बेडूक
विहिरीतले बेडूक डराव डराव करतात
विहिरीतल्या विहिरीत उड्या मारतात
उड्यांचा त्यांचा प्रयत्न उंचच उंच
पण जास्तीत जास्त बारा इंच
एकमेकांना फक्त पाण्यातच बघतात
एकमेकांवर्तीच चिखल उडवतात
विहिरीतले त्यांचे एवढूसे जग
पाणी भरेल फक्त दोनशे मग
छोटीशी विहीर गढूळ पाणी
सांदितले किडे आणि बेडूकगाणी
मृगात येतो मोठा पाऊस
पावसात भिजायची बेडकांना हौस
हिवाळ्यात असते भलतीच थंडी
बेडकांची उडते घाबरगुंडी
गारठ्यात सगळे मेल्यासारखे राहतात
चार महिने शितानिद्रेत जातात
उन्हाळ्यात विहिरीचे पाणी आटते
बेडकांना बेडकांची गर्दी वाटते
गर्मीने होते लाही लाही
बरेच मरतात उरतात काही
बेडकांचे जग आहे तरी केवढे
बेडकांचे जग विहिरीएवढे
तळ खाली वरती आकाशाचा गोल
बेडकांचे जग विहिरीएवढेच खोल
बेडकांच्या जगात फक्त बेडूक
डराव डराव डुबुक बुडुक
विहिरीतले हे दीडशहाणे मोठे
पण पलीकडल्या जगातले ज्ञान कोठे
विहिरीतच जगतात विहिरीतच वाढतात
विहिरीतच रडतात विहिरीतच कुढतात
विहिरीतच नाचतात विहिरीतच गातात
विहिरीतच जन्मतात विहिरीतच मरतात
विहिरीतले बेडूक......
-आदिकवी
डर्राव डर्राव
डर्राव डर्राव