पश्मीना

Submitted by विजयकुमार on 6 April, 2010 - 03:14

नदीवाकल्या पाउसचिंब झाडाला
वा-याने ढुशी द्यावी अन
सारे तुषार पाण्यावर झंकारून
तरंग उमटावे
तसं काहीसं आठवणींच असतं,
कुणीतरी समोरून जातं
मग सारी आठवणींची वर्तुळं
आयुष्य व्यापून टाकतात.

सतत स्वप्नात दिसणारं
कुणीतरी समोर दिसतं अवचित
तसं ते तिथच असतं
मग जाणवतं अरे हे तर तेच !
मग पानगळाल्या हिवाळ्यातल्या
झाडावर साठलेल्या दवांसारखं
उन्हात चमचमून
सारं प्रकाशोत्सवा सारखं होतं.

अंग झोब-या गार वा-यात
कुणीतरी समोर येतं,
पश्मीना शालीसारखं
मग काश्मीर झाली भावना
विस्तवदुरडी होवून
सारं जगणं उबदार बनवते,
जेव्हा ते अकस्मात निघून जातं
तेव्हा पश्मीना शालीसाठी
मारली जाणारी हरणं आठवतात
तडफडणारी.

उन्हाळ्यात सुकवल्या तेंदूची
गोठल्या हिवाळ्यात बिडी
करावी,
तसा तो सहवास
सारा सुगंधीत तंबाखूचा धूर
छाती भरून घेते,
थरथरणारं शरीर
गच्चगोठलं धुरांड होवून
फक्त बघत राहतं.

कधीतरी महाबळेश्वरच्या
हिमपावसात भिजल्यावर
ग्रेपवाईन मध्ये घेतलेला
तो आश्वासक पेग
अन
मग सा-या थंडीचा
केलेला विस्तव,
समुद्रकाठावरच्या विषम
शहरातसुध्दा
चटके देत राहतो.

चटक्यानंतर टम्म फुगलेल्या
फोडातून
लालसर पाणी वाहतं
मग जाणवतं
संपलेला तो सहवास,
मस्तकात उरलेली ती
थंडीची नशा,
बारच्या वातानुकुलीतात फक्त
भास होतात थंडपणाचे !
उष्णता तिथेच राहिली
आहे
ह्याचे प्रत्यंतर सतत येत रहाते
कारण
आता तू फोनसुध्दा उचलत नाहीस !

विजयकुमार.........
०८ . ०२. २०१०, मुंबई

गुलमोहर: 

बधीर करणारी कविता. पहिल्या ओळीतले जोड शब्द पाऊसचिंब आणि नदीवाकल्या- खूप आवडले.
' आठवणींची वर्तुळं आयुष्य व्यापून टाकतात'..खरंच.
चित्रमय शैली.

निव्व़ळ अप्रतिम!!
पुन्हा-पुन्हा वाचली....
हिवाळ्याचा आस्वाद घेत-घेत.....

ग्रेसचे "हिवाळ्यातील क्लरिअनेट" आठवले जरासे.