अवघे अर्धा शे वयमान

Submitted by एस अजित on 5 May, 2010 - 09:57

नमस्कार मित्रहो,

आपल्या प्रिय महाराष्ट्र राज्याचा ५० वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला. ५० वर्षात काय गमावले, काय कमावले यावर बरिच (निरर्थक) चर्चा झाली. विवीध राजकीय पक्षांनी आपापले सामर्थ्य दाखवून दिले. ठिकठिकाणच्या थोर थोर कार्यकर्त्यांनी हजारो रुपयांचे फटाके उडवून आपले राज्यावरील प्रेम सिद्ध केले. शनिवार, रविवार जोडुन सुट्टी आल्याने चाकरमान्यांना बहु आनंद झाला. महाराष्ट्र दिन सार्थकी लागला.

५१ व्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत मोटरमेन नी संप (२ आठवड्यांपुर्वी घोषित करुन) केला आणि मुंबई किती हतबल शहर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या गोंधळाचा आवाका एवढा प्रचंड होता की नुकताच साजरा झालेला वर्धापन दिन सर्वांच्या विस्मृतीत गेला. अर्थात वर्धापन दिन असल्याने सामान्यांच्या जीवनात काडीचाही फरक पडला नाही. या वर्धापन दिनाच्या आसपास दोन परस्पर विरोधी घटना घडल्या.

विदर्भ महाराष्ट्रापासुन वेगळा करावा यासाठी निदर्शने झाली, काळी निशाणे दाखविण्यात आली.
बेळगांवच्या एका संघटनेने 'आम्हाला महाराष्ट्रात सामील करा' या मागणीसाठी मुंबईत असलेल्या हुतात्मा चौकात निदर्शने केली.

राज्यकर्त्यांच्या कृपेने कोणतीच मागणी पुर्ण होण्याची अजिबात शक्यता नाही, पण एका राज्यासाठी याहून लाजिरवाणी परिस्थिती कुठलीच असु शकत नाही. राज्यकर्त्यांसाठी अथवा राज्यातील लोकांसाठी विदर्भ खरचं अस्पृश्य आहे. महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबई-पुणे-नासिक हा सोनेरी त्रिकोण आणि पर्यटनासाठी कोकणं हीच व्याख्या झाली आहे.

विदर्भातील शेतकर्‍याची परिस्थिती देशजाहीर आहे, कदाचित जगजाहीर. १०००-१२०० रुपयांसाठी आपला जीव संपविणार्‍या अनेक शेतकर्‍यांच्या करुण कथा सगळ्यांना माहीत आहेत. गडचिरोली आणि चंद्रपुर या जिल्ह्यांशी आपला दैनंदिन जीवनात कितीसा संबंध येतो ? दोन्ही जिल्ह्यांची ओळख आपल्याला फक्त नक्षलग्रस्त भाग अशीच आहे.

बेळगांवच्या मराठी संघटनेला या सगळ्या गोष्टी माहीत नसतील का? हे सगळे माहीत असून देखिल तिथल्या मराठी जनतेला आपल्या महाराष्ट्रात सामील व्हायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील वैदर्भिय जनतेपेक्षा बेळगांवच्या मराठी लोकांची परिस्थिती बिकट आहे असे मानावे लागेल. कर्नाटक सरकारने बेळगांवातील मराठी लोकांवर जी दडपशाही केली होती, ती जगजाहीरच आहे.

मागिल ८ दिवसात महाराष्ट्र निर्मितीचा इतिहास तुटक तुटक स्वरुपात म.टा. आणि लोकसत्ता च्या विवीध लेखांमध्ये वाचायला मिळाला. (तसा तो दरवर्षी तुटकाच असतो.) भाषावार प्रांत रचना करतांना घटनाकारांनी एक महत्त्वाचे विधान केले होते -

एका भाषेची दोन राज्ये असतील तर हरकत नाही (याच मुद्यावरुन स्वतंत्र तेलगंणाची मागणी ग्राह्य मानली जाते) पण एकाच राज्याच्या व्यवहारात दोन भाषा असु नये.(याच मुद्यावरुन तेव्हाच्या बॉम्बे राज्याची विभागणी होऊन गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन स्वतंत्र राज्ये १ मे - १९६० रोजी निर्माण झाली.)

मराठी माणुस एकतर प्रचंड स्वाभिमानी, पराक्रमी तरी असेल किंवा पराकोटीचा लाचार तरी असेल हे राज्य निर्मितीच्या वेळी पुन्हा एकदा सिद्ध झाले. सरकारी माहीतीनुसार १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले त्याच वेळी एका मराठीच नेत्याने 'महाराष्ट्र राज्य व पंडित नेहेरु यांच्यात निवड करायची झालीच तर मी पंडितजींना निवडेन' असे विधान केले होते.

राज्य निर्मितीनंतर सगळ्याच क्षेत्रांत आघाडीवर असलेले आपले राज्य ५० वर्षांत बरेच मागे फेकले गेले आहे. बघुया पुढच्या ५० वर्षांत आपण कुठे जातो ते.

गुलमोहर: 

१ विदर्भ महाराष्ट्रापासुन वेगळा करावा यासाठी निदर्शने झाली, काळी निशाणे दाखविण्यात आली.
२ बेळगांवच्या एका संघटनेने 'आम्हाला महाराष्ट्रात सामील करा' या मागणीसाठी मुंबईत असलेल्या हुतात्मा चौकात निदर्शने केली.

india is contry where there is unity in diversity.. असे काहीतरी शाळेत असताना वाचले होते ते आठवले... Happy