कानुन का बेटा...!

Submitted by विशाल कुलकर्णी on 17 May, 2010 - 00:52

"कानुन का बेटा"

"मै हर काम कानुन के दायरेमें रहकर करता हूं! कोइ गुनाह भी करता हूं तो इस तरह की कानुन कि कोइ भी दफा उसे गुनाह ना कह सके! कानुन की दफाओंके बीच सुरंग बनाकर कानुन को भी इन्साफ दिलाता हूं मैं! लोग मुझे कानुन का जादुगर कहते है... मगर मै हूं "कानुन का बेटा!"

हिंदीचं वेड शाळेत असल्यापासुनच होतं, कदाचित त्यामुळेच वैकल्पिक भाषा म्हणून संस्कृतच्या ऐवजी हिंदी घेतली होती. अगदी दहावी - बारावीलादेखील हिंदीला ९५ च्या पुढे मार्क होते. पुढे पुढे जसे हरिशंकर परसाई, प्रेमचंद, शैल चतुर्वेदी, अशोक चक्रधर हे वाचनात येत गेले तसे हिंदीचे वेड अजुनच वाढत गेले. कॉलेजला आल्यानंतर मात्र टेस्ट बदलत गेली. साधारण पंधरा - सोळा वर्षापूर्वी कॉलेज लाईफच्या दरम्यान एकीकडे सुशि , वपु, पुल अशी व्यसनं लागत होती, तर एकीकडे आणखी एक व्यसन पक्कं होत होतं. त्या व्यसनाचं नाव होतं "वेदप्रकाश शर्मा". मराठी पुस्तकांच्या किंमती जेव्हा १००-१५० रुपयांपेक्षा जास्त होत्या, तेव्हा साहजिकच सहा रुपयांपासुन दहा रुपयांपर्यंत किंमत असणारी हिंदी पॉकेट बुक्स माझ्यासारख्या वाचनवेड्याला देवासारखी वाटली नसती तर नवलच. तशी मराठीसाठी वाचनालये आहेतच पण हिंदीसाठी आधार म्हणजे रेल्वे स्टेशनवरचा पुस्तकांचा स्टॉल. (त्यावेळी आम्ही कुर्डुवाडीला राहात होतो) कुर्डुवाडी स्टेशनवरचा वेणेगुरकरांचा पुस्तकांचा स्टॉल आणि मार्केटमधलं कुलकर्ण्यांचं 'ललित वाचनालय' या दोन ठिकाणी तेव्हा हिंदी पॉकेटबुक्स मिळायची. त्यामुळे आमची वेणेगुरकर आणि ललितच्या कुलकर्णीकाकांबरोबर दोस्ती होणे साहजिकच होते. गुलशन नंदा, ओमप्रकाश शर्मा, वेदप्रकाश शर्मा आणखी एक प्रकाश मोहन भारती की असेच काहीसे नाव असलेला लेखक ही त्यावेळची हिंदीतली तरुणाईची आकर्षणस्थाने होती. त्यातल्या त्यात ओमप्रकाश शर्मा आणि वेदप्रकाश शर्मा हे आवडते लेखक. सुरेंद्र मोहन पाठकची 'सुनील सिरिज, सुधीर सिरीज, बिमल सिरीजही तेवढीच लोकप्रिय झाली होती.

ओमप्रकाश शर्मांची जासुसी नॉव्हेल्स म्हणजे जिव की प्राण. विजय-विकास, कॅप्टन विनोद, अलफांसे, वतन, जेम्स बाँड, प्रिंसेज जॅकसन, सिंगही, बटलर आणि दी ग्रेट विक्रांत असे कित्येक देशी-विदेशी हेर...., टुंबकटू नामक एक परग्रहावरचा प्राणी! त्यांच्या थरारक कारवाया, एकमेकाला नमवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सिंगहीसारख्या जग जिंकण्याचा प्रयत्न करणार्‍या खलनायकाला नमवण्यासाठी त्या सगळ्यांचं आपापसातलं वैर विसरुन एकत्र येणं सगळंच प्रचंड आवडायचं. तासन तास ती ३००-४०० पानांची जाड जाड पुस्तके वाचण्यात वेळ कसा जायचा ते कळायचं नाही. पण ओमप्रकाश शर्माच्या पुस्तकांमधुन हिंसाचार प्रचंड असायचा. (खरेतर विजय - विकास किंवा विक्रांत हे देखील वेदप्रकाश शर्माचेच मानसपुत्र, पण ते बहुतेक हिंदी लेखकांनी ढापले होते. अर्थात वेदप्रकाशच्या शर्माच्या लिखाणाची सर कुणालाच आली नाही. कारण त्याच्या लेखनात एक लॊजिक असायचं जे इतर लेखकांच्या लेखनात कधीच आढळले नाही.) असो..., एक ठराविक वय उलटून गेल्यानंतर ओमप्रकाश शर्मा वाचणं नको वाटायला लागलं आणि अशा वेळी हाती लागला तो वेदप्रकाश शर्माचा "कानुन का बेटा!"

हे काहीतरी वेगळं होतं. आज पर्यंत ओमप्रकाश शर्मा वाचलेला. प्रचंड हिंसाचार, गोळीबारी , खुन डॉक्याला ताप नाय साला. केव्हाही वाचावं वाटलं की कुठलंही पान उघडा सगळीकडे तेच. लिंक ठेवायची गरजच नाही. पण वेदप्रकाश शर्मा वाचताना पहिल्यांदा लक्षात आलं की आता असं करुन नाही चालणार. हे नीट, व्यवस्थीतच वाचायला हवं. त्यातली मजा अनुभवायची असेल तर त्याला सलगच वाचायला हवं. सुरुवातीला थोडं कठीण गेलं. पण एकदा वेदप्रकाश शर्माचं व्यसन लागलं आणि ओमप्रकाश शर्मा कधी विसरला गेला कळालेच नाही. वेदप्रकाश शर्माची आधीही खुप पुस्तके आली होती. पण माझ्या सुदैवाने मी वेदप्रकाश शर्मा वाचायला सुरुवात केली ती" कानुन का बेटा" या पुस्तकापासुन.

अलाहाबाद या पवित्र शहरात विद्यादानाचे पवित्र काम करणारे एक आदर्श अध्यापक श्री. शास्त्रीजी, त्यांची पत्नी, एक १५-१६ वर्षाचा मुलगा माधव शास्त्री आणि एक मुलगी. असं सुरेख चौकोनी कुटुंब. सुखा समाधानाने नांदणार्‍या या गोड कुटूंबाला अलाहाबादमधल्या एका चांडाळ चौकडीची दृष्ट लागते. जुनेजा, कुकरेजा, बब्बर आणि चौथा त्याचं नाव आता आठवत नाही. तर हा जुनेजा आपल्याच पत्नीचा खुन करतो. हा खुन करताना शास्त्रीजींचा मुलगा माधव त्याला पाहतो आणि निर्भिडपणे त्याच्याविरुद्ध कोर्टात साक्ष देतो. पण समाजात वरचे स्थान जुनेजा त्याला पुरून उरतो. आपल्या पाताळयंत्री वकीलाच्या अ‍ॅड. नारंगच्या साह्याने तो कोर्टातून निर्दोष सुटतो आणि सुरू होते माधव शास्त्रीच्या कुटूबाची परवड, वाताहत. एका रात्री हे चौघे माधवच्या घरात घुसतात आणि माधवच्या आईची हत्या करतात, माधवच्या असहाय वडीलांच्या समोरच त्यांच्या १४-१५ वर्षाच्या मुलीवर सुधावर अमानुष बलात्कार करतात. त्याचवेळी सर्वस्व लुटले गेलेली सुधा (किंवा असेच काहीसे नाव) जुनेजाच्याच पिस्तुलाने स्वतःच्या कपाळात गोळी मारुन आत्महत्या करते. ते पाहून निराश झालेले शास्त्रीजीही त्याच पिस्तुलाने आत्महत्या करतात. जुनेजा जाता जाता तेच पिस्तुल बेशुद्ध पडलेल्या माधवच्या हातात ठेवून या सर्व मृत्युंचा आरोप माधववर येइल अशी व्यवस्था करतो. पण जुनेजा असे काही करणार याची अंधुकशी कल्पना असल्यामुळेच माधवने आपल्या घरात एक छोटासा व्हिडीयो कॅमेरा बसवून ठेवलेला असतो. त्यावर सर्व घटनाक्रमाचे चित्रीकरण होत राहते.

शुद्धीवर आल्या आल्या माधव ती टेप घेवून पोलीसांकडे पोहोचतो.पण तोपर्यंत माधववर विश्वास असणार्‍या प्रामाणिक पोलीस अधिकार्‍याची जैनअंकलची तिथुन बदली होवून तिथे पांडे (किं चौबे) नावाचा एक भ्रष्ट एस्.एच्.ओ. आलेला असतो, ज्याला जुनेजाने आधीच विकत घेतलेले असते. तो टेप आपल्या ताब्यात घेतो आणि माधवलाच अडकवण्याचा प्रयत्न करतो. पण माधव कसे तरी त्याचीच गन त्याच्या डोक्याला लावून तिथून पळ काढतो. आणि थेट जुनेजाच्या घरी येवुन पोहोचतो त्याची हत्या करुन आपला सुड घेण्यासाठी. पण तिथे जुनेजाला निर्दोष समजणारी त्याची मुलगी आणि माधवची लहानपणापासुनची मैत्रीण सोनू त्याला आडवी येते आणि सांगते ...

"तुम्ही तो कहते थे ना माधव सच्चाई कभी छुप नही सकती, ना कभी हारती है! तो अब ये हथियार कहासे आ गया बीचमें! तुम्हे चाहीयें की तुम कानुन का सहारा लेकर साबीत करो की मेरे पापा खुनी है! तब मै मानुंगी........"

आणि तिथुन सुरू होते एक अघोषीत युद्ध ! कायदा आणि गुन्हेगारी यांच्यातले! प्रत्यक्ष कायद्याची सनद न घेताही माधव कायद्याचा पुर्ण अभ्यास करतो आणि कायद्याच्याच साह्याने कायद्यातल्या पळवाटा शोधत आपल्या कुटूबावर झालेल्या अत्याचाराचा सुड उगवतो. इथे त्याच्या कायद्याच्या शिक्षणाची कथाही मोठी मजेशीर आहे. सोनु कडुन पळाल्यावर विनातिकीट प्रवास करताना एकदा माधव पकडला जातो आणि जवळ पैसे नसल्याने अर्थातच सहा महिन्याची शिक्षा भोगायला जेलमध्ये दाखल होतो. तेथील सहृदय जेलरच्या मदतीने तो कायद्याचा अभ्यास पुर्ण करतो. त्यासाठी प्रत्येक वेळी काही तरी छोटा मोठाअ गुन्हा करून जेलमध्ये यायचे आणि आपला अभ्यास कंटिन्यु करायचा हा त्याचा उपक्रम बनतो........! पहिल्यांदा जेव्हा ट्रेनचा तिकीट कलेक्टर त्याला पकडतो तेव्हा तो त्याला त्याचे नाव विचारतो. त्यावेळी पर्यंत माधवमधला निरागस, निष्पाप माधव शास्त्री मरण पावलेला असतो, संपलेला असतो. तेव्हा नेमके ट्रेनच्या भिंतीवर असलेले गीतेमधले कृष्णार्जुनाचे गीतोपदेशाचे चित्र आणि नेहमी "पंडीत का बेटा" म्हणुन कुचेष्टा करणारा जुनेजा यांची आठवण राहावी, आपल्यातली सुडाची भावना कायम जागृत राहावी म्हणून माधव शास्त्री आपले नाव सांगतो......

"केशव पंडीत!"

आणि जन्माला येतो तो कानुन का बेटा !

वेदप्रकाश शर्मांनी केशव पंडीतवर एकुण तीन पुस्तके लिहीली बहुदा. ’केशव पंडीत’,’कानुन का बेटा’ आणि ’कोख का मोती’. पण या तिनही पुस्तकांनी त्यावेळी वेड लावले होते. वाचकानांच नव्हे तर अनेक समकालीन लेखकांना देखील केशव पंडीत या पात्राने वेड लावले. अगदी ओमप्रकाश शर्माने देखील नंतर आपल्या हिरोंमध्ये केशवचा समावेश केला. पण ओमप्रकाश शर्माचा केशव सर्रास हत्यारे वापरणारा होता. तर वेदप्रकाश शर्मांचा 'केशव पंडीत' आपल्या बुद्धीचाच हत्यारासारखा वापर करीत असे. त्यामुळे ओमप्रकाश शर्माचा केशव पंडीत कधीच भावला नाही. एका लेखकाने तर केशव पंडीत या नावानेच "केशव" कथा लिहील्या. नंतर एक पाच - सहा वर्षापुर्वी कुणीतरी अमीत खान म्हणुन एक लेखक आला होता त्यानेही केशव पंडीत साकारण्याचा प्रयत्न केला. पण वेदप्रकाश शर्माच्या 'केशवची' सर कुणालाच आली नाही. येणारही नाही. वेदप्रकाश शर्माच्या काही कादंबर्‍यावर चित्रपटही निघाले होते.... अक्षय कुमारचा "खिलाडी नं.१" (अक्षयकुमार, ममता कुलकर्णी, मोहनीश बहल, सदाशिव अमरापुरकर आणि गुलशन ग्रोव्हर अभिनीत) चित्रपटही वेदप्रकाश शर्माच्या "लल्लु" या कादंबरीवरच बेतलेला होता. त्यानंतर आलेला अक्षयकुमारचाच "इंटरनॆशनल खिलाडी" देखील वेदप्रकाश शर्माच्याच कादंबरीवर आधारीत होता. अर्थात या दोन्ही चित्रपटात मुळ कथानकाची पार विल्हेवाट लावण्यात आली होती ही बाब अलाहिदा.

असो. या सगळ्या आठवणी निघायचे कारण म्हणजे झी टीव्हीवर शनिवारी संध्याकाळी साडे आठ वाजता केशव पंडीत सिरियलच्या रुपात आपल्या भेटीला येतोय. कालच्या शनिवारी त्याचा पहिला भाग प्रदर्षित झालाय. बालाजी टेलिफ़िल्म्सची ’एकता कपुर’ केशव पंडीत घेवून येतेय. "सरवर आहुजा" नावाचा एक नवा देखणा कलाकार केशव पंडीतची भुमिका करतोय. तसे पहिल्या भागाने थोडीशी निराशाच केलीय माझीतर. कारण ज्या घटनेमुळे माधव शास्त्रीचे रुपांतर "केशव पंडीत" उर्फ "कानुन का बेटा" मध्ये होते ती मुळ घटनाच त्यांनी पहिल्याच भागात आटपून टाकलीय. त्यामुळे पुढच्या घटनाक्रमाचा इंपॅक्ट कसा असेल याबद्दल थोडी शंकाच वाटतेय. आणखी एक घोडचुक मालिकावाल्यांनी केलीय ती म्हणजे वेदप्रकाश शर्मांचा "केशव" नीली आंखोवाला दिमाग का जादुगर होता. हा केशव मात्र सर्व साधारण काळ्याभोर डोळ्यांचा पण देखणा नायक आहे. बघू...,आता दर शनिवारी रात्री साडे आठ वाजता "केशव पंडीत"ची भन्नाट सुडकथा पाहायला मिळेल. या सुडकथेचे वैशिष्ठ्य म्हणजे केशवने सोनुला दिलेले वचन की माझा सुड तर मी घेइन पण हातात एकदाही शस्त्र न घेता. महाभारतातल्या श्रीकृष्णाची आठवण करुन देणारे हे पात्र. आता मालिकेत या पात्राला कितपत न्याय देण्यात आलाय देव जाणे. मागे सुशिंच्या दुनियादारीसारख्या नितांतसुंदर कथानकाची मालीकावाल्यांनी लावलेली वाट पाहता या कथानकाचे काय होइल शंकाच वाटते. पण तरीही ज्यांनी वेदप्रकाश शर्माचा "कानुन का बेटा" वाचलय, केशव पंडीत अनुभवलंय त्यांना ही मालिका काही अंशी का होइना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून देइल हे निश्चीत! मालिका बनवणार्‍या निर्मात्याला हे शिवधनुष्य पेलवो अशी शुभेच्छा !

या संदर्भातली मुळ बातमी

जाता जाता एक प्रश्न.... चार दिवस सासुचे, या लाजिरवाण्या घरात अशा नीरस आणि कंटाळवाण्या मालिका बनवणार्‍या मराठी निर्मात्यांना आमच्या लाडक्या सुशिंच्या बॅरिस्टर अमर विश्वास किंवा मंदार पटवर्धनची आठवण केव्हा येणार?

विशाल कुलकर्णी.

गुलमोहर: 

विशाल.. बहोत खूब.. खूप जुन्या आठावणी आल्या..तू वर नमूद केलेल्या लेखकांच्या बहुतेक सर्व कथा मी वाचलेल्या आहेत. यात अ‍ॅडिशन रानू, कर्नल रंजित (मेजर बलवंत फेम),इब्निस सफी (विनोद और हमीद फेम्)..कुछ याद आया ??

यात अ‍ॅडिशन रानू, कर्नल रंजित (मेजर बलवंत फेम),इब्निस सफी (विनोद और हमीद फेम्)..कुछ याद आया ??>>>>

अरे यार, भुले हि कब थे? वो जमाना अभी तक आंखोमें है! BTW ते इब्निस सफी नाही इब्ने सफी (इब्न-ए-सफी) असे आहे. Happy रानू तर ऑल टाईम फेव्हरीट. धन्स ! कर्नल रंजितही खुप वाचलाय. मेजर बलवंत आणि त्याची टीम, खास करून त्याचा तो ट्रेनड डॉग (मला वाटतं क्रोकोडायल का असंच काहीसं नाव) मस्तच असायची ती पुस्तके.

विशाल, उत्तम लेख.

सुहास शिरवळकरांच्या पुस्तकांवर मालिका-चित्रपट बनतील तो सुदिन Happy

हां रे.. गल्ती से मिश्टेक हुई Happy
इब्ने सफी.. आणिक पणा कोण कोण होते .. शाळेत असताना कोणी 'जेम्स हेडली चेईज' असं धांसू हिन्दीत भाषांतर केलेलं पुस्तक दिलं होतं..ते वाचतांना आईनी पकडलं होतं आणी खूप रागावली होती
Proud

ते वाचतांना आईनी पकडलं होतं आणी खूप रागावली होती>>>>

आईनं फ़क्त मुखपृष्ठच पाहीलं असेल आणि मग दे दणादण... Proud सुरेंद्र मोहन पाठक हे देखील नाव खुप विख्यात होतं.

Happy वाचायला हवे एकदा वेदप्रकाश शर्माचे एखादे 'पाकेटबुक'. माझा एक मित्र बरीच वाचायचा, त्याने मला एकदा दिलेही होते वाचायला, पण राहून गेले. त्याच्या बोलण्यातही एकदम 'पाकेटबुक' टाईप उपमा असायच्या Happy

सिरीयलच्या बाबतीत मुळात एखाद्या पुस्तकावर सिरीयल बनवत आहेत हेच विशेष आहे. नाहीतर नेहमी असे वाटते की आधीचा एपिसोड झाल्यावर मग विचार करत असावेत पुढे काय लिहावे म्हणून.

केशव पंडीत मलाही जबरदस्त आवडले होते. या पुस्तकाने हिंदी पाकेट बुक च्या खपाचा विक्रम केला होता.

या पुस्तकाने हिंदी पाकेट बुक च्या खपाचा विक्रम केला होता.>>>>>

हो ना, हि ट्रिनीटी त्यावेळी खुप गाजली होती. हिंदी पॉकेट बुक्समध्ये ही बहुदा एकनेव घटना असावी की पुस्तकाच्या १० आवृत्त्या निघाल्या होत्या.

@वर्षु : अगदी Proud

सर्वांचे मनःपूर्वक आभार.

ह्म्म्म.....मी तर बुवा...फॅन आहे वेद प्रकाश चा....पण त्याचि अलिकडली काही पुस्तके वाचली की ती बात आता राहली नसल्याचे दिसुन येते....त्याचे शिखंडी तर हॉलीवूड मधील Minority Report या चित्रपटावरुन ढापलेले होते...

ही पाकेटबूक्स कधी वाचली नाहीत.. पण सोलापूर-कुर्डुवाडी गँगमधले बरेच जण वाचायचे.. बहुतेक जंक्शनच्या शहरात फेमस असतात ही पुस्तकं Happy मिरजेत तर स्टेशनच्या बाहेर एक खोकड्यात हरहस्यकथांची केवळ रहस्यकथांची लायब्ररी होती.. रोज सातारा/कराड/बेळगाव/कोल्हापूर वगैरे अपडाउन करणारी मंडळी तिथली मेंब्र असायची..

छान लिहीलेय. उत्सुकता वाढली.

पण आपल्या आवडत्या पुस्तकावरचा सिनेमा, नाटक किंवा मालिका शक्यतो बघू नये.. निराशा संभवते.

दुनियादारी हे सुशिंचे पुस्तक माझेही आवडते.. मालिका अगदीच प्रभावहीन वाटली.

iam_1june गेल्या काही वर्षांपासुन वेदप्रकाश शर्माने लिहीणे बंद केले आहे. सद्ध्या त्याच्या नावाखाली जी पुस्तके येतात ती सरळ सरळ बोगस आहेत असे समजुन वाचणे टाळत जा.

सर्वांचे मनःपूर्वक आभार!