कर्ता - भाग ३

Submitted by मानुषी on 27 April, 2010 - 02:40

कर्ता - भाग १
कर्ता - भाग २

दुसर्‍या दिवशी सकाळी अक्का आपल्या गावी गेल्या. ऋषी सकाळी टेनीस खेळायला जाताना त्यांना स्टँडवर सोडून आला.

ऋषी क्लबमधून घामाघूम होउन घरी आला. अंघोळीला जाणार इतक्यात फ़ोनची वाजला. ऋषीने फ़ोन उचलला. जबलपूरहून निरुपमाच्या वडिलांचा फ़ोन होता.

"गुड मॉर्निंग नानाजी!" त्यांच्या बोलणं झालं. हॉलमधेच पेपर वाचत बसलेल्या माईंनी कान टवकारलेच.पण ऐकू काहीच आलं नाही."ऋषी ....कुणाचा फ़ोन रे?"त्यांनी विचारलंच.

"आजी जबलपूरहून नानाजी" संक्षिप्त उत्तर देऊन ऋषी टॉवेल घेऊन बाथरूममध्ये घुसला.

"आता आणि तिथं बसून काय भरवताहेत नातवाच्या डोक्यात देव जाणे!" त्या पुटपुटल्या.

खरं म्हणजे सगळं नीट सुरळीत व्हावं म्हणून निरुपमाच्या वडिलांनी बरेच प्रयत्न केले होते. पण निरुपमाला बिथरवण्यात तिच्या आईचा फ़ार हात होता.

ऋषी बी.ए. झाल्यावर छोटे मोठे काँप्युटर कोर्सेस कर राहिला. रवीच्या आजारपणात त्याची एक परिक्षाही चुकली होती.रवीला मुंबईला हलवल्यावर त्याला स्वता:लाच पुढची साधारण कल्पना आली होती. त्याच्या दुसर्‍या हार्ट अ‍ॅटॅक नंतर त्याची तब्ब्येत खालावतच गेली. खूप काँप्लिकेशन्स होत गेली. अशा वेळी ऋषी चोवीस तास त्याच्या जवळ असायचा.

"ऋषी माझ्यामुळे तुझे महत्वाचे दिवस वाया चाललेत रे..."रवीला भरून आलं होतं.

"बाबा......असू दे......तुम्ही पूर्ण बरे व्हा.....मग काय मी मोकळाच"ऋषी वडिलांची समजूत घालत होता.
"माझ्यामुळे तुझी परिक्षा बुडली .......तुझं फ़ार नुकसान झालं रे...."रवीच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.
"बाबा तुम्ही काळजी करू नका........मी पुढचा अटेम्ट देईन ना. तुम्ही आता आजिबात त्रास करून घेऊ नका" ऋषीलाही बोलता बोलता भरून आलं होतं.

"नाही ऋषी...आता मला बोलू दे. मी आणि तुमची आई.... आम्ही दोघंही तुमचे अपराधी आहोत. आम्ही दोघांनी आपापले इगो जपले आणि तुम्हा मुलांची मात्र परवड झाली रे! घरातला कर्ता म्हणून मी काहीच कर्तव्य केलं नाही. नुस्ता पैसा आणून टाकून कर्त्याचं कर्तव्य संपत नाही......."रवी मन मोकळं करत होता.

"बाबा आता पुरे. त्रास होईल तुम्हाला." ऋषी म्हणाला

पण रवीला वाटत होतं.......आता जर का मी बोललो नाही तर सगळं कायमचंच राहून जाईल.
तो म्हणाला, " ऋषी तुला हेही सांगतो ........तुझ्या आजीच्या दबावाखाली राहू नको. तुझ्या सद्सदविवेकबुद्धीला जे योग्य वाटेल तेच कर.मी जीवनातल्या महत्वाच्या क्षणी तुझ्या आजीच्या दबावाखाली चुकीचे निर्णय घेतले. त्याचे परिणाम आपण सारे भोगतोय." ऋषीचा हात रवीने घट्ट धरून ठेवला होता.

.........अंघोळ करता करता ऋषीला परत परत सगळं स्पष्ट आठवत राहिलं. टॉवेलला केस पुसत तो डायनिंग रूममध्ये आला. आज ब्रेकफ़ास्टला मिसळ होती. हळूहळू सगळे नॉर्मलला यायचा प्रयत्न करत होते.

बेल वाजली. माई म्हणाल्या, "दामू बघ रे कोण आहे ते......."
दामू यायच्या आत उघडंच असलेलं दार ढकलून अदिती आत आली.

"ऋषी आहे का? या वह्या आणि सीडीज द्यायच्या होत्या."

माईंची काक दृष्टी अदितीला न्याहाळत होती. फ़िक्कट निळी जीन्स, पांढरा टी शर्ट....केसांचा बॉय कट असल्याने कपाळावर केस आलेले.

"हं.......बरोब्बर.....ही मुलगी रवी हॉस्पिटलात होता तेव्हा एक दोन वेळा येऊन गेलेली.......आणि रवीची बॉडी जेव्हा अँब्युलन्समधून मुंबईहून इकडे आणली तेव्हाही ही ऋषीच्या ग्रुपबरोबर होती..........बरीच जवळची मैत्रीण दिसते."निरिक्षण करता करता माईंच्या डोक्यात चक्रं चालू झाली.

बेल वाजली म्हणून शशी किचनमधून डोकावली.

"अरे !अदिती.......ये ना.......ऋषी ..........." शशीने ऋषीला हाक दिली.
ऋषी अंघोळ करून आला होता.
"हाय ऋषी" अदिती म्हणाली

"हाय अदिती" ऋषीनेही परतफ़ेड केली.

"ऋषी ......या सीडीज आणि वह्या........."

अदितीचं वाक्य तोडत ऋषी म्हणाला, "अगं ते राहू दे. शशी आत्यानं तुझ्या आवडीची मिसळ केलीये..."

अदितीची नजर घडयाळाकडे गेली......"अगं क्लासला बराच वेळ आहे अजून...तेवढयात खाणं होईल" ऋषी म्हणाला.

अदिती जरा बावरलेली होती. रवी गेल्यानंतर एकदाच येऊन गेली होती..आई वडिलांच्याबरोबर.....त्यानंतर आजच प्रथम.........!

सर्वांनी एकत्र ब्रेकफ़ास्ट घेतला. माईंचं निरिक्षण चालूच होतं.
ऋषी आणि अदिती सर्वांचा निरोप घेऊन बाइकवरून बाहेर पडले.

"आत्ता आणि कुठे गेले दोघे...?"माईंची पृच्छा!

शशी म्हणाली, " अगं आई ते काँप्यूटर क्लासला गेले." दोघे वळणावरच्या गुलमोहोराच्या झाडाखालून दिसेनासे होईपर्यंत माई पहात राहिल्या. लगेच मनातल्या मनात काही नोंदी आपोआप झाल्या....... अदिती ऋषीच्या मागे दोन्हीकडे पाय टाकून अगदी आरामात बसली होती. एक हात ऋषीच्या खांद्यावर!

...........रात्रीच्या गाडीने शिरीष शुभदा मुंबईला परत गेले. तेव्हाच माईंनी जाहीर केले की सर्वानुमते ठरल्याप्रमाणे त्या शशीबरोबर देवासला न जाता इथेच मुलांबरोबर रहाणार आहेत. माईंचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यावर अपील नाही. शुभदाला मनातून वाटतच होतं की आता यांनी इकडे तिकडे कुठे न जाता सरळ परभणीला परत जावे. इथं राहून ऋषी, घरातली गडी माणसं, येणारे जाणारे यांच्याशी या पटवून घेणारेत का?...

पण कुणीच काही बोललं नाही. हळूहळू जो तो आपापल्या जागी गेला.

..................आता घरात एक नवीनच पर्व सुरू झालं होतं. घरातला कर्ता सवरता निघून गेला होता.....कायमचा. ऋषीच्या डोक्यावरचं छत्र नाहीसं झालं होतं...............तरी त्याच्या डोक्यावरच्या आभाळाच्या कक्षा रुंदावल्या होत्या. हळूहळू ऋषीने सगळा कारभार हातात घेतला. घरात अदितीचं येणं जाणं वाढलं.खूपश्या गोष्टींवर ऋषी अदिती मिळून निर्णय घ्यायला लागले. जे माईंना मुळीच पसंत नव्हतं.
मध्यंतरीच्या काळात प्रणवची शाळा सुटली होती ती ऋषीने परत चालू केली. सुरवातीला प्रणवने थोडा विरोध दाखवायचा प्रयत्न केला. कारण तो ऐशो आरामाला चटावलेला होता. पण यातही अदितीचाच पुढाकार होता. माईंना आश्चर्य वाटायचं की हा नाठाळ पणू अदितीचं... त्या एवढयाश्या बिरमुटलीचं बरं ऐकतो! पण त्या मुलीत नक्कीच काही तरी होतं जे माईंना कधीच कळणार नव्हतं.
"का रे.......परवा सकाळी जबलपूरहून फ़ोन होता ना? काय म्हणत होते नानाजी?" माईंनी जेवताना विषय काढला. केव्हापासून त्या घोकत होत्या की त्या फ़ोनविषयी ऋषीला विचारायचंच........पण अक्का जाईपर्यंत त्यांनी कसाबसा दम धरला होता. अक्कांनाच काय त्या जरा वचकून असायच्या माई.
"आजी काही विशेष नाही गं........मम्मी पण बोलली.........जनरलच."ऋषी म्हणाला.
"हो बोलेल ना मम्मी.......उंटावरून शेळ्या हाकायला जातय काय तिचं.........." निरूपमाचा उल्लेख झाल्यावर माईंचा अगदी पाराच चढला, त्यांना अजूनही काही बोलायचं होतं पण तेवढयात दामूगडी भराभरा आत येताना दिसला.
"ऋषीदादा......मोहनभाई भण्डारी आलेत." दामू म्हणाला.
जेवण भराभरा उरकून ऋषी हॉलमधे आला. माईंना जेवायला वेळ लागायचा. म्हणून आज मात्र शेवटचा दही भात कॅन्सल करून कसंतरी तोंड वगैरे धुवून त्या ऋषीपाठोपाठ हॉलमध्ये स्थानापन्न झाल्या. ऋषीने त्यांच्या दिशेने एक नापसंतीदर्शक कटाक्ष टाकला. त्याच्या हातात गाडीच्या किल्ल्या होत्या.
"सर आज छान चतुर्थीच्या मुहूर्तावर व्यवहार होतोय आपला पहा............तुम्हाला आवडेल गाडी.....बाबांनी अतीशय प्रेमाने आणि काळजीपूर्वक वापरलेली आहे." ऋषी म्हणाला.
"प्रश्नच नाही. डॉक्टरचं सगळं वागणंच तसं होतं. कुठे नाव ठेवायला जागा नाही."मोहनभाईंनी ऋषीला दुजोरा दिला.
माईंच्या डोळ्यादेखता व्यवहार होतोय आणि त्यांना सुतराम कल्पना नाही? त्यांना रहावलंच नाही. त्या मधे बोलल्याच, "अरे ऋषी कुठली गाडी देतोयंस?"
"आजी होंडा सिटी काढून टाकू. काय करायच्या आहेत आता आपल्याला दोन दोन गाडया? मारुती ठेऊ आपल्याला........तुला पणूला होईल इकडे तिकडे फ़िरायला." तेवढ्यात दामूने सरबताचा ट्रे आणून ठेवला.
"घ्या ना सर......" ऋषी म्हणाला.
.........मोहनभाई गेल्याबरोबर माईंनी ऋषीवर प्रश्नांची फ़ैर झाडली. .....हे कोण मोहनभाई?......गाडी का विकली?........किंमत योग्य आली का?........या पैशांचं काय करणार?.......पैसे सगळे आले का?........नसतील तर उरलेले पैसे नक्की मिळणार का?..........
" आजी जरा दुसर्‍यावर विश्वास टाकून बघ. कामं सोपी होतात. आणि हे मोहनभाई पूर्वी जबलपूरला होते. नानाजींच्या चांगले ओळखीतलेच आहेत. तसे आपल्याही ओळखीचेच आहेत. अगं आजी नानाजींनीच सुचवलं .......म्हणाले... आता दोन गाडया काय करायच्या आहेत.......एक काढतोस का?"
मोहनभाईंनी ऋषीला दिलेलं नोटांच बंडल माईंच्या नजरेतून सुटलेलं नव्हतं.
संध्याकाळी अदिती डब्यातून दहीवडे घेऊन आली होती.ती गेल्यानंतर लोणकर वकील आले.ऋषीनेच त्यांना बोलावून घेतलं होतं. लोणकरांनी रवीचं मृत्युपत्र वाचलं. त्यात बरचसं ऋषीलाच मिळणार होतं. हॉस्पिटलच्या उत्पन्नातून प्रणवचा खर्च करायचा होता. हॉस्पिटलचे सगळे अधिकार रवीने ऋषीला दिले होते. एक बर्‍यापैकी रक्कम माईंना मिळणार होती.चर्चा चालू होती.
"काका हॉस्पीटलला सुद्धा गिर्‍हाइकं चांगली येताहेत.होंडा सिटीचं मी बोललोच तुम्हाला. नानाजींनी जबलपुरात बसून आपलं काम करून दिलयं."ऋषी लोणकरांना लेटेस्ट डेव्हलपमेंटस सांगत होता.
"मला वाटतं ऋषी हॉस्पिटल साठी सर्वात चांगलं प्रपोजल डॉ. भिडयांचं आहे. " लोणकर म्हणाले.
" ओके काका .....पाहू .......बोलू त्यांच्याशी.......खरंच काका तुम्ही आहात म्हणून काळजी नाही मला." ऋषी म्हणाला.
.............रात्री मुंबईहून शुभदाचा फ़ोन आला. ऋषीने तिला सगळ्या इकडच्या तिकडच्या बातम्या दिल्या.शुभदाला माईंच्याच वागण्याचीच काळजी वाटत होती.पण ऋषी म्हणाला, "काकू काळजी नको करू ..मी आजीला बरोब्बर हँडल करतोय."ओघातच त्याने हॉस्पिटलच्या व्यवहाराविषयी सांगितलं. मग शिरीषने फ़ोन घेतला. सर्व कायदेशीर गोष्टी रिषीला नीट समजावून सांगितल्या. बहुतेक रोजच ऋषीचं काका काकूंशी बोलणं व्हायचं.
...स्कूटीचा आवाज आला. माईंनी बाहेर पाहिलं तर अदिती व प्रणव स्कूटीवरून उतरत होते.
"पणू अरे उडी नको ना मारत जाऊ......लागलं म्हणजे मग? आणि दप्तर कोण नेणार घरात? तुझा काका?" अदिती हसत हसत पणूला शिस्त लावत होती.
"अदिती आता शिरीषकाकाला कुठे पणूचं दप्तर उचलायला लावते? तो गेला मुंबईला." ऋषी स्कूटीचा आवाज ऐकून पणूला घ्यायला दारात आला होता.
तोपर्यंत अदिती डोक्याचं हेल्मेट काढून केसात हात फ़िरवत हसत हसत घरात आली होती. ऋषीनं प्रणवचं दप्तर स्वता:च काखोटीला मारलं होतं. दोघही खळाळून हसले.
माईंना क्षणभर बरं वाटलं. खूप दिवसांनी जरा हलकं फ़ुलकं वातावरण या घरात जाणवत होतं. प्रणव स्वयंपाकघरात घुसला. सरूबाईंनी त्याला खायला दिलं आणि त्याही पणूशी त्याच्याच भाषेत काहीबाही बोलत होत्या. हसत होत्या. एकीकडे भाजी निवडणं चालू होतं.
हे हलकं फ़ुलकं वातावरण माईंना टोचायला लागलं. त्यांच्या डोक्यात असंख्य विचारांचे किडे वळवळायला लागले.
"आता ही अदिती पणूला शाळेत आणण्या पोचवण्याची कामंही करायला लागली की काय! स्वता:च्या घरून डबे काय आणते.......परवा तर चतुर्थीच्या दिवशी उपास सोडताना मलाच आग्रह कर होती दहीवडय़ांचा.....वर म्हणत होती ... आजी घ्या अजून एक....अगदी मऊ झालेत....चावतील तुम्हाला...!"
...........त्यानंतर एकदा ऋषी व अदिती दोघंही काही तरी बोलत बसली होती..तेही ऋषीच्या बेडवर.........अगदी शेजारी शेजारी. बेडवर सर्वत्र कागदांचा पसारा पडला होता. अदिती मधून मधून काही कामही करत होती काँप्यूटरवर.
माईंना रहावेना. घुसल्याच त्या खोलीत.
बेडवर एका मोठया बाऊलमध्ये पॉपकॉर्न ठवले होते. माईंचं निरिक्षण चालू होतं. दोघं अधून मधून पॉपकॉर्न तोंडात टाकत कागदावर... काही काँप्यूटरवर ......आकडेमोड करीत होते. चर्चा चालू होती.
"काय रे कसली खलबतं चाललीयत?" काही तरी शिजतय याचा वास त्यांना आलाच.
"आजी बस ना" ऋषी मनाशी काही ठरवल्यासारखं बोलला.आपल्या मनाशी प्रामाणिक राहून स्वता:ला जे पटेल तेच करायचं असं त्याने आपल्या मनात ठरवलेलं असल्यामुळे त्याचं त्यालाचं मोकळं मोकळं वाटत होत. आता त्याची आजीवरची चिडचिडही कमी झाली होती.
"आजी मी आणि अदिती काही व्यवसाय सुरू करायचा म्हणतोय."ऋषीने प्रस्तावना केली.
"यात आता ती अदिती कशाला आणि हवी? ती वैशालीही अशीच हळूहळू घरात शिरली आणि डॉक्टरला भुरळ पाडली........पण मीही काही कच्च्या गोटया खेळलेली नाही........!"माई काहीच न बोलता नुसता विचार करत ऋषीकडे पहात राहिल्या.
"आणि आजी आम्ही एक नवीन व्यवसाय करणार आहोत. अदिती माझी बिझिनेस पार्टनर असेल."ऋषी म्हणाला.
"अगंबाई हो का..."माईंनी आतापर्यंत अदितीची बरीच माहिती काढली होती. ती जवळच रहात होती. वडील इंजिनीअर होते आणि आई कॉलेजात लेक्चरर. मोठया बहिणीचं लग्न नुक्तंच झालेलं होतं. रवी गेल्यानंतर शेजारधर्म म्हणून दोघं येऊन गेलेलेही माईंनी पाहिलं होतं.
"आणि आजी या पार्टनशिपमधे आमच्या टर्म्स अँड कंडिशन्स खूप स्ट्रिक्ट आहेत बरं का" ऋषीनं माईंना विश्वासात घेतल्यासारखं केलं.
माईही गुंगल्या..म्हणाल्या, "आता म्हणजे रे काय? नीट मला समजेल असं सांग ना." त्यांची उत्सुकता ताणली गेली.
"काय ठरवलंय पोरांनी कुणास ठाऊक.......!" त्या जरा काळजीतच पडल्या होत्या.
"आजी आमची सिक्टी फॉर्टीची पार्टनरशिप असेल." ऋषी म्हणाला.
माई जरा सरसावून बसल्या...........पण त्या चांगल्याच बुचकळ्यात पडल्या होत्या. अदितीची बोटे कीबोर्डवर टकाटक चाललेली होती आणि नजर काँप्युटरच्या स्क्रीनवर अविचल.........पण मुरड घातलेल्या ओठात दबलेलं हसू होत. तिला आजी नातवाच्या संभाषणाची गंमत वाटत होती.
"अगं आजी ........म्हणजे आम्ही काम करून जो पैसा मिळेल त्यातला साठ टक्के मला आणि चाळीस टक्के अदितीला.
"वा रे वा तुला जास्त आणि तिला कमी असं का?" माईंनी सवयीप्रमाने आडवं घातलं. त्यात त्यांना अदितीविषयी फ़ार पुळका होता अशातली गत नव्हतीच. पण त्याही संभाषणात गुंतत चालल्या होत्या.
"अगं आजी असं पहा........आम्ही ज्या प्रमाणात गुंतवणूक केलीये त्याच प्रमाणात नफ़ा वाटून घेणार. यालाच टर्म्स अँड कंडिशन्स म्हणतात" ऋषीने आजीला फ़ोड करून सांगितलं.
मुलांचं काम चालू राहिलं. संभाषण बंद पडलं. माई विचार करतच बाहेर आल्या.बागेत चकरा मारू लागल्या. कोकिळा ओरडत होती. बागेत सगळीकडे सुकलेल्या पानांचा पाचोळा साठला होता. बर्‍याच दिवसात माळी फ़िरकलेला दिसत नव्हता. हळूहळू आभाळ भरून यायला लागलं.
"या ऋषी आणि अदितीची पार्टनरशिप का काय ते व्यवसायापुरतंच मर्यादित असलं म्हणजे झालं नाहीतर हळूहळू घरातच घुसायची ही बया........आता अजून काय घुसायचं राहिलय म्हणा........पोरांनी पुढचेही काही बेत ठरवलेत की काय.........ऋषीशी एकदा बोललं पाहिजे." माईंची विचारचक्रं गरागरा फ़िरायला लागली होती.
"आजी ....घरात या.....किती अंधारून आलया.....आज वळीव कोसळेल.......वाटतया बगा.....त्यात बागंत कदीमदी जनावर बी फ़िरतया!"
सरूबाईंनी स्वयंपाकघराच्या खिडकीतून माईंना आवाज दिला.
अदिती व ऋषी खाली आले. ऋषी तिला पोचवायला गेटपाशी गेला. तिथेही अगदी एकमेकांच्या जवळ उभे राहून गप्पा चालल्या होता. त्यातही एकमेकांना टाळ्या देणे ........पाठीवर थाप मारणं असलं सगळं चालू होतं. माईंचं अगदी बारीक लक्ष होतं.
रात्री तिघं जेवायला बसले. पणूचा नेहेमीप्रमाणे गोंधळ चालू होता. त्याला मधेच कधी तरी बाबांची आठवण यायची. पण शाळेमुळे की काय तो माणासळत चालला होता.
रात्र दाटून आली होती. हवेत उष्मा जाणवत होता. ऋषी हॉलमधे टिव्ही पहात बसला होता. त्याच्याच शेजारी प्रणव टिव्ही पहाता पहाता झोपून गेला होता.
"ऋषी तुला काही विचारायचंय.........." माईंनी मनातलं पटकन बोलून टाकलं.
"काय आजी? विचार ना.....एवढी प्रस्तावना कशाला?" ऋषी सहजपणे बोलून गेला.
"नाही ....म्ह्टलं........त्या अदितीशी पार्टनरशिप व्यवसायापुरतीच ना?........की पुढचंही काही ठरवलंय़?"माईंनी रोखठोक प्रश्ण टाकला.
"आजी मी खूप काही ठरवलं आहे. आणि जे मी ठरवलंय ते मी करणार आहे."ऋषीने संथ धीम्या लयीत, शांत आवाजात सांगायला सुरुवात केली.ऋषीने जेव्हापासून मनात काही गोष्टी करायच्या ठरवल्या तेव्हापासून खूपश्या गोष्टी त्याच्या त्यालाच स्पष्ट झाल्या. बोधिसत्वाखाली बसलेल्या बुद्धाला जसा अचानक ज्ञानाचा साक्षात्कार झाला तसाच! जणू काही त्याला त्याचा रस्ता दिसायला लागला. अदितीचा तर त्याला पहिल्यापासून पाठिंबा होताच. त्याचं मन आतून शांत असल्यामुळे त्याला आता आजीचाही राग येईनासा झाला. तरीही बाबांचा चेहेरा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत राहिला. बाबांचे शेवटचे शब्द तर असे अगदी पार्श्वभूमीसारखे त्याच्या मन:पटलावर कायमचे कोरले गेले होते.
बाहेर विजा चमकून मुसळधार पावसाने झोडपायला सुरवात केली होती. अंधारून आलं होतं.
"हं.......तर आजी, ज्या चुका मी केलेल्या नाहीत त्या चुकांची शिक्षा मी आज भोगतोय. तशा चुका इथून पुढे माझ्या हातून होणार नाहीत व मला किंवा माझ्या आजूबाजूच्यांना कुठलाही त्रास होणार नाही अशी मी काळजी घेईन." ऋषी बोलत होता. माई अवाक होउन ऐकत होत्या. त्याचा असा ठाम आणि निर्णायक आवाज त्यांनी कधीच ऐकला नव्हता.
"ऋषी कशाबद्दल बोलतोयंस तू?" माई म्हणाल्या.
"आयुष्य एकदाच मिळतं आजी........बाबा तर घरातला कर्ता पुरूष होते ना? काय झालं त्यांच्या आयुष्याचं?.......मी पहातोय आजी ........मी चांगला धडा घेतलाय आता.........आजी मी आता मोठा झालोय गं! मी आता माझे निर्णय मी स्वता: घेणार.........आणि हो........त्याचे परिणामही झेलण्याची माझी तयारी आहे."ऋषीचे डोळे भरून आले होते. माईही जरा आतून हलल्या.
ऋषी बोलतच राहिला.माई अवाक होऊन ऐकत राहिल्या.
"आयुष्य एकदाच मिळतं आजी......पण माझ्या बाबांच्या आयुष्याचं काय झालं........मी पहातोय आजी......घरातला कर्ता पुरूष होता तो." ऋषीने डोळे पुसले आणि बोलतच राहिला.
"आजी मी आता मोठा झालोय. मी माझे निर्णय स्वता: घेणार......आणि हो त्याचे परिणामही मी झेलायला तयार आहे." माई आतून जरा हलल्या.
"इतरांच्या चुकांमुळे जे झाले त्याच्या झळा मी सोसल्या. आजी.......स्वता:साठी स्वता: घेतलेल्या निर्णयाच्या झळाही मला लागू देत. सोसेन मी त्या. आजी मला मोकळा श्वास घेऊन जगायचंय!"
"अरे हो बाबा......तुला मी काही बोललेयं का? पण एक सांगते पैशाचे व्यवहार मात्र नीट कर रे बाबा. कुणाच्या तरी नादी लागून काही तरी करून बसू नको." माईंनी पुन्हा पैशाचं काढलं. ऋषीला कळलं... माईंचा रोख अदितीकडे होता.

"पैसे? आजी तू पैशांची चिंता करू नको. आणि एक सांग.....हे सारं बाबांनीच कमावलंय ना? त्यांना एवढा पैसा मिळवून का नाही मिळालं सुख?"ऋषीचे डोळे परत वहायला लागले.

"अरे आता प्रारब्धापुढे आपलं काही चालयंय का?" माई उगीचच काही तरी बोलायचं म्हणून बोलल्या.

"आजी आपलं प्रारब्ध आपण बनवायचं असतं. मी आता या घरातला कर्ता पुरुष बनलोय. तुला पैशांची चिता लागलीय ना? तुला सांगतो आजी, व्यवसायात पार्टनरशिप योग्य व्यक्तीशी झाली ना यश येतेच पाठोपाठ. आणि हो ........अदितीशी माझी पार्टनरशिप व्यवसायापुरती मर्यादित नाही. ती लाइफ़लाँग म्हणजे आयुष्यभराची असेल. पण त्यात कुठल्याच हार्ड अँड फ़ास्ट अश्या टर्म्स अँड कंडीशन्स नसतील. तिथे प्रॉफिट शेअरिन्गचं काहीच पर्सेंटेज नसेल......हो...... आम्ही कोणत्याही अटी एकमेकांना न घालता आयुष्यभराची साथ करणार आहोत.
माई पहातच राहिल्या.
बाहेर काडकन वीज कोसळली........क्षणमात्र सभोवार लक्खकन उजळलं. पाऊस कोसळतच राहिला.

गुलमोहर: 

ह्म्म्म.. आवडली कथा,मानुषी..एका दमात सगळी वाचून काढली. माईंसारख्या व्यक्ती खूप पाहिल्यात आजूबाजूला.. ऋषीचं कॅरेक्टर खूप आवडलं Happy

कविता , वर्षू . चिंगी, मऊमाऊ मेधा, पनू, रूपाली अर्चू सर्वांना धन्यवाद.
आणि हो अ‍ॅडमिननीच मदत कली.
त्यांनाही धन्यवाद.

आवडली कथा..माईंसारखे लोक आजुबाजूला असले की रोज च्या रोज घरात नवा संघर्ष्..का लोक असे वागतात कुणास ठाऊक? ऋषी चे पात्र छान आहे.

एक फूल, पूनम, युगा, कौतुक सर्वांना धन्यवाद!!
असे प्रतिसाद मिळाले की खूप प्रोत्साहन मिळते.( आला ना पुढील संभाव्य धोका लक्षात?)

मी पण एका दमात वाचुन काढली..खुप खुप आवडली..म्हातारा माणुस म्हणजे घराचा आधार असतो असं म्हणतात..पण माईंसारख्या व्यक्ती पाहील्या की वाटतं ह्यांनी संसारातुन थोडीशी विरक्ती घेतली तरच बरं!

Pages