पांढरा रस्सा

Submitted by लालू on 15 April, 2010 - 12:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो किंवा २-३ पाऊंड - मटण किंवा चिकन (हाडांसहित)
२ मध्यम आकाराचे कांदे
१०-१२ काळे मिरे
७-८ लवंगा
३-४ दालचिनीचे तुकडे (१ इन्च लांबीचे)
३-४ तमालपत्र
१ चमचा उभे कापलेले आले.(julienne cut)

चिकन/मटणाच्या तुकड्यांना लावण्यासाठी वाटण-
२ इन्च लांबीच्या आल्याचा तुकडा
५-६ लसूण पाकळ्या (ऐच्छिक)
२ मोठे चमचे - दही
मीठ

रश्श्याचे वाटण-
१ लहान वाटी - सुके खोबरे
२ मोठे चमचे - खसखस
१ मोठा चमचा - पांढरे तीळ
७-८ वेलच्या
१/२ वाटी - काजू
१ मोठा चमचा - लाल सुक्या मिरच्यांच्या बिया

इतर
मीठ
५-६ कप पाणी
१ मोठा चमचा तेल
१ मोठा चमचा तूप

क्रमवार पाककृती: 

-चिकन किंवा मटणाचे तुकडे धुवून त्याला मीठ आणि वाटलेले आले-लसूण आणि दही लावून किमान अर्धा तास मुरू द्यावे.

-रश्श्याच्या वाटणसाठी सुके खोबरे, तीळ, खसखस थोडे भाजून घेऊन त्यात वेलची, काजू, सुक्या मिरच्यांची बी घालून वाटून घ्यावे. हे वाटण बारीक व्हायला हवे. बाकीचे जिन्नस आधी कमी पाण्यात वाटून मग त्यात काजू घालून पुन्हा वाटले तरी चालेल.

- कांदे उभे पातळ चिरुन घ्यावेत. पातेल्यात तेल, तूप टाकून त्यावर मिरे, लवंगा, दालचिनी, तमालपत्र टाकून मग कांदा आणि उभे कापलेले आले टाकावे व परतून घ्यावे.

- मग मॅरिनेट केलेले चिकन वा मटणाचे तुकडे टाकून नीट सवताळून घ्यावे. त्यात पाणी टाकावे. तुकडे बुडून वर २-३ इन्च पाणी राहिले पाहिजे. मंद आचेवर शिजवावे.

- चिकन्/मटण शिजल्यावर रश्श्याचे वाटण घालून चांगली उकळी आणावी. दाट वाटल्यास थोडे पाणी घालावे व चवीप्रमाणे मीठ घालावे.

हा रस्सा नुसता प्यायला चांगला लागतो. साध्या भातावरही घेता येतो.

paandhara.jpg

प्रकाशचित्र - अनिलभाई.

वाढणी/प्रमाण: 
६ ते ८ लोकांसाठी
अधिक टिपा: 

- मटण /चिकन कुकरमध्येही शिजवून घेता येते.
- हा रस्सा अति तिखट नसतो. आवडत असल्यास मिरचीच्या बी चे प्रमाण वाढवू शकता, तसेच हिरव्या मिरच्या उभ्या शिरुन टाकता येतात.
- थोडे पाणी आणि थोडा चिकन ब्रॉथही घालता येईल.
-'मराठा दरबार पांढरा रस्सा मसाला' मिळतो. मी वापरुन पाहिलेला नाही.
- याच्या शाकाहारी प्रकारात (बटाटे, फ्लावर, दुधी इ. घालता येते (म्हणे!))

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक कोल्हापुरी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीट सवताळून घ्यावे>> लालू, सवताळून म्हणजे परतून का?
पातेल्यात तेल, तूप >> फोडणीसाठी तेल व तूप दोन्ही वापरायचे का?

लालू, सही पाकृ!! सुकं खोबरं सोडून बाकी सगळं आहे. ओला नारळ चालेल का? की खर्‍याखुर्‍या चवीत फारच फरक पडतो?

ओला नारळ चालू शकेल, खोबरं भाजून घे नीट आणि बारीक वाट. पण मूळ कृतीत सुकेच वापरतात, त्यामुळे असेल तर सुके खोबरेच वापरा. कॅनमधले नारळाचे दूध अजिबात वापरु नका.

सोप्पी आहे रेसिपी! चवीला तर अफलातून. Happy

झणझणीत कोल्हापूरी मटणाबरोबर साईडला हा पांढरा रस्सा, एखादी सुरमई/पापलेट ची तुकडी अन गरम गरम भाकरी... आहाहा!

नक्की करून बघणार Happy

वा वा मस्त. धन्यवाद लालू.
माझा एक प्रामाणिक प्रश्नः
चिकन खायला खुप आवडते. पण घरी करायचा प्रयत्न नाही केला अजून. आता करते. इथे ३-४ प्रकार पाहिले चिकनचे. चिकन ब्रेस्ट, लेग, थाईज आणि विंग्ज. कोणते घेऊ यातले? चिकनचा कोणताही प्रकार करता येईल असे यातील काय आणू?

मस्त दिसतोय रस्सा लालू. कोल्हापूरला जबरदस्त मटणाबरोबर हा रस्सा खाल्ल्याची आठवण झाली.
खादडमावशी, कोणताही प्रकार करायला आणि पहिल्यांदाच करत असशील तर बोनलेस, स्किनलेस चिकन ब्रेस्ट आण माझ्या मते.

चिकन ऐवजी बटाटे घालून करते >>>
सिंडे,सिंडे अग कोल्हापुरी लोक तलवार काढुन स्वतःचाच शिरच्छेद करुन घेतील ग हे ऐकल तर. Angry
दुसर्‍या कोल्हापुरी भरपुर डिशेस आहेत त्या कर कि त्यापेक्षा. लालु ची झणझणीत कोल्हापुरी बाकरवडी कर वाटल्यास. Happy

पन्ना पन्ना, काय हे. शोभतं का हे असं बोलणं?

मी आपलं पुरेपुर कोल्हापूरमध्ये जाऊन चापून येईन कशी. बरोबर भाकरी, ठेचा. अहाहा.....

कसला यम्मी होता रस्सा....
सिंडे, तुझी आयडीया बेश आहे पण त्यात बरोबरीने सुरणाचे काप घाल. मी तसाच करेन म्हणते.

मस्त माइल्ड प्रकार. सवताळून शब्दाबद्दल स्टार. म्हणजे सॉते ना? इथे गावाकडील बाई पण आम्ही सारे खवय्ये मध्ये येत अन सुरण सॉते करून घ्यावे म्हणते. Happy

खादाडमावशी, थाईज (बोन-इन) चालतील. पण तुकडे लहान हवेत. बोनलेसही चालेल, पण मग अर्धे पाणी अर्धी चिकन ब्रॉथ वापर.
मामी, हो. तेलावर परतणे या अर्थाने.

हि पाककृति लालूनेच लिहिली असावी, असे मी शीर्षकावरूनच ओळखले, आणि सवताळून घेणे, म्हणजे काय, हे बाकि कुणाला समजणे कठीण आहे !!!
कोल्हापूराच्या हॉटेल्समधून ज्या क्वांटिटीमधे हा रस्सा देतात, तो (कोल्हापूर बाहेरील ) एका माणसाला संपवणे कठीण आहे.
तो तयार मसाला मी वापरून बघितला आहे. चवीला ठिक आहे.

चिकन ऐवजी बटाटे घालून करते >>>
सिंडे,सिंडे अग कोल्हापुरी लोक तलवार काढुन स्वतःचाच शिरच्छेद करुन घेतील ग हे ऐकल तर.
Rofl

मी पनीर घालायचा विचार करत होते. माझा निषेध कोण कोण करतंय? Wink

मसाला आणि क्रुती चांगली वाटते आहे म्हणुन करावा वाटतोय हा प्रकार, पण खरंच आमच्या सारख्या शाकाहारींनी काय घालून करायचे ते सांगा ना.... निषेध न करता Happy

Pages