विश्व मराठी नाट्य फड न्यू जर्सी

Submitted by परदेसाई on 1 June, 2010 - 14:08

नाट्यसम्मेलन उर्फ नाटकाचा फड पार पडला. चार दिवस काही बागराज्यकरांनी जीवाची पर्वा न करता मरोस्तोवर काम केलं आणि इतरांनी अ. भा. म. ना. सं. चा आस्वाद घेतला. कार्यक्रम इतके होते की अजून दोन दिवस त्याला मिळाले असते तरी ते कमी पडले असते.

शुक्रवार संध्याकाळी शिकागोला झालेल्या एकांकिकांचा कार्यक्रम होता. तीन, दोन, एक अश्या क्रमांकाने या एकांकिका झाल्या. त्यात नंबर तीनची एकांकिका मस्त होती ती पाहता आली. नंबर दोनच्या एकांकिकेचा पसारा की पिसारा १५/२० मिनिटे पाहूनही कळला नाही. आपल्याला झोप येत असावी म्हणून कळत नाहीय, असा समज करून घरी गेलो.

शनिवारी सकाळी पहिलं नाटक होतं 'आनंदीबाई जोशींच्या जीवनावर'. त्यानंतर भाषणं वगैरे होती. सकाळी नऊ वाजता तिथे पोहोचायचं हे काही मला पटलं नाही. त्यानंतर भाषणं ऐकायची हे अजिबातच पटलं नाही, त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम चुकले. सकाळचा कार्यक्रम फारच मस्त होता, इथपासून 'भाषणं कसली, कुणी पुस्तक विकत होते' इथपर्यंत ऐकू आलं. आणि आपण नाही आलो ते बरं अशी समजूत करून घेतली. दुपारी मात्र 'U-turn' नामक नाटक होतं. गिरीश ओक आणि इला भाटे या दोनच पात्रांवर नाटक. आनंद म्हसवेकर यानी साधे पण अगदी शोभतील असे संवाद लिहीलेले, आणि काहीसा आपल्या भविष्याकडे पाहणारा विषय. पहिल्या ४/५ वाक्यात नाटकाने जी पकड घेतली, ते शेवटपर्यंत हसवत आणि विचार करायला लावणारे ठरले. मुलं मोठी होऊन इतरत्र, एकाची आई (वडिलांच्या मॄत्यू) आणि एकाचे वडील (घटस्फोट) एकटे मागे राहिलेले. नव्या पिढीला त्यांची काळजी वाटते, पण ते जेव्हा Companion होऊन एकत्र रहातात तेव्हा त्या मुलांची Reaction असा काहीसा नाविन्यपूर्ण विषय होता. हश्या आणि टाळ्या घेऊन तीन तास कधी संपले कळलं नाही. (या नाटकावर अजून एक बाफ आहे).

मग नेहमीप्रमाणे मराठी नाटकांचे होते तेच झाले. ५ चा शो सहा पर्यंत सुरू नाही. 'कलारजनी' सुरू झाला तो ८:३० ला बंद करावा लागला. जेवण संपणार म्हणून. ८:३० चा शो सुरू व्हायला ९:४५ झाले. आणि 'बुमरँग' या शिकागोच्या नाटकाने त्यादिवसाची सांगता झाली. 'कलारजनी' मधे लावण्या, तबलावादन, एकपात्री प्रयोग, स्टँड अप कॉमेडी, भरत नाट्यम असे बरेच प्रकार होते. आशालता वाबगावकरांनी 'एका रविवारची सकाळ' मधल्या कडवेकर मामी सादर केल्या.
मधूबाई कांबीकर यांनी एक लावणी साजरी केली. त्या इतक्या मस्त नाचू शकतात यावर माझा विश्वास बसला नाही. विजय कदम सुत्रधार होते. मुकूलराज देव यांचे तबलावादन, त्याबरोबर कथ्थक, 'फड सांभाळ' सारखी लावणी.. एका मागोमाग एक मेजवान्या होत्या. वेळेच्या अभावी मधुरा वेलणकर इत्यादी कलाकारांना त्यादिवशी स्टेजवर येता आलं नाही.
या कार्यक्रमात कितीतरी नवे कलाकार होते. बहुतेक कार्यक्रम हे नाच (लावणी, भरतनाट्यम, कथ्थक ) प्रकारातले असल्याने थोडं 'वसंतोत्सव' ला आल्या सारखं वाटलं (माझे आणि नाचाचे वाकडे आहे) पण कला म्हणजे फक्त नाच नव्हे असं वाटत राहिलं. भरतनाट्यम, कथ्थक इत्यादी नाच त्यात का होते हे कळले नाही. प्रदिप पटवर्धन आणि संतोष पवार यानी एक कॉमेडी सादर केली ती मस्त होती.

रविवारी सकाळीच 'बेगम बर्वे' होतं. नाटकवाला माणूस असूनही 'नाटक कळले नाही' म्हणावं लागलं. चंद्रकांत काळे यांनी म्हटलेली नाट्यगीतं, आणि सहकलाकारांनी केलेला अभिनय, आणि नाटकात असलेल्या कोट्या टाळ्या घेऊन गेल्या तरी शेवटी 'नाटक कळलं का काही?' असं बरेच लोक एकामेकाना विचारत होते. या नाटकाचे ८७ सालापासून ३० प्रयोग झाले आहेत ते का ते मात्र कळलं. डॉ. मीना नेरूरकर No risk no Glory असं म्हणाल्या पण मला मात्र ते no glue no clue असे नाटक वाटले. कोण पात्र नक्की काय होतं, आणि कधी आतल्या नाटकात होतं आणि कधी बाहेरच्या नाटकात होतं ते कळलंच नाही. उरलेला दिवस मी माझ्या नाटकामागे घालवला, त्यामुळे रात्रीचे 'कट्यार काळजात..' चुकले. फार मस्त झाल्याची वार्ता ऐकू आली.

सोमवार सकाळः भारतातल्या तीन एकांकिका. त्यातली पहिली आलेली 'दॄष्टी' पाहिली. मस्त होती, आवडली. वेळे अभावी मला इतर एकांकिका पाहता आल्या नाहीत. त्यानंतर कलारजनीचा उरलेला भाग. त्यात पुन्हा लावणी, लावणी, लावणी, लावणी, आणि मग अध्यक्ष रामदास कामत यांचे नाट्यगायन. एवढं झाल्यावर भारतातून आलेली मंडळी 'राजाराणी' ट्रॅवल तर्फे फिरायला गुल. आणि अमेरिकेतल्या कलाकारांचे कार्यक्रम तसेच मागे राहिले.

(मी सगळे कार्यक्रम पाहिले नाहीत, त्याबद्दल इतर लिहितीलच. पण ही फक्त प्रस्थावना झाली).

जाताना येताना यावर बराच विचार केला पण उत्तर सापडलं नाही. 'नाट्यसम्मेलन' इथे भरवून नक्की काय मिळवलं? भारतातून जवळपास २०० माणसं या सम्मेलनाला येणार होती. त्यात व्हिसावाल्यांच्या कॄपेने सत्तरएक व्हिसा न मिळाल्याने आलेली मंडळी जवळपास १३० लोक होते. त्यात ६०/७० कलाकार आणि त्याबरोबर ६०/७० सहाय्यक मंडळी व त्यांची कुटुंबं होती. एकादा कलाकार १८ x २ = ३६ तास प्रवास करून येतो, तो ५ मिनिटे स्टेजवर येण्यासाठी? आशालता वाबगावकर, मधुबाई कांबीकर यासारखे कलावंत, गेली तीस/चाळीस वर्ष मराठी नाट्य चित्रपटसॄष्टीत कार्यरत आहेत. उर्मिला मातोंडकर येते ५ मिनिटाच्या भाषणासाठी. या लोकांना पाच पाच मिनिटं लोकांसमोर आणून नक्की कुणाला आनंद मिळतो? कित्येक कलाकार तर, 'ते आलेत पण त्यांच्याबरोबर येणारा सहकलाकार नाही येऊ शकला' म्हणून येऊन नुसतेच फिरून गेले असतील.

यासगळ्या मागे किती तरी खर्च झालाच असेल आणि तो कुणी केला असेल? महाराष्ट्र सरकारने? की भारत सरकारने? की आपल्या सारख्या तिकीट विकत घेणार्‍यांनी? म्हणजे भारतातल्या करदात्यांनी किंवा आम्ही.

नाटक बघायला मला खूप आवडतं. ते DVD/VCD पेक्षा प्रत्यक्ष बघणं केव्हाही चांगलं. पण म्हणुन ही परेड.

बुमरँग चालू असताना एक सिनीयर नट आणि त्यांच्या पत्नी बाहेर बस ची वाट बघत उभे होते. नाटक चालले होते, पण पुढे सरकत नव्हते म्हणून मीही घरी जायला बाहेर आलो. ते सहज म्हणाले, 'स्क्रीप्ट ठिक आहे हो, पण लोक 'आवाज' 'आवाज' म्हणून ओरडताहेत, तरी स्टेजवर कसं अ‍ॅडजेस्ट व्हायचं ते कळत नाहीय या नटानां.' मी फक्त हसलो. दुसर्‍या दिवशी चंद्रकांत काळे यांचंही तेच झालं. ते मस्त गात होते, पण आवाज लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. बरेच लोक त्यांना माईकच्या दिशेने पुढे व्हायला खूणा करत होते, पण त्यांनाही ते कळत नव्हतं. थोड्या वेळाने पडदा पडल्यावर माईकची जागा बदलली गेली आणि मग गाणं ऐकू येऊ लागलं...

मला वाटलेले काही मुद्दे असे.... जे पुढच्या BMM निमित्ताने मी लिहीतोय...

१. भारंभार कलाकार बोलावून त्यांना उपयोग आपल्याबरोबर फोटो काढून घेण्याऐवजी, मोजकेच कलाकार बोलावून त्यांना स्टेजटाईम देण्यात यावा. एकतर खर्च कमी होईल आणि दुसरं म्हणजे त्या कलाकाराची कला नीट बघायला मिळेल.

२. राजकारणी मंडळी इथे येऊन आपल्याला काय उपदेश करणार, आणि त्याने आपल्याला काय फरक पडणार? तेव्हा त्यांना आणू नये. वेळ वाया जातो.
३. सिनियर नटाना इथे प्रशिक्षणासाठी आणले (म्हणजे शिक्षक म्हणून) तर निदान रंगभुमीवर असताना काय करावं आणि काय करू नये, याचे धडे आपल्याला घेता येतील. 'तुम्हाला काय येत नाही हो,' पेक्षा 'असे केलंत तर छान होईल' हे त्यांच्याकडून शिकून घेता येईल.
४. भारतातले कलाकार करतील ते सगळं उत्तम हे चूकीचं आहे. ते आल्यावर काय काय सादर करतील याचा आधी आराखडा तयार असावा. आणि त्यातले काही येऊच नाही शकले तर काय करता येणार नाही हे माहीत हवं. 'ऐनवेळी मारून नेऊ' असं बर्‍याच वेळा होतं.
५. इथले कलाकार म्हणजे, भारतातल्या कलाकाराना वेळ नसेल तेव्हा उभे करायला ठेवलेले राखीव गडी हे चुकीचं आहे. हे नेहमी घडतं. आपली कामं संभाळून इथले कलाकारही कष्टाने त्यांचा प्रयोग उभा करतात. 'आता वेळ नाही, नंतर बघू, तिकडच्या लोकांना जायची घाई आहे,' हे आपलेच आयोजक आपल्याला सांगतात.
६. आयोजनामधे वेळेचं बंधन हे पाळलंच पाहिजे. सकाळी ९ ते १२, दुपारी २-५ , आणि रात्री ७-१० अशी ठळक रुपरेषा हवी. रात्रीचा खेळ जरा जरी रेंगाळला की मंडळी उठून घरी जाते आणि प्रेक्षकागॄह रिकामे. इथे नाटक वगैरे बघायला येणार्‍यांमधे ६०/७० टक्के हे 'सिनियर्स' असतात. त्यांना जेवण, गोळ्या, आणि झोप या वेळा पाळाव्याच लागतात. उगाच भारंभार कार्यक्रम आणि मधला वेळ नाही असे केल्यास, प्रेक्षक उठून जातात हे लक्षात घ्यायलाच हवे. एका दिवशी दोन नाटकं बघणं शक्य असतं. पण ३ दिवसात १०/१२ कार्यक्रम बघायचे असले तर बुडाला मुंग्या येतात हे लक्षात ठेवायलाच हवं.
७. व्हिसाचे कागद आणि मिळाल्याचे Confirmation महिनाभर आधी व्हावं. नाट्यसम्मेलन २८ ला आणि २६ तारखेला मंडळी अमेरिकन Consulate मधे उभी, हे का होतं? मग कुणाला व्हिसा मिळतो, कुणाला नाही. कुणाला तिकीट मिळते कुणाला नाही याचा परीणाम कार्यक्रमावर होतोच.
८. नाटकाचा अनुभव नसलेल्या सिनेकलाकारांना अजिबात आणू नये. त्यांना वाक्यादोनवाक्यानंतर 'कट' ची सवय असते. बहुतेकांना स्टेजवर नीट बोलता येत नाही.

हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी कित्येक मित्रांनी गेली ३/४ महिने भरपूर कष्ट उपसले आहेत. त्यांच्याशिवाय जो कार्यक्रम झाला तो होऊ शकला नसता, याबद्दल त्यांचे आभार.....

(हे लिखाण जसं सुचेल तसं लिहील्यामुळे विस्कळीत आहे.. चू. भू. द्या. घ्या)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार करायला लावणारा लेख आहे. ह्या कार्यक्रमांचं आयोजन करणार्‍यांणानाही पाठवता आला तर उत्तम.
बीएमेम, नाट्यसंमेलन दोन्हीकडे उपस्थित न राहिल्याने काही कल्पना नाही.

विनय, संयोजकांनी विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. बीएमेमच्या अनुभवावरून सगळ्याच मुद्द्यांना अनुमोदन.
(या ग्रूपची सभासद नसल्यामुळे हे दिसलंच नव्हतं.)

विनय, खूपशा बाबतीत पटलं तुमचं लिखाण. आतापर्यंत ४ BMM तरी attend केली आहेत. आणि हे आपल्या सगळ्या कार्यक्रमांना लागू होतं. मुख्य म्हणजे भारंभार कलाकार बोलवावेच का? आणि कार्यक्रम वेळात इतके ठासून बसवतात की कशालाच न्याय दिला जात नाही.

देसाई, चांगलं लिहिलं आहे हो.

इथले कलाकार म्हणजे, भारतातल्या कलाकाराना वेळ नसेल तेव्हा उभे करायला ठेवलेले राखीव गडी हे चुकीचं आहे. हे नेहमी घडतं.
>>
एकदम बरोबर. अगदी असेच झाले त्या दिवशी. आम्हाला आधी सांगितले की सकाळी ९ वाजता ठेवला आहे तुमचा कार्यक्रम. मग ते कॅन्सल करुन तो १२ वाजता आहे असं सांगितलं. मग १२ वाजता अचानक कुठलेतरी भारतीय कलाकारांचे कार्यक्रम घुसडले मधेच. त्यांना जायचे होते म्हणे. असं करत करत शेवटी दीड वाजला कार्यक्रम सुरू व्हायला. मला काही विशेष करायचे नव्हते, पण आमच्या ग्रूपमधले लोक वैतागले होते.

भारतातले कलाकार करतील ते सगळं उत्तम हे चूकीचं आहे. ते आल्यावर काय काय सादर करतील याचा आधी आराखडा तयार असावा
>>
खरंय. आमच्या (मानसी करंदीकरांच्या) ग्रूपचा एक कार्यक्रम 'वाजले की बारा' या गाण्यावरचा डान्स होता. तर ऐनवेळी कुठल्यातरी भारतीय कलाकारांचा त्याच गाण्यावरचा नाच ठेवला. सगळे भयंकर चिडले आणि निराश झाले होते. आधीच सांगितले असते तर हा डान्स ठेवलाच नसता. अर्थात भारतातल्या कलाकारांपेक्षा सरस डान्स सादर केला इथल्या कलाकारांनी.

सोमवारी हेमंत कुलकर्णी आणि ग्रूप यांचा गाण्याचा कार्यक्रमही होता. ती सगळी छोटी मुलं काय तयारीने गात होती! बाप रे. भारी वाटलं मला. भारतातल्या कलाकारांना लाजवील इतकं सुंदर गायले ते सर्व. अमेरिकेतली मुलं इतकं उत्कृष्ट नाट्य/भाव्/चित्रपट गीत गाऊ शकतात असं वाटलंच नव्हतं मला.

त्या निमित्ताने मला रमेश भाटकर, मोहन जोशी, भारती आचरेकर, विजय कदम, वगैरे भरपूर लोक प्रत्यक्ष बघायला मिळाले. त्यामुळे छान वाटले. Happy

विनय, विक्सळीत नाही वाटले. खूप छान लिहिले उलट... आवडले.. एकदम विचार प्रवर्तक!!!!!

असल्याने थोडं 'वसंतोत्सव' ला आल्या सारखं वाटलं (माझे आणि नाचाचे वाकडे आहे) >> Happy

देसाई, छान लिहिलं आहे. संयोजनातले मुद्दे पण विचारात घेण्याजोगे आहेत. नाचांबद्दलचा मुद्दाही पटला.

आमच्या इथल्या ममंचा साध्या कार्यक्रमांनाच अत्यंत ढिसाळ कारभार असतो.. मोठ्यांचं तर काय होईल माहित नाही.,

बाकी (ह्यावेळी तरी) टायटल बरोबर दिलतं.. विशिष्ठ शब्द गाळून.. Wink

देसाई- लेख आवडला. काही मुद्दे पटले नाही तरी कळकळ जाणवली.

हे भगवंता. या विषयावर दाताच्या कण्या, आणि डोक्यावरचे किमान काही केस तरी पांढरे होईस्तोवर घातलेले म.म.तले वाद आठवले. आणि कुठेच काही बदलत नाही हे वाचुन संतोष जाहला. Proud

काळ्यांना माईक कुठे होता ते कळले नाही? आँ? अमेरिकेतले स्टेज वेगळे असतात का हो? या कलाकारांना बिचार्‍यांना रंगीत तालमींसाठी तरी वेळ मिळतो का ?

कधी कधी अत्यंत निराशाजनक विचार येतात- जसे की कल्लाकार आणि संयोजक आणि बहुतांश प्रेक्षक सगळे स्वतःवर खुष असतात च्यामारी, आपण फुकट रक्तदाब का वाढवा? कलेची 'शेवा' वगैरेचे 'इचार' करुन?

या प्रश्नांची उत्तरे मिळतील का?

१) भारतातून आलेल्या कलाकारांचा येण्याचा खर्च कुणी केला? माझ्या ऐकीव माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने (म्हणजे महाराष्ट्रातल्या कर देणार्‍या नागरिकांनी) हा केला आहे. हा खर्च कुणी केला आणि किती केला हे आयोजकांपैकी कुणी जाहिर करू शकेल का? का नाही? राजकारणी लोकांना का बोलवतात याचे उत्तरही स्प्ष्ट होईल

२) बृमम सरकारकडून असे पैसे घेत नाही आणि जाहिरपणे ते नको असे म्हणते किंवा परत करते. विश्व मराठी नाट्य फड न्यू जर्सी असे का करत नाही?

३) जे स्वयंसेवक राबले त्यांचे नेहमीच कौतुक आहे. पण अशा महाराष्ट्रातल्या करदात्यांकडून पैसे घेऊन का कार्यक्रम करावेत? आम्ही भारतातून आलेल्या कलाकारांवर एकही पैसा घातला नाही. जो काही दिला तो महाराष्ट्र सरकारने दिला असे आयोजकांनी म्हटले तर ते योग्य आहे का?

आयोजकांपैकी काही व्यक्तिंबद्दल माझ्या मनात आदर होता तो आता अजिबात राहिला नाही. म्हणजे संमेलन झाल्यावर नाही तर आधीच जेंव्हा महाराष्ट्र सरकारची मदत घ्यायची ठरवली तेंव्हा पासून.

म्हणजे आयोजकांना मिरवायला मिळतं. राजकारणी आणि महाराष्ट्रातल्या कलाकारांना जनतेच्या पैशात फुकटात्/स्वस्तात अमेरिकेत यायला मिळतं. आणि स्वयंसेवकांना आपण किती कलेची सेवा करतो याबद्दल धन्य धन्य वाटतं. मग आपण कशाला त्रास करून घ्यायचा? तुम्ही तिकीट काढलं असेल तर तुम्हीही या साखळीत सामील होऊन एक प्रकारे याला उत्तेजन दिले नाही का?

विनय...

नोव्हेम्बर-डिसेम्बर मधे तुला 'धुळवड' या मथळ्याखालि पाठवलेली 'मेल' वाच, तुला बर्‍याच प्रश्नांची उत्तरं सापडतील. आणि शेवटी व्हायचं तेच झालेलं आहे...

चंद्रकांत काळे यांचंही तेच झालं.>> 'थिएटर अ‍ॅकॅडमी'चा आणखिन एक 'प्रयोग' असं लेबल लावून 'प्रेक्षकांना वेठिस कसे धरावे?', याचे सादरीकरण झाले - असे म्हणा...

विवेकदेसाई- काळ्यांबद्दलचे आणि थिएटर बद्दलचे आपले मत पटले नाही. फारफारतर 'मला आवडले नाही, समजले नाही' जसे देसाईंने वर प्रामाणिकपणे लिहीले आहे ते तरी ठिक. पण थिएटर अकॅडमी प्रेक्षकांना वेठिस धरते म्हणजे काय हे जाणुन घ्यायला आवडेल.

. नाटकाचा अनुभव नसलेल्या सिनेकलाकारांना अजिबात आणू नये. त्यांना वाक्यादोनवाक्यानंतर 'कट' ची सवय असते. बहुतेकांना स्टेजवर नीट बोलता येत नाही.>>>> हे तरी निदान थिएटर अकॅडमीला अजिबात लागु नसावे.
उर्मिला मातोंडकर पेक्षा न समजलेले बेगम बर्वे बरे म्हणायचे. उर्मिलातैंचा रंगभूमीशी संबंध काय?

किल्लेदार- सहमत.

किल्लेदार सहमत.
पण इथे का बोला हाच प्रश्न आहे. आम्हाला आवडतं बुवा नाटक बघायला पासून पैसा फेकला की कलाकार कुठेही येईल नाचायला इत्यादी वृत्ती बाळगून संमेलन आयोजित करणार्‍यांना त्याची कुठे काय पडलेली आहे?

वाजले की बारा वर नृत्य हे नाट्यसंमेलनात कशासाठी हा प्रश्न ना इथल्यांना पडला ना तिथल्यांना.

बेगम बर्वे नाटक समजले नाही हा नाटकाचाच दोष.. आपण विचार करणारच नाही की त्या नाटकाला अनेक स्तरावर मान्यता का मिळालेली आहे, मराठी नाटकाच्या इतिहासात त्याचे इतके महत्वाचे स्थान का आहे.

थिएटर अ‍ॅकेडमीच्या नावाने लगेच खडे फोडणे.

आयत्यावेळेला मीना नेरूरकरांनी व्हिसाच्या संदर्भात हात वर केले त्याबद्दल इथे पेपरात आलेलंच आहे ऑलरेडी ते मी नव्याने सांगायला नको. पण त्याबद्दल कोण बोलणार.

'आम्ही मराठी नाट्यसंमेलन आयोजित केलं होतं' असं आयोजकांना मिरवायला मिळणं. आणि काही नेहमीच्या लोकांची अमेरिकावारी होणं यापलिकडे काय साधलं या नाट्यसंमेलनाने? की एक वीकेंड टाइमपास म्हणून हलकी फुलकी नाटकं बघायला मिळणे याला नाट्य संमेलन म्हणायचं?

आणि जरा किंचित विचार करण्यासारखं/ एखादा वेगळा अनुभव देणारं नाटक असेल तर ते पचनी पडणं तर सोडाच परत नाट्यसंस्थेलाच आणि कलाकारांनाच नावे ठेवणे?

काळे काकांना प्रोजेक्शनचा प्रॉब्लेम येत नाही हा बेगम बर्वे आणि महानिर्वाण अनेकदा बघताना घेतलेला अनुभव आहे. अगदी आमच्या 'जळ्ळी तुझी प्रीत' मधे सगळ्या विशीतल्या पोरांबरोबर असतानाही २५ प्रयोगात कधी प्रोजेक्शनचा प्रॉब्लेम त्यांना आलेला पाह्यला नाही. मग इतक्या अद्ययावत ठिकाणी का यावा? तिथल्या व्यवस्थेत/ रचनेत काही दोष असेल ही शक्यता विचार करून पण बघायची नाही?

भारतीय कलाकारांना नावं ठेवता तुम्ही लोक आणि दरवेळेला तेच तेच लोक कसे काय नेता? का नाही तुमचे आयोजक निवड प्रक्रियेत भाग घेत?

असो... महाराष्ट्र सरकारकडून अनुदान घेऊन हे नाट्य संमेलन घडलं असेल तर या सगळ्याच संमेलनाचा आणि आयोजकांचा निषेधच.

पुन्हा एकदा संन्याशाला सुळी...

१. या प्रकाराला नाट्यसम्मेलन म्हणू नये हा तुमचा मुद्दा आम्ही मनावर घेतला आहे. आयोजकानी म्हटले तरी मी त्याला 'नाटकाचा फड' असंच म्हणतो आहे.

२.हिशेबामधे कुणी किती दिले, कुठून आले हे मला माहीत नाही. ९०० माणसे प्रेक्षक म्हणून प्रत्येकी १००$ तिकीट. जमलेल्या पैश्यातून भारतातून येणार्‍या १२० लोकांच्या तिकीटाचाही खर्च निघू शकत नाही, असा माझा सरळ हिशेब.

३. 'बेगम बर्वे नाटक समजले नाही हा नाटकाचाच दोष...' हे तुम्ही म्हणताय.. मी नाही. मी आधीच कबूल करतो की मी गाढव आहे. हे नाटक मला कळत नाही. भारतातही २१ वर्षात ३० प्रयोग झाले, आता भारतीय प्रेक्षकही गा** आहे असं म्हणाल? की भारता फक्त ३० x ५०० सुजाण प्रेक्षक आहेत असं म्हणूया?

४. 'तिथल्या व्यवस्थेत/ रचनेत काही दोष असेल...' हे पटलं. पण ते इथले कलाकार नाटक करत होते, तेव्हा भारतातल्या कलाकाराना पटलं नाही... फोन करणार कर्वे काकांना?

५. 'भारतीय कलाकारांना नाव ठेवता...' हे तुम्हाला स्वप्न पडलेले दिसतेय. वरच्या लिखाणात नक्की कुठल्या कलाकाराला आणि काय नांव ठेवली आहेत ते जरा स्पष्ट करा.

६. किल्लेदार... 'तुम्ही तिकीट काढलं असेल तर तुम्हीही या साखळीत सामील...' तिकिट काढणारा प्रेक्षक नाटक बघायला जातो. त्यामागे 'कोण मिरवले', 'कोण हरवले' बघायला नाही जात. अमिरखानचे शहारूखशी पटत नाही, किंवा फायनान्सर भरत शहा असेल म्हणून हिंदी चित्रपट सोडतात का लोक? 'उपाशी माणसाला भाकरी खायची असते,' ती कशी तयार झाली याचे तत्वज्ञान नको अस्ते.

७. इथे भारततले विरुध्द अमेरिकेचे असा वाद नाहीय. यापुढे जे मोठे कार्यक्रम होतील त्यात भारतातून मोजकेच लोक आणून त्याना भरपूर स्टेज्-टाईम द्यावा, कसलेल्या कलाकारांना आणून त्यांच्याकडून धडे घ्यावेत अशा सूचना आहेत.

८. परवाच्या सम्मेलनाला आलेल्या पाहूणे कलाकारांना स्टेज आवडले नाही. एका विशिष्ठ ठिकाणी लावलेल्या फळ्या आवडल्या नाहीत. इथे मेस्त्री मिळत नाहीत, फुटकळ कामाला माणसं मिळत नाहीत. मग दिवसभर Computer बडवणार एकादा IT Ingineer, दिवसभर पेशंट बघणार एकादा डॉक्टर, संध्याकाळी Home Depot तून फळ्या आणतो. त्याच्या गॅरेज्मधे बसून त्या कापतो, त्यावर काम करतो, मग रात्री तो नाटकाच्या तालमीलाही जातो, आणि दुसर्‍या दिवशी विमानतळावर पाहूण्यांचे स्वागत करून त्यांना हॉटेलमधे पोहोचवतो. मग असल्या क्षुल्लक तक्रारी केल्या की 'यांना एकदा Broadway शो दाखवा रे... नाही मुळव्याध लागली...'तर असं रावसाहेबांसारखं म्हणतोही.

९. 'काय साधलं या नाट्यसंमेलनाने? नेहमीप्रमाणे शुन्य...

<पण कला म्हणजे फक्त नाच नव्हे असं वाटत राहिलं. भरतनाट्यम, कथ्थक इत्यादी नाच त्यात का होते हे कळले नाही>
अहो या नाट्यफडाच्या आयोजिता कोण होत्या, ते तुम्हाला माहित आहे, त्यांना तुम्ही चांगले ओळखता. मग असा प्रश्न का बरे?

एकंदरीत भारतातले कलाकार इथे आणण्याचा खटाटोप करणे, हे त्यांचा वेळ, कुणाचा तरी पैसा, नि इथल्या लोकांना त्याचा काही फायदा, या सर्व दृष्टीनी कुचकामी आहे. अनेक बीएमेम चा तमाशा पाहून झाल्यावर सुद्धा शंभर डॉ. दरडोई देणारे लोक, (जाण्या येण्याचा, रहाण्याचा, नि खाण्या पिण्याचा खर्च वेगळाच.) खरे तर भारतात जाऊन सर्व भारतीय कलाकारांची कला, त्यांच्या नेहेमीच्या ठिकाणी , नक्कीच पाहू शकतील. उगाच पाच मिनिटासाठी चेहेरा दाखवायला इथे आणायचे यात खरे तर त्यांच्यावर व इतरांवर अन्याय होतो.

कुठल्याहि भारतीय कलाकाराला दोष देण्यात अर्थ नाही. एव्हढा लांबचा प्रवास करून यायचे, अनोळखी स्टेज, अनोळखी लोक यांच्याशी मिळवून घेण. आणि तरीहि उच्च दर्जाची कला दाखवणे हे जरा कठीणच. त्यांना इथे आणून आपण त्यांच्यावर काहीहि उपकार करत नाही, तेंव्हा तो विचार मनातून काढून टाकावा. त्यांना न बोलावणे हे आपल्याच हातात आहे.

चाळीस वर्षापूर्वी भारतातले कलाकार आणणे ठीक होते. आता काही गरज नाही.

आता महाराष्ट्र सरकारचे पैसे!! भारतात लोकशाही आहे. बहुमताने निवडून आलेले लोकप्रतिनिधी जे करतील ते भारतीय जनतेच्या हिताचेच असते. महाराष्ट्र सरकार अजिबात पैसे देणार नाही असे कळले असते तर नाट्यफड भरवणार्‍यांनी विचार केला असता. पण त्याबद्दल भारतीय जनता जागृत आहेच, इथल्या लोकांनी कशाला काळजी करावी?

विनय, उत्तम आढावा घेतला आहेस... पण फारच mild लिहिलं आहेस...
काही (नेहेमीच्याच यशस्वी) कलाकारांचा उत्तम अभिनय, रंगमंचावरचा सहज वावर बघायला मिळाला, काही नाटकाविषयीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या, आणि एकेकाळी ज्या लोकांना त्यांच्या 'ऐन उमेदीच्या' काळात पाहिलं होतं त्या लोकांना वय झालेल्या अवस्थेत का होईना पण भेटता आलं हे सोडलं तर (दुर्दैवानं) बाकी सगळा आनंदच होता.
लिहावसं वाटतंय, पण लिहायला गेलं तर इतकं mild लिहिलं जाणार नाही माझ्याकडून.... म्हणून मी न लिहिलेलंच बरं ! Happy

बेगम बर्वे हे typical आळेकर style चं लिखाण आहे... जसं महानिर्वाण आहे तसंच.
सुरु झालेला विषय बोलता बोलता इतक्या वेगवेगळ्या विषयांना आणि सामाजिक /भोवताली घडणा-या घटनांना स्पर्षून जातो की भोव-यात अडकतो आपण विचारांच्या. हे भोवरे आजूबाजूला किंवा आपल्याही विचारात असतातच....पण ते असे 'समोर' पाहताना गोंधळून जायला होतं... ही खास आळेकरांची style. त्याला black comedy ची जोड. वास्तव आणि अवास्तव ह्याच्या सीमेवर घडणारं नाटक आहे हे...illusion, total illusion!
असो, हा तुझ्या लेखाचा विषय नाही.. त्यामुळे बेगम बर्वे बद्दल अधिक इथे नको.. लिहिन परत कधीतरी Happy

सन्याशाला सुळी??? विरोधी सूर असताच कामा नये की काय?
असो
१. ठिके
२. हिशोब मान्य पण म्हणून महाराष्ट्र सरकारकडून अनुदान घेऊन मिरवण्याची हौस का? आयोजकांपैकी किती जण महाराष्ट्र सरकारला कर भरतात? किती जण मुळात भारतीय आहेत अजून? संमेलनाचा निषेध करताना आयोजकांबरोबरच अनुदान देणारे गाढव महाराष्ट्र सरकार आणि मराठी नाट्य परिषद यांचाही निषेध आहेच त्यात. नोंद घ्यावी.
३. >>आपण विचार करणारच नाही की त्या नाटकाला अनेक स्तरावर मान्यता का मिळालेली आहे, मराठी नाटकाच्या इतिहासात त्याचे इतके महत्वाचे स्थान का आहे.<< या मुद्द्यांच्या विचारापेक्षा ३० वर्षात २१ प्रयोग इतकंच दिसलं तुम्हाला. तेव्हा साहजिकच तुमचा नाटकावर रोख आहे असा समज होणं उघड आहे. प्रयोगांच्या संख्येवरून दर्जा ठरवायचा तर मग 'आंटी' किंवा तत्सम नाटकंही ग्रेटच मानायची की काय? नाटक व्यावसायिक नाही. नाटकातल्या सर्व कलाकारांचे पोटापाण्याचे व्यवसाय वेगळे आहेत. तेव्हा व्यावसायिक प्रमाणे प्रयोग संख्या होणार नाहीच. त्यात परत कोणीतरी थिएटर अ‍ॅकेडमीने प्रेक्षकांना वेठीस धरले इत्यादी तारे तोडलेच आहेत वरती.
४. बर बाबा तुमचे कलाकार फार ग्रेट. ज्या माणसाने अभिनित केलेल्या नाटकांचा वेगळा महोत्सव होतो आणि त्याला भरपूर गर्दी होते तो नट मात्र वाईट नट.
५. काळ्यांचा आवाज पोचत नाही याबद्दल केवळ काळ्यांनाच तर दोषी मानलंत तुम्ही. आणि बाकी इतर प्रतिक्रियांमधेही भारतातल्या कलाकारांपेक्षा तिथलेच कलाकार चांगले इत्यादी मुद्दे आलेतच की.
६. हे लॉजिक इतर अनेक बाबतीत लावलं जाऊ शकतं. आम्हाला आमची गरज/ आवड भागल्याशी कारण. बाकी कोण काय करतंय याच्याशी काय घेणंदेणं? पण हे एरवी योग्य नाही हे पटतं तर इथे का पटत नाही?
७. माझं तर म्हणणं आहे कुणालाच नेऊ नका. दरवेळेला त्याच त्या लोकांना न्यायचं आणि तीच ती टिका करायची. पैसे फेकले तर नट कुठेही येईल अशी अपमानास्पद भाषा वापरायची काही मूर्ख खोंडांनी. कशासाठी? अज्जिबात नेऊ नका एकालाही. आणि आमच्या महाराष्ट्र सरकारकडून अनुदानही घेऊ नका. न्यायचं ठरवलंतच तर नेरूरकर बाईंनी जे आयत्या वेळेला रेफरन्सच्या संदर्भात हात वर केले तसलं काही करू नका.
८. मुळात भारतीय नाटकधंद्याला शिस्त नाही. स्टेजचं डिझाइन आणि इतर गोष्टी आधीपासून ठरवणं, देवाणघेवाण करणं हे अजिबातच अवघड नाही. पण इथल्यांना ती सवय नाही. बेशिस्त आणि चालवून घेऊ रे, मारून नेऊ रे हे भरलेलं आहे त्यांच्यात आणि तिथल्या नाट्यधंद्याला शिस्त आहे पण त्यांच्याशी तिथल्या भारतीय वंशाच्या कुणाचंच फारसं देणघेणं नाही. आम्ही हौशी आणि आमचे नोकरीधंदे सांभाळून आम्ही केवढं आमच्या कल्चरसाठी करतो एवढंच आहे. त्या त्या धंद्यातल्या व्यावसायिकाकडून थोडंफार शिकून किंवा निदान समजून घ्यावं जेणेकरून आपलाच पोपट होणार नाही हे किती जणांना वाटतं?
९. ते तसं होणारच होतं. काही नाटकांचे प्रयोग या पलिकडे जर संमेलन जाणारच नसेल तर वेगळं काय होणार.

यातलं तुम्ही हे केवळ तुम्हाला एकट्याला उद्देशून नाहीये हे तुमच्या लक्षात येत नसेल तर म्हणून सांगतेय.

नीधप, बहुधा रागाच्या भरात तुझ्या लक्षात आलं नसावं की तुझा आणि विनयचा मुख्य प्रश्न एकच ('नाट्यसम्मेलन' इथे भरवून नक्की काय मिळवलं?) आहे. दोघांचाही आक्षेप संयोजनाबाबतच आहे.

त्या व्यतिरिक्त 'काळ्यांचा आवाज पोचत नव्हता', 'बेगम बर्वे कळलं नाही' ही मतं/निरीक्षणं (खरीखुरी, साधी आणि हार्मलेस) मांडायला इतकी हरकत का?

यावर उपाय काय - यावर बोलता येणार नाही का? दोन्ही देशांतले रंगकर्मी आणि सामान्य प्रेक्षक यांनी अशा कार्यक्रमांवर बहिष्कार घालावा का? इतर कुठल्या प्रकारे अशा कार्यक्रमांना आळा घालता येईल?

नीधप- स्वातीला अनुमोदन. मलाही तसंच वाटलं. तू आणि विनय खरे म्हणजे बर्‍यापैकी तेच मुद्दे मांडताय. बेगम बर्वे सोडुन. आणि बेगम बर्वेंबद्दल त्यांनी सरळ कबुल केलय की समजलं नाही म्हणुन. पटो न पटो.

काळ्यांचा आवाज पोचत नाही याबद्दल केवळ काळ्यांनाच तर दोषी मानलंत तुम्ही <<<< हे चूक.. मी हात दुखेपर्यंत टाळ्या वाजवल्या त्यांच्या गाण्याला. Happy पण काळ्यांचं असं झालं, आणि कट्यारच्या बहुतेक कलाकारांचं असं झालं तर तांत्रिक दोष, आणि शिकागोच्या कलाकारांचं असं झालं तर 'कळत नाही त्यांना स्टेजवर कसे वावरायचे...' याला काय म्हणावे?

दरवेळेला त्याच त्या लोकांना न्यायचं << यावेळी गिरीश ओक, चंद्रकांत काळे यांसारखे उत्कॄष्ट कलावंत पहिल्यांदाच आले होते.. त्याबरोबर आलेल्या लोकांमधेही निम्म्यापेक्षा जास्त 'आधी न आलेले' चेहरे होते. निदान ही नांवं मागच्या बॄमम मधे आणि त्यापूर्वीच्याही काही कार्यक्रमांच्या यादीत नव्हती.

सरकारकडून, मंत्र्याकडून अनुदान घेणं किंवा त्याचा इथे उपयोग करणं हे मलाही मान्य नाही. हे मी लिहीलेलं आहे(च).

अज्जिबात नेऊ नका एकालाही. <<< हे पटलं.. खरंच असं झालं तर... Happy

रार... पण फारच mild लिहिलं आहेस... <<< चुका चुका म्हणून ओरडण्याआधी, त्यासाठी कुणी आणि किती कष्ट केले हे बघावे लागतेच.. आणि या चुका काय करून टाळता येतील हे बघणे म्हणजे सकारात्मक विचार असं मला वाटतं. मी इथे लिहीलेले विचार शिकागोवाल्यांना नक्कीच कळवेन. पण काम करणार्‍या लोकांना विचारलं तर ते म्हणतात, 'हे सगळं सांगून झालंय, पण ऐकेल कोण? वरची मंङळी, 'तू १०० बोलावले, तर मी ११० बोलावीन' याच गुर्मीत असतात..'

स्वाती,
माझा विनयवर काहीही राग नाहीये. किल्लेदारांनी विषय काढला नसता तर मी इथे लिहायचंच नाही असं ठरवलं होतं. रागाचं लेबल उगाचच मला कशाला न कळे? तुम्ही म्हणजे विनय एकटे नाहीत हेही मी स्पष्ट केलंच होतं की.

आक्षेप काही बाबतीत समान असले तरी काही बाबतीत नाहीयेत.
मुख्य म्हणजे मी इथे बसून कितीही ओरडा केला तरी नाट्यसंमेलनासंदर्भात कुणाचाच कुठलाच निर्णयात त्याने काडीचा फरक पडणार नाही. कदाचित संख्येने कमी असल्याने निर्णय घेणार्‍यांपैकी कुणापर्यंत तुमचाच आवाज पोचण्याची शक्यता अधिक आहे.

मतं, निरिक्षणं मांडायला काहीच हरकत नाहीये. मी कोण हरकत घेणारी? मी तिथे नव्हते त्यामुळे नाटकात काय झालं असू शकेल किंवा नाही हे मला कुठे माहित असणारे? काळे काकांना खूप ऐकलंय/ बघितलंय स्टेजवर आणि त्यामुळे हा त्यांचाच दोष नसू शकतो अशी शक्यता वाटली आणि ती मांडली तर काय चुकलं?
मला तरी ती मतं आणि त्यावरच्या काही प्रतिक्रिया इथले-तिथले प्रकारातल्या वाटल्या. आणि ते नाही पटलं. त्यावर हरकत असेल तर मी काय करू...

>>यावर उपाय काय - यावर बोलता येणार नाही का?<<
आम्हाला नाटकं बघायला मिळण्याची मतलब. मग ती तुमच्या करातून का असेनात असा पवित्रा घेतल्यावर चर्चा होते का?
मुळात काही मराठी नटांना बोलवून उत्सव करायचाय की नाट्यसंमेलन/ नाट्यमहोत्सव हवाय या मुद्द्याला हात घालायचा तर असा पावित्रा काय कामाचा?

>>दोन्ही देशांतले रंगकर्मी आणि सामान्य प्रेक्षक यांनी अशा कार्यक्रमांवर बहिष्कार घालावा का? इतर कुठल्या प्रकारे अशा कार्यक्रमांना आळा घालता येईल?<<
कोणी बहिष्कार घालावा हे मी काय सांगणार? आणि कुठल्या अधिकारात?

माफ करा माझा काहीच संबंध नसताना मी इथे बोलले. नाटक हा नको इतका जवळचा विषय असल्याने लक्षात आलं नाही. यापुढे इथे लिहिणार नाही.

>>२. राजकारणी मंडळी इथे येऊन आपल्याला काय उपदेश करणार, आणि त्याने आपल्याला काय फरक पडणार? तेव्हा त्यांना आणू नये. वेळ वाया जातो.
अशा सम्मेलानाला सरकारी अनुदान मिळण्यासाठी मंत्रिमहोदयांपुढे लाचारपणे पदर पसरल्यानंतर त्यंना पंगतीत मानाचे स्थान देणे क्रमप्राप्तच आहे. मुळात अमेरिकेत स्थायीक झालेल्या लोकांचे नाट्यडोहाळे महाराष्ट्रातील करदात्यांनी का पुरवावेत? हेच एन आर आय सुटीला भारतात गेल्यावर अमेरिकेत घरोघरी दोन गाड्या आणी स्विमिंग पूल यांच्या कहाण्या सांगून फुशारक्या मारतात ना? मग एक साधे नाट्यसम्मेलन आपल्या पैशांवर भरविता येउ नये?

नीरजा-
तसं होत नाही गं. ती चळवळ म्हण आंतरिक ओढ म्हण स्वस्थ बसु देत नाही. एकतर बेगम बर्वे पहा (कधीचं पहायचय मला) नायतर तमाशे पहा (हे ही पहायचय) असं होतं का? . Happy

अमेरिकेतली सोड, देशातल्या संमेलनातही हीच ओरड असते की नाही दरवेळेस? ती कुठल्याही उरुसजलशांची मर्यादा आहे ना?

केलं माफ. Proud

विनोद जाऊ दे, पण दोन्ही बाजूंनी इतकी टोकाची भूमिका (आधी वाद, मग 'मी बोलतच नाही') घेऊन नक्की कोणाचं भलं झालं? माझं, तुझं, विनयचं की आणखी कोणाचं?

तुझा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तुझी मतं प्रामाणिक आणि वाचनीय/मननीय असतात. त्याला फणकार्‍याची फोडणी प्रत्येक वेळी द्यायलाच हवी का? त्यामुळे समोरची व्यक्ती दुखावते आणि मग योग्य मतंही विचारात घेतली जात नाहीत हे तुझ्या कधी ध्यानात आलंय का?

"पैसा फेकला की कलाकार कुठेही येईल नाचायला" हे वाक्य या बा. फ. वर कुठल्याहि 'खोंडाने' (मूर्ख किंवा शहाण्या) लिहीले नसताना त्याचा दोनदोनदा उल्लेख इथे होतो.
तसेच, <आमच्या महाराष्ट्र सरकारकडून अनुदानही घेऊ नका.> या वाक्यात, स्पष्ट लिहीले नसले तरी 'आमच्या महाराष्ट्र सरकारकडे भीक मागू नका' अशी दर्पोक्ति असल्याचा वास येतो आहे.
त्याला उत्तर एकच!
भीक मागितली म्हणजे ताबडतोब दिलीच पाहिजे अशी कर्णासारखी ध्येयवादी वृत्ति जनतेच्या सरकारची आहे का?
भारतात लोकशाही आहे. बहुमताने निवडून आलेले लोकप्रतिनिधी जे करतील ते भारतीय जनतेच्या हिताचेच असते. तेंव्हा त्याचे उत्तर भीक मागणार्‍याकडे न मागता देणार्‍याकडे मागावे.

खरे तर महाराष्ट्र सरकारने 'घातलेली भीक', येथील लोकांनी उभारलेली रक्कम, कलाकारांच्या जाण्या येण्याचा, रहाण्याचा खर्च, त्यांना काही फूल ना फुलाची पाकळी म्हणून दिलेले मानधन, इ. सर्व गोष्टींचे आकडे माहित असल्या शिवाय उगाच बोलण्यात अर्थ नाही.

मला वाटते इथल्या लोकांना <अज्जिबात नेऊ नका एकालाही> असा उपदेश करण्या ऐवजी तिथल्याच लोकांना सांगा - अज्जिबात जाऊ नका. अहो ते नाही म्हणाले तर कुणि त्यांना हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबून, जबरदस्तीने इथे आणू शकतील काय???

उग्गाच आप्लं, राग येतो म्हणून, क्कैच्च्या क्कैच्च बोलायचे!!

आणि हो फणकार्‍याची/ हेटाळणीची/सतत कुचेष्टेची फोडणी अमेरिकेतली लोकंही देतातच बर्‍याचदा. तेव्हाही त्या त्या व्यक्तिला योग्य ती समज देण्यात यावी, अशीही अपेक्षा धरायला हरकत नसावी. Happy

अरे हो, तुझा इथे काय संबंध असे कोणी म्हणले तर तेही बरोबरच आहे. Happy

नीधपः तुम्ही लिहा हो...तुमचं नाटकाचं प्रेम दिसतंच आहे. पण स्वतःच उलटे अर्थ काढून चिडू नका... (संदर्भः चं काळेकाका).

तुमचे नाट्यसम्मेलन इकडे होऊ नये, भारतातला पैसा वापरला जाऊ नये इत्यादी मुद्दे आधीच मान्य केलेले आहेत....

<त्यांना> म्हणजे नक्की कुणाला हो स्वाती_आंबोळे?

"अशा सम्मेलानाला सरकारी अनुदान मिळण्यासाठी मंत्रिमहोदयांपुढे लाचारपणे पदर पसरल्यानंतर त्यंना पंगतीत मानाचे स्थान देणे क्रमप्राप्तच आहे. मुळात अमेरिकेत स्थायीक झालेल्या लोकांचे नाट्यडोहाळे महाराष्ट्रातील करदात्यांनी का पुरवावेत? "
अहो हे सगळे मनचे लावता का? कुणि लाचारपणे पदर पसरला? करदात्यांचे पैसे कुणि दिले? कशासाठी दिले? किती दिले? त्या करदात्यांचे पैसे देण्याचा अधिकार करदात्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनाच होता ना? मग ते करदाते असे षंढासारखे गप्प का बसले? (प्रश्नातच उत्तर आहे का?) नि आता अमेरिकेतल्या लोकांना विचारून काय फायदा?

धन्य रे देवा! कुठल्याहि गोष्टीबद्दल कुणावरहि राग काढायचा!!
<हेच एन आर आय सुटीला भारतात गेल्यावर अमेरिकेत घरोघरी दोन गाड्या आणी स्विमिंग पूल यांच्या कहाण्या सांगून फुशारक्या मारतात ना?>
आता याचा नाट्यफडाशी काय संबंध?!

विनय, mild लिहिलं आहे हे मी कौतुकानं लिहिलं तुझ्या लेखनाबद्दलच्या Happy
इतकं गलथान management/organization (आणि हे काही पहिल्यांदा होत नाहीये!) पाहून आणि अनुभवून, त्याबद्दल इतक्या सौम्य शब्दात लिहिणं मला खरंच जमणार नाही !
मी लिहायला गेले तर मुळात नाट्यसंमेलनाकरता निवडलेल्या जागेपासून (त्या थिएटरपासून) बोलायला सुरुवात करीन.
म्हणूनच मी न लिहिलेलं चांगलं असं मला वाटतं ! Happy

मला वाईट वाट्तं काही कळकळीनं काम करणा-या स्वयंसेवकांसाठी.
गेले वर्ष-सहा महिने सगळी कामं सांभाळून राबत असतील ते... पण 'महत्वाच्या दिवशी - THE DAY ला जर योग्य रितीनी execution झालं नाही, तर एका अर्थानी सगळ्या मेहनतीवर पाणीच ना !
यामुळे अनेकदा एका मनापासून काम करणा-या माणसाच्या मेहनतीचा insult होतो ... काही लोकांच्या प्रतिष्ठेसाठी !!!

परवाचं नाट्यसंमेलन ज्या low note वर, depressing स्थितीत संपलं.... तेव्हा राग न येता वाईट वाटलं मनापासून.

पण ही व्यसनं अशी आहेत ना, की कितीही राग आला, वाईट वाटलं... 'नव्या उमेदीनं' पावलं त्या व्यसनांकडे वळणारच ! Happy

Pages