कर्ता - भाग २

Submitted by मानुषी on 27 April, 2010 - 02:37

कर्ता - भाग १

.............रात्री उशिरापर्यंत कुणी कुणी भेटायला येत राहिले. मंडळी रात्रीच्या जेवणासाठी डायनिंग टेबलाभोवती जमली. शशी माईंना बोलावून घेऊन आली. जेवता जेवता गप्पा चालू होत्या.

शशी शुभदाला म्हणाली, "वहिनी........मी आईला थोडे दिवस माझ्याकडे घेऊन जाते. ऋषी, पणू पण पहाते येतात का ते.सर्वांनाच थोडा चेंज हवाय.......आणि तुम्ही दोघांनी नक्की केलंय का उद्याचं जायचं?"

"शशी खरं म्हणजे आता आम्हाला जायला हवं........तिकडची कामं दिसतायंत डोळ्यापुढे." शिरीष म्हणाला.
"हो ना .........जायला तर हवंय........पण इथली ओढ अस्वस्थ करते गं....पुढे काय या विचारानं डोक्याला भुंगा लागतो बघ. तशी रवीदादांची विश्वासाची माणसं आहेत गं तरी ..........काही वेळा विचार करकरून फ़्रस्ट्रेशन येतं! आपण इतके जवळचे असतो एकमेकांचे तरी कुणीच कुणाच्या आयुष्याला पुरत नाही. ज्याचे भोग त्यालाच भोगावे लागतात." शुभदा खंतावून बोलत होती. हातात घास तसाच राहिला होता. तिचा या घरावर इथल्या माणसांवर जीव होता. पण तिला स्वता:च्या संसारासाठी मुलांसाठी जायला लागणार होते.

"अगं शुभदा, शशी ..तुम्ही कुण्णी राहिला नाहीत तरी चालेल.......फ़क्त ती बया नाही येऊन बसली आपल्या उरावर म्हणजे झालं.....तसंही ऋषीचा ओढा आहेच तिच्याकडे." माईंनी पुन्हा डोळ्याला पदर लावला.

"आई काहीतरीच बोलतेस तू .........इतक्या वर्षात मुलांसाठी कधी तिचा जीव तुटला नाही .....ती आता कसली येतेय?" शशी म्हणाली.

"विपरीतच घडायचं म्हटल्यावर काहीही घडू शकतं! देवानं मला म्हातारीला ठेवलयं ना इथं दु:ख भोगायला पंच्याऐंशिव्या वर्षी!" माईंनी कांगावा केला...जेवण टाकून हुंदके देऊन रडू लागल्या.

"आई असं काय करतेस? आपण आहोत ना सगळे.........काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल हळूहळू" शिरीष हात धुवायला बेसीनकडे जाताजाता आईची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता.
"काही सांगू नको तू शिरीष.......आता डॉक्टरच्या प्रॉपर्टीचं जमिनीवर पडलेल्या गुळाच्या भेलक्यासारखं झालंय. नुस्ते मुंगळे जमा होतील आता."माई ऐकायला तयारच नव्हत्या.

"आई पुरे ना आता..आणि तू जेव गं" शशी सुद्धा आता कंटाळली होती.रवीच्या आजारपणात ती सारखी जाऊन येऊन होती. तिने मोठ्या भावाची अगदी मनापासून सेवा केली होती. सर्वात धाकटी सुधा मात्र लगेचच परत गेली.तिला तिच्या सासरी काही अडचणी होत्या. आता शशीचा जीव स्वता:च्या संसाराकडे ओढ घेत होता.आणि ज्याच्यासाठी एवढं केलं तोच आता नव्हता.

"नको मला शशी... इच्छाच नाही बघ." माईंनी बोलता बोलता ताट पुढे सरकवलं. त्या उठल्या. सगळे पांगले. सरूबाईंनी भराभर टेबल आवरलं. टेबल पुसण्यासाठी रोजचं पुसणं पहात होत्या.
"सरूबाई....काही शोधू नका पुसणं......नाही सापडणार तुम्हाला......अहो मी मगाशीच सगळी पुसणी बदललीयेत. तुमचं आज्जिबात कामात लक्ष नाहीये.सगळी पुसणी कळकट्ट झाली होती."बेडरूममधे जाताजाता माईं सरूबाईंना फ़डक्यावरून फ़टकारून गेल्या. चांगला खडा आवाज लागला होता. जेवतानाच्या दु:खाचा कुठे मागमूसही नव्हता.

शशी शुभदा मागची ठेवरेव पहात होत्या.सरूबाईंचा दुखावलेला चेहेरा पाहून दोघींनी एकमेकींकडे हताश कटाक्ष टाकला.तोच माईंचा पुन्हा बेडरूममधून आवाज आला,"अगं शुभदा उद्यासाठी दही विरजलं का? प्रणव दह्याशिवाय जेवत नाही."

"ज्या मुलाला मी वर्ष दोन वर्षं सांभाळला त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी आता माईंनी मला सांगाव्यात ....!"शुभदाच्या मनातला विचार शशीनेही ओळखला. दोघीत नणंद भावजयीपेक्षा मैत्रिणींचंच नातं होतं.
शुभदाने दही विरजलं, सकाळी भिजत घातलेली मटकी उपसून जरा आसडून पंच्याच्या कापडात बांधली आणि मोड आणण्यासाठी कॅसरोलमधे ठेवली.

शशी माठातलं थंडगार पाणी प्यायली......शुभदाला दिलं. दिवसभरच्या थकलेल्या दोघी जरा डायनिंग टेबलावर विसावल्या.

शशी म्हणाली, "आईला कसं कळत नाही ......सगळ्यांशी फ़टकारून बोलते."

शुभदानेही शशीला दुजोरा दिला,"हो ना......अगं माझ्याकडे होत्या ना दोन महिने .......माझ्या कामवाल्या बाईला सळो की पळो करून सोडलं होतं बोलून बोलून. पोळ्यांच्या शांताबाई तर कामच सोडून गेल्या.म्हणाल्या, आजी गेल्यावर मगच येईन.........जाऊ दे! ....शशी ...निरुपमाचा काही फ़ोन सुद्धा नाही का गं?"

"नाही ना ....कशी पाषाण र्‍हदयी, निष्ठूर बाई आहे खरंच!" शशी अगदी हताश झाली होती.

"शशी रवीदादांचं आठवलं की असं वाटतंहा घरातला कर्ता.....व्यावसायिक पातळीवर इतका यशस्वी माणूस.........पण खाजगी जीवनात जणू त्यांनी मनोमन हारच पत्करली होती." शुभदाने निश्वास टाकला.
"रवीदादानं स्वता:च्या लग्नाच्या वेळी आईला विरोध करायला हवा होता.पण रवीदादाच काय आप्पा सुद्धा तिला कधी विरोध करत नसत. नेहेमी आपलं तिच्या कलानं. "शशी म्हणाली.
"शशी, वैशाली या घरात आली असती तर हे पुढचं सगळं घडलंच नसतं. केवळ आईचं मन राखायचं म्हणून त्यांनी मनावर धोंडा ठेवून वैशालीशी कायमचंच नातं तोडून टाकलं." शुभदाला मागचं आठवून त्रास होत होता.
"हो ना............आईला वैशालीचे गुण कधीच दिसले नाहीत. चांगला नितळ सावळा रंग होता तर तिला काळी काळी म्हणून हिणवलं..........वर ते देशस्थ कोकणस्थ........त्यातून तर ती कधीच वर आली नाही."शशी म्हणाली.
" निरुपमा सुद्धा अशी वागेल असं वाटलं नव्ह्तं सुरवातीला. पण नंतर सगळच चुकत गेलं."शुभदानं सुस्कारा टाकला.
दोघी नणंदा भावजया रात्री खूप उशिरापर्यंत बोलत बसल्या.हळूहळू सगळीकडे सामसूम होत गेली. फ़क्त ऋषीच्या खोलीतून कीबोर्डची टकटक ऐकू येत होती.

........मोठ्यांच्या भांडणात लहान मुले नेहेमीच होरपळली जातात. आईवडिलांच्या मतभेदाचे चटके त्यालाच सर्वात जास्त बसले होते. त्याचा जणू भविष्यकाळच पुसला गेला होता.

..............निरुपमा आणि रवी दोघांची आयुष्ये कायम एकमेकांना समांतर चालत राहिली. दोघांच्या विचारसरणीतच खूप फ़रक होता. रवीच्या सगळ्या वागण्याबोलण्यातली तर्कसंगती निरुपमाच्या आकलन शक्तीपलिकडची होती. लग्नानंतर बघता बघता रवी आपल्या प्रॅक्टिसमधे खूप व्यग्र होत गेला. दोघातली दरी वाढतच गेली. रवीने लवकर घरी यावं असं काहीच आकर्षण उरलं नव्हतं. त्यात प्रणव मतिमंद जन्माला आला. नियतीने शेवटचा दोरही कापून टाकला. निरूपमाला तर मुलांची माया सुद्धा रोखू शकली नाही. प्रणवच्या जन्मानंतर ती अधिकच तुटक झाली. तिचं चित्त आता या मांडलेल्या खेळात लागेना.
शेवटी पाच वर्षाचा प्रणव आणि नऊ वर्षाचा ऋषी ....दोघांनाही सोडून ती माहेरी निघून गेली. रवीला तर मनातून तिने कधीच सोडून दिलं होतं.
माहेरी गेली तरी तिने ऋषीचा पिच्छा सोडला नाही. त्यांच्यात फ़ोन चालायचे. कधी सुट्टीत तो तिकडे आजोळी आठ पंधरा दिवस राहून यायचा.पण निरूपमाने प्रणवला कधीच तिकडे नेले नाही.
ऋषीच्या बालमनाला कधी कळलं नाही की आपण कुणाचं ऐकायचं! आईचं बरोबर की बाबांचं. वाढत्या वयात त्याने फ़क्त आई वडिलांच्यातले विकोपाला गेलेले मतभेद आणि भांडणं हेच अनुभवलं होतं. त्यांचं मन दुबळं झलं होतं.

त्याच्या कॉलेजच्या अ‍ॅडमिशनच्या वेळेसही सर्वांनी गृहीतच धरलं होतं की हा आता सायन्सला जाऊन पुढे मेडिकलला नक्की जाणार. त्याला तसे मार्कही बरे असायचे. पण त्याने कुणाचेच न एकता आर्ट्सला प्रवेश घेतला. रवीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण आईचं वाक्य त्याच्या कानात घुमत होतं, "काहीही हो बाबा पण डॉक्टर होऊ नको". निरुपमाचं हे जणू घोषवाक्यच बनलं होतं. आणि तिला ऋषीच्या मनावर जे बिंबवायचं होतं त्यात ती शंभर टक्के यशस्वी झाली होती.

आजही ऋषी काँप्यूटरसमोर बसून विचार करत होता, "खरंच मी जर डॉक्टर झालो असतो तर बाबांना जाताना जरा कमी यातना झाल्या असत्या का? माझ्या काळजीने त्यांना मरताना किती यातना झाल्या असतील. पणूची काळजी...ती वेगळीच........हो, पण मी मग आईचं का ऐकलं? आपण रहात होतो बाबांजवळ, बाबांच्या घरात आणि ऐकत होतो बरचंस आईचंच.............असं का झालं?..........की बाबांचं ते हॉस्पिटलला वाहून घेतलेलं आयुष्य पाहून त्या व्यवसायाविषयी मनात तिटकारा रुजला हळूहळू?............"

रवीनंही मुलांना फ़ारसा वेळ दिलेला नव्हता. तो नेहेमी म्हणायचा,"प्रत्येक व्यावसायिकाला उज्ज्वल भवितव्यासाठी सुरवातीच्या नव्या नवलाईच्या दिवसांचा बळी द्यावाच लागतो. तेव्हाच कुटुंबातल्या इतर सदस्यांनी त्याला संभाळून घ्यायचं असतं."

रवी उज्ज्वल भवितव्यासाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी कष्ट करून पैसा मिळवता मिळवता, कुटुंबापासून दूर दूर जात राहिला.मुलांच्या सगळ्या गरजा, सगळी बारीक सारीक आजारपणं घरचा डॉक्टर असूनही दामू गडी, सरूबाई यानींच निभावून नेली. कुठं तरी गणितं चुकत गेली.

आणि माईंच्या त्या तश्या स्वभावामुळे अडचणीच्या वेळी सगळे म्हणत...आम्ही आमची अडचण निभावून नेउ......पण आमच्या अडचणीच्या वेळी माई नकोत. शुभदा तर म्हणायची ..."माईंना मी आरामासाठी माझ्याकडे न्यायला तयार आहे. पण माझ्या अडचणीला त्या नकोत."

या सगळ्याची परिणिती रवीच्या पहिल्या हार्ट अ‍ॅटॅकमध्ये झाली.मुलं बिचारी बावरून गेली. निरुपमा तर आधीच निघून गेलेली.....!त्यातच माई येऊन राहिल्या.........त्याचं तर कुणाशीच पटत नसे. अगदी रवीशी सुद्धा त्यांचे खटके उडत.

..........खूप रात्र झाली होती. ऋषीने कॉम्प बंद केला. विचार करता करता कधी तरी खूप उशिरा त्याला झोप लागली.
क्रमशः
कर्ता - भाग ३

गुलमोहर: