गोष्टी तुझ्या

Submitted by क्रांति on 16 May, 2010 - 22:49

प्रेरणा
भरत मयेकर यांच्या वरील भावानुवादावर घडलेल्या चर्चेतून प्रेरणा घेऊन केलेला प्रयत्न. अर्थातच अनुवादात बर्‍याच मर्यादा आहेत, काही ठिकाणी तो भावानुवाद न होता केवळ शब्दशः अनुवाद झाला आहे, मूळ काव्यातल्या कल्पनांची चमक तितक्या ताकदीनं उतरवता आली नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. तरीही एक प्रामाणिक प्रयत्न केलाय. गझल तीच, "कभी कहा न किसीसे" छंद वेगळा [२४ मात्रा]

नाही कधीच कथिल्या गोष्टी तुझ्या कुणाला
कळली कशी न ठावे वार्ता उभ्या जगाला!

कित्येक पद्धतींनी घरट्यास बांधले मी,
बागेत वीज तरिही सोडे कधी न त्याला

तू मैफलीत परक्या जाणार नाहि, कळले
म्हणशील तर सजवितो या दीन कोटराला!

वर मागताच बहराचा, बाग अशी फुलली,
जागा जरा न उरली माझ्या इथे घराला

बागेत आज जा तू थोडा जपून व्याधा,
सोडून एकटे मी आलो तिथे घराला

जळती पतंग माझ्या कबरीवरी फुका हे,
लावू नका दिवा हो, विनवीत आपणाला!

फिरवून पाठ जाती, देऊन मूठमाती,
अवधीत क्षणांच्या होई काय हे जगाला?

होईल यात कधिही उल्लेख तुझा आता,
तू सांग, कहाणी ती संपेल या क्षणाला

बदनाम व्हायची ना भीती तुला जराही?
भर चांदण्यात सखिला समजावया निघाला!

गुलमोहर: 

जास्त अचूक अनुवाद क्रान्ति! आपलेही अभिनंदन!

मतला व बहुतेक सर्वच शेर स्वतंत्ररीत्याही उत्तम व चांगले (अनुक्रमे) आहेत.

खालील दोन शेरांचे अनुवाद!

चमन में जाना तो सय्याद देखकर जाना,
अकेला छोडके आया हूं आशियाने को

(सय्याद = पारधी, आपण व्याध हा जो समानार्थी शब्द वापरला आहेत तो उत्तम! आपण अनुवादात जपून जाण्याचा संदेश पारध्यालाच देत आहात. Happy मला नक्की माहीत नाही, पण पारध्यापासून जपून जा अशा प्रकारचा हा संदेश असावा. चुकीचे असल्यास क्षमस्व!) (कदाचित 'हे पारध्या, माझे घरटे एकाकी सोडून आलो आहे, ते जप किंवा हे पारध्या, माझे घरटे एकाकी सोडून आलो आहे ते नष्ट करशीलच तू तुझ्या सवयीप्रमाणे असेही असेल व तसे असल्यास आपला अनुवादच योग्य ठरेल)

मेरी लहड़ पे पतंगों का खून होता है,
हुजूर शम्मा न लाया करें जलाने को

लहड म्हणजे कबर! मराठीसाठी कदाचित 'चिता' वगैरे संदर्भ विचारात घेता येतील. (तसेच, माझ्या कबरीवर पतंगांचे रक्त असते व माझ्या दारात पतंगांचा जीव जातो यातील संदेश कदाचित भिन्न असावेत. माझ्या दारात पतंगांच जीव जातो म्हणजे पतंग माझ्या दारात आले की काही कारणाने मरतात. माझ्या कबरीवर पतंगांचे रक्त असते म्हणजे आयुष्यभर मी विरहात जगलो व त्यातच मेलो. माझ्या या अतीव प्रेमात व विरहात मरून जाण्याचा संकेत म्हणून पतंगाचे रक्त आले आहे.)

एक दोन ठिकाणी आपण निवडलेल्या वृत्तातही काही किरकोळ गफलती असाव्यात.

अर्थात, लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल माफी!

पण आपला अनुवाद करण्याचा व तोही अधिक अचूक, प्रयत्न खचितच सुखावून गेला. मला अनुवाद अजिबात जमत नाही. त्यामुळे आपण व भरत यांचे अनुवाद पाहिले की आश्चर्यच वाटते.

(एक आपली खुडबुड म्हणून मलाही आता या गझलेचा अनुवाद करावासा वाटत आहे.) (सुदैवाने जमलाच तर प्रतिसाद म्हणून येथेच देईन)

आपले पुन्हा अभिनंदन!

-'बेफिकीर'!

भरत मयेकर व क्रान्ती यांच्याकडून स्फुर्ती घेऊन मीही एक भाबडा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा जाणवले की अनुवाद महा कठीण काम आहे. कृपया गोड मानून घ्यावात.

कभी कहा न किसी से तेरे फंसाने को
न जाने कैसे ख़बर हो गई जमाने को

कधी कुणास कहाणी तुझी न मी वदली
तरी कशी कुणास ठाउक त्यांना कळली (त्यांना - जमानेको - येथे गडबड झालेली आहे)

चमन में बर्क़ नहीं छोडती किसी सूरत,
तरह तरह से बनाता हूं आशियाने को

कधीच वीज न बागेमधे क्षमा करते
कितीकदा घरटी बनवुनी पुन्हा जळली

सुना है गैरों की महफिल में तुम न जाओगे,
कहो तो आज सजा लूं ग़रीबखाने को

बघ म्हणलीसच तर झोपडे सजवतो मी (सजवतो मी - मधे 'तो मी' हे 'ललगा' ऐवजी 'गागा' असे घेतले)
न मैफिलीत दुज्या आज तू.. खबर कळली (गैर ऐवजी दुज्या व 'जाणार' ऐवजी काहीच नाही असे करावे लागले)

दुआ बहार की मांगी तो इतने फूल खिले,
कहीं जगह न रही मेरे आशियाने को

"हवा वसंत" म्हणालो, फुले अशी फुलली
अता घरास न जागाच माझिया उरली

चमन में जाना तो सय्याद देखकर जाना,
अकेला छोडके आया हूं आशियाने को

जरा जपून, शिकारी असेल उद्यानी
अलोय ठेवुनी घरटी मि एकटी अपुली (तीन दोष - आलोयचे अलोय, मी चे मि अन घरटे चे घरटी, तसेच, अलामतभंग) (हा अनुवाद बरोबर आहे की क्रान्ती यांनी केलेला हे मला माहीत नाही.)

मेरी लहड़ पे पतंगों का खून होता है,
हुजूर शम्मा न लाया करें जलाने को

पतंग-रक्तमयी अस्थिकलश हा अमुचा (अस्थिकलश व लहड यात प्रचंड फरक व अस्थिकलश बराच अयोग्य शब्द)
नकाच ज्योत इथे लावत जाऊ असली (असली हा शब्द अनावश्यक व हुजूर या शब्दाचा अनुवाद झाला नाही

दबा के कब्र में सब चल दिए, दुआ न सलाम,
जरासी देर में क्या हो गया ज़माने को?

असे जगास जराशात काय झाले हे ('झाले हे' हे 'गाललगा' ऐवजी)
चितेस पेटवुनी माणसे परत फिरली (दुवा न सलाम चा अनुवाद झाला नाही)

अब आगे इसमें तुम्हारा भी नाम आएगा,
जो हुक्म हो तो यहीं छोड दूं फंसाने को!

पुढे तुझेच अता नाव या कथेत असे
हुकूम दे, म्हणतो 'गोष्ट संपली अपुली' (अलामत भंग)

क़मर, जरा भी नहीं तुझको खौफ़-ए-रुसवाई,
चले हो चांदनी शब में उन्हें मनाने को!

'कमर' मुळीच तुला भय न 'व्हायचे बदनाम' (उर्दूत शेवटचे लघू अक्षर अधिक घेणे चालते. जसे बदनाम मधील 'म')

शेवटच्या ओळीचा अनुवाद करण्याइतका वेळही नव्हता अन काही सुचतही नव्हते. क्षमस्व!

-'बेफिकीर'!

मी केलेल्या अनुवादापेक्षा क्रांती यांचा अनुवाद मला अर्थाच्या दृष्टीने खूप जास्त आवडला.जास्त मात्रा वापरण्याची कल्पना छान

धन्यवाद बेफिकिर आणि भरत.
लहड़चा अर्थ तर ठाउक होता, पण मराठीत ती संकल्पना आणताना जरा कठीण वाटलं, म्हणून थोडासा बदल केला! अर्थात त्यामुळे मूळ संकल्पनेचा अर्थ तितक्या परिणामकारकपणे अनुवादात आला नाही, पाहू पुन्हा प्रयत्न करून! Happy

लहड़ जमवण्याचा प्रयत्न केलाय, कदाचित जमला असेल! Happy आणि सय्यादच्या शेराचा अर्थ असा घेतला आहे, हे शिकार्‍या, तुझ्या शिकारीच्या नादात माझ्या एकाकी घरट्याचा विध्वंस करशील, तेव्हा जरा जपून!

दोन्ही अनुवाद व त्या निमित्ताने झालेली चर्चा - आपल्या दोघांचे आभार !