स्मितफुलांची ओंजळ अन मौनातली आसवे..

Submitted by suryakiran on 13 May, 2010 - 02:02

पहाट चांदणं , गार वारा अन निरव शांतता, अन हाती जुन्या आठवणींची पाने चाळत सहज बसलो होतो. कोणीचं नव्हतं आजूबाजूला तरी त्या डायरीतले शब्द मनाभोवती, माझ्याभोवती अगदी गर्दी जमवून कल्लोळ करतं होते. असं काय होत तरी काय त्या डायरीत हेच विचारायचे असेल ना तूला? काही नाही गं तुझ्या पहिल्या नजर भेटीपासून ते तुझ्या मिठीतल्या एक एक क्षणांची जिंवत चित्रे मी माझ्या शब्दांनी रेखाटली आहेत तीच चित्रे आता काहीशी मॄत होत चालली आहेत ना म्हणूनचं काहूराची ही गिधाडे माझ्याभोवती जमली असावीत. तुला आठवतयं आपली ती पहिलीच नजरभेट, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी बस स्टॉपवर तू उभी राहिलेलीस, शहरात नविन म्हणून थोडीशी गोंधळलेली, बावरलेली ! अन मी तुझ्या त्या घाबरलेल्या मृगनयनांच्या नजरेला कुतूहलाने पाहत होतो. त्यावेळेसचा तुझा अबोला मला बरचं काही सांगत होता. अनोळखी , परक्या व्यक्तीला विचारायचं तुझ धाडस होतं नव्ह्तं अन तुझ्या त्या अबोल्यातल्या प्रतिबिंबाला विस्कटण्याला माझं मनं तयार होत नव्ह्तं. किती तरी वेळ तु तशीच उभी, तेवढ्यात तुझ्या अबोल्यात एक स्मिताची लकेर उमटली, पापण्या आनंदाने नाचू लागल्या कारण तुला जिथे जायचं होतं तिकडे घेवून जाणारी बस तुझ्यासमोर उभी होती.तू लगेच बसलीस त्या बस मधे अन खिडकीजवळून तू जे मागे वळून माझ्याकडे जे पाहिलसं ना ती नजर अजूनही माझ्या डोळ्यात हजार चांदण्याचा लख्ख सोहळा दाखवून जाते. तू निघून घेलीस , पण मी माझी शुद्ध हरपून तुझ्यासोबत तुझ्या अबोल्यात घालवलेल्या क्षणांना कुरवाळत माझे काही क्षण सोनेरी करून घेतले. मग हा नजरभेटीचा छुपा खेळ अन अबोल्यातले संवाद कित्येक दिवस चालले तुझ्या लक्षात आहे का गं, नसेल कदाचित पण माझ्या लक्षात आहे अजून माझ्या डायरीने त्या क्षणांना जपून ठेवलयं अगदी तसंच्या तसं. तुझा अबोला सुट्ला, तो दिवस तुला आठवतो का गं, कॉलेजवरून घरी जाताना झालेला उशीर, स्टॉपवरची ती गर्दी , अन वळवाळी वादळी पावसाची चाहूल, तुला तर काहीच सुचत नव्ह्तं. तेव्हा मीच धाडस केलं अन तुला विचारलं होतं, कोणत्या बस ची वाट पाहताय? तु म्हणाली होतीस "माझी बस तर निघून गेलीये, पण आता त्या मार्गाची दुसरी बस कोणतीये हे सुद्धा ठाऊक नाहीये मला :अओ:, मला थोडसं हसू आलं पण तुझ्या केविलवाण्या चेहरा पाहून मी ते आवरतं घेतलं अन विचारलं " कुठे जायचयं तुम्हाला , मी परिहार चौकला उतरते". पण ती बस तर ७ वाजताच गेली. :अओ:. ठिक आहे तुम्ही औंध बसने सुद्धा जाऊ शकता किंवा चिंचवड, निगडी या बसने जाऊन तुम्ही ब्रेमेन चौकात उतरलात तर पहियार चौक अवघ्या ५ मि. अंतरावर आहे. अन तेवढ्यात चिंचवड-मनपा ची बस समोर उभी राहीली अन तू त्या बस मधे बसून निघालीस, पुन्हा मागे वळून पाहीलसं पण आभार मानन्यासाठी तुझ्याजवळची असणारी दिलखूलास हास्याची लकेर तू पुन्हा एकदा मला दाखवलीस, मन प्रसन्न झाले. अन त्या प्रसंगाने माझ्या मनावर इतका परिणाम केला की मला सुद्धा त्याच बसमधे बसून जायचे आहे हे सुद्धा मी विसरलो होतो.:फिदी:

त्यानंतर प्रत्येक दिवस हा आपल्या नव्या संवादाचा साक्षी बनू लागला, संवादातून ओळख, ओळखीतून मैत्री झाली. अन मैत्रीतून बरेच काही आपल्याला शिकायला मिळाले. पण आपण ऐकमेकांच्या प्रेमात पडलोय हे मला तेव्हा जाणवले जेव्हा तू सुट्टीसाठी घरी गेली होतीस अन कॉलेज सुरू होऊन कित्येक दिवस झाले तरी तू परतलीच नव्ह्तीस्.तुझ्याबद्दल खूप चौकशी केली, मैत्रिणिंना विचारले तरीही काहीच निरोप नाही. दिवसामागून दिवस जात होते. तरीही तुझ्याबद्दल काहीच कळत नव्हतं. वेडयासारखी हालत झाली होती माझी, सारे क्षण मग राहून राहून माझ्या डोळ्यासमोर येत होते. तुला काही झालं असेलं का, तु आजारी आहेस का ? काहीचं कळतं नव्ह्तं. मग ठरवलं की तुझ्या घरचा फोन नं किंवा पत्ता मिळवायचा, अन प्रेमासाठी वाट्टेल ते करून मी तो मिळवला. मैत्रिणिंला सांगून त्या नं वर फोनही लावला पण कळलं की घरी कोणीच नाहीये, काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले आहेत. निरोपाने थोडासा दिलासा मिळाला पण नंतर कळालं मला कि तो निरोप बेभरवश्याचा होता. Uhoh महिना उलटून गेला, लक्ष लागेना, अन डायरीतली पाने कोरीचं राहू लागली. आजही त्या कोर्‍या पानांना चाळताना माझं अस्तित्व विरून गेल्यासारखं वाटतं. तब्बल ४६ दिवसांनी तू परत कॉलेजात आलीस, तेव्हा मी तुला दुरूनचं पाहिलं सोबत तुझे बाबा होते म्हणून मी ही तुला अडवलं नाही. पण तुझ्यासारखं तुझ्या चेहर्‍याने, तुझ्या स्मिताने, अन तुझ्या त्या पापण्यांनी सुद्धा झूकून एक मौन पाळले होते हे मला जाणवलं. अन वेड्यापिस्या भावनेने मी त्या मौनाचे अर्थ लावू लागलो.

काही वेळातचं एक मैत्रिण धावत आली माझ्याजवळ अन म्हणाली अरे ती कॉलेज सोडून चालली आहे, इंग्लडला. मी तर सुन्नचं झालो हे ऐकून. कारण माझ्या स्वप्नांची, भावनेची, ताटातूट अन ती ही अश्या नाजूक वळणावरती जिथे मी माझ्या आयुष्याचे "माईलस्टोन" उभारणार होतो. तू बाहेर आलीस कॉलेज सोडण्याच्या सगळ्या फॉरमॅलिटीज पुर्ण करून मी तिथेच उभा होतो, जगात काय चाललय, काय घडतयं हे सारं विसरून तुझ्या मौनाचं कोड उलगडतं. तू समोर आलीस अन अलगद पापण्या मिटल्यास तेव्हा तुझ्या डोळयातून ओले दोन थेंब ओघळले अन मौनाचा गुंता आणखीच वाढत गेला. तूला मनापासून सांगू जर मला शक्य असतं ना तर तुझ्या त्या मौनात ओघळलेल्या थेंबानासुद्धा मी माझ्या डायरीत साठवलं असतं.

तू का निघून गेलीस? कशासाठी हे सारं घडलं ? इतकी निर्दयी का तू झालीस ? या प्रश्नांना माझ्या मनात कुठलीच हक्काची जागा नव्हती कारण हक्क गाजवायला फक्त मैत्रीचं पुरेशी होती का? आज तू कशी आहेस? काय करतेयस ? तूला येते का गं माझी आठवणं ? अजूनही तुझे ते अबोल्यातले स्मित असते का गं तुझ्या चेहर्‍यावर की अजूनही ते मौनाचे अश्रू ओघळतात तुझ्या गालावर ? या सार्‍या प्रश्नाची उत्तरे शोधत शोधत डायरीतल्या अश्याच कोर्‍या पानांवर हात फिरवत तुझ्या असण्याला , हसण्याला, अन आयुष्याला सुखं मिळावं ही इच्छा व्यक्त करतं मी आज तुझ्या मौनावरही प्रेम करतोय.

अरेच्चा पहाट कशी सरली कळालचं नाही, चांदण्याही साक्ष देवून गेल्या अबोल्यातल्या स्मितफुलांची अन मौनातल्या हळव्या आसवांच्या ओघळण्याची.

स्मरणे अशी स्मितफुलांची आठवून,
पहाट सारी आसवात ओघळून गेली
तुझ्या मौनातल्या छबीला दोष देता,
इथे प्राक्तनाची झोळी रिती होऊन गेली...

--- सूर्यकिरण...

गुलमोहर: 

प्रकाशजी आज, सहज माझे जूने लेखन अन त्यावरच्या प्रतिक्रिया वाचत बसलो होतो तेव्हा हा लेख वाचताना मी तुमचा प्रतिसाद पाहिला, अन लगेच तुमची विधिलिखीत सुद्धा वाचली. खरच अफलातून आहे तुमची रचना. मान गये उस्ताद.. Happy

काही ठिकाणी अनावश्यक अलंकारीक शब्द आहेत जे रसभंग करतायत. तसच सो कॉल्ड प्रेयसीने विशेष पुढाकार घेतल्याचा उल्लेख दिसत नाही तेव्हा हे सगळे एकतर्फी प्रकरण वाटतय.
शेवटचा पॅराग्राफ वाचून नेहमी पडणारा प्रश्न पडला की सगळ्या उदास प्रेमभंगी लोकांना आपली प्रेमिका आपली आठवण काढत असेल का याची चिंता का सतावते? तुम्हाला (म्हणजे नायकला) येते तिची आठवण ठीक आहे. ती तुमची आठवण काढत दु:खाचे कढ मनात (शिवाय गालांवर वगैरे) साचवत बसलेली असेल याचे स्वप्नरंजन कशाला?

देवी , धन्यवाद. तुमचा प्रतिसाद आवडला. लिखाणात आवश्यक त्या सुधारणा करेल. Happy

कदाचित असेलही किंवा नसेलही एकतर्फी प्रेम पण नायकाने त्याच्या आठवणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. Happy स्वप्नरंजनाचं म्हणाल तर, आठवणी ह्या सांगून येत नाहीत अन अश्या काही आठवणी आल्या कि त्यांना दुरावणं शक्य नसतं तेव्हाच असल्या गोष्टी सुचतात अन मग उगाच स्वप्नरंजनात जातो नायक... Happy