माझ्या मनातले राऊळ

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 May, 2010 - 12:04

देऊळ म्हटलं की आपल्या किती ठराविक संकल्पना असतात, नाही? जे जे उदात्त, उत्तम असते त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे मंदिर - देऊळ. पंचमहाभूतांना मानवी संकल्पनेत बंदिस्त करून त्या द्वारे संपन्न अनुभव व आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान मानले जाते देऊळ. पण कितीतरी वेळा आपण अशा अनुभवाला काही छोट्यामोठ्या कारणांनी पारखे होतो. कधी ते कारण गर्दी असते, तर कधी त्या ठिकाणची अस्वच्छता. कधी भक्तीचा बाजार आपल्याला उबग आणतो तर कधी लोकांच्या अंधश्रद्धा! आणि मग ज्या कारणासाठी देवळात गेलो ते कारणच बाजूला पडते. त्यात जर ते दुर्योधनाचे, हिडिंबेचे, काळभैरवाचे, उंदरांचे किंवा रावणाचे देऊळ असेल तर? मग अश्या ठिकाणी कसली आली आहे मनःशांती? पण ह्या प्रकारच्या देवळांचेही काही निश्चित प्रयोजन असावे. मनुष्यातील सत्प्रवृत्ती जश्या पूजिल्या गेल्या तश्याच दुष्प्रवृत्तीही पूजिल्या जाव्यात? अखेर, सत्प्रवृत्ती व दुष्प्रवृत्ती - दोन्ही मनुष्यस्वभावाचीच अंगे आहेत ना! जे जे उदात्त, अद्भुत आहे ते ते, व जे जे रौद्र, बीभत्स, शृंगारिक, क्रूर आहे तेही - देवळांमध्ये या नवरसांचे मूर्त स्वरूप दिसते. अश्या ठिकाणी गेल्यावर पंचेंद्रिये जशी निवतात तसेच मनही निवते. पूर्वसंकल्पना गळून पडतात. आयुष्याबद्दल एका प्रकारची स्वीकृती येते. आणि विरक्तीही!

मी जेव्हा एखाद्या शांत - रम्य वेळी, निवांतपणे, स्वच्छ परिसर असलेल्या मंदिरात जाते तेव्हा तिथे येणारा अनुभवही खूप अनोखा असतो. अश्या वेळी का कोण जाणे, देवदर्शनाचा खरा आनंद मिळतो. भले देवळात देवाची मूर्ती असो अगर नसो! (गुरुद्वारा, बहाई मंदिरे). भले ते देऊळ प्रख्यात असो वा नसो, त्यावर रुपेरी मुलामे चढलेले असोत वा नसोत. दोन घटका देवळाच्या पायऱ्यांवर बसताना आपोआप माझे मन शांत होते. विचार थंडावतात. दृष्टी आत वळते. मनाचा मनाशीच सुखसंवाद सुरू होतो. त्यातूनच कधी मला अडलेल्या प्रश्नांची उत्तरे गवसतात, कधी अडचणींवर मात करण्याचे बळ मिळते. पण सवाल हा आहे की त्यासाठी देवळातच का जायचे? अगदी कोठेही हा संवाद होऊ शकतोच की! पण, शांत देवळात ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा अंतर्ध्वनी ऐकू शकता, त्याप्रमाणे इतर कोठे येतो तरी का ऐकू हा आवाज?

शोध घेताना मला अचानक जाणवले....गेली अनेक वर्षे, खरे तर मला आठवत असल्यापासून, कोणत्याही निसर्गरम्य स्थळी गेले की माझी स्तिमित पुतळी होते. समोर त्या प्रवासी कंपन्यांच्या ब्रोशर्समध्ये असतो तसा विहंगम, नयनमनोहर निसर्ग-देखावा असतो. मोकळी हवा, प्रफुल्लित करणारा वारा आणि जे जे काही अप्रतिम आहे ते ते समोर माझ्या स्वागताला पसरलेले असते. अशा उत्फुल्ल वातावरणात आजूबाजूचे लोक प्रसन्न खिदळत असतात, हास्यविनोद करत असतात, फोटोज काढत असतात, निसर्गाच्या नजाऱ्यावर हर्षोद्गार काढत असतात..... आणि मी? मी ह्या सर्वांपासून काहीशी दूर, गुरफटलेली, अलिप्त असते. अबोल, स्तब्ध. बाहेर बघणारी, पण खरे तर दृष्टी आत वळलेली. अंतर्मुख. विस्मित. दिग्मूढ!

कारण त्या क्षणांना मी स्वतःत एका प्रकारे नसतेच मुळी! समोरच्या निसर्गाला मनाने आलिंगत असते मी... त्या अथांग आकाशाला कवेत घेण्याचा प्रयत्न करत असते, गगनाला गवसणी घालणाऱ्या पर्वतरांगांना ह्या छोट्याश्या नजरेत सामावायला बघत असते.... कधी मऊशार गवतात मनानेच लोळण घेत असते, कधी समुद्राच्या उफाळत्या अजस्र लाटांवर मीही मनातल्या मनात आरूढ झालेली असते आणि स्वतःही एक लाट बनलेली असते, कधी झऱ्याच्या खळखळाटात हरवून गेलेली असते, कधी धुक्याने स्वतःला अंतर्बाह्य लपेटून घेत असते तर कधी मातीच्या गंधाने माझी वेडावलेली गत झालेली असते.... पंचमहाभूतांना पंचेंद्रियांनी समरसून अनुभवायचा, त्यांच्यात एकरूप होऊन जाण्याचा हा आवेग मला वेढत असतो. त्याची तीव्रता कधी इतकी दाहक असते की त्या स्तिमितावस्थेतही डोळ्यांत अश्रू येतात. कंठ दाटून येतो.

वाणी तर आधीच मूक, अबोल झालेली असते. आता मनाच्या अवकाशात फक्त तो निसर्ग व्यापून उरतो.

इतर कोणताच विचार नसतो. ना कसली चिंता, ना कसली आशा.

हीच का ती निद्रित जागृतावस्था? हाच का तो वर्तमान क्षण? हेच का उघड्या डोळ्यांनी लागलेले ध्यान?

मला माहीत नाही! पण एक नक्की.... ही अवस्था मला स्वतःतील अथांग अवकाशाची दृढ जाणीव मात्र करून देते. जेव्हा मनाची कवाडे खुली असतील तेव्हाच मला हे आकाश नजरेत सामावता येईल... तरच हा मातीचा, हिरवाईचा सुगंध रंध्रारंध्रात भरून घेता येईल... तरच समुद्राचे, झऱ्याचे, नद्यांचे संगीत माझे अस्तित्व व्यापून टाकेल!
झाडे, नद्या, डोंगर-दऱ्या, आणि त्यांना लपेटणारे आकाश. त्यांच्याशी एकरूप होताना, त्यांना आपल्यात सामावताना मला स्वतःतील लयही सापडते. त्यांच्याच तर तालावर ती नृत्य करत असते. आणि त्या अनुभवापाठोपाठ येते ती कृतज्ञता. मी खरंच असं काय केलं की मला ह्या निसर्गाने एवढ्या उदारहस्ते भरभरून द्यावं? माझ्या झोळीत त्याने हे जे उदंड वैभव घातले आहे त्याची उतराई मी कधी तरी होणार आहे का? त्याच्या अपार मायेच्या वात्सल्यस्पर्शाने माझे जीवन ओतप्रोत भरले आहे. बस्स! आता दुसरे काही नको. मागण्यासारखे काही उरलेले पण नाही. मागणाराही तूच आणि देणाराही तूच! तुझेच तुला मी काय देऊ?

मनात अपार समाधान दाटून येते. तृप्तीचा आल्हाद अनुभव.

हीच तर असते ना पूजा? हीच तर असते ना समाधी? हाच असतो ना आत्मसंवाद?

आता कळले की बोल अबोल का झाले.... विचार स्तब्ध का झाले.... भावना, बुद्धी यांच्यापलीकडचे काही का जाणवले....
हीच माझी पूजा. हा निसर्गच माझे देऊळ! त्याला फक्त चार भिंतींचे आवरण नाही की मानवनिर्मित आचार-उपचारांची झालर नाही! त्याच्या दारात बसले की सारे कष्ट मिटतात, हेवेदावे गळून पडतात, मनात आनंदलहरी उमटतात किंवा शांत गंभीर तरंग.

माझ्या ह्या देवळाच्या विराट वेगळेपणात, अमर्याद स्वरूपात मला धन्यता आहे. सर्वांना खुलं, बंधनमुक्त असलेलं हे देऊळ प्रत्येकाच्या मनातच दडलेलं आहे. पण निसर्गदेवतेच्या सान्निध्यात मनातल्या ह्या देवळाचे जे लख्ख दर्शन घडते ते केवळ शब्दातीत आहे!

-- अरुंधती कुलकर्णी

गुलमोहर: 

खरचं अरुंधतीताई , खूप सुंदर लिहिलंत तुम्ही. भरभरून पाऊस,फळा फुलांचा मौसम म्हणजेच या राऊळाचा उत्सव असेल होय की नाही.

अप्रतीम, सुंदर, झकास Happy

>> पंचमहाभूतांना पंचेंद्रियांनी समरसून अनुभवायचा, त्यांच्यात एकरूप होऊन जाण्याचा हा आवेग मला वेढत असतो.

Happy अगदी असंच वाटतं मलाही !!!

लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.

लाजो, सुर्यकिरण, मंदार.... प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy मनात जसं जसं उमटत गेलं तसं लिहिलंय! त्यावर नंतर विचारही केला नाही. पण तुम्हाला आवडलं हे वाचून छान वाटलं!

मस्त,
सर्वत्र असतो म्हणून आपण निसर्गाला गृहित धरतो किंवा विसरतो. निसर्ग हेच विज्ञान, निसर्ग हेच सत्य. निसर्गातच देवपण Happy

ह्या अनोख्या देवळाच्या सफरिबद्दल मनापासुन धन्यवाद .कधि कधि एखाद्या ठिकाणि गेल्यावर हा परिसर आपण कुठेतरि पाहिल्या पाहिल्यासारखा वाटतोन तसेच हे वाचल्यावर वाटले. आपल्या मनातल तुमच्या सुंदर शब्दातुन ऊतरलेल.

निसर्गच माझे देऊळ! त्याला फक्त चार भिंतींचे आवरण नाही की मानवनिर्मित आचार-उपचारांची झालर नाही! त्याच्या दारात बसले की सारे कष्ट मिटतात, हेवेदावे गळून पडतात, मनात आनंदलहरी उमटतात किंवा शांत गंभीर तरंग
वा क्या बात है . सहमत. लेख आवदला

अमोल केळकर
---------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

>>>पंचमहाभूतांना पंचेंद्रियांनी समरसून अनुभवायचा, त्यांच्यात एकरूप होऊन जाण्याचा हा आवेग मला वेढत असतो. त्याची तीव्रता कधी इतकी दाहक असते की त्या स्तिमितावस्थेतही डोळ्यांत अश्रू येतात. कंठ दाटून येतो.<<< मस्त ! आवडले राउळ Happy

अरुं कित्ती छान लिहिलसं...तुझा लेख वाचून मनात गर्दी केलेल्या विचारांना,भावनांना व्यक्त करायला शब्दच नाहीत पुरेसे

अरुंधतीजी, खास लिहिलय !
पण हे "राऊळ" नक्की कुठे आलं,कसं जाता येईल,याबद्दल जरा सांगा, मला पण कधी-कधी जाता येईल ....
Happy

अजित, सांजसंध्या, सुनिल, अमोल, आरती, जुई, रजनीगंधा, वर्षू, अनिल, कविता.... सर्वांना मनापासून धन्यवाद! Happy