राहत ही राहत...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
2’

२००६ सालापासून ज्या गाण्यानं मला वेड लावलंय आणि आजही दरवेळी ऐकताना नव्यानं ज्या गाण्याच्या मी प्रेमात पडते ते गाणं म्हणजे 'ओंकारा' मधलं 'नैनोंकी मत माणियो रे, नैना ठग लेंगे'!
मला अजूनही लख्ख आठवतंय (माझ्या डोळ्यासमोर येतंय असं म्हणण्याचा मोह मी आवर्जुन टाळतीये ! :)) ओंकारा प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच या गाण्यानं मला मोहात पाडलं. त्या वेळी मी पिट्सबर्गला होते. Sterile Hood च्या समोर बसून काचेतून पलिकडे पहात हातातल्या freezing cold liver ला काळ्या धाग्यांनी टाके घालताना, दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी department च्या गच्चीतल्या माझ्या आवडत्या जागी बसून हातातल्या खास Italian Coffee च्या कपाची उब अनुभवत सुर्यास्त पाहताना, पिट्सबर्ग ते फिनिक्स प्रवास करताना कधी धुक्यातल्या पहाटे Cleveland च्या ,कधी मध्यरात्री Denver च्या तर कधी भर दुपारी उन्हात चमकाणारी बर्फाच्छादित शिखरे पाहताना Salt Lake City च्या विमानतळावर बसून, किंवा न्युजर्सी ला जाताना turnpike वर गाडीच्या windshield मधून बर्फातून दिसणारी रस्त्याची वळणं पाहात तर कधी पावसाच्या ठिपक्यांची शर्यत अनुभवत ... या आणि अश्या अनेक अनेक ठिकाणी मी या गाण्याची पारायणं केली होती आणि या सगळ्या प्रसंगांच्या साक्षीनं एक स्वप्नं पाहिलं होतं - कधीतरी हे गाणं राहत फ़तेह अली खानच्या आवाजात प्रत्यक्ष live ऐकण्याचं... !!
'नैना' हे एकच गाणं नाही तर अगदी 'दिल तो बच्चा है जी' या गाण्यापर्यंत मी राहतच्या सगळ्याच गाण्यांची अशी आणि इतकीच पारायणं केली आहेत... त्या आवाजाला प्रत्यक्ष ऐकायला मिळण्याच्या संधीची मी गेली काही वर्ष वाट पाहत होते.
२००८ साली राहत जेव्हा LA मधे कार्यक्रम करत होता, तेव्हा मी Grand Canyon मधे Colorado नदीच्या काठावर बसून "मी इथे hiking करतीये.. तिथे राहत ची मैफिल रंगली असेल ना.. राहतला live ऐकण्याची संधी हुकली" म्हणत हळहळले होते... पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते असं म्हणतात तेच खरं.
...आणि नुकतीच तशी प्रत्यक्ष राहत फ़तेह अली खान live ऐकायची वेळ माझ्या आयुष्यात आली. माझं २००६ सालापासून पाहिलेलं स्वप्न 'कोणताही अपेक्षाभंग न होता' पूर्ण झालं. शिवाय मागच्या हुकलेल्या संधीचा पुरेपुर 'वचपा' काढल्यासारखं अवघ्या ८-१० फूट अंतरावरून राहत ऐकताना, हार्मोनियमवर फिरणारी त्याची बोटं पाहताना खूप दिवसांनी कोणत्याही कार्यक्रमात स्वत:ला विसरुन जाण्याइतकं गुंग होण्याचा आनंद मिळाला.
लहानसंच सभागृह... १००० ते १५०० लोकांची उपस्थिती. बहुतेक सगळे पंजाबी किंवा पाकिस्तानी श्रोते. माझ्या माहितीप्रमाणे त्या सभागृहात मी एकमेव मराठी व्यक्ती!
रंगमंचावरच्या मंद प्रकाशात एक ड्रम सेट, २ गिटार, एक सॅक्सोफोन आणि मध्यभागी एक हार्मोनियम. त्या आळसावलेल्या प्रकाशात थोड्याच वेळात चालू होणा-या मैफ़िलीची चाहूल मी शोधत असतानाच रंगमंचावर राहतच्या दहा साथीदारांचं आगमन झालं, आणि त्यांनी आपापल्या जागा घेतल्या.
"अरे, यातले दोन चेहरे माझ्या ओळखीचे आहेत. कधीतरी TV Asia वर एक कव्वालीचा कार्यक्रम पाहिला होता, त्यात हे दोघं कोरसला आणि टाळ्या वाजवायला होते. बहुतेक यातला एक राहताचा चुलत भाऊ का कोणीतरी आहे" शेजारी माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं, त्यामुळे माझा मनातल्या मनात माझ्याशीच संवाद चालला होता.
आणि अचानक माझे पुढचे शब्द मनातच अडकले. टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्यक्ष राहत फतेह अली खान मैफिलीत प्रवेश करत होते आणि माझ्यासकट सगळं सगळं सभागृह उभं राहून टाळ्या वाचवत त्याचं स्वागत करत होतं.
कोरस देणा-या कव्वालांच्या टाळ्या सुरु झाल्या. हार्मोनियमचे बोल सभागॄहात विखुरले आणि बघता बघता राहतच्या आवाजानी अवघ्या सभागृहाचा ताबा घेतला
मालिकुल मुल्क ला शरीका लहू, वाहदा हु ला इलाहा इल्ला हु
शम्स तबरेझ गर खुदा तलाबी, खुशबु ला इला लिल्ला हू
ये जमी जब न थी, ये जहा जब न था, चांद सूरज न थे आसमा जब ना था
राझ-ए-हक भी किसीपर अया जब न था, जब न था कुछ यहा, था मगर तु ही तू
अल्ला हू अल्ला हू अल्ला हू, अल्ला हू अल्ला हू अल्ला हू....

खरं वाटणार नाही कदाचित सांगून पण या पहिल्या आलापापासूनच राहतनी मैफिलीचा जो कब्जा घेतला तो शेवटपर्यंत ! इथे चालू झालेल्या टाळ्या मैफ़िल संपेपर्यंत थांबल्या नाहीत.

'अल्ला हू' चा घोष आणि टाळ्या संपायच्या आधीच राहतनी हार्मोनियमवर सुरावट वाचवायला सुरुवात केली आणि पुढच्या गझलेत त्याच्यासकट श्रोतेही दंग होऊन गेले...
मैने मासूम बहारोमे तुम्हे देखा है, मैने पुरनुर सितारोमे तुम्हे देखा है
मेरे मेहेबुब तेरे परदानशिदीकी कसम, मैने अश्कोंकी कतारोमे तुम्हे देखा है
तुम्हे दिललगी भूल जानी पडेगी, मोहोब्बतकी राहोमे आकर तो देखो

नुसरत फ़तेह अली खान साहेबांची ही खूप प्रसिद्ध गझल. या गझलच्या सुरुवातीचा हार्मोनियमचा तुकडा इतका लाजवाब वाजवला ना राहतनी! यातल्या 'पुरनुर सितारोंमे' मे वर काळीज चिरणारा आवाज लगेचच 'मेरे मेहेबुब' म्हणताना इतका हळवा होऊन गेला...आणि त्याही पेक्षा 'मैने अश्कोंकी कतारोमे तुम्हे देखा है' या ठिकाणी घायाळ झाले मी.. आधीच शब्द अर्थपूर्ण त्यात राहत नी ह्या ओळीत त्यानी इतकी जान ओतली की ... मी खल्ल्लास!
ह्या आणि पुढच्याही अनेक गझलांमधे आणि गाण्यातही इतक्या वेगवेगळ्या जागा घेतल्या, इतके वेगवेगळे तराणे म्हणले या माणसानं....ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे, शब्दात व्यक्त नाही करता येणार मला !
"पहिल्या दोन पेशकश मधे माझी ही अस्वस्था .. पुढे मैफिलीत माझं काय होणार देव जाणे (की अल्ला जाने ! :))" माझा माझ्याशीच संवाद चालला होता. आणि हृदयाचा एक ठोका चुकलाच...
ज्या गाण्यामुळे माझी आणि राहत पहिली भेट झाली ते गाणं. "कोण आहे तरी कोण हा राहत फतेह अली खान? कसला वेगळाच आवाज आहे ना! हा स्टुडीयो गायकाचा आवाज नाही...हा मैफ़िलीतला आवाज आहे.. ही वेगळी गायकी आहे... ह्या आवाजाला follow करायला हवं... "
राहतच्या पहिल्या भेटीतच मनात जे विचार आले होते ते नव्याने डोळ्यासमोर तरळले... एकीकडे २००४ मधे पाप मधलं गाणं ऐकल्यापासून ज्या आवाजाची लगन लागलीये ते गाणं राहत गात होता. 'आजावो मेरी जान.. मेरे दिलका जहान...मांगे तेरी खबर.. धुंडे तेरा निशान... लागी तुमसे मन की लगन' असं हळूवारपणे शब्दांशी आणि सुरांशी आणि ऐकणा-याच्या मनाशीही खेळत होता. प ध सा रे ग रे सा.. सुरावटींची अनेक variations घेऊन शेवटी अचूक समेवर येत अपुर्णाचा 'गम' देऊन ऐकणा-याला असं हुरहुर लावणा-या वातावरणात सोडून राहत पुढच्या गाण्यात निघूनही गेला.
अशीच काहीशी अस्वस्था जेव्हा त्याने 'तुझे देख देख सोना, तुझे देख कर है जगना' चालू केलं तेव्हा. परत एकदा हार्मोनियमवर गाण्याचे बोल उमटले. ढोलकीचा आणि गिटारचा मिश्र आवाज आणि कोरसचे 'जीया धडक धडक जाये'. ... साल २००५, कलियुग मधलं हे गाणं ऐकल्यावर मनातल्या मनात "राहत मे दम है बॉस.. हा one song wonder types नाही" म्हणून देवाचे खूप आभार मानले होते ते आठवलं.
कधी 'धडक' मधल्या 'क' चा पूर्ण उच्चार कधी 'क' ला तसाच अर्धवट सोडणे...
'कबसे है दिलमे मेरे अरमा कई अनकहे'’ म्हणताना खास सूफ़ी स्टाईलमधे आवाज आत खेचून मोकळा करणे.'कहना कभी तो मेरा मान' म्हणताना आवाजातलं ते खास उर्दू आर्जव.
किती आणि काय काय वर्णन करणार.. सगळंच भारावलेलं वातावरण.
आणि अशा भारलेल्या वातावरणात guitar च्या background वर राहत ने 'नैणोंकी मत मानियो रे' सुरुवात केली आणि माझ्या अंगावर सरकन काटा आला. आधीच गुलझार चे महा-अप्रतिम शब्द. विशाल भारद्वाजच त्यांना न्याय देणारं संगीत आणि ह्या सगळ्यावर साझ चढवणारं राहत चं सादरीकरण.
'नैनोंकी जबान पे भरोसा नही आता.. लिखत पढत ना रसिद ना खाता.. सारी बात हवाई रे'
हे स्वत:च्या डोळ्याबद्दल आहे की समोरच्याच्या की....?? नुकताच कधीतरी LA हून परत येताना वाळवंटातल्या सरळसोट रस्त्यावर या गाण्यावरच्या चर्चेनी घेतलेली विविध वळणं आठवली. आम्ही प्रत्येकानी किती वेगवेगळे अर्थ मांडले होते...तरीही खरा अर्थ या डोळ्यांच्या भाषेइतकाच गूढ.. दिसणारा, कळणारा.. पण तरीही अगम्य. शेवटच्या 'नैना' ह्या आलापाला मी recording ऐकतानाही अजूनही इतक्या वेळा ऐकूनही नव्याने दाद देते, सलाम करते... हा आलाप ही digital recording ची कमाल नसून समोर बसलेल्या माणसाच्या गळ्यातून साकारलेली अदाकारी आहे - ह्या आपल्या विश्वासाला तडा न बसता, उलट त्याबद्दलची खात्री पटणं .. एखाद्या (आणि त्यातही आवडत्या) गायकाबद्दल असलेला हा विश्वास अनुभवायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट झालीये आजच्या ह्या digital recording च्या काळात.
मीच नाही तर सगळ्याच श्रोत्यांनी त्या शेवटच्या 'नैना' ला उभं राहुन टाळ्यांचा कडकडाटा दाद दिली. माझ्यासाठी राहत ची मैफिल इथेच अविस्मरणीय झाली होती.... यापुढे तो जे काही गाईल ते सगळंच माझ्यासाठी bonus होतं... !

राहत फतेह अली खान. 'मन की लगन' पासून हिंदी चित्रपटात गायला सुरुवात, 'सुरीली अखियोंवाले' डोक्यातून काही केल्या जात नाही. दिल तो बच्चा है जी ऐकताना हजार वेळा दिल बच्चा असल्याचं फीलींग येतं. 'तेरी ओर' किंवा 'बोल न हलके हलके' मधे श्रेया किंवा महालक्ष्मीच्या आवाजावरुन नजर हटावी असं काहीतरी या माणसाच्या आवाजात आहे. नुसरत नंतर सूफ़ी संगीत भारतीय चित्रपटात समर्थपणे मांडणारा आवाज म्हणजे राहत. हिंदी चित्रपटातलं ह्याचं एकही गाणं flop गेलं नाही की टाकावू ठरलं नाही.. एका अर्थाने 100% strike rate असणारा गायक !
राहतनी हिंदी चित्रपटात गायलेली गाणी प्रत्यक्ष मैफिलीत त्याच्या आवाजात ऐकायची जितकी इच्छा होती तितकीच मनात भीती पण होती... अपेक्षाभंग तर होणार नाही ना! ज्या आवाजाचं, ज्याच्या प्रत्येक गाण्याचं गारूड आहे आपल्यावर - ते प्रत्यक्ष नीट गायला जमलं नाही त्याला तर, प्रत्यक्ष ऐकताना तितकं भिडलं नाही मनाला तर !
कारण कितीही नाही म्हणलं तरी आजकाल mixing चा जमाना आहे, इतकी treatment दिली जाते गाण्याला, इतकी वाद्य असतात, इतके effects असतात...त्यामुळे राहतनी एका मागून एक चित्रपटातली गाणी गायला सुरुवात केली तेव्हा मनात एक काळजीयुक्त धाकधूक होती.
पण ती गाणी या मैफीलीत ऐकल्यानंतर, शंकर-अहसान-लॉय किंवा प्रीतम किंवा सलिम-सुलेमान ह्या सगळ्या संगीतकारांची माफी मागून मला असं म्हणावसं वाटतं की 'सजदा तेरा सजदा' (माय नेम इज खान) काय किंवा 'तेरी याद साथ है' (नमस्ते लंडन) काय किंवा 'ओ रे पिया' (आजा नचले) किंवा सुरीली अखियोवाले (वीर) काय..ही गाणी नुसती हार्मोनियम, कोरस आणि कव्वालांच्या टाळ्या, ढोलकी आणि तबला या साध्या वाद्यांच्या साथीनं राहतच्या आवाजात recorded गाण्यापेक्षाही खूप जास्त संवाद साधणारी वाटली मला... त्यातला तो rawness मनाला खूप खोलवर भिडला ! खरं सांगायचं तर या मैफिलीनंतर राहतला studio मधे ३ मिनीटाच्या गाण्यात recording मधे, त्या २४ synthetic instruments च्या आवाजात बंदिस्त करणं हा अन्याय आहे ऐकणा-यावर असं वाटून गेलं क्षणभर.
हिंदी गाण्यांनंतर राहत परत एकदा सूफी कव्वाली आणि गझलांकडे वळला. 'ये जो हलका हलका सुरुर है' ही त्याच्या अल्बममधली अत्यंत गाजलेली गझल. त्याने इतक्या मनापासून खुलवत खुलवत गायली ना ही गझल, ते खरंच अनुभवण्यासारखं (आणि शिकण्यासारखं) होतं. सगळ्यात कमाल म्हणजे त्याने नुसरत फतेह अली खान साहेबांची 'आफ़रीन आफरीन' ही रचना सादर केली तेव्हा.
हा आवाज, ही सुरांवरची पकड, ही शब्दात जान ओतण्याची (आणि ऐकणा-याची जान घेण्याची ) अदा... खरंच देवाघरची देणगी आहे... काही लोकांनाच ती मिळते.. आणि त्यातल्याही काहीच लोकांना 'आपल्याला ती मिळालीये' हा अहसास होतो.
"राहतच्या आवाजात ह्या रचना ऐकताना असं भारलेपण जाणवतंय..ज्यांनी खुद्द नुसरत फतेह अली खान साहेबांना ऐकलं असेल गाताना, त्यांची काय अवस्था झाली असेल... आपल्या नशीबात नव्हतं ते. कदाचित आपण तितकेही भाग्यवान नाही !!" मनात विचार चमकून गेला.
नुसरत फतेह साहेबांची आठवण झाली आणि मला त्यांच्या मैफीलीत त्यांचा शागीर्द म्हणून गाणारा राहत डोळ्यासमोर आला. आपल्याकडे पं. जसराजांच्या मागे बसून गाणारा (आणि मैफिलीतून शिकणारा) संजीव अभ्यंकर बघता बघता मैफिल गाजवायला लागला... नुसरत आणि राहत चं नातंही तसंच.
म्हणजे आता राहतच्या ह्या मैफिलीतल्या त्या मुख्य कोरस गाणा-या गायकावर, अशफ खान वरही, लक्ष ठेवायला हवं... कदाचित काही वर्षांनी तो ही स्वत:च्या मैफिली गाजवायला सुरुवात करेल. "
माझं स्वत:शीच मनातल्या मनात बोलणं चालु होतं.
राहतनी 'अखिया उडीक दिया' हे पंजाबी सूफी पेश केलं तेव्हा तर त्या कव्वालांच्या टाळ्यांच्या गजरात हरवून जायला झालं. पूर्ण मैफिल भर माझं लक्ष त्या टाळ्या वाजवण्याच्या पद्दतीवर, त्यांच्या ठेक्यावरही होतं. ते दोघं जबरदस्त forearm असलेले कव्वाल बाह्या सरसावून टाळ्या वाजवत ठेका देत होते. त्या मैफिलीची जान होते ते आणि त्यात जान ओतत होते. सोपं नाहीये अजिबात... घाम निघत होता त्यांचा अक्षरश: त्यांचा कोरस देताना आणि टाळ्या वाजवताना...आणि 'ख्वाजा मेरे ख्वाजा' मधे जसे ते नाचताना trans मधे जातात तसंच काही काळानं त्या टाळ्या पाहून आणि ऐकून आपल्यालाही trans मधे जायला होतं. पंढरीच्या दिंडीमधे 'ग्यानबा तुकाराम' चा घोष जसा देहभान विसरायला लावतो, सूफी कव्वालीतल्या ह्या टाळ्याही अगदी तशाच.. देहभान विसरायला लावणा-या.
अशीच trans मधे असताना कानावर शब्द आले "आप महाराष्टीयन होके भी आपको हमारे पंजाबी गाने काफी मालुम होते है" माझ्याशीच मी हिंदीत बोलतीये का असा भास झाला क्षणभर. पण हिंदी बोलताना इतकी आदब मराठी माणसात कुठली ? ह्या विचारानी भानावर आले तर शेजारचे काका मला प्रश्न विचारत होते. मी त्यांच्याकडे बघून नुसतीच हसले. माझं हिंदी ऐकून त्यांनी त्यांचा प्रश्न मागे घेतला असता, पण तितक्यात राहतनी 'मस्त कलंदर' गायला सुरुवात केलं आणि एका स्मितहास्यावर माझ्या प्रश्नाचं उत्तर थांबलं (म्हणून मी राहतला धन्यवादही दिले). पण त्या प्रश्नाचं उत्तर माझ्यावर उधार आहे ते आज इथे लिहिते...
पिटसबर्ग ला लॅब मधे मी कायम गाणी लावून काम करायचे. एकदा असंच बहुधा 'जिया धडक धडक जाये' मी repeat mode वर लावून काम करत होते. तो आमच्या लॅब मधे नवीन आला होता. माझ्याकडे intern म्हणून काही प्रयोग शिकायला. हे गाणं ऐकुन त्यानी मला हिंदीमधे 'तुला राहत आवडतो का?' असं विचारलं त्यावर मी 'आवडतो.. म्हणजे जितकं ऐकलंय तितकं आवडतं.. आणि अजून ऐकायला खूप आवडेल' असं उत्तर दिलं. दुस-या दिवशी त्यानी मला त्याचा 120GB चा external hard drive आणून दिला.. हे ठेव तुझ्याजवळ. ह्यात नुसरत, राहत आणि अजून खूप collection आहे. हे सगळं आणि अजून जी काय गाणी असतील ती घे तुला !
मी थक्क... अवघ्या एक दिवसाचीही ओळख नाही माझी आणि त्यानं त्याच्याकडचं सगळं collection विश्वासानं माझ्या हातात ठेवलं होतं. त्यात नुसरत, राहत पासून अबिदा परवीन, गुलाम अली, मेहदी हसन, रफ़ी यांच्या काही पंजाबी उत्तम गझला, खूप गाण्यांच्या original पाकिस्तानी किंवा पंजाबी रचना असा अमूल्य ठेवा मला सापडला. आणि मग गाणं ऐकायचं आणि त्यातल्या पंजाबी शब्दांचे, उर्दू शब्दांचे ह्याला अर्थ विचारायचे .. कोण कोणाचे विद्यार्थी आहे असा प्रश्न पडावा ! या गाण्याच्या माध्यमातून आमची मस्त मैत्री झाली.. हिंदी गाण्यांपलीकडच्या ख-या राहतची माझी ओळख झाली ती याच मित्रामुळे.
शर्माजींना मेल करून कळवायला हवं - राहत live ऐकला म्हणून...मस्त वाटेल त्याला!!!
विचार करता करता मैफल शेवटच्या टप्यावर आली... मनात हुरहुर दाटलेल्या अस्वस्थेतच राहतला उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट ’खुदा हाफिज’ केलं .
रात्री ११.३० ची वेळ. सरळसोट रस्त्यावरून गाडी धावतीये... आणि विचारही.
या रस्त्यावरुन जाता येताना किती वेळा गाडीत ipod वर राहत ची गाणी ऐकलीयेत. आज ipod लावला नव्हता, तरी ती गाणी गाडीत वाजत होती. गाणं संपताना टाळ्यांची दादही कानांना स्पष्ट ऐकू येत होती. त्या सगळ्या गाण्यांना आज राहतच्या सुरांचा, त्याच्या गायकीचा साज चढला होता. एका प्रत्यक्ष अनुभवलेल्या मैफीलीचा नशा त्या शब्दांना, त्या गाण्यांना चढली होती....
......गेल्या दोन आठवड्यात राहतची गाणी परत परत ऐकतीये मी.त्या गाण्यांची लज्जत आता आधीपेक्षा खूप जास्त वाढलीये... त्या शब्दांचे अर्थ नव्या रूपात डोळ्यासमोर यायला लागलेत...विलक्षण आहे हा अनुभव!

"काही मैफिली जिथे संपतात तिथेच त्या मैफिलींची खरी सुरुवात होते" हेच खरं !

(संपूर्ण तरीही अपूर्णच.... :))

प्रकार: 

कसलं सही लिहीलंय. राहत मलाही आवडतो. पण त्यातलं नक्की काय आवडतं हे असं लिहीता येणार नाही मला! वर ती कॉन्सर्ट मिस केली हे शल्य आहेच! Sad

अहाहा.. काय गाणी आहेत ना एकेक राहतची! आणि उच्चार काय परफेक्ट्ट. ते दांत से रेशमी डोर कटती नही.. मधे कटती काय नाजूक म्हटलय. अगदी खरोखरच रेशमी.
काय लकी अहात तुम्ही सगळ्या ज्यांना लाईव्ह बघायला मिळाली त्याची गाणी.
मस्त लिहिलयस रार!!

दोन्ही भाग एकत्र करून लिहिले आहेत आता Happy
राहतच काय माझ्यामते वेगवेगळ्या गायकांचे आणि कलाकारांचे लाईव्ह कार्यक्रम ऐकायला मला आवडतं... स्टेज वर प्रेझेंट करताना काय करावं आणि काय करू नये दोन्ही शिकायला मिळतं यातून Happy
मी इतकी भारावून गेले होते की जवळ कॅमेरा असूनही फोटो काढावेत हे देखील विसरून गेले.
एक तर मैफिलीत माझ्या बरोबर ओळखीचं कोणी नव्हतं. हे इतकं जादुई वातावरण, ते सूर , शब्द , आवाज.. हे मला तेव्हा कोणाजवळच व्यक्त करता आलं नव्हतं... मी अक्षरशः तडपत होते हे express करायला!
गेले दोन आठवडे ही अवस्था होती.. घुसमटच एक प्रकारे.. शेवटी एकदाची राहत ची नशा या शब्दांच्या माध्यमातून थोड्या प्रमाणात का होईना एकदाची system मधून बाहेर पडली.
ह्या अश्या रक्तात घुसणा-या मैफिलीची मजा खरंच काही औरच असते... ती शब्दात पकडण म्हणजे वेडा प्रयत्न आहे खरं तर ..पण इलाज नसतो कधीकधी Happy

मस्तं लिहिलयस,
माझ्या मते उत्तम सुफी गायकाची गायकी एकदा तरी लाइव्ह जरुर ऐकावीच!
राहत फतेह अली खान ची गायकी, ते वातावरण सगळाच एक दैवी चम्त्कार.. कुठलही विशेषण कमी पडतं !
राहत ची मैफील भरभरून देत रहाते.. त्याच्या अवाजाची प्रचंड रेंज, अधे मधे पाणीही न पिता त्याचं शेवट पर्यन्त पॉवर नी गाणं, त्याच अतिशय नम्र बोलणं सगळच अफलातून !!
'नैना ठग लेंगे' सर्वात अप्रतिम, नक्कीच,, खरं तर प्रत्येक गाणं standing ovation देण्या इतकं अशक्य सुंदर.. दोनदा पाहिली मी कॉन्सर्ट, पुन्हा कधी बघायला मिळेल याची वाट पहातेय !!
ज्यांनी पाहिली नाहीये, त्यांनी बघायची संधी अजिबात सोडु नका, राहत या दौर्‍यात ही सगळी गाणी गातो:
अल्ला हु
दम मस्त कलन्दर
जिया धडक धडक
लगी तुमसे मन कि लगन
तेरी ओर हाय रब्बा
नैना ठग लेंगे
ओ रे पिया
बोल न हलके हलके
सुरीली आम्खियो वाली
मै जहां रहू मै कही भी रहू
आज दिन चढीया
तेरा सजदा
आफरीन
ये जो हलका हलका सुरुर
सानु एक पल चैन ना आये
मेरा पिया घर आया ओ लालनी
किन्ना सोणा तेनु
आणि इतरही बर्‍याच सुरेख कव्वाली.:).

गेल्या वर्षी सॅन होजे ची मैफील थोडी छोटी होती, तिथे तो रिक्वेस्ट सुध्दा स्वीकारत होता, या वेळी पाहिलेली लाँग बीच कॉन्सर्ट मोठी होती, जरी त्याने एरिक्वेस्ट द्या सांगितल होत्म तरी तिथे रिक्वेस्ट पोचवणं अवघड होतं.
रिक्वेस्ट चा एक मजेदार किस्सा,
बर्‍याच रिक्वेस्ट वाचून राहत नी शेवटी एक अनाउन्समेन्ट केली " मुझे हिन्दी पढना नही आता, प्लिज उर्दु या इंग्लिश मे लिखिए' Proud
खरच, राहत ची गाणी ऐकताना लक्षात च येत नाही आपण दुसर्‍या देशाच्या दुसर्‍य भाषेतल्या गायकाची मैफील ऐकत आहोत :).
संगीत, कला have no boundaries.. देशाच्या बॉर्डर्स मॅन मेड आहेत, राह्त सारखे दैवे देणगी लाभलेले कलाकार खुद्द देवानी बनवलेत, सगळ्या जगा साठी, त्यांचा कुठल्या देशाच्या बाउंडरीज शी काय संबंध ! :).

रार आणि डीजे , क्लास लिहिलंयत . राहतची गाणी ऐकायची माझी आवडती वेळ म्हणजे मध्यरात्री अभ्यास करताना . Happy तो स्वतः ट्रांसमध्ये जातोच पण आपल्याला आपल्या नकळत त्या ट्रांसमध्ये नेतो . आजच्या पिढीतला " खतरनाक " गायक आहे तो . आमच्याकडे काँन्सर्ट होते का बघायला हवं आता . Happy

<<< राहतनी हिंदी चित्रपटात गायलेली गाणी प्रत्यक्ष मैफिलीत त्याच्या आवाजात ऐकायची जितकी इच्छा होती तितकीच मनात भीती पण होती... अपेक्षाभंग तर होणार नाही ना! ज्या आवाजाचं, ज्याच्या प्रत्येक गाण्याचं गारूड आहे आपल्यावर - ते प्रत्यक्ष नीट गायला जमलं नाही त्याला तर, प्रत्यक्ष ऐकताना तितकं भिडलं नाही मनाला तर !>>>>

अगदी अगदी हेच होतं माझ्या मनात .

<<<एका अर्थाने 100% strike rate असणारा गायक !>>>

पर्फेक्ट . Happy

मी अत्ता पर्यन्त आशा भोसले, सोनु निगम, सुनिधी, शंकर महादेवन, एस पी बालसुब्रमण्यम, कविता कृष्ण्मूर्ति, साधना सरगम, महालक्ष्मी अय्यर, कैलाश खेर, अमित कुमार, कुणाल गान्जावाला, ए आर रेहमान , जावेद अली, हरिहरन, शान सगळ्यांना लाइव्ह कॉन्सर्ट मधे ऐकलय, आशा भोसले सोडून सगळे सही वाटले लाइव्ह ऐकताना पण राहत सारखी जादूई मैफील एकही नाही :).

सर्वात निराशा करणारी आशा भोसले :रागः
परफॉर्मिंग आणि गाणाचे बेस्ट पॅकेज : सोनु ,सुनिधी आणि शान
प्युअर सिम्गिंग : कैलाश, राहत, शंकर, हरिहरन, साधना, कविता
बेस्टेस्ट प्रेझेंटेशन : ए. आर . रहमान.
बेस्ट महफील : राहत :).. अधे मधे कोणा होस्ट ची फालतु बडबड नाही कि लोकल अर्टिस्ट्स ची लुडबुड, असह्य मिमिक्री नाही.. फक्त राहत आणि त्याचं पॉवरपॅक्ड् गायन..बस्स !!

दिपांजली, आता जखमेवर मीठ नको चोळूस Sad
रारचं हे लिखाण वाचतानाही अंगावर काटा आला. प्रत्यक्ष ऐकायचं म्हणजे काय जादुई, भारलेली अवस्था होईल ह्याची कल्पना येतेय..

राहतनी 'अखिया उडीत दिया' हे पंजाबी सूफी पेश केलं तेव्हा तर त्या कव्वालांच्या टाळ्यांच्या गजरात हरवून जायला झालं.
<< आंखिया 'उडिक' लिया आहे ते, अप्रतिम झाल् ते पण गाणं.

थोडं विषयांतर, पण लिहिल्या वाचून राहवत नाही :).
सॅन होजे आणि लाँग बीच च्या मैफीली मधे पाहिलेली एक कॉमन गोष्ट !
राहत च्या मैफीलीला जसं राहत ची गाणी एक वातावरण तयार करतात तसे श्रोते पण करतात हं :).
म्हणजे जसे पुण्यात बालगंधर्व ला नाटकाला जाताना गजरा, शाल वगैरे अजुनही वापरतात किंवा इथे ऑपेराज, शोज ना जाताना लोक तयार होउन जातात तसे राहत ला जाताना लोक एकदम खान्दानी पारम्पारीक कपडे घालून येतात, casual jeans t shirt मधे एकही व्यक्ती दिसत नाही, पुरुष सुध्दा फॉर्मल सुट, ब्लेझर किंवा सलवार कुर्ता, शेरवानी मधे येतात.
सगळ्या मुली, बायका पारंपारीक पध्दतीचे एक से एक सलवार कमीझ, वर सुरेख कशिदा काम केलेल्या शाली, उंची परफ्युम अशा थाटात येतात .
अगदी येणार्‍या प्रत्येकीच्या चप्पल पण बघत राहाव्या अशा सुंदर असतात :).( शारजा क्रिकेट चा कॉमेंट्रि करणारा हेनरी जसा इअर रिंग्स नोट करायचा तसे राहत च्या कॉन्स्रर्ट ल पारंपारीक कपडे, चप्पल, इअर रिंग्स सगळच नोट कराव Happy )
So now you know how to get ready for Rahat's concert :).

डीजे, कपड्यांच म्हणशील तर ... अगदी अगदी Happy
सही आहेस तू.. किती जणांना ऐकलं आहेस प्रत्यक्ष... Happy
आता माझ्या लिस्टवर सुखविंदर आणि ए. आर. रहमान Happy (म्हणजे मला न जाणं हा पर्यायच नाहीये, इतके आवडतात हे !)

रार,
सुखविन्दर पण मस्त गातो लाइव्ह, रेहमान च्या पहिल्या प्रोग्रॅम मधे ऐकल होतं.
अता पुढच्या महिन्यात बे एरीयात जाणारे सुखि च्या शो ला, माझ्या गृप मधला मित्र च अरेन्ज करतोय ती कॉन्सर्ट, सो घरचच कार्य आहे.. आधी पासून जाणारे मी:).
बे एरीयाकरांनो,
मराठी लोक भरपूर येणार असतील तर 'हो राजे' ची डिमान्ड करा नक्की, मी सन्देश पोचवयच काम नक्की करीन:).

आरती, रेहेमान जून मध्ये येतोय... मी २००३ मध्ये ऐकलिये त्याची कॉन्सर्ट.. तोड नाही.. सोनू, साधना, हरि, शंकर, सुखी, एस्पीबी, चित्रा.. सगळेच महान
http://www.liveisbetter.com/a-r-rahman-in-concert/

२००३ ची रेहमान कॉन्सर्ट बेस्ट !!
मी रेहमान च्या तीन कॉन्सर्ट्स पाहिल्यायेत, त्यात्ली २००३ ची बेस्ट होती आणि प्रेझेंटेशन च्या दृष्टीनी अत्ता ऑस्ट्रेलियात पाहिलेली 'जय हो' कॉन्सर्ट बेस्ट.. अगदी cirque du soleil च्या शोज ना टक्कर देइल अशी भव्य आणि प्रेक्षणीय होती :).

हो, सुखविंदरही येतोय खरा. पण न्यू जर्सीत येतोय की नाही कल्पना नाही.
<< अ‍ॅड मधे पाहिलय , नक्कीच येइल ग कारण न्यु जर्सीचा बिट्टु कुमार च मेन को ऑर्डिनेटर आहे सगळ्या सुखविन्दर कॉन्स्र्ट्स चा.
जर तुमच्या आधी बे एरीया कॉन्सर्ट झाली तर देइन फीडबॅक तुला, बे एरीयाला १५ मे ला आहे कॉन्सर्ट :).

मस्त लिहिलंय एकदम, तुम्ही मैफलीचा एवढा आनंद घेतलाय वाचून फारच छान वाटलं.
मेल गिब्सनच्या apocalypto च्या काही साऊंडट्रॅक साठीही राहतने आवाज दिलाय, सही आहेत ते पण जरूर ऐका.

अगदी माझ्या मनतले लिहिले आहेस !!! राहत ला ऐकणे हा एक अभूतपूर्व अनुभव आहे...प्रत्येक गाणे ऐकताना वेगळा वेगळा गायक आहे असे वाटते....dhingana.com वर राहत स्पेशल ऐकत राहिले की दिल एकदम बच्चा होउन जातो Happy

Pages