एक निघून गेल्यावर तिने हेमंतला पण इथेच जॉब घ्यायला लावला. ते दोघं माझे आईबाबा झाले. कबीरशी मी लग्न करायचं ठरवलंय म्हटल्यावर कबीरच्या पंजाबी कुटुंबात जाऊन सगळ्यांचा होकार घेऊन आले. माझं रितसर लग्न करून दिलं. मुंबईत आमचं बस्तान बसवायला मदत केली. हेमंतला त्याच दरम्यान अमेरिकेतली, त्याला हवी तशी रिसर्चची संधी मिळाली. मग मात्र ताईच्याकडची कारणं संपल्यासारखी झाली. गेली अमेरिकेत. नंतर मात्र बरेच दिवस ग्रीनकार्ड आणि अजून सतरा भानगडींच्यामुळे तिला इकडे येताच आलं नाही. ती आत्ता आली माझ्या डिलिव्हरीला. अमेरिकेत गेली तेव्हा शमकी आठनऊ वर्षाची होती फक्त.

‘‘गंगाबाई तुझी शमकी पार तुझ्या वळणावर आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीत मला लहानपणची तू आठवतेस. जेव्हा हट्ट करून, वाद घालून अंत बघते ना माझा तेव्हा तर अगदी तुझ्यासारखीच दिसते ती. आईची इतकी दया यायची मला. आता माझीच येते.’’
‘‘ताई शमकी माझ्या वळणावर असेल तर उत्तमच आहे की. पण इतकं घालूनपाडून बोलू नकोस. तुला जमत नसेल तर इकडे पाठवून दे तिला. माझं ऐकते ती.’’

काय प्वाइंट मिळालाय ताईला पिडायचा. अजूनही ताईशी गप्पा मारताना हळूच तिला शाब्दिक चिमटे घेऊन चिडवायची जी काय खुमखुमी येते ना. मला वाटलं होतं आपण मोठ्या झालो की थोडी अक्कल येईल. पण आता जवळजवळ पस्तिशीला आले तरी काही फरक नाहीये.

‘‘मला वेड लागलंय शमिकाला तुझ्याकडे ठेवायला. काय संस्कार करणारेस तू? तुझ्या ‘गमतीशीर’ मुद्द्यामुळे आधीच मला या नव्या पिल्लाचं कसं होणार अशी भिती वाटायला लागलेय.’’
आता माझा इगोबिगोच दुखावला. आई झाले तरी फारसा समजुतदारपणा आलेला नव्हता म्हणजे, निदान ताईसमोर तरी. मग आम्ही थोडासा मनसोक्त वाद घातला. थोडं निंदेला बसलो लोकांच्या आणि सोयीस्करपणे मुद्द्याला कलाटणी दिली. तरी ताई थोडीशी डिस्टर्ब्डच राह्यली. ---------------------------------

‘‘मुलींना धाकात ठेवायला हवं चांगलं’’ कश्यातलं तरी काहीतरी वाचून ताई एकदम म्हणाली. ‘‘धाकात ठेवायचं म्हणजे नक्की काय करणार तू ताई? जाण्यायेण्यावर बंदी? मित्रांवर बंदी? काय?’’
शक्य असतं तर एखाद्या किल्ल्यात बंदीस्त करून ठेवली असती असं ताईला म्हणायचं होतं. म्हणाली नाही इतकंच.
‘‘धाकात ठेवण्याने काय होणार?’’
‘‘मी काही केलं तरी गोष्टी थांबणार नाहीत गंगे. लग्नाच्या आधीच सगळं काही करून बसणार या पोरी.’’ ताईचा आवाज भिजला परत.
‘‘तुला अमेरिकेत गेल्याचा पश्चात्ताप इत्यादी होतोय का ताई?’’
‘‘मला तसं फारसं जायचं नव्हतंच ना पण हेमंतसाठी गेले. आता सवय झाली. पण शमकीसाठी भिती वाटते. निर्णय चुकला की काय असं वाटतं.’’
‘‘या कारणासाठी निर्णय चुकला बिकला म्हणू नकोस ताई. इथेही फार वेगळा प्रकार नाहीये. परत सगळंच झाकपाक करत त्यामुळे चुकीचे समज, चुकीच्या कल्पना. धाकापोटी अज्ञान आणि अज्ञानापोटी चुका असं भरपूर आहे इथे.’’
‘‘हो का गं? पण मी आणि तू राह्यलोच की स्वच्छ!’’
‘‘ई हे स्वच्छ काय आहे!’’
‘‘मुद्दा लक्षात घे ना.’’
‘‘तुला काय वाटतं? आपण धाकापोटी अश्या राह्यलो? तुझ्यामाझ्या बरोबरीचे सगळे जण धाकापोटी असेच राह्यले? निलूचं काय मग? तिच्या घरचा धाकबिक तर आपल्या घरच्या वरताण होता. निलूच कशाला अजून मैत्रिणी नव्हत्या का तुझ्या माझ्या?’’
"‘म्हणून काय ते बरोबर आहे काय? पुढच्या वेळेला मी इथे येईन तेव्हा शमकी तशीच असेल कशावरून याचा विचार केलायस कधी?’’
इथे मात्र मी पण गडबडले.
----------------------------------

लग्न करायचं ठरल्यानंतरही काही ना काही कारणाने उशीर होत आमचं तिशीला टेकता टेकता लग्न झालं. बाकी सगळ्या पातळ्यांवर कवाडं सताड उघडून विचार बिचार करून मगच पटणारा निर्णय घेण्याची सवय लागली होती. पण या एका बाबतीत मात्र माझं मत ठाम बिम होतं तेव्हा. कबीर म्हणजे संत प्राणीच. मी चुकीची समजूत करून घेईन म्हणून या प्राण्याने विषयच काढला नाही आणि मी विषय काढून वर थांबायचंच असं ठामपणे सांगितल्यावर ‘तुला जे कम्फर्टेबल असेल ते!’ म्हणाला.

लहानपणापासून फारश्या कुठल्याच गोष्टी आईबाबांची ‘चांगली मुलगी’ शीर्षकाखालच्या नव्हत्या केल्या. अभ्यास-मार्क इत्यादींमधे बोंब, एक करू नको सांगितलं की तेच करणं. काहीतरी उफराटी वेडं डोक्यात घेणं.. नॉर्मल काहीच नाही. शक्य तेवढं आईबापांना चिंतेत पाडणं हे एवढंच केलं होतं मी. त्यात अजून मी दिल्लीला एकटी रहात होते आणि एका पंजाब्याशी लग्न करायचं ठरवून बसले होते. निदान याबाबतीत तरी चांगली मुलगी बनून दाखवावं हा गिल्ट होताच ठाम मत असायला. मग ते दोघं अचानक गेलेच. कुठलीही त्यांना पटली नसती अशी गोष्ट न करण्याचा हट्ट घेतला मी आणि ते सगळं कबीरनं समजून घेतलं. लग्न उशीरा होऊनही आम्ही तसेच होतो.

गोष्टी करा आणि मग त्यावर पांघरूणं घालत बसा, पकडले जाण्याचा सततचा ताण विकत घ्या, त्यातून परत घोळ बिळ झाला तर काय? हे टेन्शन, एवढ्या कटकटीपेक्षा ‘मरूदेत! थांबूच या!’ हे सोपं होतं. लग्नानंतर मात्र हे थांबणं ओव्हररेटेड वाटायला लागलं. कशासाठी थांबलो आपण? इतक्या सांगितल्या गेलेल्या गोष्टी तोडल्या आपण मग इथे काय हरकत होती? लग्न तर करणारंच होतो मग उगाच इतकी वर्ष वाया का घालवली आपण? असं बरंच काय काय डोक्यात यायला लागलं.

कबीरशी बोलल्यावर आधी तो खूप हसला. ‘‘ऐसाही लगता था मुझे तब. पण तुला नको होतं आणि तुझं मन वळवणं शक्य दिसत नव्हतं. तू इतकी ठाम होतीस की मी जराजरी विषय काढला तर तू मला सोडूनच देशील अशी भिती वाटली. त्यापेक्षा थांबणं परवडलं!’’

‘‘लेकीन ये बात नॅचरल लगती नही रितू! बहोत दिन ऐसेही गंवाये हमने!’’ यावर आमचं एकमत झालं होतं.

हे सगळं खरं असलं तरी शमकी कदाचित वेळ वाया घालवणार नाही. कदाचित चौदापंधरा वर्षांनी माझ्या समोरचं माझं गाठोडंही वेळ घालवणार नाही या विचारांनी मी गडबडलेच. ‘मुली म्हणजे छातीवर निखारा’ असं शेजारच्या आजी म्हणायचा ते हेच की काय असा विचार करत माझी परत तंद्री लागली.
----------------------------------------------

‘‘आय थिंक आय शुड गिव्ह माय फ्लॉवर!’’
‘‘ओह! माय गॉड! डू इट!’’
टिव्हीच्या आवाजाने माझी तंद्री मोडली. बाहेर हॉलमधे गेले तर ताईचे डोळे टिव्हीला चिकटलेले होते. फ्रेंडस चालू होतं. कॅफेमधे तीस वर्षाची महाकाय मोनिका आणि रेचेल.
‘‘व्हॉट इज शी कॉलिंग फ्लॉवर टू? आय मीन यक्क! व्हॉट अ बोरींग टर्मिनॉलॉजी!’’
आमच्या नजरा हॉलच्या दाराकडे वळल्या. टिनेजर त्यांच्या आयपॉड समाधीतून बाहेर येऊन हॉलमधे प्रकट होत्साते हे उदगार काढत्या झाल्या होत्या. ताईने टिव्ही बंद केला. आम्ही दोघींनी शमिकावर नजर स्थिर केली.
‘‘व्हॉट मॉम?’’
नक्की काय बोलायचंय हे न समजल्याने एकमेकींकडे आणि शमकीकडे आम्ही आळीपाळीने बघत राह्यलो. शेवटी मी कोंडी फोंडली.
‘‘मग हल्लीचे टिनेजर्स काय म्हणतात याला?’’
‘‘नथिंग!’’
टिनेज बोललं! आम्ही तसंच तिच्याकडे बघत राह्यलो.
‘‘व्हाय इज इट सच अ बिग डील, मॉशी?’’
टिनेजरने आम्हाला खोल गर्तेत लोटून परत कानाला हेडफोनची बटणं लावली.

‘‘बिग डील!! पाह्यलंस? हे बिग डील नाहीये?’’
ताईला अस्वस्थतेने अजून काही बोलता आलं नाही आणि आत्ता तिला पिडायची माझी इच्छा नव्हती.
‘‘कदाचित नसेल ना तिच्यासाठी हे बिग डील. इतर बिगर डिलं दिसत असतील तिला.’’
‘‘कसली बिगर डिलं?’’
‘‘म्हणजे यावर एवढा विचार करण्यापेक्षा इतर महत्वाच्या गोष्टी असतील तिच्यासाठी.’’ ‘
‘पण म्हणजे ही गोष्ट विचार न करण्याची?’’
ताई म्हणजे एक स्फोटक पदार्थ झाली होती आत्ता. काहीही म्हणा... धाड धुम्म.... होणारंच.
‘‘मला काय म्हणायचंय ते नक्की सांगता येत नाहीये आत्ता. उद्या बोलूया? तू पण दमलीयेस.’’ ---------------------------

कबीर आठवडाभराने बाहेरगावाहून आल्यावर लगेचच ताई परत जायला निघणार होती. मघाशी स्फोट न होता निजानिज झाली असली तरी आठवड्याभरात कधीही स्फोट होऊ शकला असता. घर आणि मी आणि पिल्लू सगळी उस्तवार ताई फारच मनावर घेऊन करत होती. मला आरामच आराम होता. परत नको तेवढा विचार करण्याची खानदानी सवय. मग झोप येणार कशी!

शमकीला योग्य ती सगळी माहिती योग्य वेळी ताईने, शमकीच्या शाळेने दिलीच असणार. पण तरी ताईची काळजी सुटत नव्हती आणि ती लॉजिकल वाटत नसली तरी मलाही घेरून राह्यली होती. शमकी ‘नॉट बिग डील!’ म्हणून विषय झटकत होती का?

‘‘आयुष्यात करण्यासारखं दुसरं काही नाहीये का?’’
एकोणीस वर्षाची सुचरिता मला, पस्तिशीच्या सुचरिताला म्हणाली.
‘‘असेल की पण हे सगळं पण खुणावणारंच ना?’’
‘‘खुणावू देत!’’
‘‘म्हणायला काय जातंय?’’
‘‘करण्यासारखे खूप उद्योग आहेत मागे. बॉयफ्रेंड, मग त्याला वेळ द्या, त्याची कौतुकं करा वेळ तरी आहे का यासाठी?’’
‘‘माझीच वाक्यं आहेत ही. वेळोवेळी फेकलेली. मलाच काय ऐकवतेयस?’’
‘‘तुझी नाही माझी आहेत. एकोणीस वर्षाच्या सुचरिताची. पस्तिशीला पोचेतो अर्थ विसरलीयेस या वाक्यांचा.’’
‘‘कसा विसरेन? पण मला तेव्हा शरीरानं जवळ येणं ‘नॉट बिग डील!’ वाटत नव्हतं.’’
‘‘का?’’
‘‘का म्हणजे? ते बिग डील होतं म्हणून.’’
‘‘या ‘बिग डील’शी लग्न, आयुष्य असं सगळं बांधून ठेवलं होतंस. आजूबाजूला कोणी नव्हतंच त्यामुळे सोपंही होतं ना ते असं बांधून ठेवणं?’’
‘‘मग?’’
‘‘शमकीला नसेल वाटत अशी सगळी एकत्र मोट बांधावी असं.’’
‘‘..............’’
‘‘एवढं बिग डील का करतीयेस तू? एवढ्याश्या गोष्टीची निलूला फार जास्त मोठी शिक्षा झाली असं तूच म्हणतेस ना?’’
‘‘हो.’’
‘‘मग शमकीने केलं तर चूक? तू केलं असतं तर चूक? निदान शमकीला ताईने सगळं नीट समजावलेलं तरी आहे. तुला होतं समजावलेलं. सगळ्या धोक्यांची जाण होतीच की.’’
‘‘हो होती मला सगळ्या धोक्यांची जाण. पण केवळ शरीराच्या धोक्यांची. मनाच्या पडझडीबद्दल कुठे काय माहित होतं. त्या पडझडीलाच तर घाबरले ना मी.’’
‘‘मनं आणि शरीरं एकत्र गुंतवली की त्रास होतो. नको तसं तुटामोडायला होतं. वेगळं करणं जमणार नाही तुलाही आणि मलाही. त्यापेक्षा नकोच तो गुंता. असंच सांगितलं होतंस ना वरच्या मजल्यावरच्या मकरंदला? वय वर्ष अठरा होतं फक्त तुझं.’’
‘‘..................’’
‘‘शमकी पण असे गुंते करेल कशावरून? तुझ्यासाठी बिग डील होतं म्हणून तू गुंतवत होतीस दोन्ही गोष्टी. तुझी पडझड म्हणून होणार होती. शमकीसाठी नाहीये ना हे बिग डील. ती नाही पडझड करून घेणार स्वतःची असे गुंते करून.’’
‘‘पण म्हणजे मग मनाचं काय?’’
‘‘काही नाही. तू गुंते नकोत म्हणून जराश्या तोंडातोंडीनंतर थांबलीस. तुझ्या पूर्ण आयुष्याचा निर्णय शरीराच्या ताब्यात दिला नाहीस. तिची थांबायची पायरी वेगळी असेल. पण ती सुद्धा शरीराच्या निर्णयांवर आयुष्याचे निर्णय आखणार नाहीच ना.’’
‘‘पण याचा अर्थ काही झालं तरी ती लग्नापर्यंत थांबणार नाही.’’
‘‘ती लग्न करेलच कशावरून?’’
‘‘असे फाटे खूप फोडता येतील.’’
‘‘बरोबर. पण महत्वाचं काय तर ती जे काही करेल ते उघड्या डोळ्यांनी, तिच्या मनाने आणि सहजपणे करेल. कदाचित तितक्याच सहजपणे ताईला येऊन सांगेलही. सतत काळजी आणि चिंतेचा भुंगा मागे नसता तर तू सुद्धा मकरंदशी झालेली तोंडातोंडी ताईला तरी सांगितली असतीच ना.’’
‘‘पण ती फक्त पंधराची आहे.’’
‘‘चौदा. पंधरा व्हायला अजून एक महिना बाकी आहे.’’
‘‘तेच ते. पंधरा वर्षाची मुलगी इतकी जबाबदारपणे घेईल या गोष्टी?’’
‘‘विश्वास तर टाका तिच्यावर!’’

इथे मात्र मी चमकले. इथंच तर गंमत होती. सगळी वादावादी आपल्यावर वरच्या पिढीचा विश्वासच नाही या एकाच खुंटाभोवती फिरत होती की. माझ्यावर थोडापण विश्वास नाही का असं भांडण मी सतराअठरा वर्षाची असताना रोजच भांडायचे की आईशी. आता शमकी ताईशी भांडत असेल. माझं हे पिल्लू माझ्याशी भांडेल काही वर्षांनी.

पिल्लू पंधरा वर्षाची होऊन कशी भांडेल माझ्याशी अशा विचारात गुंगल्यावर कधीतरी झोप लागली.
--------------------

छान स्वच्छ सकाळ झाली. ताई अजिबात स्फोटक पदार्थ वाटत नव्हती आणि शमकी पण वेगळी वाटत होती. मला एकोणीस वर्षाची सुचरिता भेटायला आली तसं यांना कोण भेटलं होतं?
‘‘बरोबरे तुझं.’’
मी ताईकडे बघत राह्यले. ताई फ्लॉवर, बिग डील इत्यादीबद्दलच बोलत होती. जे बोलत होती त्यावर विश्वास ठेवणं ताईलाच अवघड जात होतं पण तरी ती प्रयत्न करत होती. कुठेतरी कशानेतरी एक थर खरवडला गेला होता.
‘‘असं काही होऊच नये यासाठी मी किती पुरी पडणार ना!’’
‘‘होऊच नये यासाठी झगडण्यात तसा अर्थ नाही ना ताई!’’
‘‘अं.. कदाचित. आणि तेवढी एकच गोष्ट नाहीये ना तिच्या आयुष्यात. परत आपल्याच पोटचा गोळा, आपलेच संस्कार आणि आपण इतका संशय घ्यायचा!’’
मी ऐकत होते.
‘‘सगळ्या शास्त्रीय फॅक्टस समजवल्या आहेतच तिला कधीच. आम्ही दोघांनी पण आणि शाळेत पण. निदान अडाणीपणानं घात तरी नाही करून घेणार स्वतःचा. रात्री बोलली माझ्याशी पोर. बराच वेळ. आधी भांडली पण माझ्याशी. अगदी तुझ्यासारखी. मग रडलो आम्ही दोघी खूप’’
मी हसले.
‘‘जग बदलतंय गंगे.’’
मी जरा चकित होऊन ऐकू लागले.
‘‘लपूनछपून, अडाणीपणाने घडायचंच की सगळं काही. निदान ते तरी टळेल. आफ्टरऑल इट रियली इजन्ट सच अ बिग डिल!’’
ताईचा आवाज अजिबात ठाम नव्हता. प्रयत्न होता मात्र.
‘‘इज दॅट राइट!’’
मी हसले. ताई हसली.
टिनेजरनं कानाला बटणं लावली. माझं गाठोडं झोपेत खुसखुसलं.
पस्तिशीच्या सुचरिताने एकोणीसच्या सुचरिताला मस्त टाळी दिली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त

-नीरजा पटवर्धन

तळटिपः या कथेच्या शेवटाकडे येण्यासाठी काही 'मुलींच्या आयांशी' मनमोकळी चर्चा केली होती. ज्या चर्चेचा खूप उपयोग झाला. त्या सगळ्या आयांचे खूप खूप आभार. Happy

गुलमोहर: 

अरे मी २-३ महिन्यांनी काल रात्री टाकलाय तिसरा भाग. लगेच कसा पुढचा भाग जमेल Proud

प्रयत्न करतेय. जमेलही काहीतरी बरं या दोन चार दिवसात.
तूर्तास हा विषय मला कधी कधी महत्वाचा वाटतोय तर कधी नॉन-इश्यू...
तुमचं काय मत आहे?

वर झोकात भाग १ व २ व ३ लिहीलेले वाचले तेंव्हा वाटले चला बरं झालं आधी नव्हती वाचली. आता पूर्ण वाचू. Sad
असो. मस्त इंटअरेस्टिंग वाटतेय. पूर्ण कर मग बघू या. Happy
आणि हो कबीरचं कॅरेक्टर अगदी गौरीबाईंच्या कथांमधल्या संत नवर्‍यांसारखं झालंय.

आता झालंच. एकच भाग अजून.
>>
बायो, हे 'आता झालंच' जेव्हा लिवशील तेव्हा खरं.. Proud

कबीरचं कॅरेक्टर अगदी गौरीबाईंच्या कथांमधल्या संत नवर्‍यांसारखं झालंय.>>> आणि त्याचे नाव सुद्धा!!

नीधप, कथा संवादांसह अतिशय सहज आणि सुरेख वाटली... नाजूक विषय असून कुठेही अतिरंजित, उथळ, शब्दबंबाळ, उपदेशात्मक, वैचारिक नाही वाटली...

नवरा सिंगापूरला सेटल व्हायची स्वप्न बघतोय (त्याच्या मते इथे त्याला तितकंसं करियर प्रॉस्पेक्ट्स नाहीय) आणि माझा आणि त्याचा असाच वाद होतो... त्याचं मत सुचरितासारखंच आहे, मला मात्र तिच्या ताईसारखंच टेन्शन आलंय...

मुली म्हणजे छातीवर का डोक्यावर निखारा असं एक शेजारच्या आजी म्हणायचा ते हेच की काय असा विचार करत माझी परत तंद्री लागली.>> खरंय... Sad

असो... जर ही कथा वाचून माझं मतपरिवर्तन झालं abroad सेटल व्हायचं तर माझा नवरा तुला मनापासून धन्यवादच देइल. Happy (नेतेय प्रिंट काढून त्याला वाचायला Happy )

असे बरेचसे NRIs असतील ज्यांच्या फांद्या abroadच्या आकाशाकडे झेपावायला उत्सुक आहेत पण मूळ भारतीय संस्कारांचे roots पण सोडवत नाहीत... मोठी विचित्र सिच्युएशन असते ही... आणि सुचरिता म्हणते तसं abroad च कशाला भारतातही या घटना अगदी सहजपणे घडताहेत आणि आपली त्याबद्दलची मानसिकताही बदलू लागलेय सुचरितासारखीच हेही तितकंच खरं... वैचारिक द्वंद्व छान शब्दांकित केलेय Happy

आहे होय अजून?? मला वाटलं प्रश्न अर्ध्यावरच सोडून दिलाय! नजरचुकीने क्रमशः मिसलं... बरं तर मग वाट पाहतेय प्रचंड कुतुहलाने पुढच्या भागाची!

ही आधी वाचायची राहिली त्यामुळे सलग तीन भाग वाचायला मिळाले. :). मस्त जमलेय. पुढल्या भागाची वाट बघतेय.

dreamgirl
असे बरेचसे NRIs असतील ज्यांच्या फांद्या abroadच्या आकाशाकडे झेपावायला उत्सुक आहेत पण मूळ भारतीय संस्कारांचे roots पण सोडवत नाहीत... मोठी विचित्र सिच्युएशन असते ही...
>>

बरोबर बोललीस. लग्नाआधि एकत्र रहाण्यात मुख्य प्रश्न असा की मग नंतर कोणत्याही कारणाने लग्न
झाले नाही तर कठीण परिस्थिती होते म्हणजे मुलगा किंवा मुलगी दोघांचीही. अर्थात मुलगा pregnant राहणार नाही म्हणुन त्यातल्या त्यात सुखी असा आभास असतोच, पण अत्यंत बेजबाबदार मुलगा नसेल तर दोघे अड्कलेच तसे मग लग्नच का करु नये?

तूर्तास हा विषय मला कधी कधी महत्वाचा वाटतोय तर कधी नॉन-इश्यू... >> actually हा इश्यू नाहीचे खर तर.. आपण लग्नासारख्या इतक्या अननॅचरल गोष्टीला आरामात निभाउन नेतो आणि जे एकदम नॅचरल आहे त्याचा इतका बाउ करतो. असो, छान लिहिते आहेस. पण मला पण वाटल १ २ व ३ म्हणजे पुर्ण कथा असेल Sad

नीधप
इथे मी कबीर आणि सुचरिता यांना एक प्रश्न विचारु इच्छिते.
ते लग्नासाठी का थांबले?
काही जण म्हणतात की career च्या मध्ये distraction नको, पण लग्नाने एवढा मुलभुत काय फरक पडतो?
परदेशात मुलगा व मुलगी एकत्र राहतात कारण एकमेकांशी न पटल्यास वेगळे होण्यास ते तयार असतात
व अशा परिस्थितीत त्यांना दुसरे साथिदार पुढे मिळु शकतात (कोणतीही लपवाछपवी न करता), परंतु अशा परिस्थितीत जन्मलेल्या मुलांना बरेचदा त्रास होतोच.
अर्थात ही कथाच आहे पण अनेकदा मी एखादा decision regret करताना आईचे वाक्य आठवते.
"प्रत्येक decision ची जबाबदारी घ्यायला शीक म्हणजे त्यासाठी तु आई वडिलांना, समाजाला जबाबदार धरणे सोडुन देशील"
dreamgirl हाच संदेश आपण आप्ल्या मुलांना द्यायला हवा. सध्या तरी माझी मुलगी लहान (वय वर्षे ६.५) आहे.

विषय तसा नाजूकच आहे... शेवटच्या भागाव्रर सगळ्या कथेचा डोलारा अवलंबून होता... त जर चुकला असता तर फक्त टीआर्पी जमवण्याची कसरत ईतकाच उद्द्येश्य उरला असता...
तू १९ च्य आणि पस्तिशीच्या सुचाची गाठ घालून विषय अगदी नीट तोलून धरलास. थोडं फिल्मी वाट्लं (फ्टोतून बोल्णं) तरी आपण स्वतःशी असा संवाद साधतच असओ की... (फोटॉतून नाही म्हणा!)

आपला भूतकाळ नीट लक्षात असला की भविष्याला नीट समजून घ्जेता येऊ शक्तं!

अजून येउद्या! Happy

प्रतिसाद समाप्त!!!

मस्त, छान, सुंदर वगैरे वगैरे काहीही म्हणणार नाही...

तरीही आवडली...

नक्की काय आवडलं आणि तेच का आवडलं हे ही सांगता येणार नाही...

कदाचित ३५ आणि १९ च्या मध्याच्या आसपास असल्यानी दोन्ही मनं इमॅजिन करता आली म्हणूनही असेल...

Pages