निर्णय

Submitted by सुनिल परचुरे on 30 April, 2010 - 05:27

निर्णय
``या केशवराव, या या बबनराव. अहो तुम्हा दोघांची मी कधीपासून वाट बघतोय``.
``हं जरा मोठी राऊंड मारुन आलो``.
``अहो आता बघान आपल्या नानांच कस झाल? तरी मी त्यांना सांगत होतो की बागेत ह्या ठिकाणी पाण्याचा नळ लिक आहे. निसरड झाल आहे, तुम्ही तिथुन चालू नका. पण नाही एकल. गेले चालत आणि पडले. आता उजवा हात मोडलाय, कंबरही कुरकुरायला लागलीय. तुम्हाला दोघांनाही परत सांगतो चालतांना जरा खाली बघुन चाला. इकडे तिकडे बघु नका``.
``अहो इकडे तिकडे बघायची सवय तुम्हाला..``.
``चेष्टा नको. पण काल तर नाना आला होता, हाताला बँडेज व कंबरेला कंबरपट्टा बांधुन्. अहो आता ह्यावरुन आमच्या हिची एक गंमत आठवली. हीचा सारखा घोशा असायचा मला सोन्याचा कंबरपट्टा हवा म्हणून. मध्ये पडली तर आला कंबरपट्टा . म्हटल तुझी खुप इच्छा होती न, घे तर हा आता . सुरवात तर झालीय. हळुहळु तो सोन्याचाही करु``.
``पण बबनराव एक काम करा, आज नानाला फोन करुन विचारा की बाबा सकाळी का नाही फिरायला आलास, कंबर बरी आहे नं ?"
``अहो मग तुम्हीच कां नाही फोन करुन विचारत ?``
``मला आज दिवस भर मुंबईच्या बाहेर जायचेय, तिथून करायचा म्हणजे रेंज असते, नसते म्हणून म्हटल.``
``बर बघतो``.

नानासाहेब गोरे, तात्या गोडबोले, केशवराव जोशी व बबनराव पंडित हे चौघेजण रोज सकाळी जॉगर्सपार्कमधे फिरायला येणारे मेंबर. सगळेजण सत्तरीच्या पुढचे. त्यांची मैत्री ही इथे फिरायला येउनच झाली.

``तात्या , हां तात्याच न, अरे मी बबनराव बोलतोय. बर मी काय म्हणतो मी नानाला फोन करायचा प्रयत्न करत होतो पण फोनच उचलेना कोणी. नुसतीच रिंग वाजत होती. "
``अरे नक्की तोच नंबर फिरवत होतास न ? नाही, आताशा तुला जरा अंधुक दिसत म्हणून विचारतो``.
``अरे बाबा मधे मधे बोलु नकोस. बर मी काय म्हणत होतो ? हां, तर फोन लागेना म्हणून म्हटले संध्याकाळी समक्ष घरी जाऊनच चौकशी करावी. घरी गेलो तर फक्त वहिनी व त्यांची सुनबाई होति. त्यांचा फोन बंद पडला होता,वायरचि काहितरि गडबड होति.त्यामुळे रिंग वाजत होति पण त्यांना रिंग वाजलेलि कळत नव्हति. पण मग मि निघालो. बाहेर पडलो तर गाडीतून नाना व त्यांचा मुलगा उतरले. नानांनी मला एका बाजुला घेतले व सांगितले की ते एक वृध्दाश्रम बघुन आलेत. पण जर तुम्हा तिघांपैकी कुणाकडेही ह्या दोघांची म्हणजे नाना-नानींची सहा महिने सोय होणार असेल तर उद्या सकाळी तो निरोप घेऊन आपल्या तिघांना चहासाठी बोलावलय. नीट एकलेत न, तर यावर विचार करा, आणि तात्या जरा हाच निरोप केशवरावांना द्याल ?"

``हे बघा, बबनराव मला अगदी सगळ नीट स्पष्टपणे सांगा बघु``.
``म्हणजे ?``
``अहो म्हणजे नेमके नाना काय बोलले ? कशासाठी बोलले ?"
``तात्या तुम्ही ह्या केशवरावांना नीट निरोप दिलातन``
``हो हो मीच फोन केला. म्हटले तुमचे फ्री कॉल संपले असतील , त्यामुळे तो मला करायला सांगितल हे आल लक्षात."
``हो... नाही , म्हणजे तुम्हि म्हणताय ते खर आहे. तुम्ही चेष्टेत जरी म्हणालात नं तरी मी सांगतो. अरे माझ वय आता 80 होऊन गेल. तुम्ही रिटायर झालात तेव्हा जे पगार होते तसे मी 21-22 वर्षापूर्वी मि रिटायर झालो तेव्हा नव्हते. शिवाय मी क्लार्क म्हणूनच रिटायर झालो. आम्ही घरात दोघजण जरी असलो तरी फोन हा फक्त मी इमर्जन्सी म्हणूनच वापरतो. त्यामुळे शक्यतो जे फ्रि कॉल्स मिळतात तेवढेच करतो. ते किती केले हे लक्षात रहात नाही म्हणून प्रत्येक केलेला कॉल लिहून ठेवतो. शिवाय तुम्ही म्हणत होतातं की मला मुल नाहित, त्यामुळे माझ सहस्त्र चंद्रदर्शन करुया म्हणून. पण अरे महिन्याची 20 तारीख आली की सहस्त्र चंद्रदर्शनच काय तर डोळ्यापुढे सहस्त्र तारे चमकायला लागतात. देवाला प्रार्थना करतो ह्या दिवसात आम्हा दोघांनाही व्यवस्थित ठेव. अचानक काही खर्च आला तर काय करायच ह्याचीच चिंता असते. अशा ह्या परिस्थितित मी नाना-नानींला 6 महिने कसे ठेऊन घेऊ ? त्यांनी जरी पैसे दिले तरी ते घेतानाच मला किती लाजीरवाण होईल. शिवाय तिथे त्यांना स्वतंत्र ए.सी. बेडरुम, वेगळा कमोडचा संडास बाथरुम आहे , अस माझ्या घरात काहीच नाही``.
``अहो बबनराव मी सहज गमतीत म्हटल होत. आपली मैत्री आहे ती काय तुमच्याकडे पैसा आहे कि नाही आहे असे बघुन झालीय का ? काही तरीच बोलता. पण नानांनी जे विचारल होत ते मी हिला सांगितल. रात्री ठरवुन मुलालाही विचारला. तेवढयात सुनबाई आल्या, मुलाने तिला सर्व सांगितले. सगळ एकुन ती बेडरुमध्ये गेली. पण आतुन एकु येत होते की दोन म्हातारे कमी आहेत की काय म्हणून आणखीन सहा महिने दोघांना इथे आणुन ठेवायचय ? आता खर तर ह्या गोष्टी बाहेर सांगु नयेत पण...``
``बाहेर ? तात्या .." बबनरावांनी तात्यांचा हात हातात घेतला.
``तात्या, बबनराव, हे बघा पुढच्याच महिन्यात आम्ही नेहमी प्रमाणे 6 महिने मुलाकडे अमेरिकत जाणार आहोत. म्हणजे इथे असतो तर नक्की ह्या दोघांना ठेवले असते." केशवराव म्हणाले.
``पण मला कळत नाही की, ह्या हल्लीच्या मुलांना झालय तरी काय ? त्यांना आपल्या आईवडलांचे ओझे होते ? "
``आता नानांचच बघाना, मुलगा चांगला प्रायव्हेट कंपनीत मोठया हुद्यावर आहे. चांगला पगार आहे. वहिनीहि अशाच कंपनीत आहेत. नातु नुकताच शिकायला फॉरेनला गेलाय. अस असतांना अचानक ह्यांना वृध्दाश्रमात जायला लागाव ? आता ह्या वयात नानांचा हात फ्रॅक्चर झाला आहे, वहिनींना नुकताच पॅरेलिसीसचा माइल्ड ऍटॅक आलेला. त्यांना बघायला कुणीतरी लागत. ह्यावेळी त्यांची काळजी घ्यायची सोडून डायरेक्ट वृध्दाश्रम? ``
``अहो हल्ली ह्या सगळ्यांना काय झालय तेच कळत नाही. मधे मी कुठे वाचल का कुणाकडुन एकल लक्षात नाही, पण त्यांचा मुलगा अमेरिकेत होता. नेहमी प्रमाणे घरावर, गाडीवर बँकेच कर्ज होत. त्यात मध्ये इकॉनामीक क्रायसिसमध्ये त्याचि नोकरी गेली. तर तो इथे आला. वडलांना म्हणाला आपण सर्वजण तिथे राहू. इथले घर विका. वडलांनी घर विकल, सामानहि कुठे कुठे विकल, पैसेही मुलाच्या अकाऊंटला ट्रान्सफर केले. वडलांना एयरपोर्टवर नेत तो म्हणाला कि तुम्हि इथेच थांबा, मी बाकी सर्व सामान लोड करुन व इमिग्रेशन करुन येतो. तास झाला, दोन तास झाले हे बाहेर. शेवटी चौकशी केली तेव्हा कळल मुलगा एकटा अमेरिकेत पसार झाला होता. काय बिचा-यांची अवस्था झाली असेल. नशीब त्यांना पेंशन होत म्हणून कुठेतरी वृध्दाश्रमात सोय झाली. "
``बापरे भयानकच आहे नाही. आता आपल्याला नानांच्या घरी जायचच आहे न, तर आधी मी त्यांच्या मुलाला जाब विचारणार आहे की तु अस का वागतोस ?" तात्या आवेशातच म्हणाले.

``अरे या या बसा, सॉरी ह मित्रांनो मी दोन दिवस सकाळी येऊ शकलो नाही``.
``आधी हे सांग तुम्हा दोघांची तब्येत कशी आहे ?``
``ठीक आहे. पुढच्या आठवडयात बँडेज सोडतील अस वाटतय. अग मेघा जरा ह्या सगळ्यांना चहा टाकतेस का गं ?``
``काय हो अवि कुठे दिसत नाही ? नाही म्हणजे मला जाब विचारायचाय त्याला?"
``जाब ? कसला जाब ?``
``नाही, तुम्हा दोघांना वृध्दाश्रमात टाकायला निघायला तो अस एकल. मला त्याला कान पकडुन विचारायचा हक्क आहे ना ?``
``अरे हो हो, आधि एकुन तर घ्या. हे बघा गेल्या काही आठवडयात घरी घडलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नाहीत. ह्याच कारण माझहि अजुन नक्की ठरत नव्हत. पण आता ठरलय म्हणुनच तुम्हाला बोलावल.
पहिली गोष्ट , काल मी बबनरावांबरोबर एक निरोप पाठवला होता, त्याच्या बद्दल...``.
``नाही काय आहे, प्रत्येकाचे काहीना काही प्रॉब्लेम्स आहेत``.
``ठिक आहे. आता काय ते मी तुम्हाला सांगतो. माझ्या मुलाला कंपनी तर्फे एक वर्ष लंडनला जायच प्रपोजल आल होत. ते समजत न समजतय तेवढयात मेघाच्याही कंपनीने तिला सहा महिन्याकरता एका प्रोजेक्टवर ऑस्ट्रेलियाला जायला सांगितले. हे सर्व अचानक झाल. त्यात हिला नुकताच येऊन गेलेला माइल्ड पॅरॅलिसिसचा ऍटॅक, माझ हे पडण, त्यामुळे तिने तिथे जाण्याचा बेत रहित केला होता. पण मला ते पटल नाही. आज नोकरीत करियरही महत्वाच. आता तर रोहन, माझा नातु शिकायला अमरिकेत आहे. मग मीच निर्णय घेतला. उगाच कुणा नातेवाईकांकडे जाउन राहयच किंवा घरी दोन चार बायका कामाला ठेवायच्या त्यापेक्षा खोपोलीत सावली नांवाचा वृध्दाश्रम आहे. पुर्वी मी त्याच काम करायचो. त्यांना भरपुर डोनेशनही मिळवून दिली होती. काल हे बबनराव संध्याकाळी भेटलेन तेव्हा तिथेच जाऊन आलो होतो. म्हटल सगळी ओळखिची माणस आहेत. शिवाय आजुबाजुला समवयस्कर माणस असल्याने वेळही मजेत जाईल. तो वृध्दाश्रमहि मि मुलाला दाखवला. तो बघितल्यावर त्यालाहि पटले कि आम्हा आजार्‍यांचि इथे चांगलि व्यवस्था होइल. मुलाला म्हटले कि लोक काय म्हणतील ह्याची पर्वा तुम्ही करु नका. लोक काय दहा तोंडानि बोलतिल,पण संकटात नातेवाइक काय किंवा मित्र काय कुणिहि मदतिला येत नाहित. आपल करियर बघा. तात्यासाहेबत तुम्ही मगाशी म्हणालात की माझ्या मुलाचा कान पकडुन त्याला जाब विचारणार म्हणुन. पण खर सांगु तुम्ही तुमच्या स्वतच्या मुलाला जाब विचारु शकत नाहीत तर माझ्या मुलाला कुठल्या तोंडाने विचारणार. नाहितरि आम्हि तुम्हा कुणाकडेहि रहायला येणार नव्हतोच पण सहजच तुमचि परिक्षा घेतलि. ते जाउ दे. मुलाला म्हटले, मेघाचा सहा महिनेच आहे न प्रोजेक्ट, जाऊ दे. आम्ही दोघेही वृध्दाश्रमात राहु. भले तो आणखी 6 महिन्याने वाढला तरी आमची तयारी आहे. नशिबाने आम्हाला चांगला मुलगा व सुन मिळाली आहे. त्यांच्या प्रगतीच्या आड मी कधीच येणार नाही. बस अजुन एक आठवडयांनी माझ प्लास्टर निघाल की नातु अमेरिकेत, मुलगा लंडनला , सुन ऑस्ट्रेलियात तर आम्ही दोघे खोपालीला असु. कधी आठवण आलीच तर खोपोलित नक्की या."
समोर आलेला चहा कधीच थंड झाला होता.

गुलमोहर: 

असे समजूतदार आई बाबा सगळीकडे असतील तर गोष्टी खूप सोप्या होतील का? माझ्या इथल्या घराच्या अगदी शेजारी एक वृद्धाश्रम आहे. सगळे वृद्ध स्वत: गाड्या चालवत बाहेर जाता येतात. अगदी खूष दिसतात. नेहेमी विचार यायचा मनात...हे आवडत असेल का त्यांना?