लाखात एक

Submitted by रुपाली अलबुर on 10 April, 2010 - 06:22

एका संध्याकाळची गोष्ट .... मी घरात एकटीच होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती . मागच्या गच्चीत कपडे गोळा करताना एक मुलगा दिसला .न जाणे काय सांगत होता .विचित्र भाषेतले त्याचे बोलणे न समजल्याने मी जरा गोंधळलेच .तो कोण ??कुठला ?? काहीच ठावूक नव्हते .म्हणून त्याच्या बद्दलची उत्सुकता अजूनच वाढली .

दुसऱ्या दिवशी कॉलनीतला एक मुलगा त्याच्यावर हात उगारताना दिसला. काकू - काकू म्हणत तो ओरडत होता.हे पाहून त्या मारणाऱ्या मुलाला रागावून मी घरात आले . त्याच्या चेहऱ्यावर मला आनंद ,दिलासा दिसला.

रोज संध्याकाळी ७- ८ वर्षांचा तो चिमुरडा मला मैदानात मुलांमध्ये दिसायला लागला . अंगावरचा शर्ट त्याची हाफ चड्डी झाकणारा !!! काहीसे विस्कटलेले तरी पण नेटके भासणारे केस . सगळ्यांच्या छान छान चपला आणि कपड्यांना न्याहाळणारे त्याचे बोलके डोळे आणि दगड , काटे यांचा विचार न करता उड्या मारणारे त्याचे पाय माझ्या कुतूहलाचा विषय बनले . वरच्या गच्चीत आम्हाला मोबाईल वर बोलताना पाहून लाकडाला कानावर ठेवून " हालो " म्हणणारा तो , फुटबॉल खेळणारी मुले गेल्यावर फुटक्या बॉलला लाथा मारणारा तो किंवा हातात bat धरल्याचा उत्तम अभिनय करणारा तो नेहमीच कॉलनीतल्या मुलांकडून दुर्लक्षित होता. पण तरीही बाकीची मुले त्याच्या खेळांची मजा अनुभवायचे . रंगपंचमीच्या दिवशी तर फुटक्या बाटलीत पाणी भरून " ओ मामा ओ मामा " म्हणत मोठ्या खुबीने सगळ्या मोठ्यांमध्ये तो मिसळून गेला होता, आता कॉलनीताली मुले त्याच्याबरोबर पकड पकडी खेळायला लागली होती. जुन्या डब्यावर काठी बडवत तो खूप छान वाजवायचा .

मागे बांधकाम चालू होते तिथे watchman असलेल्या आजोबांचा हा नातू ! मतीमंद आहे तो ! त्याची आई वडिलांकडेच रहायची. तो पूर्वी शाळेत जायचा. पण तिथली मुले त्याला वेडं म्हणून मारायची .हताश झालेल्या आईने नंतर त्याला मतीमंद मुलांच्या शाळेत घातले.आता तिथे तो रमलाय.

त्याला पहिले कि प्रश्न पडतो. या निरागस चेहऱ्याच्या , बोलक्या डोळ्याच्या ,निखळ हास्याच्या मुलाच्या नावापुढे मतीमंद हा शिक्का का बसावा ??दोष देवाचा कि दैवाचा ???

समाधान मिळावे म्हणून मग मीच स्वतःला समजावते कि ...तो चेहरा कायम निरागस राहावा , डोळे बोलके राहावेत आणि सगळे मिळूनही अतृप्त असणाऱ्या या जगात त्याचं निखळ हास्य असंच कायम राहावे म्हणून देवाने त्याला सगळ्यांपासून वेगळे घडवले आहे . अगदी वेगळे !!!

बांधकामाच्या वाळूवर डोंगर बनवणाऱ्या त्याला पहिले कि त्याच्या डोळ्यातली चमक , चेहऱ्यावरचा आनंद मला वेगळेच समाधान देऊन जातो !!! कदाचित या शहाण्यांच्या जगात कोणत्याही शहाणपणा शिवाय सच्च्या दिलाने , आनंदाने जगण्यासाठीच देवाने त्याला घडवले आहे !!!

गुलमोहर: 

< मग प्रतिसाद का ??? >
चांगलं लिहीणार्‍या लोकांचा नवा लेख आला की त्यावर धडाधड प्रतिसाद मिळतात. त्यात मग "पहिला प्रतिसाद माझा" असं करायला चान्स मिळत नाही. आणि मला आवडते चांगला लेख सर्वात पहिल्यांदा मीच वाचलाय ही भावना. म्हणुन...

आणि शेवटच्या ओळींमधुन समजतंय छान झालाय हाही लेख ते: -

<<चेहरा कायम निरागस राहावा , डोळे बोलके राहावेत आणि सगळे मिळूनही अतृप्त असणाऱ्या या जगात त्याचं निखळ हास्य असंच कायम राहावे म्हणून देवाने त्याला सगळ्यांपासून वेगळे घडवले आहे . अगदी वेगळे !!!>>

<<कदाचित या शहाण्यांच्या जगात कोणत्याही शहाणपणा शिवाय सच्च्या दिलाने , आनंदाने जगण्यासाठीच देवाने त्याला घडवले आहे !!!>>
---> फार महत्त्वाचं आहे हे..

खरंय.... आपण ह्या जीवांवर फक्त त्यांचं आयुष्य त्यांना निर्धोक जगता यावं ह्यासाठी आपल्या प्रेमाचं, मायेचं आणि सुरक्षेचं ऊबदार आवरण घालू शकतो! चांगला आहे लेख!

हि एक खरी गोष्ट आहे. त्यामुळे आपसूकच छान लिहिले गेले आहे .हा लेख एक वर्षापूर्वी सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला. त्यावेळचा संदर्भ असा होता कि आपल्या मतीमंद मुलीला घेऊन एका डॉक्टर बाई ने कात्रज घाटात जीव दिलेला. म्हणून हि गोष्ट लिहिली गेली होती.प्रतिक्रियांसाठी आभार.