एकला चोलो रे!

Submitted by सई केसकर on 7 June, 2010 - 06:01

"तुला एकटीला कंटाळा नाही येत घरी?"
या प्रश्नाची लहानपणी मला सवय झाली होती. आणि मी अगदी दोन वर्षांची असल्यापासून त्याचं उत्तर ठाम ’नाही’ असं होतं. घरात किंवा घराच्या आजूबाजूला एकटं असण्यासारखं दुसरं सुख जगात नाही. एकटीने करायच्या सगळ्या गोष्टी मला प्रिय होत्या. मग तो नाचाचा सराव असो किंवा मांजरीच्या पिलाशी खेळणे असो. मला तिथे दुस-या कुणाचाही सहभाग आवडायचा नाही. माझ्या या वृत्तीला घाबरून आई-बाबांनी माझं नाव "बालभवन" या खेळ-गृहात घातलं. तिथे म्हणे प्रवेश मिळायला खूप वेळ वाट बघावी लागायची. मला तो प्रवेश मिळाल्यावर आईला खूप आनंद झाला होता. पण तिथे जायला लागल्यापासून आठवड्याभरातच मला तिथे अज्जिबात जाऊ नये असं वाटू लागलं. मग विमलमावशी मला सोडायला जायला तयार होताच मी पलंगाखाली जाऊन बसायचे आणि बालभवन मधून परत यायच्या वेळेपर्यंत बाहेरच यायचे नाही. थोडे दिवसांनी मी त्या अडचणीच्या जागेत माझ्या बाहुल्या, भातुकली अशा सगळ्या वस्तू नेऊन ठेवल्या. शाळेत मला जी काय सामूहिक कृत्यं करावी लागायची ती माझ्या दृष्टीने माझ्यासाठी पुरेशी होती. घरी येऊन पुन्हा सामूहिक खेळात भाग वगैरे घ्यावा लागला की मला जाम रडू यायचं. पण मी "एकुलती एक" आहे हे माझ्या आई-बाबांच्या मनावर समाजाने पुन्हा पुन्हा बिंबवल्यामुळे त्यांना अशा गोष्टी कराव्या लागत असतील कदाचित.
सगळ्यात आवडती एकटीने करायची गोष्ट म्हणजे गाणी ऐकणे. बाबांनी मला रवींद्रनाथ टागोरांच्या गाण्यांच्या कॅसेट्स आणल्या होत्या. घरी कुणी नसताना मी नेहमी बंगाली गाणी ऐकायचे. त्यातलं 'आमी चीनी गो चीनी' माझं सगळ्यात लाडकं गाणं! दुपारी शाळेतून घरी आले की मला ओट्यावर चढून चहा करायची फार हौस होती. बाबाचं बघून मी छोट्या किसणीने आलंसुद्धा घालायचे माझ्या चहात. मग आई-बाबांच्या खोलीच्या खिडकीत बसून मला चहा आणि खारी खाता यायची मन लावून. तसंच मला बाहेरच्या पेरूच्या झाडाचा पाला खायलासुद्धा फार आवडायचं! पेरूची पानं पेरुसारखीच लागतात!
आमच्या उद्योग बंगल्याच्या मागच्या बाजूला एक घसरगुंडीसारखं नारळाचं झाड होतं. त्या झाडावर चढायलाही मला फार आवडायचं.
माझ्याकडे थ्री लिटील पिग्स नावाचं गोष्टीचं पुस्तक होतं. त्यात तीन अतिशय गोड डुकराची पिल्लं घर सोडून जातात. त्यांचा हेतू घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहणे हा असतो. पण निघताना सामान भरायला दप्तर न घेता ती पिल्लं बोचकी घेतात. आणि प्रत्येक बोचक्याला एक लांब काठी लावलेली असते. ते बघून मीदेखील घर सोडून जायचं ठरवलं होतं. मग आई बाबा नसतील तेव्हा मी एका रुमालात माझ्या बांगड्या, पेन्सिली, सर्दी झाली तर व्हिक्स, अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवून बोचकं करायचे. आणि ते एका लांब काठीला लावून घराभोवती फिरायचे. एकदा विमलमावशी गिरणीत गेली होती. ती संधी साधून गेटवर चढून मी सरळ रस्त्यांनी माझं बोचकं घेऊन चालू लागले. कोप-यावर मला विमलमावशी भेटली. तिनी मला काही बोलायच्या आधी मीच, "अगं विमलमावशी, एकटी कुठे चालली आहेस? हरवशील!" असं वाक्य टाकून दिलं. त्यावरून अगदी परवापर्यंत घरात माझी थट्टा व्हायची!
एकटेपणातली अजून एक आवडती गोष्ट म्हणजे कलिंगड खाणे. कलिंगड खाण्यासाठी मी मला नको असलेल्या सगळ्या गोष्टी आधी संपवायचे. आणि आपण घरी एकटे असणार आहोत आणि आपल्याबरोबर आईनी चिरून ठेवलेलं कलिंगड आहे ही भावना फार सुंदर असायची. मग ती कलिंगडाची चंद्रकोर घेऊन मी पेरूच्या झाडाखाली जाऊन बसायचे. आणि बिया गालात साठवून ठेवायचे. मग शेवटी बियांचा फवारा हवेत उडवायचे. आंबा, कलिंगड, अननस असली फळं घरात खाणं म्हणजे त्यातली निम्मी मजा हिरावून घेण्यासारखं आहे. आंबा घरात बसून खाताना सारखा आईचा पहारा असायचा. भिंतीला हात लावायचा नाही, कपड्यांना हात लावायचा नाही, पलंगाच्या जवळ जायचं नाही, या आणि अशा अनेक अटी असायच्या. त्यामुळे बागेत बसून एकटीने असल्या गोष्टी करायला फार मजा यायची.
आमच्या घराबाहेर एक मोठा हौद होता. त्या हौदात पाय सोडून बसायला मला फार आवडायचं.
गच्चीत बसून साबणाचे फुगे उडवायलाही मला आवडायचं. ही गोष्ट मी स्नेहाबरोबरसुद्धा करायचे. पण एकटीने करण्यात वेगळीच मजा होती. हवेत फुग्यांचा घोळका सोडून त्याच्याकडे तो दिसेनासा होईपर्यंत बघायला मला खूप आवडायचं. त्यातले काही फुगे पाणी जास्त झाल्यामुळे लठ्ठ मुलांसारखे आधीच शर्यत हरायचे. काही मोठे होऊन इंद्रधनुषी बनायचे आणि हवेत नाहीसे व्हायचे अचानक! काही काही फुगे जुळे असायचे. आणि त्यांच्याकडे बघायला मला फार मजा वाटायची. मी नेहमी सारस बागेतून हट्ट करून फुगेवाल्याची ती साबणाची डबी विकत घ्यायचे. पण त्या तारेतून फुगेवाल्यासारखे फुगे कधीच निघायचे नाहीत माझ्याच्यानी. बाबा मात्र मस्त फुगे काढायचा त्यातून. मग त्यानी खोलीभर पसरलेले फुगे मी पकडायचा प्रयत्न करायचे.
मोठी होताना माझा हा एकटेपणा माझ्या मैत्रिणींनाही जाणवायचा. एखाद्या दिवशी मधल्या सुट्टीत बाहेर भटकण्यापेक्षा मला उत्सुकतेच्या शिखरावर नेणारं पुस्तक संपवावसं वाटायचं. मग सगळ्या मैत्रिणींना मी विचित्र आहे असं वाटायचं. पण दिवसातले काही तास एकटेपणात घालवले की उगीचच कुठूनतरी एक अदृश्य शक्ती मिळते. साहस, कष्ट, नियमितपणा, काटकसर, संयम असल्या प्रसिद्ध गुरूंच्या मानाने एकटेपणा फारच उपेक्षित आहे. पण काहीही न बोलता, कुणाशीही चर्चा न करता, पुन्हा पुन्हा तोच विचार वेगळ्या नजरेतून बघण्याची दिव्य शक्ती फक्त एकटेपणाच देऊ शकतो. त्याला आपला मित्र बनवलं की मनातली भीती, शंका, द्वेष हे सगळे नको असलेले शत्रू पळून जातात. आपल्यात दडलेल्या कवीशी, समीक्षकाची आपलीच ओळख होते. पण असा आनंदी एकटेपणा लगेच शिष्टपणा करू लागतो, महाग होतो! आणि एकटेपणाची भीती गेल्यानेच की काय कोण जाणे, एकटेपणापासून दूर नेणारे प्रेमळ सखे सोयरे भेटतात!
मूळ लेख : http://unhalyachisutti.blogspot.com/2010/06/blog-post.html

गुलमोहर: 

उगीचच काही कारण नसताना,'देनीसच्या गोष्टी'तला देनीस आठवला.

ए, काय मस्त लिहिलंयस.......

दिवसातले काही तास एकटेपणात घालवले की उगीचच कुठूनतरी एक अदृश्य शक्ती मिळते. साहस, कष्ट, नियमितपणा, काटकसर, संयम असल्या प्रसिद्ध गुरूंच्या मानाने एकटेपणा फारच उपेक्षित आहे. पण काहीही न बोलता, कुणाशीही चर्चा न करता, पुन्हा पुन्हा तोच विचार वेगळ्या नजरेतून बघण्याची दिव्य शक्ती फक्त एकटेपणाच देऊ शकतो. त्याला आपला मित्र बनवलं की मनातली भीती, शंका, द्वेष हे सगळे नको असलेले शत्रू पळून जातात. आपल्यात दडलेल्या कवीशी, समीक्षकाची आपलीच ओळख होते. पण असा आनंदी एकटेपणा लगेच शिष्टपणा करू लागतो, महाग होतो! आणि एकटेपणाची भीती गेल्यानेच की काय कोण जाणे, एकटेपणापासून दूर नेणारे प्रेमळ सखे सोयरे भेटतात! >>>

हा शेवटचा पॅरा खूप छान......... Happy

तुझे हे सगळे उद्योग "लहानपणीचे नस्ते उद्योग" च्या बीबी वर पण टाक गं....... Happy

माणुस एकटा राहीला की हरवत नाही.. गर्दीत गेला की हरवतो..
असे कुठे तरी वाचले आहे..
तुझ्याबाबतीत खरे वाटते... Happy
मस्त लिहले आहेस..

साहस, कष्ट, नियमितपणा, काटकसर, संयम असल्या प्रसिद्ध गुरूंच्या मानाने एकटेपणा फारच उपेक्षित आहे. >>
पण असा आनंदी एकटेपणा लगेच शिष्टपणा करू लागतो, महाग होतो!>> क्या बात है!

सईबाई, हे ही छान! ईथे पोस्टत रहा. तुझ्या ब्लॉगला भेट देण्याचे टाळते आहे कारण मी तिथे गेले तर सगळे एकाच वेळी वाचुन संपवेलः)

शेवटचा प्यारा खरच अप्रतिम.. किती सुंदर शब्दात मांडलय.. माझ्या सारख्या एकटीला तर खूप भावला.. गर्दीत खूप अलिप्त वाटतं मला .. कारण गर्दीत मिसळता येत नाही .. Happy

लै भारी! माझीच गोष्ट वाटतीय मला. अर्थात मला इतकं भारी लिहीता आलंच नसतं! आणि आता हे वाचून वाटतंय "श्या, असलं भारी लहानपण नव्हतं यार आपलं!" Sad Happy
तू लिहीत रहा गं !

मस्त Happy

हे फारच विलक्षण लेखन आहे. ग्रेट >> अनुमोदन.

बस्के सारखंच - तू लिहीत रहा गं ! बस्के इतकं वाईट वाटून नको घेउस. समहौ मला ही तुझीही गोष्ट वाटली. Happy

सई, खूप सुंदर. हे इतकं सहज, सोप्प्या शब्दांतलं तुझं-माझं अन कुणाचही आहे की.... नक्की हव्या त्या शब्दांत प्रतिसाद देता येत नाहीये इतकं सुंदर.

@बस्के
असं तुम्हाला आत्ता वाटतंय. पण शांतपणे जर लहानपणीची आठवण काढलीत तर छान आठवणी सुचतील तुम्हाला देखिल!!
@दाद
धन्यवाद!!
@अरू
धन्यवाद!! Happy तुझेही लेख वाचले. पण मराठीत लिहायचा कंटाळा येतो कारण सारख्या चुका होतात. चिडचिड होते मग जाम!!
@रैना
हा हा! हे फारच झालं!! पण असा छान प्रतिसाद मिळाला की जमिनीवर अजून घट्ट उभं राहिलं पाहिजे!!
पण रोज गाईडच्या शिव्या खायला लागतात त्यामुळे सध्या तरी जमिनीवर रहायची सोय झाली आहे!
सगळ्यांचे आभार!
*हुश्श* माझ्या प्रतिसादातल्या शुद्धलेखनाच्या चुका माफ करा ही विनंती!!

अप्रतिम सुंदर लिहिलय
टागोरांच्या 'पोरवय' या पुस्तकाची आठवण आली.
मी देखील एकुलता एक,एकलकोंडा आणि वाचनवेडादेखील त्यामुळे प्रचंड रिलेट झालो Happy

सगळे लेख हळुहळु ब्लॉग वर वाचतीये..हा झाला वाचुन...अप्रतीम लिखाण!!! खुपच सुरेख!!! मजा येतीये वाचायला Happy

Pages