कर्ता - भाग १

Submitted by मानुषी on 26 April, 2010 - 08:15

"थोडाथोडका नाही पंधरा लाख रुपये खर्च झाला." बोलता बोलता माईंनी डोळ्याला पदर लावल्यासारखं केलं. शेजारीच बसलेल्या अक्कांनी एक जळजळीत कटाक्ष माईंकडे टाकला. माईंच्या लक्षात आलं, आपण परत परत खर्चाचं बोलतोय ते आपल्या मोठया बहिणीला आवडलं नाही. म्हणून पुढे सारवासारवीचं बोलल्या, "खर्चाचं काही नाही गं.........एवढं कमावून ठेवलं होतं डॉक्टरने ............त्यातलं एवढं चिमटीभर गेलं उडून वार्‍यावर म्हणायचं न काय!" दोन्ही हात हवेत उडवून माईंनी सुस्कारा टाकला.

हे सगळं सुमनताईंसाठी होतं. सुमन..माईंची जुनी मैत्रिण. रवी गेल्याचं कळल्यावर माईंना सांत्वनासाठी भेटायला आली होती.

"हो ना केवढा पसारा घालून ठेवून गेला. आता या हॉस्पिटलला वाली कोण गं माई?" सुमनताईंनी वरवर माईंना दुजोरा दिला. पण मनातून त्यांना वाटलं,.........माणसाचा स्वभाव काही बदलत नाही......हिचा मुलगा गेला म्हणून मी सांत्वनासाठी आले तर ही मला त्याच्या आजारपणातला जमाखर्च सांगतेय.आणि गेलेल्या मुलाच्या पैशाचा एवढा तोरा? पंधरा लाख रुपये म्हणजे का चिमटीभर?"पण सुमनताईंनी मनातले विचार मनातच ठेवले.
"पहा ना आता ऋषी डॉक्टर झाला असता तर निदान पुढची चिंता तरी मिटली असती गं. पण त्या निरुपमाने सगळा विस्कोट करून टाकलाय बघ." सुनेच्या नावानं खडे फ़ोडण्याची एकही संधी माई सोडत नसत.
"एवढा खर्च झाला तो झालाच वर हाती काहीच लागलं नाही गं. आणि शेवटी शेवटी डॉक्टरला फ़ारच त्रास झाला गं सुमन." स्वता:च्या मुलाचा उल्लेख माई अगदी टुकीनं डॉक्टर असा करत.

दामू गडी पाणी घेऊन आला. " दामूकाका जरा आत चहा सांगा बरं दोन तीन कप." अक्कांनी चहा सांगितला.
" अगं अक्का राहू दे" सुमनताई म्हणाल्या.

" या माईलाच दे एवढा घोटभर......."असं म्हणून सुमनताई थोडया माईंच्या जवळ सरकल्या आणि मायेनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.

"तुझी सून..............काय तिचं ते नाव.......येत होती हॉस्पिटलात डॉक्टरच्या आजारपणात काहीबाही खायला घेऊन..........पथ्याचं." बोलता बोलता माईंनी सुमनताईंचा खांद्यावरचा हात झटकल्यासारखं केलं आणि थोडया लांबही सरकल्या.

"किती हा अलिप्तपणा......किती कोरडं मन आहे हिचं" सुमनताईंच्या मनात आलं.
" सुजाता" सुमनताईंनी आपल्या सुनेचं नाव सांगितलं.

"हं........सुजाता! तर त्या दिवशी सुजाता केशव, दोघं असंच काही सूप बीप घेऊन आले होते. डॉक्टर म्हणाला सुद्धा त्यांना ........की तुम्ही दोघं माझ्या साठी खूप करताय म्हणून.........तर सुमन तुला सांगते, तुझा केशव काय म्हणाला असेल त्यावर?"

सुमनताईंना वाटलं ही कसली कोडी घालत बसलीये आत्ता....काही वेळ काळ! त्यांनी नुसतं माईंकडे प्रश्नार्थक चेहेर्‍याने पाहिलं.

सुजाताची दोन्ही बाळंतपणे रवीने स्वता: केली होता. स्त्री रोग तज्ञ म्हणून त्याचा हात धरू शकणारा पंचक्रोशीत कुणी नव्हता. माईंना तर रवीचा कोण अभिमान होता. रवी आणि सुमनताईंचा केशव..... दोघांची लहानपणापासूनची मैत्री. जशी सुमनताई व माईंची होती. मैत्रीचा हा ओघ पुढच्या पिढीतही अविरतपणे चालू राहिला. केशव इंजिनीअर होता. आणि सुमनताईंचा धाकटा मुलगा कुमार इंटेरियर डेकोरेटर होता. रवीच्या हॉस्पिटलचं घराचं बांधकाम केशव व कुमार दोघांनी मिळून केलं होतं.

अक्का चहा घेऊन बाहेर आल्या. "अगं माई किती वेळा सांगशील तेच तेच? त्या सुमनला जरा चहा घेऊ दे शांतपणे आणि तूही घे."अक्कांनी माईंना परत टोकलं. माईंचा तोंडचा पट्टा मोठी बहीण या नात्याने फ़क्त अक्काच थांबवू शकत.

माईंनी अक्कांकडे सपशेल दुर्लक्ष केलं." बरं का गं सुमन, केशव म्हणाला ......रवी , तू आमच्या कुमारच्या वेळी जे काही केलंस त्या मानानं हे काहीच नाही." माईंनी आपलंच घोडं दामटलं. चहा पिता पिता सुमनताईंना ठसकाच लागला. त्या थक्क झाल्या.

"किती प्रेमाने माणसं जोडली जातात.........त्या प्रेमापोटी आपण एकमेकांच्या अडचणीत एकमेकांना मदत करतो .........आधार देतो...........त्यात त्याच्या मानाने हे, आणि ह्याच्या मानाने ते असं काही तुलनात्मक मोजमाप असतं का? आणि सर्वात कळस म्हणजे हे कुमारचं आत्ता काढण्याची काही गरज होती का? या माईला काही काळवेळच नाही."सुमनताईंच्या मनात विचारचक्र चालू झालं.

सुमनताईंनी सतरा वर्षापूर्वीचं दु:ख कुलूपबंद करून भूतकाळाच्या खोल अंधार्‍या विहिरीत टाकून दिलं होतं. आंणि या माई...........जखमेवरची खपली नखलून काढावी तसं सुमनताईंचं दु:ख उकरून काढत होत्या.

माईंना जणू सार्‍या जगासमोर असं ठसवायचं होतं की पुत्रशोक झालेली मी एकटाच आई नाही या जगात.
"तुला सांगते सुमन ........डॉक्टर त्या दिवशी गेला होता कुठं तरी लेक्चर द्यायला."माईंना आपलंच खरं करायची सवय होती.सुमनताई आपल्या मैत्रिणीला पुरतं ओळखून होत्या. त्यांना आता पुढचं दृश्य स्पष्ट दिसू लागलं. त्या कळून चुकल्या की कुमारच्या...त्यांच्या मुलाच्या आत्महत्येची कथाच माईंनी सुरू केलीये. त्यातही स्वता:च्या गेलेल्या मुलाच्या लॅव्हिश लाईफ़ स्टाईलचं वर्णन करताना त्यांचा तोरा पहाण्यासारखा होता.

"तुला तर माहितीच आहे सुमन.........." माईंनी परत सुरवात केली.

"अगं हो गं बाई......मला जर सगळं माहिती आहे तर परत परत तेच काढून माझ्या दु:खावर डागण्या का देतेस?" सुमनताईंचा मनातला विचार मनातच राहिला. माई कुणाला बोलू देतील तर ना. त्यांनी आपलं चालूच ठेवलं

"डॉक्टरच्या सारख्या पार्टय़ा, कुठे लेक्चर्स, पिकनिक्स, ट्रेक.........वेळात वेळ काढून तो लोकात मिसळायचा! त्याचा जिमचा ग्रूप वेगळा, म्युझिक सर्कल वेगळं." माईंनी मधे जरा थांबून डोळे पुसले आणि म्हणाल्या, "बरं का सुमन, त्या दिवशी खाली हॉस्पिटलात आला होता केशवाचा फ़ोन. खालच्या रिसेप्शनिस्टनी विचारलं सुद्धा की वर माईंना देऊ का फ़ोन म्हणून. पण डॉक्टर जागेवर नाही म्हटल्यावर केशव नको म्हणाला. तेव्हाच जर हे कुमारचं माझ्यापर्यंत आलं असतं ना तर मी त्याच्या सेलफ़ोनवर डॉक्टरला गाठला असता."
सुमनताईंना वाटलं, "आता हे सगळं का मला माहिती नव्हतं! नंतर केशवनेच रवीला सेलफ़ोनवर गाठलंच होतं की. पण विधिलिखित कधी टळतं का? तरी या माईचा मीपणा काही संपत नाही."
आता माई पेटल्या होत्या. सतरा वर्षापूर्वी त्यांच्या मैत्रिणीच्या घरात घडलेल्या अशुभ घटनेचा वारंवार उल्लेख करून माई आपल्या मैत्रिणीच्याच मनाला डागण्या देत होत्या. त्यातही मी....मला.......माझे!
माई बोलतच राहिल्या, " सुमन मला वेळेवारी कळलं असत ना...........तर बघ सगळं चित्रंच बदललं असतं."
आता मात्र अक्का मधे पडल्या. खूप वेळ त्यांनी धाकटया बहिणीची बडबड ऐकून घेतली होती.त्यांचाही पारा चढला.
"माई......कशाला बोलतेस तू? तू तुझं स्वता:चं चित्र कधी बदलू शकलीस का?" अक्का चिडल्या होत्या.
"अक्का......! हे तू बोलतेस? मी संसारासाठी काय नाही केलं सांग बरं. सुमन तू सांग........तुला तर ठाऊक आहे सगळं....अप्पांनी फ़क्त नाकासमोर नोकरी करून घरात पैसे आणून टाकण्याचं काम केलं. मुलांची शिक्षणं, दुखणीबाणी, त्यांची करिअर, लग्नं..........अप्पांचा कशात तरी सहभाग होता का? आणि अक्का तू आता खरं सांग , संसार कुणी सांभाळला?" माईंच्या दुखर्‍या जागेवर बोट ठेवलं गेलं होतं.
सुमनताईंची मधल्या मधे वाईट अवघड अवस्था झाली होती. अक्का पण पडतं घ्यायला तयार नव्हत्या. त्या म्हणाल्या," माई तुझी सून निरूपमा भरल्या संसारातून उठून निघून गेली. त्यानंतर रवीच्या संसाराची काय अवस्था झाली होती? आणि घराचं काय चित्र होतं?"
"अक्का.......तू निरूपमा आणि डॉक्टरच्या डायव्होर्सलाही मलाच जबाबदार धरतेस? शर्त आहे बाई तुझी!"
"अगं माई विचार कर तू जरा..........सर्वांच्या तंटयात मुलांचे किती हाल झाले?" अकांनी पण लावून धरलं होतं.
"घरात घडणार्‍या सर्व अभद्र वाईट गोष्टींसाठी तुम्ही सगळे मलाच का जबाबदार धरताय? आणि निरूपमा निघून गेल्यानंतर मी प्रणवला माझ्याकडे परभणीला घेऊन गेले ते विसरलीस अक्का? अगं मतिमंद मुलाला सांभाळणं सोपं काम आहे का?" माई आता अगदी चिरडीला आल्या होत्या.
परभणीला अप्पांची नोकरी होती. आणि तिथेच माईंच्या सासरची वडिलोपार्जित शेतजमीन होती. मोठा वाडा होता. चार पाच भाडेकरू होते. परभणीतही माई अगदी राज्य करायच्या.
तरी त्यांचा उरला सुरला मुक्काम रवी शिरीषकडे विभागला जायचा. शशी सुधा.....दोघी मुलींना खूप वाटायचं आईनं यावं म्हणून. पण माई शशी सुधाकडे मात्र अगदी सठीसामासीच जायच्या..........काही कारणास्तव!
...........बहिणींचा वाद चालूच राहिला. अक्का म्हणाल्या, "अगं तू म्हणतेस तू पणूला परभणीला नेलास..पण कोणत्या परिस्थितीत? आणि काही उपयोग झाला त्याचा? कारण त्याला आधी शुभदाने आपल्याकडे.......मुंबईला नेला होता.......निरूपमा निघून गेल्यावर. चांगला मतिमंदांच्या शाळेत घातला........त्याची केवढी काळजी घ्यायची ती! तेही स्वता:चा संसार, मुलं, बँकेतली नोकरी ........सगळं सांभाळून!"
शुभदा माईंची मोठी सून.....शिरीषची बायको. अक्कांच्या लक्षात आलं की आपल्या वादंगात सुमनताई अवघडून गेल्या आहेत.म्हणून अक्का त्यांनाही संभाषणात घेण्याचा प्रयत्न करू लागल्या.
"बरं का सुमन .......प्रणव चांगला सुधारत होता. शुभदाकडे मुंबईला. जरा वळण लागत नव्हतं तोवर हिनं त्याला उचलून परभणीला नेला. जरा सुनेला गेलं असतं क्रेडीट तर काय बिघडलं असतं गं?" अक्का सुमनताईंशी बोलता बोलता स्वता:शीच चिडल्या.
आता मात्र सुमनाताईंची परिस्थिती खरंच अवघड झाली होती. त्यांना सगळा इतिहास माहिती होता. त्यावेळी प्रणवसारख्या मतिमंद मुलाला कुणीतरी आधार देण्याची...त्याची जबाबदारी कुणी तरी घेण्याची गरज होती. ती शुभदाने स्वता: होऊन स्वीकारली होती. निरूपमा तर मुलांकडेही न पहाता निघून गेली होती.
"अक्कामावशी, लोणकर वकील येताहेत पंधरा मिनिटात...........फ़ोन आला होता त्यांचा. दोघंही येताहेत." शुभदा ओढणीला हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या कानावर सगळी चर्चा गेलीच होती. कारण काम करता करता तिचा एक कान बाहेर होताच.
"अक्कामावशी जरा मधे बोलते...........इथे काय किंवा परभणीला काय प्रणवला जी स्पेशल ट्रीटमेंट मिळते........ती तिकडे मुंबईला माझ्या घरी बिलकुलच नव्हती. म्हणजे पहा.....इथे कसं सगळी...अगदी गडीमाणसांसकट "पणूदादा पणूदादा" करत त्याच्या पुढेमागे धावतात. त्यामुळे आपण म्हणजे कुणीतरी विशेष व्यक्ती आहोत असा त्याची स्वता:बद्दल भावना झाली होती.......त्याची इथे प्रगती न होण्याचं ते एक मुख्य कारण होतं."
"खरंच गं शुभदा मागे मी मुंबईला आले होते तेव्हा मी पाहिलं ना.... कसा सुतासारखा सरळ आला होता. मला इतका बदल जाणवला होता त्याच्यात. खूपच शांत आणि स्थिर वाटला होता."अक्का म्हणाल्या.
" हो ना ... तुम्ही तेव्हा कुणाच्या तरी लग्नाला आला होतात. अक्कामावशी... प्रणव ज्या शाळेत जायचा तिथला ट्रेंड स्टाफ़, नाविन्यपूर्ण खेळणी आणि शिकवण्याची पद्धत यामुळे प्रणवचा जो काही मेंदू होता तो हळूहळू त्याच्या कुवतीनुसार काम करायला लागला होता."शुभदा म्हणाली.
................सुमनताई जाण्यासाठी उठून उभ्या राहिल्या, म्हणाल्या, " हो ना ...आता आपल्यात काही तरी कमी आहे, हे कळण्याची कुवत नाही बिचार्‍यात.....मला तर वाटतं देवानं रवीवरच सर्व बाबतीत अन्याय केलाय. काय करणार... आले देवाजीच्या मना....!..........त्यातल्या त्यात म्हणजे अप्पांना हे सगळं सोसायला देवानं ठेवलं नाहीये"
"शुभदा गजू ड्रायव्हरला गाडी काढायला सांग......म्हणावं .....या मावशींना सोडून ये." अक्का म्हणाल्या. सुमनताईंनी सर्वांचा निरोप घेत्ला.
.............शुभदाला खरं तर झाल्या प्रसंगाचा फ़ायदा घेऊन विषय पुढे वाढवायचा होता. कारण माईंनी प्रणवला मुंबईहून पुन्हा परभणीला अचानकच नेल्यामुळे, चांगला सुधारत असलेला मुलगा.........पुन्हा त्याची गाडी घसरणीला लागली होती.इतके कष्ट करून शुभदाने केलेल्या प्रयत्नांवर पाणी पडले होते. या गोष्टीची तिच्या मनात कायमची खंत राहिली होती. पण अजूनही सासूपुढे जास्त बोलण्याची तिची हिंमत नव्हती. ती जरा घुटमळलली व नंतर गजूला पाहायला मागील दारी गेली.
संध्याकाळ कलत आली होती तरी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या.
माई शून्यात नजर लावून बसल्या होत्या. गेट वाजलं तशी जरा सावरून बसल्या. लोणकर वकील बायकोला घेऊन आले होते.......थोडा वेळ निस्तब्ध शांतता. कुणीच काही बोललं नाही.
"फ़ार वाईट झालं............आता त्याच्यासारखा डॉक्टर पुन्हा होणे नाही." सुस्कारा टाकत लोणकर म्हणाले.
"हो ना.....आमच्या नेत्राला बाळंतपणात अगदी जीवदानच मिळालं डॉक्टरांमुळे." बायकोने नवर्‍याला पुस्ती दिली.
"आम्हाला सुद्धा आमचा मुलगा याचं दु:ख तर आहेच पण त्याही पेक्षा हजारो पेशंटसचा कैवारी गेल्याचं दु:ख जास्त आहे." भाषणातलं वाक्य टाकावं तसं माईंनी वाक्य टाकलं. त्यांचा आवाजही अंमळ मोठाच लागला होता. प्रसंगाला विशोभित. त्यांनी सावधपणे आजूबाजूला तिकडे नजर टाकली. "अक्का दिसत नाही हॉलमधे.........लवंडली वाटतं." आपल्याशीच पुटपुटल्या. इकडे तिकडे पहात थोड्या लोणकरांजवळ सरकल्या आणि खाजगी आवाजात विचारू लागल्या, "लोणकर एक विचारू का?वाईट दिसेल .........म्हणाल, ही आई आहे की कोण?........हिला कोणत्या प्रसंगी काय सुचतंय? पण गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात ना?"
"बोला हो माई........"लोणकर म्हणाले.
"ऋषीचं सगळं वागणं तुम्हाला महिती आहे..........त्याच्याशी काही संवादच होऊ शकत नाही. प्रणवचा काही प्रश्णच येत नाही.सगळं कळतंय आणि तरी काहीच कळत नाही.....अशातली गत! ती निरूपमा तर केवळ मुलांना जन्म दिला म्हणून आई म्हणायची.........मग उरलं कोण? आता तुम्हाला मलाच पुढच्या हालचाली करायला हव्यात."
लोणकरांच्या लक्षात येत होतं सगळं तरी त्यांना माईंच्या तोंडून स्पष्ट ऐकायचं होतं. ते म्हणाले, "माई कशाबद्दल बोलताय तुम्ही........?"
"अहो, असं काय करताय लोणकर तुम्ही..........डॉक्टरच्या विलचं काय? तो म्हणाला होता लोणकरांना सगळं माहिती आहे म्हणून."
आता लोणकरांची जरा पंचाइतच झाली होती. कारण माईंनी जेव्हा विलचा विषय काढला तेव्हाच ऋषी वरच्या बेडरूममधून हॉलमधे येत होता. तो जिनाच उतरत होता. तिकडे माईंची पाठ होती. तो माईंचं बोलणं ऐकत एक क्षण जिन्यात थांबला. माईंना खूप कमी ऐकू येत असल्याने त्यांना ऋषीच्या येण्याची जाणीवच झाली नाही.
पुढचा प्रसंग टाळण्यासाठी........माईंनी ऋषीबद्द्ल आणखी काही बोलू नये म्हणून......ते अमंळ मोठ्यानेच म्हणाले, " अरे ऋषी ये ना.......बस."
जेणेकरून माईंना ऋषीच्या येण्याची जाणीव व्हावी.
पंचविशीतला ऋषी पूर्णपणे वडिलांवर गेलेला होता. उंचापुरा, तगडा, गोरापान.........पण रोखून पहायला लागला की निरूपमाची आठवण व्हायची. तस्सेच पिंगट डोळे. ........!
निरूपमाला या घरात माईंनीच आणले होते. खरं म्हणजे रवी त्याच्याच वर्गात शिकणार्‍या वैशालीत गुंतला होता. दोघांनी लग्न करायचं ठरवलेलं होतं. पण रंगानं थोडी सावळी असलेली वैशाली माईंना कधीच आवडलेली नव्हती. वरवरच्या गोष्टींना पटकन भुलण्याचा त्यांचा स्वभाव...त्यामुळे वैशालीतले सुप्त गुण त्यांना कधीच दिसले नाहीत. अप्पा मात्र या वेळी माईंच्या विरोधात असायचे.......आणि अर्थातच वैशालीच्या बाजूचे. पण माईंनी शेवटी आपलंच खरं केलं.
त्यांनी आपल्याच लांबच्या नात्यातली निरूपमा शोधून आणली.खरोखरंच खूपच देखणी होती ती! लख्ख गोरा रंग, लांब सडक केस, रेखीव नाक डोळे.........सौंदर्याची सर्व बाह्य लक्षणं तिच्यात होती..........!
ऋषी जिना उतरून खाली आला. कपाळावर केस, डोळ्यात विखार.......तो नुसता येऊन शांतपणे माईंच्या पुढ्यात उभा ठाकला.
माई सटपटल्या. चाचरत विषय बदलू लागल्या."ऋषी मी काय म्हणत होते.......तुमची आई फ़िरकलीच नाही रे, एवढं कळवून सुद्धा साधा एक फ़ोनसुद्धा केला नाही रे! आपला नवरा मरणाच्या दारात आहे कळल्यावर तरी एखादी मागचं सगळं विसरून तोंडदेखलं तरी येऊन गेली असती."माईंनी परत डोळ्याला पदर लावला. एक अस्फ़ुट असा हुंदका सुद्धा दिला.
"आजी विलचं काय म्हणत होतीस?"ऋषीने माईंच्या तोंडावर थंडगार प्रश्न टाकून त्यांना एकदम तोडूनच टाकलं.
"बरंय माई आम्ही निघतो आता हळूहळू.......ऋषी आता माई, प्रणव सर्वांकडे तुलाच पहाचंय." लोणकरांची जरा अवघड परिस्थिती झाली होती. वातावरण तापत चालल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी समारोपाची वाक्य टाकण्याचा प्रयत्न केला.
"दामूकाका महामूर्ख....दामूकाका महामूर्ख! ए दादा दादा त्याला शिक्षा दे ना रे." आपल्यामागे दोन्ही तीन्ही दारं आपटत वेडावाकडा पळत प्रणव धापा टाकत हॉलमधे दाखल झाला.
"का रे पणू?"ऋषीने अगदी गोडीत विचारलं.
"दादा दामूकाका माझ्याबरोबर गाडीतून फ़िरायला येत नाही. त्याला शिक्षा कर." प्रणवने मोठया भावाकडे तक्रार नोंदवली.
साधारण प्रतीचे, पण इस्त्री वगैरे केलेले कपडे घालून, पावडर लावून, भांग बींग पाडून प्रणव गाडीतून फ़िरायला जायच्या तयारीत होता.
लोणकारांना जाणवलं, प्रणवशी बोलताना ऋषीच्या डोळ्यातला विखार अगदी निवतो.
ते म्हणाले,’अरे याला आज कुणी फ़िरवून नाही का आणलं? रोज जगू ड्रायव्हरच्या शेजारी अगदी ऐटीत बसलेला असतो."
"नाही ना काका........आज सगळेच जरा धांदलीत आहेत. सगळं रूटीनच बदललंय ना सध्या......दामूकाका, गजू, सगळेच काही ना काही इतर कामात बीझी आहेत."ऋषी नाराजीनेच म्हणाला.
प्रणवला बाकी समज जरी कमी असली तरी त्याची मालकी हक्काची भावना मात्र चांगलीच जोपासली गेली होती.
"काका तुम्हाला सांगतो, पणू जरा जादाच होत चाललाय दिवसेंदिवस..."ऋषी धाकट्या भावाविषयी करत होता तक्रारच, पण त्यालाही एक कौतुकाची झालर होती
"आपले घोलपकाका आहेत ना मेडिकल शॉपमधले............" तो पुढे सांगू लागला.
रवीने पेशंट म्हणून ओळख झालेल्या घोलपांना वेळोवेळी खूप आर्थिक मदत केली होती. त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना आधार दिला होता. हळूहळू स्नेह वाढत गेला. त्यांना आपल्या हॉस्पिटलच्या आवारातच औषधांचे दुकान काढून दिलं होतं. घोलपांनी सचोटीने दुकान चालवून त्यावर त्यांचं स्वता:चं घर झालं होतं.
ऋषी बोलत होता म्हणून जायला निघालेले लोणकर दारातच थांबले होते.
ऋषी म्हणाला, " काका बाबांना मागच्या महिन्यात चेकपसाठी मुंबईला नेलं होतं ना....त्यांच्याबरोबर हे पणूसाहेबही गेले.....आणि साहेब गेले म्हणून त्यांच्या दिमतीला दामूकाका.....! असे लाड करून घ्यायची सवय लागलीये याला." प्रणवच्या निर्बुद्ध चेहेर्‍यावर एक बावळट हसू होतं. त्याला कळत होतं की आपलंच कौतुक चाललंय.
ऋषी पुढे म्हणाला, "संध्याकाळी कसा तिकडे मेडिकल शॉपमधे जाऊन बसतो...माहितीये ना तुम्हाला........नुसता टाईमपास."
" हो ना आणि घोलपांशी गप्पा चाललेल्या असतात.आणि गिर्‍हाइकांशीही......अगदी शहाण्यासारख्या गप्पा मारतो बरं का." लोणकर म्हणाले.
"अहो काका तेवढंच नाही........याचं डोकं पहा कसं नको तिथं चालतं ते......एकदा घोलपकाका सहज याला म्हणाले....पणूदादा आला नाहीत दोन तीन दिवसात........तर हा त्यांना काय म्हणाला असेल?......"ऋषीला बोलता बोलता हसू आवरत नव्हते.
"हा म्हणतो, ...तुम्हाला काय करायचंय? मी कधीही येईन........मालक कोण? तुम्ही की मी?"
"शाब्बास" लोणकरही हसण्यास सामील झाले.
वातावरण जरा निवळलं. लोणकरांना माहिती होतं की बिचार्‍या पणूला स्वता:ला ओळखण्याची कुवत नव्हती आणि त्यात घरात अती लाड. म्हणूनच तो बिथरल्या सारखा वागतो.
"दादा दादा" करूत प्रणवने ऋषीला सुचू दिलं नाही.
"काका तुम्ही बसा.....मी आलोच."म्हणत ऋषी प्रणवला पुढे घालून किचनकडे गेला.
लोणकर पहात होते. त्यांना वाटलं प्रणवही एक दोन वर्षात ऋषीची उंची गाठणार..
"अरे तुमचं चालू द्या........आम्ही निघतो"म्हणत लोणकरांनी सर्वांचा निरोप घेतला.
लोणकरांना प्रणवच्या सगळ्या सवयी माहिती होत्या. प्रणवला कसं सगळं चागलं चुंगलं लागायचं. इस्त्रीचे कपडे, छान तेल लावून पाडलेला भांग, बूटमोजे ........आणि या सगळ्याला विसंगत असं चेहेर्‍यावरचं निर्बुद्ध हास्य.पण घरातल्या सगळ्यांवर दादागिरी करून तो स्वता:चं सगळं अगदी व्यवस्थित करून घ्यायचा.

..............अंधार झाकोळून आला होता.मागील दारातून थंड हवेच्या झुळका यायला सुरवात झाली. दामू येऊन पुढच्या व्हरांड्यातलं दार लावून गेला.

स्वयंपाकघरात शुभदा सरूबाईंना सूचना देत होती. रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती. शशी, शिरीष.....दोघं भावंडं काही कामासाठी बाहेर गेले होते ते परत आले. शिरीष शुभदा दोघांनाही मुंबईला परतून आपापलं रूटीन चालू करायचं होतं. शुभदाने बँकेत रजा टाकली होती. शिरीषची वकिली सेलफ़ोनवरून चालू होती.

................माईंच्या चौघा मुलांपैकी एक रवी वगळता तसं सर्वांच बरं चाललेलं होतं. अर्थातच त्याचं श्रेय माई स्वता:कडेच घ्यायच्या.म्हणायच्या, "माझा शिरीष माझ्यामुळेच वकील झाला.मी लहानपणापासून तसं बिंबवलेलंच होतं ना त्याच्या मनावर.........आणि शशी.... तिला तर मीच लहानपणापासून गाण्याचा क्लास लावला. आता पहा कशी मस्त गाते आणि कॉलेजात संगीत शिकवते..........आणि रवी? त्याला तर इंजिनीअर व्हायचं होतं.........पण मी ठरवलेलंच होतं की हा डॉक्टरच होणार. अहो पर्सनॅलिटीच आहे तशी........अगदी डॉक्टरला साजेशी. आणि सगळ्यात धाकटी सुधा.......सारखी काही ना काही प्रयोग करायची लहान होती तेव्हा.........मीच तिच्यातली संशोधक वृत्ती ओळखली आणि आता पहा......आजमितीला ती भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमधे सायंटिस्ट आहे."

हेच पुराण हातवारे करून, मोठ्या आवाजात, वेळकाळ काही न पहाता खूप जणांसमोर सांगून झालं होतं.
त्यांचं हे पुराण सुरू झालं की शुभदाला अगदी ऑकवर्ड होत असे.
तिला वाटे, " नुसतं मी, मला, माझं..........बिचार्‍या अप्पांना अगदी अनुल्लेखानं मारतात माई."

एकदा तर या सगळ्याचा अतिरेक झाल्यावर ती हिंमत करून माईंना म्हणाली होती, " माई मुलं आपापलं नशीब घेऊनच जन्माला येतात. आपण फ़क्त त्यांना एक सुखी ,समृद्ध ,सुंदर बालपण द्यायचं असतं." हे वाक्य तिच्या आईचं होतं. तेच तिनं माईंना ऐकवलं होतं. पण माई कुणाचंच एकून घेत नसत.

.............शिरीषला पायलट व्हायचं होतं. पण त्याची दृष्टी थोडी अधू असल्याने त्याला तिकडची वाट बंद झाली होता. तरी तो एक यशस्वी वकील झालाच. या साध्यासुध्या गोष्टीला माई वेगळाच रंग देत व सगळं क्रेडिट स्वता:कडे घेत.

क्रमशः
कर्ता - भाग २

गुलमोहर: 

मागे पण कोणाचातरी असाच प्रॉब्लेम झाला होता. बहुतेक पहिल्यांदा एक ओळ जास्त सोडावी लागते.

मानुषी
तुम्ही पॅरा नीट पाडलेले नाहीत म्हणून अस होतेय. कथेच्या सुरूवातीला १-२ ओळी मोकळ्या सोडा आणि बाकी सगळीकडे पॅरा पाडा. लेखनात खूप जास्त कंटेंट असले की असे होते बर्‍याचदा.

कथा खूप मोठी असल्याने दिसत नव्हती. ती आता ३ भागात विभागली आहे. प्रत्येक भागाच्या शेवटी पुढिल भागाचा दुवा आहे.
तसेच लिहितांना परिच्छेदांमध्ये मोकळी ओळ सोडा.