म मराठीचा ,आपल्या मायबोलीचा

Submitted by maitrey1964 on 1 May, 2010 - 11:35

छत्रपति शिवाजी महाराज यांची १९ फ़ेब्रुवारीची जन्मतारखे नुसारची जयंती तर दुसरी ३ मार्चची तिथीनुसार साजरी केलेली जयंती अश्या साजर्‍या केलेल्या दोन शिवजयंत्या, १६ मार्चचा गुढीपाडवा-नविन मराठी वर्ष , २७ फ़ेब्रुवारीचा मराठी भाषा दिन, दुबईत झालेल मराठी विश्व साहित्य संमेलन आणि नुकतच पुणे येथे झालेल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे वेगवेगळे दिवस आपण एका पाठोपाठ उत्साहाने साजरे केले आहेत. लवकरच १ मेला येणारा महाराष्ट्र राज्याचा ५० वा वर्धापन दिन सुध्दा आपण असाच उत्साहाने साजरा करणार आहोत. असे एकंदरीत उत्सवी वातावरण असताना मराठी माणसांची मने कश्याने तरी धास्तावलेली आणि त्याहुन जास्त म्हणजे दुखावलेली आहेत अस चित्र दिसत आहे.
मराठी मनामनांमध्ये सध्या इत्र तित्र सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे मराठी संस्क्रुतीच आणि भाषेच भवितव्य काय ?. त्या मुळे मराठीच्या प्रश्नावर राजकारणी व सर्वसामान्य मराठी माणसे एकतर वाद घालताना किंवा हमरातुमरीवर येताना दिसत आहेत.तेव्हा अचानक मराठी भाषे बद्दल हळव होण्यासारख काय घडल असाव याचा शोध तथाकथित विचारवंतानी गांभिर्यपुर्वक घ्यायला होता नाही का?. पण ते तर मराठी माणसांना संकुचितपणाचं लेबल लावून एकत्रीतपणे तुटून पडताना दिसत आहेत. याचा परिणाम म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसांना ते अजुनच दुखावत आहेत.विचारवंत असले तरी ते पण या मराठी समाजाचा एक भाग आहेत हे ते विसरलेले दिसत आहेत. लेखक, कवि,कलावंत आदी मंडळी जी मराठी भाषेच्या जिवावर प्रसिद्धी व पैसा मिळवत आहेत ती तर आपला याच्याशी जणू काही सबंध नाही अश्या प्रकारे मुग गिळून बसली आहेत.
राजकारणी मंडळींच सोडुन द्या पण सर्वसामान्य मराठी माणूस त्याचा कसलाही फ़ायदा नसताना मराठीच्या प्रश्नावर आज इतका हळवा आणि संतप्त का झाला आहे याच विचारवंत,लेखक, कवि,कलावंत आदींना काहीच पडलेल दिसत नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. स्व:ताला संवेदनशील म्हणवणारी ही मंडळी समाजातल्या सर्वसामान्य मराठी माणसां पासून मनाने व विचाराने फ़ारच दुर गेलेली आहेत.
मध्यंतरी काही मराठी कलावंतानी त्यांचा एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये ते मराठी असल्याने अपमान झाला अशी ओरड केली हॊती. त्यावेळी त्या हॉटेलवर मोर्चा काढून राजकारणी आणि त्या कलावंतानी प्रसिद्धी मिळवली खरी पण त्यातून मुळ प्रश्न सुटला का?. त्या नंतर त्या हॉटेल मध्ये कांदेपोहे, मिसळपाव आणि मराठी बर्गर ( वडापाव ) असे मराठमोळे पदार्थ मिळू लागले आहेत का? त्या हॉटेल मध्ये मराठीत मेन्यु कार्ड ठेवल गेल का? तिथे किती मराठी माणसांना रोजगार मिळालेला आहे ? याचा कोणी विचार केला का?. तुम्ही म्हणाल याचा त्या मराठी कलावंताच्या झालेल्या अपमानाशी कसा काय सबंध येतो.पण जरा शांतपणे विचार केलात तर या सर्वाचा एकमेकांशी असलेला सबंध आहे हे तुमच्याही लक्षात येइल. कारण त्या मराठी कलावंतांचा हॉटेल मध्ये अपमान झालाच असेलच तर तो ते मराठी असल्याने म्हणून नव्हे तर मराठी संस्क्रुती म्हणजे काय आहे याची जाणीवच मराठी माणसांच्या राजधानीत व्यवसाय करणार्‍या त्या हॉटेलला मुळात नव्हती म्हणून.
त्या मुळे मराठी माणसाला मराठी भाषीक म्हणून महाराष्ट्रात तसच देशात व जगात सन्मानाने व स्वाभिमानाने जगायच असेल तर त्याच्या आचारातून आणि विचारातून मराठी संस्क्रूती सर्वांना जाणवली पाहीजे. त्या साठी मराठी माणसांनी एकमेकांशी बोलताना तरी कटाक्षाने मराठीतूनच बोलल पाहीजे. किमान महाराष्ट्रातल्या सार्वजनीक ठिकाणी उदा. रेल्वेस्टेशन, चित्रपटगृह, हॉटेल (मग ते पंचतारांकीत असले तरी) येथे मराठीतूनच बोलल पाहीजे. ईथे महाराष्ट्रात व्यवसाय अथवा नोकरी करु इच्छीणार्‍या इतर भाषीक व्यक्तींच्या कानावर सतत मराठी कसे पडेल याची काळजी आपण मराठी माणसांनी नाही घ्यायची तर कोणी घ्यायची.
या सर्व पार्श्वभुमीवर आपण शांतपणे आजुबाजुला नजर टाकली की लक्षात येईल, भाषेच्या व संस्क्रूतीच्या बाबतीत इतर भाषीक समुह जेवढे जागृक व आग्रही आहेत तसे आपण नाही. आपल्या मराठी भाषेला व संस्क्रुतीला मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा व सहिष्णू संतपरंपरेचा वारसा असतानाही आपल्याला आपल्या भाषेचा व संस्क्रुतीचा उदघोष करायला न्युनगंड का बरं वाटतो?.
आपल्याला असही वाटत की इंग्रजी आल की जगात आपल काही आडणार नाही. माझा एक मित्र असाच विश्वास मनात ठेवुन फ़्रान्सला गेला. त्याने पॅरीस आंतरराष्टीय विमानतळावर सर्वच पाट्या फ़्रेंच मध्ये असल्याच पाहील. त्याने विचार केला आपल्याला इंग्रजी येतय ना मग पाट्या फ़्रेंच मध्ये असेल तर काय अडेल. त्याने तिथल्या आजु बाजुच्या कर्मचार्‍यांशी व लोकांशी इंग्रजी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. फ़्रेंच आणि ब्रिटन यांच पारंपारीक वैर असल्याने फ़्रेंच माणूस त्याला इंग्रजी समजत असल तरी इंग्रजीमध्ये बोलण्यास नाखुश असतो असा त्या मित्राचा अनुभव आहे. तो तर असेही गमतीने म्हणतो की फ़्रेंच माणूस एकवेळ हिंदीत बोलेल पण इंग्रजीत..................................
दुसरा अनुभव तर माझाच आहे. एकदा ऑफ़ीसच्या कामासाठी मद्रासला.. सॉरी चेन्नईला गेलो होतो. रात्री करमणूक म्हणुन हॉटेल पासून काहीश्या अंतरावर असलेल्या थेटरमध्ये हिंदी पिच्यर पाहायला गेलो. सकाळ पासून भेटलेले सर्वच जण हिंदी समजत नसलेले होते. मग तो हॉटेल मधला रुमबॉय असॊ की रिक्क्षावाला.त्यामुळे हिंदी पिच्यर पाहायला फ़ारशी गर्दी नसेल अशी आमची समजूत.पण पाहातो तर काय पिच्यर पाहायला ही तुडुंब गर्दी.बहुतेक जण संर्पुंण कुटंबासह आले होते.त्यामुळे बाल्कनीच तिकीट मिळाल नाही. तेव्हा अप्पर स्टॉलच तिकीट काढल. आमच्या आजुबाजुच पब्लीक हे कष्टकरी वर्गातल असल्याच दिसत होत. मनात आल , या लोकांना हिंदी समजत नाही मग पिच्यर पाहायला का बर आले आहेत? थोड्याच वेळात पिच्यर सुरु झाला. पाहातो तर काय आजुबाजुच्या लोकांना त्या पिच्यरचे जवळ्पास सर्व संवाद पाठ. संर्पुण पिच्यर त्या लोकांच्या तोंडचे संवाद ऎकतच आम्ही पाहीला.पिच्यर संपला. इतक्या लोकांना हिंदी छान कळतय व बोलता येतय हे पाहुन आम्हाला बर वाटल. विचार केला हॉटेल जवळच आहे.तर विचारत विचारत चालतच जाउ. म्हणुन त्यातला एकाला हॉटेलला कस जायच ते हिंदीत विचारल.तर त्याने काहीतरी अगम्य भाषा कानावर पडल्या सारखा चेहरा केला. अजून दोघा तिघांना विचारल तर तेच. शेवटी हॉटेलला चालत जायचा विचार सोडून दिला. रिक्क्षा केली. रिक्क्षावाल्याला समजेल अश्या तोडक्या मोडक्या इंग्लीश मध्ये पत्ता सांगून हॉटेलला पोहोचलो.
या वरुन कळून येत की, फ़्रेंच भाषिक असो की तामीळ भाषिक असो, ते आपल्या भाषेच्या बाबतीत सतत जागृक व आग्रही असतात. जगातल्या बहुतेक सर्व भाषिक समुहांच्या बाबतीत हेच आढळून येईल. गुजराथी व मारवाडी हे तर अमेरिकेच्या अध्यक्षां बरोबर सुध्दा त्यांच्या मातृभाषेत बोलायला कमी करणार नाहीत अशी मला खात्री आहे. हे भाषिक समुह आपल्या भाषेच्या बाबतीत सतत जागृक व आग्रही असतात याचं मला तरी कौतुकच वाटत. त्यांना माहित आहे की स्व:ताची संस्क्रुती टिकवायची असेल तर स्वभाषा जपलीच पाहिजे. तर मग आपल्यालाच मराठी भाषेचा आग्रह धरायला न्युनगंड का बरं वाटतो?
आपण सर्व जण हॉटेलमध्ये जात असतो.हॉटेलच्या मेन्यु मध्ये जैन पद्धतीने पदार्थ बनवून मिळतील अस आवर्जुन नमुद केलेल असत. गुजराथी, मारवाडी लोकांसाठी विमान कंपन्या शाकाहारी पदार्थ ठेवतात. अहमदाबाद येथुन विमानाने परत येताना विमानात मासांहारी पदार्थांचा पर्याय उपलब्ध नव्हता असा माझा अनुभव आहे.हे सगळ होत कारण ही सर्व माणस त्यांच्या खाद्यसंस्कॄतिच्या बाबतीत आग्रही आहेत म्हणूनच ना?. हॉटेलमध्ये ते पैसे देतात तर आपण काय चिंचोके देतो का?. मराठी पदार्थ हॉटेलमध्ये किंवा विमानात मिळत नाहीत याच कारण ते पोषण मुल्यात कमी आहेत हे नसुन त्यांची मागणी कोणी करतच नाही हेच आहे.
सरकारी पातळीवर देखील मराठी भाषेची किती अवहेलना सुरु आहे याचे प्रत्यंतर तर ठाई ठाई मिळेल. शासनाची किती परिपत्रके, आदेश आणि देण्यात येणारी विविध प्रमाणपत्रे मराठी भाषेत दिली जातात किंवा शासनाच्या किती विभागांची संकेतस्थळे मराठी भाषेत याचा तर विचारच न केलेला बरा.कनिष्ठ न्यायालयात मराठीतून कामकाज व्हाव असा शासनाने स्तुत्य निर्णय घेतला आहे पण त्याची अंमलबजावणी अद्यापही होत नाही हे खेददायकच आहे. गुजराथ या शेजारच्या राज्यात बहुतांश शासकीय व्यवहार गुजराथीतूनच होतो. महाराष्ट्र आणि गुजराथ या दोन राज्यांची निर्मीती एकाच वेळी झाली हे लक्षात घेता हा विरोधाभास जास्तच जाणवतो.
या सारख्या प्रत्येक गोष्टींसाठी राजकारण्यांना दोष देण सोईच असेलही पण त्या मुळे आपली आपल्या भाषे बाबतची व संस्क्रुती बाबतची अनास्था नाकारता येईल का?.आपल्या मराठीत एक म्हण आहे " यथा राजा तथा प्रजा". लोकशाही मध्ये प्रजाच राजा निवडत असते. त्या मुळे जसे आपण तसेच आपले राज्यकर्ते . तेव्हा आपण आपल्या भाषेच्या व संस्क्रुतीच्या बाबतीत कितीशे जागृक व आग्रही आहोत याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची व काहीतरी कृती करण्याची आता वेळ आली आहे हे तुम्हालाही पटेल. हे सर्व लक्षात घेता , स्वभाषेचा व स्वसंस्क्रुतीचा अभिमान व आग्रह ठेवणे म्हणजे संकुचीतपणा हा न्युनगंड सर्वप्रथम मनातून काढुन टाकायला हवा. लक्षात ठेवून मराठीचा जास्तीत जास्त वापर दैनंदीन जिवनात करायलाच हवा. भाषा व संस्क्रूती पेक्षा कोणीही महत्वाच नाही. आपण ज्या मराठी अस्मितेचा सतत उदघोष करत असतो ती अस्मीता शिवरायांच्या राजनितीतून,जातीभेदाच्या पलीकडे जावून विचार करणा‍र्‍या संतपरंपरातून, मर्दानी रांगड्या मराठी भाषेतून, गौरवशाली संस्क्रूतीतून व शौर्याच्या इतिहासातून तयार झालेली आहे. त्यामुळे या अस्मीतेचा अभिमान आपल्याला असायलाच हवा. मराठी माणसांनी वैश्विक (Globle) होण्याची गरज आहे असे अनाहुत सल्ले बर्‍याच वेळी आपल्याला दिले जातात. अश्या वेळी वैश्विक होण म्हणजे आपल जे चांगल ,उदात्त आहे ते विसरुन जाण नव्हे. वैश्विक होताना इतरांच्या चांगल्या गोष्टी जरुर स्विकाराव्यात पण त्याच बरोबर आपल्या मधल्या चांगल्या गोष्टी सुध्दा जगासमोर विश्वासाने व ठामपणे मांडल्या पाहीजेत. तेव्हा आपण वैश्विक जरुर होवूया पण ते होताना आपण आपली संस्क्रुती विसरता कामा नये. .
येत्या १ मेला मराठी भाषीकांच्या आपल्या महाराष्ट्र राज्याला ५० वर्ष पुर्ण होत आहेत. तेव्हा आता आपले सगळे न्युनगंड टाकून मराठी भाषा व संस्क्रुती साठी एक होवूया. त्या दिवशी महाराष्ट्राचीच काय तर पुर्ण विश्वाची भाषा मराठी होइल असा सकारात्मक संकल्प करुया. सुवर्ण महोत्सवी वर्षात आपल्या या संकल्पा मुळे मराठी अस्मितेला तेजाची नविन झळाळी निश्चितच मिळेल या बद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही.
जय महाराष्ट्र जय मराठी
आपला
मैत्रेय१९६४

गुलमोहर: