सेलफ़ोन इष्टोरी

Submitted by मानुषी on 8 June, 2010 - 03:37

सेलफ़ोन इष्टोरी
मी आणि नवरा पुण्याहून ठाण्याला चाललो होतो. आपलं स्टेट ट्रान्स्पोर्ट खूपच सुधारलंय ना सध्या......तर एस.टीच्याच वोल्वोत अगदी आरामात ( आता अगदी स्वार झालो होतो असंच म्हणायची इच्छा होतेय मला..........कारण एस.टी.त इतका आराम? पहा: गुटकापुराण आणि आमचा प्रवास.) बसलो होतो. एकदा तर चक्क पाण्याच्या छोटुकल्या इवल्याश्या बाटल्याही मिळाल्या. समोर टीव्ही सुद्धा होता. पण तो काही कुणी चालू केला नाही आणि कुणी तशी डिमांडही केली नाही.

सकाळी आठची वोल्वो होती. आता मी या वोल्वोला बस नाही बरं का म्हणणार, कारण बस म्हटलं की अगदी कसनुसंच होतं. वोल्वो म्हटल्यावर कसं अगदी भारदस्त आणि मस्त वाटतं.
गाडीला लेडी कंडक्टर होती. अगदी छोटीशी.... तिला कुणीच बधत नव्हतं. सगळे आपल्याला पाहिजे त्या सीटवर बसून घेत होते. अहो शेवटी बसची वोल्वो झाली, तरी प्रवासी तेच ना........आपल्या येष्टीच्या लाल डबड्यातून(हो... हे मी नाही म्हणत पु.ल. म्हणून गेलेत.) प्रवासाची सवय असलेले!

तर आम्ही दोघे स्थानापन्न झालो. नवर्‍याने पुस्तक आणलं होतं वाचायला .........
डॉ. वि.ना. श्रीखंडयांचं "आणि दोन हात".
गाडी लेट सुटली.........अर्धा तास. हळूहळू सगळे आपापल्या सेलफ़ोनवर सुरू झाले. इकडून तिकडून संवाद ऐकू येत होते.......अर्थातच दबक्या आवाजातले.

१)"हो हो .....मिळाली बस........ सुटलीये आत्ताच .....अकरा पर्यंत पोचतो."
२)"अरे, वोल्वोचं तिकिट मिळालंय ना.......अकरा साडेअकरापर्यंत पोचतेच.....अरे हो.... लेट झालीये जरा... पण ते मेकप करतात नंतर. बरोब्बर वेळेत पोचवतात..चल ठेवते"
३)"हो...साडेअकरापर्यंत....नको.... घ्यायला येऊ नको... मी येईन रिक्शाने."
अश्या टाईपचे संवाद ऐकू येत होते.
आता माझ्या अगदी पाठीमागच्या सीटवरचाही सेल खणखणला. छान म्यूझिक होतं. मेलोडियस.
"हो हो .......निघाले. जस्ट आत्ताच..... अगं माझी सिंहगड मिस झाली ना.......हो मी साडेअकरापर्यंत पोचते."
आवाजाची मालकीण तरूण मुलगी असावी. ही अगदी मागच्या लगेचच्या सीटवर होती आणि तिचा व्हॉल्यूम इतका मोठा होता की मला वाटलं अगदी ड्रायव्हरलाही कळलं बहुतेक हिची सिंहगड मिस झाली ते!

जनरली पहा....... बसमधे, बस सुटताना आणि ज्याच्या त्याच्या उतरण्याच्या वेळी, अशी प्रवाश्यांमधे सेलवरची ठराविक संभाषणे असतात. नंतर मधल्या काळात बहुतेक फ़ोन बंद असतात. अगदीच काही कामाचा फ़ोन असल्यास कामाचं बोलून फ़ोन ठवतात. "मी ट्रॅव्हल करतोय......ऑफ़िसात पोचलो की फ़ोन करतो" अशीही संभाषणे अधून मधून होतात.
तर या मागच्या बाईसाहेबांचा फ़ोनयज्ञ अखंड चार तास चालू होता. मी सिरियल्स कधी पहात नाही. पण तीन चार सिरियल्स एकत्र पाहिल्यासारखं वाटलं. निम्मे फ़ोन तिला आलेले होते आणि निम्मे तिने केलेले होते.
यात मजा एकच आहे. ती म्हणजे तिच्या तोंडचे डायलॉग ऐकून मला तिची पूर्ण लाइफ़ इष्टोरी कळली...आणि पलिकडची व्यक्ती काय बोलली असेल याचाही अंदाज येत गेला. खरं म्हणजे मी तिचा चेहेरा सुद्धा नीट पाहिला नाही. आणि मी अगदी जर कानात बोळेच घातले असते तरच तिच्या इष्टोरीपासून मी वंचित राहिले असते. आणि ते मी का म्हणून करायचं?

आता तिने फ़ोन केला होता, "हाय निखिल!......अरे तुला वाटलं असेल ना मी काल फ़ोन का नाही उचलला.......अरे मी ड्राइव्ह करत होते. काय म्हणजे काय? मी काय बस की रणगाडा ड्राइव्ह करीन का? अरे मी म्हटलं नव्हतं का तुला, माझी शेवरले बीट येतेय म्हणून."
आता हा डायलॉग आत्ता मारायची काही गरज होती का? हे घरी गेल्यावर फ़ोन करून, जीटॉकवर, ऑरकुटवर, फ़ेसबुकवर किंवा मेल करूनही सांगता आलं असतं. माझं म्हणणं..... अगदी लगेच चालत्या बसमधे स्वता:चा एक रुपया खर्च करण्याइतकं काही अर्जंट नव्हतं.पण स्वता:ची शेवरले बीट येण्याचा आनंद तिला पूर्ण बसबरोबर शेअर करायचा होता बहुतेक!
पुढे ती म्हणाली, "अरे माझा यूके व्हीसा आला............
हो फ़्लाइट बुकिन्ग झालं..............अरे...निखिल..........अरे..? हो हो ....... भेटायचंय ना...........मी ठाण्याहून आले की भेटू."
काय कळलं ना ? निखिल काय म्हणत होता ते?

आता मला छंदच लागला. तिचे संवाद तर मला चांगलेच ऐकू येत होते........त्यावरून पलिकडील व्यक्ती काय बोलली असेल याचा मी मनातल्या अंदाज बांधू लगले. थोडक्यात..... ऐकू येत नसलेले डायलॉग मी मनातत्या मनात तयार करू लागले.
आणि एक गंमत .......ती स्वता:चं नावही वरचेवर घेत होती आणि पलिकडच्या/ची चं नावही घेत होती. आहे की नाही गंमत? त्यामुळे मला कळलं की तिचं नाव रीमा आहे. ते मला कसं कळलं हे तुम्हाला खालील डायलॉगवरून कळेलच.
ओके.. बी रेडी............वाजला तिचा फ़ोन. माझा मनातल्या मनात खेळ सुरू झाला.
"हॅलो मम्मी.........बोल....हो...अगं मी आत्ताच निघालीये...अगं हो होतं सिंहगडचं बुकिंग, पण माझी सिंहगड मिस झाली गं......तुला वाटत असेल ना की रीमा कुठे रमली?" पहा पहिला स्वता:च्या नावाचा उल्लेख!
म्हणजे तिच्या आईचा फ़ोन होता आणि आईला माहिती होते की हिने सिंहगड एक्स्प्रेसचं रिझर्वेशन केलेलं होतं. एवढं तर शेंबड्या पोरालाही कळलं असतं.
"अगं नाही गं .........काल रात्री मी १० वाजताच झोपले होते. पण लगेचच करणचा फ़ोन आला लंडनहून......तो जवळजवळ १ वाजेपर्यंत बोलत होता." रीमा
"हो का? मग तू काय भांडलीस की काय त्याबरोबर?" मम्मी
"नाही गं मम्मी, मी कशाला भांडू त्याच्याशी? आता चाललीच आहे ना त्याच्याकडे दोन वर्षांनी का होईना! ..........मम्मी ..माझा दुसरा फ़ोन वाजतोय.....आणि हे बघ माझी या फ़ोनची बॆटरी लो आहे तर माझा नवा नंबर घेतेस का? पटकन घे.........९८९०--------. कर मला नंतर. चल बाय"
पूर्ण बसला तिचा नवा सेल नंबर कळला.

चपळाईने दुसरा फ़ोन घेते. "हे SSSSS स्वाती हाय!.........बोल."
आता स्वातीचे संवाद हे मी रीमाच्या मला ऐकू येणार्‍या बोलण्यावरून तयार केले आहेत.
"अगं काय हे तू कुठे आहेस?काही फ़ोन नाही मेसेज नाही" स्वाती.
ही तिची स्वाती नावाची मैत्रिण/कुलीग असणार ..कारण पहा पुढे रीमाचा डायलॉग.
"स्वाती अगं खरंच आय अ‍ॅम सो सॉरी.....ऑफ़िसमधे तुला भेटताच आलं नाही गं..आणि त्यात माझं यूके व्हीसाचं काम चालू होतं ना गं." रीमा
"अगं हो पण तुला प्रबलबरोबर फ़िरायला वेळ आहे........फ़क्त मला..." स्वाती.
"स्वाती ?अगं प्रबलबरोबर फ़िरायला? काय बोलतेस तू? ऐकून तर घे........" रीमा
"जाउ दे.............." स्वाती
"हे बघ तू उगीच गैरसमज करून घेतलायस. तू मला स्पष्टच विचारायला हवं होतंस त्या दिवशी की....रीमा तू प्रबलबरोबर कुठे गेली होतीस?" रीमा.
पहा पुन्हा स्वता:च्या नावाचा उल्लेख.
"अगं मी तुला पाहिल्यासारखं वाटलं म्हणून विचारलं आणि मला असं वाटलं की तो प्रबलच असावा." स्वाती
"अगं.........वाटलं वाटलं काय ? सरळ विचार ना रीमा तू प्रबलबरोबर कशी? असं आडून आडून कशाला चौकशा ?"
पहा पुन्हा स्वता:चा उल्लेख!
"रीमा अगं परवाच तुझं आणि प्रबलचं ऑफ़िसमधे सगळ्यांच्या समोर वाजलं ना? म्हणून मला वाटलं ,
बोथ ऑफ़ यू आर नॉट इन टॉकिंग टर्म्स." स्वाती.
"अगं एकदा वाजलं म्हणून काय झालं? शेवटी आम्हालाच नव्या प्रोजेक्टवर काम करायचय ना? न बोलून सांगतेस कुणाला? प्रबलनेच मला काल विचारलं की कॉफ़ी प्यायला येतेस का? मग आम्ही ऑफ़िसनंतर गेलो होतो..तेव्हाच तू मला पाहिलं असशील." रीमा
इतकी सगळी हिस्टरी आम्ही दोघेच मुकाट ऐकत बसलो होतो तर तिच्या शेजारच्याचं काय झालं असेल? नवरा फ़क्त अधून मधून पुस्तकातून डोकं काढून माझ्याकडे त्रस्त असहाय दृष्टिक्षेप टाकत होता.
बस चालूच होती.
फ़ूड मॉलला अर्धा तास गेला. ती फ़ोन कानाला लावूनच उतरली.

मध्यांतर

परत त्याच अवस्थेत चढली. कानाला फोन लावूनच .सीरियल मागील पानावरून पुढे चालू.
माझे कान आपोआपच मागे खेचले गेले. काय करणार? नवरा "आणि दोन हात" मधे गुंगला.
रीमाचा नवा सेल वाजला. वेगळा रिंगटोन. फ़ोन उपर्निदिष्ट प्रबलचा होता.
"हाय प्रबल हाउ आर यू? अरे मी ठाण्याला पोचतेय. हो.... परवाची कॉफ़ी मस्त होती."रीमा
"अगं, कालचा नव्या क्लाएंटचा डेटा तू कुठे सेव्ह केलास?"प्रबल
"अरे, माय डॉक्यूमेंटस मधे करण नावाची फ़ाईल आहे त्यात एका फ़ोल्डरमधे आहे बघ........." रीमा
"वॉव ...आता नवर्‍याकडे चाललीस तर फ़ाईललाही त्याचंच नाव! सो रोमॅन्टिक!" प्रबल
"चल रे...तसलं काही नाही रे.....अरे स्वातीचा माझ्याबद्द्ल काही गैरसमज झालाय का?" रीमा
"का गं? काय झालं? ती मला तर काही बोलली नाही". प्रबल
"अरे ...मी आता चाललीये ना यूकेला.......करणकडे? मला काय करायचय तुमच्या दोघात पडून. इज शी फ़ीलिंग इन्सिक्युअर अबाउट यू अ‍ॅन्ड युवर रिलेशनशिप अ‍ॅन्ड दॅट टू बिकॉज ऑफ मी?
व्हे SSSS री फनी!" रीमा.
" नाही गं..अं?.....ओह.. असं काही झालंय का? तरीच!" प्रबल
"का रे ? तरीच का म्हणतोस? ती काही बोलली का तुला?" रीमा
"नाही गं परवापासून जरा विचित्रच वागतेय ती माझ्याशी. रीमा मला फ़ोन येतोय...ओके चल नंतर करतो तुला फ़ोन." प्रबल
"ओके पण नक्की कर रे कॉल...मी वाट पहाते" रीमा

पुन्हा तिचा फ़ोन वाजतो. मी कान टवकारले. नवयाचा त्रस्त असहाय दृष्टिक्षेप !
"हाय पियू ...कशी आहेस?..." रीमा
" अगं मी मस्त.....तू कुठे आहेस?" पियू
"अगं माझी सिंहगड मिस झाली गं...वोल्वोने चाललीये ठाण्याला, मामाकडे." रीमा
"रीमा झालं का तुझं यूके वीसाचं काम?" पियू
" हो झालं ना ..अगं तिकिट सुद्धा बुक झालय."रीमा
"ओके ..तर फ़ायनली रीमाबाई दिल्या घरी सुखाने नांदायला निघाल्या तर!" पियू.
"अगं या रीमाबाई चालल्या दिल्या घरी..लग्नानंतर दोन वर्षांनी का होईना.. पण सुखाने नांदणार की कशी ते लंडनला गेल्यावरच कळेल". रीमा
"का गं? अजूनही फ़ोनवरची भांडणं चालू आहेत की काय?" पियू
"अगं हो त्याचा स्वभाव बदलणार आहे का? तरी पहा मला यूके व्हीसा मिळाला नाही म्हणून आम्हाला डेस्टिनीनेच विचार करायला वेळ दिलाय पियू ...दोन वर्षं!" रीमा
"अगं तुला एक सांगायचं होतं....स्वाती काही तरी बडबडत होती काल ऑफ़िसात...आणि प्रबलशी तुझ्यावरून भांडली वाटतं!" पियू
"हो का ? तरीच प्रबलचा आवाज जरा डिप्रेस्ड वाटत होता. अगं मला काय त्याच्यात इंटरेस्ट? आम्ही फ़क्त एका प्रोजेक्टवर काम करतोय इतकच! आणि मला माहिती आहे ना स्वाती आणि त्याचं काय चाललय ते!" रीमा
"अगं स्वाती म्हणत होती ही रीमा आधी अती करते..मग अगदी दुसरं टोक..." पियू
"कसलं दुसरं टोक? त्या स्वातीचा ना माझ्याबद्द्ल काही तरीच ग्रह झालाय बरं का.." रीमा
"अगं स्वाती म्हणत होती की हल्ली तू प्राचीशीही अगदी संबंध तोडलेस म्हणे...आधी अगदी गळ्यात गळे...असं स्वाती म्हणत होती काल...." पियू
"काय बोलतेस पियू तू? अगं तुला माहिती आहे ना प्राचीच्या मुलीला...टिनाला.. माझा किती लळा आहे तो.....सारखं आपलं रीमामावशी रीमामावशी चाललेलं असायचं. मलाही दोन वर्षं एकट राहून बोअर होत नसेल का गं? मग मीच जायची ऑफ़िस झाल्यावर ...फ़क्त टिनाला भेटायला. आता मी लंडनला गेल्यावर आम्हा दोघींनाही जड जाईल गं. म्हणून टिनाला माझ्या नसण्याची हळूहळू सवय करतेय इतकच!" रीमा
" नाही गं ...स्वाती काहीतरी दुसरंच बोलत होती...." पियू
"मला माहिती आहे....अगं तुम्हाला नाही कळणार...लग्न झाल्यानंतरही असं वेगवेगळं रहायचं ...किती अवघड असतं ते. लोक काय गं बोलतातच. पण मी कुणाकुणाला उत्तर देत फ़िरु?" रीमा
"अगं नाही ...प्राचीचा नवरा...काय त्याचं ते नाव?" पियू
"पियू मी तिकडेच वळतीये. अगं मी प्राचीकडे फ़क्त टिनासाठी जायची. त्याचा जर काही उलटा अर्थ काढला जाणार असेल तर त्यापेक्षा संबंध तोडलेलेच बरे. तशीही मी यूकेला चाललीच आहे. कळलं ना आता तुला प्राचीशी मी का कमी केलं ते !" रीमा
"आणि तो प्रबल...." पियू
" अगं हो...पियू तुला तर माहिती आहे ना मी आता चाललेय करणकडे ते? अगं मी लग्न झाल्यावर दोन वर्षे एकटीने कशी काढली..माझं मला माहिती! मला त्या प्रबलमधे काहीही इंटरेस्ट नाही. त्यात मला माहितीये ना स्वातीचं आणि त्याचं! पियू मी म्हटलं ना आपला समाज कितीही सुधारला ना तरी असं माझ्यासारख्या लग्न झाल्यावरही एकाकी आयुष्य कंठणार्‍या मुलीकडे समाजाची पहाण्याची रीतच चमत्कारिक असते. " रीमा
"ओके...अगं मला काहीच म्हणायचं नव्हतं... मी फ़क्त तुझ्या कानावर घातलं...चल आलीस की भेटू" पियू
"हो हो मी दोन तीन दिवसात येतेय. मग भेटू" रीमा

बाप रे...काय चाललय काय? मी अगदीच गुंतत चालले होते या रीमा प्रकरणात...पण काय करणार? कानात बोळे घालणं शक्य नव्हतं.
चला प्रवास संपत आला... रीमाचा फ़ोन वाजला..
"हं ...मम्मी बोल..."रीमा
"अगं मी काल तुला बोलायची विसरले...मामाकडे द्यायला काही खाऊ घेतलायस का?"मम्मी
" मम्मी अगं मी काल पुण्यातच बाकरवडी आणि आंबा बर्फ़ी घेतलीये गं...आणि काय गं ...तुझं कोल्हापुरात बसून लक्ष सगळं माझ्याचकडे...!" रीमा
"म्हणजे काय अगं आता तू अगदीच लांब जाणार ना आमच्या पासून..." मम्मी
"मम्मी मला सारखी सारखी आठवण करून देऊ नकोस गं...इतकी वर्ष निदान एका देशात, प्रांतात तरी होतो ना आपण...मम्मी मला फ़ोन येतोय गं आणि आता ठाणं आलंच आहे...मी मामाकडे पोचल्यावर करीन तुला फ़ोन!"रीमा

"हं बोल स्वाती...अगं काय गैरसमज करून घेतला आहेस तू..! हे बघ मी आता उतरतेय बसमधून..."
ठाणं आलं होतं. रीमाने कानाला फ़ोन लावूनच वरची आपली छोटी बॅग काढली, आमच्या आधी भराभरा बसमधे पुढे जाऊन थांबली...तिचा स्टॉप थोडा आधीचा होता. आम्ही तीन हात नाक्याला उतरणार होतो. ती बोलत बोलत उतरून गेली. मी तिला आता डोळा भरून बघून घेतलं. पाठमोरीच!
स्किन टाइट जीन्स, टी शर्ट, केस शोल्डर लेंग्थ्पर्यंत, खांद्याला पर्स, उजव्या हाताने व्हीआयपीची छोटी बॅग ओढत, डाव्या हाताने कानाला फ़ोन लावून बोलत बोलत ती निघाली होती. पाठमोरी!
तीनहात नाका आला. नवर्‍याने पुस्तक माझ्या पर्समधे टाकलं.
माझ्या मनात विचार चालू होते....रीमाबद्दलच! काय असेल तिचा पुढचा डायलॉग? आणि कुणाशी?

गुलमोहर: 

हे राम . फार पिळू असतात हे लोक. मला पडणारा नेहमीचा प्रश्न . या लोकाना फोनची बिले येत नाहीत का? याना जे फोन करतात त्याना बिले येत नाहीत का? दुसरे असे की यांच्या मोबाईलच्या ब्याटर्‍या ४-४ तास टॉक टाइमला कशा चालतात? मी एकदा पुणे औरंगाबाद प्रवासात ' मी सोमवारी हिमाचलला चाललोय' हे वाक्य १०० वेळा निश्चित ऐकलेय...

पूर्वी गाव ते गाव अशी रेंज यायची . मधल्या काळात यांची थोबाडे बन्द असायची. पण आता टॉवर्सची संख्या वाढल्याने सलग रेंज येते आणि प्रवासभर ही मंडळी पिडत राहतात.

मानुषी , तुम्ही अत्यन्त उत्तम लिहिले आहे.पण शेवटी शेवती मला तुमचा सूर त्या बयेच्या बाजूने वाटला...

टोणगा.......मी मुळीच त्या बयेच्या बाजूची नाहीये बरं का. पण बिचारी ...मला तिच्या विषयी कणव वाटायला लागली.
मी एकदा पुणे औरंगाबाद प्रवासात ' मी सोमवारी हिमाचलला चाललोय' हे वाक्य १०० वेळा निश्चित ऐकलेय... हाहाहाहा!
बाकी पूर्ण सहमत तुमच्याशी.
वत्सला, अर्चू , निवांत सर्वांना धन्यवाद.

मानुषी लेख मस्त...

निसर्गाने कान बंद करण्याची खरच सोय केलेली नाही. त्यामुळे आपली इच्छा असो नसो असले संवाद कानावर पडतातच.

>>>>दुसरे असे की यांच्या मोबाईलच्या ब्याटर्‍या ४-४ तास टॉक टाइमला कशा चालत>>>>>>>

टोणगा अहो हा प्रश्न तर आहेच पण यांचे कान कसे बधिर होत नाहीत हा सुद्धा एक प्रश्न आहे. मला तर पाच मिनीटं मोबाईल कानाशी लाऊन धरला तर कान गरम होतो माझा. (अर्थातच लाजुन नाही, मोबाईल तापल्यामुळे. उगाच गैरसमज नको :P)

छान झालाय लेख.... मागं पुण्याहून मुंबईला जाताना वोल्वोत माझ्या बाजूच्या सीटवर असाच एक कॉलेजकुमार बसला होता. त्याच्या फोनयज्ञावरून इंजिनियरिंगचा विद्यार्थी वाटत होता. त्याला सतत मैत्रिणींचे फोन येत होते किंवा हे कुमार त्यांना फोन करत होते. संभाषण म्हणाल तर ऐंशी टक्के टीपी आणि वीस टक्के अभ्यासाचं बोलत होते. मी चेंबूरला उतरले तरी हे प्रकरण फोनलाच चिकटलेलं! मला त्याच्या चिकाटीचं फार्फार कौतुक वाटलेलं! Proud

इथून पुढे:

प्राची: काय मिळालं तुला माझ्या संसारात बिब्बा घालून आता लंडनला चाललीस.. (हुंदके, हुंदके).

किंवा...

तिचा बॉस: प्रोजेक्टवर काम करताना कामाकडे लक्ष द्या...

किंवा...

प्राचीचा नवरा: टिनाला तुझी खूप आठवण येईल बघ....

किंवा....

ऑपरेटरः मॅडम, आपके लिय एक नई योजना.... और ३६ घंटे बात किजीये, फिर मिलेगा एक Super-Surf का पॅकेट मुफ्त. धो डालिये सब दाग और शान से जाईये लंडन.... :टिंगटाँगः

Happy

परदेसाई...........समोर नाही आहात नाहीतर टाळीसाठीच हात पुढे केला असता. लेखापेक्षा प्रतिक्रीया ब्येष्ट! लय भारी!
अजीत, पराग ,सायो ,अरुंधती, रचना, विनायक
सर्वांना धन्यवाद. तुम्हाला ख्रर्रर्र सांगते जसं जसं ऐकत गेले तसं तसं तिचं सगळं आयुष्य डोळ्यापुढे उलगडत गेलं.

मानुषी, आता तुझ्या मनाला छंदच लागला असेल ना, त्या सेलफोन वर बोलणार्‍यांचं पुढे काय काय चालू असेल ते इमॅजिनायचा.. कारण त्यांच्या आयुष्याचा काही पार्ट माहित झालाय ना तुला Wink

मानुषी,
मस्त लेख. मला स्वतःला प्रवासात बोलताना फोनवर बोलायला आवडत नाही, पण इच्छा नसली तरी इतरांच्या असल्या ष्टोर्‍या कानावर पडतातच.

मानुषी,
छान आहे ललित...
पण तो सेलफोन क्रमांक प्लीज एडिटा... अशावेळी काल्पनिक (५५५५-०००-५५५) किंवा अर्धवट (९८९०-abcd-१२३) क्रमांक वापरंत जा...
पुलेशु

मानुषी.. बापरे दुसर्‍यांचा मोबाईल वरचा सतत संवाद ऐकून डोक्याला कित्ती कित्ती ताप होतो.. एस्पेशली जेन्व्हा प्रवासात आपण छानसे पुस्तक वाचणार असतो किन्वा झोप काढणार असतो Angry

धमाल! Happy
नोकरी किंवा छोकरी मिळाली, परदेशात चाललोय, पगार जास्त आहे इ.इ. गोष्टी जरा जास्तच जोरात सांगितल्या जातात आपलं स्टेट्स सगळ्यांना कळावं ही भावना तर असतेच. मजा आहे ना, सध्या कोणी स्वतःहून सहप्रवाशाशी बोलत नाही पण त्याला आपल्याबद्द्ल कळावं ही इच्छाही आहे!

मस्त झालाय लेख...दुरान्वयेही कसलाच संबध नसाताना रीमा प्रकरणाने गुंतवुन ठेवले शेवटपर्यंत!! मजा आली पणं Happy

छान आहे

आसेच एकदा मी आणि माझे मिस्टर रात्रीचा प्रवास सेमी स्लिपर ने करत होतो
तर माझ्या आधि च्या सिट वर एक मुलगा न दुसर्या रो मधे एक मुलगी एकाच ओफीस चे होए रात्र जशी झाली सगले झोपायला लागले हे दोघे मात्र बोलतच होते आधि माझा नवरा पेपर वाचत होता पण जस त्याला झोप यायला लागली तर त्याने मोठ्या आवाजात म्हटले 'आता गप्प बसनार का '

मला खुप हसु येत होते ते दोघे गप्प झाले
Happy

हे हिन्दि भाशीक होते

अगदि परफेक्ट लिहिले आहे. लोकलमध्येसुधा चर्चगेट पासुन ते गोरेगांव पर्यंत सेलवर बोलणारे बघतो तेव्हा वाटत कि इनकमिंग जरि फ्रि असेल तरि जो /जि फोन करते त्यांना किति बिल येत असेल आणि बोलण काय तर टिपि.

अमोल, आगाऊ, प्रीतिभूषण, रेश्मासंदीप
सर्वांना धन्यवाद!
'आता गप्प बसनार का ' हेही कधी कधी करावेच लागते . समजत नसेल तर समजावून सांगावेच लागते.

खरचं लोकं आपली सगळी माहिती फोनवर सांगत असतात. कारण एकदा असंच trainमध्ये एक बाई मोबाईलवर बोलत होती. तेव्हा तिचं बोलण ऐकुन समजलं कि तिच्या मुलीला पाहायला येणार आहेत. तिच्या मुलीच्या चेहर्‍याला साधारण भाजल्याची खुण आहे. आणि ह्या बाईने तिच्या लग्नासाठी १० तोळे सोनं स्वःताच्या हिंमतीवर जमा केलं आहे कारण तिच्या नवर्‍याचे एका बाईबरोबर संबंध होते. आणि त्या बाईला सुद्धा एक लग्नाची मुलगी आहे. आणि त्या मुलीला बघायला तिचा बाप आहे. आणि ही बाई नि तिची मुलगी खुप स्वाभिमानी आहेत. ते त्याच्याकडुन लग्नासाठी एक पैसाही घेणार नाही आहेत. पण तो बाप म्हणुन जे काही देईल ते घेणं भाग आहे. इत्यादि... इत्यादि...

बाकी आपली लेख सुंदर जमलाय!...

Pages