आरश्यासमोर

Submitted by nikhilmkhaire on 22 April, 2010 - 05:49

आरश्यासमोर फोटो
फोटोत आरसा
आरश्यासमोर दुसरा आरसा

मग आरश्यात आरसा
आरश्यात फोटो
फोटोत आरसा... अनंत आरसे अनंत फोटो

'पोटापाण्यापलिकडे सध्या काय करतो?'
पोटापाण्यासाठी नाटक करणारा मित्र विचारतो.

कविता करतो
आणि फाडून खाऊन टाकतो
शाईमुळे चव चांगली लागते.

या ढंगाची असेल तर
दुपारच्या चहासोबत

त्या ढंगाची असेल तर
रात्री झोपायच्या आधी

कधी चांगली वाटलीच तर
तंबाखू गुंडाळायला

मी अशा पथ्याच्या वेळा पण सांगतो.
मग तो निघून जातो.

मग मलाच माझी लाज वाटते, अशा प्रिटेंशियस वागण्याबद्दल.
मग मी ही कविता पण फाडून टाकतो.

आणि नवी कविता लिहितो, ही कविता का फाडली ते लिहिण्यासाठी...

पुन्हा आरसा
आरश्यासमोर फोटो
फोटोत आरसा
आरश्यासमोर दुसरा आरसा

मग आरश्यात आरसा
आरश्यात फोटो
फोटोत आरसा... अनंत आरसे अनंत फोटो

एक दगड आरश्यावर एक दगड डोक्यावर!
बस्स!
मग आरसा फुटतो, डोकंही फुटतं.

मग फुटक्या डोक्यात.. फुटक्या काचा.... पुन्हा तेच....
गरगरतंय आता.. थांबवा कुणीतरी....

--
निखिल

गुलमोहर: 

गरगरतंय आता.. थांबवा कुणीतरी...

उचंबळून येणार्‍या काव्यस्फूर्तीला आता उमासे? Wink

निखिल,
वा छान मस्त...
इत्यादी इत्यादी बुळबुळीत प्रतिक्रियांच्या पलिकडे आवडली.

अरूण कोलटकरांची आठवण येणं अपरीहार्य आहे.

>>'पोटापाण्यापलिकडे सध्या काय करतो?'
पोटापाण्यासाठी नाटक करणारा मित्र विचारतो.<<
यावर खूप हसले. खूप काही आठवलं.

कविता करून कागद फाडून खाण्याचे दिवस खरं यंजॉय करण्याचे दिवस रे... Happy

निधप, अनुमोदन!

निखिल,
हाण च्या मारी!
आरशा समोर कोण उभं र्‍हातंय कशाला?
अन् ज्यांना जमत नाय तेच शिकवतात..
थांबवा म्हटलं की दुसर्‍यालाच थांबवतात.
चलता है भिडू..
झक्कास कविता.
फाडायची, खायची, अन् पुन्हा ल्ह्यायची Happy
मस्त, मस्त, मस्त.
तु नकोस थांबू मित्रा, येऊ दे अजुन कविता!