रंगीत चित्रांचे सिक्रेट

Submitted by अरुण मनोहर on 2 May, 2010 - 21:38

टेबलाच्या जेमतेम वर पोहचणारे तोंड कपाला लावण्याचा प्रयत्न गुड्डु मघापासून करत होता. त्याच्या ओठांच्या धक्क्याने तो कप थोडा दूर ढकलला गेला. जरा आणखी ढकलले तर कप नक्की कलता होऊन दूध सांडणार. आई थोड्या वेळापुर्वीच गरम दूध कपात ओतून बाथरुममधे गेली होती. जातांना तिने दूध थंड झाले की संपव आणि मग दफ़्तर घेऊन सोफ़्यावर बसून रहा अशी ताकीद दिली होती. सकाळी मऊमुलायम झोपेतून उठवल्यापासून शाळेत नेऊन सोडीपर्यंत आपल्या एकनएक हालचाली आईने ठरवल्याप्रमाणेच झाल्या पाहीजे. जरा ईकडे तिकडे वेगळे करायला, हुंदडायला मोकळीक नसते. दुध थंड झाले का पहायला गुड्डुने चिमुकली बोटे कशिबशी कपात बुडवली. चटका बसताच बोटे बाहेर ओढतांना कपही समोर ओढल्या जाऊन आतले दूध गुड्डुच्या मांडीवर सांडले.

“आय आय आय आय” गुड्डुने सूर धरला. शॉवरच्या आवाजात देखील आईला ते ऐकू गेले. “अहो काय झाले बघा बरं” ती तिथूनच ओरडली. बाबा टायच्या गाठीबरोबर खेळत आरशासमोर उभे होते. बाबांना कितीही वेळ टायशी खेळत बसणे अलौड असते. अगदी गुड्डु प्राणपणाने किंचाळत असला तरीही. ते येणार नाही हे माहीत असल्याने आईच घाईघाईने टॉवेल गुंडाळून बाहेर आली. बाबांवर आग पाखडतांना तिने गुड्डुला उचलून घेतले. तिच्या अंगाला साबणाचा खुप छान सुवास येत होता.

“सांडले ना दूध शेवटी? सांगितल होत ना तुला थोडं थंड झाल्याशिवाय पिऊ नको म्हणून” गुड्डुच्या मांडीवरून हात फ़िरवीत ती म्हणाली. दुध तसे जास्त गरम नव्हतेच मुळी. ते गरम असेल ह्या भितीनेच तो ओरडला होता. “अहो बघत काय बसलात, बर्नॉल आणा आधी.”
“अग कुठे ठेवले आहेस तू?”
बाबा अगदिच विसरभोळे आहेत. त्यांच्या काहीच लक्षात रहात नाही. काल त्यांनीच तर आरशाच्या ड्रॉवरमधे ठेवली होती ती ट्युब. शेवटी नेहमीसारखी आईलाच ती ट्युब शोधून काढावी लागली. गुड्डुनेही ती कुठे आहे हे तिला सांगितलेच नाही. साबणाच्या मंद सुवासात तिच्या कडेवर बसून रहायला गुड्डुला खूप आवडते.

गुड्डुच्या मांडीवर लाल डाग बिग न दिसल्याने बाबा म्हणाले. “अग काही चटकाबिटका बसलेला दिसत नाहीय.” आई नेहमी म्हणते- बाबा नेमके जे बोलायला नको तेच बोलत असतात. पण आईने तरीही बर्नॉल चोळलेच. बर्नॉलचा वास किती घाणेरडा असतो. त्यानंतर आईने गुड्डुला दुसरे कपडे घालून दिले. हे सगळे करण्यात तिचा अर्धा तास वाया गेला. “अहो आता ह्याला डे स्कूल मधे सोडायला गेले तर मला उशीर होईल. आज तुम्ही ह्याला सोडून द्या ना” तिने बाबांना सांगितले. गुड्डुचा चेहरा जरा चिंतामग्न झाला. बाबांबरोबर शाळेत जायला त्याला मुळीच आवडायचे नाही. ते गाडीत बसवून न्यायचे म्हणूनच आवडायचे नाही. बेल्ट आवळून नुसते बसून रहा. खिडक्या बंद. बाबा चालवतांना काही बोलणार नाही. गाडीत त्यांना आवडते तेच डोके विटवणारे गाणे लावणार. गुड्डुने ईकडे तिकडे हात लावला तर ओरडणार. दहा मिनटात शाळेत आणून सोडणार. रोज आईबरोबर शाळेत जाणे म्हणजे केवढी मज्जा असते.

पण आईने सांगितलेले काही मुकाट्याने ऐकतील तर ते बाबा कसले? त्यांनी आईला सरळ उडवून लावले. “मला नाही जमणार. तुला वाटते शाळा काय ईथेच ढुंगणाशी आहे. सकाळच्या वेळी वाकडा रस्ता घेऊन तिकडे गाडी न्यायची म्हणजे ट्रॅफ़ीक जॅममधे माझा अर्धा तास जास्त जाईल. त्यापेक्षा नेहमीसारखी तुच घेऊन जा.” मग नेहमीसारखीच त्या दोघांची जुंपली. डोळे टिव्हीकडे आणि कान त्यांच्या भांडणाकडे लावून गुड्डु आरामात बसला होता. शेवटी “गरम दुध त्याच्यासमोर ठेऊन आंघोळीला जायला तुला मी सांगितले होते का” असे निर्वाणीचे वाक्य बोलून बाबा धाडकन दार आपटून निघून गेले. हे दार आपटून निघून जाण्याचे पुढच्या वेळेस करून बघायला हवे. रडून रडून घसा सुकून जातो त्यापेक्षा बरे!

आईनेच मग भराभरा तिच्या पर्समधे कायकाय वस्तु कोंबल्या. अशीच घाईघाईत मागच्या वेळेस मोबाईल विसरून गेली होती. मग त्याचाही राग तिने आल्यावर बाबांवर काढला होता. बाबांनी तिला जुमानले नाही की मग गुड्डुला ओरडायची. म्हणून गुड्डुने आधीच पाहून ठेवले होते की मोबाईल तिने पर्समधे टाकला होता. तिच्या पर्स भरण्याकडे लक्ष ठेवतांना गुड्डु स्वत:च्या दफ़्तराकडे कसला बघतोय! तेव्हा ती ओरडलीच. “अरे शुंभासारखा काय बघत बसला? दफ़्तरात सगळे भरले का?” आईने असे ओरडताच त्याने झीप उघडून आईला सगळे दाखवले. चित्रांचे पुस्तक, कलर पेन्सील, नॅपकीन, खाऊचा डबा. सगळे जागेवर होते. ते दाखवतांना त्याने शिताफ़िने बाबांचे एक बायांची रंगीत चित्रे असलेले मासिक आत खोल दाबून ठेवले. काल रात्रीच त्याने बाबांच्या नकळत ब्रीफ़ केस मधून काढून दफ़्तरात ठेवले होते. आई आज घाईत असल्याने तिने दफ़्तर स्वत: चेक केले नाही म्हणून बरे.

आईच्या खांद्यावर लटकती पर्स होती. गुड्डुचे दफ़्तर तिने त्याच्या पाठीवर चढवून दिले. एका हाताने तिने गुड्डुचा हात धरला आणि त्याला ओढत ती दाराबाहेर आली. दरवाजा लॉक करून तिने गुड्डुला कडेवर घेतले आणि लिफ़्ट साठी वाट न पहाता दडदड जिने उतरून खाली आली. ब्लॉक बाहेर आल्यानंतर लगेच समोर मोठे मोकळे मैदान होते. संध्याकाळी बाबा कधी त्याला बास्केट बॉल खेळायला तिथे घेऊन यायचे. मैदानाच्या बाजुने गोल असणाऱ्या पायवाटेवरून चालत गेले की एक रस्ता यायचा. तिथून पुढे बस साठी थांबायचे. मग आई त्याला बस मधून शाळेपर्यंत पोहचवून देई. शाळेच्या दरवाजात उभ्या रहाणाऱ्या अंकलकडे त्याला देऊन मग ती दुसऱ्या बसने ऑफ़ीसला जायची. ह्या प्रवासात तिच्या सोबत वेळ घालवणे गुड्डूला खूप खूप आवडायचे. त्यामुळे रोज सकाळची तो अगदी वाट बघत असे. बरे झाले आज बाबांनी गाडीतून पोहचवायला नाही म्हटले ते.

ब्लॉक बाहेर आल्यावर आईने गुड्डुला कडेवरून खाली सोडले. त्याला तेच हवे होते. आता मैदानाच्या बाजुबाजुने आईच्या हातात हात देऊन रमतगमत जायचे. अशा वेळेस पाठीवरच्या दफ़्तराचे ओझे कळत पण नाही. सकाळी मैदानात खेळणारे कोणीच नसायचे. एरवी मोठ्या मुलांच्या टीम्स तिथे फ़ुटबॉल खेळत हुडदुंगा घालीत. गुड्डुला त्यावेळी मैदानात यायला मुळीच आवडयचे नाही. ती राक्षसासारखी उघडी मुले, धडाधडा बॉल लाथेने उडवायची. कधी धावत एखादा जण त्याच्या जवळून गेला की घामाचा घाणेरडा वास यायचा. शाळेला जातांना मात्र सकाळी मैदान मोकळे असायचे. मग त्यावर असंख्य साळुंक्या उतरायच्या. ईकडे तिकडे बघत बघत त्या पिवळ्या धम्म चोची गवतात खुपसून काहितरी शोधून खायच्या. साळुंकी गवतातले किडे खाते असे आईने त्याला सांगितले होते. “श्शी! ईतकी सुंदर साळुंकी. किडे का बर खाते ती आई?” “अरे त्यांचे तेच अन्न असते” आईने माहीती दिली. “पण का बरे?” “कारण त्यांच्या साठी दुकान नसते म्हणून” पण गुड्डुचे येवढ्यावर समाधान झाले नव्हते. ही मोठी माणसे अशीच काहीबाही उत्तरे देऊन आपल्याला बनवत असतात.

आज आधीच उशीर झाल्यामुळे गुड्डुला रमतगमत चालू द्यायला आई तयार नव्हती. तो ईकडेतिकडे पहात तिच्या बोटांना लटकत मागे मागे रहातो आहे असे लक्षात आल्यावर आई त्याल ओढू लागली. गुड्डुचा कोमेजलेला चेहरा पाहून तिला जरा किंव येऊन तिने गुड्डुला कडेवर घेतले. मग मात्र तो सगळा कंटाळा विसरला आणि उच्चासनावरून आजुबाजुची मजा बघु लागला.

गुड्डुला शाळेत सोडून आई तिच्या कामावर गेली. टीचरनी एक चित्र रंगवायला सगळ्यांना दिले. चित्रातल्या बाहुलीची रिबीन रंगवायला नेमकी हिरवी पेन्सील सापडत नव्हती. गुड्डुने अगदी दफ़्तरात खोलवर हात घालून शोधले. अगदि खाऊचा डब्बा देखील वहीवर उपडा करून झाला. शेवटी कावून जाऊन त्याने पूर्ण दफ़्तरच डेस्कवर ओतले. सगळ्या गोष्टी धडाधडा खाली पडल्या. टीचर ते पाहून जवळ आली आणि तिने बाबांचे रंगीत बायांची चित्रे असलेले मासिक उचलून हातात घेतले. टीचरचा रागीट चेहरा पाहून गुड्डुने ती काही बोलायच्या आतच रड्का चेहरा केला. “हे कोणी दिले बेटा तुला?” टीचरने अगदी प्रेमाने विचारले. नेहमी खरे बोलावे असे आई सांगायची ना!
“बाबांचे आहे” गुड्डुने अगदी खरे खरेच सांगितले.
“बाबांचे आहे तर तु दफ़्तरात का आणलेस?”
“.........” अडचणीत सापडले की बाबा असेच गप्प रहातात!
“बरे ते जाऊ दे. शहाणी मुले अशी दुसऱ्याची वस्तु घेत नाही! आपण हे तुझ्या बाबांना परत देऊ हं” रंगीत मासिक घेऊन टीचर तिच्या खुर्चीवर जाऊन बसली. त्यानंतर टीचरने मुलांना चित्र रंगवायला पूर्ण मोकळे सोडले. नेहमी प्रमाणे त्यांच्या मधेमधे जाऊन नाक खुपसण्या ऐवजी ती तिच्या खुर्चीवर बाबांचे मासिक वाचत बसली. गुड्डुला वाटले बाबांचे मासिक आता हीच घेऊन जाणार. शाळा सुटण्याअगोदर तिने गुड्डुला सांगितले, आज तुझे बाबा तुला घ्यायला येणार आहेत. गुड्डुचा चेहरा एकदम घाबरला. “टीचर, मी ते मासिक चुकून दफ़्तरात टाकले असे सांगा तुम्ही बाबांना.” टीचर नुसतीच हसली.

“ओहो माय स्मार्ट बॉय गुड्डु!” आल्यावर लगेच बाबांनी गुड्डुला उचलूनच घेतले. चला म्हणजे धोका बहुदा नसावा. “बाबा मी दफ़्तर घेऊन येतो.” दफ़्तर आणायला तो वळला तेव्हा टीचरने बाबांच्या हातात मासिक देऊन त्यांना काहीतरी सांगितल्याचे त्याने पाहिले. बहुदा गाडीत बसल्यानंतर ओरडा खावा लागणार. पण बाबांनी कही विशेष मनावर घेतले नसावे. त्यांनी सहजच विचारले- “गुड्डु तू बाबांचे मासिक घेतले होते असं टीचर म्हणाली” “आय ऍम सॉरी बाबा. चुकून आणलं”
“ते जाऊदे. तू पाहीलंस का ते?”
“नाही बाबा. मी दफ़्तर उलट केले तर टीचरनेच ते घेतले आणि मग ती वाचत बसली होती.”
“असं का? गुड्डु अरे बेटा ते मोठ्या माणसांचे मासिक आहे. आपण मोठ्यांच्या वस्तु घ्यायच्या नाही. कळलं ना?”
“ओके बाबा. सॉरी आता नाही घेणार.”
“गुड बॉय. आपण आता हे आईला काही सांगायचे नाही हं. उगाच ती तुला न मला रागावत बसेल. प्रॉमिस?”
“गॉड प्रॉमिस” गुड्डुने अंगठा चोखून त्यांच्या अंगठ्याला भिडवला.
बाबांनी रंगीत मासिक ब्रीफ़ केस मधे टाकून ती बंद केली आणि कुलपाचे नंबर्स अंगठ्याने फ़िरवून टाकले.

आज गाडीतून घरी जातांना गुड्डु खुषीत होता. दोन मोठ्या माणसांमधे असतात तशी सिक्रेट त्याच्यात आणि बाबांमधे होती. बाबांची ब्रीफ़केस उघडी असतांना त्याने कुलपाचे नंबर्स पाहिले होते ते आकडे त्याच्या डोळ्यासमोर येत होते.

*****************************

*****************************

गुलमोहर: